मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६

सप्टेंबर अमेरिका दौरा - आजी क्रमांक २ आणि जेफ मार्श


डॅलस लाऊंजमध्ये तामिळ आजी, ब्रिटिश एअरवेजचे कर्मचारी आणि माझं नाट्य सुरु असताना फावल्या वेळात माझे निरीक्षण सुरु होते. माझ्या आसनावरून मला गेटवर आलेल्या एका विमानातील दोन वैमानिकांचा हास्यपूर्ण संवाद पाहायला मिळाला. पहिल्या छायाचित्रात विविध विमानांनी आपापल्या आकारानुसार कसं उभं राहावं ह्याच्या सुचना देणाऱ्या जमिनीवरील मार्गदर्शक पट्ट्या दिसत आहे. 




दुसऱ्या छायाचित्रात  विमानाला गेटवरून मुख्य धावपट्टीवर खेचून नेणारा pushback tug or aircraft tractor दिसत आहे. ह्यावरील कर्मचारी सतत वैमानिकांच्या संपर्कात असतात. विमानाला मुख्य धावपट्टीवर नेऊन ठेवल्यावर हे लोक वैमानिकाला सर्व काही आलबेल असल्याचा मोठा थाटात इशारा करतात. विमानातील बरेचजण आपल्याला विमानाच्या गवाक्षांतून न्याहाळत असतील ह्याचा त्यांना अंदाज असल्यानं त्यांचा रुबाब काही न्यारा असतो. 


माझ्यासारख्या चिंतातुर माणसांची खात्री पटविण्यासाठी विमानाचा मार्ग वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवला जातो. विमान नक्की लंडनच्याच दिशेनं चाललं आहे ह्याची खात्री करून देणारा हा फोटो! इथं डॅलस, लंडन आणि वसईच्या स्थानिक वेळांचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी माझी होती ! ब्लॉगचा preview आकर्षक असावा म्हणुन हा फोटो सुरुवातीला सुद्धा दिला आहे. 


मी सहसा अमेरिकेच्या उत्तर पुर्व किनाऱ्यावरून परततो. त्यावेळी लंडन सहा तासांत येतं. ह्यावेळी डॅलस हे अमेरिकेच्या दक्षिणमध्य भागात असल्यानं लंडनपर्यंतचा प्रवास जवळपास नऊ तासांचा झाला.  आम्ही साधारणतः रात्री आठ वाजता उड्डाण केलं होतं. नऊ तासांचा प्रवास, अमेरिका - लंडन मधील स्थानिक वेळांतील फरक ह्यामुळं आम्ही लंडनला उतरेस्तोवर अकरा वाजले होते. 

लंडन इथं मला ह्यावेळी एक नवीन अनुभव आला. कोणत्याही सुरक्षा तपासणीशिवाय आमच्या विमानातील प्रवासी विमानतळाच्या सर्वसाधारण भागात पोहोचु शकलो. प्रत्येक वेळी हीथ्रो इथं सुरक्षा तपासणीची सवय असताना हे आश्चर्यकारक होते. माहिती मायाजालावर Pilot One Stop Security (OSS) Exemption असा शोध घेतला असता ह्याविषयी अधिक माहिती मिळु शकते. 

हीथ्रो विमानतळ खूप मोठं आहे. भारताकडं येणारी विमानं बहुदा टर्मिनल पाचवरून उड्डाण करतात. अमेरिकवरून विमानं सहसा टर्मिनल तीनवर उतरतात. टर्मिनल पाचवर दोन तीन लाऊंज असाव्यात. नऊ तासाच्या प्रवासानं दमलेला (!)  असल्यानं आणि सुरक्षातपासणी न झाल्याच्या मानसिक धक्क्यातुन न सावरल्यानं मी माझ्या नेहमीच्या परिचयाच्या लाऊंजचा शोध न घेता मी प्रवेश करू शकणाऱ्या पहिल्या लाऊंजची निवड केली. हा निर्णय चुकीचा आहे हे थोड्या वेळात मला समजलं. इथं प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. मी ह्या लाऊंजच्या दोन चक्कर मारल्यानंतर एक खिडकीजवळील आसन मला मिळालं. लंडन ते मुंबई स्थानिक वेळेनुसार सव्वादहाचं विमान सुटल्यानंतर थेट सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ब्रिटिश एअरवेजचे विमान आहे. मला विमानतळावर एकंदरीत पाच सहा तास वेळ घालवायचा होता.  शाळेत असताना परीक्षेत 'रेल्वे स्थानकावर अर्धा तास' असा मराठी किंवा हिंदी भाषेत निबंध लिहायला सांगितलं जात असे. त्यावेळी बहुधा मी एकदाही हा निबंध लिहला नसावा. त्याची शिक्षा म्हणून मला हल्ली असे बऱ्याच विमानतळावर सहा - आठ तास घालवायची शिक्षा मिळत आहे. मागं वळुन पाहता विद्यार्थ्यांना निबंध लिहायला सांगण्यामागं परीक्षकांचा काय हेतु असावा. माझ्या मते मुलं सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विक्रेते, आजुबाजूला असणारी माणसं, त्यांची धावपळ ह्यांचं किती खोलवर निरीक्षण करतात आणि ते शब्दांत कसं प्रभावीपणे उतरवू शकतात हा परीक्षकांचा हेतू असावा. मी बोर्डीला जाणाऱ्या ट्रेनने क्वचितच प्रवास केल्यानं ह्या बाबतीत त्यावेळी माझ्याकडं फारसे गंमतीदार अनुभव नव्हते. आजकालच्या मुलांना ह्या विषयावर निबंध लिहायला सांगितला तर ते बहुदा रील बनवून टाकतील. असो ! 

खिडकीजवळील आसन मिळाल्यानं दर तीस ते पंचेचाळीस सेकंदाला मला दिसणाऱ्या धावपट्टीवरून उड्डाण करणारी विविध कंपन्यांची विमानं मी पाहत राहिलो.  काही छोटी तर काही मोठी! काही धावपट्टीवरून आधीच उड्डाण करायची तर काही नंतर! अगदी आइसलँडच्या विमानकंपनीपासून ते आपल्या एअर इंडियाच्या विमानापर्यंत अशी अनेक विमानं तासभर मी पाहत होतो. एकट्यानं प्रवास करताना एक अडचण म्हणजे आपल्या बॅग्स आसनाच्या आसपास सोडून तुम्ही भटकण्यासाठी लांबवर जाऊ शकत नाहीत ! त्यामुळं माझ्या बॅग्स मला दिसु शकतील अशा कॉफी मशीनपर्यंत जाऊन तेथील दोन स्वादाच्या कॉफी (अनेकवचन गृहित धरावं !) प्राशन करून आलो. 



त्यानंतर कंटाळल्यानं मी ताजातवाना होऊन लाऊंजच्या दुसऱ्या भागाच्या दिशेनं प्रस्थान केलं. इथं थोडा शोध घेतल्यानंतर मला एक आसन मिळालं. इथून काही अंतरावर मला बरेच खाद्यपदार्थ दिसत होते. बरेच प्रवासी माझ्या आसनाजवळ येऊन कुतूहलानं पाहून परत जात होते. मी काहीसा अलर्ट मोडमध्ये गेलो. थोड्याच वेळात एक विमानतळाचा कर्मचारी एका इंग्लिश आजीबाईना घेऊन माझ्याजवळ आला. माझ्या आसनाजवळील टेबलवर वायरलेस मोबाईल चार्जर होता. आजीबाईंना त्यांचा मोबाईल चार्ज करायचा होता. माझ्या समोरील आसन रिकामे होते. त्या आसनावर त्या स्थानापन्न झाल्या.  "मी इथं माझा भ्रमणध्वनी चार्ज केला तर चालेल का?" असं त्या आजीबाईंनी मला विचारलं. इथं तामिळ / तेलगु ते इंग्लिश / मराठी असा भाषांतराचा अडथळा नसल्यानं मी आनंदानं हो म्हणालो. "तुम्हांला हे आसन हवं आहे का?"  असे त्यांना मी अगत्यानं विचारलं. त्यांनी हसुन नकारार्थी उत्तर दिलं. पण मी हा प्रश्न विचारल्यानं त्या खुश झाल्या असाव्यात असं मला वाटलं.  

त्यांना भूक लागली असावी. आजुबाजूला अनेक माणसं बसली होती पण आजीबाईंनी मला विचारलं की "मी माझ्या बॅग्स इथं सोडून खाण्यासाठी काही घेऊन आले तर चालेल का?" मी अर्थातच होकारार्थी उत्तर दिलं. "मी तुझ्यासाठी काही घेऊन येऊ का?" आजीबाईंनी मला विचारलं. मी त्यांना म्हणालो की "तुम्ही जाऊन या मग मी जाईन!" डॅलस इथं तमिळ / तेलगु आजींना जो मी प्रश्न विचारला होता त्याची परतफेड (चांगल्या अर्थानं) झाली होती.  प्लेट भरून घेऊन आल्यावर त्यांनी मला "आता तू जाऊन ये" असं स्वतःहून सांगितलं. मी माझी प्लेट भरून घेऊन आल्यावर आम्ही दोघांनी काही सुसंवाद साधला. त्यांना खूप काही बोलायची इच्छा होती असं स्पष्ट दिसत होतं. पण आमच्या दोघांच्या आसनांमध्ये काही अंतर असल्यानं मोठ्यानं बोलावं लागत होतं. आणि भोवतालच्या प्रवाशांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असल्यानं मी बोलणं आटोपतं घेतलं. 

वसई, मुंबई, कोलंबस, प्लेनो असो वा अजुन कोणते ठिकाण असो! सर्वजण सुसंवादाचे भुकेलेले आहेत. आजच आलेली जपानी माणुस शोजी मोरीमोटोची पोस्ट वाचली की हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित होतो. आजकाल बोलणारी, लिहणारी माणसं नाही असं नाही. पण स्वकेंद्रित बोलणं, लिहिणं वेगळं आणि दुसऱ्याला केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्याशी संवाद साधणं वेगळं ! हा फरक आपणा सर्वांना कळला तर खूप फरक पडेल. 

अर्ध्या तासानं आजीबाईंचा मोठ्या जड अंतःकरणानं निरोप घेतला. त्या परत भेटण्याची सुतराम शक्यता नाही. अगदी अत्यंत पराकोटीच्या योगायोगानं त्या समोर आल्या तरी आम्ही एकमेकांना ओळखणार सुद्धा नाही. 

मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरु झाला. आकाशातील असेच काही ढग ! त्यांच्याशी संवाद वगैरे साधण्याची शक्यता नव्हती ! 



ह्या भेटीत दोन आठवड्यापूर्वी लंडनहुन अमेरिकेला जातानाचा एक किस्सा ! मुंबई - लंडन - फिलाडेल्फिया - कोलंबस असा माझा प्रवास होता. लंडनहुन विमान गेटवरून वेळेवर निघालं. थोडाफार जमिनीवर प्रवास करून उड्डाणासाठी मुख्य धावपट्टीवर सुद्धा आलं.  बहुदा Cabin crew, please be seated for take-off" अशी घोषणा सुद्धा होणार होती. आणि अचानक आमचं विमान मुख्य धावपट्टीवरून बाजूला काढण्यात आलं. त्याला परत गेटकडं नेण्यात आलं नाही. पण असंच आडोशाला remote parking stand (tarmac/apron) मध्ये  ठेवण्यात आलं. बहुदा त्यांना एक बॅग काढायची होती.माझी ह्या बाबतीत १००% खात्री नाही. कारण ही खातरजमा सहसा गेट सोडण्यापुर्वी केली जाते. असो, जे काही कारण होते त्याचं समाधान केल्यानंतर ह्या वेळात जे काही इंधन खर्ची पडलं आहे त्याची भरपाई करण्यासाठी एक नवीनच प्रकार मला अनुभवायला मिळाला. पारंपरिक चल इंधन ट्रकला (Conventional Mobile Fuel Tanker Truck) आमच्या विमानाला जोडण्यात आलं. हे अगदी माझ्या खिडकीच्या जवळच होत असल्यानं त्याचा फोटो मी घेतला. 


१९८५ - १९९२ च्या सुमारास ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी डेव्हिड बून आणि जेफ मार्श भारतीय गोलंदाजांना अगदी भारी पडत असे. त्यातला हा जेफ मार्श ! 



ह्या Conventional Mobile Fuel Tanker Truck मधील माणुस जेव्हा शिडी चढून वर आला तेव्हा त्याला पाहुन मला क्षणभर जेफ मार्शचा भास झाला. पण इंग्लंड - ऑस्ट्रेलियाचे मैत्रीपूर्ण (?) संबंध पाहता माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूला इंग्लंड अशी संधी देणार नाही हे नक्की होते. राहता राहिला तो ह्याच्याशी संवाद साधण्याचा प्रश्न ! विमानाची काच वरती करता येत नसल्यानं ते राहून गेलं !  


ह्या सर्व प्रकारात दोन तास गेल्यानं माझं फिलाडेल्फिया ते कोलंबस विमान चुकतंय की काय अशी चिंता मला भेडसावू लागली. मी तिथं साडेबारा वाजता पोहोचणार होतो आणि साडेतीन तासांत मला इमिग्रेशन आटपून, बॅग्स घेऊन, पुन्हा त्यांचे चेक-इन करून, सुरक्षा तपासणी आटपून दुसऱ्या विमानात शिरायचं होतं. विमानाचं उड्डाण होताच हे साडेसात तासांत फिलाडेल्फिया इथं पोहोचेल अशी घोषणा वैमानिकानं केली. विमानात दोन air hostess होत्या.  त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मी कशी चुकवणार? त्या दोघीनांही माझं पुढील विमान चुकणार तर नाही ना हा प्रश्न दोन तीनदा विचारून भंडावून सोडलं. त्यांनी तुला आम्ही सर्वात प्रथम सोडतो ह्या उत्तरापासून असा उशीर झाला की ते जरा जोरात विमान नेतात अशी उत्तरं देऊन माझं समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं ते ' ते जरा जोरात विमान नेतात ' ते उत्तर ऐकून मी काहीसा धास्तावलो. पुढील विमान चुकलं तरी चालेल अशी मनाची समजूत करत जेवणाचा आणि सिनेमाचा आनंद घेत राहिलो. फिलाडेल्फिया इथं उतरल्यावर तिथलं विमान आधी अर्धा आणि मग एक तास उशिरानं उड्डाण करत असल्याची घोषणा झाली. आणि मी सुटकेचा निश्वास टाकला !

(क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सप्टेंबर अमेरिका दौरा - आजी क्रमांक २ आणि जेफ मार्श

डॅलस लाऊंजमध्ये तामिळ आजी, ब्रिटिश एअरवेजचे कर्मचारी आणि माझं नाट्य सुरु असताना फावल्या वेळात माझे निरीक्षण सुरु होते. माझ्या आसनावरून मला ग...