मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

अलविदा माही !



 

काळाचा महिमा अगाध आहे ! यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावरील प्रत्येकाला कधी ना कधी शिखरावरुन पायउतार व्हावं लागतं ! कधी हे सत्य स्वखुशीनं स्वीकारलं जातं तर कधी ते तुम्हांला स्वीकारावं लागतं ! शंभर कोटींहून अधिक लोकसंख्येच्या क्रिकेटवेड्या देशातील जनतेच्या मनावर  बारा ते चौदा वर्षे राज्य करणं कोण्या येरागबाळ्याचं काम नाही ! माही, गेल्या अनेक वर्षांतील मनावर कोरुन ठेवलेल्या स्मृतींबद्दल शतशः धन्यवाद !

तु खेळाडु आणि कर्णधार दोन्ही पातळ्यांवर जिंकलास ! जागतिक पातळीवरील स्पर्धा जिंकणं म्हणजे एक महायज्ञ असतो ! तुमच्याकडील संघातील वैयक्तिक गुणवत्ता, संघभावना आणि मोक्याच्या क्षणी मैदानावरील परिस्थिती ध्यानात घेऊन अचुक निर्णय घेता येण्यासाठी आवश्यक असणारी चाणाक्ष बुद्धी ह्या सर्वांचा मिलाफ जुळून यावा लागतो!  तु हा मिलाफ एकदा नव्हे तर तीनदा जुळवून आणलास ! 

२००७ साली संपुर्ण राष्ट्र काही महिन्यांपुर्वी विश्वचषक स्पर्धेत झालेल्या अनपेक्षित पराभवानं दुःखाच्या गर्तेत ढकललं गेलं होतं. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या उदघाटनाच्या  T20 विश्वचषक स्पर्धेत दिग्गजांना विश्रांती देण्याचं धाडस निवड समितीनं दाखवलं ! काहीशा नवख्या खेळाडुंना घेऊन तु आफ्रिकेत गेलास. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका सारख्या बलाढ्य संघांना हरविण्याची किमया तू आणि तुझ्या संघानं घडवुन आणली ! त्यात युवराज, गौतम, रोहितने तुला मोलाची साथ दिली ! अंतिम सामन्यात तुझ्या कप्तानपदातील भविष्यात वारंवार दिसुन आलेल्या एका महत्वाच्या गुणाची झलक आम्हांला प्रथम दिसली ! ती म्हणजे संघातील नवख्या खेळाडूंवर तु दाखवलेला विश्वास ! १५७ सारख्या माफक धावसंख्येचा बचाव करताना आर. पी. सिंग आणि इरफान पठाण ह्यांनी खरंतर सामना भारताच्या बाजुनं झुकवला होता. पण मग मिस्बाहच्या फटकेबाजीनं सामन्याचे चित्र पुरतं पालटलं होतं. अशा वेळी शेवटच्या षटकात नवख्या जोगिंदरच्या हातात चेंडु सोपविण्याचे धाडस तू दाखविलेस आणि त्या पुढं जे काही घडलं तो एक अविस्मरणीय इतिहास होता !

२०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत चित्र वेगळं होतं. मायभुमीवर खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत तु एका बलाढ्य संघाला घेऊन उतरला होतास! संघात प्रथितयश खेळाडूंचा भरणा होता. फलंदाजीसाठी खास अनुकूल खेळपट्ट्या बनविल्या गेल्या होत्या. २००७ सालच्या विश्वचषकातील अनपेक्षित पराभवाच्या आठवणी पुसून काढायच्या होत्या ! अजुन एका अपेक्षाभंगाचे दुःख पचविण्याची तयारी ह्या १२० कोटींच्या देशाकडे नव्हती. इथंही तु ह्या कसोटीला पुरेपूर उतरलास ! युवराज ह्या विश्वचषक स्पर्धेत अगदी नजर लागण्याइतका उत्कृष्ट खेळला ! फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ह्यात त्यानं तुला पुरती साथ दिली. सचिन, विरु, गौतम, नुकतास उदयाला येऊ लागलेला विराट ह्यांनी सुद्धा आपला हातभार लावला. उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलिया, उपांत्य फेरीत मानसिक कणखरतेची कसोटी पाहणारा पाकिस्तान संघ ह्या सर्वांना तु आणि तुझ्या शिलेदारांनी हरविले ! पण अंतिम फेरीतील विजय फक्त तुझा आणि तुझाच होता ! शतकाजवळ आलेला गौतम ज्यावेळी तंबुत परतला त्यावेळी श्रीलंका आणि विश्वचषक ह्यांच्यामध्ये फक्त तु आणि युवराज होतास ! तू नाबाद ९१ धावांची अविस्मरणीय खेळी खेळलास ! मायदेशातील विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकताना  एक कर्णधार म्हणुन प्रतिस्पर्धी संघाच्या वेगवान गोलंदाजाला थेट समोर षटकार मारण्याचं धारिष्ट्य तुझ्यात होतं ! प्रत्येक भारतीय क्रिकेटरसिकाच्या हृदयात हा क्षण कायमचा कोरला गेला ! २०१३ सालाची ICC Champions Trophy सुद्धा तू भारताला जिंकुन दिलीस ! ह्या तिन्ही महत्वाच्या जागतिक पातळीवरील स्पर्धा जिंकुन देणारा कर्णधार म्हणुन तू आपलं नाव इतिहासात नोंदविलंस  ! कसोटीमध्ये सुद्धा तु  कप्तानपद भूषविलंस आणि काही संस्मरणीय विजयांची नोंद केलीस ! 

तु जसा थंड डोक्याचा कर्णधार होतास तसाच तु धाडसी आणि कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता बाळगुन असणारा खेळाडु होतास ! तु कोणत्याही खेळाडूच्या प्रतिष्ठेचं ओझं बाळगलं नाही, मग तो प्रतिस्पर्धी संघातला खेळाडु असो वा स्वतःच्या ! कठोर संदेश देण्यात माहीर असा कप्तान म्हणुन तू नावलौकिक मिळविलास ! पण इथं कोणत्यातरी एका क्षणी तु काहीसा स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात पडल्यासारखा वाटलास ! संघात काही खरोखर सभ्यतेचे मूर्तिमंत पुतळे असणारे खेळाडु होते. त्यांच्या निवृत्तीचे अनुभव काहीसे क्लेशदायकतेकडं झुकले असं मला वाटलं ! त्याला तु काही एकटा जबाबदार नसशील पण त्यांना चांगली वागणूक देता आली असती असं राहुन राहुन वाटलं !

सामना जिंकण्यासाठी चौकार, षटकार, बळी हे धावफलकांवरील नायक ! ह्या नायकांच्या प्रेमात पडलेल्या भारतीय संघाला आणि चाहत्यांना त्या मानसिकतेतुन बाहेर काढण्यात तु मोलाचा वाटा बाळगलास ! शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर Running Between the Wickets, अप्रतिम क्षेत्ररक्षण ह्या माध्यमातुन सुद्धा धावा वाचवता येतात, सामने जिंकता येतात हे तू दाखवुन दिलेस ! कमीत कमी धोका घेऊन सामन्याचा कल आपल्या बाजुने झुकविण्याकडे तुझं प्राधान्य होतं ! एक यष्टीरक्षक म्हणुन तू जबरदस्त होतास आणि आहेसुद्धा ! मर्यादित षटकांच्या सामन्यात निकराच्या क्षणी चोरटी बाय धावुन काढणाऱ्या फलंदाजांना तुझ्या नेमबाजीचा धाक सदैव राहिला ! 

तु क्रिकेटसेन्सचा सर्वोत्तम मेंदु बाळगुन होतास ! प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाच्या शैलीचा अभ्यास करुन तू तुझ्या मिश्किल भाषेत गोलंदाजांना उपयुक्त सल्ले दिलेस ! असे काही व्हिडिओ पाहताना तुझ्या वाणीने हास्याचे फवारे उडतात !  हाती उपलब्ध असलेल्या मोजक्या Third Umpire Review (DRS) चा कसा वापर करावा ह्या बाबतीत तुझा निर्णय क्वचितच चुकला ! त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाच्या कोणत्या गोलंदाजांला लक्ष्य करुन त्याच्यावर आक्रमण करायचं ह्याचं गणित तुझ्या डोक्यात पक्के बसलेलं असायचं ! वाढत्या धावगतीचं तु कधी दडपण घेतलं नाहीस कारण तुझा स्वतःच्या क्षमतेवर असलेला प्रचंड विश्वास ! 

