वसईत पाऊस स्थिरावला आहे. स्थिरावला आहे म्हणजे बऱ्यापैकी दिवसभर लागुन राहत आहे. मंडळींनी पंखा बंद करायला हरकत नाही इतका गारवा आला आहे. अधुनमधून सोसाट्याचा वाराही सुटतो. घरासमोरील कंपाऊंडपलीकडे काही मोठाली झाडे आहेत.
आज सकाळपासुन ऑफिसचे कॉल सुरु होते. सकाळी अकरा वाजता एक फांदी तुटल्याचा आवाज आला. कॉल सुरु असल्यानं फारसं लक्ष देता आलं नाही. आवाज भेंडीच्या झाडातुन आला की अंबाडीच्या ह्याचा सुगावा लागला नाही. कॉल सुरु राहिले आणि तो आवाज काहीसा विसरला गेला.
पावणेचार वाजता मात्र आवाजांची वारंवारता वाढली. जणु काही कोणीतरी झाडावर कुऱ्हाड चालवत आहे की काय असा भास होत होता. अंगणात जाऊन पाहिलं तर आवाज भेंडीच्या झाडातूनच येत आहे ह्याची खातरजमा केली. मी सोहमला जाऊन झाड पडत आहे तर पाहायला चल असे सांगितलं. तो आपला लॅपटॉप सोडुन आला. आता तर दार दहा पंधरा सेकंदाला आवाज येऊ लागले होते.
आणि मग एक मोठाला आवाज झाला ! भेंडीचं इतकी वर्षे अंगणाच्या पलीकडं असलेलं झाड जमीनदोस्त झालं. झाड पडलं की का कोणास ठाऊक मनाला खंत वाटते. लहानपणापासुन पाहिलेली झाडं अशी पडली की अजुनच खंत वाटते. प्रत्यक्ष पडताना पाहिलेलं हे पहिलंच झाड ! सकाळी पहिला आवाज आला त्यावेळी जागरुकतेने हालचाल करुन योग्य व्यक्तींना बोलावुन झाडाला आधार वगैरे देता आला असता का असे विचार मनात आले ! कोरोना काळात हे फारसं शक्य नाही ह्याची मनाला जाणीव होतीच !
कॉल पुनःश्च सुरु झाले. पुन्हा एकदा पुर्वीपेक्षा थोडा कमी आवाज करत झाडाचा उर्वरित भाग पडला. ह्यावेळी कुंपणावरून अंगणात पडला ! भेंडी आणि अंबाडीच्या झाडांनी अंगणात सावली आणली होती. त्यामुळं अंगणातील झाडं सूर्यप्रकाशाअभावी जास्त जोर धरीत नाहीत असं मोठ्या माणसांना लहानपणापासुन बोलताना ऐकलं आहे त्याची आठवण झाली ! आंबाही सूर्यप्रकाशासाठी ईशान्येकडे जास्तच झुकला आहे ! आता तो सरळ वरती जाईल, मी मोठ्या माणसासारखा सोहमला म्हणालो !
काहीही असो भेंडी तु पडायला नको होतो! आज खिडकीपलीकडं पडलेली भेंडी आहे. Long Live Bhendi !!
ह्या झाडाविषयी अधिक माहिती विकिपीडियावरुन साभार !
भेंडीचे झाड हे तपकिरी रंगाची खरखरीत साल असलेले मध्यम आकारचे व छत्रीसारख गोल वाढणारे वर्षभर हिरव्या, पिंपळासारख्या पानांनी आच्छादलेला वृक्ष आहे. याला पिवळ्या रंगाची मोठी, शोभेची फुले वर्षभर येतात. ही फुले जसजशी परिपक्व होतात तशी जांभळट, मातकट लाल रंगाची होतात. या फुलांच्या अंश:कोषात पाकळ्यांच्या मुळांशी गडद लाल मखमली रंग असतो. त्या झाडाची फळेही हिरवी गार टणकफळे, फळ फोडल्यावर त्यातून पिवळा रंग निघतो आणि चंदेरी बिया-सोन्या-चांदीचच फळ असे दिसते.[१]
मूळचे आशिया आणि आफ्रिका खंडातील असलेले हे झाड कोकण, दक्षिण भारत, श्रीलंका, अंदमान, बांगला देश आणि पॅसेफिक बेटांवर आढळते. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि कोलंबो येथे या झाडांची लागवड रस्त्याच्या दुतर्फा आढळते. क्षारयुक्त जमिनीतही याची पैदास आणि वाढ जोमाने होते. बियांनी तसेच छाटणी पद्धतीने रोप तयार करून झाडांची पैदास करता येते. याच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, बैलगाडीची चाके आणि होड्या तयार करण्यासाठी होतो. कागद तयार करण्यासाठीही याचा उपयोग होतो. याच्या साली व फळांपासून लालसर दाट वंगणाचे तेल मिळत. फुलांपासून पिवळा रंग तयार करतात. एरंडयाच्या तेलातला भेंडीच्या बियांचा अर्क कीटकांच्या, प्रामुख्याने डासांच्या चावाण्यावर वर उपाय आहे.
भेंडीची मूळशक्तीवर्धक आहेत. त्वचा विकारांवर हे सर्वण्यात औषध आहे. याचा उपयोग अतिसार मूळव्याध तसेच मधुमेहाच्या उपचारांमध्ये केला जातो.
आणि ही लिंक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा