मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६

सप्टेंबर अमेरिका दौरा - आजी क्रमांक २ आणि जेफ मार्श


डॅलस लाऊंजमध्ये तामिळ आजी, ब्रिटिश एअरवेजचे कर्मचारी आणि माझं नाट्य सुरु असताना फावल्या वेळात माझे निरीक्षण सुरु होते. माझ्या आसनावरून मला गेटवर आलेल्या एका विमानातील दोन वैमानिकांचा हास्यपूर्ण संवाद पाहायला मिळाला. पहिल्या छायाचित्रात विविध विमानांनी आपापल्या आकारानुसार कसं उभं राहावं ह्याच्या सुचना देणाऱ्या जमिनीवरील मार्गदर्शक पट्ट्या दिसत आहे. 




दुसऱ्या छायाचित्रात  विमानाला गेटवरून मुख्य धावपट्टीवर खेचून नेणारा pushback tug or aircraft tractor दिसत आहे. ह्यावरील कर्मचारी सतत वैमानिकांच्या संपर्कात असतात. विमानाला मुख्य धावपट्टीवर नेऊन ठेवल्यावर हे लोक वैमानिकाला सर्व काही आलबेल असल्याचा मोठा थाटात इशारा करतात. विमानातील बरेचजण आपल्याला विमानाच्या गवाक्षांतून न्याहाळत असतील ह्याचा त्यांना अंदाज असल्यानं त्यांचा रुबाब काही न्यारा असतो. 


माझ्यासारख्या चिंतातुर माणसांची खात्री पटविण्यासाठी विमानाचा मार्ग वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवला जातो. विमान नक्की लंडनच्याच दिशेनं चाललं आहे ह्याची खात्री करून देणारा हा फोटो! इथं डॅलस, लंडन आणि वसईच्या स्थानिक वेळांचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी माझी होती ! ब्लॉगचा preview आकर्षक असावा म्हणुन हा फोटो सुरुवातीला सुद्धा दिला आहे. 


मी सहसा अमेरिकेच्या उत्तर पुर्व किनाऱ्यावरून परततो. त्यावेळी लंडन सहा तासांत येतं. ह्यावेळी डॅलस हे अमेरिकेच्या दक्षिणमध्य भागात असल्यानं लंडनपर्यंतचा प्रवास जवळपास नऊ तासांचा झाला.  आम्ही साधारणतः रात्री आठ वाजता उड्डाण केलं होतं. नऊ तासांचा प्रवास, अमेरिका - लंडन मधील स्थानिक वेळांतील फरक ह्यामुळं आम्ही लंडनला उतरेस्तोवर अकरा वाजले होते. 

लंडन इथं मला ह्यावेळी एक नवीन अनुभव आला. कोणत्याही सुरक्षा तपासणीशिवाय आमच्या विमानातील प्रवासी विमानतळाच्या सर्वसाधारण भागात पोहोचु शकलो. प्रत्येक वेळी हीथ्रो इथं सुरक्षा तपासणीची सवय असताना हे आश्चर्यकारक होते. माहिती मायाजालावर Pilot One Stop Security (OSS) Exemption असा शोध घेतला असता ह्याविषयी अधिक माहिती मिळु शकते. 

हीथ्रो विमानतळ खूप मोठं आहे. भारताकडं येणारी विमानं बहुदा टर्मिनल पाचवरून उड्डाण करतात. अमेरिकवरून विमानं सहसा टर्मिनल तीनवर उतरतात. टर्मिनल पाचवर दोन तीन लाऊंज असाव्यात. नऊ तासाच्या प्रवासानं दमलेला (!)  असल्यानं आणि सुरक्षातपासणी न झाल्याच्या मानसिक धक्क्यातुन न सावरल्यानं मी माझ्या नेहमीच्या परिचयाच्या लाऊंजचा शोध न घेता मी प्रवेश करू शकणाऱ्या पहिल्या लाऊंजची निवड केली. हा निर्णय चुकीचा आहे हे थोड्या वेळात मला समजलं. इथं प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. मी ह्या लाऊंजच्या दोन चक्कर मारल्यानंतर एक खिडकीजवळील आसन मला मिळालं. लंडन ते मुंबई स्थानिक वेळेनुसार सव्वादहाचं विमान सुटल्यानंतर थेट सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ब्रिटिश एअरवेजचे विमान आहे. मला विमानतळावर एकंदरीत पाच सहा तास वेळ घालवायचा होता.  शाळेत असताना परीक्षेत 'रेल्वे स्थानकावर अर्धा तास' असा मराठी किंवा हिंदी भाषेत निबंध लिहायला सांगितलं जात असे. त्यावेळी बहुधा मी एकदाही हा निबंध लिहला नसावा. त्याची शिक्षा म्हणून मला हल्ली असे बऱ्याच विमानतळावर सहा - आठ तास घालवायची शिक्षा मिळत आहे. मागं वळुन पाहता विद्यार्थ्यांना निबंध लिहायला सांगण्यामागं परीक्षकांचा काय हेतु असावा. माझ्या मते मुलं सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विक्रेते, आजुबाजूला असणारी माणसं, त्यांची धावपळ ह्यांचं किती खोलवर निरीक्षण करतात आणि ते शब्दांत कसं प्रभावीपणे उतरवू शकतात हा परीक्षकांचा हेतू असावा. मी बोर्डीला जाणाऱ्या ट्रेनने क्वचितच प्रवास केल्यानं ह्या बाबतीत त्यावेळी माझ्याकडं फारसे गंमतीदार अनुभव नव्हते. आजकालच्या मुलांना ह्या विषयावर निबंध लिहायला सांगितला तर ते बहुदा रील बनवून टाकतील. असो ! 

खिडकीजवळील आसन मिळाल्यानं दर तीस ते पंचेचाळीस सेकंदाला मला दिसणाऱ्या धावपट्टीवरून उड्डाण करणारी विविध कंपन्यांची विमानं मी पाहत राहिलो.  काही छोटी तर काही मोठी! काही धावपट्टीवरून आधीच उड्डाण करायची तर काही नंतर! अगदी आइसलँडच्या विमानकंपनीपासून ते आपल्या एअर इंडियाच्या विमानापर्यंत अशी अनेक विमानं तासभर मी पाहत होतो. एकट्यानं प्रवास करताना एक अडचण म्हणजे आपल्या बॅग्स आसनाच्या आसपास सोडून तुम्ही भटकण्यासाठी लांबवर जाऊ शकत नाहीत ! त्यामुळं माझ्या बॅग्स मला दिसु शकतील अशा कॉफी मशीनपर्यंत जाऊन तेथील दोन स्वादाच्या कॉफी (अनेकवचन गृहित धरावं !) प्राशन करून आलो. 



त्यानंतर कंटाळल्यानं मी ताजातवाना होऊन लाऊंजच्या दुसऱ्या भागाच्या दिशेनं प्रस्थान केलं. इथं थोडा शोध घेतल्यानंतर मला एक आसन मिळालं. इथून काही अंतरावर मला बरेच खाद्यपदार्थ दिसत होते. बरेच प्रवासी माझ्या आसनाजवळ येऊन कुतूहलानं पाहून परत जात होते. मी काहीसा अलर्ट मोडमध्ये गेलो. थोड्याच वेळात एक विमानतळाचा कर्मचारी एका इंग्लिश आजीबाईना घेऊन माझ्याजवळ आला. माझ्या आसनाजवळील टेबलवर वायरलेस मोबाईल चार्जर होता. आजीबाईंना त्यांचा मोबाईल चार्ज करायचा होता. माझ्या समोरील आसन रिकामे होते. त्या आसनावर त्या स्थानापन्न झाल्या.  "मी इथं माझा भ्रमणध्वनी चार्ज केला तर चालेल का?" असं त्या आजीबाईंनी मला विचारलं. इथं तामिळ / तेलगु ते इंग्लिश / मराठी असा भाषांतराचा अडथळा नसल्यानं मी आनंदानं हो म्हणालो. "तुम्हांला हे आसन हवं आहे का?"  असे त्यांना मी अगत्यानं विचारलं. त्यांनी हसुन नकारार्थी उत्तर दिलं. पण मी हा प्रश्न विचारल्यानं त्या खुश झाल्या असाव्यात असं मला वाटलं.  

त्यांना भूक लागली असावी. आजुबाजूला अनेक माणसं बसली होती पण आजीबाईंनी मला विचारलं की "मी माझ्या बॅग्स इथं सोडून खाण्यासाठी काही घेऊन आले तर चालेल का?" मी अर्थातच होकारार्थी उत्तर दिलं. "मी तुझ्यासाठी काही घेऊन येऊ का?" आजीबाईंनी मला विचारलं. मी त्यांना म्हणालो की "तुम्ही जाऊन या मग मी जाईन!" डॅलस इथं तमिळ / तेलगु आजींना जो मी प्रश्न विचारला होता त्याची परतफेड (चांगल्या अर्थानं) झाली होती.  प्लेट भरून घेऊन आल्यावर त्यांनी मला "आता तू जाऊन ये" असं स्वतःहून सांगितलं. मी माझी प्लेट भरून घेऊन आल्यावर आम्ही दोघांनी काही सुसंवाद साधला. त्यांना खूप काही बोलायची इच्छा होती असं स्पष्ट दिसत होतं. पण आमच्या दोघांच्या आसनांमध्ये काही अंतर असल्यानं मोठ्यानं बोलावं लागत होतं. आणि भोवतालच्या प्रवाशांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असल्यानं मी बोलणं आटोपतं घेतलं. 

वसई, मुंबई, कोलंबस, प्लेनो असो वा अजुन कोणते ठिकाण असो! सर्वजण सुसंवादाचे भुकेलेले आहेत. आजच आलेली जपानी माणुस शोजी मोरीमोटोची पोस्ट वाचली की हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित होतो. आजकाल बोलणारी, लिहणारी माणसं नाही असं नाही. पण स्वकेंद्रित बोलणं, लिहिणं वेगळं आणि दुसऱ्याला केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्याशी संवाद साधणं वेगळं ! हा फरक आपणा सर्वांना कळला तर खूप फरक पडेल. 

अर्ध्या तासानं आजीबाईंचा मोठ्या जड अंतःकरणानं निरोप घेतला. त्या परत भेटण्याची सुतराम शक्यता नाही. अगदी अत्यंत पराकोटीच्या योगायोगानं त्या समोर आल्या तरी आम्ही एकमेकांना ओळखणार सुद्धा नाही. 

मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरु झाला. आकाशातील असेच काही ढग ! त्यांच्याशी संवाद वगैरे साधण्याची शक्यता नव्हती ! 



ह्या भेटीत दोन आठवड्यापूर्वी लंडनहुन अमेरिकेला जातानाचा एक किस्सा ! मुंबई - लंडन - फिलाडेल्फिया - कोलंबस असा माझा प्रवास होता. लंडनहुन विमान गेटवरून वेळेवर निघालं. थोडाफार जमिनीवर प्रवास करून उड्डाणासाठी मुख्य धावपट्टीवर सुद्धा आलं.  बहुदा Cabin crew, please be seated for take-off" अशी घोषणा सुद्धा होणार होती. आणि अचानक आमचं विमान मुख्य धावपट्टीवरून बाजूला काढण्यात आलं. त्याला परत गेटकडं नेण्यात आलं नाही. पण असंच आडोशाला remote parking stand (tarmac/apron) मध्ये  ठेवण्यात आलं. बहुदा त्यांना एक बॅग काढायची होती.माझी ह्या बाबतीत १००% खात्री नाही. कारण ही खातरजमा सहसा गेट सोडण्यापुर्वी केली जाते. असो, जे काही कारण होते त्याचं समाधान केल्यानंतर ह्या वेळात जे काही इंधन खर्ची पडलं आहे त्याची भरपाई करण्यासाठी एक नवीनच प्रकार मला अनुभवायला मिळाला. पारंपरिक चल इंधन ट्रकला (Conventional Mobile Fuel Tanker Truck) आमच्या विमानाला जोडण्यात आलं. हे अगदी माझ्या खिडकीच्या जवळच होत असल्यानं त्याचा फोटो मी घेतला. 


१९८५ - १९९२ च्या सुमारास ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी डेव्हिड बून आणि जेफ मार्श भारतीय गोलंदाजांना अगदी भारी पडत असे. त्यातला हा जेफ मार्श ! 



ह्या Conventional Mobile Fuel Tanker Truck मधील माणुस जेव्हा शिडी चढून वर आला तेव्हा त्याला पाहुन मला क्षणभर जेफ मार्शचा भास झाला. पण इंग्लंड - ऑस्ट्रेलियाचे मैत्रीपूर्ण (?) संबंध पाहता माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूला इंग्लंड अशी संधी देणार नाही हे नक्की होते. राहता राहिला तो ह्याच्याशी संवाद साधण्याचा प्रश्न ! विमानाची काच वरती करता येत नसल्यानं ते राहून गेलं !  


ह्या सर्व प्रकारात दोन तास गेल्यानं माझं फिलाडेल्फिया ते कोलंबस विमान चुकतंय की काय अशी चिंता मला भेडसावू लागली. मी तिथं साडेबारा वाजता पोहोचणार होतो आणि साडेतीन तासांत मला इमिग्रेशन आटपून, बॅग्स घेऊन, पुन्हा त्यांचे चेक-इन करून, सुरक्षा तपासणी आटपून दुसऱ्या विमानात शिरायचं होतं. विमानाचं उड्डाण होताच हे साडेसात तासांत फिलाडेल्फिया इथं पोहोचेल अशी घोषणा वैमानिकानं केली. विमानात दोन air hostess होत्या.  त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मी कशी चुकवणार? त्या दोघीनांही माझं पुढील विमान चुकणार तर नाही ना हा प्रश्न दोन तीनदा विचारून भंडावून सोडलं. त्यांनी तुला आम्ही सर्वात प्रथम सोडतो ह्या उत्तरापासून असा उशीर झाला की ते जरा जोरात विमान नेतात अशी उत्तरं देऊन माझं समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं ते ' ते जरा जोरात विमान नेतात ' ते उत्तर ऐकून मी काहीसा धास्तावलो. पुढील विमान चुकलं तरी चालेल अशी मनाची समजूत करत जेवणाचा आणि सिनेमाचा आनंद घेत राहिलो. फिलाडेल्फिया इथं उतरल्यावर तिथलं विमान आधी अर्धा आणि मग एक तास उशिरानं उड्डाण करत असल्याची घोषणा झाली. आणि मी सुटकेचा निश्वास टाकला !

(क्रमशः )

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२६

सप्टेंबर अमेरिका दौरा - आजी क्रमांक १



गेल्या महिन्यातील अमेरिकावारीहुन परतीच्या प्रवासात दोन आज्ज्या भेटल्या. 

डॅलस विमानतळावरील लाऊंज मध्ये भेटलेली आजी क्रमांक १
मी नेहमीप्रमाणं चार तास आधी विमानतळावर पोहोचलो होतो. निशांकने अगदी थेट बॅगा ब्रिटिश एअरवेजच्या ताब्यात देईस्तोवर माझी साथ दिली. डॅलस विमानतळावर शुकशुकाट म्हणावा इतकी शांतता होती. सुरक्षातपासणीचे सोपस्कार आटपून लाऊंजमध्ये पोहोचून स्थिरस्थावर झालो. तिथं जवळपासच ह्या आजीबाई होत्या. प्लॅनोमध्ये कार्यालयाबाहेर फक्त आणि फक्त भारतीय दिसल्यानं ह्या आजीबाईंना पाहून मला फारसं आश्चर्य वाटलं नाही. सार्वजनिक ठिकाणी त्यातही अमेरिकेतील सार्वजनिक ठिकाणी माझ्या चेहऱ्यावर अगदी गंभीर भाव असतात. त्यामुळं ह्या आजीबाईंनी मला थोडं स्मितहास्य देऊन त्या शांत बसल्या. 

काहीवेळानं त्या लांबलचक लाऊंजमध्ये आजीबाई आणि मी हे दोघंच भारतीय असल्याची जाणीव मला झाली. इथं आपल्याला खाण्यासारखं काही असावं का ह्या शोधासाठी मी त्या लांबलचक लाऊंजचा फेरफटका मारण्यासाठी निघालो. संकष्टी चतुर्थी असल्यानं अर्थातच माझ्याकडं मर्यादित पर्याय असणार ह्याची मला जाणीव होती. दूरवर जाऊन काही सॅलड्स, आणि केक एका प्लेटमध्ये घेऊन मी परतलो. त्यावेळी प्रथमच मी आजीबाईंकडे पाहून स्मितहास्य केलं आणि खुणेनेच हे तुम्हांला आणुन देऊ का असं विचारलं. त्यांच्या मनात कोणतं वादळ सुरु आहे ह्याची मला कल्पना नव्हती. त्यांनी मला नाही म्हटलं पण त्या माझ्याजवळ येऊन बसल्या. तामिळ / तेलगू असं विचारलं. मी जोरजोरानं नकारार्थी मान वळवली. त्यानंतर त्यांनी मला लंडन लंडन असं विचारलं. मी आनंदानं हो हो अशा अर्थाची मान वळवली. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यांनी उत्साहानं चेन्नई चेन्नई असं विचारलं. मला चेन्नई एक्सप्रेस असं उत्तर देण्याचा मोह झाला होता तो आवरून मी मुंबई मुंबई असं उत्तर दिलं. त्यांच्या चेहऱ्यावर घोर निराशा पसरली. 

चार तास कसे काढणार असा माझ्यासमोरील प्रश्न आजीबाईंनी चुटकीसरशी सोडवला होता. त्या ह्युस्टनवरून सकाळीच डॅलस इथं स्थानिक विमानानं आल्या होत्या. मी इथं तीन चार तासांची चिंता करत होतो तर त्यांनी आधीच आठ तास प्रतीक्षा केली होती. त्यांना अजून बोर्डिंग पास मिळाला नव्हता. पण त्यांची खरी चिंता वेगळीच होती.  आपली ह्युस्टनला चेक-इन केलेली बॅग इथं व्यवस्थित पोहोचली असेल ना आणि चेन्नईपर्यंत सुद्धा ती व्यवस्थित पोहोचेल ह्याची खातरजमा करून देणारं कोणीतरी त्यांना हवं होतं. अर्थात मी खुणेनंच हो हो पोहोचेल असं समजविण्याचा प्रयत्न केला. हा एकंदरीत विश्वासार्ह माणुस आहे का ह्यावर त्यांच्या मनात चिंता निर्माण झाली. मग थोड्या वेळानं त्या फोन घेऊन आल्या. आपला मुलगा ह्युस्टनला डॉक्टर आहे. त्याला फोन लावुन देण्याची विनंती त्या करत होत्या. त्यांचा फोन वाय फाय ला जोडला गेला नसल्यानं कॉल जात नव्हता. मी सहसा अनोळखी माणसाला माझ्या फोनवरून फोन करत नाही. पण अपवाद म्हणून त्यांच्या मुलाशी बोललो. तो अर्थात शांत होता. दैवावर भरवंसा ठेवून बॅग्स चेन्नईला पोहोचतील असा आशावाद बाळगावा ह्यावर आमच्या दोघांचं एकमत झालं. त्यानंतर तो आजीबाईंशी बोलला. एव्हाना आजीबाईंनी विमानकंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत मैत्री केली होती. त्यांना बोर्डिंग पास मिळाला होता. पण त्यांची ती बॅग विषयीची शंका कोणी दूर करू शकत नव्हतं. गावचा माणुस म्हणून त्या मला घेऊन त्यांच्याकडं गेल्या. मी सरळसरळ त्या कर्मचाऱ्यांना ह्यांना हो हो म्हणून सांगा असं सांगितलं. माझ्या चेहऱ्यावरील हावभावांमुळं मी उडवाउडवी करतोय हे आजीबाईना समजलं व त्या माझ्यावर य नाराज झाल्या. पण जिद्दीनं त्यांनी त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं वाय फाय ला जोडणी केली. माझ्यावर नाराज झाल्या असल्या तरी मुलाला फोन लावण्यासाठी 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' हे भाव चेहऱ्यावर घेऊन त्या माझ्याकडं आल्या. मी मुकाट्यानं त्यांना फोन लावून दिला. बहुदा मुलानं त्यांना जबरदस्त झापलं असावं. त्यामुळं त्या केविलवाण्या चेहऱ्यानं काही वेळा तेलगूमध्ये आणि काही वेळा तामीळमध्ये (हा माझा अंदाज) हो हो म्हणत राहिल्या. मला वाईट वाटत होतं पण नाईलाज होता. थोडा वेळ त्या त्यांच्या आसनावर मुकाट्यानं बसून राहिल्या. बोर्डिंग सुरु होत आहे अशी उद घोषणा झाली आणि आजीबाईना भूक लागली. त्या काही खायला मिळतंय का ह्याच्या शोधार्थ निघाल्या. कपाळावर हात मारून घेण्याशिवाय माझ्याकडं पर्याय नव्हता. मी माझ्या नियमानुसार गेटकडे धाव घेतली. तिथं पोहोचता क्षणी तेथील कर्मचाऱ्यांना आजीबाईंचा फलाहार होताच त्यांना विमानाकडं तात्काळ घेऊन या अशी विनंती केली. विमानात बसलो तरी आजीबाई कुठं दिसतील का ह्याचा शोध माझी नजर घेत होती. 

एखाद्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आजीबाईंच्या ह्युस्टनमधील मुलाला फोन लावुन त्यांचा चेन्नईतील फोन नंबर घेऊन त्यांना फोन लावायचा विचार माझ्या मनात सारखा घोळत आहे ! पुढील भागात लंडनला भेटलेल्या इंग्लिश आजीबाई आणि अजून काही ! 

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

कोलाहलाच्या पलीकडं !


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र उघडताच वाचलं.  ८८ वगैरे ठीक आहे, त्यापुढील ०९ ह्या अपूर्णांक भागाचं आणि ते खात्रीलायकरित्या सांगू शकणाऱ्या अधिकाऱ्यांचं मला नेहमीच कौतुक वाटत आलं आहे.  सोमवार सकाळ असल्यानं गेल्या दोन दिवसांत अनाघ्रात होऊ पाहणारं मन अशा बातम्या वाचुन काही वेगळा विचार करू लागतं. तलावाच्या पाण्याची पातळी जशी अचुकपणे मोजता येते तशी आपल्या मनाच्या समाधानाची पातळी मोजता येऊ शकेल का ? हा आज मनात आलेला विचार !

प्रत्येक मनाच्या समाधानाच्या पातळीवर परिणाम घडवुन आणणारे विविध घटक असतात. ह्यातील काही आपल्याला जाणवतात तर काही जाणवत नाहीत. अगदी झोप व्यवस्थित लागली की नाही, प्रॉडक्शन इश्यु आला की नाही,  घरातील सोमवार सकाळचं वेळापत्रक अगदी मिनिटानुसार चाललंय की नाही ह्या तात्कालीन घटकांपासुन आरंभ होत ह्यांची व्याप्ती खूप दूरवर पोहचत राहते. सकाळी तीन वाजता जाग आली असतांना कार्यालयीन कामांबाबत आलेला एखादा धोरणात्मक विचार किती अचुकपणे सकाळी सात वाजता आपण आठवु शकतो असे आणि अनेक वेगवेगळे विचार आपल्या मनाच्या समाधान पातळीवर इष्ट वा अनिष्ट परिणाम करू शकतात. 

आपण बऱ्याच वेळा भोवतालच्या दैनंदिन जीवनाच्या कोलाहलात अडकलेलो अडतो. आपल्यासोबत आपलं बिचारं मनसुद्धा असंच काहीसं अडकलेलं असतं. शनिवार / रविवार संध्याकाळ ह्या बिचाऱ्या मनासाठी राखुन ठेवाव्यात असं मला सदैव वाटत राहतं. अगदी शांतपणे बसलं की सुरुवातीच्या अर्ध्या तासात मन त्या कोलाहलाच्या जंजाळातुन आपल्याला मुक्त करतं. त्यापुढं त्याला मिळतो तो अगदी मुक्त प्रदेश! जणु काही एखाद्या हिमालयाच्या शिखरावरुन उड्डाण करत निळ्याशार गगनांत मुक्त विहार करणारा राजबिंडा गरुड !   प्रत्येकाचं मन वेगळं तसं उड्डाण करण्याचं त्याचं गगन वेगळं, त्याला खुणावणारी क्षितिज वेगळं ! कोणी संगीताच्या, कोणी विज्ञानाच्या, कोणी साहित्याच्या, कोणी अध्यात्म्याच्या गगनांत विहार करू लागतं किंबहुना करू शकतं. प्रश्न असा आहे की आपण आपल्या मनाला ही संधी देतो का? मी इथं केवळ दोन तीन तासांची गोष्ट सांगतोय, पण जर  आपण वर्षोनुवर्षे गुहेत तपस्या करणाऱ्या मुनींचा किंवा पुर्ण आयुष्य संशोधनाला वाहून घेतलेल्या शास्त्रज्ञांचा विचार केला तर ते आपापल्या क्षेत्रांत किती खोलवर गेले असतील ह्याचा विचार करून थक्क व्हायला होतं. ह्या प्रवासाच्या शेवटी कुठंतरी तो सर्वशक्तिमान असतो. प्रत्येकजण आपला इथला प्रवास आटोपून त्याच्याकडं जाईल त्यावेळी नक्कीच त्याला प्रश्न विचारला जाईल की तुझ्या आयुष्यात मनुष्यजातीच्या ज्ञानात भर पडेल असं काही केलं का? ९९.९९९९९ टक्के लोकांचे उत्तर नकारार्थी असलं तरीही पुढचा प्रश्न विचारला जाईल की त्या दृष्टीनं मी प्रयत्न तरी केला पाहिजे असा विचार तरी मनात आला का? 

पुन्हा कधी जर चांगली फुरसत मिळाली तर हा प्रश्न स्वतःला नक्की विचारून पहा !   

मंगळवार, २१ जुलै, २०२६

समाजमाध्यमांवर व्यक्त होतांना - भाग १






समाजमाध्यमांवर व्यक्त होतांना पाळायची मार्गदर्शक तत्त्वं !

मी समाजमाध्यमांवर व्यक्त होतांना बहुतांशी ब्लॉगपोस्टचा वापर करत असल्यानं ह्या लेखातील बहुतेक मुद्यांचा रोख ब्लॉगपोस्टशी (तो ही मराठीतील) संबंधित आहे. 

१.  तुम्ही व्यक्त होण्याची सुरुवात केल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर तुमची एक स्वतःची ओळख (ब्रँड) तयार होतो. विविध निकषांवर तुमच्या लिखाणाला, व्यक्त होण्याला जोखलं जाऊन तुमचा एक स्वतःचा वाचकवर्ग तयार होतो. त्यात जाणकार वाचकवर्ग, चांगलं वाटून घेण्यासाठी येणारा वाचकवर्ग आणि अनेक इतर वाचकवर्गांचा समावेश होतो. सांख्यिकीशास्त्राच्या दृष्टीकोनातुन पाहिलं असता जाणकार वाचकवर्ग, चांगलं वाटून घेण्यासाठी येणारा वाचकवर्ग ह्यांचं प्रमाण बाकी वर्गाच्या दृष्टीनं कमी असतं. तुम्ही लिहिता / व्यक्त होता कोणासाठी ह्याची जाणीव तुम्हांला असणं आवश्यक असते. 

२. मराठीत एखाद्या वाक्यात विशिष्ट अर्थासाठी कोणता शब्द वापरावा ह्यासाठी तुमच्याकडं विविध पर्याय असतात. ह्यात तुम्ही नेमका कोणता शब्द वापरता, तो त्या वाक्यात / पोस्टमध्ये चपखल बसतो की नाही ह्या मुद्यावर जाणकार वाचकवर्ग तुम्हांला प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या जोखत असतो. त्या शब्दाच्या निवडीवर तुमचं भाषाज्ञान, तुमचा विषयाचा आवाका दिसुन येतो. हा शब्द त्या वाक्यात नेमक्या ठिकाणी वापरला गेला आहे की नाही ह्यावर तुमची बुद्धिमत्ता काही प्रमाणात जोखली जाते. 

३. संपुर्ण लेखात तुम्ही एकूण किती मुद्दे (त्यांची पुनरावृत्ती न करता) मांडले आहेत, त्यांची क्रमवारी योग्य प्रमाणात लावली आहे का? ते एकमेकांशी विसंगत आहेत का ? विसंगत असल्यास तुम्हांला ते जाणवलं आहे का? जाणवल्यास ही विसंगती मान्य करून त्याविषयी तुम्ही काही बोलता आहात का ? हे मुद्दे तुमची विश्वासार्हता ठरवतात. 

४. तुम्ही जर अनेक वर्षे व्यक्त होत असाल तर तुमची विचारसरणी वर्षोनुवर्षे सुसंगत राहिली आहे का ? की तुम्ही तुमच्याच काही वर्षांपूर्वीच्या विचारांशी फारकत घेतली आहे का ह्याकडं सुद्धा जाणकारांचं लक्ष असतं. 

५. तुम्ही तुमच्या पोस्टमधील प्रत्येक शब्दाचं, वाक्याचं उत्तरदायित्व किती गांभीर्यानं घेता ह्यावर सुद्धा तुमचं परीक्षण होत असतं. ही गोष्ट गेल्या काही दिवसतीलच नव्हे, तर तुमच्या प्रत्येक पोस्टला लागु होत असते.  दहा वर्षांपूर्वी आपल्या मनात नेमके कोणते विचार आले होते, त्यांचं ह्या पोस्टमध्ये नक्की कसं परिवर्तन झालं हे तुम्हांला कितपत आठवतं हे महत्वाचं ठरतं. त्यावेळच्या आपल्या विचारसरणीत काही चूक झाली झाली असेल हे कालांतरानं आपल्याला जाणवलं तर ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणा आपल्याकडं हवा. 

६. मी शुद्धलेखनात प्रचंड मार खातो / मला शुद्धलेखनात सुधारणेस प्रचंड वाव आहे. माझे मराठीचे शब्दभांडार मर्यादित आहे. मराठीतील प्रसिद्ध लेखकांच्या लेखनशैलीविषयी मी बराचसा अनभिज्ञ आहे. त्यामुळं काही जाणकार वाचक माझ्या लिखाणापासून दुरावतात. पण त्याला इलाज नाही. स्वानंद हा माझं लिखाणाचा मुख्य हेतू आहे. 

(क्रमशः )

सोमवार, २२ जून, २०२६

वैचारिक साखळी - खरं आव्हान !



वैचारिक सुस्पष्टतेचा डोळ्यांत ठळकपणे भरणारा अभाव हा आजच्या समाजासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.  स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी नक्की योग्य काय ह्याची जाण आपल्याला नाही. समाजानं ठरवुन दिलेल्या यशाच्या तथाकथित मापदंडांच्या मागे धावण्यात आपली शक्ती आपण वाया घालवत आहोत. कोणत्याही मनुष्यानं निवांत बसुन आपल्यासमोरील परिस्थितीचा शांतपणे विचार केल्यास त्याला / तिला स्वतःसाठी योग्य मार्ग सापडु शकतो. पण आपण सर्व काही बाजुला सारून परिस्थितीचा सखोल विचार करायला क्वचितच बसतो. ह्याची अनेक उदाहरणं मी नंतरच्या पोस्टमध्ये क्रमशः देईन. 

आजच्या ह्या छोटेखानी पोस्टमध्ये आपण एका साखळीचा उल्लेख करू इच्छितो. सोशल मीडियाचे कुटुंबाला लागलेलं व्यसन !  => स्वयंपाकघरात उत्साहानं तरुण पिढीला आवडतील असे नवीन पदार्थ शिकू पाहणाऱ्या गृहिणींची झपाट्यानं कमी होणारी संख्या => कालानुरूप ह्या गृहिणींना आवश्यक असणारी पण न मिळणारी स्वयंपाकघरातील पुरुषांची साथ => घरातील सदस्यांच्या संवादाच्या विविध तऱ्हा => त्यामुळं संवादाच्या पहिल्या चकमकीतच ठिणग्या उडून संवादाचं पुढं न जाणं => घरातील जेवणांकडं पाठ फिरवणारी तरुण पिढी => झोमॅटो / स्वीगीवरून मागवल्या जाणाऱ्या चविष्ट पण तेलकट, मिठाचं प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचं सेवन => प्रोटीन वेडापायी शरीरातील पचनसंस्थेवर पडणारा ताण => बऱ्याच वेळा विनाकारण वैद्यकीय तपासणीच्या मागं लागणं => आपण एखाद्या मॉडेलप्रमाणं दिसावं असा विविध वयोगटातील लोकांचा अट्टाहास => ह्या सर्वांसाठी लागणारा भरमसाट पैसा => हा पैसा मिळविण्यासाठी नोकरी / व्यवसायात यशस्वी होण्याचं प्रत्येकावर असणारं दडपण => जगात कधीही, केव्हाही फक्त विशिष्ट टक्के (२०-२५% टक्के) लोकंच यशस्वी होऊ शकतात ह्या मुलभूत तत्वाचा बहुतेकांना पडलेला विसर => ह्या सर्व कारणांमुळं येणारा तणाव / नैराश्य 

आपल्याला जी काही बुद्धी लाभली आहे, कष्ट करण्याची आपली जी क्षमता आहे, आपल्याकडं जी काही संवादकला आहे, लोकांना सोबत घेऊन जाण्याचं जे कौशल्य आपल्याला लाभलं आहे, आपल्यात धोका पत्करण्याची किती तयारी आहे हे आणि इतर काही घटक आपण ह्या दुनियेत किती यश मिळवणार ह्याच्या सीमारेषा आखुन देतात. ह्याची जाणीव ठेवून सातत्यानं दुधी, गलका, शिराळे, पडवळ ह्या भाज्यांचं सेवन करणारी व्यक्ती ह्या दुनियेत निःसंशय सुखी होणार - इति आदित्य ! 

