मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

आदित्यास पत्र


प्रिय आदित्य,

तुला नितांत गरज असलेल्या वार्षिक सुट्टीचा आजचा पहिला दिवस. ह्या वर्षातील घडामोडींचा आढावा घेत पुढील आयुष्यासाठी महत्त्वाच्या गोष्टीना एका आखीव स्वरूपात मांडण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे अशी समजूत करून घेत मी पुढील मुद्दे मांडत आहे. 

  1. सकाळच्या वेळी तू अधिक कार्यक्षम असतोस. लवकर शुचिर्भूत होऊन आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर तू अधिक वेळ घालवावा. महत्त्वाच्या गोष्टी ह्या संकल्पनेत कार्यालयीन कामाव्यतिरिक्त आई, भावंडं, पत्नी, मुलगा आणि नातेवाईक  ह्यांच्याशी सुसंवाद साधणे हे सुद्धा अपेक्षित आहे ह्याची तुला जाणीव असावी हे अपेक्षा. 
  2. तुझा मेंदू आणि मन सदैव उल्हसित, टवटवीत ठेवावास. हे दोघे तुझ्या शरीरात वास्तव्य करतात. त्यामुळं तुझ्या शरीराची काळजी घेणं हे ओघानं आलंच. वरणभात, भाजी हा आहार शरीराला सम्यक स्थितीत ठेवण्यासाठी उत्तम. झोपायला जाण्याच्या तुझ्या वेळेत दिवसेंदिवस उशीर होत आता ही वेळ रात्री अकरा वाजता (आणि पलीकडे) झाली आहे. ह्यावर वेळीच उपाययोजना करत, ही वेळ किमान साडेदहा वाजेपर्यंत आणावी. 
  3. दररोज किमान तीस मिनिटं चाल. तुला जाणवलं असेलच की चालण्यानं मेंदूला प्राणवायूचा पुरवठा होऊन चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात आणि तू अधिक कार्यक्षम होतोस. 
  4. ह्या वर्षात काही प्रसंगी तू चिडलास, भविष्यात सुद्धा हे असेच घडत राहील. तुझ्या मनाचा तोल जाण्याची घटना घडत असताना त्याची जाणीव व्हायला हवी जेणेकरून आपल्याकडून दुखावल्या जाणाऱ्या लोकांची संख्या आणि त्यांचं दुखावलं जाणं आटोक्यात ठेवता येऊ शकते. शांत झाल्यावर त्या लोकांशी जाऊन बोलणं महत्त्वाचं !
  5. आयुष्यात महत्त्वाच्या असे नातेवाईक आणि मित्र ह्यांना पारखण्यात आणि त्यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध कायम ठेवण्यात तू यश मिळवलेस. आयुष्यात एका विशिष्ट टप्प्यानंतर पैशाव्यतिरिक्त इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. म्हणून आयुष्यात ह्या लोकांना अग्रिम स्थान देणं तू चालू ठेवावंस. दुसऱ्या बाजूनं विचार करता तुझ्या आयुष्यात अशा काही व्यक्ती येत राहतील ज्यांच्याशी तुझं मनापासून कधीच जुळू शकणार नाही. तरीही त्यांच्याशी पूर्णपणे फारकत न घेता किमान पातळीवर संपर्क कायम ठेवता येणं तुला जमायला हवं 
  6. वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या बाबतीत तुझ्याकडून काडीचीही आशा बाळगणं चुकीचं ठरेल. त्यामुळं ह्याबाबतीत वाईट वाटणं सोडून दे ! आयुष्यात सर्वानांच सर्व गोष्टी जमत नाहीत
  7. घरी कागदपत्रांचे व्यवस्थित नियोजन करणे तुला अजिबात जमत नाही. किमान सर्वात महत्वांच्या अशा कागदपत्रांची यादी करुन ती कागदपत्रं सांभाळून ठेव जेणेकरून प्रत्येकवेळी त्यांचा शोध घेण्यातील तुझा वेळ वाचेल. 
  8. सत्तरी - ऐंशीतील मोजक्या जुन्या गाण्याव्यतिरिक्त जगात अजूनही चांगलं संगीत आहे ह्याची जाणीव ठेव. तरीही हीच गाणी ऐकण्याचा अट्टाहास असेल तर कानात हेडफोन घालून ऐक. 
