गेल्या शनिवारी "The Folk आख्यान" आणि आज (ह्या शनिवारी) "पुढच्या शुक्रवारी सात वाजता" ह्या दोन दर्जेदार कलाकृती अनुभवण्यास मिळाल्या.
आजची पोस्ट "The Folk आख्यान" विषयी. महाराष्ट्राचं वैभव म्हणुन ज्यांना आपण संबोधू शकतो असे अभंग, भारूड, लावणी, गवळणी हे लोकसंगीताचे प्रकार वर्षोनुवर्षे महाराष्ट्राच्या गावागावांत समाजजीवनाशी अत्यंत जवळून निगडीत आहेत. हल्लीच्या संगणकाच्या विश्वात ह्या कला काळाच्या उदरात गडप होतील का असं भय वाटत असतांना तरुण कलावंतांनी सादर केलेला "The Folk आख्यान" हा कार्यक्रम एक अत्यंत सुखद धक्का देऊन जातो.
ह्यातील बहुदा सर्व कलाकृती नवनिर्मीत असल्या तरी परंपरेशी आपली नाळ जोडुन आहेत. कलाकार खरोखरच लोकसंगीताला मूळ स्वरूपात सादर करतात. आपण २०२६ सालात हा कार्यक्रम पाहतो आहोत असं जाणवतच नाही इतकी ह्या कलाकारांची गुणवत्ता आहे. बहुदा ह्यातील बरेचसे कलाकार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतून आल्यानं शहरी संस्कृतीनं त्यांच्या कलेच्या शुध्दतेवर घाला केला नाही.
कार्यक्रमाच्या शेवटी जवळपास १५ मिनिटं सादर करण्यात आलेली असंख्य वाद्यांची जुगलबंदी केवळ अप्रतिमच ! यानिमित्तानं पारंपरिक, दुर्मिळ वाद्यांचा परिचय आपल्याला होतो. ह्या कार्यक्रमाच्या सादरीकरणामागं ह्या सर्व कलावंतांनी किती प्रचंड मेहनत केली असेल ह्याचा विचार करूनच थक्क व्हायला होतं. माझ्या मनात ह्या कार्यक्रमाने प्रचंड सकारात्मकता निर्माण केली. ह्या कार्यक्रमाचे निर्माते महाराष्ट्रातील लोककलाकारांना मदत व्हावी ह्यासाठी सक्रिय प्रयत्न करत असतात. आपल्या लोकसंगीताविषयी, संस्कृतीविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसानं पाहावी अशी ही कलाकृती! ह्यातील सर्वच कलाकार युवा असल्यानं असे उपक्रम आपल्या संस्कृतीला प्रतिकुल वातावरणात देखील पुढे नेऊ शकतील हा आशेचा किरण ! बऱ्यापैकी महागडी तिकिटं असली तरी मैदानावरील सर्व आसने भरली होती, हा ही एक सकारात्मक संदेश ! बाकी आपले प्रेक्षक कितीही सुंदर कलाकृती असो आपल्या चमचमीत खाण्यावरील प्रेमाला कशी मुरड घालू शकत नाहीत हे पाहुन चांगलंच मनोरंजन झालं.
खटकणाऱ्या काही गोष्टी ! साडेसहाची वेळ देऊन कार्यक्रम साडेसात वाजता सुरु करण्यात आला. सुर्यप्रकाश नाहीसा होण्याची आम्ही वाट पाहत होतो असं आयोजकांतर्फे सांगण्यात आलं. ही अत्यंत अस्वीकारार्ह अशी बाब आहे. तुमच्याकडं एक बावनकशी सोनं म्हणावं अशी कलाकृती आहे, त्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रेक्षकवर्ग तुम्हांला लाभला आहे. त्यांना गृहीत धरू नका. सादरीकरणात पुर्णपणे व्यावसायिकता ठेवा. मुख्य सूत्रधाराच्या शब्दफेकीचं, भाषेवरील प्रभुत्वाचं कौतुक करावं तितकं थोडं! पण एकंदरीत निवेदनात कुठंतरी विषयांतर झाल्यासारखं वाटत राहिलं. उगाचच उथळ विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यासारख्या काहीशा आजच्या काळात कर्मठ म्हणता येईल अशा प्रेक्षकाला हे खटकलं ! वसईतील निसर्गाचा आधीच ऱ्हास होत असताना दहा मिनिटांचं मध्यंतर अशी घोषणा करून जवळपास पंचवीस मिनिटं उंच इमारतीच्या जाहिराती दाखवत राहणं चुकीचं आहे! वसईत आजही रात्री दहा वाजता निद्राधीन होणारा वर्ग अस्तित्वात आहे ह्याची जाणीव असायला हवी होती!
हे सर्व असलं तरी पुन्हा एकदा - "संधी मिळाल्यास हा कार्यक्रम बघाच !"
आज पाहिलेलं "पुढच्या शुक्रवारी सात वाजता" हे नाटक म्हणजे एक अत्यंत उत्कृष्ट कलाकृती ! त्यावरील पोस्ट लवकरच !



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा