सुरण
का कोणास ठाऊक पण मला असं वाटत राहतं की बावर्ची चित्रपटात राजेश खन्नाच्या तोंडी एक संवाद आहे. "बनानेवाला सुरन की सब्जी को भी मटन जैसा स्वादिष्ट बना सकता हैं !" हल्ली लोक छोट्या छोट्या गोष्टींवरुन नाराज होतात. त्यामुळं ह्या विधानामुळं माझे बरेच शाकाहारी मित्र नाराज होण्याचं भय मी बाळगुन आहे. सुरणाची भाजी जमली तर खरोखर स्वादिष्ट बनते. काही सुरण घशात खाज निर्माण करुन शकतात, त्यामुळं सुरणाची भाजी बनवताना त्यात चिंच वगैरे समाविष्ट करावा लागतो.
ज्यावेळी आपण सुरणाची भाजी करतो त्यावेळी त्याला आलेले कोंब जर जमिनीत गाडले तर पावसाळ्यात तिथं सुरणाचे झाड उगवते आणि मग कालांतरानं जमिनीखाली मोठा सुरण निर्माण होतो. ज्यावेळी सुरणाच्या झाडाचा जमिनीवरील हिरवा भाग सुकून गळून पडतो त्यावेळी जमिनीखालील सुरण तयार झाला असावा असे मानतात. मग जमिनीखालील ह्या सुरणाला जमिनीवर आणावं !
सुरणाचे फुल
आजच्या पोस्टचा विषय थोडा वेगळा आहे. आज आपण सुरणाच्या फुलाच्या भाजीविषयी बोलणार आहोत. एकंदरीत ह्या प्रकाराविषयी मला अजुनही खूप कुतूहल आहे. वरील उल्लेख केलेल्या सुरणाच्या प्रत्येक झाडाला फुल येतंच असं नाही. सुरणाचे फुल खूप दुर्मिळ आहे. ते कोणत्या परिस्थितीत उगवतं ह्यावर ही पोस्ट वाचणारी एखादी तज्ञ व्यक्ती टिपणी करेल अशी आशा मी बाळगून आहे.
अतिशयोक्ती करण्यासाठी ह्या आठवड्यात सदतीस वर्षानंतर वाडीत सुरणाचे फुल आले असा उल्लेख जवळच्या खास मित्रमंडळात मी केला. त्यामुळं मित्रमंडळींच्या कल्पनाशक्तीला उधाण आलं ! त्याची काही उदाहरणं !
सदतीस वर्षांनी सुरणफुल आल्यामुळं घराला तोरण, रोषणाई व्हायला हवी अशी मागणी करण्यात आली.
अंगणात शेणाने सारवून, रांगोळी काढून, वाडीत सदतीस वर्षांनी आलेल्या सुरण फुलाचा अभिषेक करून सनई, ताशाच्या मंजुळ संगीतात पालखीने त्याचा पाटीलवाड्यात प्रवेश होईल, औक्षण होईल.
विळीची पूजा केली जाईल, ओटी भरली जाईल. आणि मग घरातील पाच सुवासिनी रेशमी कपड्यात गुंडाळलेल्या सुरणफुलाला
(बारसे style)
कुणी फुलाची भाजी घ्या,
कुणी आमटी घ्या,
कुणी वडी घ्या,
कुणी सुकट सोबत घ्या.
असे पाच वेळा करतील. आणि मग ते सुरण फुल कापले जाईल.
सुरणफुलाच्या भाजीची रेसिपी
मग मित्रमंडळींनी सुरणफुलाच्या भाजीची रेसिपी सुद्धा दिली !
पावसाळ्याच्या आसपास सुरणाच्या गड्ड्यांना सुरेख फूल येतं. ते रंगाला सुरेख असतंच, पण चवीलाही. म्हणूनच त्याच्या भाजीची तुमच्यासाठी ही खास रेसिपी.
साहित्य : एक सुरणाचं फूल, एक वाटी सोललेले कडवे वाल, दोन लहान कांदे, पाच-सहा सोललेल्या लसूणपाकळ्या, दीड वाटी नारळचे दूध, गूळ-मीठ चवीपुरते, दीड चमचा मसाला, हळद, हिंग, राई, बेसन अर्धा चमचा आणि चिंचेचा कोळ.
कृती : सुरणाचं फुल बारीक चिरून तेलावर गुलाबी होईपर्यंत परतून घ्या, नतंर कांदा परतून घ्या. राई-हिंगांची फोडणी करून त्यात सुरणाचं फूल, कांदा, वाल, मसाला, हळद व उकळलेलं पाणी घालून एक उकळी आणा. नंतर गॅस कमी करून वर झाकण ठेवून, पाच-सात मिनिटं शिजू द्या. मग लसूण ठेचून टाका, मीठ टाका. गूळ, चिंचेचा कोळ, नारळाचं दूध व बेसन थोड्या पाण्यात विरघळून लावा. पुन्हा चांगली उकळी आली की झाकण ठेवून मंद गॅसवर सात-आठ मिनिटं पुन्हा शिजू द्या. आपली रसभाजी तयार!
ह्या मुळ रेसिपीत तज्ज्ञांनी काही मौल्यवान सूचना दिल्या
ह्यात शेंगदाणा कूट आणि तिळाचा कूट घातला, नारळाचे दूध टाकले तर अप्रतिम होईल.
वाल, ओले काजु नसले तर काजू रात्री भिजत घालुन त्यात टाकावेत.
ज्यांच्या ध्यानी मनी सदैव मांसाहार असतो त्यांनी ह्यात सुके मासे टाकुन पाहावेत असा सल्ला दिला!
प्रत्यक्ष भाजी शिजवताना
वाडीत उगवलेले हे सुरणफुल ! ह्याचं बाह्यरुप फारसं आकर्षक नाही !
अशा प्रकारे सर्व मित्रमंडळींच्या शुभेच्छांचा स्वीकार करुन काल ह्या सुरणफुलाच्या भाजीसाठी पाकसिद्धता करण्यात आली. सुरणफुल कापताना अकरावी बारावीच्या काळात संबध आलेल्या dissection ह्या शब्दाची आठवण झाली. त्याचा उच्चार डिसेक्शन करावा की डायसेक्शन करावा ह्याबाबतीत बारावीपासुन असलेल्या संभ्रमाने पुन्हा उचल खाल्ली. ह्या सुरणफुलाच्या उभ्या छेदाचे हे एक विहंगम छायाचित्र !
मित्रमंडळींनी दिलेल्या बहुमूल्य सूचनांचं पालन करत आणि त्यात गृहिणीला असलेल्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा मुक्त वापर करत बनलेली ही सुरणफुलाची अगदी चविष्ट भाजी !
देव करो आणि वाडीत लवकरच नवीन तीन चार सुरणफुले येवोत आणि आप्तेष्ट, मित्रमंडळींसोबत हा आनंद घेता येवो !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा