आधीच्या भागाच्या लिंक्स
भाग पहिला
https://patil2011.blogspot.com/2020/07/blog-post_21.html
भाग दुसरा
https://patil2011.blogspot.com/2020/07/2.html
आपल्या बॉसचे या महत्वाच्या प्रकरणात लक्ष वेधून घेण्यासाठी बर्नीला बरेच कष्ट करावे लागले. एकतर ६८ वर्षापूर्वी शेवटी लॉगइन झालेले अकाउंटला आता पुन्हा लॉगइन केलं जातं म्हणजे कुठे तरी पाणी मुरत आहे हे बर्नीला नीट समजावून सांगता येत नव्हतं किंवा त्याच्या बॉसला ह्या प्रकरणाचं गांभीर्य कळत नव्हतं. शेवटी एकदाचा बर्नी आपल्या बॉसला आपलं म्हणणं पटवुन देण्यात यशस्वी झाला.
मग मात्र बॉसने झटपट सूत्र हलवुन महाराष्ट्र पोलिसांच्या योग्य त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. शाल्मलीचा प्रवास वेगाने चालू होता. रस्त्यावरील वाहतुक एव्हाना काहीशी तुरळक झाल्यानं गाडी ऑटोपायलट मध्ये टाकण्यासाठी सुद्धा तिला संधी मिळाली होती. त्यामुळे तिचं विचारचक्र जोरात सुरु होतं. तरीही बॅकमिरर मधुन सतत डोकावणाऱ्या गाडीनं तिला काहीसं विचलित करण्यास सुरुवात केली होती. मग तिनं स्वतः गाडीचा ताबा घेऊन थोडा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. पण ही कार तिला ओव्हरटेक करण्याच्या अजिबात घाईत नव्हती.
शाल्मलीचा मेंदू एव्हाना खूपच जागृत झाला होता. तिने आपला पाठलाग केला जात आहे हे तिनं मान्य केलं होतं. आपला पाठलाग पृथ्वीवर तो सुद्धा काहीशा अपरिचित प्रदेशात होत आहे हे तिला पुरेसं धोकादायक वाटलं. काही केलं तरी ती चंद्राची नागरिक होती त्यामुळे तिच्या सुरक्षिततेची प्राथमिक जबाबदारी चंद्रांच्या अधिकाऱ्यांकडे होती. तिनं पुन्हा एकदा गाडी ऑटोपायलट टाकून काही मेसेजेस पाठवले.
शाल्मलीचा पाठलाग करणारा सामंत पुर्ण उत्साहात आला होता. बऱ्याच दिवसांनी एखाद्या सनसनाटी कामगिरीत सहभागी व्हायची संधी त्याला मिळाली होती. परंतु सावजाचं लक्ष न वेधता पाठलाग करण्यात त्याला यश मिळाले नव्हतं. अचानक त्याचा फोन खणखणला. "पाठलाग ताबडतोब थांबवावा!" हा संदेश मिळताच
ठेवणीतले काही शब्द उच्चारून सामंतने पुढील उपलब्ध एक्झिट घेतला. तेथील फूड मॉलमध्ये जाऊन तोआपला राग शांत करीत तो बसला.
सामंतांचा बॉस असणाऱ्या तळेकरचा मात्र भेजा खलास झाला होता. प्रथम
अमेरिकेतून कॉल येऊन त्याला द्रुतगती मार्गावर त्याला आपल्या माणसाला पाठलाग करण्याचे आदेश द्यावे लागले होते. पाठलाग अगदी रंगात येताच मात्र एका तासातच चंद्रावरून एक अशक्यप्राय व्यक्तीने त्याला हुकुमी स्वरात पाठलाग रद्द करण्याचे आदेश दिले होते.
गाडी जशी दिसेनाशी झाली तसे शाल्मलीने सुटकेचा निश्वास टाकला. गुहागरला पोहोचेस्तोवर रात्रीचे दहा वाजले होते. तिनं तिथलं एक छोटेखानी पण चांगलं हॉटेल बुक केलं. फ्रेश होऊन कुतूहल न शमल्यानं शाल्मली पुन्हा नीलाच्या फेसबुक अकाउंटला लॉग इन करती झाली. "हॅलो" नीलाच्या अकाउंटवर कोणीतरी तिला पिंग केले होते. "हाय" शाल्मलीने त्या पिंगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला खरा पण त्यानंतर आपण हे बरोबर केले का या विचारात ती पडली होती. "या अकाउंटवर कोण लॉग इन आहे?" अशी समोरुन विचारणा झाली. ह्या उद्धट माणसाला काय उत्तर द्यावे ह्या विचारात असताना नीलाला प्रत्यक्षात ओळखणारे कोणीतरी अजूनही जिवंत आहे हा विचार तिला काहीसा दिलासा देऊन गेला.
"मी आहे राजेश!" शाल्मलीने धडधडीत खोटं उत्तर दिलं. "आपण कोण आहात?" शाल्मलीने राजेशच्या पडद्याआडून काहीसा धाडसी प्रश्न विचारला. थोडावेळ समोरून काही उत्तर आले नाही. मग आपण कुठे आहात हा प्रश्न तिने विचारला. "मी कोकणात गुहागरला आहे" ह्या उत्तराने तिच्या अंगावर शहाऱ्याची लहर पसरुन गेली. "मी सुद्धा.... " तिच्या तोंडात आलेले हे वाक्य पूर्ण होण्याच्या आधी कोणत्यातरी अद्भुत शक्तीने तिला थांबविलं अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली.
काहीशा भितीनं तिनं घाईघाईनं लॉगआऊट केलं खरं पण तिची उत्सुकता तिला स्वस्थ बसु देत नव्हती. तिनं पंधरा मिनिटांनी पुन्हा लॉगइन केलं. ती व्यक्ती ऑनलाइन नव्हती. शाल्मलीनं नीलाच्या अकाउंटची बारकाईनं तपासणी सुरू केली. आता ज्या व्यक्तीने पिंग केले होते त्या व्यक्तीचे आणि निलाचे बरेच सामायिक मित्र होते. त्या मित्रांच्या यादीवर लक्ष टाकताना एका नावाने तिचे लक्ष वेधून घेतले. सरंजामे नावाची एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीची आणि नीलाची फ्रेंड हिस्टरी पाहताना बऱ्याच गोष्टी शाल्मलीला उलगडत गेल्या होत्या.
सरंजामे आणि नीला कॉलेजच्या जीवनात प्रथम एकत्र भेटले होते. त्यानंतर बहुधा एकत्रही आले होते. परंतु काही कारणाने मध्ये अनेक वर्ष दोघांचा संपर्क नसावा असे एकंदरीत वाटत होते. अचानक २०१९ साली पुन्हा सरंजामे नीलाच्या संपर्कात आला होता. तिथून मग मात्र नीलाच्या जीवनात खळबळ माजण्यास सुरुवात झाली होती. शाल्मली इतक्या सर्व काही विचारात असताना " हॅलो!" पुन्हा एकदा समोरील व्यक्तीने पिंग केले! या व्यक्तीचे नाव होते जोशी. वय वर्षे ८५ म्हणजे नीला आणि शाल्मली या दोघांना जाणणारी सध्यातरी एकमेव व्यक्ती ! "मी इथे कोकणातच आहे, मी उद्या गुहागरला येऊ शकतो!" राजेशच्या अवतारातील शाल्मली म्हणाली. "सकाळी ११ वाजता!" शाल्मलीला आपला विचार बदलण्याची संधी न देता जोशी आजोबा म्हणाले आणि क्षणार्धात गायब झाले सुद्धा !
शाल्मलीला आता मात्र झोप येऊ लागली होती. पण इतक्यात तिला काहीतरी सुचलं ! तिनं एक मेसेज टाकला आणि पाचव्या मिनिटाला तिचा बॉस नॅथनची हॉलॉग्राफिक प्रतिमा तिच्यासमोर अवतीर्ण झाली होती. "शाल्मली, हा काय प्रकार सुरु आहे?" त्यानं काहीशा दरडावणीच्या सुरात विचारलं. "थोडंसं धाडस सुरु आहे इतकंच !" शाल्मली म्हणाली. तो बहुदा कामात खूप गर्क होता. "टेक केअर !" इतकं बोलुन तो गायब झाला ! आणि दमलीभागली शाल्मली सुद्दा दोन मिनिटात झोपी गेली!