रविवार, ७ जून, २०२६

पोह्यांचा ऊहापोह




पारंपरिक मराठी घरांमध्ये दररोज सकाळी सर्वसाधारणपणे शिरा, उपमा आणि पोहा हे तीन होतकरू उमेदवार आपला अर्ज दाखल करत असत. घरातील मुख्य गृहिणी विविध तात्कालीन घटकांचा विचार करून ह्यातील एका पदार्थांची निवड करत असे. 

आजच्या पोस्टमध्ये आपण संक्षिप्तपणे भारताच्या विविध प्रांतात वेगवेगळे न्याहारीचे पदार्थ सर्वमान्य का झाले असावेत, महाराष्ट्रात पोह्यांनी अग्रगण्य न्याहारीच्या पदार्थात स्थान का मिळवलं असावं? भावी वधूवरांना प्रथम भेटीच्या वेळी कांदापोहे का खाऊ घातले जातात आणि प्रोटीन वादळात पोह्यांचे भवितव्य काय ह्या प्रश्नांचा ऊहापोह करणार आहोत. खरंतर हा एक सखोल संशोधनाचा विषय आहे. पण मी थोडक्यात आटोपतं घेतलं आहे. 

१.  न्याहारीच्या पदार्थातील प्रांतीय वैविध्य 

स्थानिक पिके प्रत्येक प्रांतात न्याहारीच्या पदार्थ निवडीत महत्वाचा घटक बनतात. दक्षिण भारतात तांदुळ मुबलक असल्यानं इडली, डोसा तर पंजाबात गव्हामुळं पराठा, महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, तांदूळ ह्यामुळं पोहे, उपमा, थालीपीठ तर बंगालमध्ये चक्क मासे सुद्धा न्याहारीच्या पदार्थात स्थान मिळवून आहेत. 

हवामानाचा प्रभाव हा घटक लक्षात घेण्याजोगा आहे. पंजाबात जास्त उष्मांक मिळवून देणारे लोणी, तूप, पराठे तर तुलनेने उष्ण प्रदेशात हलके, पचनास सोपे असे इडली, पोहे असे पदार्थ पसंत केले जातात. 

कष्टकरी समाज ऊर्जा देणारी न्याहारी पसंत करतो तर पांढरपेशा वर्ग हलकीफुलकी न्याहारी पसंत करतो. दक्षिण भारतात मंदिर संस्कृतीमुळे इडली, पोंगल यांसारखे सात्त्विक पदार्थ विकसित झाले.

मुघल प्रभावामुळे उत्तर भारतात पराठे आणि भरपूर मसालेदार पदार्थ लोकप्रिय असावेत तर पोर्तुगीज प्रभावामुळे गोव्यात काही विशिष्ट ब्रेड व बेकरी पदार्थ विकसित झाले.

मराठी गृहिणी, कुटुंब सात्विक, शालीन स्वभावाच्या असतात. सकाळच्या प्रसन्न घडीला तरी घरातील सात्विक वातावरण कायम राहावं म्हणून सात्विक पोहे निवडले जाण्याची शक्यता जास्त असते. पोहे बनविण्यासाठी लागणारे जिन्नस सहज उपलब्ध असतात आणि पोहे बनविण्यात तुलनेनं कमी वेळ लागत असल्यानं पुर्वीच्या गृहिणींना ज्ञानसाधनेस आणि हल्लीच्या गृहिणींना भ्रमणध्वनीसाधनेस पुरेसा वेळ मिळतो. घरातील पुरुषांनी पोहे बनविण्यात पुढाकार घ्यावा अशी चळवळ सुरु झाल्यास माझा तिला तात्विकदृष्ट्या पाठिंबा राहील. 

वरील सर्व प्रकारांचा विचार करता महाराष्ट्रात पोहे न्याहारीच्या आघाडीच्या तीन पदार्थात स्थान पटकावून आहे. 

२. पोह्यांचे एकूण प्रकार 

पोह्यांचे एकूण प्रकार १७३ की १८९ ह्याविषयी तज्ञ मंडळीत सुद्धा एकमत होऊ शकत नाही.  मी तज्ञ व्याख्येच्या जवळपास सुद्धा जात नसल्यानं मी फक्त पोह्यांच्या काही लोकप्रिय प्रकारांचा उल्लेख करून पुढील मुद्याकडे जातो. कांदा पोहे, बटाटा पोहे, दडपे पोहे, कोल्हापुरी पोहे,  नागपुरी तर्री पोहे, कोकणी नारळ पोहे, दूध पोहे, दही पोहे, चिवडा पोहे (सणावाराचे), इंदोरी पोहे, सेव पोहे, उसळ-पोहे. बुधवार, शुक्रवार, रविवारी आमच्या घरी पोहे केल्यास त्यासोबत ऑम्लेट किंवा तत्सम अंडाजन्य पदार्थ दिला जातो. ह्या प्रकारास पोह्याच्या अधिकृत प्रकारात राजमान्यता मिळाली नाही. 

पोह्यांचे प्रकार फक्त पाककृतीनुसारच नाही तर पोह्यांच्या जाडीवरूनही केले जातात.  जाड पोहे, मध्यम पोहे, पातळ पोहे, लाल तांदळाचे पोहे वगैरे वगैरे. अजुन काही जाडीचा प्रकार / रंग असल्यास ह्या विषयात जो कोणी डॉक्टरेट करणार असेल त्यांनी त्यांचा उल्लेख करावा.   

३. भावी वधुवर आणि कांदेपोहे 

भावी वधुवर ज्यावेळी भेटतात त्यावेळी बहुदा कांदेपोहेच का निवडले जातात ह्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक, भावनिक आणि इतर इक कारणे आहेत. 

अशा भेटींच्या वेळी भावी वधुवर आणि त्यांच्या कुटुंबातील संवाद हा महत्वाचा घटक असतो. अशा वेळी बनविण्यास सर्वात सोपा,जो बनविण्यात चुक होण्याची शक्यता कमी आहे (Low Risk), जो ग्रहण केल्यानं उपस्थित पाहुणे मंडळींच्या पचनसंस्थेला सर्वात कमी धोका आहे असा पदार्थ निवडणं योग्य आहे असं इतिहासानं मराठी लोकांना समजावलं असावं. आता सांस्कृतिक, भावनिक कारणं वगैरे काय आहेत असा विचारण्याचा दीडशहाणेपणा करू नकात. ते वाक्य प्रभावशाली होण्यासाठी ह्या दोन प्रकारांची भर घातली होती. 

थोडा अधिक विचार करता समजा मसालाडोसा हा अशा भेटींच्या वेळचा राजमान्य पर्याय ठेवला असता तर नवऱ्या मुलाला चमचा काट्यानं मसाला डोसा खाता येत नाही, मुलीकडच्यांना एकही चटणी नीट बनवता आली नाही अशा कारणांमुळं होऊ घातलेली लग्न फिस्कटली असती. 

आता तर कांदेपोहे कार्यक्रम ही एक सांस्कृतिक संज्ञा बनली आहे. 

४. प्रोटीन वादळ आणि पोह्यांचे भवितव्य 

आजकाल सोशल मीडिया, फिटनेस शिक्षक आणि सप्लिमेंट उद्योगामुळे "प्रोटीन" अपरिहार्य बनले आहे. अनेकदा असा आभास निर्माण होतो की न्याहारीत ३०-४० ग्रॅम प्रोटीन नसेल तर ती न्याहारीच नाही. या पार्श्वभूमीवर पोह्याला मागे पडण्याचा धोका संभवतो कारण पारंपरिक कांदापोह्यांच्या एका प्लेटमध्ये साधारण ४-६ ग्रॅम प्रोटीन असते. धोका पोह्यांना नाही, तर "फक्त पोहे पुरेसे आहेत" या विचाराला आहे. प्रोटीनमध्ये वाहून गेलेल्या लोकांसाठी पोह्याला नवीन रूपात यावं लागेल. कडधान्यं, दही, ताक, ज्यांना चालतं त्यांनी अंडी ह्यांच्यासोबत पोहे घ्यावेत. 

एकंदरीत ज्यावेळी आपल्यासमोर नाश्त्याला पोहे समोर येतात त्यावेळी हे सर्व घटक ध्यानात घेऊन त्यांना मनमोकळी दाद द्यावी ! 

रविवार, १७ मे, २०२६

पुढच्या शुक्रवारी ७ वाजता


'पुढच्या शुक्रवारी ७ वाजता' हे नाटक मनोविकाराच्या एक टोकाला गेलेल्या मुलाचं, मंगेशचं (सुदीप मोडक) कथानक आपल्यासमोर घेऊन येतं. दोन वेगवेगळ्या कारणांसाठी मंगेशला सुधारण्याचा प्रयत्न करणारे डॉ. अतुल  ( सतीश राजवाडे ) आणि राधिका (चैत्राली गुप्ते)  ही ह्या नाटकातील महत्त्वाची दोन पात्रं! वीस वर्षांपूर्वी अर्धवट राहिलेल्या ह्या दोघांमधील प्रेमकहाणीची ह्या कथानकालाअसलेली झालर! 

एखादया उत्तम कलाविष्काराच्या माध्यमातुन कलाकार जितकं काही चाहत्यांपर्यंत पोहोचवतो त्याहून बरंचसं अधिक असं चाहत्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे मिळवावं असं मला नेहमीच वाटत आलं आहे. प्रत्येक चाहत्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणं हे अधिक असं जे काही आहे ते बदलत राहतं. मला असंच बरंच काही ह्या नाटकातून मिळालं. 

Spectrum हा एक अर्थपुर्ण शब्द आहे. प्रकाशाचा वर्णपट ह्या अर्थी संबोधिण्यासाठी त्याचप्रमाणं मनःस्थितीच्या विविध अवस्था असतात, त्या सर्वांना एकत्रितरित्या संबोधण्यासाठी हा शब्द वापरला जातो. मंगेश मनोविकाराच्या टोकाच्या स्थितीत पोहोचला आहे. आपण आपल्याभोवती पाहिलं तर निराशा हल्ली कोणालाच चुकली नाही. हा काळाचा महिमा आहे. यशाच्या शिखरावर असणाऱ्या माणसांना सुद्धा ही निराशा हल्ली सोडत नाही तर बाकीच्यांचं काय? दैनंदिन दिवसात येणाऱ्या निराशेच्या क्षणापासून परत सम्यक स्थितीत घेऊन येण्यासाठी काहीतरी सकारात्मक घडावं लागतं,  कोणी जिव्हाळ्याचं माणुस आयुष्यात असावं लागतं किंवा तुम्ही मानसिकरित्या खंबीर असावे आवश्यक असतं.  

ही झाली सर्वसामान्य माणसाची कहाणी! मंगेशची कहाणी तर अगदी हृदयद्रावक म्हणावी अशीच आहे! बुद्धिमतेचं प्रचंड वरदान लाभलेला मंगेश वयाच्या चौदाव्या वर्षी आयुष्यात घडलेल्या कठीण प्रसंगामुळं भोवतालच्या निष्ठुर दुनियेच्या तावडीत सापडतो. एका नाजुक क्षणी अंमली पदार्थाची झालेली ओळख त्याला ह्या खोल दरीत खेचून घेऊन जाते.  पत्नीच्या अकाली जाण्यानं खचलेला डॉ. अतुल आपला व्यवसाय बंद करून दूरवर कुठंतरी जायच्या तयारीत असतानाच राधिका त्याच्या भेटीला येते.  आपल्याला भेटायला येण्यामागं आपलं सांत्वन करणं हा तिचा खरा हेतू नाहीए हे जाणण्याइतका अतुल तिला ओळखून असतो. मंगेशला ह्या स्थितीतून बाहेर काढण्याचं आव्हान तो स्वीकारतो त्याचं कारण वेगळं असं आहे.  

एखादया मनोरुग्णाला त्याच्या त्या अवस्थेतुन सामान्य स्थितीत आणण्याचा प्रवास रंगमंचावर अडीच - तीन तासांत उलगडुन दाखविण्याचं आव्हान झेपण्याचा प्रामाणिक प्रयत्न नाटक, कलाकार करतात. ह्या आजारातील विविध संज्ञाचा योग्य वापर, त्या प्रेक्षकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा! आजारातून बरं होताना रुग्णाला कसं विविध स्थितींमधून जावं लागतं, त्याला कसे भास होत राहतात, त्यावेळी कसं त्याला जवळच्या माणसाची गरज असते हे सर्व काही खूप चांगल्या पद्धतीनं सादर करण्यात आलं आहे. नशील्या पदार्थांचा राक्षस आज नाक्या-नाक्यावर लपून बसला आहे. आपल्या युवकांचं  ह्या राक्षसापासुन रक्षण करणं कसं आवश्यक आहे हा संदेशही नाटक देतं. पण कुठंही हा संदेश अगदी भडक रूपात आपल्यासमोर येत नाही. 

नाटकाची संहिता, सादरीकरण एका उच्च दर्जाचं आहे. सतीश राजवाडेंविषयी थोडंफार ऐकून होतो, पण ह्या नाटकातील त्यांचा अभिनय पाहुन नक्कीच त्यांचा चाहता बनलो आहे.  एका प्रथितयश डॉक्टरच्या वागण्यातील आत्मविश्वास, भारदस्तता त्यांच्या अभिनयातुन अगदी परिपुर्णपणे पाहावयास मिळते. 

आपल्याला तिचा मनोमनी राग येतो असा राधिकेचा अभिनय आणि त्यातच तिचं यश सामावलेलं! कॉर्पोरेट जगातील संस्कृती तिनं अगदी हुबेहूब प्रेक्षकांसमोर आणली आहे. आपल्याला यशस्वी बनायचं आहे हे तिनं कधी कोणापासुन लपविलं नाही, कायद्याच्या चौकटीत राहून जमेल त्या मार्गानं आर्थिकदृष्ट्या यशस्वी बनायचं हे तिचं ध्येय आहे. त्यासाठीच तिनं अतुलवरील असलेल्या आपल्या प्रेमाला एका क्षणी दूर केलं. अशी विचारात सुस्पष्टता असणारी माणसं आपल्या भोवताली आपल्याला दिसत असतात. राधिका त्यांना अगदी हुबेहूब रूपात आपल्या समोर आणते. 

एक चांगलं कथानक लिहिल्याबद्दल सुदीप मोडक ह्याचं मनःपुर्वक अभिनंदन ! अमली पदार्थांचा आपल्या भोवताली असलेला विळखा, त्यापासुन आपल्या तरुण पिढीला असणारा धोका ( धारावीसारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या युवकांना तर अधिकच धोका!), त्यातुन बाहेर पडत यशस्वी होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हे सारं काही ह्या कथानकात अगदी संयतपणं आपल्यासमोर ह्या कथानकाद्वारे सुदीप ह्यानं आणलं आहे. अभिनयही चांगला म्हणावा असा ! 

मला हे नाटक आवडलं कारण नाटकात मंगेश निराशेच्या ह्या गर्तेत का सापडला ह्याचा शोध घेण्याचा खराखुरा प्रयत्न डॉ. अतुल करत राहतात. मंगेश नक्की कशापासून पळतोय हे मला शोधायचं आहे असं ते राधिकेला सांगतात. एका मुलाचं आयुष्य वाचविण्यासाठी सुरुवातीला केवळ एकदाच भेटायची तयारी दाखवली असताना नंतर मात्र ते आपला निवृत्तीचा विचार बदलतात.  इतकी खोलवर नसेल पण निराशा आपल्या सगळ्यांचा पाठलाग तर करतच असते ना? हा विचार माझ्या मनात घोळत राहिला. हे आपण उघडपणे मान्य करायला शिकणार का? एक समाज म्हणुन नैराश्य हा एक गहन प्रश्न बनतोय ह्याची कबुली आपण कधी देणार? 

मला हे नाटक आवडलं कारण कुठंही उथळपणा नाही. आपल्याकडं बावनकशी सोनं आहे तर मग बाकी उथळपणाची गरजच नाही हे नाट्यकर्त्यांना चांगलं ठावूक आहे. उगाचच पात्रांची खोगीरभरती नाही. सेट, संगीत ह्यावर उगाचच जास्तीचं लक्ष दिले नाही. मला आवडणाऱ्या  'No Nonsense' प्रकारात मोडणारं! कितीही बुद्धिमान माणूस असला तरी हॅकर्सना तासाभरात पळवुन लावणं हा एकमात्र खटकलेला मुद्दा ! 

पहिल्या प्रयोगाला पुढच्या काही रांगाच भरल्या होत्या; आज बऱ्याच भरल्या आहेत, पुढील प्रयोगाला हाऊसफुल्ल होऊ द्यात असे डॉ. राजवाडे प्रेक्षकांचं आभार मानताना म्हणाले. बऱ्याच अटी कबुल करून घेऊन मी पत्नीसोबत ह्या नाटकाला गेलो होतो. तिचं इथं आभार मानणं उचित ठरेल. आज ह्या नाटकाचा प्रयोग पुण्यात होता. पुणेकरांना आवडलं तर नक्कीच यशस्वी होईल हे नाटक ! 

सद्यस्थितीनुसार प्रेक्षकांत ज्येष्ठ नागरिकांचंच त्यातही महिलांचंच बहुमत होतं. पण काही वेळानं युवकवर्गाचा देखील काही प्रमाणात प्रवेश झाला. पुढील प्रवेशात हे प्रमाणसुद्धा वाढावं ही इच्छा !  बाकी मध्यंतरात आमच्या शेजारी पॉवरलूम, हँडलूम असे शब्द कानांवर पडले. पत्नीकडून त्याची अधिक माहिती गोळा करायला हवी. तितकीच सामान्यज्ञानात भर !

शनिवार, १६ मे, २०२६

The Folk आख्यान!





गेल्या शनिवारी "The Folk आख्यान" आणि आज (ह्या शनिवारी) "पुढच्या शुक्रवारी सात वाजता" ह्या दोन दर्जेदार कलाकृती अनुभवण्यास मिळाल्या. 

आजची पोस्ट "The Folk आख्यान"  विषयी. महाराष्ट्राचं वैभव म्हणुन ज्यांना आपण संबोधू शकतो असे अभंग, भारूड, लावणी, गवळणी हे लोकसंगीताचे प्रकार वर्षोनुवर्षे महाराष्ट्राच्या गावागावांत समाजजीवनाशी अत्यंत जवळून निगडीत आहेत. हल्लीच्या संगणकाच्या विश्वात ह्या कला काळाच्या उदरात गडप होतील का असं भय वाटत असतांना तरुण कलावंतांनी सादर केलेला "The Folk आख्यान" हा कार्यक्रम एक अत्यंत सुखद धक्का देऊन जातो. 

ह्यातील बहुदा सर्व कलाकृती नवनिर्मीत असल्या तरी परंपरेशी आपली नाळ जोडुन आहेत. कलाकार खरोखरच लोकसंगीताला मूळ स्वरूपात सादर करतात. आपण २०२६ सालात हा कार्यक्रम पाहतो आहोत असं जाणवतच नाही इतकी ह्या कलाकारांची गुणवत्ता आहे. बहुदा ह्यातील बरेचसे कलाकार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतून आल्यानं शहरी संस्कृतीनं त्यांच्या कलेच्या शुध्दतेवर घाला केला नाही. 

कार्यक्रमाच्या शेवटी जवळपास १५ मिनिटं सादर करण्यात आलेली असंख्य वाद्यांची जुगलबंदी केवळ अप्रतिमच ! यानिमित्तानं पारंपरिक, दुर्मिळ वाद्यांचा परिचय आपल्याला होतो. ह्या कार्यक्रमाच्या सादरीकरणामागं ह्या सर्व कलावंतांनी किती प्रचंड मेहनत केली असेल ह्याचा विचार करूनच थक्क व्हायला होतं. माझ्या मनात ह्या कार्यक्रमाने प्रचंड सकारात्मकता निर्माण केली. ह्या कार्यक्रमाचे निर्माते महाराष्ट्रातील लोककलाकारांना मदत व्हावी ह्यासाठी सक्रिय प्रयत्न करत असतात. आपल्या लोकसंगीताविषयी, संस्कृतीविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसानं पाहावी अशी ही कलाकृती! ह्यातील सर्वच कलाकार युवा असल्यानं असे उपक्रम आपल्या संस्कृतीला प्रतिकुल वातावरणात देखील पुढे नेऊ शकतील हा आशेचा किरण ! बऱ्यापैकी महागडी तिकिटं असली तरी मैदानावरील सर्व आसने भरली होती, हा ही एक सकारात्मक संदेश ! बाकी आपले प्रेक्षक कितीही सुंदर कलाकृती असो आपल्या चमचमीत खाण्यावरील प्रेमाला कशी मुरड घालू शकत नाहीत हे पाहुन चांगलंच मनोरंजन झालं. 

खटकणाऱ्या काही गोष्टी ! साडेसहाची वेळ देऊन कार्यक्रम साडेसात वाजता सुरु करण्यात आला. सुर्यप्रकाश नाहीसा होण्याची आम्ही वाट पाहत होतो असं आयोजकांतर्फे सांगण्यात आलं. ही अत्यंत अस्वीकारार्ह अशी बाब आहे. तुमच्याकडं एक बावनकशी सोनं म्हणावं अशी कलाकृती आहे, त्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रेक्षकवर्ग तुम्हांला लाभला आहे. त्यांना गृहीत धरू नका. सादरीकरणात पुर्णपणे व्यावसायिकता ठेवा. मुख्य सूत्रधाराच्या शब्दफेकीचं, भाषेवरील प्रभुत्वाचं कौतुक करावं तितकं थोडं! पण एकंदरीत निवेदनात कुठंतरी विषयांतर झाल्यासारखं वाटत राहिलं. उगाचच उथळ विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यासारख्या काहीशा आजच्या काळात कर्मठ म्हणता येईल अशा प्रेक्षकाला हे खटकलं ! वसईतील निसर्गाचा आधीच ऱ्हास होत असताना दहा मिनिटांचं मध्यंतर अशी घोषणा करून जवळपास पंचवीस मिनिटं उंच इमारतीच्या जाहिराती दाखवत राहणं चुकीचं आहे! वसईत आजही रात्री दहा वाजता निद्राधीन होणारा वर्ग अस्तित्वात आहे ह्याची जाणीव असायला हवी होती!

हे सर्व असलं तरी पुन्हा एकदा - "संधी मिळाल्यास हा कार्यक्रम बघाच !"

आज पाहिलेलं "पुढच्या शुक्रवारी सात वाजता" हे नाटक म्हणजे एक अत्यंत उत्कृष्ट कलाकृती ! त्यावरील पोस्ट लवकरच ! 

शुक्रवार, ८ मे, २०२६

अनंतिका !




सकाळी पावणेसात ते सहा पन्नास ह्या वेळात सूर्याच्या किरणांचं रूप पाहायला आणि अंगावर खेळवायला प्रसन्नदायी वाटतं. सहा एकावन्न झाले की ही किरणं तप्त होऊ लागतात. मी तासा - दोन तासाला जास्वंदीच्या रोपट्याला पाणी देत राहतो. मुंबईच्या भट्टीत गॅलरीत वाढणाऱ्या रोपट्यांविषयी माझ्या मनात दयाभाव निर्माण होत राहतो. त्यांना पुढील जन्म कोणत्यातरी जंगलात मिळो आणि तिथुन कोणत्याही महामार्गाची योजना निघू नये अशी मी परमेश्वराकडं मनोमन प्रार्थना करत राहतो. 

गावाकडील भाजीवाले साडेसात - आठच्या सुमारास आपापल्या जागी स्थिरावतात. तोवर सूर्याच्या किरणांनी दाहक रूप धारण केलेलं असतं. दोन मिनिटं ह्या उन्हात राहताच मला कससंच होऊ लागतं. लहानपणी मे महिन्यात तासनतास क्रिकेट खेळणारा आदित्य गेला कुठं असा प्रश्न मला पडत राहतो. अकराच्या सुमारास कार्यालयात निघताना ह्या भाजीवाल्यांना तळपत्या उन्हांत एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारतांना पाहुन मी अचंबित होतो. मेट्रोच्या मार्गात नसते बदल केल्यानं मी हल्ली लोकल ट्रेनने कार्यालयात जातो. त्या वेळातील एकमेव वातानुकूलित लोकल आपल्या मर्जीनुसार पंधरा मिनिटांच्या कालावधीत केव्हांही येते, केव्हांतरी रद्द सुद्धा होते.  गेल्या आठवड्यापासून मी टोपीचा वापर सुरु केला आहे. ह्या एकंदरीत प्रकाराचा मी खूपच धसका घेतला आहे. यंदा पाऊस कमी असल्यानं हा प्रकार असाच काही महिने सुरु राहील ह्या धास्तीनं मी अधिकच चिंताग्रस्त होतो. 

..... 

मी पृथ्वीपासून हजारो प्रकाशवर्षे दूर अशा ग्रहावर एकटाच असतो.  ह्या उन्हापासून, ह्या तप्ततेपासून मुक्तता मिळाल्यानं मला खूप खूप आनंद झालेला असतो. माझ्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय त्या सर्वशक्तिमानानं केलेली असते. भोवताली नानाविध बियाणी विखुरलेली असतात. त्यांचं प्रयोजन काहीसं मला उमजलं असलं तरीही मी त्याविषयी शाश्वत नसतो. त्यावेळी एक धीरगंभीर आवाज मनाच्या गाभाऱ्यात उमटतो. "तुझ्या मनोहर वसुंधरेचं साजिरे रूप ह्या अनंतिकेला देण्याची जबाबदारी तुझ्यावर मी सोपवत आहे!" 

हजारो वर्षे उलटून गेलेली असतात. त्या बियाणांच्या आधारे अनंतिकेला मिळालेलं ते साजिरे रूप पाहताना मला खूपच आनंद होत असतो. मी एक निमित्तमात्र असतो. 

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

या चिमण्यांनो परत फिरा रे !


आमची गॅलरी चिमण्यांना आवडते असं दिसतंय. हल्ली पहाटे लवकर उजाडत असल्यानं सव्वा सहाच्या सुमारास येऊन त्या चिवचिवाट करू लागतात. चिमण्यांच्या चिवचिवाटाने येणारी जाग एक प्रसन्नतेची चाहुल घेऊन येते. असंही सकाळची वेळ  रात्री झोपताना मनात असलेल्या चिंता दुर सारण्याची क्षमता बाळगुन असते, त्यावर हा चिमण्यांचा चिवचिवाट एक प्रसन्नतेचा शिडकावा पसरवुन जातो.  हिवाळ्यात ज्या वेळी ह्यांना थंडी वाजत असे (हा माझा कयास!) त्यावेळी त्यातील चिमणी बराच वेळ एका जागी बसुन समोरील झाडांकडं पाहत समाधिस्थ होत असे.  हा फोटो ज्यावेळी फेसबुकवर टाकला त्यावेळी मित्रानं 'कधी तिने मनोरम रुसणे' अशी टिपण्णी केली ज्यामुळं ह्या सुप्रसिद्ध काव्यपक्तींना उजाळा मिळाला! 

कधी तिने मनोरम रुसणे

कधी तिने मनोरम रुसणे

रुसण्यात उगिच ते हसणे
रुसण्यात उगिच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
म्हणून ते मनोहर रुसणे

पुरुषांच्या मनात ज्या काही मोजक्या गोष्टींची दहशत असते त्यात ह्या तथाकथित रुसण्याचा अग्रक्रम आहे. ह्याची प्रामुख्यानं दोन कारणं! हा रुसवा निर्माण होण्यास आपण कसे कारणीभुत आहोत ह्याचा बहुतांश वेळी अजिबातच थांगपत्ता नसणे हे पहिलं आणि हा रुसवा दुर करण्याचे आपण जे प्रयत्न करीत आहोत त्यामुळं हा रुसवा अधिकच वाढत जातो ह्याचा पुरुषांनी घेतलेला धसका! त्यामुळं ह्या रुसण्याकडं पुर्णपणे दुर्लक्ष करण्याचं धाडस जे पुरुष दाखवतात त्यांना माझा सलाम! वरच्या छायाचित्रातील चिमणा बहुदा त्याच वर्गातील असावा !

हे सर्व काही प्रसन्न असताना ह्या आठवड्यात टाइम्स मध्ये एका कोपऱ्यात एक दुःखद बातमी आली.  मध्य प्रदेशात आलेल्या अवकाळी वादळी पावसानं भरोली आणि अमायान गावांतील सात किलोमीटर पट्ट्यात हजारो चिमण्या मृत्युमुखी पडल्या. बहुदा ह्या अचानक आलेल्या पावसानं त्यांना आडोश्याला जाण्याची संधीच मिळाली नाही! बातमी वाचुन झालेल्या तीव्र दुःखाचा  जीवनरगड्याच्या संघर्षात काही तासांतच विसर पडला. अवकाळी पावसानं उद्ध्वस्त झालेल्या शेतांच्या / संसाराच्या बातम्या वाचुन त्या शेतकऱ्यांच्या विषयी आपल्या मनात क्षणभर तरी अनुकंपा निर्माण होत असावी का हा प्रश्न निर्माण व्हावा इतके आपण असंवेदनशील बनलो आहोत, तर ह्या बिचाऱ्या चिमण्यांच्या जीवाचं काय? 

ही बातमी वाचल्यानंतर मुंबईच्या काँक्रीट जंगलात आपला निवास शोधणाऱ्या आमच्या चिमण्यांकडं पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. त्यांना हिरव्यागार शेतात दाणे टिपायला मिळत नाही ह्याचं मला आधी दुःख वाटत असे. आता मात्र किमान त्या ह्या काँक्रीट जंगलात आपला जीव सुरक्षित ठेवू शकतात असं वाटुन गेलं. गावातली माणसं काय किंवा चिमण्या काय त्यांच्या व्यथा सारख्याच! जगाच्या काही भागात माणसांची चिमणी बाळे सुद्धा हकनाक आपला जीव गमावुन बसताहेत! त्यांच्याविषयी आपली अनुकंपा जर का असेल तर तिलासुद्धा  आपला जीवनरगड्याचा संघर्ष अल्पकालीन ठरवत आहे किंबहुना जीवनरगड्याचा संघर्ष ही ढाल पुढं करून आपण अधिकाधिक स्वकेंद्रित बनत चाललो आहोत. 

रविवार, २९ मार्च, २०२६

मनाला काबुत ठेवताना !


खंबीर मनाची माणसं हल्ली पुर्वीइतक्या वारंवारतेने दिसत नाहीत किंवा माणसांची खंबीरता वारंवार आपल्यासमोर येत नाही. ह्या दोन्ही गोष्टींच्या अनुभवानं मन पुर्वी आपसुक शांत होत असे. हल्ली भोवतालच्या माणसांशी सखोल संवाद क्वचितच होतो. सखोल संवाद अपघातानं होत नाही. सखोल संवाद घडवून आणण्यासाठी जाणकार, जगाचा अनुभव घेतलेली माणसं बैठकीत असावी लागतात, त्यांना बोलतं करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी लागते. अशा माणसांची कदर करणारा समुह भोवताली असावा लागतो. हल्ली अशा माणसांची कदर करण्याची वृत्ती आपण एक समाज म्हणुन झपाट्यानं गमावत चाललो आहोत. 

वर्तमानपत्रांचं समाजजीवनातील स्थान मला अजुनही खूप महत्वाचं वाटतं. ती समाजातील अगदी साध्या बातम्या देखील आपणापर्यंत पोहोचवत असतात. त्यात भोवतालच्या जीवनातील विज्ञान समजावुन सांगणारं सदर असतं, तिथं जुनी माणसं आपलं मनोगत अजुनही मांडत असतात. मोबाईल, संगणकाद्वारे आपल्यापर्यंत पोहचणाऱ्या बातम्यांमध्ये, सदरांमध्ये जुन्या लोकांची मतं क्वचितच आपल्यापर्यंत पोहोचत असतात. केवळ ह्या माध्यमांवर अवलंबुन राहिल्यास एका महत्वाच्या दृष्टिकोनाला आपण मुकत राहतो. 

हल्ली सामाजिक क्षेत्रातील वावर असणाऱ्या व्यक्तींच्या अधःपतनाच्या बातम्या आपणासमोर येत राहतात. सामाजिक माध्यमांची गरज म्हणुन अशा प्रकारच्या बातम्यांचा भडीमार आपल्यावर होत राहतो. मी ह्या बातम्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतो. ह्या घटना समाजजीवनात प्रथमच घडत नाहीयेत फक्त समाजमाध्यमं त्यांना आपल्यासमोर अतिउग्र रूपात सातत्यानं आणत आहेत. मला कोणाचं समर्थन करायचं नाहीये. पण जीवनात अजुन खूप तीव्र अशी दुःख आहेत, तिच्याकडं एकतर आपलं लक्ष नाही किंवा आपल्याला त्याविषयी काही वाटत नाही. 

जीवनाच्या संघर्षाला दररोज अजिबात कुरकूर न करताना सामोरी जाणारी माणसं आपल्याला दिसत राहतात. सफाळे - केळवा इथून दररोज सकाळी चार वाजताची ट्रेन पकडून सात वाजता बोरिवलीला ताज्या भाज्या घेऊन येणाऱ्या भाजीवाल्या असतात, त्यात सत्तरीला पोहोचलेली एक वृद्ध महिला देखील आहे. थंडी, पाऊस, दुपारचं ऊन ह्याविषयी कधीही तक्रार करताना मी तिला पाहिलं नाही. 

आपल्या नियंत्रणातील गोष्टींविषयीच फक्त वाईट वाटून घेण्याचा प्रयत्न करावा. ज्या नियंत्रणात नाहीत त्यांच्याविषयी नाही! ज्या व्यक्तींशी बोलुन चांगलं वाटतं, ज्या गोष्टी (अर्थात समाजातील चालीरीतीला अनुसरून) केल्यानं बरं वाटतं, ज्या ठिकाणांना भेट दिल्यानं बरं वाटतं, जे पदार्थ (योग्य) ग्रहण केल्यानं मन प्रसन्न होतं असं सर्व काही करावं. जी माणसं आपल्या आयुष्यात आनंद आणतात ते त्यांना योग्य प्रकारे सांगावं. 

