मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

नकार!!




सन १९९x

महिना मार्च

स्थळ - सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वसतीगृह अंधेरी पश्चिम

मुख्य पात्र - आदित्य पाटील - प्रथम वर्ष अभियांत्रिकी

प्रसंग १

होळीच्या रात्री -वसतिगृहातील सर्व विद्यार्थीगण जागरण करुन होळी पेटविण्याच्या अस्सल मूडमध्ये! सर्वजण एक निव्वळ सोपस्कार म्हणुन वसतिगृहाच्या मेसमध्ये रात्रीचे जेवण आटपत होते.

शैलेश - "अरे आज आदित्य एकटाच कोपऱ्यात का बसलाय ? आपल्याकडं पाहत सुद्धा नाही !"

बाकी सर्व मंडळी - "चलो देखते हैं मामला क्या हैं ?"

शैलेश - "आदित्य काय झालं ? आज एकटाच का जेवायला बसला आहेस ? आणि घरी का नाही गेलास होळीला ?"

आदित्य - " अरे बहिणीच्या लग्नाची तयारी घरी जोरात सुरु आहे! अभ्यास होणार नाही घरी ,म्हणुन इथं थांबलोय ! सबमिशन करीन म्हणतोय उद्या !"

शैलेश - "सबमिशन होईल रे ! पण आज रात्री होळी पेटवायला आणि उद्या सकाळी धुळवडीला यायचं बरं का !"

त्याच्या स्वरात गर्भित धमकी ओथंबुन भरली होती !

आदित्य - "नको रे शैलेश, सबमिशन बाकी राहील ! " - हाच तो नकार !

नक्की काय झालं आठवत नाही पण मंडळींचं लक्ष दुसरीकडं गेलं ! रात्री मी होलिकादहनाला गेलो नाही हे ह्या मंडळींच्या ध्यानात आलं नसावं असा सोयीस्कर समज मी करुन घेतला !



प्रसंग २

दुसऱ्या दिवसाची रम्य सकाळ !

सकाळी पावणेसहा वाजता उठून कर्तव्यदक्ष आदित्य पाटील ह्यांनी आंघोळ वगैरे आटपुन घेतली. खोली तळमजल्यावर आणि खोलीला लागुन बाल्कनी ! खोलीबाहेर जाऊन कोणी पाहत नाही ह्याची खातरजमा करुन घेत महाशयांनी खोलीला कुलूप लावलं. आणि सुमडीमध्ये बाल्कनीमधून प्रवेश करुन, बाल्कनीचा दरवाजा आतून घट्ट बंद करुन जग जिंकल्याच्या अविर्भावात महाशय रसायनशास्त्राचा धडा वाचू लागले ! साधारणतः साडेआठ वाजेपर्यंत हा प्लॅन अगदी ११०% यशस्वी झाल्याची लक्षणं दिसत होती. परंतु पावणेनऊच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरुन कल्लोळ सुरु झाला! स्लीपर घालुन जोरजोरात धावत जाण्याचे आवाज येऊ लागले ! ह्यातील पहिला आवाज बाथरुम मध्ये जाऊन बादली भरुन आणण्याचा आणि दुसरा गाढ झोपेत अंगावर थंड पाण्याची बादली ओतल्यावर मनात जे असंख्य भाव निर्माण होतील त्यांना एका सेकंदात शब्दरुप मिळाल्यानंतरचा होता ! तिसरा मजला आटोपला आणि मंडळी दुसऱ्या मजल्यावर आली ! धकधक करने लगा गाणे त्यावेळी आले नव्हते तरी तेच भाव निर्माण झाले ! रसायनशास्त्रातील रसायनांपेक्षा थंड पाणी भयावह असु शकते हे भाव मनी निर्माण झाले !

आणि तो क्षण आला !

शैलेश - "अरे आदित्य लॉक करुन गेला कुठं ?"

साधारणतः भिजलेली पंधरा वीस मंडळी माझ्या रूमच्या बंद दरवाजासमोर उभी होती ! त्यातील ऐशी टक्के लोक मनाविरुद्ध भिजवले गेले असल्यामुळं सूडाच्या भावनेनं पेटले होते !

राजकुमार - "लेकिन आदित्य सुबह कहा नहीं जा सकता !"

राजकुमारच्या ह्या आत्मविश्वासपर शब्दांनी गोंधळ केला ! ही उत्साही मंडळी धावत धावत बाहेर गेली आणि माझ्या गॅलरीत आली ! त्यांच्या ह्या प्रवेशानंतर मी लपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नव्हते ! त्यांनी मला पाहिलं !

आता नाट्य पुन्हा माझ्या दरवाज्यासमोर घडू लागलं !

शैलेश - "आदित्य बऱ्या बोलाने दरवाजा उघड ! नाहीतर तोडायला कमी नाही करणार !"

त्याच्या ह्या शब्दावर अविश्वास ठेवण्याचं काही कारण नव्हतं !

आदित्य - "अरे पण थोडा अभ्यास करायचा आहे !"

माझ्या ह्या उत्तरानं मंडळींचा संयम संपुष्ठात आला! दरवाज्यावर जोरात धडका बसु लागल्या ! दरवाजा तुटू शकतो ह्याची खात्री होताच मी दरवाजा उघडला !

पुढील अर्धा मिनिट भयानक सन्नाटा होता !

राजकुमार - "क्या करने का इसका !"

आदित्य - "एक के बदले दो बादली से भिगाओ !" माझ्या ह्या उत्तरावर मंडळीचे नक्की समाधान होईल ह्याची मला खात्री होती !

आदित्य - "और मुझे एक मिनिट दे दो, मैं ये अच्छा कपडा बदल के आता हूँ !"

स्वराज आणि राजकुमार ह्यांची नेत्रपल्लवी झाली. तिसऱ्या सेकंदाला मी धरणीमातेला समांतर अवस्थेत होतो, आणि माझा प्रवास होस्टेलच्या प्रवेशद्वाराकडे सुरु झाला. तिथं तीन चार मजबुत लोकांनी मला घट्ट पकडून ठेवले. (खरंतर त्यातला एकसुद्धा पुरला असता !) बाकीच्या असंख्य लोकांनी समोर मातीचा खड्डा बनविणे, त्यात दहा - बारा बादल्या पाणी ओतुन दर्जेदार चिखल बनविणे ही सर्व कामं अत्यंत आवडीनं केली !

आणि मग पुढील पंधरा - वीस मिनिटं मला सचैल चिखलस्नान घडविण्यात आलं ! तेव्हाही पहिले दहा मिनिटं उघड्या राहिलेल्या खोलीच्या दाराची चिंता करायची की हे खराब झालेले चांगले कपडे कसे धुवायचे ह्याची चिंता करायची की रसायनशास्त्राचा त्या राहिलेल्या धड्याची चिंता करायची ह्यावर मी विचार करत होतो ! साधारणतः अकराव्या मिनिटाला मला सर्वज्ञानप्राप्ती झाली ! त्यानंतर मला चिखलस्नान घडवायला आलेल्या बेसावध दोघांना मी गनिमी काव्याने चिखलात लोळवले ! आणि त्यानंतर आदित्य त्यांच्यातलाच झाला ! पुढील तीन तास मी माझ्या आयुष्यातील खेळलेल्या एकमेव सिरिअस होळीचा येथेच्छ आनंद लुटला !

आदित्य पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...