  9. रात्रीच्या जेवणाची वेळ आठच्या आत ठेवण्यात तुला बऱ्यापैकी यश मिळालं आहे. ही सवय कायम ठेव. रात्रीच्या जेवणाची वेळ दहाच्या पलीकडे गेल्यास हे जेवण टाळणं उत्तम 
  10. घरी गाणी म्हणण्याच्या तुला मिळालेल्या परवानगीचा दुरुपयोग करू नकोस. कदाचित ती रद्द होऊ शकते. 
  11. आपल्या पूर्वापार आवडीकडं, मुळांकडे जाण्यासाठी ह्या सुट्टीचा वापर कर. रात्रीच्या आकाशाकडं पाहत ह्या ताऱ्याकडून निघालेल्या प्रकाशानं पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खरोखरच काही वर्षे घेतली असतील का हा विचार तुझ्या मनात येऊन कित्येक वर्षे झाली. 
  12. वाडीत जा, तिथल्या झाडांशेजारी बस. झाडांभोवताली फिरणाऱ्या मुंग्या, कीटक, फुलपाखरं ह्यांचं निरीक्षण कर. जग वैविध्यपूर्ण आहे. दररोज तुला जो काही जगाचा मर्यादित नजारा दिसतो तो नजारा म्हणजेच संपूर्ण जग आहे अशी चुकीची समजूत करुन घेऊ नकोस. 
  13. मराठी / हिंदी मालिका अधुनमधून पाहत जा. जरी ह्या मालिका मूर्खपणाची हद्द गाठत असल्या तरी ह्या मालिका म्हणजे जीव की प्राण असणाऱ्या हजारो लोकांमध्ये आपण राहत आहोत ह्याचं भान तुला असणं आवश्यक आहे. 
  14. भोवतालच्या वयस्क लोकांशी बोलत जा. त्यांच्याकडं असणाऱ्या ज्ञानाच्या खजिन्याचा तुला खूप फायदा होऊ शकतो. त्यासाठी त्यांच्याशी तुला संवाद साधता यायला हवा, त्यांना बोलतं करता यायला हवं. जगात गोष्टी झपाट्यानं बदलत आहेत असं जरी आपल्याला वाटत असलं मूळ प्राथमिक गोष्टी, शहाणपणा कायमच राहत असतो. 
  15. तुझ्या मुलाचं नीट निरीक्षण कर, त्याचं बोलणं मन लावून ऐक. "मला तुला शहाणपणाचे दोन शब्द ऐकवू देत" ह्या कायमच्या मनोवृत्तीतून बाहेर ये! नवीन पिढीकडे पाहण्यासाठी, त्यांना समजावून घेण्यासाठी सोहम महत्त्वाची संधी आहे हे ध्यानात ठेव 
  16. वरील मुद्दा खरा असला तरीही जगाला तुझ्या ब्लॉगपोस्ट्सची गरज आहे ज्याद्वारे तू जुन्या चालीरीतींचे, संस्कृतीचे, मूल्यांचे  गुणगान गात असतोस. त्यामुळं तुझं लिहिणं चालू ठेव 
  17. वर्षभरात तीसहुन अधिक दिवस असे होते ज्यादिवशी एका दिवसात तू पंचवीसपेक्षा जास्त बुद्धिबळाचे ऑनलाईन सामने खेळलास. आता तुझ्यात लक्षणीय सुधारणा होण्याची तिळमात्र शक्यता नाही आणि तू एखादी स्थानिक स्पर्धा सुद्धा जिंकू शकत नाहीस. त्यामुळं ह्याबाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवलेलंस बरं !
  18. २०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून फारशा अपेक्षा ठेऊ नकोस. त्यांच्या खराब कामगिरीनंतर त्या कामगिरीचे विश्लेषण करण्याचा विचारसुद्धा मनात आणू देऊ नकोस. चुकूनमाकून त्यांनी तुला खोटं ठरविले तर ही पोस्ट एडिट करून "मी चुकलो" असे वाक्य टाक.    
  19. पुढील पंधरा दिवसांत सर्व गॅझेटपासून सातत्यानं किमान दोन तास दूर राहण्याचा प्रयत्न कर 

 हे वर्ष तू बऱ्यापैकी चांगलं निभावलंस. तुझ्या भूमिकेत एक वर्ष निभावण्यासाठी दररोज नेकीचे प्रयत्न करावे लागतात, ते तू केलेस. त्याबाबत सार्थ अभिमान ठेव. "आपल्या मूळ रूपापासून फारशी फारकत घेऊ नकोस" शेवटी तेच महत्त्वाचं आहे. 

तुझा विश्वासू,
आदित्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...