त्या छोटेखानी रेस्टाँरंटमध्ये जोशीआजोबांना शोधुन काढण्यास शाल्मलीला फारसा वेळ लागला नाही ! "राजेश!" त्यांच्यासमोर आत्मविश्वासानं जात, मिळवत आणि खुर्ची सरकवत आसनस्थ होत शाल्मली म्हणाली.
"ओह आय सी !" आपल्या चेहऱ्यावरील आश्चर्य लपविण्याचा प्रयत्न करीत आजोबा म्हणाले.
"तु निलाचे अकाऊंट हॅक का आणि कसं केलंस ?" आजोबांनी थेट मुद्द्याला हात घातला.
"कोकणाविषयीच्या माझ्या आकर्षणामुळं मी नीलाताईंच्या अकाउंटपर्यंत पोहोचले ! आणि ... "
"तू करतेस काय? " जोशीआजोबांनी तिला अडवलं ते बहुदा तिच्याकडुन आपल्याला अकाउंटविषयी काही खरी माहिती मिळणार नाही ह्याची खात्री पटल्यानं !
"मी चंद्रावर असते ! आणि बाकी काही सांगु शकत नाही !" शाल्मली म्हणाली.
जोशीआजोबांच्या चेहऱ्यावरील भाव पालटले होते !
"आपण नीलाताईंचे कोण ?" शाल्मलीने प्रश्न विचारला.
"त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध होते!" जोशीआजोबा तुटकपणे म्हणाले. त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरु होती ह्यात शंका नव्हती !
आता पुढं बोलायचं काय ह्याविषयी शाल्मलीला प्रश्न पडला होता !
"त्यावेळचं कोकण किती छान होतं किनई !" तिच्या तोंडुन किनई शब्द ऐकुन जोशीआजोबांइतकीच तीही आश्चर्यचकित झाली होती. आजोबा काही बोलण्याच्या मुडमध्ये नसल्यानं तिचीच गडबड सुरु होती. खरंतर ती एक मितभाषी व्यक्ती होती. परंतु आज काहीतरी आगळंवेगळं घडत होतं! आणि बोलताबोलता
"हे सरंजामे कोण हो ?" हा प्रश्न तिच्या तोंडुन निघाला ! आजोबांच्या चेहऱ्यावरील भाव आता पुर्णपणे पालटले. त्यानंतर त्यांना आलेली खोकल्याची उबळ खोटी आहे हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नव्हती ! त्याचं निमित्त करुन "मी आलो थोड्याच वेळात!" म्हणुन ते घाईघाईनं आतील कक्षात असलेल्या वॉशबेसिन मध्ये गेले !
का कोणास एका अनामिक भितीच्या भावनेनं शाल्मलीला स्पर्श केला होता. "U5435" तिनं नॅथनला मेसेज केला. "मला मदतीची तातडीनं गरज आहे " असा त्याचा अर्थ होता. नॅथन इतक्या त्वरित कशी मदत करणार ह्याविषयी तिच्या मनात शंका होतीच! घाईघाईनं तिनं रेस्टॉरंटमधुन काढता पाय घेतला.
"गुड मॉर्निंग !" बाहेर उभ्या असलेल्या एका देखण्या युवकानं तिला साद दिली. साडेअकरा वाजता एकट्या दुकट्या तरुणीला पाहुन गुड मॉर्निंग करणाऱ्या तरुणांविषयी २०९० साली सुद्धा तरुणींच्या मनात काही सॉफ्ट कॉर्नर असण्याची शक्यता कमीच होती ! पण प्रसंग वेगळा होता. शाल्मली त्या तरुणासोबत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्याच्या कारकडं चालु लागली होती !
(क्रमशः)