मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

स्वातंत्र्यदिन शुभेच्छा !


रविवारी आपण सर्वांनी भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहानं साजरा केला. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा ! रविवारी सकाळी वडिलांनी आम्हांला पहिल्या स्वातंत्र्यदिनी शाळेत मिठाई दिली होती अशी आठवण काढली.आजच्या घडीला ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा क्षण प्रत्यक्ष पाहिला अशी मोजकी मंडळी आहेत. त्यामुळं बहुतांशी नागरिकांना स्वातंत्र्याचं खरं मोल समजत असेल का हा प्रश्न डोळ्यासमोर उभा रहातो. सद्ययुगात स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ते कशापासून हा प्रश्न रविवारी सकाळपासून माझ्या डोक्यात घोंघावत होता. गॅझेट्सपासुन स्वातंत्र्य हे बऱ्याच जणांचं मत असण्याची शक्यता आहे. अशा मनःस्थितीत असताना सायंकाळी मी स्वतः संगणकापासून दूर जाऊन वर्तमानपत्र वाचनाकडं वळलो. 

लोकरंगमध्ये राजरत्न भोजने ह्यांचा "स्वगत ... ध्येयहीन तरुणाईचे !" हा एक उत्तम लेख वाचावयास मिळाला.  ह्या लेखातील काही महत्वाचे मुद्दे 

१. नक्की करायचंच काय " हा आजच्या तरुणाईला भेडसावणारा प्रश्न 

२. थोड्याथोडक्यानं समाधान न मानणाऱ्या आणि स्वतःकडून असामान्य अपेक्षा बाळगणाऱ्या हा प्रश्न अधिक त्रास देत आहे 

३. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आता मायबोलीतून आणि दुसरीकडे मराठी शाळांना विद्यार्थ्यांची वानवा असा विरोधाभास 

४. Uncertainty Principle (Heisenberg) - आजच्या तरुणांच्या मनावर घिरट्या घालणाऱ्या भविष्याला घेरुन असलेल्या अनिश्चिततेच्या प्रश्नांवर कुणीतरी आपलं लक्ष वेधून घेत आहे का? नोकरी मिळविण्याची अनिश्चितता , नोकरी टिकविण्याची अनिश्चितता, योग्य मोबदला मिळेल की नाही ह्याची अनिश्चितता, हा मोबदला भविष्यासाठी पुरेसा ठरेल की नाही ह्याची अनिश्चितता, मन मारुन काम करत राहिल्यानं मानसिक समाधान न मिळण्याची अनिश्चितता, ध्येयपूर्ती होईल की नाही ह्याची अनिश्चितता, जगाच्या पटलावर नावलौकिक मिळेल की नाही ह्याबाबत अनिश्चितता

आता माझे मुद्दे 

मुलांशी सुसंवाद 

फार थोड्या उदाहरणांत पालकांना तरुण पिढीशी सुसंवाद साधता येतो. एकतर पूर्णपणे संवादाचा अभाव नाहीतर दोघांतील एक पिढी सांगेल तसं दुसऱ्यांनी ऐकायचं हेच बऱ्याच उदाहरणांत पाहायला मिळतं. 

१) जेव्हा केव्हा तुम्ही मुलांशी चर्चेस सुरुवात करता त्यावेळी "ठेव तो मोबाईल बाजूला आणि मग बोल माझ्याशी" अशी सुरुवात केली तर मग संपलंच. अमेरिकन सहकारी म्हणतात त्याप्रमाणं You lost me there अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा सुरुवातीनंतर मुलं तुमचं बोलणं कितपत मनापासून ऐकून घेतील ह्याविषयी शंकाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या काळातील एखादं दुसरं उदाहरण देऊन मग मुलांना बोलण्याची संधी द्यावी. नुसतं ज्ञान पाजळु नये.  नाहीतरी एका क्षणी त्यांच्या मनात तुमच्या परीक्षणाचे विचार येण्यास सुरुवात होते. 

२) मुलांशी चर्चा करताना आपण किती आत्मविश्वासानं बोलतो आहोत हा महत्वाचा घटक. बऱ्याच वेळा आपण अगतिकतेने बोलत असतो. पुढील काळ कठीण असणार आहे असाच एकंदरीत आपल्या बोलण्याचा सूर असतो. मग अशा वेळी मुलांनी तुमचं बोलणं गांभीर्यानं का घ्यावं? जर तुम्ही आम्हांला पुढील काळासाठी आत्मविश्वास देऊ शकत नसाल तर किमान उगाचच फारशी उपयोगी न पडणारी जुन्या काळातील उदाहरणं देऊन आमचा मूड खराब करु नकात अशीच त्यांची मनोधारणा दिसून येते. 

३) दर पिढीनुसार मुलांच्या भावविश्वातील पालकांनी व्यापलेला टक्का कमी होत जाणार आहे. तुम्ही तुमच्या पालकांवर जितक्या प्रमाणात अवलंबून होता तितक्या प्रमाणात मुलं तुमच्यावर अवलंबून नसणार. आजच्या जगात स्वावलंबी बनणं ही काळाची आवश्यकता आहे. ह्या स्वावलंबितेचा side effect म्हणजे त्यांचे तुमच्या पासून काही प्रमाणात दूर जाणं ! त्यामुळं ही बाब वैयक्तिक पातळीवर घेता कामा नये. 

४) ज्या प्रमाणात पालक आता सोशल मीडियावर व्यक्त होत चालले आहेत ते बहुदा नवीन पिढीला आवडत नसावं असा माझा कयास आहे. म्हणजे त्यांचा आक्षेप सोशल मीडियावर व्यक्त होण्यावर नसुन ते व्यक्त होणे सतत चर्चेच्या रुपानं घरात रेंगाळत राहण्याला असावा.

५) भोजने ह्यांनी वर्णिलेली अनिश्चितता आहे हे अगदी शंभर टक्के खरे. पण ह्या अनिश्चिततेची बहुसंख्य कारणे बाह्य जगात नसून आपल्या मनात आहेत. आपण सर्वांनी स्वतःला सिद्ध करण्याचं खूळ डोक्यात घेतलं आहे.  प्रत्येकानं आपल्याला सिद्ध करायलाच हवं का? कदाचित समाजाच्या ज्या विविध संक्रमणावस्था असतील त्यातील एक ही असावी. कालांतरानं एक समाज म्हणून आपल्याला ह्या सिद्धतेच्या मागे धावण्यातील फोलपणा ध्यानात येऊन आपला कल आपल्या स्वभावाला अनुकूल असे राहण्याकडे वळेल. 

६) आता मुख्य मुद्दा म्हणजे हे मुलांना पटवून द्यायचं कसं ? खूप पैसा कमवावा, खूप खर्चावा हा आजच्या जगताचा मूलमंत्र आहे. आधीच्या पिढीनं वेगळं जग पाहिलं असल्यानं ते बहू पैसा कमवावा, बहू पैसा खर्चावा ह्या तत्वाच्या विरोधात विचार करण्याचं त्यांच्याकडं स्वातंत्र्य आहे. पण मुलांना मात्र जीवन जगण्याचा हा एकमेव मार्गवाटत असावा. 

बहुदा वरील विचार सुसंगतपणे मांडण्यात मला अपयश आलंय. पण हेच आजच्या पिढीच्या मानसिक गोंधळाचं प्रतीक आहे. आपले विचार आणि भोवतालची परिस्थिती / भविष्यकालीन जगाची दिशा ह्याची सांगड घालण्यात जो आपला गोंधळ होत आहे त्यातून बाहेर पडण्यात एक समाज म्हणून आपल्याला यश मिळावं हीच ह्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाची आवश्यकता आहे! 

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

बलसागर भारत होवो !




पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटानं मला जाग आली. आसमंताच्या रोमारोमात नैसर्गिकता भरुन राहिली होती. मी खोलीत नजर फिरवली. प्रशस्त अशी खोली पुर्णपणे नैसर्गिक सामुग्रीने बनविण्यात आली आहे हे सांगण्यासाठी कोण्या तज्ञाची गरज नव्हती. समुद्राच्या लाटांच्या आवाजांनी मला अजून एक धक्का बसला. खोलीबाहेर पडताच दिसलेल्या भव्य दिवाणखान्याकडं दुर्लक्ष करुन मी थेट घराबाहेर पडलो. समोरच निळ्याशार समुद्राच्या दर्शनानं नयन सुखावून गेले. भवताली विविध इवले पक्षी आनंदानं बागडत होते. 




काही काळ ह्या प्रसन्न दुनियेत वावरुन मी परत दिवाणखान्यात परतलो.  दिवाणखाना अत्यंत प्रशस्त होता. त्याच्या एका कोपऱ्यात एक काउंटर होता. तिथं विविध फळं आणि फळांच्या रसांनी भरलेले चषक भरुन ठेवले होते. त्यातील एक चषक उचलून मी मऊ अशा सोफ्यावर येऊन बसलो. समोर नजर जाताच मला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला. तिथं पाच मोठाले सोनी कंपनीचे HD दूरदर्शन संच व्यवस्थित मांडून ठेवले होते. त्या मधुर अशा फलरसाचा पहिला घोट घेतला आणि आपल्या आयुष्यात हे काय चाललं आहे ह्याविषयी विचार करण्याची मला प्रथमच उसंत मिळाली. 

अचानक पक्षांचा किलबिलाट थांबला. आणि एक धीरगंभीर आवाज दिवाणखान्याभर पसरला. "वत्सा, हे जे काही चालले आहे त्याविषयी तू चिंता करण्याचे काहीही कारण नाही.  तुला एकंदरीत क्रीडाप्रकाराविषयी अत्यंत प्रेम आहे हे आमच्या ध्यानात आले. तू सध्या जपानपासून हजार मैल दूर असलेल्या एका निसर्गरम्य बेटावर आहेस. इथं पुढील सोळा सतरा दिवस तुझं वास्तव्य असेल. तुझ्यासमोर जे भलेमोठे दूरदर्शन संच आहेत त्यावर त्याक्षणी सुरु असलेल्या ऑलिंपिक खेळांचे थेट प्रक्षेपण सर्व दिवस चालू राहील. एकाच वेळी दोन तीन स्पर्धा बघण्याचा तुझा मोह पाहून आम्ही इतक्या संचांची व्यवस्था केली आहे. ज्या काउंटरवरुन तू हे चषक घेतलेस तिथं चोवीस तास विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. तुझ्या मनात जो काही पदार्थ येईल तो तिथं हजर असेल. आणि हो, पुढील सोळा - सतरा दिवस तू इथं आहेस हे तुझ्या कार्यालयात आणि घरी कळविण्यात आलं आहे!" "कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना?" हा प्रश्न त्या धीरगंभीर ध्वनीला विचारण्याचं धारिष्ट्य मला झालं नाही. 

तो आवाज थांबला आणि पुन्हा पक्षांचा किलबिलाट सुरु झाला. मी पहिला दूरदर्शन संच सुरु केला. ऑलिम्पिक सुरु होण्यासाठी दोन दिवस असले तरीही पुरुष आणि महिला फूटबॉल सामने सुरु झाले होते. उदघाटन सोहळ्याआधी हे सामने सुरु होण्याची पुर्वापार प्रथा आहे.  मला फूटबॉल सामन्यांत फारसा रस नसल्यानं मी ह्या दोन दिवसातील बराचसा भाग खाण्यापिण्यात आणि झोपण्यात घालविला. सायंकाळी दिसणारा सूर्यास्त डोळ्याचं पारणं फिटून टाकणारा होता. फूटबॉल विश्वचषक स्पर्धेला जितक्या प्रमाणात लोकाश्रय मिळतो त्याच्या दहा टक्के सुद्धा ऑलिंपिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या फूटबॉल स्पर्धेला मिळत नाही. बहुदा आघाडीच्या व्यावसायिक खेळाडूंची ऑलिंपिकमध्ये सहभागी न होण्याची मानसिकता हे ह्यामागील मुख्य कारण असावे ! 


२३ जुलै - आज टोकियो ऑलिंपिकच्या उदघाटन सोहळ्याचा दिवस ! जपानी लोकांचे कौतुक करावं तितकं थोडं ! सध्याच्या परिस्थितीत जगातील विविध आघाडीच्या खेळाडूंना आपल्या देशात बोलाविण्याचे, त्या सर्वांना ऑलिंपिक गावात राहण्यासाठी एकत्र ठेवण्याचं धाडस त्यांनी केलं. आणि बऱ्यापैकी निभावलं देखील. उदघाटन सोहळा साधा पण मन प्रसन्न करणारा होता. त्या धीरगंभीर आवाजाच्या सुचनांचे नेमानं पालन करत मी विविध लज्जतदार पदार्थांचे स्मरण करुन त्यांना काउंटरवर पाचारण करत होतो.  खिडकीमध्ये मी उदघाटन सोहळा पाहत असताना काही रंगीबेरंगी पक्षीसुद्धा येऊन बसले होते.

२४ जुलै - आज मुख्य स्पर्धांना प्रारंभ होण्याचा दिवस. मी सकाळीच सज्ज होऊन माझ्या आसनकक्षात स्थानापन्न झालो. नेमबाजी, वेटलिफ्टिंग ह्या स्पर्धा सर्वसाधारणपणे पहिल्या दिवशी आयोजिलेल्या असतात. जागतिक पातळीवरील स्पर्धेत एखाद्या देशाला मिळालेल्या पदकांची संख्या त्या देशात रुजलेल्या क्रीडासंस्कृतीचे प्रतीक असते.  ह्या बाबतीत नक्कीच योग्य दिशेनं सुरु आहे. ह्यात खास उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील काही राज्यं, विभाग ह्याबाबतीत पुढाकार घेत आहेत. हॉकीसाठी ओरिसा, बॅडमिंटनसाठी हैद्राबाद ह्यांनी खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा प्राप्त होतील ह्यासाठी मेहनत घेतली आहे.  बॉक्सिंग, वेटलिफ्टिंगसाठी पुर्वेकडील राज्यं ह्यांनी आपला एक खास ब्रँड निर्माण केला आहे.  महाराष्ट्रातील महिला नेमबाज सुद्धा आशियाई आणि ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बऱ्याच वेळा आशा निर्माण करतात.

पहिल्याच दिवशी मीराबाई चानू हिनं ४९ किलो वेटलिफ्टिंग गटात रौप्य पदक मिळवून देऊन भारताला सुंदर सुरवात करुन दिली. ह्या पूर्वेकडील राज्यातून गेले काही वर्षे भारताला जागतिक दर्जाचे खेळाडू मिळाले आहेत. आपल्या जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी हे खेळाडू खेळाचा आधार घेताना दिसतात. पण भारताच्या महानगरातील युवा मंडळी मात्र बऱ्याच वेळा शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीत मागे पडलेली आहेत! मीराबाई चानूचे मनापासून अभिनंदन करण्यात माझ्यासोबत माझी मित्र बनलेली पक्षी मंडळी सुद्धा सामील झाली होती. 

धनुर्धारी स्पर्धा - विश्वचषक आणि इतर जागतिक स्पर्धांमध्ये भारताची बऱ्याच वेळा चांगली कामगिरी असते. परंतु काही कारणास्तव ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय तिरंदाजांना आपला ठसा उमटवता येत नाही असं आढळून येतं. दीपिकाकुमारी ही अशीच एक गुणी तिरंदाज आहे. भविष्यातील स्पर्धांसाठी दीपिकाला शुभेच्छा. 

ऑलिंपिक हा आनंदसोहळा आहे. जगातील सर्वोत्तम ऍथलिट आपल्या खेळाचा नजराणा आपल्यासमोर पेश करत असतात. केवळ भारताचा सहभाग असलेल्या खेळाच्या वेळीच टीव्ही पाहायला हवा असे नाही. मी मिळालेल्या संधीचा वापर करत व्हॉलीबॉल स्पर्धेतील पुरुष आणि महिला अशा दोन्ही वर्गातील सामने पाहिले. ज्या पद्धतीनं नेटजवळ येऊन ह्या खेळाडू जोरदार फटके मारतात, किंवा वेगानं धावत जाऊन संपूर्ण कोर्ट व्यापतात ते प्रेक्षणीय असते. प्रतिस्पर्धी संघ सर्व्हिस करत असताना ज्या पद्धतीनं आपल्या सहकाऱ्यांना बोटानं खुणा केल्या जातात ते ही बघण्यासारखा ! 

बीच व्हॉलीबॉल मध्ये दोघांचा संघ असतो. हा खेळ आशिया खंडात फारसा प्रसिद्ध नसावा. त्यानंतर लक्षवेधी म्हणजे टेबल टेनिस. ह्यात मा लॉंग ह्या चिनी खेळाडूने माझे लक्ष वेधून घेतलं. भारताच्या शरथ कमलने मा लॉंग विरुद्ध एक गेम जिंकुन माझ्या आशा उंचावल्या होत्या. परंतु मा लॉंग हा खरा जगज्जेता आहे. अत्यंत थंड डोक्यानं ज्या अचुकतेने तो टेबलवर फटके मारतो ते प्रेक्षणीय असते. त्यानं ह्या ऑलिंपिकमध्ये पुन्हा एकदा पुरुष एकेरी स्पर्धेत विजेतेपद पटकावलं!  मोनिका बात्रा ही भारताची आघाडीची खेळाडू. तिनेही तिसरी वा चौथी फेरी गाठली. परंतु मनापासून सांगायचं झालं तर चिनी, कोरिआई स्पर्धकांच्या तोडीस तोड करण्यासाठी अजून आपल्या टेबल टेनिस खेळाडूंना बरीच मजल मारायची आहे. 

टेनिस खेळात अंकिता रैना आणि सानिया मिर्झा ह्या दुहेरीतील जोडीला सलामीच्या सामन्यातच पराभव पत्करावा लागला. अंकिता रैना एकंदरीत गुणी खेळाडू आहे. भविष्यात तिच्याकडून आपल्याला बऱ्याच अपेक्षा बाळगता येतील. टेनिस म्हटलं की लिअँडर पेस आठवला नाही असं होऊ शकत नाही. ह्या गड्याने १९९६ साली आपल्या देशाला वैयक्तिक कांस्य पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर बहुदा २०१६ सालापर्यंत हा जिद्दी खेळाडू ऑलिंपिक खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत राहिला. जोकोव्हिक हा आघाडीचा खेळाडू पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यात अयशस्वी ठरला. टोकियोतील उन्हाळा ह्या आघाडीच्या खेळाडूला झेपला नसावा ! जपान जिच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगून होता ती नेओमी तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानं जपानच्या आशांवर पाणी फिरलं. 

अशाच एका सायंकाळी मी निवांत समुद्रकिनारी विचार करत बसलो होतो. एका ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूमागे बहुदा आठ - दहा हजार प्रयत्नशील खेळाडू असावेत. एखाद्या देशाची क्रीडा संस्कृती ही तो देश ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूचा सन्मान कसा करतो ह्यावर नाही तर त्या प्रयत्नशील आठ - दहा हजार खेळाडूंना सन्मानानं जगण्याची कितपत संधी देतो ह्यावर ठरत असते. 

जिम्नॅस्टिक स्पर्धेतील विविध क्रीडाप्रकार त्यातील सहभागी खेळाडूंनी वर्षोनुवर्षे घेतलेल्या मेहनतीचे आपल्याला दर्शन घडवितात. ह्यातील एखाद्या छोट्या स्टेपमधील चूक सुद्धा तुम्हांला पदकापासून वंचित ठेऊ शकते.  जिम्नॅस्टिक असो वा डायविंग स्पर्धा असो, तुम्ही जमीन अथवा पाण्यावर ज्याप्रकारे पदस्पर्श अथवा मस्तकस्पर्श करता ह्यावर बरेच गुण अवलंबून असतात. 

भारतीय नेमबाजांकडून खूप अपेक्षा होत्या. दुर्दैवानं ह्या ऑलिंपिकमध्ये भारतीय नेमबाजांना फारसं यश मिळालं नाही. ह्या पराभवानं खचून न जाता भारतीय नेमबाजांनी पुढील स्पर्धांत नेत्रदीपक यश मिळवावं ह्याबद्दल त्यांना शुभेच्छा ! हा एक खर्चिक खेळ असल्यानं त्यातील खर्चाचा हिशोब प्रत्येक स्पर्धेनंतर कोणीही मांडू नये ही नम्र विनंती!

बॅडमिंटन हा खेळ आता खऱ्या अर्थानं देशात रुजला आहे. सायना नेहवाल आणि सिंधू ह्या जोडगोळीने जागतिक पातळीवर बऱ्याच स्पर्धांत उच्च दर्जाची कामगिरी केली आहे. सिंधूने ह्या ऑलिंपिकमध्येसुद्धा अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन केले. परंतु दुर्दैवानं उपांत्य फेरीच्या सामन्यात ताई यिंग ह्या तैपेईच्या खेळाडूपुढे तिचा टिकाव लागला नाही. ह्या अगदी बारीक चणीच्या खेळाडूने पहिल्या गेमचा सुरुवातीचा काळ वगळता सिंधूला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. परंतु ह्या पराभवानं खचून न जाता सिंधूने कांस्य पदकाच्या सामन्यात विजयश्री खेचून आणली. लागोपाठच्या दोन ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदके मिळविणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ! 

कुस्तीमध्ये रवी दहियाने रौप्य आणि बजरंग पुनियाने कांस्य पदकाची कमाई करुन भारतीय चाहत्यांना दिलासा दिला. हळूहळू भारत कुस्तीमध्ये आता ताकदवान राष्ट्रांच्या यादीत जाऊन बसावा ही आशा ! महिला वर्गात सुद्धा कुस्ती स्पर्धेत बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु दुर्दैवानं त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. कुस्तीमध्ये Repechage हा एक लक्षवेधी प्रकार आहे. एखादा कुस्तीवीर प्राथमिक फेरीत समजा हरला पण त्याला हरविणारा खेळाडू जर अंतिम फेरीपर्यंत पोहोचला तर अशा Repechage प्रकाराद्वारे कांस्य पदकापर्यंत मजल मारता येऊ शकते. 

छत्तीस वर्षाच्या मेरी कोमची जिद्द वाखाणण्याजोगी! हिने मोठ्या जिद्दीनं पुढील फेऱ्यांत मजल मारली. बॉक्सिंग ह्या खेळातली गुणपद्धती ही अगम्य असते. ती केवळ मलाच समजत नसावी अशी माझी समजूत होती. पण मेरीचा सुद्धा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. आपण पदक जिंकलो आहोत ही तिची समजूत गैरसमजूत ठरली आणि यंदा ऑलिंपिक पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न अधुरे राहिले. परंतु लोव्हलीना हिने मात्र महिलांच्या Welterweight बॉक्सिंग प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

भारतीय महिला हॉकी संघानं सुरुवातीच्या निराशाजनक कामगिरीनंतर मात्र अत्यंत सुरेख खेळ करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत मिळवलेला विजय दीर्घकाळ लक्षात राहील. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या साखळी सामन्यात हरविले खरे पण नंतर मात्र त्यांनी आपल्या गटातील बाकीच्या संघांना हरवून नेत्रदीपक कामगिरीचे प्रदर्शन केले. साखळीतील त्यांनी अर्जेंटिना संघाविरुद्ध मिळविलेला आणि उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटन संघाविरुद्ध  मिळविलेला विजय संस्मरणीयच म्हणावा लागेल ! कृत्रिम पृष्ठभागावर खेळविल्या जाणाऱ्या हॉकीमध्ये खेळाडूंचा फिटनेस खूप महत्त्वाचा घटक ठरतो. चेंडूवर नियंत्रण मिळविण्यासोबत आपल्या संघानं फिटनेसमध्ये सुद्धा आता कमालीची प्रगती केली आहे. ह्या खेळात कमालीची स्पर्धा आहे. आघाडीचे सात आठ संघ तोडीस तोड आहेत. हे सारे लक्षात घेता भारतीय संघाची ही कामगिरी अधिकच प्रशंसनीय ठरते. पुरुष आणि महिला हॉकी संघांच्या कामगिरीचा आलेख असाच उंचावत जावो ह्या शुभेच्छा ! 

ह्या ऑलिंपिक स्पर्धेआधी अदिती अशोक हे नाव फार थोड्या भारतीय रसिकांनी ऐकलं असावं! ही भारतीय महिला गोल्फ खेळाडू जगात दोनशेव्या स्थानावर होती. पण तिने कमालीची कामगिरी करत चार दिवस चाललेल्या बहात्तर फेऱ्यांच्या स्पर्धेत बहुतांश काळ पहिल्या तिघांत स्थान कायम ठेवलं होतं. पण दुर्दैवानं ती अगदी शेवटच्या क्षणी चौथ्या स्थानावर गेली. तिच्या जिद्दीला सलाम ! 

आणि शेवटी भारताच्या ऑलिंपिक इतिहासात ज्याचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल त्या नीरज चोप्राविषयी ! त्यानं ह्या स्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम फेरी ज्या आत्मविश्वासानं कामगिरी बजावली त्याला तोड नाही ! आज ज्या पद्धतीनं तो वावरत होता त्यावेळी सुवर्णपदकावर केवळ माझा आणि माझाच हक्क आहे ह्याविषयी त्याला पूर्ण खात्री होती. ऑलिंपिक सारख्या जागतिक स्पर्धेत इतक्या शांतपणे इतका आत्मविश्वास दर्शविणे ह्याला तोड नाही ! नीरज तुझा आम्हां सर्वांना खूप खूप अभिमान आहे ! तुझी ही कामगिरी भारताच्या युवा पिढीला खूप प्रोत्साहन देईल ह्याविषयी मला तिळमात्र शंका नाही ! 

"पाने घ्यायची का? " ह्या आवाजानं मी दचकलो. धीरगंभीर आवाज, तो काउंटर सारे काही गायब झाले होते. दिवाणखान्यात अजून बरसात आहे सुरु होते. परंतु मला तिळमात्र दुःख झाले नव्हते. नीरजने भरभरुन आनंदाचं, अभिमानाचे दान साऱ्या भारतीयांच्या पदरात टाकलं आहे ! नीरज, टोकियो ऑलिंपिक मध्ये सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यात स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर आपली सर्वोकृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सर्व क्रीडापटूंचा आम्हांला खूप खूप अभिमान आहे! खेळ आणि खेळाडू एक संस्कृतिपूर्ण राष्ट्र घडवितात . भारताची वाटचाल अगदी योग्य दिशेनं चालू आहे !

सोमवार, १९ जुलै, २०२१

गहन ही प्रक्रिया




व्यावसायिक जगात दैनंदिन विविध प्रक्रिया गुण्यागोविदानं घडत असतात. खरंतर त्या गुण्यागोविंदानं पार पडाव्यात म्हणून पडद्यामागं अनेक कलाकार मंडळी अविरत कार्यरत असतात.  माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अशाच काही प्रक्रियांबद्दल अत्यंत सखोल अभ्यास करण्यात आला. त्या चर्चेत मी सहभागी झालो. बरेच आठवडे लांबलेल्या ह्या चर्चेत विद्वान लोकांनी अनेक जुन्या संकल्पनांना उजाळा दिला आणि काहींना जन्म दिला. 

ह्या चर्चेतील महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही व्यावसायिक प्रक्रियेचे काही महत्वाचे घटक असतात. 

सर्वात पहिला महत्वाचा घटक म्हणजे ती प्रक्रिया सुरु करण्याची कोणीतरी केलेली कृती. मी समजा टी शर्ट विकत घेणार आहे तर त्या टी शर्टच्या संगणक किंवा मोबाईलवरील प्रतिमेवर मी केलेला माऊस क्लिक, हा ह्या प्रक्रियेचा जनक. 

दुसरा घटक म्हणजे ही प्रक्रिया कशी घडावी ह्याविषयी त्या प्रक्रियेसंबंधी जबाबदार लोकांनी घालून दिलेले नियम. टी शर्ट विकत घेताना त्याच्या मूळ किमतीवर आदित्याच्या प्रोफाईलनुसार किमतीत किती फेरफार करायचा, आदित्यला जर हा टी शर्ट जंगलात नेऊन द्यायचा असेल तर त्यावर किती जास्तीची किंमत लावायची वगैरे वगैरे. 

तिसरा घटक म्हणजे त्या प्रक्रियेच्या प्रत्येक आवर्तनावर ठेवलेले नियंत्रण (Execution) ! ह्या सर्व प्रक्रियेतील विविध स्क्रीन्स प्रत्येक आवर्तनात ग्राहकांसमोर एका मागोमाग एक विशिष्ट क्रमानेच यायला हव्यात. 

चौथा घटक म्हणजे ही सर्व माहिती माहितीभंडारात साठवून ठेवणे. 

पाचवा घटक म्हणजे पहिल्या चार घटकांमध्ये समन्वय साधण्यास जबाबदार असणारी मंडळी ! त्याला Orchestrator असे भारदस्त नाव आहे. 

सहावा घटक म्हणजे लेखापरीक्षणासाठी पुढील काही वर्षे ह्या सर्व घटकांची, प्रक्रियेची माहिती व्यवस्थित साठवून ठेवणे. 

पोस्टचा विषय आता खरा सुरु होतोय.  व्यावसायिक जगाला विसरा हो ! आज पहिली शिफ्ट करुन लवकर मोकळा झालोय म्हणून तर हे सारे सुचतंय.  आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या एखाद्या प्रक्रियेला ह्या संकल्पनेचे पांघरुण घालण्याचा मोह मी टाळू शकलो नाही. आपल्या दैनंदिन व्यवहारात तर बऱ्याच घटना घडत असतात. काही दररोज घडतात, काही साप्ताहिक, मासिक, वार्षिक तर काही कधीही घडू शकतात. अचानक मला पुरणपोळी बनविण्याची प्रक्रिया आठवली.  ह्या प्रक्रियेचे विश्लेषण करावं असं वाटलं. 

पुरणपोळी बनविण्याच्या प्रक्रियेतील पहिला घटक हा दोन प्रकारचा असू शकतो. एक तर दरवर्षी येणारी होळी ज्यात वार्षिक नियमितता आहे. दुसरा घटक म्हणजे घरातील मंडळींनी गृहिणीकडे पुरणपोळी बनवावी असा धरलेला आग्रह.  

ह्यातला दुसरा घटक पुरणपोळी कशी बनवावी ह्याविषयी त्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेले नियम . दोन चपात्यांमध्ये पुरण पसरवून पुरणपोळी बनविणं ह्या एखाद्या घराण्यातील ग्राह्य नियम असू शकतो. फक्त त्याची ग्राह्यता घरात प्रस्थापित केली गेली पाहिजे. 

तिसरा घटक Execution म्हणजे पुरणपोळी बनविण्याच्या प्रक्रियेतील विविध उपक्रियांचा ठरविलेला क्रम आणि त्यांच्यासाठी ठरवून दिलेला वेळ. प्रत्येक पुरणपोळी बनविताना तो ठरलेला क्रम, ठरलेली वेळ चुकता कामा नये.  

चौथा घटक (काहीसे स्वातंत्र्य घेत) पुरणपोळ्या डब्यात नीट साठवून ठेवणे.   

पाचवा घटक म्हणजे घरातील कोणी एक व्यक्ती जी ह्या पहिल्या चार घटकांमध्ये समन्वय साधेल.  सर्व काही नीट घडलं तरच घरातील सदस्यांच्या ताटात खुसखुशीत पुरणपोळी पडणार.  

सहावा घटक लेखापरीक्षण ह्याचा संबंध कसा जोडावा हे काहीसं समजेनासं झालं.  पण मग लक्षात आलं की समजा कधी चुकून पुरणपोळ्यांचे गणित चुकलं तर ते का चुकलं ह्याची सविस्तर माहिती उपलब्ध असावी. पुढील दहा वर्षात भांडणात ह्या चुकून बिघडलेल्या पुराणपोळ्यांचा उल्लेख आला तर ह्या माहितीचे स्मरण असणे आवश्यक ठरेल! 

बघा म्हणजे घरात इतक्या अनेक प्रक्रिया घडत असतात. ह्यातील प्रत्येक प्रक्रियेत बऱ्याच वेळा हे वरील सहा घटक असतात. म्हणजे एकाच घरात एकाच वेळी किती अनोन्यसंबंध असणाऱ्या विविध प्रक्रिया आणि घटक घडत असतात. घरातील विविध मंडळींनी ह्यातील जमेल त्या प्रक्रिया आणि घटक ह्यांत परस्परसंमतीने भाग घ्यावा. ह्या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा जर कोणी सदस्य घरात असेल तर उत्तमच !  

शनिवार, १० जुलै, २०२१

विम्बल्डनचा मानवी चेहरा


आताच विम्बल्डनच्या महिलांच्या अंतिम फेरीचा ऍशली बार्टी आणि कॅरोलिना प्लिस्कोवा ह्यांच्यात तीन सेट रंगलेला सामना पाहिला. हल्लीच्या अत्यंत कदाचित निष्ठुर म्हणता येईल अशा व्यावसायिक जगतात आपला मानवी चेहरा दाखवून देण्याचे स्तुत्य प्रयत्न अधूनमधून दिसून येतात. विम्बल्डन मात्र अगदी परंपराप्रिय ! महिला आणि पुरुष एकेरीचे अंतिम सामने संपल्यानंतर जो बक्षीस समारंभ होतो तो सुद्धा प्रत्यक्ष सामन्यांइतकाच प्रेक्षणीय असतो. 

विम्बल्डनच्या अंतिम सामन्यानंतर होणाऱ्या बक्षिस समारंभासाठी  इंग्लंडच्या राजघराण्यातील मान्यवर हजेरी लावतात. त्यांच्यासाठी खास पायघड्या अंथरल्या जातात. तिथं त्यांचं आगमन होताना पंधरवडाभर चालणाऱ्या ह्या स्पर्धेत ज्या बॉल बॉय आणि बॉल गर्ल ह्यांनी मोलाचा हातभार लावला त्यांची ते आपुलकीनं चौकशी करताना दिसतात. लहानपणीपासून पाहिलेला हा क्षण अगदी लक्षात राहतो तो म्हणायला गेलं तर फारशी महत्वाची वाटू न शकणाऱ्या ह्या जबाबदारीच्या घेतल्या जाणाऱ्या दखलीमुळं ! केवळ काही सेकंद चालणाऱ्या ह्या चर्चेत राजघराण्यातील व्यक्ती ह्या मुलांकडं नक्की कोणती चौकशी करत असतील हा अजूनही अनुत्तरित राहिलेला प्रश्न !




आजच्या बक्षीससमारंभात सर्व प्रथम दखल घेतली ती सामन्यातील मुख्य पंचाची ! हा सुद्धा संयोजकांच्या संवेदनशीलतेची प्रचिती देणारा क्षण ! त्यानंतर बोलावलं गेलं ते यंदाची उपविजेती ठरलेल्या कॅरोलिनाला ! ऍशलीने सामना जिंकल्यानंतर तिचा आनंदोत्सव सुरु असताना ज्या पद्धतीनं कॅरोलिना एका खुर्चीत बसून होती त्यावेळी बहुदा ही बक्षीस स्वीकारायला आल्यावर गंगा जमुना सुरु होणार असा मला अंदाज आला होता. तिनं सुरुवात तर चांगली केली पण एक दोन वाक्यानंतर बिचारीला अश्रू आवरेनासे झाले. उपविजेत्याच्या बाबतीत टेनिस खेळ अगदी निर्दयी वाटावा असा आहे. तुम्ही दोन आठवड्याच्या अथक मेहनत आणि दर्जेदार खेळाच्या जोरावर इथवर आलेले असता आणि तिसऱ्या सेटमध्ये एक सर्व्हिस ब्रेकमुळे विजेतेपदाच्या ढालीला मुकता ! विजेतेपद आणि उपविजेतेपद ह्यात केवळ एखाद्या डबल फॉल्ट किंवा विनाकारण नेटमध्ये मारलेल्या फटक्याचा फरक असू शकतो. आपल्या पराभवाची कारणं देणं सुरु न करता कॅरोलिनाने बार्टीच्या कौतुकापासून सुरुवात केली! हा सुद्धा एक लक्षणीय दिलदारपणा ! ह्या प्रत्येक खेळाडूची एक टीम असते. त्यात त्यांचे प्रशिक्षक आणि अन्य सहाय्यक संघ असतो. वर्षातील सात आठ महिने ही मंडळी आपल्या कुटुंबापासून दूर फिरत ह्या खेळाडूंची साथ देत असतात. जणू काही हे सुद्धा एक कुटुंबच! कॅरोलिनाने ह्यांचं आभार मानलं ! 

सामना जिंकल्यावर बार्टीने थेट प्रेक्षकात बसलेल्या आपल्या संघाकडं अक्षरशः धाव घेतली. प्रेक्षकांतून पायऱ्या चढून जात ती थेट आपल्या संघाकडं गेली आणि त्यांना कडकडून भेटली ! खचाखच भरलेले प्रेक्षागार पाहून आधीच साशंक झालेलं माझं मन हे दृश्य पाहून तर प्रचंड शंकाकुल झाले ! पण हा झाला बार्टीचा मानवी चेहरा ! बार्टीनं बोलताना सुद्धा ह्या संघाची खूप स्तुती केली ! कॅरोलिनामुळे मला माझ्या खेळाचा दर्जा उंचवावा लागला त्याबद्दल मी तिची आभारी आहे असं ती म्हणाली! सामन्यातील शेवटच्या गुणाविषयी तुला काही म्हणायचं आहे का ? असं तिला विचारण्यात आलं ! "अहो मी तर तो केव्हाच विसरुन गेलेय ! " तिनं खेळकरपणे उत्तर दिलं आणि प्रेक्षागृहात हसू पसरलं ! समालोचकांनी बार्टी पार्टी आता सुरु होणार असं म्हणत चांगलं यमक साधलं ! बार्टी ऑस्ट्रेलियाची, एखाद्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूने विम्बल्डनच्या महिला एकेरी स्पर्धेचे विजेतेपद पटकवायची ही १९८० नंतर  Evonne Goolagong Cawley  ने जिंकलेल्या महिला विजेतेपदानंतरची ही पहिलीच वेळ. Evonne Goolagong Cawley हे नाव मराठीत लिहण्याचं धाडस नाही होत हो ! 

ऍशली आणि कॅरोलिना तुम्हां दोघींचे मनःपूर्वक अभिनंदन ! संपूर्ण सामनाभर मात्र कुठंतरी १९८७ साली मार्टिनाला चुरशीची लढत देऊन हरलेली आणि पुढील वर्षी जिद्दीनं येऊन विम्ब्लडन स्पर्धा जिंकणारी स्टेफीच आठवत राहिली! आयुष्यात काही गोष्टी नाही विसरल्या जात ! 

गुरुवार, ८ जुलै, २०२१

तव नयनाचें दल हललें ग




काल्पनिक 

बा. भ.  बोरकरांचा निषेध असो, निषेध असो ! माझ्या एका पर्यावरण मित्र असलेल्या मित्राचा आजच सकाळ सकाळी फोन आला. सुरुवातच त्यानं अशी खळबळजनक केल्यानंतर त्याला शांत करणे आवश्यक होते.

 "अरे तू कोणाविषयी बोलतोय माहिती आहे का तुला? बा. भ.  बोरकरांच्या कविता वाचून पहा मग तू कसा त्यांचे गोडवे गाऊ लागशील" मी म्हणालो.  

"त्यांची एक कविता आकाशवाणीवर आताच ऐकली म्हणूनच तुला फोन केलाय !" तो गुश्श्यातच होता.  बापरे हे प्रकरण जरा गंभीरच होते. 

"नक्की झालं तरी काय? " मी जरा सबूरीच्या स्वरात म्हणालो. 

"ऐक आता " त्यानं सुरुवात केली. 

तव नयनाचें दल हललें ग !
पानावरच्या दवबिंदूपरि
त्रिभुवन हें डळमळलें ग !

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि, मुनि, योगी चळले ग !

ऋतुचक्राचे आंस उडाले
आकाशांतुनि शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळीं तळमळले ग !"

हृदयीं माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरले ग !

रागाच्या अगदी उच्च पातळीवरुन त्यानं ही कविता एका दमात वाचून दाखवली. आणि ठळक केलेल्या ओळी त्यानं अगदी ठासुन म्हटल्या. एकंदरीत प्रकरणाचा मला अंदाज येऊ लागला होता. 

पाण्याचा एक घोट घेण्यासाठी त्यानं क्षणभराची उसंत घेतली असावी. 

त्रिभुवन हें डळमळलें ग ! - "बोरकरांना काय भूकंप आवडतो की काय?" 

तारे गळले, वारे ढळले - " तारे गळणे हे तर शक्यच नाही ! पण सद्यपरिस्थितीत मान्सून आपला नियमितपणा पूर्ण विसरला असता वारे जर आपल्या मूळ मार्गापासून ढळले तर भारतीय कृषिक्षेत्रावर किती अनिष्ट परिणाम होईल ह्याचा बोरकरांनी विचार करायला हवा !"

गिरि ढासळले - "बोरकरांना इथं हिमस्खलन अभिप्रेत आहे की काय? पर्यावरणाच्या दृष्टीनं भारतीय उपखंडात पर्वतांचे महत्व किती अनन्यसाधारण आहे ह्यावर माझ्याकडं दीडशे पानाचा प्रबंध आहे. तुला तो पाठवून देतो." सद्यपरिस्थितीत हा मित्र थेट घरी येऊ शकत नाही ह्या विचारानं मला हायसं वाटलं . 

मीन जळीं तळमळले ग !" - "तुम्ही मोठाली जहाजे समुद्रात पाठवून द्यायची आणि त्यातून तेलाची गळती होऊन द्यायची! मग समुद्रातील मासे तळमळणार नाही तर काय आनंदानं नाचणार ? "

पुढील पंधरा वीस मिनिटं मी त्याचं कवीकल्पना ह्या संकल्पनेवर माझ्या अकलेनुसार संबोधन घेतलं. 

"तुला कॉलेजात असताना ती मुलगी आवडायची तिनं एकदा तुझ्याकडं हसून पाहिलं होतं त्यावेळी तुला कसं वाटलं होतं?" मी त्याला विचारलं 

"हृदयाचे ठोके चुकले होते ... " तो मी त्याच्या मर्मावर अचानक बोट ठेवल्यानं  एकदम नरमला. 

"पण त्याचा इथं काय संबंध " दुसऱ्या क्षणी तो पुन्हा खवळून उठला !

"चलाओ  ना नैनो के बाण रे ! चार पाच वर्षांपूर्वी हे गाणं म्हणत कोण थिरकत नाचत होतं ?" मी सुटलो होतो 

"मीच तो !" त्याचं उरलंसुरलं अवसान गळायच्या मार्गावर होतं. 

"प्रेयसीच्या केवळ एका नजरेनं प्रियकराच्या भावनिक विश्वात काय खळबळ माजू शकते ह्याचा कल्पनाविलास बा  भ बोरकरांनी ह्या कवितेतून केला आहे. त्यांच्या प्रतिभाशक्तीला तू दाद द्यावीस असा माझा आग्रह आहे ! " मी गरजलो 

काल्पनिक भाग समाप्त !

मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर ह्यांची आज सदतिसावी पुण्यतिथी ! सकाळी आकाशवाणीने त्यांचं स्मरण करत सलील कुलकर्णी ह्यांच्या आवाजातील तव नयनाचें दल हललें ग हे एक सुरेख गीत ऐकवले. निवेदकाने जो मोजक्या शब्दांत बाकिबाब ह्यांचा परिचय करुन दिला त्यावरुन त्यांच्या प्रतिभेचा अंदाज आला. अगदी तरुणपणी त्यांनी कवितालेखनास सुरुवात केली ! विविध व्यासपीठावरुन, कवितासंग्रहाद्वारे त्यांनी आपल्या कवितांचा आनंद रसिकांना दिला. मराठी साहित्य संमेलन, कोकणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. 

मराठी भाषेतील एक नावाजलेले कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  बोरकरांच्या पवित्र स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन ! 

रविवार, २७ जून, २०२१

पाऊस कोसळतच असतो ..







रविवार सकाळ.पावसाला वाटतं म्हणून तो कोसळू लागतो. रविवार सकाळी अंघोळ आटपुन निवांत बसल्यावर पाऊस सुरु होण्यासारखं सुख नाही. पाऊस आकाशातून लक्षावधी थेंबांना घेऊन धरतीमातेकडे येत राहतो. त्यातील बरेचसे थेट धरतीमातेच्या कुशीत विसावतात. पण काही मात्र झाडापानांवर विसावतात, नाखुशीने मग धरणीमातेकडं झेपावतात. थेट धरणीमातेच्या कुशीत सामावणाऱ्या अथवा प्रथम झाडापानांवर विसावणाऱ्या थेंबांच्या मनात आपल्या बाबतीत भेदभाव झाला आहे ही भावनाच मुळी नसते. पाऊस कोसळतच असतो ... 

पाऊस माणसांत भावनांची वादळं निर्माण करतो. माणसं विचारात गढून जातो. ह्या विचारांत काही सुसूत्रता नसते. विचार उगम पावतात, मेंदूपर्यंत पोहोचतात. काही मनाला सुखावतात, काही कष्ट देतात. मनाला रविवारी सकाळी कष्ट देणाऱ्या विचारांचा राग येतो. मेंदू त्यांना प्रयत्नपूर्वक दूर सारतो. समोर गच्चीवर कावळा पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बसलेला असतो. कावळे सकाळी शांत असतात, पण सायंकाळी मात्र खूप कावकाव करतात.  पावसात आपल्याला स्वतःचं हक्काचं घरटं नसल्यानं दुसऱ्यांच्या गच्चीवर आश्रय घ्यावा लागतोय ही अपराधी भावना मुळी त्या कावळ्याच्या मनात नसते !पाऊस कोसळतच असतो ... 

मन मग मागच्या काही पावसाळ्यांच्या आठवणीत गुंततं. मनाला गुंतण्यासाठी काहीही चालतं. कारण मन सध्या काहीसं हळुवार बनलेलं असतं. मनालाच प्रश्न पडतो की आज आपलं हळवं रुप का सामोरं यावं? मन ह्यासाठी पावसाला जबाबदार धरतं. पाऊस सांगतो, "अरे सध्या माझे दिवस आहेत, मी रिपरिप करत पडीन किंवा धोधो कोसळेन. माझ्या आगमनानं बरेच लोक उत्साहित झाले आहेत, निसर्गाच्या हाकेला ओ देत बाहेर पडले आहेत" मनाला पावसाचं हे म्हणणं पटतं. आपल्या मनस्थितीबद्दल कोणाला जबाबदार धरणं चुकीचं आहे हे मनच मनाला समजावत राहतं. पाऊस कोसळतच असतो ... 

मनाला अचानक एक उक्ति आठवते.  "Life is about becoming better version of yourself!" मन बंडखोरीच्या पवित्र्यात असतं. सुधारित ह्या संज्ञेचा अर्थच सापेक्ष नाही का?  जर ह्या संज्ञेचे विविध अर्थ शक्य असू शकतात तर त्यातील एकाच अर्थाच्या अनुषंगानं सतत स्वतःच्या सुधारित आवृत्तीचा ध्यास का धरावा? पाऊस कोसळतच असतो ... 

कसोटीच्या मोक्याच्या क्षणी भारतीय संघाला आपलं better version का सादर करता आलं नाही ? आठवड्यातील सर्वच दिवशी तुला स्वतःच्या better version च्या स्थितीत का पोहोचता आलं नाही? मनाचं बहुदा बंडखोर रुप जागृत झालं होतं. भोवतालच्या परिसंस्थेतील असंख्य घटक तुझ्या सादर होणाऱ्या रुपावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या परिणाम करत असतात. तुझं better version सादर व्हायचं असेल तर त्यातील महत्वाच्या काही घटकांशी होणारा तुझा संबंध सकारात्मक असायला हवा ! जसं परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याला वर्षभराच्या अभ्यासासोबत शेवटच्या काही दिवसातील / आदल्या दिवशी केलेली  उजळणी, पुरेशी झोप, आहार महत्वाचा असतो. मन का कोणास ठाऊक समाजावणीच्या रुपाकडे पोहोचले होते.  पाऊस कोसळतच असतो ...

हे सारे लाड आहेत. एकदा का कर्मभूमीवर पोहोचले की प्रत्येक वेळी better नव्हे तर best version देता यायलाच हवं. बहुदा मन sinusoidal स्थितीतून जात असावं. कर्मभूमीवर पोहोचल्यावर त्याआधी काही घडलं ते सारं विसरता यायला हवं आणि उपलब्ध माहितीआधारे सर्वोत्तम कामगिरी बजावता यायला हवी !  पाऊस कोसळतच असतो ...