एका विशिष्ट मर्यादेपलीकडे स्वप्रतिमेची फिकीर बाळगू नये. स्वानंद आणि स्वप्रतिमेची फिकीर ह्यात निर्णय घ्यायचा झाल्यास स्वानंदाला झुकतं माप द्यावं. फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवावी की आपला स्वानंद दुसऱ्या कोणाच्या पीडेला कारणीभुत न व्हावा. आपल्यापायी कोणाला पीडा होऊ शकतेय ह्याची जाणीव, हे समाजभान आपण दर्शवावं. 

साध्या साध्या गोष्टी नकारात्मकतेकडे झुकू पाहणाऱ्या मनाला थोपवू शकतात. सकाळी लवकर उठुन स्नान करून देवपूजा / भगवंताचं स्मरण करणं हे देखील मनाला बरं वाटुन देऊ शकतं. निसर्गाच्या सानिध्यात जे राहतात त्यांना निसर्ग भरभरून देत राहतो, त्यांच्या मनाची काळजी तो वाहत राहतो. निसर्गाअभावी आपल्या महानगरांचं, त्यातील माणसांचं काय होणार ह्याची चिंता मात्र मला सतावत राहते. वरणभात, भाजी, चपाती, (मांसाहारी असल्यास मोजकाच सामिष आहार), सायंकाळी लवकर आणि मोजकं जेवणं ह्या साऱ्या गोष्टी मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी कारणीभूत असतात. 

सतत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या, भ्रमणध्वनीला खिळून राहणाऱ्या माणसांचं मन त्याच्या शांत स्थितीपासून दीर्घकाळ दूर राहतं . त्याला पूर्ण शांतीची आवश्यक वेळ न मिळाल्यास  ते बेभान होण्याची शक्यता वाढीस लागते. 

ही पोस्ट लिहूनही उद्या मी माझ्या मनाला शांत ठेवू शकेन असे अजिबात नाही. फक्त मनाची सैरभैर परिस्थिती ही कायम राहणारी नाही, परिस्थिती बदलताच पुन्हा एकदा मनाला मी काबुत आणू शकेन इतका विश्वास पुन्हा नव्यानं देण्याचे काम मात्र ही पोस्ट जरूर करेल. 

(पोस्टमधील छायाचित्र माझ्या कार्यालयातील सहकारीच्या नालासोपारा येथील शेतात डिसेंबरात घेतलेलं ! अशा ठिकाणांना दिलेल्या भेटी मनाला दीर्घकाळ शांत ठेवतात )

शनिवार, २१ मार्च, २०२६

विमानाचा U टर्न





एअर इंडियाचे प्रवाशांनी भरलेले एक विमान गुरुवारी दिल्ली आणि व्हॅन्कुव्हर दरम्यान उड्डाण करत असताना मध्येच परत फिरवण्यात आले.  या मार्गावर Air India ला Boeing 777-300ER वापरण्याची परवानगी आहे, परंतु या विशिष्ट उड्डाणासाठी 777 चे चुकीचे मॉडेल (Boeing 777-200LR) वापरण्यात आले. उड्डाण केल्यापासून नऊ तासांनी बिचारे प्रवासी आपल्या मुळ उड्डाणस्थानी परतले. ह्या प्रवाशांना परत इमिग्रेशन तपासणीतून जाऊन हॉटेलात विश्रांती घेऊन मग योग्य मॉडेलचा वापर करून कॅनडाला परत पाठविण्यात आले. 

ही बातमी वाचल्यावर माझ्या मनात आलेले विविध विचार 

१ ) आखातातील सद्यस्थितीमुळं हे विमान पुर्व दिशेनं जात होते. पृथ्वी गोल असल्याचा किती फायदा होतो हे हल्ली आपल्याला जाणवत आहे. पश्चिम दिशेला काही प्रश्न उद्भवले की विमानं पुर्व दिशेनं आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतात. जर पृथ्वी आयतघनाकृती (आयताचे त्रिमितीय रूप) असती तर हे असे शक्य झाले नसते.  पृथ्वीच्या निर्मात्यानं किती दूरवरचा विचार करून ठेवला आहे हे अशा वेळी आपल्याला जाणवतं. 

२) ह्या विमानातुन कित्येकजण असे असतील ज्यांनी अगदी मिनिटामिनिटांचा हिशोब करून कॅनडामध्ये आपल्या पुढील भेटीचं नियोजन केलं असेल. त्यांचं सर्व नियोजन धुळीस मिळालं असेल. 

३) माझ्यासारखे काही लोकं विमानात Flight Map सुरु करून बसले असतील. विमानानं U टर्न घेतला आहे हे समजताच त्यांच्या मनात किती वादळं निर्माण झाली असतील. अजून एक शक्यता म्हणजे एखादा प्रवासी उड्डाण केल्यापासुन दोन तीन तासांनी आपलं ठिकाण कुठं आहे ह्याची खातरजमा करून झोपी गेला असेल, तो / ती  काही तासांनी जागा / जागी  झाल्यावर आपण परत त्याच ठिकाणी आहोत हे समजल्यावर त्यांच्या मनात किती गोंधळ निर्माण झाला असेल. 

४) माहिती आणि तंत्रज्ञान आणि बहुतांश सर्वच क्षेत्रात Production Issue झाल्यावर प्रथम त्या परिस्थितीचं निराकरण केल्यानंतर मूळ कारण विश्लेषण बैठक बोलावली जाते. ह्या बैठकीत ह्या चुकीचं मुळ कारण नक्की कुठं आहे ह्यावर उहापोह केला जातो. कोण्या एका व्यक्तीच्या चुकीमुळं इतका मोठा गोंधळ होत असेल तर चूक त्या व्यक्तीची नसुन ती व्यवसाय प्रक्रिया निर्माण करणाऱ्या व्यवस्थापनाची असते हे मुलभूत तत्त्व. ह्या चुकांपासून शिकुन ही व्यवसाय प्रक्रिया अधिकाधिक प्रगल्भ करावी लागते. 

५) आता ह्या घटनेसाठी सुद्धा नक्कीच मूळ कारण विश्लेषण बैठक बोलावली जाईल. त्यात नक्की कोणते मुद्दे चर्चिले जातील हे जाणुन घेण्यासाठी मी उत्सुक राहीन. पण माझ्या कल्पनाशक्तीनुसार खालील कारणे असु शकतात. 

अ.  जसं एस. टी. स्टॅण्डवरील कर्मचारी बस क्रमांक MH 4756 कोल्हापूर, MH 3027 सातारा अशा प्रकारे वेगवेगळ्या एसट्या विविध मार्गावर पाठवत असतो, त्याचप्रमाणे दिल्ली विमानतळावर बसलेला कर्मचारी विविध मार्गांवर विमानांना पाठवत असावा. बहुतेक त्याच्या चष्म्याचा नंबर चुकीचा असल्यानं Boeing 777-300ER ऐवजी त्यानं Boeing 777-200LR विमानाकडं पाहुन त्या विमानास कॅनडाला जाण्यास परवानगी दिली. 
ह्यावर खालील प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येतील.
१. विमान वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चष्मा नंबर वेळच्या वेळी तपासुन घ्यावा. अधिक खबरदारी म्हणुन दोघा जणांनी मिळून विमानाचा मॉडेल नंबर तपासून मगच त्याचे वाटप करावे. 
२. चार तासांचं उड्डाण झाल्यानंतर परत फिरण्याऐवजी अधिकारी व्यक्तींनी कॅनडाच्या अधिकारी व्यक्तींशी बोलणी करून अपवादात्मक परिस्थिती म्हणुन Boeing 777-200LR ला कॅनडामध्ये प्रवेश करण्यास एकदाच परवानगी देण्याची विनंती करावयास हवी होती. अशी विनंती प्रत्यक्षात केली गेली असल्यास जर ती का फेटाळली गेली असेल त्या फेटाळण्याचं सुद्धा मूळ कारण विश्लेषण केलं गेलं पाहिजे. 
३. कॅनडाला Boeing 777-200LR च्या नावाविषयी अंकशास्त्रानुसार काही समस्या असल्यास त्याचं निराकरण करण्यात यावं. किंवा त्यातील तांत्रिक बाबीविषयी काही उणिवा असल्यास त्यांचं निराकरण करावं. 
४. ह्या समस्यांचं मुळ भारत - कॅनडा देशांमधील ताणलेल्या राजनैतिक संबंधांशी निगडित असल्यास ते सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात यावं. 

वाचकांपैकी कोणाला ह्या बैठकीची आतल्या गोटातील बातमी मिळाल्यास मला ती कळवावी. बाकी ह्या घटनेतून निष्पन्न झालेल्या सकारात्मक गोष्टी - 
१. वैमानिकानं स्थिरमनाने आकाशातील वाहतुकीचे सर्व नियम पाळत U टर्न घेतला.  अवकाशातील विमानांची वाढती संख्या पाहता हळूहळू अशा U टर्न घेणाऱ्या विमानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं भविष्यात अवकाशात वाहतुक पोलीस ठेवावेत. 
२. आतापर्यंत ह्या विमानातील कोणत्याही प्रवाशाने तक्रार केल्याचं वाचनात आलं नाही. बातमीत असंही म्हणण्यात आलं होतं की पश्चिम दिशेनं आखातातून जाणारे प्रवाशी आपल्या प्रवासाला उशीर होईल, विमान परत फिरेल ह्या शक्यतांच्या  अशा मानसिक तयारीतच असतात. पण पूर्व दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांची मात्र अशी मानसिक तयारी नसते. मी हे वाचून धन्य झालो. ह्या पुढं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सर्व दिशेला जाणाऱ्या विमानांतील सर्व प्रवाशांनी अशा शक्यतांची तयारी ठेवावी.  जगाचं पुढं काय होईल कोणास ठावूक ?

शनिवार, ७ मार्च, २०२६

२०२६ फ्रेब्रुवारी - अमेरिका दौरा

गेल्या शनिवारी दोन आठवड्यांच्या अमेरिका भेटीनंतर मी मुंबईत परतलो. ह्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत. जाणकारांच्या माहितीसाठी - कामासंबंधित कोणतीही माहिती ह्या ब्लॉगमध्ये देता येत नसल्यानं हा माणुस केवळ फिरायला जातो की काय असा आपला (गैर) समज होत असल्यास त्यात आपली काही चूक नाही. मी फक्त इतकं स्पष्टीकरण देऊ इच्छितो की मी तिथं जाऊन कामंही करतो. 

सदैव ब्रिटिश एअरवेजने जाणारा मी!  ह्यावेळी मात्र मी इथीहाद ह्या विमानकंपनीच्या विमानानं अबुधाबी मार्गे प्रवास केला. इमिरेट्सची बिझनेस क्लासमधील निर्विवादपणे सर्वोत्तम! अगदी एक - दोन वर्षापूर्वी इथीहाद त्याच्या जवळपास सेवा देत असे असं जाणकार सांगतात. पण माझी मात्र ह्या संपुर्ण प्रवासात घोर निराशा झाली. सेवेमधील तत्परता, जेवणाचा दर्जा ह्या बाबतीत नक्कीच सुधारणेस वाव आहे. मदिरापान हे आपलं क्षेत्र नसल्यानं त्याबाबतीत मी काही बोलु शकत नाही. 

ब्रिटिश एअरवेजचे विमान सकाळी दोन वाजताचे. घरातुन दहा वाजता निघाल्यावर घरची मंडळी झोपायला तयार. मुंबई ते लंडन नऊ तास तर लंडन ते फिलाडेल्फिया सहा तास अशी प्रवासाच्या दोन टप्प्यातील अगदीच विषम म्हणता येणार नाही अशी विभागणी. पहिल्या टप्प्यात झोप घेण्याची चांगली संधी! ही माझं ब्रिटिश एअरवेजच्या पारड्यात माप टाकण्याची महत्वाची कारणं ! माझ्या आवडत्या लंडनची ओझरती भेट हे महत्वाचं !

ह्या उलट इथीहादचे विमान सकाळी पावणेपाच  वाजताचे ! पहिला टप्पा मोजुन मापून तीन तासांचा तर दुसरा चौदा तासांचा! घरच्यांच्या आणि आपल्या झोपेचं खोबरं ! 


अबुधाबीस थांबा घेतला असता तिथं काढलेले फोटो. 



अबुधाबी हे एकमेव विमानतळ असे आहे जिथं अमेरिका देशातील इमिग्रेशन आधीच पार पाडलं जातं. त्यामुळं अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर आपण तेथील देशांतर्गत विमानातुन प्रवास केल्यासारखं थेट बॅग्ज घेऊन विमानतळाबाहेर पडू शकतो. 
चौदा तासांचा सलग विमान प्रवास हे म्हणायला गेलं तर दिव्यच ! प्रवासमार्ग दाखविणारे हे चित्र !








इथीहादने स्वतःहुन फक्त एकदाच जेवण दिलं. मी काही वेळानं न राहवून चहा, ब्रेड मागवुन घेतला.  डोळ्यांना आराम द्यावा म्हणून ह्या चौदा तासांत मी केवळ एकच चित्रपट पाहिला. बऱ्यापैकी झोपलो. 

JFK विमानतळावर वेळेवर आगमन झालं. बॅग्स सुद्धा  तात्काळ आल्या. सहा डॉलर्स खर्च करून घेतलेल्या ट्रॉलीवर चढवून उबेरचे आरक्षण करून हॉटेलच्या दिशेनं मार्गस्थ झालो. बऱ्याच वर्षांनी झालेलं न्युयॉर्कचं दर्शन काहीसं मनाला खिन्न करून गेलं. शहर काहीसं जुनं वाटू लागलं आहे. बऱ्याच ठिकाणी बांधकामं सुरु होती. एका आठवड्यापूर्वी झालेल्या मोठ्या बर्फवृष्टीतला बर्फ मातीत मिसळून त्याचं गोजिरेपण बर्फ हरवुन बसला होता. फिलाडेल्फियामध्ये अजिबात न दिसणारी रहदारी इथं तात्काळ जाणवली.  

"New York Marriott at the Brooklyn Bridge" ह्या हॉटेलात आमचं आगमन झालं. फिलाडेल्फियामधील प्रशस्त खोल्यांची सवय झाल्यानं ही खोली अगदीच लहान वाटत होती.  Brooklyn Bridge चे दर्शन देणाऱ्या बाजुची खोली मला मिळाली नाही.  सचैल स्नान करून ग्रबहब मधुन रात्रीचे जेवण मागवलं. भारतात झोमॅटोवरून घरात अगदी अर्ध्या तासांत आपल्या आवडीचं जेवण आपल्याला मिळतं.  इथं किमान एक तासभराची प्रतीक्षा आपणास करावी लागते. ह्या वास्तव्यात पाऊण तासानंतर ऑर्डर रद्द होण्याचा दुर्धर प्रसंग माझ्यावर तीन वेळा ओढवला. संयम महत्वाचा असतो !




दुसरा दिवस हा प्रेसिडेंट्स डेच्या सुट्टीचा असल्यानं सहकाऱ्यांनी उणे तापमानात सुद्धा न्युयॉर्कची मनसोक्त सैर केली. मी मात्र थोडक्यात आटपलं! 


तीन दिवस न्युयॉर्क ब्रुकलिन कार्यालयात अगदी सखोल चर्चा झाली.  तिसऱ्या दिवशी सायंकाळी आम्ही उबेरने फिलाडेल्फियाला आलो. मार्गात आलेल्या अनेक पुलांपैकी एका पुलावरील हा व्हिडीओ !


इथंही कार्यालयात दोन दिवसांची परिषद, सहकाऱ्यांशी चर्चा असा अगदी व्यस्त कार्यक्रम होता. बालमित्र अजय अगदी वेळात वेळ काढून मला नेहमीप्रमाणे भेटायला आला. रविवारी सकाळी कार्यालयीन सहकाऱ्याच्या घरी मोठ्या टीव्हीवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पाहावयास गेलो. भारतानं दणकून मार खाल्ल्यावर रविवार सकाळच्या झोपेचं खोबरं केल्याचं दुःख झालं. 

दुपारपासून पुन्हा एकदा जोरदार बर्फवृष्टीस सुरवात होण्याचा हवामानखात्याचा अंदाज होता. अगदी सव्वातीन - साडेतीन पासून बर्फवृष्टीस सुरुवात होईल इतकं अचूक अनुमान त्यांनी वर्तवलं होते. त्यानुसार बर्फवृष्टीस सुरुवात झाली देखील ! सायंकाळी आम्ही सर्व सहकारी हिवाळ्याची वस्त्रे परिधान करून खाली उतरलो. तिथं फोटो शूट केलं. मी थोडा रॅम्प WALK सुद्धा केला. त्याचा व्हिडीओ प्रसिद्ध केल्यास विविध जाहिरात कंपन्यांकडुन माझा पिच्छा पुरविला जाण्याचा धोका ध्यानात घेऊन मी तो मोह टाळत आहे. 







पुढील तीन दिवसातील बर्फमय परिसराची नयनरम्य चित्रं ! तापमान शुन्याच्या आसपासच रेंगाळत असल्यानं कार्यालयात अथवा बाहेर फिरायला जाताना अगदी युद्धाला जावं त्याप्रमाणं तयारी करावी लागत होती. 
शनिवार सकाळ 

रविवारी मध्यरात्री 


रात्री जेट लॅगने नेहमीप्रमाणं दीड - दोनला जाग आली असता खिडकीतून हे विहंगम दृश्य दिसलं. 











माझी खोली पहिल्या मजल्यावर होती.  खिडकीत एक इवलुसे झाड होते. त्याला बिचाऱ्याला खट्याळ बर्फानं पुर्णपणे आच्छादुन टाकून त्याला जबरदस्तीनं झोके घ्यायला भाग पाडलं. मी प्रथम जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा "डायनासोर येती घरा तोचि दिवाळी दसरा" ह्या सुप्रसिद्ध मराठी म्हणीची मला आठवण झाली. मराठी माध्यम झिंदाबाद !




हॉटेलच्या प्रवेशद्वाराच्या कमानीची दोन छायाचित्रे !







बर्फ पडत असला तरीही काम जोरात सुरूच राहिले. 

गुरुवारी रात्री १० वाजता JFK विमानतळावरून माझं परतीचं विमान होतं. विल्मिंग्टन ते JFK हा थोडा दूरचा प्रवास असल्यानं मी थोडा आधीच निघालो. बहुतांश आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुमच्या उड्डाणाच्या चार तास आधी तुम्हांला बॅग्स चेकइन करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळं आधी आलेल्या मला जवळपास तासभर ताटकळत बसावं लागलं.  इथं इतिहादच्या प्रवाशांसाठी आमच्या कंपनीची Chase Sapphire Lounge आहे. इथं मागविलेलं सॅल्मोन पुलाव. ह्याक्षणी भारतात शुक्रवार झाल्याची मनाची समजूत घालत Salmon चा स्वाद घेतला. 







विमानात प्रवेश करेपर्यंत दोन आठवड्यातील दगदगीनं पुर्ण दमलो होतो. बसताक्षणी मला डुलकी लागली. तासाभरानं जाग आली तरीही विमान जागच्या जागी होते. विमानात बसलेल्या एका प्रवाशाने विनंती केल्यानं किंवा इतर काही कारणांमुळं त्याला त्याच्या बॅगेसकट खाली उतरविण्यात आले.  मनात अनेक शंकांचं वादळ निर्माण झालं. 

अजुन एक भिती मनात होती. अबुधाबीला उतरल्यानंतर केवळ दीड तासांत मुंबईचं विमान होतं. त्यामुळं एक तास उशीर झाल्यानं ते विमान मिळण्याची शक्यता कमी झाली होती. हे विमान चुकलं तर बऱ्याच वेळा दुसरं विमान दुसऱ्या दिवशी मिळतं असे ऐकून होतो.  सुदैवानं ह्या वैमानिकानं उड्डाण केल्यावर विमान भरधाव वेगानं दौडवलं. 

विमानातील मेन्यूची आणि भोजनाची चित्रं !











अबूधाबीला उतरल्यानंतर मुंबईचं विमान सुटायला केवळ पाऊण तास उरला होता. माझ्यासोबत मुंबई विमान पकडणारे अजून दोघं तिघं होते. आम्ही ह्या विमानातून धावत थेट पळ काढला. सुरक्षा तपासणी वगैरे आटपुन मुंबईच्या विमानात स्थानापन्न झालो त्यावेळी त्याच्या उड्डाणास अजून पंचवीस मिनिटं होती. म्हणजेच एका विमानातुन दुसऱ्या विमानात मी केवळ वीस - बावीस मिनिटात प्रवेश केला होता. हा माझा जागतिक विक्रम आहे ! विमानात प्रवेश करताना तिथल्या कर्मचाऱ्यास माझ्या बॅग्स माझ्यासोबत ह्या विमानात येण्याची शक्यता किती आहे असे हसत हसत विचारलं. आम्ही तुमच्या बॅग्स नक्की घेऊ असे त्यानं मला आश्वासन दिलं. 

इथल्या एअर होस्टेसने मला अप्रतिम अशी चिकन बिर्याणी खाऊ घातली. अबूधाबीत अजुनही शुक्रवार असल्यानं चिकन बिर्याणी खाणं प्रशस्त आहे अशी मी माझ्या मनाची समजुत घातली. त्याचं बहुतेक गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि Salmon / चिकन बिर्याणी ह्या सर्व प्रकारात मन वढाय वढाय झालं असावं ! 



आमच्या मुंबईत गेल्या शनिवारी सकाळी एक वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास उतरलो. दोन्ही बॅगाची सुद्धा लगेचच भेट झाली. साडेतीन वाजता घरात प्रवेश केला आणि चार वाजता स्नान आटपून निद्राधीन झालो. ब्रिटिश एअरवेजचे विमान साडेअकरा वाजता येतं. त्यामुळं दोन वाजता निद्राधीन होता येतं. कोणास ठाऊक कसं पण दहा वाजेपर्यंत गाढ झोप लागली. 

दुपारी टीव्ही सुरु केला.  आखातात युद्ध सुरु झाल्यानं अबुधाबी आणि त्या भागातील इतर विमानतळे बंद करण्यात आली होती. जर माझं अबू धाबीला येणारं विमान अजून अर्धा तास उशिरानं आलं असतं तर बहुदा मी ही अडकलो असतो. सुदैवानं त्या परिस्थितीचा सामना करावा लागला. माझे काही सहकारी दुबईत तर काही अमेरिकेत अडकून बसले. त्यांना परतताना बुधवार - गुरुवार उजाडला. ब्रिटिश एअरवेज झिंदाबाद! 

सप्टेंबर अमेरिका दौरा - आजी क्रमांक २ आणि जेफ मार्श

डॅलस लाऊंजमध्ये तामिळ आजी, ब्रिटिश एअरवेजचे कर्मचारी आणि माझं नाट्य सुरु असताना फावल्या वेळात माझे निरीक्षण सुरु होते. माझ्या आसनावरून मला ग...