मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३ एप्रिल, २०२१

हजारों ख्वाहिशें!!



तीन दिवसांची साप्ताहिक सुट्टी आली की काही वेगळे उद्योग सुचतात. काल अचानक जगजीतसिंग आणि गज़ल ह्या क्षेत्रात यु ट्यूबच्या कृपेनं प्रवेश केला. पहिल्या दोन तीन गझलांमध्ये हजारों ख्वाहिशें ही गालिब लिखित, जगजीतसिंग ह्यांच्या स्वर्गीय आवाजातील गज़ल ऐकावयास मिळाली. माहितीमायाजालावर मिळालेलं गझलचे पूर्ण रुप पोस्टच्या शेवटी ! 

गज़ल ह्या प्रकाराविषयी मी पुर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यामुळं ही पोस्ट ह्या गझलेच्या सौंदर्याविषयी नाही तर त्यातील प्रेमिकांच्या एकंदरीत मानसिकतेविषयी आहे. पण बऱ्याच वेळा गझल प्रकार हा प्रेमिकांचे दुःख घेऊन येतो असं वाटत राहतं. प्रियकर असो वा प्रेयसी, प्रेमात पडल्यावर जाणवणाऱ्या दुःखाची गहराई जितकी दाट तितकं प्रेम कदाचित खुलून उठत असावं ! 

उर्दू भाषा अलंकारिक, भारदस्त शब्दांनी श्रीमंत ! शब्दाच्या मूळ अर्थाला आपल्या भारदस्ततेचं कोंदण घालून वाचकाच्या कल्पनाशक्तीला पंख फुलवणारी ! त्यात माझ्यासारख्या बऱ्याच मराठी भाषिकांना उर्दू भाषेचं खोलवर ज्ञान नसल्यानं आदर ठायी ठायी भरुन राहतो ! प्रेमिकेनं गायलेली वा तिच्यावर चित्रित झालेली आणि लक्षात राहिलेली गझल म्हणजे रझिया सुलतान चित्रपटातील हेमामालिनीवर चित्रित झालेली ऐ दिल-ए-नादान ! बाकी सर्व माझ्यासारख्या वरवरच्या रसिकाला माहिती असलेल्या गझला ह्या प्रियकरांचे मनोगत व्यक्त करणाऱ्या आहेत ! 

मी इथं जे काही म्हणणार आहे त्याला अपवाद आहेत पण गज़ल गाणारे बरेचसे प्रियकर प्रेमात दुःखानं होरपळलेले असतात. बऱ्याच वेळा ह्या प्रियकरांना दुनियेची व्यावहारिक गणितं जमलेली नसावीत, त्यांच्याकडं फारशी पुंजी नसावी. त्यामुळं प्रेमिकेच्या गल्लीत निरर्थक फिरणं वगैरे प्रकारांत ते आपला वेळ व्यतित करत असतात. 

प्रेमात पडणं म्हणजे आयुष्यात दुःखाची १००% खात्री असा एकंदरीत ग्रह ह्या गझला ऐकुन झाल्यास नवल नसावं. प्रेमिकेशी निकाह / विवाह करण्यात यश आल्यास तिच्या ज्या रुपावर भाळून लग्न केलं त्या रुपापेक्षा तिचं वेगळं रुप समोर आल्यानं हा निष्पाप जीव दुःखमय होऊन जातो. परंतु विवाह केल्यानंतरच्या आयुष्याचे वर्णन करणाऱ्या गझला क्वचितच माझ्या वाचनात आल्या आहेत ! त्याची कमी हल्ली सोशल मीडियावरील विनोद भरुन काढत असावेत. 

प्रेमिकेच्या प्रतीक्षेत घालवलेला वेळ किंवा प्रेमिका दुसऱ्या कोणाची झाल्यास मात्र प्रियकरांचे / गझलकारांचे शब्दवैभव फुलून येते. प्रियकराचं हृदय हा ह्या सर्व प्रक्रियेतील महत्तम दुःख सहन करणारा जीव ! ह्या हृदयाच्या दृष्टिकोनातून पाहिलं असता प्रेयसीसाठी कातिल / जालीम वगैरे शब्दरचना योग्यच ठरतात. ह्या शब्दांसाठी मराठी भाषा कदाचित रुक्ष वाटते. प्रेमिकेला पाषाणहृदयी वगैरे शब्द वापरले जात असावेत पण हृदयाला त्रास देणारी (जसं की कातिल) ह्या अर्थाचे शब्द आढळत नाहीत ! कदाचित मला माहिती नसावेत ! 

प्रेमिकेच्या गल्लीचं आणि प्रियकराचे  खास नाते असावे! इथं जशा काही मधुर आठवणी जोडल्या आहेत तशाच काही कठोर क्षणांना सुद्धा प्रियकराला सामोरे जावं लागलं आहे 

बहुत बे-आबरू होकर तेरे कूचे से हम निकले

प्रियकराचे हृदय हा ह्या सर्व प्रकाराला कारणीभुत असलेला घटक ! प्रियकराच्या सर्व आशाआकांक्षा, स्वप्नं हजारोंच्या संख्येनं इथंच जन्म घेतात. एकेक स्वप्न पूर्ण करायला जावं तर दम निघावा अशी परिस्थिती ! तरीही हे कमीच असं ह्या प्रियकराला वाटत राहतं. 

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले

प्रेमात होरपळलेला असला तरी ह्या प्रियकराचा आत्मविश्वास शाबूत असतो. 

मगर लिखवाये कोई उसको खत तो हमसे लिखवाये

एकंदरीत दुःख खुप झालं की मद्याच्या प्याल्यामध्ये स्वतःला आणि त्या दुःखाला बुडवून टाकण्याव्यतिरिक्त दुसरा कोणता उपाय ह्या प्रियकरापुढं नसावा !  ह्या मद्याच्या प्याल्यामध्ये आकंठ बुडल्यानंतर एकंदरीत दुःख हवंहवंसं वाटत असावं. 

हुई इस दौर में मनसूब मुझसे बादा-आशामी

फिर आया वो जमाना जो जहाँ से जाम-ए-जम निकले

आता मग तलवार, जखमा वगैरेचा उल्लेख येणं क्रमप्राप्तच आहे. बात हृदयाची आहे ना !

हुई जिनसे तव्वको खस्तगी की दाद पाने की

वो हमसे भी ज्यादा खस्ता-ए-तेग-ए-सितम निकले

 त्यानंतरची  स्थिती म्हणजे जीवनमारणातील फरकाची चिंता न वाटणे. जर तु मिळाली नाहीस तर ह्या जगण्याला काय अर्थ बरे, त्यापेक्षा मृत्यूच परवडला वगैरे वगैरे ! जिच्या दर्शनानं जगण्याला अर्थ प्राप्त होतो तिच्याच प्रतीक्षेत माझा दम सुद्धा निघेल की काय अशी परिस्थिती निर्माण होते ! 

मुहब्बत में नहीं है फ़र्क जीने और मरने का
उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले

जगात ज्या काही सुंदर गोष्टी, कलाकृती आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करावा असा आविष्कार मला हल्लीहल्ली झाला. ह्याचाच परिणाम म्हणजे काल ऐकलेल्या काही गझला !  गझला वगैरे प्रकारात आवडलेल्या गोष्टीसाठी झोकून देणाऱ्या माणसांचं वर्णन असतं. दुःखाच्या उदात्तीकरणात प्रेमही खुलून उठतं ही मानसिकता जाणवते. आपण पडलो पुरते व्यावहारिक ! ही पोस्ट जशी संपत आली तसं वरिष्ठ लोकांनी हल्लीच दिलेला संदेश आठवला! 

Don't come only with the problem, tell me what you think would be the probable solution! 

झालं!! मिर्झा गालिब भेटला तर त्याला हा संदेश सांगायचा आहे. "बाबा, तुझं दुःखाचं कोडकौतुक पुरे झालं! आता ह्यावर उपाय काय ते सुद्धा सांग !"


असो माहिती मायाजालावर मिळालेलं ह्या नितांतसुंदर गझलेचं पुर्ण रूप !

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले

- मिर्जा गालिब (Mirza Ghalib)

 

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले

बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले

 

डरे क्यों मेरा कातिल क्या रहेगा उसकी गर्दन पर

वो खून जो चश्म--तर से उम्र भर यूं दम--दम निकले

 

निकलना खुल्द से आदम का सुनते आये हैं लेकिन

बहुत बे-आबरू होकर तेरे कूचे से हम निकले

 

भ्रम खुल जाये जालीम तेरे कामत कि दराजी का

अगर इस तुर्रा--पुरपेच--खम का पेच--खम निकले

 

मगर लिखवाये कोई उसको खत तो हमसे लिखवाये

हुई सुबह और घर से कान पर रखकर कलम निकले

 

हुई इस दौर में मनसूब मुझसे बादा-आशामी

फिर आया वो जमाना जो जहाँ से जाम--जम निकले

 

हुई जिनसे तव्वको खस्तगी की दाद पाने की

वो हमसे भी ज्यादा खस्ता--तेग--सितम निकले

 

मुहब्बत में नहीं है फ़र्क जीने और मरने का

उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले

 

जरा कर जोर सिने पर कि तीर--पुरसितम निकले

जो वो निकले तो दिल निकले, जो दिल निकले तो दम निकले

 

खुदा के बासते पर्दा ना काबे से उठा जालिम

कहीं ऐसा हो याँ भी वही काफिर सनम निकले

 

कहाँ मयखाने का दरवाजा 'गालिब' और कहाँ वाइज़

पर इतना जानते हैं, कल वो जाता था के हम निकले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...