बुधवार, २० डिसेंबर, २०२३
मुंबईचे, मुंबईकराचे खरे नाही!
रविवार, १० डिसेंबर, २०२३
झिम्मा २
समाजातील सृजनशीलता झपाट्यानं लोप पावत आहे किंवा माहितीमायाजालावरील माहितीच्या स्फोटामध्ये ती कुठंतरी दडून बसत आहे. सहजरित्या उपलब्ध असलेल्या कलाकृतींचा आस्वाद घेतांना सृजनशीलतेच्या बाबतीत पदरी निराशाच पडण्याची शक्यता असते.
कोणत्याही कलाकृतीचा जीवनप्रवास ही खरंतर एक अभ्यासण्याजोगी घटना असायला हवी. कथेतील मूळ कल्पनेचा उगम, तिचं विस्तारीकरण ह्यात लेखकांची प्रतिभा, त्यांच्या कल्पनाशक्तीने घेतलेल्या भराऱ्या ह्याचे वाचक प्रत्यक्ष साक्षीदार नसले तरी त्या कलाकृतीचा आनंद घेताना संवेदनशील वाचकांना त्याची अनुभूती मिळायला हवी. इथंच खरं कथाकार आणि वाचक ह्यांचं एक अदृश्य, घट्ट नातं जुळतं. जेव्हा ही कथा नाटक, चित्रपटाच्या माध्यमांद्वारे आपणांसमोर सादर केली जाते त्यावेळी खरंतर दिग्दर्शकाच्या कौशल्याची कसोटी असते. मूळ कथेच्या गाभ्याला फारसा धक्का न लावता नाटक, चित्रपट माध्यमांना योग्य अशा स्वरूपात ही कलाकृती सादर करणे म्हणजे तारेवरील कसरत असते.
आठवडाभर कार्यालयीन कामात जुंपून घेतल्यानंतर फुरसतीच्या वेळात वयानुसार निर्माण झालेल्या आवडीमुळे चांगल्या नाटक, चित्रपटाच्या शोधात असलेला मी ! खरा प्रश्न इथं आहे. चांगलं म्हणजे नक्की काय? आपल्याला नक्की काय आवडतं ह्यावर आपण फारसा विचार करत नाही. काल पाहिलेल्या झिम्मा २ ह्या चित्रपटाच्या कालावधीत विचार करण्यासाठी खूप वेळ मिळाला. चित्रपटाला कथा म्हणून काही नव्हतीच. लेक डिस्ट्रिक्टची निसर्गरम्य पार्श्वभूमी ही चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू! मी आणि प्राजक्ता चित्रपट संपल्यानंतर कथेच्या, त्यातील पात्रांच्या, व्यक्तिमत्त्वांच्या किंवा चित्रपटातील नात्यांच्या खोलीविषयी बोलत होतो. काही इंग्लिश चित्रपटात कथेला मोठा जीव नसला तरीही त्यातील संवादातील आणि नात्यांतील विविध छटांच्या सादरीकरणामुळं ते प्रेक्षणीय बनतात. आमच्या चांगल्या चित्रपटाच्या व्याख्येत ह्या बाबींचा समावेश होतो.
चित्रपटात विविध वयोगटातील भाराभर नायिका आणि मोजून दोन पुरुष व्यक्तिमत्वे आहेत. इंग्लिश व्यक्तिमत्वाला नायक म्हणायला वाव नसल्यानं दोन नायक म्हणण्याचं जाणीवपूर्वक टाळलं आहे, इतकी सगळी पात्रं आपली भूमिका कशी उत्तम होईल ह्याकडेच लक्ष देत आहेत असं वाटत राहतं. त्यामुळं अधूनमधून येणाऱ्या शाब्दिक कोट्यावर आपण मनमुराद हसत राहतो. चित्रपट कोणत्याही क्षणी संपला असं सांगितलं तरीही आपल्याला काही फरक पडेल असं वाटत नाही. त्यामुळं खरोखरच ज्यावेळी चित्रपट संपतो तेव्हाही आपल्याला काही वाटत नाही. पार्किन्सन ह्या गंभीर आजारासंदर्भात देण्यात आलेला सामाजिक संदेश ओढूनताणून आणल्यासारखा वाटतो. ना धड तो संदेश दिला जात नाही ना चित्रपटाच्या कथेला त्यामुळं वाव मिळतो / गती मिळते. चित्रपट ही काही मिसळ वगैरे नाही ज्यात नामांकित कलाकार, निसर्गरम्य पार्श्वभूमी, सामाजिक संदेश वगैरे एकत्र आणलं की एक चांगली कलाकृती बनेल.
मराठी चित्रपटांचे उभरत्या इंग्लिश कलाकारांना योगदान ह्या मुद्द्यावर ह्या चित्रपटाला गुण प्रदान करता येतील. झिम्मा ३ / ४ वगैरे भागात जर्मन, फ्रेंच, इटली वगैरे देशांतील कलाकारांचा विचार करता येऊ शकेल.
असे चित्रपट शहरी भागातील स्त्रीच्या समस्यांना कितपत योग्य स्वरूपात सादर करतात ह्याविषयी मोठी साशंकता निर्माण होते. व्यक्तिरेखांच्या खोलीच्या अभावी ह्या स्त्रियांच्या समस्यांशी आपण फारसे जोडले जात नाहीत. मूलभूत सुविधा नसलेल्या गावात अगदी तुटपुंज्या पैशात आपला संसार चालविणाऱ्या स्त्रियांविषयी झिम्मा ३ - ४ वगैरे यायला हवा असा विचार मनात येतो.
बाकी इनऑर्बिट मॉलमधील चित्रपटगृह खचाखच भरलं होतं. एक चांगला लेखक आणि एक यशस्वी लेखक ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे गालिब नाटकातील वाक्य चित्रपटांना सुद्धा लागू होते असं वाटलं. पॉपकॉर्नची पाचशे रुपयांच्या वरील किमतीची पुडकी विकत घेऊन चित्रपटगृहात वचावचा आवाज करत खाणारी टाळकी मोजकीच होती. सिनेमागृहातील आवाजाची पातळी काही वेळा कर्कश होती. प्रेक्षकांच्या श्रवणयंत्रावर, हृदयाच्या ठोक्यांवर विपरीत परिणाम करणारी अशी होती. ह्यावर कोणीही आवाज उठविलेला दिसत नाही. जाहिरातींचा अतिरेक झाला होता. चित्रपटातील एकही गाणं लक्षात राहण्यासारखं नव्हतं. मॉलच्या फूड कोर्टमध्ये खचाखच नसली तरी बऱ्यापैकी गर्दी होती. पाश्च्यात्य देशांतील कंपनीमध्ये काम करून पैसा कमाविणारे बरेच लोक पाश्चात्य खाद्यपदार्थांवर पैसे खर्च करत होते. मॉलमधून बाहेर पडताच मेट्रो स्टेशन आहे. त्याद्वारे प्रयेकी वीस रुपयांच्या तिकिटात दहा बारा मिनिटांत वातानुकूलित ac डब्यात बसून घरी पोहोचलो. रिक्षात बसून शंभर रुपये खर्च करत प्रदूषणात बसून घरी पोहाचण्यापेक्षा हे खूप बरं ! एकंदरीत देशाचे बरं चाललं आहेत. तुम्ही वर्तमानपत्रं, त्यातील अग्रलेख न वाचता शहरात फिरत राहिलात तर लाईफ इज चकचकीत ! आयुष्य सुंदर आहे !
सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३
गालिब - एक सुरेख कलाकृती !
नाटक पहावं ते कशासाठी ? चांगलं नाटक पहावं ते सद्ययुगात जुन्या संकल्पनांवर आधारित आयुष्य जगण्याच्या आपल्या श्रद्धेला दुजोरा देण्यासाठी. आपल्याभोवताली उथळ गोष्टींचे पेव फुटले आहे. अशा उथळ गोष्टींना प्रसिद्धी मिळवून देणारी यंत्रणा सुद्धा अस्तित्वात आहे. बॉम्बे टाइम्समध्ये कोणाही ऐऱ्यागैऱ्याचा फोटो येतो; आपण यशस्वी कसे बनलो, तुम्ही यशस्वी कसं बनू शकता याविषयी ज्ञान पाजळणाऱ्या चार गोष्टी सांगणाऱ्या या तथाकथित सेलेब्रिटी लोकांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या जातात. आपल्याला अशी प्रसिद्ध व्यक्ती का माहिती नाही याविषयी काहीसं अपराधित्व मनात दाटून येतं. कालच्या नाटकात इरा ज्यावेळी अंगद दळवीला मला अनन्या पांडे माहिती असणे अपेक्षित आहे का असा प्रश्न विचारते त्यावेळी आपण तिच्याशी रिलेट होतो; तिच्या भावना समजून घेऊ शकतो. अजूनही सखोल गोष्टींचा विचार करणारी माणसं जगात आहेत ह्या जाणिवेनं मन सुखावतं.
नाटकात एक वाक्य आहे. यशस्वी लेखक होणे आणि चांगला लेखक होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हल्ली या दोन्हींचा प्रवास अगदी विरुद्ध दिशेने चालू आहे. हल्लीच्या जगातील ह्या कटू सत्यावर ही अगदी मार्मिक टिपण्णी आहे.
नाटक पहावं ते कशासाठी ? चांगलं नाटक पहावं ते त्यातील कलावंतांच्या मेहनतीला दाद देण्यासाठी! पूर्वीच्या काळातील तपश्चर्या करणारे ऋषीमुनी प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं नाही. नाट्य कलाकारांची तपस्यासुद्धा थक्क करण्यासारखी असते. जवळपास अडीच तीन तास चालणाऱ्या या नाटकातील संवाद त्यातील छोट्या मोठ्या जागा पकडत प्रत्येक प्रयोगात त्याच खुबीनं सादर करणाऱ्या कलावंतांना मला सलाम करावासा वाटतो. कलावंतांचा अभिनय, डोळ्यातील भाव, संवादफेक, रंगमंचावरील जागेचा त्यांनी केलेला योग्य वापर सारं काही पाहण्यासारखं असतं. अर्ध्या मिनिटात दुसरा पेहराव परिधान करत दुसऱ्या प्रसंगात अगदी अलगदपणे सामावून जाणं हे केवळ असे कलाकारच करू जाणे. चांगली मराठी नाटक मला थक्क करतात.
नाटक पहावं ते कशासाठी ? चांगलं नाटक पहावं ते सखोल अनुभूती देणाऱ्या आनंदानुभवाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी, सखोल संवादांसाठी! त्यातील काही वाक्यं सदैव स्मरणात ठेवून देण्यासारखी असतात; जीवनातील मूल्यांविषयी आपला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित करणारी असतात. गौतमीच्या डोळ्यात एकाचवेळी मांजरीचं धुर्तपणा आणि हरिणांचे बावरेपण दिसतं असं विराजस म्हणतो. त्या हरिणांचे बावरेपण मी कायम हृदयात बाळगून असते असं गौतमी म्हणते तो प्रसंग लक्षात राहणारा !
नाटक पहावं ते कशासाठी? चांगलं नाटक पहावं ते त्यातील कलाकारांतील केमिस्ट्रीसाठी! गौतमी आणि विराजसची केमिस्ट्री "माझा होशील ना "पासून खूप जुळणारी. रंगमंचावर त्यांची ही केमिस्ट्री पाहणं, तिचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे खूपच भावून जाणारं!
नाटक पहावं ते कशासाठी? चांगलं नाटक पहावं ते त्यातील कलाकार ज्या पद्धतीनं भूमिकेशी एकरूप होतात हे अनुभवण्यासाठी! नाटकातील आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी ज्या पद्धतीने ते व्यक्तिरेखेशी एकरूप होतात आणि प्रत्यक्ष आयुष्यात ज्या गोष्टी ते कदाचित करू शकणार नाहीत त्या गोष्टी रंगमंचावर इतक्या सहजतेने करतात ते पाहून थक्क व्हायला होतं. गौतमी ज्या पद्धतीने अत्यंत सहजतेने शिव्यांचा वापर करते ते पाहून काहीसा धक्का बसतो पण त्याच वेळी तिच्यातील कलाकाराला सलाम करावासा वाटतो. मृण्मयी आणि गौतमी देशपांडे या अत्यंत गुणी कलाकार भगिनी! काल तर गौतमीमध्ये मृण्मयीचाच जास्त भास होत होता. त्या दोघींच्या डोळ्यांत, हावभावांत एक प्रकारचा खट्याळपणा दडलेला आहे असं मला सतत वाटत राहतं. ज्या मिश्कीलपणे तो खट्याळपणा त्या आपल्यासमोर आणतात त्याला तोड नाही. गौतमीने ज्या पद्धतीने हृद्य, भावनिक प्रसंगांचं सादरीकरण केलं ते केवळ अप्रतिम! उच्चारातील सुस्पष्टता हा ह्या दोन्ही भगिनींचा प्लस पॉईंट. एका प्रथितयश साहित्यिकाच्या मुलीची भूमिका बजावताना गौतमीने दर्जेदार मराठी, संस्कृत भाषेतील संवादफेकीची बहार उडवून दिली आहे. गौतमीने ज्या पद्धतीने जुन्या काळातील विविध श्लोक, संस्कृतरचना अस्खलितपणे स्पष्ट उच्चारासहित सादर केल्या आहेत त्याला तोड नाही.
विराजस हा अत्यंत गुणी, नो नॉन्सेन्स कलाकार आहे. मला तो खूप आवडतो. गौतमीच्या खट्याळपणाला त्याचा गंभीरपणा अगदी खुलून दिसतो. त्याच्या अभिनयात एक प्रकारचा संयतपणा आणि उगाचच ओढूनताणून आणलेल्या आक्रस्ताळेपणाचा पूर्णपणे अभाव या चांगल्या गोष्टी आढळतात. अभ्यास, कष्ट करून आपल्या आणि कुटुंबियांच्या जीवनात स्थैर्य, सुख आणून देण्यासाठी धडपडत असणाऱ्या मराठी मुलांचे प्रतिनिधित्व करणारा असा तो मला वाटतो. मुल्यांची जाण असणे वेगळं पण व्यवहाराशी जमवून घेण्यासाठी एका मर्यादेपर्यंत या मूल्याशी तडजोड करण्याची तयारी असणारं असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्यानं साकारलेल्या आतापर्यंतच्या भूमिकेत हे हा एक समान धागा आहे असं मला वाटत राहतं.
नाटक पहावं ते कशासाठी? चांगलं नाटक पहावं ते कोणत्याही गॅजेटच्या माध्यमाच्या मदतीशिवाय एखादा कलाकार आपल्या रसिकांसमोर, चाहत्यांसमोर आपली कलाकृती सादर करतो, त्यावेळच्या एका समृद्ध अनुभवाचे साक्षीदार होण्यासाठी!
नाटक पहावं ते कशासाठी? चांगलं नाटक पहावं ते जीवनातील जुन्या मूल्यांची उजळी करून घेण्यासाठी. भोवताली दोन वेगळ्या पद्धतीच्या विचारपद्धती अस्तित्वात आहेत. तथाकथित यशाच्या सामाजिक प्रतिष्ठेच्यापाठी लागून सदैव धडपड करीत राहणं योग्य आहे हे मानणारी एक विचार पद्धती तर जीवन आपल्या वेगाने मर्जीने, संथगतीने पण सखोल जीवनानुभव घेत जगण्यावर विश्वास असणारी! रेवा पहिल्या प्रकारात मोडणारी तर इरा ही दुसऱ्या! नाटक कोणत्याही एका विचारसरणीच्या बाजूनं न झुकता दोन्ही बाजू आपल्यासमोर उलगडत जातं.
नाटक पहावं ते कशासाठी? चांगलं नाटक पहावं ते त्यातल्या दडून बसलेल्या प्रतिकात्मक संदेशांसाठी! प्रत्येक रसिकाने आपापल्या परीने, आपल्या बुद्धीने आपल्याला आवडेल तसं त्याचं रसग्रहण करावे. स्टेजवरील कारंजे बहुदा मानव किर्लोस्कर यांच्या प्रतिभेच्या जिवंतपणाचे प्रतीक आहे. ज्यावेळी मानव किर्लोस्कर आपल्या लेखणीने साहित्यक्षेत्रात बहार उडवून देत असतात त्यावेळी हे कारंजे हवेत उडणाऱ्या आपल्या थुईथुई तुषारांनी वातावरणात प्रसन्नता आणत असतात. परंतु ज्यावेळी मानव किर्लोस्कर आपले मानसिक स्वास्थ गमावून बसतात त्यावेळी या कारंजाचे तुषार आपोआपच लुप्त होतात. या नाटकात मुंबई आणि पुणे या शहराची अदृश्य तुलना जाणवते. मुंबई हे शहर व्यावहारीक लोकांसाठी योग्य; जिथे पैसा कमावण्यासाठी लोकांनी जावं आणि यशस्वी बनावं. कदाचित आपल्या मूल्यांची तडजोड करीत! परंतु पुणे हे शहर मात्र कलेशी एकनिष्ठ राहणाऱ्या लोकांचं! हे झालं माझं निष्कर्ष काढणं
पूर्वीचा समाज वेगळा होता. बुद्धिमान लोकांना समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नसत. त्यांना आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्याची गरज भासत नसे. आजच्या काळात सर्वसाधारण समाजातील ऐरागैरा माणूससुद्धा आपल्याला विद्वान समजू लागल्यामुळे दैनंदिन जीवनात बुद्धिमान लोकांना सहजासहजी प्रतिष्ठा मिळत नाही. त्यासाठी त्यांना बुद्धिमान लोकांना त्यांच्या बुद्धिमत्तेची जिथं कदर केली जाते अशा शिक्षणसंस्था किंवा कंपन्यांमध्ये जावं लागतं. पण तिथं त्यांना आपल्या काही मूल्यांना, तत्त्वांना आणि असल्यास एककल्लीपणाला काही प्रमाणात मुरड घालावी लागते. पण जर का ही तडजोड करण्याची अशा बुद्धिमान माणसांची तयारी नसेल तर मग ते समाजात आपल्या बुद्धिमत्तेचे ओझे बाळगत काहीसे एकटे पडत जातात. आपल्या बुद्धिमत्तेला समाज दाद देत नाहीत याची खंत बाळगत जीवन जगत राहतात. इराची गोष्ट काहीशी अशीच! नाटक हाच मुद्दा अजून एका वेगळ्या पद्धतीने अधोरेखित करते. इराने आपली १८ ते २५ ही उमेदीची वर्ष वडिलांच्या सेवेत घालवली. प्रेक्षकांना तिच्या त्यागाविषयी आदर आणि ह्या काळात त्या दोघांकडे क्वचितच येणाऱ्या तिच्या बहिणीविषयी प्रथम संताप निर्माण होतो. परंतु ज्यावेळी इरा हा त्याग करत असते त्यावेळी त्यांची आर्थिक बाजू मात्र तिची मोठी बहिणच सांभाळत असते; तेही मुंबईत जगण्याची कसरत करीत! हा मुद्दा ज्यावेळी ती मांडते त्यावेळी आपल्याला आपण करून घेतलेल्या पूर्वग्रहाविषयी पुनर्विचार करावासा वाटतो.
कलाकार बऱ्याच वेळा कलेसाठी आपला आयुष्य खर्ची घालतात. असं करत असताना त्यांना आर्थिक गणिताची बाजू सांभाळता येत नाही. त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या संसाराची होणारी कुतरओढ याचा मुद्दा हे नाटक अधोरेखित करतं. बाहेरच्या दुनियेसाठी आकाशाला भिडणारी अशी ज्यांची प्रतिमा असते अशा वडिलांचे त्यांना न जमलेल्या आर्थिक गणितामुळे ज्या प्रकारचे वास्तववादी चिरफाड रेवा करते त्यावेळी कलाकारांच्या जीवनाची ही दुखरी नस हे नाटक आपल्यासमोर आणतं.
या नाटकात रेवा, इरा या सिगारेट, टकीला वगैरे गोष्टींचा वापर करताना आढळतात. जमल्यास हा भाग टाळावा ही निर्माता आणि दिग्दर्शकांना विनंती. विश्वचषक अंतिम सामन्याच्या दिवशी या नाटकाला उपस्थिती लावणाऱ्या प्रेक्षकांचे गौतमी, विराजस आणि सहकाराकारांनी नाटक संपल्यावर खास आभार मानलं हे खूप चांगलं वाटलं. त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्याची इच्छा होती. पण त्यांच्याशी नक्की काय बोलावं याचा विचार न करता आल्यानं हा विचार टाळला.
सद्यकाळातील अभिनयाची उंच पातळी गाठून देणारे हे मराठी भाषेतील दोन पट्टीचे तरुण कलाकार! चांगलं नाटक आणि यशस्वी मराठी नाटक या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत हे जर आपल्याला सिद्ध करून द्यावसं वाटत असेल तर नक्कीच हे नाटक आपण बघावं ही माझी कळकळीची विनंती! मराठी नाटक हा मराठी संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि आपण आपल्या परीनं तो टिकवण्याचा प्रयत्न करावा. इतके अथक प्रयत्न करून एक नितांतसुंदर कलाकृती सादर करणाऱ्या कलाकारांसमोर रिकाम्या नाट्यगृहासमोर ही कलाकृती सादर करण्याची वेळ पुन्हा येऊ नये अशी माझी मनोमन इच्छा!
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ खेळत असताना मी हे नाटक पहायला जाणं ही माझ्यासाठी मोठी बाब असेल असं मला वाटत होतं. पण का कोणास ठाऊक हा योग्य निर्णय असेल असंच मला वाटत राहिलं. त्यांच्यावरील हा विश्वास सार्थ ठरविणाऱ्या गौतमी आणि विराजसचे मनःपूर्वक आभार. असे कलाकार एकंदरीत मराठी नाट्यभूमीला पुढील काही काळासाठी एक नवचैतन्य देत राहतील !
रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३
Yen Can Cook -चिकन झंझावाती
रविवार, १ ऑक्टोबर, २०२३
स्वप्नरंजन
"सुदैवी आहेत जे त्यांनी नियोजित निवृत्तीचा क्षण अनुभवला" ह्या अर्थाचा शेर ह्यांनी मिर्झा गालिब ह्यांनी उर्दूत जर लिहिला असता तर आज मला इथं तो उद्धृत करता आला असता. त्यांनी तसं काही लिहिलं नसावं आणि जरी लिहिलं असलं तरी ते माझ्यासारख्या मर्यादित वाचन करणाऱ्या माणसाच्या वाचनात येण्याची शक्यता तशी कमीच !
हल्लीच्या काळात काही विशिष्ट वर्षांच्या अनुभवानंतर व्यावसायिक जीवनात येणारं प्रत्येक वर्ष हे बोनस म्हणूनच समजावं ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळं अगदी सविस्तर जरी नसलं तरी निवृत्तीनंतरचं नियोजन काही अंशी आपल्या मनात तरी तयार असावं ही माझी विचारधारणा. त्यामुळं निवृत्तीनंतर करावयाच्या काही ठळक गोष्टींची माझ्या मनातील यादी आज कागदावर उतरवत आहे.
१. जंगल लागवड - बऱ्याच काळापासून हे माझ्या मनात घोळत आहे. आता लागवड केलेलं जंगल अगदी घनदाट होण्यासाठी कित्येक वर्षे जाणार, त्यामुळं मला ह्यासाठी आधीच उशीर झाला आहे, तरीही ह्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार. जमेल इतकी मोठी जमीन विकत घेऊन पारंपरिक डेरेदार वृक्षांच्या बियांची त्यात पेरणी करणार. मध्यावर काही मोजकी तळी असावीत. ह्या जंगलात चालत जाण्यासाठी सुद्धा पायवाट उपलब्ध नसावी. हळूहळू पक्षी येऊन इथं आपलं वास्तव्य करतील. त्यांच्या मधुर रवाने जंगलाचा परिसर प्रसन्न होऊन जाईल. वृक्ष इतके घनदाट होतील की ते सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करण्यासाठी उंच उंच वाढत जातील. संध्याकाळी जंगलात चालत गेल्यावर थंड वाऱ्याची झुळूक आपल्याला सुखावून जाईल. मावळत्या सूर्याची किरणे जंगलातील झाडांमधून मार्ग काढत कशीबशी आपल्यापर्यत पोहोचतील. भास्कराचे ते दर्शन नयनांना आल्हाददायक ठरेल.
हळूहळू माझ्या भोवतालच्या परिसरात माझ्या सारखेच निसर्गप्रेमी असाच उपक्रम राबवतील आणि एक मोठालं जंगल जिथं प्राणवायूचा अगदी मुबलक पुरवठा होईल, पक्ष्यांचे मधुर आवाज कानावर पडतील उदयास येईल ! कदाचित वाघ - सिंह सुद्धा तिथं वास्तव्यास येतील.
२. प्रवास - जगभरातील अफाट, वैविध्यपूर्ण निसर्ग पाहण्यासाठी मी भटकंतीवर निघीन. पुन्हा जंगलांत भटकंती करणं हा माझा प्राधान्यक्रम असेल. त्यासाठी आवश्यक असलेली काटक प्रकृती बनविणे आवश्यक असेल. ती मेहनतीनं कदाचित मी बनवीन सुद्धा पण जंगलात भटकण्यासाठी लागणारी हिंमत आणणं हे मात्र जरा जिकिरीचं काम असेल. त्यासाठी मात्र सुनियोजित असा उपाय काही नसतो.
प्रवासात वेगवेगळ्या माणसांना भेटून त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा अभ्यास करणं हे माझ्या यादीत वरच्या क्रमांकावर असेल. काळ पुढे जात असला तरीही जुन्या विचारसरणीची माणसं जगात अस्तित्वात आहेत आणि राहतील ह्या सिद्धांतावर माझा विश्वास आहे. ह्या सिद्धांताला पुष्टी देणाऱ्या माणसांना भेटण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. माझा प्रवास, मला भेटलेली ही माणसं, मी भेट दिलेली जंगलं, त्यात भेटलेले पशु, पक्षी ह्यावर खूप खूप लिहीन.
३. क्रीडा - जगभरात वर्षभर विविध क्रीडास्पर्धा होत असतात. वर्षभरात ह्या सर्व क्रीडास्पर्धा दूरदर्शनसंचावर आणि शक्य असल्यास प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहीन. प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन पाहण्याच्या यादीत प्राधान्यक्रमावर खालील क्रीडास्पर्धा असतील
अ - एडन गार्डन्स, मेलबॉर्न आणि लॉर्ड्स येथील कसोटी सामने
ब - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना
क - वसई मैदानावर पूर्वी दोन दिवसांचे क्रिकेटचे अंतिम सामने होत असत. त्यातील होळी विरुद्ध पारनाका ह्या संघातील अंतिम सामना
ड - न्यूझीलंडच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याची पार्श्वभूमी लाभलेल्या क्रिकेट मैदानावरील एक दिवसीय (दिवस - रात्र) अंतिम सामना. ह्यात रात्री नऊ वाजता वगैरे मावळणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांत न्हाऊन निघालेलं ते हिरवेगार मैदान !
ई - विम्बल्डन स्पर्धेचा पुरुष गटातील अंतिम सामना.
फ़ - मुंबई विरुद्ध दिल्ली रणजी अंतिम सामना
४. अध्यापन - एक मराठी माध्यमाची शाळा सुरु करून त्यात अगदी तीस - चाळीस वर्षांपूर्वीचं वातावरण निर्माण करायचं. मुलांना मराठीतील गाजलेल्या लेखकांच्या साहित्यकृती जसे की स्वामी, पानिपत, श्रीमान योगी वगैरे. साने गुरुजींच्या गोष्टी सुद्धा ह्या मुलांना वाचायला मिळाव्यात. महाराष्ट्राचा इतिहास त्यांना कळायला हवा. गाजलेल्या कवींच्या कवितांचं रसग्रहण करण्याचा अनुभव त्यांना मिळायला हवा. इतकं सारं करताना त्यांना आधुनिक जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक सर्व शिक्षणसुद्धा योग्य त्या माध्यमातून दिलं जाईल. त्यात मी दहावीपर्यंत गणित हा विषय शिकवीन.
५. वाचन - मराठी आणि इंग्लिश भाषांतील नावाजलेल्या साहित्याचे अगदी सखोल वाचन करणार. (बहुदा हे एकाग्रतेनं करण्यासाठी मी जोपासलेल्या जंगलात वास्तव्य करावं लागणार). हे वाचन केल्यानंतर त्याचे रसग्रहण करणाऱ्या ब्लॉगपोस्ट्स लिहिणार.
ह्याला आज नक्की झालं काय असं आपल्याला कदाचित वाटलं असणार. मला जवळून ओळखणाऱ्या लोकांना बहुदा ही शंका येणार नाही. कधी नव्हे ती सतत तीन दिवस सुट्टी आल्यानंतर आणि सलग आठ तास कंपनी ई-मेल कडे लक्ष न दिल्यावर मिनी निवृत्तीचे विचार मनात आले ह्यात आश्चर्य नाही. पण खरोखर ह्यातील थोड्याफार गोष्टी जरी करता आल्या तर मी स्वतःला धन्य समजीन !
रविवार, २४ सप्टेंबर, २०२३
वैचारिक सुस्पष्टता
आपलं स्वतःच असं एक जग असतं. या जगात आपण, आपला मेंदू, आपलं मन, आपलं वैयक्तिक / व्यावसायिक जीवन सारं सारं काही असतं. जीवनात आपण काही गोष्टी मनापासून करत असतो तर बरंच काही एक व्यक्ती म्हणून आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पडण्यासाठी करत असतो. जस जसं आपलं वय वाढत जातं तसं जबाबदाऱ्यांचं ओझं वाढत जातं.
जबाबदाऱ्या तर सर्वांनाच असतात पण त्याचं ओझं बनवायचं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. जबाबदारीचं ओझं बनणं हा एक प्रवास असतो. ह्या प्रवासाची प्रामुख्याने दोन कारणे असतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्या पार पडण्याची मनापासून इच्छा उरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पार पडण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक किंवा मानसिक ताकद आपण आपल्यापाशी नसते. जबाबदाऱ्यांनी त्रासलेली माणसं सदैव आपल्या भोवती दिसत असतात किंवा आपणच जबाबदाऱ्यांनी त्रासलेलो आहोत हे आपल्याला जाणवत असतं.
जर आपल्याकडे विचारांची सुस्पष्टता असेल तर जबाबदाऱ्यांचं ओझं बनवायचं आपण टाळू शकतो. यासाठी विविध तंत्रांचा वापर करण्याचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे.
१) पहिली गोष्ट म्हणजे आपल्यासमोर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व एका कागदावर लिहून काढाव्यात. यामध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांची यादी वेगवेगळी असावी.
२) वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये आपला वेळ कसा विभागावा याची सुस्पष्टता सुरुवातीलाच आपल्याकडं असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ वैयक्तिक जबाबदाऱ्यांना ६० टक्के वेळ आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांना ४० टक्के वेळ! ह्यात छंदाला वेगळा वेळ द्यायचा की नाही हा सुद्धा महत्वाचा निर्णय तुम्हांला घ्यायचा असतो. हा मुद्दा अगदी महत्वाचा आहे, आयुष्यात आपल्याला नक्की महत्वाचं काय आहे ह्याचा निर्णय तुम्हांला घेता आला पाहिजे आणि आपण असा निर्णय का घेत आहोत हे तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींना स्पष्ट करून सांगता आलं पाहिजे.
३) त्यानंतर यातील दोन्ही यादीतील सर्व जबाबदाऱ्यांना प्राधान्यक्रमाच्या उतरत्या मांडणीने लिहून काढाव्यात. म्हणजे सर्वात महत्त्वाची जबाबदारी आधी आणि त्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या उतरत्या क्रमाने!