मनाला विचारांचं द्वंद्व झेपेनासं होतं. कावळा उडून दिसेनासा होतो. उरलेसुरले थेंब धरणीमातेच्या कुशीत आपल्या सवंगड्यांना भेटून सुखावलेले असतात. रविवार आता दुपारकडे झुकलेला असतो. एव्हाना पाऊस थांबलेला असतो ! 

रविवार, २० जून, २०२१

शेरनी !



आपल्या सभोवताली घडणाऱ्या एखाद्या घटनेवर आधारित चित्रपट निर्मिती करताना दिग्दर्शकासमोर दोन पर्याय उपलब्ध असतात. व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून वास्तवाला बाजूला सारून चित्रपट निर्मिती करायची. यामध्ये एक दिग्दर्शक म्हणून तुम्हांला जे कलानिर्मितीचे स्वातंत्र्य मिळालेलं असतं त्याचा तुम्ही वापर करत असता.  व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी हा दृष्टिकोन आवश्यक आहे अशी बऱ्याच निर्मात्यांची बॉलिवूडमध्ये धारणा आहे.  दुसरा दृष्टिकोन म्हणजे ज्या पद्धतीने ही घटना वास्तवात घडत असावी ती त्याच पद्धतीने सादर करण्याचा आटोकाट प्रयत्न करणे. शेरनी या चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शक आणि दुसरा दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. 

ही कथा उत्तर भारतातील वनखात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या एका जंगलातील वाघिणीची आणि त्या जंगलातील वनअधिकारी असलेल्या विद्या बालनची ! प्रतीकात्मकदृष्टया पाहायला गेलं तर कथेत दोघीही परिस्थितीच्या शिकार होतात. त्यामुळं शेरनी हे  चित्रपटाचं शीर्षक म्हटलं तर दोघींनाही नजरेसमोर ठेवून  देण्यात आलं असावं ! मूळ समस्या - वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी मनुष्यवस्तीनं जंगलांत केलेला शिरकाव, जंगली प्राण्यांच्या नेहमीच्या येण्याजाण्याच्या मार्गात येणारी गावं, शेतं आणि त्यामुळं बकऱ्यांसारख्या माणसानं पाळलेल्या प्राण्यांच्या शिकारीसाठी चटावलेले रानटी प्राणी.  हा संघर्ष आहे तो मनुष्यांच्या दोन दृष्टिकोनांचा. वनअधिकारी, वनखाते आणि पशुमित्र एका बाजुला तर येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाघिणीने घेतलेल्या मनुष्यबळींचे भांडवल करु पाहणारे राजकीय नेते.  विकास आणि पर्यावरण संतुलन ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे परस्परविरोधी (mutually exclusive) आहेत; त्या गुण्यागोविंदाने एकत्र नांदु शकत नाहीत अशा आशयाचं विधान चित्रपटात एकदा येतं ! 

अशा निबिड अरण्यात बहुतांशी पुरुषांचं अधिराज्य असलेल्या वनखात्यात वरिष्ठ पदावर असलेल्या स्त्री अधिकाऱ्यांच्या समस्या विविध प्रसंगांमधून आपल्यासमोर येत राहतात. त्यावर ही एक समस्या आहे अशी स्पष्ट टिपण्णी करण्याचा मोह इथं टाळण्यात आला आहे. राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडण्याचा आटोकाट प्रयत्न विद्या करते. पण कधीही त्याविरुद्ध ती बंड करुन उठताना दिसत नाही. ह्या सर्व दांभिकपणाला कंटाळून मी नोकरी सोडून मुंबईला येते असंही ती आपल्या नवऱ्याला म्हणते. पण माझ्या नोकरीचं काही खरं नाही त्यामुळं तुझी सरकारी नोकरी कशीही करुन टिकवून ठेव असंच नवरा म्हणतो. 

मनुष्य आणि वन्यप्राणी सहजीवन तत्वांचे पालन करुन राहू शकतात ही विद्या, वन्यमित्र आणि विरोधकांची भावना. ह्याउलट मनुष्याचा जीव महत्वाचा आहे त्यामुळं ह्या वाघिणीला तात्काळ मारलं पाहिजे ही दुसऱ्या बाजूची विचारधारणा ! त्यांच्यासोबत पंचवीस वाघांची शिकार केलेला एक गर्विष्ठ शिकारी! वाघिणीला आपल्या दोन बछड्यांसह एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जायचं असतं. ह्या मार्गात मनुष्यवस्तीसोबतच एक मोठाली खाण सुद्धा असते. काही दिवसांपुर्वी DW ह्या जर्मन वाहिनीवर कोळशांच्या खाणीमुळं भारतातील पिढ्यानपिढ्या जंगलात राहणाऱ्या हजारो लोकांची आयुष्यं कशी उध्वस्त झाली आहे ह्यावर हृदयस्पर्शी माहितीपट पाहिला होता त्याची ह्या निमित्तानं आठवण झाली. 

हा चित्रपट एका संथ लयीत पुढं सरकत राहतो. अनुभवायचा असेल तर त्या आदिवासी पाड्यातील एक रहिवासी म्हणून ह्याकडं पाहावं. काला पत्थरसारख्या चित्रपटात खाण कामगारांच्या मूळ समस्येला हात घालण्याचा प्रयत्न नसतो.अशा  चित्रपटांत  ह्या समस्येमुळं प्रभावित काही पात्रांची कथा आपल्यासमोर येते. नायक नायिकेसोबत नाचगाणी करत, खलनायकाशी मारामारी करत त्या मोजक्या पात्रांना सुखी करतो आणि आपण आनंदी होतो. चित्रपट संपला की ती समस्या चित्रपटगृहातच ठेवून आपण आनंदी मनानं घरी यायचं असतं. शेरनी चित्रपटातील विद्या ही लौकिकार्थानं नायिका नाही. तिलाही आपल्यासारख्या समस्या आहेत, नोकरी टिकवायची आहे, त्यामुळं ती छोट्या विजयात समाधान मानते. हा चित्रपट आपण घरी पाहतो. चित्रपट पाहून विसरुन जाणं हे दिग्दर्शकाला आपल्याकडून अपेक्षित नाही. पर्यावरण विरुद्ध विकास हा जो काही लढा आहे त्यात माझी भूमिका कोणती आणि त्यासंदर्भात मी कोणते ठोस पाऊल उचलणार हा प्रश्न चित्रपट आपल्याला विचारतो. त्यामुळं घरात बसून शनिवारी सायंकाळी पाहिलेला हा चित्रपट आपल्या मनातच घोळत राहायला हवा हे ह्या शेरनीला आपल्याकडून अपेक्षित आहे ! 

(तळटीप - शेरनी म्हणजे सिंहीण ह्याची खात्री मी घरी विचारुन केली. परंतु चित्रपटात केवळ एकदा दर्शन देणाऱ्या ही शेरनी मराठीत वाघिणच आहे ही माझी समजूत !)

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...