दहावी परीक्षांच्या ICSE आणि CBSE ह्या दोन परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. SSC बोर्डाचा लवकरच जाहीर होईल. माझ्या अनुभवावर आधारित हे दोन शब्द !
व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडं आवश्यक असलेल्या गुणांपैकी खालील हे असे गुण ज्यांची दहावीच्या परीक्षांत सुद्धा चाचपणी होते.
१) मुळ संकल्पनांची समज
मेहनत तुम्हांला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत यश मिळवुन देऊ शकते. निर्विवाद यश मिळविण्यासाठी मुळ संकल्पनांची समज अत्यावश्यक आहे!
२) कॉमन सेन्स
मेहनत, मुळ संकल्पनांची उमज ह्या घटकांसोबत प्रत्यक्ष कामगिरी (आपल्या उदाहरणात परीक्षेचा पेपर) करत असताना कोणता तरी surprise factor तुमच्या समोर उभा ठाकणारच ! अशा वेळी उपलब्ध माहिती आणि पुर्वानुभव ह्यांच्या आधारावर योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे कॉमन सेन्स !
३) जिद्द, चिकाटी - Never Give Up Attitude दहावी, बारावी म्हणा किंवा आयुष्यातील कोणताही महत्त्वाचा टप्पा म्हणा ! ही वर्ष - दोन वर्षे , अनेक वर्षांची मेहनत असते. ह्या दीर्घ प्रवासात तुम्हांला निराशेचे क्षण येणारच ! एखाद्या किंवा दोन - तीन सराव परीक्षांत कमी गुण मिळु शकतात. पण ज्या परीक्षेतील कामगिरी खरोखर गणली जाते त्यावेळी तुम्ही आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करणे आवश्यक असते. त्यामुळं जोवर ती परीक्षा झाली नाही तोवर काहीही बिघडलं नाही हे स्वतःला समजावत रहा !
आता वळुयात बाकीच्या मुद्यांकडे !
शिकवणी वर्गाशिवाय खरंतर काहीच अडत नाही. ते तुमचा उगाचच वेळ घेतात. दररोज घरी येऊन जो विद्यार्थी नियमितपणे एक धड्याचा स्वतःहुन अभ्यास करतो, स्वतःच्या नोट्स काढतो त्याला शिकवणीची गरज नाही ! बरेचसे शिकवणी वर्ग मुलांना दमवितात. शाळा आणि शिकवणी मिळुन साधारणतः १० तास खर्च होत असतील तर स्वअभ्यास करण्याची संधीच मुलांना मिळत नाही.
शाळेत बऱ्याच वेळा तुम्हांला शिकवणी वर्गात सर्व काही शिकवलं गेलं आहे असं गृहीत धरलं जातं शाळेत काही (आगाऊ) विद्यार्थी असतात ज्यांना आपल्याला समजलं आहे हे उगाचच सर्वांसमोर दाखवुन द्यायचं असते त्यामुळं त्यांनी गणितं सोडवुन दाखवली की बाकी सर्वांना सुद्धा ती समजली आहेत असं सोयिस्कर गृहितक बरेचसे शिक्षक करतात. त्यामुळं केवळ यांत्रिकदृष्या काही मुलं गणिताच्या स्टेप्स मांडतात पण मुळ संकल्पनांचा आनंदी आनंदच असतो ! "सर मला हे समजलं नाही ! परत समजावुन सांगा ! " हे भरवर्गात सांगायचे धारिष्ट्य जो मुलगा / मुलगी दाखवु शकतो त्यांनी व्यावसायिक जगात आवश्यक असणारा एक अत्यंत महत्वाचा गुण आत्मसात केला असे म्हणता येईल !
पुर्वी (मराठी माध्यमाच्या - हे माझ्या अनुभवावर आधारित!) उत्तरपत्रिकांचे परीक्षण करताना जणु काही प्रत्येक उत्तर विविध पैलुंवर तपासुन पाहिलं जात असावं. उत्तरात अपेक्षित असणारे सर्व मुद्दे मांडणं ही गोष्ट तुम्हांला पुर्ण गुण मिळवुन देण्यासाठी पुरेशी नसे. ते योग्य क्रमानं मांडले गेले आहेत का, शब्दांचा योग्य वापर केला गेला आहे की नाही, शुद्धलेखन वगैरे अनेक घटकांची तपासणी केली जात असे. त्यामुळं नव्वद टक्क्यांच्यावर जाणं तितकंसं सोपं नसायचं. हल्ली बहुदा उत्तरात अपेक्षित असणारे सर्व मुद्दे मांडणं ह्या एकमेव निकषावर पुर्ण गुण मिळत असावेत. त्यामुळं सरासरी गुणवारीचं प्रमाण वाढलं आहे! आणि त्यामुळं स्वअभ्यास करुन घवघवीत यश मिळु शकते ह्या संकल्पनेस जोरदार पुष्टी मिळते !
सायन्स, सोशल सायन्स ह्या विषयांसाठी स्वतःच्या नोट्स बनविणे हा घटक शेवटच्या दोन महिन्यात आणि परीक्षेच्या कालावधीत फार महत्वाचा ठरतो!
साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटी पुर्ण पेपर सोडविण्यास सुरुवात करावी. व्यावसायिक जगात कोणताही प्रश्न सोडविताना Top Down आणि Bottom Up असे दोन दृष्टीकोन स्वीकारले जातात. का कोणास ठाऊक पण संपुर्ण पुस्तकांचा अभ्यास करुन परीक्षा देणे हा Bottom Up दृष्टिकोन आणि आधीच्या बऱ्याच वर्षांच्या पेपरचा अभ्यास करुन परीक्षेसाठी सज्ज होणे हा Top Down दृष्टिकोन असे मला वाटतं. ह्या दोन्ही दृष्टिकोनांचे योग्य मिश्रण साकारता यायला हवे !
आयुष्याकडं बघण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. दहावी, बारावी, पदवी परीक्षा, व्यावसायिक आयुष्य, वैयक्तिक आयुष्य हे आयुष्याचे ढोबळमानाने महत्वाचे टप्पे आपण मानु शकतो ! लेखाच्या आरंभीस नमुद केलेले तीन (आणि तत्सम) गुण ह्या सर्व टप्प्यांत वारंवार परिक्षले जातात. दहावीतील यश - अपयश गुणांच्या निकषावर न पाहता ह्या वरील तीन गुणांपैकी आपण कोणते गुण प्रदर्शित करु शकलो, ह्या अनुभवातून काय शिकू शकतो ह्याचं परीक्षण करणे योग्य ठरेल. आयुष्य प्रत्येकाला अनेक संधी देत राहणार! दहावी - बारावी ह्या सर्व संधींपैकी सुरवातीच्या दोन संधी आहेत हे लक्षात ठेवणं योग्य ठरेल !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा