सध्या मी Chess.com ह्या संकेतस्थळाचे सदस्यत्व पत्करले आहे. इथं एका वेळी तीन - चार लाख सदस्य ऑनलाईन असतात. दिवसाला लाखोंच्या संख्येनं सामने खेळले जातात.
सध्या मी दहा मिनिटांच्या अवधीचे खेळ खेळतो. इथं आपण खेळण्याची इच्छा व्यक्त करण्याचा अवकाश की ही साईट आपणासाठी एक आपल्या तोडीचा एक प्रतिस्पर्धी निवडते आणि सामना सुरु होतो. सध्या माझा स्कोर १३०० आणि १४०० च्या मध्ये घुटमळतो आहे. त्यामुळं प्रतिस्पर्धी सुद्धा त्याच गुणवत्तेचे येतात. माझा खेळ सुधारावा म्हणुन मी सध्या बुद्धिबळाचे यु ट्यूबवर व्हिडिओ पाहत आहे. गुगलवर सर्च सुद्धा करत आहे. ह्यातुन समजलेल्या आणि बुद्धिबळाच्या काही मुलभूत संकल्पना !
Disclaimer - १३०० चे गुणांकन हे सरासरी खेळाडूचे गुणांकन मानलं जात असल्यानं ह्या खालील संकल्पना केवळ प्राथमिक माहिती म्हणुनच वाचाव्यात !
१. बुद्धिबळात सुरुवातीच्या खेळीच्या काही विशिष्ट साचेबद्ध पद्धती असतात. त्यांना Standard Opening म्हणुन संबोधिले जाते. जगातील आघाडीच्या खेळाडुंनी अशा ह्या साचेबद्ध पद्धतीचा खुप खोलवर अभ्यास केलेला असतो. सुरुवातीच्या पंधरा - वीस खेळी ह्या Standard Opening चा भाग असु शकतो. अशा वेळी हे दोन्ही खेळाडु प्रचंड वेगानं सुरुवातीच्या ह्या खेळी खेळतात. आता इथं दोन्ही खेळाडु त्या Standard Opening नुसार खेळत असणार हे अभिप्रेत असतं. इथं समजा एखाद्या नवख्या खेळाडूने एखादी वेगळीच खेळी केली तर अनुभवी खेळाडु त्या खेळीतील त्रुटीचा फायदा घेत त्या नवख्या खेळाडूला नामोहरम करु शकतो!
२. सुरुवातीच्या काही खेळींमध्ये बुद्धिबळाच्या पटाच्या मध्यभागी असलेल्या चार घरांवर ताबा मिळविणे हे ध्येय असते.
सुरुवातीला वजीर बाहेर काढण्याची पद्धत फारशी अवलंबली जात नाही. त्यामुळं राजा, वजीर ह्यांच्या समोरील प्यादी, उंट आणि घोडे ह्यांच्या मदतीने ह्या चार घरांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. Four Knight Opening ही ह्याच प्रकारात मोडणारी साचेबद्ध सुरुवात !
बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक घराला एक विशिष्ट नाव असते. डाव्या कोपऱ्यातुन उजवीकडे a,b,c,d,e,f,g,h अशी नावे दिली जातात. खालुन वर रांगांना १-२-३-४-५-६-७-८ अशी नावं दिली जातात.
कधीतरी मान्यवर खेळाडु सुरुवातीच्या खेळांमध्ये आपल्या एका प्याद्याचा बळी देऊन नंतरच्या खेळासाठी अनुकूल जागा काबीज करण्याचा प्रयत्न करतात. त्याला Queen / King's Gambit असे संबोधिले जाते.
केंद्रीय चार घरांवर ताबा मिळविण्यासाठीच्या खेळ्या खेळुन झाल्या की खेळाडु आपल्या हद्दीपलीकडील पुढील दोन रांगांवर आपल्या सोंगट्या हलविण्याचा किंवा आपल्या सोंगट्यांद्वारे त्या रांगांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करु लागतात.
प्यादी हे बुद्धिबळातील महत्वाचं सोंगटे आहे. ह्या प्याद्यांनी रांग बनविली तर ती प्रतिस्पर्धी खेळाडूसाठी डोकेदुखी बनु शकते.
बुद्धिबळाचे वेळेच्या बंधनानुसार वेगवेगळे प्रकार करण्यात आले आहेत.शीघ्रगतीच्या (रॅपिड चेस) बुद्धिबळाच्या खेळात तुम्हांला वेळेच्या मर्यादा लक्षात घेऊन झटापट खेळ्या खेळाव्या लागतात. इथं आघाडीचे खेळाडु मनातल्या मनात पुढील पाच सहा खेळ्यांचा विचार करु शकतात. इथं permutation and combinations प्रकार लक्षात घ्यावा लागतो. ह्या शक्यतांची वेगानं आणि अचुकतेनं विचार करण्याची तुमच्या मेंदुची क्षमता जितकी जास्त तितके तुम्ही चांगले खेळाडु असता !प्याद्यांना १, उंट - घोड्यांना प्रत्येकी ३ गुण, हत्तीला ५ गुण, वजिराला नऊ गुण असे गुणमापन केले जाते. तरीही दोन हत्तीच्या बदल्यात वजीर देणे हा काही नेहमीच फायद्याचा सौदा असतोच असे नाही. बुद्धिबळाच्या खेळात आरंभीचा खेळ, मध्य सत्रातील खेळ आणि शेवटाचा खेळ अशा दृष्टीनं सुद्धा पाहिलं जाऊ शकते. वजीर ही अत्यंत महत्वाचे सोंगटी असल्यानं मध्य सत्रापर्यंत त्याला आपल्या अर्धभागात ठेवणं राजमान्य मानलं जात असावं.
राजाला सुरक्षित ठेवणं हा बुद्धिबळाच्या खेळातील महत्वाचा हेतु! त्यामुळं किल्ला करणे ही एक खास खेळी बुद्धिबळात आहे. किल्ला करण्याआधी राजाने एकसुद्धा हालचाल केली नसावी. किल्ला हा पटाच्या दोन्ही बाजुंना करता येतो. जरी किल्ला करण्यानं राजा सुरक्षित होत असला तरी त्याच्यासमोरील प्याद्यांवर हल्ला करुन प्रतिस्पर्धी तुम्हांला बेजार करु शकतो. त्याप्रमाणं किल्ला केलेल्या राजासमोरील एकही प्यादं हलविले नसेल तर त्याच्या रांगेत येऊन हत्ती अथवा वजिराने शह दिल्यास चेकमेट होण्याची शक्यता असते !
घोडा हा अडीच घरे जातो. घोडा हे एकमेव सोंगटे असे आहे की त्याच्या खेळीला वजिराकडे पर्यायी उत्तर नसते. म्हणजे उंटाची तिरपी चाल, हत्तीची सरळ चाल, प्याद्याचे एक घर तिरपे आक्रमण ह्या सर्वांच्या कक्षेत वजीर आला तर तो प्रतिहल्ला चढवु शकतो. परंतु घोड्याची चाल वजीर प्रतिआक्रमणाने मोडु शकत नाही. सर्वात धोकादायक खेळी म्हणजे घोडा अशा घरात येणे जिथुन तो राजाला शह आणि वजिरावर आक्रमण करु शकतो. अशावेळी घोडयाला मारता आले नाही तर आपणास वजीर गमवावा लागतो. त्यामुळं घोडा मध्यरेषेच्या पलीकडे आला की त्यावर खास लक्ष ठेवले पाहिजे !
बाकी प्यादी एक एक घर पुढे सरकत अंतिम रेषेपर्यंत पोहोचली की तिचा वजीर, हत्ती, उंट, घोडा वगैरे करण्याची मुभा आपणास असते. त्यामुळं प्यादं सहाव्या रांगेत पोहोचले की त्यावर विशेष लक्ष द्यावे.
एका रांगेत असलेले दोन हत्ती विशेष ताकदवान असु शकतात. ते समोरच्या वजिराला सुद्धा धमकी देऊ शकतात. खेळ ज्यावेळी शेवटच्या टप्प्यात पोहोचतो त्यावेळी प्रतिस्पर्धी चेकमेट होण्यासाठी तुमच्याकडे विशिष्ट सोंगट्या असाव्या लागतात.
१) राजा + वजीर
२) राजा + हत्ती
३) राजा + दोन उंट
४) राजा + दोन घोडे
ह्या सर्व प्रकारात स्टेलमेट नावाचा सुद्धा एक प्रकार असतो. राजाला शह दिला नसताना सुद्धा जर त्याला हलण्यासाठी घर उपलब्ध नसेल तर स्टेलमेट होतो. आपली नाजुक परिस्थती असताना स्टेलमेट करुन घेणे ही कौशल्याची बाब आहे.
बुद्धिबळ का खेळावं? विविध शक्यतांचा वेगानं अभ्यास करुन त्यातील योग्य शक्यता ओळखता येण्यासाठी, एकाग्रता वाढविण्यासाठी नक्कीच ह्या खेळाचा उपयोग होतो. तणावाखाली सुद्धा समतोल बुद्धीनं विचार करण्याची सवय होण्यास मदत होते. ह्या पोस्टमध्ये आधी आपण स्टॅंडर्ड ओपनिंग्स हा प्रकार पाहिला. ह्यात तुम्हांला ह्या खेळ्या लक्षात ठेवाव्या लागतातच परंतु प्रतिस्पर्धी खेळाडूने जर त्यात एखादा बदल घडवुन आणला तर त्यालाही प्रतिखेळी तात्काळ शोधता यायला हवी !
आता माझं chess.com मधील भविष्य काय? गेल्या आठवड्यात मी ही साईट जॉईन केली. सुरुवातीला १२०० - १३०० गटातील खेळाडूंचा मुकाबला करणे सोपं गेलं. पण आता १३०० - १४०० गटातील खेळाडु खुप तयारीनिशी येत आहेत. ह्यात एक शक्यता अशी आहे की प्रत्येक सामन्यातील चुका जर का मी लक्षात ठेऊ शकलो तर मी पुढे जाईन ! नाहीतर ....
© आदित्य पाटील
(प्रतिमा माहितीआंतरजालावरुन साभार !)