२०१५ सालचा ऑस्ट्रेलियातील विश्वचषक! साखळी सामन्यात भारतानं दृष्ट लागण्यासारखी कामगिरी केली होती ! साखळीतील सर्व सामने जिंकुन उपांत्य फेरीत आपण दिमाखात दाखल झालो होतो ! पण उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३२८ धावांचा डोंगर उभा केला ! सुरुवातीच्या आशादायक सलामीनंतर रोहित, धवन, विराट तंबुत परतले ! तू ६५ धावांची खेळलास खरा, पण विजयाकडं तु घेऊन जाशील असं कधीच त्या खेळीत वाटलं नाही! त्या पराभवाचं दुःख तर आम्ही पचविले पण मग हे वारंवार घडु लागलं ! कदाचित वयोमानानुसार तुझ्या हालचाली थोडयाफार मंदावल्या होत्या. ह्या बाबतीत अगदी निष्ठुर असलेल्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना ही गोष्ट समजली नसती तरच नवल ! हळूहळू आपल्या मर्जीवर सामना संपविण्याची तुझी क्षमता कमी होत चालली ! गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर टिकून राहुन चांगली धावसंख्या उभारण्याची क्षमता अजुनही तू बाळगुन आहेस! पुन्हा एकदा २०१९ चा विश्वचषक ! साखळीतील उत्तम कामगिरीनंतर उपांत्य सामन्यात न्यूझीलंड सामोरे होते ! गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्टीवर किवींना आपण २३९ धावांत रोखले खरे पण आघाडीचे फलंदाज ३ फलंदाज ५ धावांत बाद झाले. तू आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली खरी पण संपुर्ण भारताच्या आशा जडेजावर अवलंबुन राहिल्या ! जडेजा बाद झाला आणि रसिकांच्या नजरा आणि आशा तुझ्याकडे वळल्या ! तुही एक दोन चमकदार फटके मारलेस पण सामना आवाक्याबाहेर गेला होता हे तुझ्या देहबोलीतुन जाणवत होते ! आणि तु धावबाद झालास ! पुर्वीचा धोनी ही धाव घेताना धावबाद कधीच झाला नसता, किंबहुना त्यानं ही धोकादायक धाव न घेता शेवटी एक अधिक षटकार मारण्याचं ठरविलं असतं ! इथं तु धावबाद झालास आणि आता भारतातर्फे तु खेळलेला हा शेवटचा सामना ठरला ! 

IPL मध्ये तु मुंबई इंडियन्सचा प्रतिस्पर्धी असल्यानं त्यांच्याशी खेळताना तु बाद व्हावा अशी इच्छा प्रबळ असली तरी बाकी संघांशी खेळताना तुझ्या फटकेबाजीचा मनमुराद आनंद आम्ही लुटला ! निळ्या धोनीने हृदय जिंकलं तर चेन्नई सुपरकिंग्सवाल्या पिवळ्या गणवेशातील धोनीनं आम्हांला मनोरंजनाच्या आठवणींचा खजाना दिला ! 

बाकी एक माणुस म्हणूनही तू मन जिंकलंस ! सैन्यासोबत वावरलास ! एका छोट्या गावातुन मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमीवरुन येऊन सुद्धा तु कधी वलयांकित दुनियेत परका वाटला नाहीस ! देशभरातील छोट्या छोट्या गावांतील मुलांना मेहनतीवर दृढ विश्वास ठेवण्यास तु मदत केलीस ! 

माही, तू लक्षात राहशील तो २००७ च्या त्या अंतिम सामन्यात जोगिंदरच्या हातात चेंडू सोपविणारा कप्तान म्हणुन, वानखेडेवर विश्वचषक जिंकताना उत्तुंग षटकार टोलविणारा कप्तान म्हणुन आणि 'इसके पैरमे डाल, पॉईंट में हवा में मारेगा !" असे सल्ले देणारा चाणाक्ष यष्टीरक्षक म्हणुन !

Well Played Dhoni!

३ टिप्पण्या:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...