मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २३ जुलै, २०२०

टोमॅटो केचप - भाग 2



T O m A t O K e T c H u P 

लाल भगव्या रंगांच्या त्या अगडबंब अक्षरांनी neela.limayeabcd चे अकाऊंट लॉग इन झालं होते. "अय्या किती मस्त DP होता हिचा !" शाल्मलीच्या तोंडातुन आपसुकच शब्द बाहेर पडले !  शाल्मली हळुहळू त्या नीलाच्या विश्वात रंगत गेली. विसाव्या शतकातील हिरव्यागार कोकणच्या नयनरम्य फोटोंनी निलाची प्रोफाइल व्यापुन टाकली होती. "अरे वा ! " ती मनातल्या मनात म्हणाली. आपण ज्या कोकणच्या केवळ कथाच ऐकल्या ते प्रत्यक्ष फोटोतुन बघण्याची संधी तिला मिळाली होती !

हिचा जन्म किती सालचा असावा बरे ? हा विचार येण्याच्या एका मिनिटातच ती निलाच्या account information विभागात होती. २४-सप्टेंबर-१९६४ ही निलाची जन्मतारीख पाहुन तिच्या पायाखालील जमीन सरकल्याचा  तिला भास झाला. तरीही मनाची समजुत म्हणुन तिनं आपलं ID कार्ड पुन्हा एकदा निरखुन पाहिलं. शाल्मली सरपोतदार जन्मतारीख २४-सप्टेंबर-२०६४!

आता शाल्मली तिथुन बाहेर निघणं केवळ अशक्य होतं. त्यानंतर तिला पुढील एक धक्का मिळाला. नीलाच्या ह्या प्रोफाईलवर २०२२ सालानंतर  नोंदी दिसत नव्हत्या. नाही म्हणायला "तु आमच्या सदैव लक्षात राहशील!" "एक हसतं खेळतं दिलखुलास व्यक्तिमत्व !" वगैरे कॉमेंट्स होत्या ! ह्या नीलाला वाहिलेली श्रद्धांजली आहे हे कळायला शाल्मलीला वेळ लागला होता ! म्हणजे ह्या बाई अठ्ठावनाव्या वर्षी स्वर्गवासी झाल्या ! शाल्मली स्वतःशी म्हणाली ! 

शाल्मली थोडी अजुन पुढे सरकली तर एक विशेष गोष्ट तिच्या ध्यानात आली ! २०१९ सालापासून बऱ्याचशा पोस्टचे प्रायव्हसी सेटिंग Only Me असे होते.  आणि ह्या पोस्टमध्ये बरीचशी गुप्त माहिती नोंदवली गेली आहे हे शाल्मलीला सहजासहजी समजत होते. "कोण्याच्या अकाउंट मध्ये असं डोकावुन पाहणे चुकीचं आहे" हे तिच्या सद्सद् विवेकबुद्धीनं तिला समजावलं. तिने जवळपास लॉग आऊटचा पर्याय स्वीकारला होताच पण अचानक तिचं लक्ष गेलं, "तु मला का त्रास देतोयस ! मी तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टींचा ताबा तुला दिलाय ना ?" ह्या प्रायव्हसी सेटिंग Only Me असलेल्या अजुन एका पोस्टकडे !

तो पुर्ण दिवस शाल्मली त्या अकाऊंटवरच होती ! प्रायव्हसी सेटिंग Only Me असलेल्या नोंदी तिला एका गूढ विश्वात घेऊन जात होत्या ! सायंकाळचे चार वाजले होते. आई वडिलांनी आफ्रिकेतुन केलेला कॉल तिनं धुडकावून लावला होता.  बरोबर चार वाजुन पंधरा मिनिटांनी शाल्मली सरपोतदार आपली आलिशान गाडी घेऊन मुंबई कोकण ह्या बारा पदरी आलिशान द्रुतगती मार्गावरुन निघाल्या होत्या ! 

सॅनफ्रॅन्सिस्को मध्ये राहणारा आणि फेसबुकच्या जुन्या कर्मचारीवर्गापैकी एक बर्नी सकाळी आपल्या घरुन लॉगिन झाला होता. सर्व Health Check रिपोर्ट्सवर नजर टाकुन सर्वकाही आलबेल असल्याची खातरजमा करुन घेण्याची त्याची जबाबदारी होती ! लॉगिन केल्यानंतर बरोबर दुसऱ्या मिनिटाला त्याची चाणाक्ष नजर एका नोंदीवर पडली होती. गेले ६८ वर्षे निष्क्रिय असलेल्या अकाउंटवर कोणीतरी लॉगिन केले होते. ज्या गॅजेटमधुन हे लॉगिन झालं होते ते गॅजेट प्रतिताशी १५० किमी वेगानं अशा ठिकाणी जात होतं जिथं त्या अकाउंटने १९९० ते २०२२ सालांपर्यंत सक्रियता दर्शवली होती ! 

(क्रमशः )

पहिला भाग 
https://patil2011.blogspot.com/2020/07/blog-post_21.html 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...