मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २८ जून, २०२०

अनुपमा १९६६


शनिवारी रात्री ९ वाजता जेव्हा मन साप्ताहिक सुट्टीमुळं निर्माण झालेल्या आनंदाच्या परमोच्च क्षणी असतं त्यावेळी लोकसभा वाहिनी सुरु करुन त्यावर कोणता चित्रपट दाखविला जात आहे हे मी बऱ्याच वेळा तपासुन पाहतो. काही अनमोल रत्नं ह्यावेळी प्रदर्शित केली जातात. काल रात्री प्रदर्शित केला गेलेला आणि आज दुपारी पुनर्प्रसारित केला गेलेला अनुपमा हे एक असंच अनमोल रत्न !

पत्नीवर अपार प्रेम असणारा पती तरुण बोस ! बाळंतपणात आपल्या पत्नीला गमावुन बसल्यावर आपल्या पत्नीच्या मृत्यूला आपली नवजात मुलगीच जबाबदार आहे असा ग्रह करुन घेतो; आणि आयुष्यभर बाळगत बसतो. तरीही आपल्या मुलीला योग्य शिक्षण मिळावं, तिचं लग्न एखाद्या सुस्थितीतल्या घरात व्हावं असं प्रेमळ पित्याला वाटणाऱ्या सर्व भावना त्याच्या मनात असतात. 

चित्रपटातील संगीत श्रवणीय ! 

धीरे धीरे मचल ये दिले बेकरार 
कुछ दिल ने कहा 
या दिल की सुनो दुनियावालो 

ही ह्या चित्रपटातील गाजलेली गाणी !  सुंदर शर्मिला टागोर, देखणा धर्मेंद्र आणि बाह्यदर्शनी अल्लड रुप धारण करणारी शशिकला! शर्मिलेचे सौंदर्य मोहक ! भुमिकेतील शालीनता कायम ठेवत आयुष्यात धर्मेंद्र आल्यानंतरचा होणारा बदल तिनं सुरेख साकारलाय ! धर्मेंद्र एका क्षणी तिला म्हणतो सुद्धा - तु हसताना कधी आरशात पाहिलं आहेस स्वतःला ? तु किती सुंदर दिसतेस ते तुला जाणवेल! देवेन वर्माला जास्त वाव मिळत नसला तरी तो आणि डेविड ह्या चित्रपटातील विनोदी भूमिकांची गरज पार पाडतात ! डेविडची माहिती मायाजालावर शोधली असता तो बेणे इस्त्राईल वंशातील असुन मराठी भाषिक होता हा रंजक इतिहास सामोरा आला ! शशिकला पुर्वीच्या काळात खलनायिकेची भूमिका बजावणारी अभिनेत्री, पण इथं तिनं आधी अल्लड आणि मग नायक - नायिकेला मदतगार अशी सकारात्मक भुमिका बजावली आहे! चित्रपटातील सुरुवातीच्या काही प्रसंगांत दोन तीन वाक्य बोलुन धावत जातानाच ती दिसते! त्यामुळं हिला बहुदा चालता येत नसावं असा काही काळ माझा ग्रह झाला होता ! 

चित्रपटाची पातळी अभिजात. अर्थपुर्ण संवांदांची रेलचेल!  प्रत्येक प्रसंगांचा चित्रपट पुढं सरकण्यासाठी हातभार लावतानाच बऱ्याच वेळा चित्रपटांतील पात्रांच्या स्वभावांच्या छटा उलगडुन दाखवणारा ! आपल्या मालकाकडं आयुष्यभर  नजर वर करुन बघण्याची हिंमत नसलेली घरातील आया अगदी मोक्याच्या क्षणी शर्मिलाच्या आयुष्याविषयी त्याला दोन शब्द सुनावते. तिच्यापासुन स्फुर्ती घेऊन शर्मिला आपलं मनोगत पित्याला सांगते. त्यात आपल्या पित्याची मानसिकता तिनं ज्याप्रकारे समजावुन घेतली आहे ते केवळ अप्रतिम ! आपल्या पदरी ज्यानं केवळ उपेक्षा आणि रागाचं माप टाकलं त्याच्याविषयी तिरस्कारसदृश्य भावना असणं स्वाभाविक होतं आणि त्याबद्दल तिला प्रेक्षकांनी माफसुद्धा केलं असतं. पण ती त्याची मानसिकता समजावुन घेते. आईनं तुमच्या हृदयात जे स्थान प्राप्त केलं होतं तसंच स्थान मला कोणाच्या तरी हृदयात निर्माण करायचं आहे, त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. हे ती एका दमात सांगुन टाकते. पिताही तिच्या टोक्यावर हात ठेऊन निःशब्द आशिर्वाद देतो. तुमचं एकाकीपण मी जवळुन पाहिलं आहे त्यामुळं तुम्ही केवळ एका शब्दानं हाक द्या, मी धावत येईन! जाता जाता ती सांगते! 

धर्मेंद्र कथानकाची गरज म्हणुन कथालेखक असतो असं जरी बराच काळ वाटत राहिलं तरी आपलं प्रेम प्रेयसींपुढं व्यक्त करण्यासाठी त्याला त्यानं लिहिलेल्या कादंबरीची बरीच मदत होते. भावना थेट व्यक्त करण्यात जास्त धोका वाटत असल्यास अशा अप्रत्यक्ष मार्गाचा प्रथम वापर करणे  ह्याला धोरणात्मक चाल असं म्हटलं जातं !

जाता जाता चित्रपटातील बंगला सुद्धा मला आवडुन गेला ! चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण महाबळेश्वर इथं झालं. त्यामुळं १९६६ च्या आसपास महाबळेश्वर किती सुंदर होतं हे पाहुन जीव हळहळला.  हे सारं आपण का गमावलं ?  ५४ वर्षांआधीचा चित्रपट रविवारी दुपारी पाहुन तो इतका परिणाम करु शकतो की पुढे ठाकलेल्या भरगच्च आठवड्याची चिंता करायचं सोडुन एक चिंतातुर जंतु रात्री अकरा वाजेपर्यंत जागुन ही पोस्ट लिहितो ! May be Sharmila effect! 

एक गोष्ट नमूद करायची राहुन गेली. हिंदी चित्रपटाच्या शेवटच्या पाच मिनिटांत परगावी एकट्याच निघालेल्या नायक - नायिकेचं चित्रीकरण असलेला हा अजुन एक चित्रपट. भारतीय रेल्वेने कथानकाच्या शेवटच्या टप्प्यात अशी अनमोल भुमिका बजावलेल्या आणि तुम्हाला आवडलेल्या चित्रपटांची नावे सांगा! जा सिमरन जी ले अपनी जिंदगी ! 

शनिवार, २७ जून, २०२०

वर्तुळं



स्वतःभोवताली केंद्रित वर्तुळं रेखाटण्याचा 
त्याचा छंद जुनाच आहे!!!

माणसांना ओढुनताणून  ह्या वर्तुळात बसवण्याचा 
त्याचा छंद जुनाच आहे!!

काही कामासाठी, काही छंदांसाठी तर काही उगाच अशी अनेक वर्तुळं
तो रेखाटतो !!

काहीजण त्याला त्यांच्या वर्तुळात आणुन बसवतात,
तनाने असला तरी मनानं तिथं राहणं 
त्याला बहुदा जमत नाही ! 

आपल्या वर्तुळात ओढुनताणून आणुन बसवलेल्यांची कुतरओढ पाहणं 
त्याला आवडतं!!

त्याच्या वर्तुळात बसण्याची सक्ती झुगारून देण्याचा ध्यास 
काहीजण बाळगतात !!

सोडुन गेलेल्यांचं दुःख, 
साथीला मागं राहिलेल्यांचा आनंद व्यक्त करणं 
त्याला जमत नाही ! 

कालांतरानं सारं काही बदलत जातं पण ते 
त्याला उमजत नाही !

काही वर्तुळात त्याचं हरवलेलं केंद्रस्थान 
त्याला जाणवत नाही...  
जाणवलं तरी ते 
तो स्वीकारत नाही !
मात्र आपणच रेखिलेल्या वर्तुळाबाहेर फेकलं घेण्याचं दुःख 
त्याला सोसवत नाही ! 

काही वर्तुळात मात्र 
तो एकटाच उरतो 
स्वतःची स्पेस बाकी सगळ्यापेक्षा महत्वाची मानण्याचा अट्टाहास 
त्याला सोडवत नाही !

मग ती वेळ येते सर्व वर्तुळांना पुसून टाकण्याची !
त्या वेळी 
वर्तुळांच्या आकारांविषयी,  भरलेल्या रंगांविषयी , निवडलेल्या माणसांविषयी 
खंत करण्याची संधी सर्वश्रेष्ठ  त्याला देत नाही !!!!

आदित्य पाटील 

(ही पोस्ट त्याच्याऐवजी तिच्याविषयी सुद्धा असु शकते !)

शुक्रवार, १९ जून, २०२०

Clarity of Thought Process !


कल्लोळ हा माणसांच्या वाढत्या संख्येमुळे होत नाही, तर तो माणसांच्या वाढत्या महत्वाकांक्षा आणि सरलतेपासुन फारकत घेतलेल्या भावभावनांमुळे होतो. सद्यकाली ज्या माणसाला / स्त्रीला विचारप्रकियेतील सुस्पष्टता साध्य झाली तो माणुस / ती स्त्री सुखी झाली!  आयुष्यातील तुमच्या विचारप्रकियेतील सुस्पष्टता विविध टप्प्यात कोणत्या पातळीवर असावी ह्याची उकल करण्याचा हा प्रयत्न !

१. तुमची विविध कलागुणातील, क्षेत्रातील  क्षमता ! ह्यातील एक क्षेत्र कदाचित तुम्ही उपजिवीकेसाठी निवडलं असेल. आपण निवडलेल्या क्षेत्रात केवळ गुणवत्तेच्या जोरावर आपण कुठवर पोहचू शकतो आणि प्रचंड मेहनत घेऊन कुठवर पोहचु शकतो हे जाणुन घेण्याची सुस्पष्टता ज्यांना लाभली, ते भाग्यवान ! 

प्रचंड मेहनत घेऊन जर आपण वरिष्ठ स्थानी पोहचु शकत असलो तर त्या स्थानाचे महत्व आणि त्या मेहनतीमुळं आपल्याला करावे लागणारे त्याग ह्याचा हिशोब ज्यांना करता आला ते भाग्यवान !

आपण निवडलेलं उपजीविकेचं क्षेत्र जबरदस्त प्रमाणात चुकलं ह्याची जाणीव चाळिशीनंतर होऊनसुद्धा जी माणसं त्याच्याकडं अगदी तटस्थ भावनेनं पाहु शकतात ती माणसं भाग्यवान !

२. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर घेतलेल्या निर्णयांच्या अचुकतेविषयी प्रौढी मिरवणं अथवा चुकांबद्दल पश्चाताप करणे ज्यांना टाळता आलं ते भाग्यवान !

३. जगात अब्जावधी लोक आहेत. त्यातील काही टक्के लोक यशस्वी होणार, काही लोकांची निवड राष्ट्रीय संघात होणार पासुन काही लोक नगरसेवक होणार ! व्यक्तीच्या दृष्टीकोनातुन पाहिलं तर हा तुमच्या नशिबाचा वगैरे खेळ असु शकतो ! पण जगाच्या दृष्टीतुन हा केवळ शक्यतांचा खेळ असतो. तुमची गुणवत्ता, योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्ही हजर असणे, काही योग्य लोकांची तुमची विचारसरणी जुळणं वगैरे घटक तुम्ही कुठवर जाऊन पोहोचता हे ठरवतात. त्यामुळं माझं नशीबच खराब वगैरे नाट्यमय वाक्य स्वतःशीच बोलणं टाळावं ! Probability ची संकल्पना आपल्यालाही लागु पडते हे ज्यांना समजलं ते भाग्यवान !

४. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर यशांच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. काही  यशं / अपयशं लोकांना दृष्य स्वरुपात जाणवतात तर काही जाणवत नाहीत ! लोकांच्या नजरेस पडलेल्या तुमच्या यशस्विता / अयशस्वितेच्या पलीकडं जाऊन तुमच्या मनाला सुख देणारी काही यशं असतात. ती तुमच्या मनाच्या त्या हळव्या कोपऱ्यात तुम्ही कायम बाळगुन ठेवु शकता ! हे ज्यांना उमगलं आणि अशा यशांचा पाठलाग करता येणं ज्यांना जमलं ते भाग्यवान !

५. जगातील बहुतांश लोकांच्या  आयुष्यात तुमचं स्थान विशिष्ट काळापुरता असतं. त्यानंतर ही माणसं अचानक तुमच्या आयुष्यातुन गायब होतात. कदाचित तुम्हीही लोकांच्या बाबतीत असं वागला असाल! त्यामुळं आपण ज्यांच्यात भावनिकदृष्ट्या गुंतलो आहोत ते आपल्याशी अशा प्रकारे वागु शकतात ह्याची जाणीव ज्यांना आहे ते भाग्यवान !  जिथं दोन्ही बाजुंनी आयुष्यभराचं व्यक्त / अव्यक्त नातं ठेवण्याची आस आहे अशी नाती ओळखता येणं आणि निभावता येणं हे ज्यांना जमलं ते भाग्यवान !

६. आपण अधुनमधुन चुकीचं वागतो! आपल्या चुका ज्यांना  लगेच, काही कालावधीत जाणवतात आणि ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी त्यांना ह्या चुकांबद्दल योग्य व्यक्तींची माफी मागु देते त्या व्यक्ती भाग्यवान ! 

७. आज जेवण काय करावं, कोणता शर्ट घालावा, ऑफिसात जाताना कोणता मार्ग घ्यावा, दीडशे रुपयाला ३ पापलेट्स घ्यावी की तीनशेला ८ असल्या प्रश्नांवर १० सेकंदात निर्णय घेऊ शकणाऱ्या व्यक्ती भाग्यवान !

७. शेवटी शुक्रवारी सकाळी ब्लॉगपोस्ट लिहिण्याची जिद्द करुन आपल्या ऑफिसच्या कामाचा पुरता गोंधळ उडू शकतो, आपले प्रियजन आपल्यावर वैतागु शकतात ह्याची जाणीव असुनही ही जिद्द जो जोपासु शकतो तो ..... !!!

रविवार, १४ जून, २०२०

सुशांत ...


सुशांत सिंगच्या अकाली मृत्युची बातमी कळली. मोठा धक्का बसला, खुप वाईट वाटलं. सद्यःकाली मुंबई हे एकट्यानं राहण्याचं शहर राहिलं नाही. शहरानं आपला माणुसकीचा चेहरा काही काळासाठी बाजुला सारला आहे. अशा वेळी तुमच्या सोबत जिवाभावाचे माणुस हवंच !

काही आठवड्यापुर्वी धोनीच्या भुमिकेत सुशांतला पाहिला. सुशांतची भूमिका आणि मी पाहिलेला हा पहिला चित्रपट ! सुशांत माझ्या लक्षात राहिला तो त्यानं ज्या शांतपणे ही भुमिका निभावली त्यासाठी ! ह्या भुमिकेत कुठंही आक्रस्ताळेपणा जाणवला नाही.  दुर्देवानं आज ही बातमी ऐकायला मिळाली. 

ही टोकाची भुमिका घेण्याआधी तो कोणत्या मनःस्थितीतुन गेला असेल ह्याचा विचार करणं कठीण जातं. संपुर्ण विश्व एका बाजुला व दुसऱ्या बाजुला मी आणि  माझी समस्या ! ही समस्या इतकी गहन की त्यातुन माझी  कोणीही सुटका करु शकणार नाही ! 

आता लोक म्हणणार, सुशांत तु जवळच्या लोकांशी संपर्क करायला हवा होता. त्यांच्याशी बोलुन पहायला हवं होतं. पण हे फार कठीण असतं. सुशांत एकटा नाही असे अनेकजण भोवताली आहेत. ह्या सर्वांच्या वेदना, दुःख ऐकुन घ्यायला प्रत्येक वेळी कोणी असेलच ह्याची शाश्वती नाही !

लेखाच्या या पुढील भागात हे सारं काही सुशांतच्या बाबतीत घडलं आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही! हा संघर्ष सुशांतचा एकट्याचा नाहीये ! आपल्या सर्वांचा आहे ! 


नक्की काय होतंय ! आपल्या मुळ रुपात राहुन उपजीविका साध्य करु शकु असे मोजके व्यवसाय शिल्लक राहिले आहेत. चोवीस तासातील बराच काळ तुम्हांला तुमच्या मुळ रुपापेक्षा वेगळ्या रुपात वावरावं लागतं. कारण ही तुमच्या व्यवसायाची गरज असते. आपल्या मुळ रुपाला सोडुन ह्या वेगळ्या रुपात शिरताना, वावरताना तुमची प्रचंड ऊर्जा खर्च होत असते. जोवर ह्या ऊर्जेच्या समप्रमाणात तुम्हांला यश मिळत राहतं तोवर तुम्ही ही ऊर्जा स्वतः निर्माण करु शकता. 

ज्या क्षणी तुमच्या यशाची पातळी घसरु लागते किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही ताणतणाव निर्माण होतात त्यावेळी मात्र तुम्हांला कोणीतरी जवळचं लागतं. एक असते आपली मुळ प्रतिमा आणि दुसरी असते आभासी प्रतिमा जी आपण व्यावसायिक जगासाठी बनविलेली असते ! ज्यावेळी ह्या व्यावसायिक जगातील आपल्या क्षणभंगुरतेची आपल्याला जाणीव होते त्यावेळी आपल्याला आपल्या आभासी प्रतिमेचा तिटकारा येतो, तिच्यापासुन दूरदूर पळावेसे वाटतं. पण जिच्याकडं परत जावं ती आपली मुळ प्रतिमा कोसो मैल दुर गेलेली असते ! 

सगळ्याच माणसांच्या बाबतीत असं होतं असंही नाही ! म्हणजे काही जणांना कोणीतरी जवळचं लागतं तर काहीजणांना ते लागत नाही ! काही माणसं किंबहुना माणसांचे प्रकार स्वयंपुर्ण असतात. एकतर निराशावादी विचार त्यांच्या मनात निर्माण होत नाहीत किंवा तयार झाले तरी त्यांचीबुद्धी अशा विचारांचा वेळीच निचरा करते. 

आता ह्या क्लिष्ट समस्या निर्माण करणाऱ्या व्यवसायांपासून दुर जाऊन साधं आयुष्य स्वीकारावं म्हटलं तर साधं आयुष्य जगणाऱ्या माणसांना  सुखी म्हणावं अशी सुद्धा परिस्थिती जगानं  ठेवली नाही. भले ती माणसं सुखानं जगायला तयार असतील आणि ते ही आपल्या मुळ रुपात ! पण त्यांच्या विश्वात शिरुन जाहिरातींच्या आणि अन्य माध्यमातुन तुम्ही कसे विविध सुखांना पारखे झाले आहात ह्याची सदैव जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला जातो ! ह्या अपप्रचाराला बळी पडु शकते ती युवामंडळी !

कोणत्याही चैनीच्या गोष्टींची जाहिरात करणाऱ्या माध्यमांवर तुम्हांला काहीतरी करुन आळा घालता यायला हवा किंवा त्यांना तितकाच खर्च करुन साध्या जीवनात सुद्धा कसं सुख मिळु शकतं ह्याची जाहिरात करावयास भाग पडायला हवं ! जितका जास्त विचार मी करतोय तितकं ह्यातुन बाहेर पडण्याचा रास्त मार्ग क्लिष्ट आहे हे जाणवतंय !

जगाचा हा प्रश्न सोडविणं कठीण आहे ! प्रयत्न वैयक्तिक पातळीवर करायला हवेत ! शांत मनोवृत्तीची शिकवण देता यायला हवी !  तुम्ही शहरात राहत नसाल, तुमच्याकडं शहरातील नोकरी नसेल तर तुमच्या आयुष्यातील भला मोठा भाग अपुर्ण राहिला आहे ह्या समजुतीचे समुळ उच्चाटन ज्यावेळी आपण करु शकु त्यावेळी आपल्या ह्या समस्येची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल ! तोवर आजच्या दुर्दैवी घटनांसारख्या घटनांची पुनरावृत्ती होतच राहणार ! 

रविवार, ७ जून, २०२०

मॅटर झालं !



सामान्यपणे माणसं एखाद्या विशिष्ट वयानंतर भोवतालच्या सर्वच गोष्टींकडं गंभीरतेने पाहायला लागतात. अर्थात ह्याला सन्माननीय अपवाद असतातच! काही माणसं अगदी जन्मल्यापासुन गंभीर असावीत की काय असा संशय घ्यावा इतक्या लहान वयात गंभीर बनतात. तर काही माणसं आयुष्यभर खट्याळ राहतात. ह्या सर्व प्रस्तावनेमागचं कारण की साधारणतः आठवी- नववी पासुन ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हा गट दिलखुलास असतो. घरी पालक, शाळा-कॉलेजात शिक्षक डोक्याला कितीही ताप (त्यांच्या भाषेत शॉट) देत असले तरीही आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी हलकाफुलका ठेवत असतात, अगदी थ्री इडियटस मधील आमीर सारखा ! ह्या मंडळींची दैनंदिन जीवनातील भाषा (lingo) सुद्धा आपल्याला चेहऱ्यावर एक मितहास्य आणायला भाग पाडतो! आजची पोस्ट अशीच ह्या मंडळींच्या वापरातील एका शब्दप्रयोगावर! तो म्हणजे मॅटर झालं किंवा मॅटर हो गया ! 

ह्या मॅटर हो गया शब्दप्रयोगाची व्याप्ती विस्तृत आहे. 

वैश्विकसध्यातरी ह्या मंडळींनी हा शब्दप्रयोग अंतराळातील घटनांबाबत वापरल्याचे मी प्रत्यक्षात ऐकलं नसलं तरी एखादी उल्का पृथ्वीच्या जवळुन गेली तर मॅटर होते होते बच गया असं ते म्हणु शकतात ! 

जागतिक - जागतिक राजकारणात पाहिलं तर ट्रम्प आल्यापासुन त्याचं दररोज चीन, उत्तर कोरिया, इराण अशा देशांशी मॅटर होतंच राहतं! 

आशिया - सध्या भारत आणि चीन ह्यांचं लडाख इथं मॅटर चालु आहे. 

भारत - कोरोना ने जो  जगभर आणि भारतात धुमाकूळ घातला आहे त्याचा स्कोप "मॅटर हो गया" च्या पलीकडचा आहे. इथं आपण मॅटर झालं ह्या संज्ञेचे गुणधर्म लक्षात घ्यायला हवेत ! मॅटर झालं ह्या संज्ञेत जुजबी नुकसान करणाऱ्या आणि दीर्घकालीन दुष्परिणाम  नसणाऱ्या घटनांचा अंतर्भाव होतो! त्यामुळे आपल्या राज्यात परत जायला उत्सुक असणाऱ्या असंख्य नागरिकांनी वांद्रा स्टेशनबाहेर गर्दी केली ही घटना मॅटर झालं ह्याच्या स्कोपमध्ये येते. पण जर का त्यामुळं अचानक दहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला तर मात्र ती मॅटर झालं च्या परिघाच्या पलीकडं जाते! 

शाळा / महाविद्यालयीन जीवन - लेक्चर बंक करुन जाताना शिक्षकांनी पकडणं, वर्गात फ्री लेक्चरला क्रिकेट खेळणं, पालकांची सही करण्याचं धारिष्ट्य केलं असता शिक्षकांच्या ते ध्यानात येणं वगैरे फुटकळ घटना मॅटर झालंच्या व्याप्तीत येतात. पुर्वी शाळेत मुलामुलींनी एकमेकांशी बोलणं ही मॅटर होण्याची नांदी समजली जायची! पण त्याकाळी हा शब्दप्रयोग अस्तित्वात नव्हता ! 

घर ते शाळा / कॉलेज - स्कुल बसचा चालक आणि रिक्षाचालक ह्याची बाचाबाची होणे, रेल्वेचा पास संपला असता समोरुन टी. सी. येणं ह्या घटना मॅटर झालं म्हणुन गणल्या जातात. 

सोशल मीडिया - व्हाट्सअँप, फेसबुकवरील दैनंदिन घटना  जरी मॅटर हो गया इतकी महत्त्वाची नसली तरी कधीतरी तिथंही मॅटर होतात !

घर - ह्या वयोगटात घरी दररोज मॅटर व्हायलाच लागतं. एखाद्या दिवशी मॅटर नाही झालं तर काहीतरी मोठं मॅटर झालं असावं असा ह्यांना संशय येतो ! घरी मॅटर झालं ह्यात मोबाईलवर रात्री दोन - दोन वाजेपर्यंत खेळत राहणं जे पालकांच्या लक्षात येणं, आईनं दिलेलं महत्वाचं काम विसरुन येणं, बाबांना एखादं दुसरं उलट वाक्य बोलणं ह्या सर्व घटनांचा समावेश होतो !

आता आपण तथाकथित मोठ्यांनी ह्या मॅटर झालं ह्या संज्ञेकडून आणि पर्यायानं ह्या वयोगटाकडुन काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं ! जर लहान वयात त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मॅटरना ते इतके हसतखेळत सामोरे जाऊ शकतात तर आयुष्यात मोठं झालेल्या आपल्याला आयुष्यात सामोरे येणाऱ्या तथाकथित समस्यांकडे मॅटर झालं च्या चश्म्यातुन पाहायला काय हरकत आहे ! ही मंडळी मॅटर झालं हे सांगताना कधी दुःखी नसतात, तर त्यांच्या चेहऱ्यावर बहुतेक वेळा मिश्किल भावच असतात! आपणही त्यांच्याकडुन आयुष्याला सामोरे जाण्याचा हा दृष्टिकोन स्वीकारुयात ! 

आता बघा आठवडाभराची सुट्टी संपल्याने मी ही एक मोठी समस्या आहे असा चेहरा करुन बसलो होतो पण आता मात्र मी मॅटर हो गया असं स्वतःला समजावत आठवड्याला सामोरे जायला तयार झालो आहे ! 

मंगळवार, २ जून, २०२०

समजुतदारपणाचा लेखाजोगा आणि Corona Times!!!


काही माणसं जन्मतः समजुतदार असं म्हटलं जातं. समजुतदार म्हणजे काय ह्याचा थोडा ऊहापोह करण्याचा हा प्रयत्न !

सामाजिक जीवन सुरळीत चालण्यासाठी मनुष्यजातीने शेकडो वर्षांच्या अनुभवांच्या आणि सामुहिक बुद्धिमत्तेच्या जोरावर कायदे बनविले आहे. या कायद्यांच्या जोरावर सामाजिक जीवन सुरळीतपणे चालवण्याची मनिषा शासनकर्ते बाळगुन असतात. जर समाज सुशिक्षित आणि सुविचारी असेल तर शासनकर्त्यांची हे मनिषा बऱ्यापैकी पूर्ण होते. परंतु मनुष्यांच्या एखाद्या छोट्या समुहाच्या दैनंदिन कामकाजात  सुरळीतपणा हवा असेल तर तिथं कायदे लागू करता येणं शक्य नसते. 

प्रत्येक कुटुंबाचे, एखाद्या मित्रमंडळींच्या गटाचे आणि सामाजिक संस्थांचे काही अलिखित असे नियमअसतात. हे अलिखित नियम त्या गटांत वावरण्यासाठी सदस्यांना एक चौकट घालुन देतात.  ही चौकट काहीशी ऐच्छिक असते. त्यामुळं अलिखित नियम, बंधनांचा अभाव हे सर्व घटक अस्तित्वात असतानादेखील जी व्यक्ती प्रसंगी स्वतःकडे पडती बाजु घेत सामुहिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी पुढाकार घेते तिला समजूतदार व्यक्ती असे आपल्याला ढोबळमानाने म्हणता येईल. 

आता प्रत्येक व्यक्तीचा समजुतदारपणा कुठून येतो याकडे आपण वळूयात! व्यक्तीला जन्मतः समजूतदारपणाची पुंजी मिळालेले असते. ही मूळ पुंजी बहुतांशी वेळा त्या व्यक्तीच्या वयानुसार अनुरुप असे रुप घेत त्या व्यक्तीचा समजूतदारपणा आयुष्यभर कायम ठेवण्यास मदत करते. समजूतदारपणाचे लहानपणीचे उदाहरण म्हणजे सर्व मुलं एकत्र खेळत असताना आपला चेंडू असूनही सदैव पहिल्या फलंदाजीचा आग्रह न धरणे हे असू शकते! मोठं झाल्यावर समजूतदारपणाला बहुआयामी बनावं लागतं!  आपल्याशी कठोर वागणाऱ्या लोकांशी आपणसुद्धा तसंच वागायला हवं हा अट्टाहास न धरणे हा समजूतदारपणा असू शकतो!!

आपल्याला समजूतदारपणाची जी पुंजी लहानपणी मिळालेली असते ती तशीच्या तशी आयुष्यभर पुरणे किंबहुना तिच्यावरील विश्वास अढळ रहाणे तसे कठीणच! समजूतदारपणा हा काही फुकटात येत नाही. समजुतदारपणा दाखवणाऱ्या व्यक्तीला त्याची काही प्रमाणात किंमत मोजावी लागते! काहीजणांना  त्यासाठी त्याग करावा लागतो तर कधी होणारा मानसिक संताप आतल्याआत दडून ठेवावा लागतो. 

ही शक्ती त्या व्यक्तीला नक्की देतं कोण?  प्रत्येक समजूतदार व्यक्तीचा समजुतदारपणावर विश्वास ठाम राहण्यासाठी त्या व्यक्तीला कोणत्यातरी एका आश्वासक स्त्रोताचा पाठिंबा लागतो. हा स्त्रोत "तू समजूतदार आहेस" आणि "जगाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे, त्यामुळे तू सदैव समजूतदारच राहा" असे आणि तत्सम संदेश त्या व्यक्तीला सदैव देत राहतो !! 

आता पोस्टच्या उत्तरार्धाकडे वळुयात ! कोरोनामुळं मनुष्यजातीचा सरासरी समजुतदारपणा आधीच खालावला गेला आहे. बरीच लोक आपल्या नेहमीच्या वर्तवणुकीच्यापेक्षा काहीशा वेगळ्या वर्तवणुकीचे प्रदर्शन करु लागले आहेत. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी ! सामाजिक जीवनातील काही घटक बऱ्याचजणांना आपलं मनःस्वास्थ्य टिकवुन ठेवायला मदत करतात. ह्या स्वास्थ्यकारी स्त्रोतांशी संपर्क तुटल्यानं आणि हा संपर्क पुन्हा प्रस्थापित होण्याचा नक्की कालावधी माहित नसल्यानं माणसं बैचैन झाली आहेत. 

अशा वेळी समाजातील समजूतदार व्यक्तींची जबाबदारी अधिकच वाढली आहे. आपल्या भोवताली वावरणाऱ्या व्यक्तींपैकी कोणाचं मनःस्वास्थ्य हे Breaking Point च्या आसपास पोहचत तर नाही ना ह्यावर ह्या मंडळींनी लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यांच्याशी सतत संपर्क ठेवणं आवश्यक आहे. 

आता प्रश्न असा येतो की सामान्य परिस्थितीतील समजुतदार / समजंस माणुस कोरोना काळातील सुद्धा समजंस माणुस असेलच का? त्यांचे स्वास्थ्य टिकवणारे स्रोत त्यांना उपलब्ध राहतील का? समाजस्वास्थ्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा ह्या प्रश्नांची उत्तरच येत्या काळातील एखाद्या विशिष्ट समाजाच्या वाटचालीत महत्वाचा भाग घेतील ! एक वेळ करोनानंतर आर्थिक नुकसानीतुन बाहेर पडणे सोपं असु शकेल पण तुटलेल्या भावबंधांना जोडणं हे मात्र कठीण ठरु शकतं !


आदित्य पाटील 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...