साल - २०९०
चंदावरील आपली आठ महिन्याची वार्षिक नेमणूक संपवून शाल्मली पृथ्वीवर परतली होती. चंद्रावरून परत येण्याची ही तिची पहिलीच वेळ नसली तरी पृथ्वीवरील वेळेला सराव होण्यासाठी तिला एक आठवडा नक्कीच जात असे. वर्षातून आठ महिने चंद्रावर नेमणूक, पृथ्वीवर त्यानंतर तीन महिने सुट्टी आणि मग पृथ्वीवरून एक महिना कामाला सुरुवात असेच तिचे वेळापत्रक गेले सहा वर्ष सुरू होते. तिचे आई-वडील आफ्रिकेत वसवल्या गेलेल्या मराठी वसाहतीत राहत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते आफ्रिकेतील हवामानाला बरेचसे सरावले होते. शाल्मली त्यांना महाराष्ट्र मुंबई भेटीला येण्याचा आग्रह करत होती. परंतु यावर्षी मात्र काहीसे तयार नाही असे तिला वाटु लागले होते.
मुंबईतील त्यांचा फ्लॅट प्रशस्त होता. इथं या अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्स मध्येच शेती आणि दुग्धव्यवसाय विकसित केले गेल्यामुळे तिची याबाबतीत गैरसोय होण्याची शक्यता तशी कमीच होती. तिच्या लग्नाचा विषय तिच्यासोबत चर्चेला आणणं म्हणजे उगाच मनस्ताप करून घेणं याची तिच्या आईला आई-वडिलांना पूर्ण कल्पना असल्यानं हल्ली त्यांनी हा विषय तिच्यासोबत काढणार टाळलं होतं. मंगळावरील वसाहतीमध्ये कायम वास्तव्य करण्यासाठी आपला क्रमांक कधी लागतो याची ते वाट पाहत होते.
अशाच एका रात्री झोपेची वाट पाहत असतानाच शाल्मलीने आपले जुने पुराणे फेसबुक अकाउंट उघडले. तिनं दहा वर्षापुर्वी उघडलेलं हे अकाउंट ती पृथ्वीवरील वास्तव्यात वापरत असे. पृथ्वीवरील मित्रमैत्रिणींशी थोडाफार संपर्क ठेवण्यासाठी हे अकाउंट कामास येत असे. चंद्रावरील मनुष्य आणि परग्रहवासी ह्यांच्या संयुक्त वसाहतीत असले उद्योग करणं तिला शक्य होत नसे. तिच्या मेंदुला आकर्षित करेल असला कोणताही अपडेट तिला पहिल्या नजरेत दिसला नाही. ती लॉगऑऊट करणार इतक्यात तिची नजर People You May Know ह्या विभागाकडं गेली.
नीला लिमये ह्या व्यक्तीच्या प्रोफाईलकडे लक्ष जाताच तिच्या मनात काहीशी अस्पष्टशी बैचैनीची भावना जाणवुन गेली. असेल काही तरी अशी मनाची समजुत काढुन ती परत झोपण्याचा प्रयत्न करु लागली. कधीतरी तिला झोप लागली. तिला अधुनमधून स्वप्नं पडत. आजही असंच काही स्वप्न पडत राहिलं. सुरुवातीला काहीसं सर्वसाधारण भासणाऱ्या स्वप्नानं मग मात्र काहीसं वेगळं रुप घेतलं. भोवताली अफाट विस्तार असलेली पोकळी तिच्यासमोर होती. त्या पोकळीत लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे कोणत्याही क्रमानं तिच्याभोवती वेगानं येत आणि निघुन जात होती. काही वेळ असंबद्ध वाटणारा ह्या क्रमात काहीतरी एक पॅटर्न आहे हे जाणवायला तिच्या कुशाग्र मेंदुला वेळ लागला नाही! Fibonacci series च्या क्रमातील अक्षरेच फक्त जर लक्षात ठेवली तर एक विशिष्ट शब्द तयार होतोय हे तिला समजलं. तो शब्द तिच्या मेंदूने कुठंतरी नोंदवुन ठेवला. ह्या शब्दांची ही कसरत थांबली तेव्हा अचानक @gmail.com ही शब्दसाखळी एक सेकंद तिच्या डोळ्यासमोर आली आणि सर्व काही शांत झालं. ह्या नंतर तिला कधी झोप लागली हे तिला समजलंच नाही !
दुसऱ्या दिवशी तिला जाग आली तिला जवळपास दुपारचे बारा वाजले होते. सर्व काही आटपुन ती फुरसतीत बसली नसेल तितक्यात तिच्यासमोर ती लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे पुन्हा एकदा पिंगा घालु लागली ! ती खरंतर कधी बैचैन होत नसे पण हा प्रकार तिला नक्कीच त्रासदायक होत होता. तिनं मग काही काळ नृत्य केलं, विविध प्रकारचं संगीत ऐकलं पण फारसा फरक पडत नाही हे तिला ध्यानात आलं. दमली भागली शाल्मली त्रस्त मनानं पुन्हा एकदा लॅपटॉपवर बसली.आजच्या दिवसात तिच्यासाठी काही ठीक घडावं असं नियतीला मान्य नसावं! फेसबुक उघडता क्षणीच तिच्यासमोर नीला लिमयेची प्रोफाइल आली!
शाल्मली ह्या क्षणी आपलं संतुलन गमवून बसली. चंद्रावरील आपल्या अवतारात ती एक प्रसिद्ध संशोधक होती. तिचा मेंदु कसा विचार करेल ह्याचा तिलाही बऱ्याच वेळा थांगपत्ता लागत नसे. आपल्या मेंदुवर कोणी बाह्य शक्ती ताबा घेत असावी असा तिला दाट संशय होता. आताही असेच झालं. तिनं आपल्या अकाउंटमधुन लॉगऑऊट केलं आणि Login into new account हा पर्याय स्वीकारला. neela.limayeabcd ह्यातील abcd हे वर्ष आपण का टाईप केला ह्याचा तिला विचार करायचा नव्हता. ई-मेलचा उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी ती गोंधळली ते क्षणभरच ! @gmail.com ची स्वप्नातील शब्दसाखळी तिच्यासमोर स्पष्टपणे झळकली होती !
आता प्रश्न होता तो पासवर्डचा ! लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे तिच्या चांगलीच लक्षात होती !
(क्रमशः )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा