मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २९ मे, २०२१

बोलतं रहा !


ह्या आठवड्यात कंपनीत व्यवस्थापकांसाठी एक चांगली चर्चा झाली. सध्या करोनामुळं बहुतेक सर्वजणांना विविध पातळ्यांवरील तणावाला तोंड द्यावं लागत आहे. तुम्ही तणावाला कसं तोंड देता ह्याविषयी ह्या चर्चेत विविध व्यवस्थापकांना बोलतं केलं गेलं. त्या परिसंवादात एक महत्वाचा मुद्धा होता, की तुम्ही तुमच्या सर्वोत्तम मनःस्थितीत असणं इष्ट आहे आणि त्यासाठी आवश्यक गोष्टी तुम्ही ओळखायला हव्यात !  चित्रकला, गायन वगैरे मार्गांसोबत एक महत्वाचा मार्ग सामोरा आला तो म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत दूरध्वनीवरुन बोलणे. 

प्रत्येक व्यक्तीसाठी काही माणसं अशी असतात की त्यांच्याशी भेटून, बोलून त्या व्यक्तीला बरं वाटतं, जीवनाविषयीचा आशावाद पुन्हा जागा होतो. हे कितीही खरं असलं तरी ह्याचा वापर फारसा होताना दिसत नाही. ह्याची कारणे काय असावीत? तुझ्याशी बोलुन मला बरं वाटतं हे आपण स्पष्टपणे किती जणांना सांगतो? माझ्यासाठी वेळ राखुन ठेवशील का ? हा विनंतीवजा प्रश्न सद्यकाळात योग्य समजला जाईल. जसं आपल्याला त्या व्यक्तीशी बोलून बरं वाटतं त्याचप्रमाणं कदाचित त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याशी बोलुन बरं वाटत असेल. 

सध्या नक्की काय होतंय ज्यामुळं लोक निराशेच्या दिशेनं झुकू लागली आहेत? आपल्या उत्साहप्रिय समाजाला समारंभांपासुन, लोकसंपर्कापासून बराच प्रदीर्घ काळ वंचित राहावं लागलं आहे. आपल्या मनातील साठून ठेवलेल्या असंख्य विचारांचं ओझं आपण त्यासाठी मुक्त द्वार न सापडल्यानं बाळगतो आहोत. त्यात आपण प्रत्येकानं आपले जवळचे काही मित्र, नातेवाईक ह्या काळात गमावले आहेत. आपल्या घरातील माणसांशी बोलुन तणावमुक्ती पूर्णपणे होत नाही कारण ते सुद्धा त्याच परिस्थितीतून जात असल्यानं त्यांचा एकंदरीत दृष्टिकोन आपल्यासारखाच असतो.  

आपल्याला काही व्यक्तींशीच बोलून बरं का वाटतं? कारण ह्या व्यक्ती पटकन आपल्या भूमिकेत शिरतात. आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी भेडसावत असतील ह्याची त्यांना जाणीव असते किंवा ती खुबी त्यांनी आत्मसात केलेली असते. आपल्याशी बोलताना परखड सत्य मांडणं हा त्यांचा हेतू नसून आपल्याला रुचेल अशा पद्धतीनं सत्य सांगण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली असते. कदाचित हेही शक्य आहे की ते आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात गांजलेले असतील पण आपल्याशी बोलताना त्या गोष्टींचा उल्लेख ते क्वचितच करतात. जगात, अवतीभोवती  ज्या काही सकारात्मक घटना घडत आहेत त्यांचा उल्लेख सहजरित्या ह्या संवादात ते आणतात. त्यांची विनोदबुद्धी अजूनही त्यांनी शाबूत ठेवली असते. ह्या सर्वाचा परिणाम असा होतो की सध्या आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत ती परिस्थिती तात्पुरती आहे आणि पूर्वीचा काळ परत येणार आहे ह्यावर आपला विश्वास बसतो. आणि सध्याच्या काळात ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे! 

अजून एक मुद्दा ! मनातील विचार ज्यावेळी सैरावैरा फिरत राहतात त्यावेळी ते क्लेशनिर्मिती करतात, आपल्याला गोंधळवून टाकतात. आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवता येत नाही ह्याचा आपल्याला खूप संताप येतो. पण ज्यावेळी आपण अशा व्यक्तींशी बोलतो त्यावेळी ह्या व्यक्ती आपल्याला विचारांची व्यवस्थित आखणी करायला मदत करतात. आपण नक्की कशानं त्रस्त आहोत ह्या दिशेनं ते आपल्यला घेऊन जातात आणि तेही आपल्यातील दोषांवर बोट न ठेवता ! 

माझी एक सर्वांना विनंती आहे. तुम्हांला ज्यांच्याशी बोलून बरं वाटतं त्यांना ते वैयक्तिकरित्या कळवा आणि त्यांच्याशी जमेल तसे बोलत रहा. त्याचप्रमाणं तुमच्या ज्या मित्रांना तुमच्याशी बोलून बरं वाटत असेल त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी तुम्ही उपलब्ध आहात हे जाहीरपणे कळवा! 

शनिवार, २२ मे, २०२१

तौक्ते आणि वसईकरांचे आयुष्य !


दिनांक १६ मे २०२१ सायंकाळ 

तौक्ते वादळ कोकणापर्यंत येऊन थडकल्याच्या बातम्या येत होत्या. वसईत मात्र एकंदरीत अजुनही शांत वातावरण होते. सायंकाळी बावखलात उतरुन काही छायाचित्रे काढली.  बावखल मनाला एक प्रकारची शांतता प्रदान करते. मध्यंतरी बावखल काहीसं खोल केल्यामुळं आणि हल्ली पाऊस उशिरापर्यंत रेंगाळत असल्यानं मे महिन्यात देखील बावखल पुर्ण सुकत नाही. नाहीतर पुर्वी सुक्या बावखलात क्रिकेट खेळता यायचं. 



दिनांक १७ मे २०२१ सकाळ  

रात्री पावसाच्या जोरदार सरी येऊन गेल्या होत्या.  वृक्ष छाटणीसाठी आज सकाळी साडेनऊपासुन विद्युत पुरवठा खंडित केला जाईल ही पुर्वसुचना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळानं आधीच दिली होती. त्यामुळं रविवारी रात्री झोपताना आणि सोमवारी सकाळी उठल्यानंतर पाण्याची टाकी भरुन ठेवली. पण सकाळी हळूहळू वाऱ्यानं जोर पकडल्यानंतर पावणेआठच्या सुमारासच विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला.  बहुतेक घरात वसईकरांनी इन्व्हर्टर बसवुन घेतल्यानं साधारणतः एक दिवसभर मर्यादित वीजग्रहण करणारी उपकरणे त्यावर चालतात. कार्यालयीन झुम कॉल सकाळी अकरा वाजेपासून सुरु झाले. त्याच सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. 

दिनांक १७ मे २०२१ दुपार   

दुपारी दीड वाजेपर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु होते. दीड वाजता माझ्या व्यवस्थापकांसोबत माझे १:१ होते. त्यांना झूमवर येण्यासाठी थोडा उशीर झाला. आमचं बोलणं व्यवस्थित सुरु असतानाच अचानक वायफायने गटांगळ्या खायला सुरुवात केली. आयपॅडवर झूम आणि लॅपटॉपवर स्क्रीन शेयर चालू असल्यानं तात्काळ दोन्ही उपकरणं मोबाईलच्या हॉटस्पॉटवर सुरु ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. माझं नेटवर्क सुरु होत नाही हे पाहुन मग घरातील सर्वांच्या फोनचा हॉटस्पॉट घ्यायची केविलवाणी धडपड सुरु केली. ही धडपड पुढील दोन-तीन दिवस चालु राहणार होती. वादळाने एव्हाना भयंकर जोर पकडला होता. एअरटेल, VI  वगैरे सर्व नेटवर्कनी वादळापुढे शरणागती पत्करली होती.  मागे वाडीत अनितादीदींचं घर आहे. तिथं जायच्या रस्त्यावर बरीचशी झाडे कोलमडून पडली. 


दिनांक १७ मे २०२१ सायंकाळ  

सायंकाळपर्यंत ऑफिसच्या नेटवर्कशी संपर्क साधण्याची धडपड करत राहिलो. मध्येच VI ची ध्वनीसेवा सुरु झाल्यानंतर टीममधील एकाला सर्वजणांना माझ्या अनुपलब्धतेविषयी कळविण्यास सांगितलं. सायंकाळी अचानक वडिलांच्या हॉटस्पॉटवरून दहा - पंधरा मिनिटं ऑफिसच्या नेटवर्कला जोडण्यात आणि झूम कॉलवर जाण्यात यश मिळालं. पण अशा अनिश्चिततेच्या वातावरणात महत्वाच्या कॉलवर गेल्यानं आणि मग पुन्हा बाहेर पडल्यास उगाच सर्वांचाच वेळ वाया जातो हे जाणवलं. त्यानंतर मात्र मी दिवस संपला असेच घोषित केले. बाहेर सोसाट्याचा वारा, पाऊस, घरात इन्व्हर्टरच्या विजेचा काटकसरीने वापर करायचं ठरविल्यानं अंधाराचे साम्राज्य आणि कोणाशीही फोन संपर्क नसल्यानं अगदी शंभर वर्षांपूर्वी वातावरण कसे असेल ह्याची कल्पना करण्याची संधी प्राप्त झाली होती. टाकीतील पाणी आठजणांना जितका वेळ पुरेल तो वेळ भरत आल्यानं आम्ही अधिक दडपणाखाली आलो होतो. आणीबाणीच्या परिस्थितीत मराठी घरात शिजविल्या जाणाऱ्या गरमागरम खिचडीचा आस्वाद घेऊन आम्ही वरच्या मजल्यावर काकांकडे गप्पा मारण्यासाठी गेलो. तिथे सर्वजण हॉलच्या कानाकोपऱ्यात हातात मोबाईल घेऊन कुठे रेंज येते का याचा सातत्यानं प्रयत्न करत होते. शेवटी दहाच मिनिटं  VI नेटवर्क मिळालं आणि त्यात आम्ही सर्वांना हॉटस्पॉट वगैरे देऊन व्हाट्सअँप मेसेज आणि कॉल करुन घेतले. रात्री झोपण्याच्या वेळी नळाचं पाणी संपल्याची एक भयप्रद जाणीव झाली.  वसईत मुसळधार पाऊस वगैरे झाला की दोन - तीन दिवस वीजपुरवठा खंडित होतो. बऱ्याच वेळी पाऊसवाऱ्यामुळं ओव्हरहेड विजेच्या तारांवर कोसळलेली झाडे हे त्याचे मुख्य कारण असते. 

दिनांक १८ मे २०२१ सकाळ 

रात्रभर धुवांधार पाऊस कोसळत राहिला. मे महिन्यातील हा शतकातील सर्वाधिक पाऊस असेल ह्याविषयी कोणतीही शंका नव्हती. रात्रभर प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं वाडीतील झाडांची स्थिती कशी झाली असेल ह्याची कल्पना सुद्धा करवत नव्हते.  सकाळी उठल्यावरसुद्धा मुसळधार पावसाच्या सरी कोसळतच होत्या. आता कसरत होती ती घरातील सर्व माणसांसाठी स्वयंपाक, आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची! आम्ही सुदैवी अशासाठी की घराजवळच विहीर आणि कालच्या मुसळधार पावसामुळं अचानक विहिरीचे पाणी तीन - चार पायऱ्या वर आले होते. त्यामुळं पाणी उपसणे तुलनेनं सोपे झाले. 

विहिरीतुन पाणी काढण्याची शर्यत सुरु असताना नेटवर्क चुकून सुरु झाले आहे का हे तपासुन पाहणे महत्वाचं होते.  त्यासाठी खालील आज्ञावली घरातील प्रत्येक नेटवर्कच्या फोनवर आलटून पालटुन चालवावी. ही आज्ञावली manually चालविणे त्यातील निराशेचा सुस्कारा ह्या ओळीमुळं खूपच निराशाजनक असु शकते. ह्यावरुन माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात AUTOMATION ला अनन्यसाधारण महत्व का प्राप्त झालं आहे ह्याची थोडीफार कल्पना येते ! 

For I = 1 to 10000

Select Setting Option

Select Connections 

Select Mobile Networks 

Select Network Operators 

First Select Manually 

Then Select Automatically 

एक निराशेचा सुस्कारा !

Next I 


दिनांक १८ मे २०२१ दुपार  

दुपारपर्यंत सर्वांच्या अंघोळी आटोपल्या, जेवण आटोपली! विहिरीतून पऱ्याने पाणी काढण्यात मी महत्वाचा हातभार लावल्यानं मला दुपारी मस्त झोप लागली होती. दुपारनंतर पावसानं उघडीप दिली आणि सव मंडळी बाहेर पडली.  नुकसानीचा अंदाज येऊ लागला.   फणस,  केळी, नारळ ह्यांची झाडे जमीनदोस्त झाली होती. केळीचे लोंगर पडले होते. 








अर्धवट पिकलेल्या आंब्याचा खच पडला होता. 


संपुर्ण वसईभर हीच स्थिती होती. आम्ही पूर्णपणे शेतीवर अवलंबुन नसल्यानं आमच्या घरातील ज्येष्ठांची पडलेल्या नारळ, केळीविषयी संयत प्रतिक्रिया होती. प्रेमानं वाढविलेल्या झाडाची आपल्या डोळ्यादेखत क्षणार्धात अशी हालत होणे हे केव्हाही क्लेशदायीच असते! पण ज्यावेळी त्या झाडांसोबत आपली मेहनत, गुंतवणूक आणि भविष्यातील आशा मातीमोल होतात त्यावेळी ते दुःख मनाला खूपच क्लेश देतं, वसईतील सर्व शेतकऱ्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ! 

महाराष्ट्र राज्य विद्युतमंडळाचे कर्मचारी सकाळपासूनच कामाला लागले होते. जिथं जिथं विजेच्या तारांवर झाडं पडली होती तिथं तिथं हे कर्मचारी जाऊन जिवावर उदार होऊन ही झाडे कापुन विद्युतपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात होते. दुर्दैवानं त्यातील एका कर्मचाऱ्याचा ह्यात मृत्यू झाला असे ऐकण्यात आले. आपल्याला घरात बसुन आपल्या समस्या मोठ्या भासत राहतात परंतु ही मंडळी मात्र जीवावर उदार होऊन समाजासाठी दिवसरात्र झटत होती. 

सायंकाळी पाच वाजता आमच्या घरातील विद्युतपुरवठा सुरळीत झाला. ३३ तासानंतर विद्युतपुरवठा सुरळीत होणे ही फारच दिलासादायक बाब असते. आपल्या जीवनातील सदैव उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचे अस्तित्व गृहीत धरण्याची आणि झगमगाटी दुनियेतील गोष्टीचा मोह बाळगण्याची आपल्याला सवयच लागून राहिलेली असते. पण ह्याच मूलभूत गोष्टी ज्यावेळी काही कारणास्तव आपल्यापासुन दुरावतात त्यावेळी त्यांचं महत्व आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. ह्या गोष्टीच कशा आवश्यक आहेत आणि केवळ त्या असल्या तरी आपण आयुष्य जगू शकतो ही जाणीव आपल्याला होते. 

आमच्या भागातील विद्युतपुरवठा सुरळीत झाला तरी वसईतील काही भाग अजूनही (म्हणजे जवळपास पाच दिवसांनंतरही विजेपासून वंचित आहेत! त्यांचा विद्युतपुरवठा सुरळीत होवो ही प्रार्थना ! 

दुपारी एका टाऊनहॉल मध्ये मला पाच दहा मिनिट बोलायचं होतं. तिथं मी येऊ शकत नाही हे सुद्धा मी माझ्या व्यवस्थापकांना आणि सहकाऱ्यांना कळवू शकलो नाही!  विद्युतपुरवठा सुरळीत झाला तरीही सर्व नेटवर्क आणि वायफाय सुरु झाले नव्हते. मध्येच अर्धा तास एक नेटवर्क सुरु झाले आणि एक महत्वाचा कॉल घेता आला. पण त्यानंतरच्या अमेरिकन व्यवस्थापकासोबतच्या महत्वाच्या बैठकीला मात्र मी हजर राहू शकलो नाही !  

दिनांक १९ मे २०२१ रोजी सकाळी केव्हातरी वायफाय सुरु झाले आणि जिवात जीव आला. गेले दोन तीन दिवस अधूनमधून हे वायफाय गोंधळतच आहे.  शुक्रवारी बहुतांश नेटवर्क सुद्धा सुरळीत झाली आणि बॅकअप अस्तित्वात आलं. ह्या सर्व काळात कंपनीतील सहकाऱ्यांनी, टीमनं आणि व्यवस्थापकांनी माझ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. तू सुरक्षित राहा, ते महत्वाचं असा सल्ला दिला ! खूप बरं वाटलं ! व्यावसायिक जगातील माणुसकीचं हे दर्शन नेहमीच सुखावून जातं !

वसई हे अगदी निसर्गरम्य गाव ! पावसाळा सोडला तर बाकीच्या ऋतूत इथलं जीवनमान खूप छान ! पण पावसाळ्यात मात्र अनियमित विद्युतपुरवठा, तुंबून राहणारे पाणी ह्यामुळं बऱ्याच भागात जगणं संघर्षमय होऊन जातं. इथलं प्रशासन ह्याबाबतीत योग्य पावलं उचलेल हा आशावाद ! फक्त अजून नवीन बांधकामांना परवानगी देताना पाण्याचा निचरा कसा होणार, इथं नव्यानं येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा देता येतील की नाही ह्याचा सर्वप्रथम विचार करायला हवा ! 

माझ्या सततच्या शिंपण्यानं अवेळी उगवलेला तेरडा ह्या मुसळधार पावसानं सुखावला ! आता खरा मान्सुन येईस्तोवर त्याला आनंदात ठेवण्याची जबाबदारी माझी ! 





पाऊस गेला आठवणी मागे ठेऊन ! आज सकाळी दिसलेलं एक सुंदर फुलपाखरु ! आणि त्यावर सुचलेल्या ह्या ओळी 

शामल त्या मोहक तनुवरी  
शुभ्र ठिपक्यांची आवली !
प्रातःकाली प्रसन्न प्रहरी 
रम्य तुझी प्रतिमा मज भावली !!



शनिवार, ८ मे, २०२१

जीवनात ही घडी !



ह्या आठवड्यात आमच्या लग्नाला वीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मागं वळून पाहताना आजची ही पोस्ट ! 

आमचं जमवून आणलेलं लग्न! स्थापत्यशाखेची अभियांत्रिकी पदवी घेताना काही खास कामगिरी बजावता आली नव्हती. तरीही पदव्युत्तर शिक्षणाचा अट्टाहास आणि स्थापत्यशाखेत सात-आठ महिने नोकरी केल्यामुळं पुढील काही वर्षे नोकरीत स्थिरस्थावर होण्याची चिन्हं दिसत नव्हती. मग योगायोगानं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिरकाव झाला. तिथंही सुरुवातीच्या काही महिन्यांच्या संघर्षास सामोरे जावे लागल्यानंतर मग मात्र देवाच्या कृपेनं जम बसला. दोन वर्षे अनुभव होत नाही तोवर इंग्लंडला जायची संधी मिळाली. साधारणतः ह्या काळातच घरी लग्न जमविण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरु झाल्या होत्या. पण कुठे खास प्रगती होत नव्हती. अशा वेळी इंग्लंडला जाऊन आल्यावर पाहू ह्या बोलीवर घरच्यांनी इंग्लंडला पाठवलं. 

ह्याच काळात आमच्या नात्यातील गणेश पाटील ह्यांची प्राजक्तासोबत FDC ह्या कंपनीत भेट झाली. त्यांची पत्नी कविता ही आमच्या हरेश्वर मामांची मुलगी. बोलता बोलता प्राजक्ताला त्यांनी माझ्या स्थळाविषयी सुचवलं. कोणत्याही मुलीचं लग्न जमायचं असेल तर किमान सात आठ मुलं पाहावी लागतात ही प्राजक्ताची तात्कालीन समजूत ! त्यामुळं पहिल्या काही स्थळांविषयी फारसं गांभीर्यानं घेऊ नये ह्या मताची ती होती. त्यामुळं तिनं कोणतंही दडपण न घेता अगदी सहजपणे घरी आपल्या आईला ह्या स्थळाची माहिती दिली.  तिच्या आईनं आपल्या भावजयीच्या म्हणजेच प्रणिता हिच्या कानावर ही गोष्ट घातली. प्रणिताताई ही माझ्या वडिलांच्या मामेभावाची मुलगी ! ती सर्व गोष्टीत अत्यंत नियोजनबद्ध ! तिनं पुढील सुत्रं आपल्या हाती घेतली. हे सर्व मी इंग्लंडमध्ये असताना चाललं होतं. 

आमच्या घरी एकतर माझ्या लग्नाची खूपच उत्सुकता होती किंवा दडपण असावं. त्यामुळं माझ्या आईनं माझ्या वहिनीसोबत प्राजक्ताची एक भेट घेतली.  ह्या भेटीनंतर वहिनीने आईच्या सांगण्यानुसार प्राजक्ताच्या स्तुतीपर एक मोठं ई-मेल मला पाठविलं. ही तुमच्यासाठी योग्य मुलगी आहे वगैरे वगैरे ! तिथं इंग्लंडमध्ये कहाणीला वेगळं वळण मिळालं होतं. अमेरिकन एक्सप्रेसच्या ब्रायटन ऑफिसात तीन महिन्यासाठीची माझी नेमणूक आता दीर्घकालीन होण्याची चिन्हं दिसु लागली होती. माझं वर्क परमिट असल्यानं मी तिथं दोनतीन वर्षे तरी सहज राहू शकत होतो. पहिलाच परदेश दौरा आणि त्यात वास्तव्य दीर्घकाळ होण्याची शक्यता ह्यामुळं मी काहीसा भावुक बनलो होतो. अशावेळी वहिनीच्या ई - मेलचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. पुढे हिवाळा जसजसा वाढत गेला तसतसं मी माझ्या व्यवस्थापकांना भारतात परतु देण्याची विनंती केली. परंतु त्यांनी ती फारशी मनावर न घेतल्यानं मी स्वतः तिकिटं बुक करुन काही दिवसांच्या सुट्टीच्या बोलीवर भारतात परतलो ! इंग्लंडहून भारतात परतण्यासाठी विमानात बसल्यावर भारतात प्राजक्ता नावाची मुलगी आपली वाट पाहत आहे अशी स्वप्नं मी रंगवत होतो ! 

इथं आल्यानंतर पहिल्या आठवड्यात आमची पहिली भेट झाली. पहिल्या भेटीला चर्चेला कोणत्या गोष्टी घ्याव्यात ह्याची मी एका कागदावर नोंद करुन ठेवली होती. त्यात प्रामुख्यानं गणिताविषयी कितपत आवड आहे ह्याविषयी खास प्रश्नार्थक उल्लेख होता. परंतु हा कागद प्रत्यक्ष भेटीत बाहेर काढण्याची संधी मला मिळाली नाही किंवा सुचलं नाही.    साधारणतः पंधराव्या मिनिटाला मी माझ्या परीनं होकार सांगून टाकला. आता हा होकार सांगण्याचा माझ्याकडं अधिकार आहे असं सोयीस्कर गृहितक मी बनवलं होतं. प्राजक्ताला जरी परदेशी शिक्षणाची इच्छा असली तरी वसईला राहायला आवडेल असा तिनं उल्लेख केला. प्रत्यक्ष होकार द्यायला तिला अजून एक भेट लागली. आता लग्न जमवून मी परत इंग्लंडला जातो आणि मे महिन्यात लग्नासाठी परत येतो ह्या माझ्या प्रस्तावाला तिनं चांगल्या शब्दांत धुडकावुन लावलं. त्याकाळी तिची इंग्लिशमध्ये संवाद साधण्याची वारंवारता जास्त असल्यानं तिनं "We need to know each other better before marriage" ह्यासारखं काही वाक्य बोलल्याचं मला आठवतंय. डिसेंबर ते मे ह्या कालावधीत बरोबर पन्नास वेळा भेटल्यानंतर ६ मे २००१ रोजी आम्ही विवाहबंधनात अडकलो ! 

मागं वळून पाहता आमचे स्वभाव म्हणजे पृथ्वीचे दोन ध्रुव ! लहानपणापासुन अगदी शिस्तीत वाढला गेलेलो मी ! बहुदा मस्ती करणे हे माझ्या स्वभावात लहानपणापासुन नव्हतंच ! त्यात शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून प्रतिमा ! प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी व्हायला हवी हा काहीसा अट्टाहास ! क्रिकेटची खूप आवड ! घर आणि सभोवतालच्या परिसरातच जास्त रमणारा ! लग्नसमारंभ आणि बाकीचे सोशल इव्हेंट्स ह्यात सहभाग म्हणजे माझ्या दृष्टीनं सत्वपरीक्षेचा काळ ! चारचौघात गप्प असलो तरी जवळच्या लोकांत मात्र खुप बोलणारा ! चित्रपट आणि संगीताच्या बाबतीत हिंदी चित्रपटापलीकडं झेप नसणारा ! बोलताना समोरच्याचे मन दुखवू नये ह्यासाठी प्रयत्न करणारा ! हल्ली मात्र काही लोकांची मनं गैरसमजामुळं दुखावली गेली आहेत ! पुर्वी न रागावणारा म्हणून काही प्रमाणात मी ओळखला जायचो. हल्ली तेही बदलत चाललंय!  ऑफिसचे काम, क्रिकेट ह्यात डुंबवून घेणारा ! घरातील फ्युज उडाला तरी इलेक्टिशियनची गरज भासणारा ! कोणताही धोका पत्करण्याची तयारी नसणारा ! सकाळी पाच वाजता उठणं ही आयुष्यातील फार महत्वाची गोष्ट आहे ह्यावर ठाम विश्वास बाळगणारा ! 

प्राजक्ता काहीशी वेगळ्या धर्तीची ! सामाजिक समारंभात खूप रस घेणारी, समाजातील लोकांशी संपर्क ठेवणं आवडणारी, हाती घेतलेली गोष्ट निष्ठेनं पुरी करणारी मग त्यासाठी कितीही वेळ लागो. काहीशी स्पष्टवक्ती, जर का रागावली तर त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जाणारी, नवनवीन गोष्टी शिकण्याची तीव्र इच्छा बाळगून असणारी, आयुष्य जगायचं तर जीवनातील योग्य गोष्टींचा पूर्णपणे आनंद लुटता यायला हवा ह्यावर ठाम विश्वास असणारी. इंग्लिश माध्यमात शिक्षण झालं असला तरीही आजोबांनी लावलेली मराठी वाचनाची आवड जोपासणारी, आता त्यात पेपर वाचनाचा अतिरेक होत आहे ही बाब वेगळी. घरात कोणतंही उपकरण बंद पडलं किंवा बिघडलं तर स्वतःहून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणारी. 

अमेरिका पहिली वारी २००२ फिनिक्स 

लग्नानंतर दोघांनीही काही महिने मुंबईत नोकरी केली.  वसईच्या घरी राहत असल्यानं घरच्यांनी सांभाळलं. प्राजक्ताने वसईतील मांसाहार प्राधान्य असलेल्या आहारपद्धतीचा स्वीकार केला. अचानक कंपनीनं मला अमेरिकेत पाठविण्याचा निर्णय घेतला. खरंतर ही कमी कालावधीसाठीची नेमणूक होती. परंतु मागच्या अनुभवामुळं कदाचित असेल पण प्राजक्तानं नोकरी सोडून माझ्यासोबत अमेरिकेला जावं असा आग्रह धरण्यात आला. तिनं ह्या निर्णयाला साथ दिली. अमेरिकेत पहिल्या भेटीत मला कार चालवता न आल्यानं तिची बऱ्यापैकी निराशा झाली. त्यात माझा अगदी काळजी करणारा स्वभाव. अमेरिकेत पहिल्या महिन्यातच फिनिक्समध्ये असताना लास वेगासला मित्रांसोबत जायची संधी होती. परंतु त्यानं कधी फिनिक्सच्या बाहेर गाडी चालवली नाही ह्या कारणामुळं मी त्यांच्यासोबत जायला नकार दिला.  सामान्यज्ञानाच्या बाबतीत माझ्याकडे आनंदी आनंद असल्यानं लास वेगासची महती मी जाणून नव्हतो. पुढे काही वर्षे अमेरिकेत राहून सुद्धा लास वेगास भेटीचा योग काही आला नाही. ही पहिल्या महिन्यात चुकलेली लास वेगास वारी लक्षात राहिली. 

तिथंही मी कामात स्वतःला अडकवून घेतलं. तरीही तिनं जमेल तसा माझ्या सहकाऱ्यांच्या पत्नींशी परिचय करुन स्नेहसंबंध प्रस्थापित केले. माझी वरण, भात, भाजी अशा भोजनाची आवड लक्षात घेऊन तिने ती पुरविण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. ह्या भेटीतच आम्ही ग्रँड केनयन, लॉस अँजेल्स डिस्नेलँड ह्यासारख्या सुप्रसिद्ध स्थळांना  भेटी दिल्या. अडीच महिन्यात दुसऱ्या प्रोजेक्टनिमित्त आम्हांला फिनिक्स सोडून फ्लोरिडाला स्थलांतर करावं लागलं. मी एकंदरीत अमेरिकन जीवनपद्धतीशी अनभिज्ञ असल्यानं तिनं ह्या पहिल्या भेटीत बऱ्याच गोष्टींत पुढाकार घेतला. फ्लोरिडाचे वातावरण फिनिक्सच्या मानानं खुपच आल्हाददायक होतं. त्यावेळी की वेस्टला दिलेली भेट संस्मरणीय ठरली. अमेरिकेच्या दक्षिण टोकाला असलेल्या ह्या बेटांच्या समूहांना जोडणारा रस्ता आपल्या मनात  समुद्राच्या मध्यातून प्रवास करण्याची भावना निर्माण करुन देतो. ह्या फ्लोरिडा भेटीत आम्हांला हॉटेलातच राहावे लागले. तिथं दिवसभर हॉटेलात एकटं राहण्याच्या कंटाळवाण्या प्रसंगांना तिनं तोंड दिलं. फ्लोरिडातील एक मोठा मॉल सॉग्रास मिल्स जवळ असल्यानं आमचे बहुतांश शनिवार रविवार तिथेच जात असत. तिचा विविध दुकानातील खरेदीचा उत्साह पाहून मी आश्चर्यचकित होत असे. ह्या उत्साहाशी बरोबरी करणे मला फारसं जमत नसे. 

ह्यावेळी मात्र कमी कालावधीसाठीची नेमणूक तितक्याच कालावधीसाठी ठरल्यानं आम्ही भारतात परतलो. त्यावेळी मी परदेशात स्थायिक व्हायला उत्सुक असल्यानं तिनं पुन्हा नोकरी शोधण्याचा तात्काळ प्रयत्न केला नव्हता. पण काही महिने वाट पाहून ती पुन्हा रुजू झाली आणि पुन्हा एकदा माझा परदेशगमनाचा योग आला! 

फ्लोरिडा २००३ 
ह्यावेळी कंपनीनं थोडी दीर्घमुदतीची ग्वाही दिल्यानं आम्ही पुन्हा द्विधा मनःस्थितीत सापडलो. शेवटी भारतीय मानसिकतेने विजय मिळविला; पुन्हा एकदा नोकरीचा राजीनामा देऊन ती माझ्यासोबत फ्लोरीडाला आली. इथला सुरुवातीचा काळ कठीण गेला. मला कामाचा खूप ताण होता आणि अपार्टमेंटमध्ये आम्ही शिफ्ट झालो त्यावेळी आर्थिक गणित सुद्धा चुकते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तिने मोठ्या जिद्दीनं त्याला तोंड दिले.ह्या भेटीत मात्र तिने मला लवकरात लवकर ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यास भाग पाडले आणि स्वतःही लेखी परीक्षा दिली. इथं IBM आणि TCS ह्या कंपनीचे बरेच कर्मचारी होते. त्यांच्या पत्नींच्या कंपूत प्राजक्ताचा सहजरित्या प्रवेश झाला. महिन्यातून एका शनिवारी ह्या महिला आपल्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी नवरेमंडळींकडे सोपवून आपली पार्टी करत असत. नवरे मंडळी रविवारी आपापसात क्रिकेटचे सामने खेळत असत/ माझ्या कंपनीचा मी एकमेव कर्मचारी असल्यानं मला IBM ने आपल्या संघात घेतलं होतं. आयुष्यातील सर्वोकृष्ट फलंदाजी ह्या तीन चार महिन्यात मी केली. TCS च्या गोलंदाजांनी माझा काहीसा धसका घेतला होता (काहीशी अतिशयोक्ती). ह्या भेटीत सोहमची चाहूल लागली असताना ऑफिसातील परिस्थिती बदलली आणि आम्हांला भारतात परत यावं लागलं. सोहमचा जन्म अमेरिकेत व्हावा ही आमच्या दोघांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यावेळी त्या गोष्टीचं वाईट वाटलं असलं तरी आता मात्र काही खेद नाही. भारतात परतलो. सोहमचे आगमन झाले. दोन्ही कुटुंबीय आनंदात होते.

न्यू जर्सी २००५
मला फ्लोरिडातुन इच्छा नसताना परत यावं लागल्यानं मी कंपनी बदलण्याचा निर्णय घेतला. नव्या कंपनीनं तीन महिन्यातच परत अमेरिकेला पाठवलं. ते तीन महिन्याच्या बोलीवर ! सोहम अगदी लहान असल्यानं त्या दोघांना सोबत घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता. तिथं गेल्यावर इंग्लंडमधील अनुभवाची पुनरावृत्ती झाली. तीन महिन्यांची नेमणूक दीर्घकाळात परिवर्तित झाली. त्यामुळं  प्राजक्ता आणि सोहम ह्यांचा व्हिसा प्रोसेस करुन त्यांना अमेरिकत बोलाविण्याचा आम्ही निर्णय घेतला. ह्या सर्व प्रकरणात एकंदरीत पाच महिने मी एकट्यानं अमेरिकेत काढले. त्यावेळी सुद्धा प्राजक्ता भारतातुन "मला न्यूयॉर्क जवळ आहे तिथं फिरुन ये" वगैरे बजावत होती. मागच्या भेटीत शिकलेली पाककला आता उपयोगास येत होती. पाच महिन्यांनी ज्यावेळी ह्या दोघांचं अमेरिकेत आगमन झालं त्यावेळी मला सराईतपणे कार चालवताना पाहुन तिला खूप आनंद झाला होता. इथं मी स्थिरावल्यानंतर हे दोघे आल्यानं नक्कीच फरक पडला होता. त्यांना एक स्थिरावलेल्या घराचा अनुभव मिळाला. परंतु इथला हिवाळा मात्र ह्या दोघांसाठी खूप कंटाळवाणा ठरला. तरीही ख्रिसमसचे वातावरण उत्साह निर्माण करुन जात असे. 

त्यानंतरच्या उन्हाळ्यात मात्र आम्ही बऱ्यापैकी मौज केली. SUV चालवत एका दिवसात नायगारापर्यंत ३५० मैलांची मारलेली मी मजल प्राजक्ताला खूप प्रभावित करुन गेली. इथंही तिचा मोठा कंपू बनला होता. त्यांच्यासोबत ती संध्याकाळ व्यतित करत असे. प्राजक्ताला त्यावेळी खरेदीची खूप आवड होती. एखाद्या बॅगेत जास्तीत जास्त गृहोपयोगी वस्तू कशा सामावल्या जाऊ शकतात ह्याविषयी तिचे कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. पण त्या वजनदार बॅगा मला उचलायच्या असल्यानं मला ह्या कौशल्याची मनमोकळेपणानं कधी प्रशंसा करता आली नाही. सोहमला आणि आम्हांला भेटण्यासाठी आई भाई पुढील वर्षी आले. त्यांची ही भेट खरंतर सहा आठवड्यांचीच! सोहम पहिल्या दिवशी थोडा दूरदूर राहिला. पण त्यानंतर मात्र आई भाईंसोबत पूर्ण मनमोकळेपणानं खेळू लागला. इथं प्राजक्ताची विचारचक्रं फिरु लागली. भारतात आपले इतके नातेवाईक असताना आपण इथं भुतासारखं का राहावं असा प्रश्न तिनं मी एके दिवशी ऑफिसातून परतल्यावर केला. पुढील आठवडाभर मोठी चर्चा होऊन आई भाईंसोबत हे दोघेसुद्धा परततील असा निर्णय घेण्यात आला. मला एकटं सोडून जाताना ह्या सर्वांना मात्र खूप वाईट वाटत राहिलं. 

अमेरिका सोडली हा निर्णय योग्य की अयोग्य हा प्रश्न प्राजक्ताला केव्हाच पडला नाही ! मला मात्र अजूनही अमेरिका सोडण्याच्या निर्णयाच्या अचूकतेविषयी अधूनमधून शंका निर्माण होत राहतात. आता परत नोकरी सुरु न करता तिनं सोहमच्या संगोपनात स्वतःला वाहुन घेतलं.   पुन्हा एकदा पाच महिने एकट्यानं अमेरिकेत काढुन मी भारतात परतलो. वसईत राहायला मिळेल अशी तिची आशा होती. पण मला आता वसईहुन दररोज मुंबईला अपडाऊन करणे जमेनासे झाले होते आणि मग मी बोरिवलीला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. इथंही तिचा म्हटलं तर हिरमोडच झाला होता. पण माझ्या करिअरच्या दृष्टीनं योग्य होईल म्हणून तिनं ह्या निर्णयाला साथ दिली ! 

२००७ नंतर  

बोरिवलीला राहत असलो तरी बहुतेक शनिवार - रविवार आमच्या वसईला फेऱ्या होत राहिल्या. सोहमच्या शाळेच्या प्रत्येक सुट्टीच्या वेळी हे दोघे न चुकता वसईला यायचे. वसईच्या सर्व नातेवाईकांत तिनं एक उत्साही मुलगी म्हणुन आपली ओळख निर्माण केली. २०१० साली मी JPMC कंपनीत दाखल झालो. इथं मला जबाबदाऱ्या असल्या तरी वेळच्या वेळी सुट्टी घेण्याची संधी मिळत राहिली. खरंतर सुट्टीत घरी अराम करणे ह्यालाच माझी पहिली पसंद असायची. परंतु हळुहळू मला बदलविण्यात तिनं यश मिळविलं. कधी स्वतः तर कधी वीणा वर्ल्ड सारख्या कंपनीसोबत आम्ही भारताच्या विविध राज्यांत फिरु लागलो. प्रत्येक ठिकाणी आठवण म्हणून फोटो काढण्याचा छंद तिचाच ! सुरुवातीला ह्यावरुन मतभेद होत असले तरी हळूहळू मला त्याची ही सवय होऊ लागली. मी २०१० साली ब्लॉग लिहिण्यास आरंभ केला. बऱ्याच वेळा प्रूफरीडिंग साठी तिला मी पोस्ट वाचण्यासाठी देतो. ती जरी इंग्लिश माध्यमात शिकली असली तरी तिचं मराठी तिनं प्रयत्नपूर्वक जोपासलं आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा पोस्टमध्ये तिच्या अमुल्य सूचना असतात. तसंही इंग्लिश माध्यमातुन शिकली असल्यानं मी त्या भाषेसाठी तिचा सल्ला अधूनमधून घेत असतो. 

सोहम जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याचा अभ्यासाचा आवाका वाढत गेला. त्यामुळं एकाने त्याच्यासोबत घरी थांबणं क्रमप्राप्त होऊ लागलं.  त्यात मग माझ्या कार्यालयीन जबाबदाऱ्या सुद्धा वाढत गेल्या. माझ्या स्वभावानुसार मी आनंदानं ही घरी थांबण्याची जबाबदारी स्वीकारली. मधल्या काही वर्षांत मी सामाजिक समारंभ बऱ्यापैकी टाळले. सुरुवातीला ही गोष्ट स्वीकारायला तिला कठीण गेलं. पण मग माझा स्वभाव आणि सोहमचा अभ्यास हे पाहता तिनं ह्याचाही स्वीकार केला. मी एप्रिल महिन्यात आमच्या शाळेच्या NPL स्पर्धांच्या आयोजनात सहभागी होऊ लागलो. लोकांनी माझं कौतुक केलं. तिला ह्या गोष्टीचा मोठा अभिमान वाटला. काळानुसार तिनं आपल्या स्वभावात बदल घडवत आणले. सुरुवातीला फिनिक्स इथं असताना मला घरात विशेषतः बाथरुममध्ये मोठ्यानं गायची सवय होती.  तिनं त्यावेळी जवळपास माझ्यावर गायची बंदी घातली होती. कालांतरानं कदाचित माझ्या आवाजात सुधारणा झाली असावी किंवा तिच्या सहनशक्तीत वाढ ! त्यामुळं मी इथं आनंदानं आता नमूद करु इच्छितो की मला आता घरी गाण्याची परवानगी आहे. गेल्या वर्षी मी फेसबुकवर काही गाणी रेकॉर्ड करुन टाकली होती त्यात तिनं दिलेल्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा होता.  माझ्या व्यावसायिक जीवनाविषयी तिचा अव्यक्त पाठिंबा राहिला आहे. मी यशस्वी व्हायलाच हवं असा तिचा अट्टाहास नाही. उलट मागच्या बढतीच्या वेळी आता तु अजून व्यग्र होणार म्हणून ती काहीशी दुःखी झाली!  बस झालं आता, तू निवृत्त हो ! आपण जे आहे त्यात भागवु हा तिचा आवडता डायलॉग ! मला नसलं तरी सोहमला त्यामुळं उगागच तणाव येतो ! बिचारा ! 

माझा स्वभाव तसा सदैव टेन्शन घेण्याचा ! दुसऱ्या दिवशीसाठी घरात भाजी आहे की नाही पासून पुढील आठवड्यात एखादी महत्वाची बैठक आहे असली नानाविध कारणं मला घरातील वातावरण गंभीर करुन सोडण्यास पुरेशी ठरतात. शनिवार रविवारी सुद्धा संगणकासमोर ऑफिसचं काम करत किंवा बुद्धिबळ खेळत बसणं हा माझा छंद ! गेल्या काही वर्षांत ऑफिसात बढती मिळून जबाबदाऱ्या सुद्धा वाढत चालल्या आहेत. कदाचित एक माणुस म्हणून सुद्धा मी बदललो असेन. ऑफिसात जो काही थोडाफार एक सिनिअर व्यक्ती म्हणुन मान मिळतो त्याची घरी सुद्धा थोडीफार दखल घेतली जावी अशी अप्रत्यक्ष अपेक्षा कदाचित मी बाळगून असेन. नात्यात ह्या गोष्टीनं थोडाफार फरक पडत असावा. तिनं आता स्वतःला तबला, सतार आणि गायन अशा विविध छंदांत रमवून घेतलं आहे. मी तुला तुझी स्पेस देते, तू मला माझी स्पेस दे हे हल्ली हल्ली ऐकलेलं वाक्य ! माझ्या सदैव तणावाखाली राहण्याच्या स्वभावामुळं कधीकधी ती वैतागते ! 

बाकी नवराबायको म्हटले की दैनंदिन व्यवहारात दोन टोकं असल्याची उदाहरणं तर हवीतच ! आमच्या बाबतीत ती खूप आहेत ! घरात पंखा लावणं ही माझ्या दृष्टीनं अनावश्यक गोष्ट ! तर उगाचच चार - पाच वर पंखा लावून घरात इथं तिथं फिरणं हा तिचा आवडता छंद ! भर उन्हाळ्यात सुद्धा वाटीभर दही खाऊन सर्दी होण्याची भिती बाळगणारा मी तर उन्हाळ्यातील प्रत्येक दिवशी आईसक्रीम, दही, काकडी, कलिंगड  खाल्ल्याशिवाय झोप न येणारी ती ! आलं, लवंग असे मसाल्याचे पदार्थ आवडणारा मी तर ह्या उष्ण पदार्थांचा धसका घेतलेली ती ! लग्नाला जाताना पाच मिनिटांची तयारी पुरेशी असणारा मी आणि .... 

मागं वळून पाहता काही प्रमाणात आम्ही  एकमेकांना बदललं आहे ! मी काही प्रमाणात सामाजिक जीवनाची आवड निर्माण करुन घेतली.  मुळ आनंदी स्वभाव कायम ठेवला तरी ती काहीशी गंभीर बनली. तासंतास आता वाचन करु लागली. ती दैनिकातील सदरे खास करुन संपादकीय वगैरे प्रकार गंभीर स्वरुप धारण करु लागले आहेत ! तिच्या भाषेत आताशा मोठमोठाले क्लिष्ट शब्द येऊ लागले आहेत. सकाळी उठण्याच्या बाबतीत तिनं आपली मूळ वेळ कायम ठेवली असली तरी वसईच्या घरच्या वेळेनुसार लवकर झोपण्याची सवय तिनं लावून घेतली आहे. लग्नाआधी मुख्यत्वेकरुन पापलेट आणि चिकन हे प्रकार माहिती असणाऱ्या प्राजक्ताने आता मटण, विविध प्रकारचे मासे ह्या प्रकारात नैपुण्य संपादन केले आहे ! 

बाकी आमच्या काही सामायिक आवडी सुद्धा आहेत ! ताज्या भाज्या बाजारातुन आणुन काही वेळ त्यांची तारीफ करणे, हिरव्यागार वनराईने नटलेल्या ठिकाणी फिरायला जाणे,  गेल्या काही वर्षांपासुन शास्त्रीय संगीत ऐकणे वगैरे वगैरे ! गेल्या काही वर्षांत तिनं का कोणास ठाऊक पण शॉपिंग हा प्रकार सुद्धा अगदी कमी केला आहे. त्यामुळं आमच्यात एकमत आहे अशा गोष्टींच्या यादीमध्ये एक महत्वाची भर पडली आहे. मुंबईत फिरायचे असेल तर रिक्षा, बेस्ट आणि लोकल ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्तम वापर करावा ह्यावर आमचं ठाम एकमत आहे.  कार सारख्या गोष्टींवर फारसा पैसे खर्च करु नये, फक्त ड्रायव्हिंग करता यायला हवं.  संधी मिळाली तरी ओसाड जमिनीवर जंगल रुजवावं हे आमच्या दोघांचं स्वप्न आहे ! फक्त जंगलातील झाडांच्या यादीवर एकमत होत नाही ही एक छोटी बाब ! 

खरंतर ह्या विषयावर लिहणं ही मोठी जोखमीची गोष्ट ! पण आज सकाळच्या पोस्टनंतर काही मित्रांनी आज वीस वर्षांच्या सहप्रवासावर एक पोस्ट अपेक्षित होती अशी टिपण्णी केली आणि प्राजक्ताने त्याला दुजोरा दिला म्हणून हे धारिष्ट्य ! अर्थात ह्या पोस्टचे प्रूफ रीडिंग तर झालंच आहे.  एकंदरीत आढावा घ्यायचा झाला तर वेगळ्या स्वभावांमुळं दैनंदिन जीवनात मतभेदाचे प्रसंग उद्भवण्याची सदैव शक्यता असणारा  पण एकंदरीत जीवनाविषयी समान दृष्टिकोन असल्यानं सुखकारक असा हा गेल्या वीस वर्षांचा प्रवास ! धन्यवाद FDC ! 

काही सांगू पाहतं आहे हे चित्र !





 

चुकीची गृहीतकं ही मनःशांतीला पोषक नसतात. जसं की आयुष्यात सुखांचा कालावधी दुःखाच्या कालावधीपेक्षा दीर्घकाळ टिकणारा आहे, आयुष्यात महत्प्रयासानं प्राप्त केलेलं स्थैर्य चिरकाल टिकणारं आहे वगैरे वगैरे ! खरंतर आपण सर्व निसर्गाचाच एक घटक, परंतु निसर्गदत्त बुद्धीमुळे आपण निसर्गातील बाकी सजीवांपासून आपणास वेगळं समजु पहातो. निसर्गाचे नियम आपल्याला लागु पडणार नाहीत अशी भ्रामक समजुत करु पाहतो. निसर्ग त्याच्या पद्धतीनं  आपल्याला समजवू पाहतो. निसर्गानं दिलेले धडे समजुन घेण्यासाठी गरज असते ती फक्त फक्त डोळे उघडे ठेवण्याची! आज सकाळी काढलेली ही दोन चित्रं ! मनाला खुप भावून गेलं.  निसर्ग ह्यात खूप काही सांगतोय असं वाटलं. 

पानाच्या विविध जीवनावस्था ! एक उमलणारे कोवळं पान ! जीवनाविषयी खूप काही आशा बाळगणारे ! दुसरं हिरवंगार पान ! अगदी तारुण्याच्या भरात ! चकाकणारा हिरवा रंग ! आणि मग पिवळं पान ! आयुष्य पुर्ण जगलेलं ! संतृप्ततेनं धरणीने आपल्याला सामावुन घ्यावं ह्याची वाट पाहणारं ! तिन्ही अवस्थांमधील पानांना सारख्याच मायेनं आपल्या अंगावर खेळवणारं हे जास्वंदीचं झाड ! 

पानांप्रमाणं फुलांच्याही तीन अवस्था ! एक नुकतीच उमलू पाहणारी कलिका! फक्त हिरव्या रंगांचा स्पर्श झालेली ! दुसरी उमलण्याच्या अर्ध्या मार्गावरील ! आणि एक फुलण्याच्या अंतिम टप्प्यावरील असलेलं दाट लाल रंगाचे फुल ! ह्यात आयुष्याच्या अवस्थांमुळं निर्माण होणाऱ्या हर्ष, उन्माद, खेद वगैरे भावना अस्तित्वात नसाव्यात असंच वाटत राहतं !

केवळ हीच मंडळी इथं नाहीत ! जरा निरखुन पाहिलं तर दिसतोय तो एक कोळी ! दोन दिसांचा डाव अशी कहाणी असलेल्या ह्या सर्व  पानाफुलांच्या आधारानं आपलं घर उभारु पाहणारा हा कोळी ! ते पिवळं पान कधीही गळून पडणार, त्या लालचुटुक फुलाचा मोह कोणाला पडून ते केव्हांही खुडले जाणार आणि मग प्रयासाने उभारलेलं हे कोळ्याचं जाळं नष्ट होणार ! ह्या इवल्या कोळ्याच्या बाबतीत किती वेळा हे घडलं असणार हे केवळ तो कोळी आणि देवच जाणो ! तरीही नव्या जिद्दीनं तो कोळी पुन्हा नवं जाळं उभारायला लागेल, हे जास्वदींचं झाड सुद्धा खुडल्या गेलेल्या फुलांचा आणि गळलेल्या पिवळ्या पानांचा शोक न करता नवीन बाळांच्या संगोपनात आपलं मन रिझवु पाहणार ! आपल्याला काही शिकता येईल का ह्या चित्रांतून ?

शनिवार, १ मे, २०२१

जाईन विचारीत सुरणफुला !




सुरण 

का कोणास ठाऊक पण मला असं वाटत राहतं की बावर्ची चित्रपटात राजेश खन्नाच्या तोंडी एक संवाद आहे. "बनानेवाला सुरन की सब्जी को भी मटन जैसा स्वादिष्ट बना सकता हैं !" हल्ली लोक छोट्या छोट्या गोष्टींवरुन नाराज होतात. त्यामुळं ह्या विधानामुळं माझे बरेच शाकाहारी मित्र नाराज होण्याचं भय मी बाळगुन आहे. सुरणाची भाजी जमली तर खरोखर स्वादिष्ट बनते. काही सुरण घशात खाज निर्माण करुन शकतात, त्यामुळं सुरणाची भाजी बनवताना त्यात चिंच वगैरे समाविष्ट करावा लागतो.  

ज्यावेळी आपण सुरणाची भाजी करतो त्यावेळी त्याला आलेले कोंब जर जमिनीत गाडले तर पावसाळ्यात तिथं सुरणाचे झाड उगवते आणि मग कालांतरानं जमिनीखाली मोठा सुरण निर्माण होतो. ज्यावेळी सुरणाच्या झाडाचा जमिनीवरील हिरवा भाग सुकून गळून पडतो त्यावेळी जमिनीखालील सुरण तयार झाला असावा असे मानतात. मग जमिनीखालील ह्या सुरणाला जमिनीवर आणावं !

सुरणाचे फुल 

आजच्या पोस्टचा विषय थोडा वेगळा आहे. आज आपण सुरणाच्या फुलाच्या भाजीविषयी बोलणार आहोत. एकंदरीत ह्या प्रकाराविषयी मला अजुनही खूप कुतूहल आहे. वरील उल्लेख केलेल्या सुरणाच्या प्रत्येक झाडाला फुल येतंच असं नाही. सुरणाचे फुल खूप दुर्मिळ आहे. ते कोणत्या परिस्थितीत उगवतं ह्यावर ही पोस्ट वाचणारी एखादी तज्ञ व्यक्ती टिपणी करेल अशी आशा मी बाळगून आहे. 

अतिशयोक्ती करण्यासाठी ह्या आठवड्यात सदतीस वर्षानंतर वाडीत सुरणाचे फुल आले असा उल्लेख जवळच्या खास मित्रमंडळात मी केला. त्यामुळं मित्रमंडळींच्या कल्पनाशक्तीला उधाण आलं ! त्याची काही उदाहरणं !

सदतीस वर्षांनी सुरणफुल आल्यामुळं घराला तोरण, रोषणाई व्हायला हवी अशी मागणी करण्यात आली. 

अंगणात शेणाने सारवून, रांगोळी काढून, वाडीत सदतीस वर्षांनी आलेल्या सुरण फुलाचा अभिषेक करून सनई, ताशाच्या मंजुळ संगीतात पालखीने त्याचा पाटीलवाड्यात प्रवेश होईल, औक्षण होईल.
विळीची पूजा केली जाईल, ओटी भरली जाईल. आणि मग घरातील पाच सुवासिनी रेशमी कपड्यात गुंडाळलेल्या सुरणफुलाला
(बारसे style)
कुणी फुलाची भाजी घ्या,
कुणी आमटी घ्या,
कुणी वडी घ्या,
कुणी सुकट सोबत घ्या.
असे पाच वेळा करतील. आणि मग ते सुरण फुल कापले जाईल.


सुरणफुलाच्या भाजीची रेसिपी

मग मित्रमंडळींनी सुरणफुलाच्या भाजीची रेसिपी सुद्धा दिली !

पावसाळ्याच्या आसपास  सुरणाच्या गड्ड्यांना सुरेख फूल येतं. ते रंगाला सुरेख असतंच, पण चवीलाही. म्हणूनच त्याच्या भाजीची तुमच्यासाठी ही खास रेसिपी.

साहित्य : एक सुरणाचं फूल, एक वाटी सोललेले कडवे वाल, दोन लहान कांदे, पाच-सहा सोललेल्या लसूणपाकळ्या, दीड वाटी नारळचे दूध, गूळ-मीठ चवीपुरते, दीड चमचा मसाला, हळद, हिंग, राई, बेसन अर्धा चमचा आणि चिंचेचा कोळ.

कृती : सुरणाचं फुल बारीक चिरून तेलावर गुलाबी होईपर्यंत परतून घ्या, नतंर कांदा परतून घ्या. राई-हिंगांची फोडणी करून त्यात सुरणाचं फूल, कांदा, वाल, मसाला, हळद व उकळलेलं पाणी घालून एक उकळी आणा. नंतर गॅस कमी करून वर झाकण ठेवून, पाच-सात मिनिटं शिजू द्या. मग लसूण ठेचून टाका, मीठ टाका. गूळ, चिंचेचा कोळ, नारळाचं दूध व बेसन थोड्या पाण्यात विरघळून लावा. पुन्हा चांगली उकळी आली की झाकण ठेवून मंद गॅसवर सात-आठ मिनिटं पुन्हा शिजू द्या. आपली रसभाजी तयार! 

ह्या मुळ रेसिपीत तज्ज्ञांनी काही मौल्यवान सूचना दिल्या 

ह्यात शेंगदाणा कूट आणि तिळाचा कूट घातला, नारळाचे दूध टाकले  तर अप्रतिम होईल.

वाल, ओले काजु नसले तर काजू रात्री भिजत घालुन त्यात टाकावेत. 

ज्यांच्या  ध्यानी मनी सदैव मांसाहार असतो त्यांनी ह्यात सुके मासे टाकुन पाहावेत असा सल्ला दिला!  


प्रत्यक्ष भाजी शिजवताना 

वाडीत उगवलेले हे सुरणफुल ! ह्याचं बाह्यरुप फारसं आकर्षक नाही ! 




अशा प्रकारे सर्व मित्रमंडळींच्या शुभेच्छांचा स्वीकार करुन काल ह्या सुरणफुलाच्या भाजीसाठी पाकसिद्धता करण्यात आली.  सुरणफुल कापताना अकरावी बारावीच्या काळात संबध आलेल्या dissection ह्या शब्दाची आठवण झाली. त्याचा उच्चार डिसेक्शन करावा की डायसेक्शन करावा ह्याबाबतीत बारावीपासुन असलेल्या संभ्रमाने पुन्हा उचल खाल्ली.  ह्या सुरणफुलाच्या उभ्या छेदाचे हे एक विहंगम छायाचित्र ! 



मित्रमंडळींनी दिलेल्या बहुमूल्य सूचनांचं पालन करत आणि त्यात गृहिणीला असलेल्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा मुक्त वापर करत बनलेली ही सुरणफुलाची अगदी चविष्ट भाजी ! 


देव करो आणि वाडीत लवकरच नवीन तीन चार सुरणफुले येवोत आणि आप्तेष्ट, मित्रमंडळींसोबत हा आनंद घेता येवो ! 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...