मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

आयुर्वेदिक तेल - पुर्वतयारी














सालाबादप्रमाणे होणाऱ्या व्यवस्थापकीय मंडळींच्या चिंतन सोहळ्याला यंदा करोनाच्या कृपेने घरुन हजेरी लावली. भारतातील तीन शहरे आणि अमेरिकेतील तीन भिन्न टाईम झोन मधील मंडळी उपस्थित होती. ह्या व्हर्च्युअल सोहळ्यामुळं काही अधिक गोष्टींसाठी नियोजन करावं लागलं.  पाच दिवसांत साधारणतः ३० जणांनी आपल्या प्रेसेंटेशनचे  झुमवर सादरीकरण केले. जवळपास शंभर मंडळी आपल्या प्रेसेंटेशनवर लक्ष ठेवून असताना समजा अचानक आपल्या इंटरनेट पुरवठादाराला कंटाळा आला व  काहीशी गंमत करावी वाटली तर आपलं इंटरनेट जोडणी गटांगळ्या खाणार आणि आपण झुमवर स्तब्ध आणि निशब्द होणार!  मग अशावेळी दोन तीन सेकंदात आपल्या साथीदाराने लगेचच आपण बोलत असतो तो दुवा घेऊन लगेच बोलायला सुरुवात करायला हवी ! वगैरे वगैरे ! 

काही गोष्टी चांगल्या सुद्धा झाल्या.  उगाचच खाण्याचा अतिरेक टळला. सहकाऱ्यांना सोबत म्हणुन आपण कोकचे ग्लासच्या ग्लास रिचवतो तेही टळले. प्रेसेंटेशननंतर प्रत्येक टेबलवर खोल उडी (Deep Dive) म्हणुन जे चर्चासत्र असतं त्यात वेळेचे बंधन पाळायला फार कठीण ! पण झुमच्या ब्रेकआऊट विंडोंना लोकांच्या उच्चपदाची वगैरे काही चिंता नव्हती. त्यामुळं ठरलेल्या मिनिटाला कोणीही कितीही तावातावाने बोलत असो, लोकांना मुख्य रूममध्ये परत आणुन सोडलं जात होतं. 

ह्या सगळ्याचा साईड इफेक्ट घरी झाला. घरचे वातावरण मी अगदी गंभीर करुन टाकले. सर्वांना मोठ्यानं बोलायला वगैरे बंदी घालण्यात आली. कर्फ्युच लावला म्हणा ना ! पण जसजसा आठवडा पुढे सरकु लागला तसतसा घरच्या सदस्यांचा संयम ढळु लागला. तुझं तु बघुन घे वगैरे संवाद होतील की काय अशी शंका निर्माण झाली. शेवटी एकदाचा शुक्रवार उजाडला आणि मावळला देखील ! परिसंवादाची यशस्वी सांगता झाली. आता सर्वासमोर होताना सांगता यशस्वीच होते. खरं काय ते नंतर सविस्तर कळेलच ! 

शुक्रवार संपला तसं आठवडाभरातील कृत्यांचा जाब देण्याची वेळ आली.  Quality Time, Team Building activity वगैरे शब्दांचा वर्ड क्लाऊड माझ्याभोवती काल रात्रीपासुन पिंगा घालु लागला. सुरुवात मुलानं केली. तो सध्या ऑनलाईन बुद्धिबळ खेळतोय. काही स्टँडर्ड खेळींचा अभ्यास वगैरे करतोय. बऱ्याच दिवसांनी त्याच्याशी खेळत होतो. त्यानं कोणत्या तरी चांगल्या सुरुवातीचा अवलंब केला. पण चौथ्या पाचव्या खेळीत मी पुर्णपणे अनपेक्षित खेळी केली. तोच प्रकार मी पुढील काही खेळीत केला! तो खूप वैतागला! "बाबा हे बरोबर नाही ! ते कसे स्टॅंडर्ड खेळीच खेळतात ?" ! "अरे पण मला त्या स्टॅंडर्ड वगैरे काय म्हणतात त्या खेळी माहीतच नाहीत ! मग?" मी म्हणालो. त्या वैतागानेच बहुतेक तो हरला. Quality Time मधला Quality वर्ड क्लाऊड मधुन अंधुक होत गायब झाला. 

आज सकाळी Team Building activity घोषित करण्यात आली! आपण आयुर्वेदिक तेल बनवुयात असे घोषित करण्यात आले. तसं काहीतरी वेगळा प्रयोग होणार आहे ह्याची चाहुल काल बाजारात जाताना १०० ग्राम कलौंजी आणा असं सांगितलं त्यावेळीच लागली होती. हल्ली नवीन मराठी / हिंदी शब्द माहिती होण्याची वेळ क्वचित येते ! काल ती कलौंजीने आणली !

आयुर्वेदिक तेल बनविण्यासाठी लागणारी कच्ची सामुग्री !

मोहरी 

मेथी दाणे 

लवंग 

आवळा 

कांदा (खिसलेला)

मेंदीची पाने 

जास्वंदीची पाने 

जास्वंदीची फुले 

तुळशीची पाने 

ब्राह्मि 

माका 

कडीपत्ता 

दुर्वा 

ह्यातील जास्वंदीच्या पानांपासून पुढील गोष्टी गोळा करण्याचा Team Building Activity मध्ये समावेश करण्यात आला होता. जास्वंदीची पाने, फुले, कडीपत्ता आणि दुर्वा ओळखायला सोप्या! पण ब्राह्मी, माका ह्यांनी जरा मेहनत करायला लावली! शनिवार सकाळ असल्यानं ओ माकारीना गाणे सुद्धा आठवलं. पण सर्व गोष्टी एकत्र झाल्यावर त्यांचे एकत्रित दर्शन डोळ्याला सुखावुन गेले! 

कच्ची सामुग्री गोळा करुन देण्यापुरता माझा Team Building Activity मधील सहभाग मर्यादित होता असं गृहीतक मी केलं आहे! जर पुढील काही दिवसांत  आयुर्वेदिक तेल - एक प्रयोगशाळा अशी पोस्ट आली तर हे गृहीतक चुकीचं होतं हे सुज्ञांनी समजुन जावं !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...