४) हे सर्व लिहून झाले की मग या जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती साधनं, तंत्रं आणि मार्ग उपलब्ध आहेत याचीही यादी बनवावी. एखादी जबाबदारी पार पडण्यासाठी जर आपल्याकडे विविध पर्याय उपलब्ध असतील तर त्यातील नक्की कोणत्या तंत्राचा वापर करावा याचा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे.
५) बऱ्याच वेळा हा निर्णय न घेता आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये उगाचच क्लिष्टता निर्माण होते. योग्य वेळी निर्णय न घेता येणे आणि परिपूर्णतेचा अट्टाहास धरणे या दोन कारणांमुळे आपल्या जबाबदाऱ्या बराच काळ आपल्या यादीवर तशाच कायम राहतात. "Problems don't age well" असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. म्हणजेच आपण एखादी समस्या जर बराच काळ तशीच भिजत ठेवली तर ती गहन स्वरूप धारण करते. त्यामुळे एखादी जबाबदारी पार पडताना त्यामध्ये एक विशिष्ट प्रमाणात अचूकता असल्याची आपल्याला खात्री झाली की तो निर्णय घेऊन मोकळ व्हावं.
६) प्रत्येक माणसाच्या कुवतीनुसार तो आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांपैकी काही विशिष्ट जबाबदाऱ्याच पार पडू शकतो. मुद्दा ३ मध्ये उल्लेख केलेला प्राधान्यक्रम काळानुसार बदलत जातो. त्यामुळे ज्या जबाबदाऱ्यांवर आपण लक्ष केंद्रित करत आहोत त्या जबाबदाऱ्या त्या क्षणी आपल्या प्राधान्यक्रमाच्या नक्की कोणत्या स्थानावर आहेत आणि पार पडताना आपण बाकीच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष तर करत नाही आहोत ना हा या गोष्टीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा प्राधान्य कामातील खालच्या क्रमांकावर असलेल्या गोष्टींकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणे आवश्यक असते.
७) सहाव्या मुद्द्याचं थोडं वेगळं रूप. ही जी तुम्ही प्राधान्यक्रमाची यादी बनवत असता ती यादी बनवताना हा प्राधान्यकम केवळ वर्तमान काळाला डोळ्यासमोर ठेवून बनवण्याची चूक करू नये. आपण वर्तमानकाळातील घेतलेल्या बऱ्याचशा निर्णयांचे परिणाम दिसण्यासाठी भविष्यकाळ उजाडावा लागतो. त्यामुळे एखाद्या जबाबदारीविषयी आज घेतलेला निर्णय हा भविष्यकाळाला डोळ्यासमोर घेऊन घेण्यात यावा. आता तुम्ही म्हणाल की भविष्यकाळ कोणी पाहिला आहे आणि आजच्या निर्णयाची भविष्यकाळात काय परिणीती होणार आहे हे आम्ही आज कसे काय सांगू शकणार? मुद्दा अगदी बरोबर आहे. परंतु एक प्रौढ व्यक्ती म्हणून आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयांच्या परिणामांचे दायित्व सुद्धा घ्यावे लागते.
हे सर्व वाचून जर तुम्हाला दडपण आले असेल तर ते दडपण काही प्रमाणात दूर करण्याचा सुद्धा माझ्याकडे मार्ग आहे. आतापर्यंत आपल्या मागच्या अनेक पिढ्यांनी घेतलेले सर्व निर्णय काही अगदी अचूक होते असे नाही. तरीही त्यांनी आपल्या परीने योग्य प्रयत्न करत आपलं आयुष्य जगत आपल्या पुढील पिढीसाठी जमेल तितके प्रयत्न केले.
त्यामुळे तुम्ही लहान असा वा मोठे असा प्रत्येक दिवशी तुम्ही नक्की काय करायचं याचा सकाळी विचार करा, त्यावर दिवसभर जमेल तितके प्रयत्न करा. बाकी आयुष्यभर आपल्याकडून काय घडलं किंवा नाही घडलं त्याची काळजी करण्याची जबाबदारी त्या सर्व शक्तिमानावर सोडून द्या. रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपटातील जुनी गाणी ऐकत शांतपणे हे एक चांगलं आयुष्य दिल्याबद्दल देवाचे आभार माना!
गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३
व्यक्तीस्वातंत्र्याच्या कोषाकडे!
कालच्या लोकसत्तेतील "पालक की मारक" हा विचारप्रबोधक अग्रलेख वाचला. केवळ नामांकित वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशामागे लागून जगण्याशी संबंधित अनेक अंगाचा अभ्यास आनंददायी असू शकतो याचा अंदाज नसलेल्या आपल्या समाजात अजूनही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांची हाव सुटत नाही असा विचार मांडणारा हा अग्रलेख! अधोरेखित वाक्य अग्रलेखातून जसच्या तसं उचललेलं !
आता यावरील माझे विचार.
मागच्या पिढीने शिक्षणाचा आधार घेत आपलं राहणीमान मध्यमवर्गीय जीवनस्तराकडे उंचावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पूर्वीच्या चांगल्या राहणीमानाच्या आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पना या वेगळ्या पातळीवर होत्या. १९९० च्या दशकात जे आर्थिक उदारीकरणाचे धोरण आपल्या देशानं स्वीकारलं त्यामुळे एखाद्या वादळामुळे शेतीवाडीची जशी वाताहत होते त्यासारखी परिस्थिती आपल्या समाजाची आणि त्याच्या मानसिक स्थैर्याची झाली. या उदारीकरणामुळे आणि त्याच्या अनुषंगाने आलेल्या विविध पर्यायांच्या उपलब्धतेमुळे जीवनातील नव्या पैलूची (चंगळवादी आयुष्याची) आपल्या समाजाला ओळख झाली.
आजचं कोणतंही वर्तमानपत्र उघडलं की अत्यंत आकर्षक जाहिरातींचा आपल्यावर भडिमार होत असतो. त्यामध्ये लाख-लाख रुपयांचे भ्रमणध्वनी, तीस चाळीस लाखांच्या गाड्या, दोन कोटी पासून ज्यांची किंमत सुरू होते अशा आलिशान सदनिका, किमान चार-पाच लाख रुपये शुल्क असलेल्या परदेशवारी यात्रा, विविध रंगीत टेलिव्हिजन संच, वातानुकूलन प्रणाली, महागडे रेफ्रिजरेटर ह्यांचा समावेश असतो. समाजातील काही मनं स्थिर असतात. आपली क्षमता, आपल्याला लाभलेला संस्काराचा वारसा, जीवनाकडून आपल्याला नक्की काय हवंय ह्याविषयी कमालीची सुस्पष्टता ती बाळगून असतात. त्यामुळं असल्या जाहिरातींपासून विचलित न होण्याची म्हणायला गेलं तर देणगी त्यांना लाभलेली असते.
अजूनही बरीचशी मध्यमवर्गीय कुटुंब अशी आहे की जी जुन्या विचारसरणीला अनुकूल असे आयुष्य जगत असतात. परंतु बऱ्याच वेळा हा स्वखुशीने घेतलेला निर्णय नसून परिस्थितीसमोर हार मानून स्वीकारलेली एक अपरिहार्य अशी जीवन पद्धती असते. त्यामुळेच पालकवर्ग आणि काही प्रमाणात विद्यार्थीसुद्धा या परिस्थितीवर मात करण्यासाठी नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळं जो वर्ग अजूनही आपला आर्थिक स्तर उंचाविण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना हा विचार पटणं सहजशक्य नाही. "नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे आवश्यक नाही" ही विचारसरणी आयुष्यात स्थिरस्थावर झालेल्या लोकांकडून येण्याची शक्यता जास्त!
अजून एक मुद्दा की अजूनही आपला बहुतांश समाज सामाजिक जीवनाशी आपली नाळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय सामाजिक जीवन हे एका विशिष्ट किंमतीवरच उपलब्ध असतं. तुम्ही जेव्हा जेव्हा भारतीय सामाजिक जीवनात सहभागी होता त्यावेळी तुम्ही त्या संपूर्ण समाजाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी हवे तसे टक्केटोमणे देण्यास मारण्याचा अधिकार प्रदान करत असता. बऱ्याच वेळा हे टक्केटोमणे हे तुम्ही आयुष्यात किती यशस्वी आहात यासंबंधी असतात. टक्केटोमणे मारणारी लोक स्वतः किती यशस्वी आहेत किंवा त्यांनी आयुष्यात नक्की कायमिळविलं आहे हा मुद्दा गौण असतो. इथं तुम्हाला दोन पातळीवर निर्णय घ्यायचा असतो.पहिली पातळी म्हणजे सामाजिक जीवनात तुम्हांला सहभागी व्हायचं आहे की नाही आणि दुसरी पातळी म्हणजे जर तुम्ही सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलात तर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या तुमच्यावर होणाऱ्या टिप्पणीला तुम्ही किती महत्त्व देता! जर तुम्हाला या टिप्पणीकडे दुर्लक्ष करण्यात यश लाभत असेल किंवा तितकी मानसिक कणखरता तुम्ही दाखवू शकत असाल तर तुम्हाला तुमच्या मर्जीने जीवन जगता येतं.
प्रश्न असा आहे की इतकी मानसिक कणखरता आपल्या समाजाकडे खरोखर उरली आहे का? ही मानसिक कणखरता आणण्यासाठी आपला स्वतःशी संवाद असणे आवश्यक आहे. स्वतःशी असलेला संवाद आणि नजीकच्या नातेवाईकांशी, मित्रांशी असलेला संपर्क आपल्याला समाजाच्या टिप्पणीपासून विचलित न होण्याची शक्ती देऊ शकतो. अजूनही समाजाचा एक भाग ही कणखरता दाखवतो आणि आपल्या मर्जीनुसार जीवन जगतो.
पुढील पिढीच्या बाबतीत एक गोष्ट होण्याची शक्यता मला वाटतेय. आज समाजाला जी बाकीच्या समाजाशी नाळ टिकून ठेवण्याची गरज वाटत आहे की बहुदा पुढच्या पिढीला वाटणार नाही. आजच्या सामाजिक समारंभात आढळून येणारे दांभिकपण हे पुढच्या पिढीला या सामाजिक समारंभांपासून दूर लोटणारे ठरेल. मग आपली स्थितीसुद्धा पाश्चात्य देशांसारखी होण्यास वेळ लागणार नाही, जिथे प्रत्येकजण आपल्याभोवती व्यक्तीस्वातंत्र्याचा कोष विणून त्यात मग्न असेल. मनुष्यउत्क्रांतीतील हा पुढील टप्पा असेल.
कोलाहलाच्या पलीकडं !
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...
-
गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट का...
-
गेल्या शनिवारी दोन आठवड्यांच्या अमेरिका भेटीनंतर मी मुंबईत परतलो. ह्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत. जाणकारांच्या माहितीसाठी - कामासंबंधित कोणत...
-
दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की व...












