साधारणतः जानेवारीच्या अखेरीस परिसरातील जांभुळ, आंबा वगैरे फळझाडं मोहोरांनी बहरुन गेली. हा काळ माझ्या आवडीचा ! अमेरिकेत जो काही मोजका काळ घालवला त्यावेळी घेतलेला हिवाळ्याचा धसका अजुनही मनात कुठेसा रेंगाळत आहे. सायंकाळी चार वाजताच अवतरणारी दीर्घ रात्र काहीसं निराश करून जायची. परंतु जानेवारीनंतर हळुहळू दिवस मोठा होत जातो. तापमानाच्या दृष्टीनं पाहिलं तर फेब्रुवारी सर्वात बोचऱ्या थंडीचा महिना ! ह्यावर्षी आपल्या इथंही तशी चांगली थंडी फेब्रुवारी महिन्यात होती ! तरीही येणाऱ्या उन्हाळ्याचा विचार मनात आशावादाची पेरणी करुन जातो.
आता मुळ मुद्द्याकडं ! मोहोरांनी बहरलेली ही झाडं मला सदैव भूतलावरील जीवसृष्टीच्या जगण्याच्या दुर्दम्य आशावादाचं प्रतीक वाटत राहिली आहेत. पण ह्यातही थोडा विचार केला तर आंबा आणि जांभुळ ह्यात थोडा फरक जाणवतो. आंब्याचं झाड तसं कणखर, लाकुड मजबूत ! तरीही का कोणास ठाऊक आंब्याच्या झाडाला व्यवहार जास्त कळतो असं मला वाटत राहतं ! मोहोराने बहरलेलं आंब्याचं झाड हळुहळू आपल्या मोहोराचा , छोट्या कैऱ्यांचा निरोप घेत राहतं. महिन्या - दोन महिन्यांनी पाहिलं तर हे डेरेदार आम्रवृक्ष आपल्याला झेपेल इतक्याच आपल्या बाळांचा संसार घेत दुनियेच्या कौतुकाचं लक्ष बनुन मिरवत असतात.
जांभळाला व्यवहार कळत नाही ! आपल्या बाळांवर त्याची वेडी माया ! जांभळाच्या फुलाचं हे एक मोहक चित्र !
पण एका क्षणी हा भार ह्या जांभळाला सोसत नाही. कसलंतरी निमित्त होतं आणि हे प्रेमळ झाड,त्याची फांदी ह्या ओझ्यानं आपल्यावर गुण्यागोविंदानं नांदणाऱ्या विविध अवस्थेतील जांभळासकट खाली येते !
मनुष्याला ह्या साऱ्याच काही सोयरसुतक नसतं ! मनुष्य ह्या बाळांना टोपलीत गोळा करुन, फोटो काढुन सर्वत्र मिरवून घेतो आणि आपली जांभुळफळाची आवड पुरवून घेतो!
वेड्या जांभळा - तुला व्यवहार काही कळलाच नाही !
(तज्ञांनी दिलेल्या टिपणीनुसार संपुर्ण पोस्टमध्ये जांभुळाऐवजी जांब असे वाचावे ही विनंती !)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा