मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

बलसागर भारत होवो !




पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटानं मला जाग आली. आसमंताच्या रोमारोमात नैसर्गिकता भरुन राहिली होती. मी खोलीत नजर फिरवली. प्रशस्त अशी खोली पुर्णपणे नैसर्गिक सामुग्रीने बनविण्यात आली आहे हे सांगण्यासाठी कोण्या तज्ञाची गरज नव्हती. समुद्राच्या लाटांच्या आवाजांनी मला अजून एक धक्का बसला. खोलीबाहेर पडताच दिसलेल्या भव्य दिवाणखान्याकडं दुर्लक्ष करुन मी थेट घराबाहेर पडलो. समोरच निळ्याशार समुद्राच्या दर्शनानं नयन सुखावून गेले. भवताली विविध इवले पक्षी आनंदानं बागडत होते. 




काही काळ ह्या प्रसन्न दुनियेत वावरुन मी परत दिवाणखान्यात परतलो.  दिवाणखाना अत्यंत प्रशस्त होता. त्याच्या एका कोपऱ्यात एक काउंटर होता. तिथं विविध फळं आणि फळांच्या रसांनी भरलेले चषक भरुन ठेवले होते. त्यातील एक चषक उचलून मी मऊ अशा सोफ्यावर येऊन बसलो. समोर नजर जाताच मला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला. तिथं पाच मोठाले सोनी कंपनीचे HD दूरदर्शन संच व्यवस्थित मांडून ठेवले होते. त्या मधुर अशा फलरसाचा पहिला घोट घेतला आणि आपल्या आयुष्यात हे काय चाललं आहे ह्याविषयी विचार करण्याची मला प्रथमच उसंत मिळाली. 

अचानक पक्षांचा किलबिलाट थांबला. आणि एक धीरगंभीर आवाज दिवाणखान्याभर पसरला. "वत्सा, हे जे काही चालले आहे त्याविषयी तू चिंता करण्याचे काहीही कारण नाही.  तुला एकंदरीत क्रीडाप्रकाराविषयी अत्यंत प्रेम आहे हे आमच्या ध्यानात आले. तू सध्या जपानपासून हजार मैल दूर असलेल्या एका निसर्गरम्य बेटावर आहेस. इथं पुढील सोळा सतरा दिवस तुझं वास्तव्य असेल. तुझ्यासमोर जे भलेमोठे दूरदर्शन संच आहेत त्यावर त्याक्षणी सुरु असलेल्या ऑलिंपिक खेळांचे थेट प्रक्षेपण सर्व दिवस चालू राहील. एकाच वेळी दोन तीन स्पर्धा बघण्याचा तुझा मोह पाहून आम्ही इतक्या संचांची व्यवस्था केली आहे. ज्या काउंटरवरुन तू हे चषक घेतलेस तिथं चोवीस तास विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. तुझ्या मनात जो काही पदार्थ येईल तो तिथं हजर असेल. आणि हो, पुढील सोळा - सतरा दिवस तू इथं आहेस हे तुझ्या कार्यालयात आणि घरी कळविण्यात आलं आहे!" "कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना?" हा प्रश्न त्या धीरगंभीर ध्वनीला विचारण्याचं धारिष्ट्य मला झालं नाही. 

तो आवाज थांबला आणि पुन्हा पक्षांचा किलबिलाट सुरु झाला. मी पहिला दूरदर्शन संच सुरु केला. ऑलिम्पिक सुरु होण्यासाठी दोन दिवस असले तरीही पुरुष आणि महिला फूटबॉल सामने सुरु झाले होते. उदघाटन सोहळ्याआधी हे सामने सुरु होण्याची पुर्वापार प्रथा आहे.  मला फूटबॉल सामन्यांत फारसा रस नसल्यानं मी ह्या दोन दिवसातील बराचसा भाग खाण्यापिण्यात आणि झोपण्यात घालविला. सायंकाळी दिसणारा सूर्यास्त डोळ्याचं पारणं फिटून टाकणारा होता. फूटबॉल विश्वचषक स्पर्धेला जितक्या प्रमाणात लोकाश्रय मिळतो त्याच्या दहा टक्के सुद्धा ऑलिंपिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या फूटबॉल स्पर्धेला मिळत नाही. बहुदा आघाडीच्या व्यावसायिक खेळाडूंची ऑलिंपिकमध्ये सहभागी न होण्याची मानसिकता हे ह्यामागील मुख्य कारण असावे ! 


२३ जुलै - आज टोकियो ऑलिंपिकच्या उदघाटन सोहळ्याचा दिवस ! जपानी लोकांचे कौतुक करावं तितकं थोडं ! सध्याच्या परिस्थितीत जगातील विविध आघाडीच्या खेळाडूंना आपल्या देशात बोलाविण्याचे, त्या सर्वांना ऑलिंपिक गावात राहण्यासाठी एकत्र ठेवण्याचं धाडस त्यांनी केलं. आणि बऱ्यापैकी निभावलं देखील. उदघाटन सोहळा साधा पण मन प्रसन्न करणारा होता. त्या धीरगंभीर आवाजाच्या सुचनांचे नेमानं पालन करत मी विविध लज्जतदार पदार्थांचे स्मरण करुन त्यांना काउंटरवर पाचारण करत होतो.  खिडकीमध्ये मी उदघाटन सोहळा पाहत असताना काही रंगीबेरंगी पक्षीसुद्धा येऊन बसले होते.

२४ जुलै - आज मुख्य स्पर्धांना प्रारंभ होण्याचा दिवस. मी सकाळीच सज्ज होऊन माझ्या आसनकक्षात स्थानापन्न झालो. नेमबाजी, वेटलिफ्टिंग ह्या स्पर्धा सर्वसाधारणपणे पहिल्या दिवशी आयोजिलेल्या असतात. जागतिक पातळीवरील स्पर्धेत एखाद्या देशाला मिळालेल्या पदकांची संख्या त्या देशात रुजलेल्या क्रीडासंस्कृतीचे प्रतीक असते.  ह्या बाबतीत नक्कीच योग्य दिशेनं सुरु आहे. ह्यात खास उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील काही राज्यं, विभाग ह्याबाबतीत पुढाकार घेत आहेत. हॉकीसाठी ओरिसा, बॅडमिंटनसाठी हैद्राबाद ह्यांनी खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा प्राप्त होतील ह्यासाठी मेहनत घेतली आहे.  बॉक्सिंग, वेटलिफ्टिंगसाठी पुर्वेकडील राज्यं ह्यांनी आपला एक खास ब्रँड निर्माण केला आहे.  महाराष्ट्रातील महिला नेमबाज सुद्धा आशियाई आणि ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बऱ्याच वेळा आशा निर्माण करतात.

पहिल्याच दिवशी मीराबाई चानू हिनं ४९ किलो वेटलिफ्टिंग गटात रौप्य पदक मिळवून देऊन भारताला सुंदर सुरवात करुन दिली. ह्या पूर्वेकडील राज्यातून गेले काही वर्षे भारताला जागतिक दर्जाचे खेळाडू मिळाले आहेत. आपल्या जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी हे खेळाडू खेळाचा आधार घेताना दिसतात. पण भारताच्या महानगरातील युवा मंडळी मात्र बऱ्याच वेळा शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीत मागे पडलेली आहेत! मीराबाई चानूचे मनापासून अभिनंदन करण्यात माझ्यासोबत माझी मित्र बनलेली पक्षी मंडळी सुद्धा सामील झाली होती. 

धनुर्धारी स्पर्धा - विश्वचषक आणि इतर जागतिक स्पर्धांमध्ये भारताची बऱ्याच वेळा चांगली कामगिरी असते. परंतु काही कारणास्तव ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय तिरंदाजांना आपला ठसा उमटवता येत नाही असं आढळून येतं. दीपिकाकुमारी ही अशीच एक गुणी तिरंदाज आहे. भविष्यातील स्पर्धांसाठी दीपिकाला शुभेच्छा. 

ऑलिंपिक हा आनंदसोहळा आहे. जगातील सर्वोत्तम ऍथलिट आपल्या खेळाचा नजराणा आपल्यासमोर पेश करत असतात. केवळ भारताचा सहभाग असलेल्या खेळाच्या वेळीच टीव्ही पाहायला हवा असे नाही. मी मिळालेल्या संधीचा वापर करत व्हॉलीबॉल स्पर्धेतील पुरुष आणि महिला अशा दोन्ही वर्गातील सामने पाहिले. ज्या पद्धतीनं नेटजवळ येऊन ह्या खेळाडू जोरदार फटके मारतात, किंवा वेगानं धावत जाऊन संपूर्ण कोर्ट व्यापतात ते प्रेक्षणीय असते. प्रतिस्पर्धी संघ सर्व्हिस करत असताना ज्या पद्धतीनं आपल्या सहकाऱ्यांना बोटानं खुणा केल्या जातात ते ही बघण्यासारखा ! 

बीच व्हॉलीबॉल मध्ये दोघांचा संघ असतो. हा खेळ आशिया खंडात फारसा प्रसिद्ध नसावा. त्यानंतर लक्षवेधी म्हणजे टेबल टेनिस. ह्यात मा लॉंग ह्या चिनी खेळाडूने माझे लक्ष वेधून घेतलं. भारताच्या शरथ कमलने मा लॉंग विरुद्ध एक गेम जिंकुन माझ्या आशा उंचावल्या होत्या. परंतु मा लॉंग हा खरा जगज्जेता आहे. अत्यंत थंड डोक्यानं ज्या अचुकतेने तो टेबलवर फटके मारतो ते प्रेक्षणीय असते. त्यानं ह्या ऑलिंपिकमध्ये पुन्हा एकदा पुरुष एकेरी स्पर्धेत विजेतेपद पटकावलं!  मोनिका बात्रा ही भारताची आघाडीची खेळाडू. तिनेही तिसरी वा चौथी फेरी गाठली. परंतु मनापासून सांगायचं झालं तर चिनी, कोरिआई स्पर्धकांच्या तोडीस तोड करण्यासाठी अजून आपल्या टेबल टेनिस खेळाडूंना बरीच मजल मारायची आहे. 

टेनिस खेळात अंकिता रैना आणि सानिया मिर्झा ह्या दुहेरीतील जोडीला सलामीच्या सामन्यातच पराभव पत्करावा लागला. अंकिता रैना एकंदरीत गुणी खेळाडू आहे. भविष्यात तिच्याकडून आपल्याला बऱ्याच अपेक्षा बाळगता येतील. टेनिस म्हटलं की लिअँडर पेस आठवला नाही असं होऊ शकत नाही. ह्या गड्याने १९९६ साली आपल्या देशाला वैयक्तिक कांस्य पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर बहुदा २०१६ सालापर्यंत हा जिद्दी खेळाडू ऑलिंपिक खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत राहिला. जोकोव्हिक हा आघाडीचा खेळाडू पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यात अयशस्वी ठरला. टोकियोतील उन्हाळा ह्या आघाडीच्या खेळाडूला झेपला नसावा ! जपान जिच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगून होता ती नेओमी तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानं जपानच्या आशांवर पाणी फिरलं. 

अशाच एका सायंकाळी मी निवांत समुद्रकिनारी विचार करत बसलो होतो. एका ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूमागे बहुदा आठ - दहा हजार प्रयत्नशील खेळाडू असावेत. एखाद्या देशाची क्रीडा संस्कृती ही तो देश ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूचा सन्मान कसा करतो ह्यावर नाही तर त्या प्रयत्नशील आठ - दहा हजार खेळाडूंना सन्मानानं जगण्याची कितपत संधी देतो ह्यावर ठरत असते. 

जिम्नॅस्टिक स्पर्धेतील विविध क्रीडाप्रकार त्यातील सहभागी खेळाडूंनी वर्षोनुवर्षे घेतलेल्या मेहनतीचे आपल्याला दर्शन घडवितात. ह्यातील एखाद्या छोट्या स्टेपमधील चूक सुद्धा तुम्हांला पदकापासून वंचित ठेऊ शकते.  जिम्नॅस्टिक असो वा डायविंग स्पर्धा असो, तुम्ही जमीन अथवा पाण्यावर ज्याप्रकारे पदस्पर्श अथवा मस्तकस्पर्श करता ह्यावर बरेच गुण अवलंबून असतात. 

भारतीय नेमबाजांकडून खूप अपेक्षा होत्या. दुर्दैवानं ह्या ऑलिंपिकमध्ये भारतीय नेमबाजांना फारसं यश मिळालं नाही. ह्या पराभवानं खचून न जाता भारतीय नेमबाजांनी पुढील स्पर्धांत नेत्रदीपक यश मिळवावं ह्याबद्दल त्यांना शुभेच्छा ! हा एक खर्चिक खेळ असल्यानं त्यातील खर्चाचा हिशोब प्रत्येक स्पर्धेनंतर कोणीही मांडू नये ही नम्र विनंती!

बॅडमिंटन हा खेळ आता खऱ्या अर्थानं देशात रुजला आहे. सायना नेहवाल आणि सिंधू ह्या जोडगोळीने जागतिक पातळीवर बऱ्याच स्पर्धांत उच्च दर्जाची कामगिरी केली आहे. सिंधूने ह्या ऑलिंपिकमध्येसुद्धा अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन केले. परंतु दुर्दैवानं उपांत्य फेरीच्या सामन्यात ताई यिंग ह्या तैपेईच्या खेळाडूपुढे तिचा टिकाव लागला नाही. ह्या अगदी बारीक चणीच्या खेळाडूने पहिल्या गेमचा सुरुवातीचा काळ वगळता सिंधूला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. परंतु ह्या पराभवानं खचून न जाता सिंधूने कांस्य पदकाच्या सामन्यात विजयश्री खेचून आणली. लागोपाठच्या दोन ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदके मिळविणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ! 

कुस्तीमध्ये रवी दहियाने रौप्य आणि बजरंग पुनियाने कांस्य पदकाची कमाई करुन भारतीय चाहत्यांना दिलासा दिला. हळूहळू भारत कुस्तीमध्ये आता ताकदवान राष्ट्रांच्या यादीत जाऊन बसावा ही आशा ! महिला वर्गात सुद्धा कुस्ती स्पर्धेत बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु दुर्दैवानं त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. कुस्तीमध्ये Repechage हा एक लक्षवेधी प्रकार आहे. एखादा कुस्तीवीर प्राथमिक फेरीत समजा हरला पण त्याला हरविणारा खेळाडू जर अंतिम फेरीपर्यंत पोहोचला तर अशा Repechage प्रकाराद्वारे कांस्य पदकापर्यंत मजल मारता येऊ शकते. 

छत्तीस वर्षाच्या मेरी कोमची जिद्द वाखाणण्याजोगी! हिने मोठ्या जिद्दीनं पुढील फेऱ्यांत मजल मारली. बॉक्सिंग ह्या खेळातली गुणपद्धती ही अगम्य असते. ती केवळ मलाच समजत नसावी अशी माझी समजूत होती. पण मेरीचा सुद्धा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. आपण पदक जिंकलो आहोत ही तिची समजूत गैरसमजूत ठरली आणि यंदा ऑलिंपिक पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न अधुरे राहिले. परंतु लोव्हलीना हिने मात्र महिलांच्या Welterweight बॉक्सिंग प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

भारतीय महिला हॉकी संघानं सुरुवातीच्या निराशाजनक कामगिरीनंतर मात्र अत्यंत सुरेख खेळ करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत मिळवलेला विजय दीर्घकाळ लक्षात राहील. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या साखळी सामन्यात हरविले खरे पण नंतर मात्र त्यांनी आपल्या गटातील बाकीच्या संघांना हरवून नेत्रदीपक कामगिरीचे प्रदर्शन केले. साखळीतील त्यांनी अर्जेंटिना संघाविरुद्ध मिळविलेला आणि उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटन संघाविरुद्ध  मिळविलेला विजय संस्मरणीयच म्हणावा लागेल ! कृत्रिम पृष्ठभागावर खेळविल्या जाणाऱ्या हॉकीमध्ये खेळाडूंचा फिटनेस खूप महत्त्वाचा घटक ठरतो. चेंडूवर नियंत्रण मिळविण्यासोबत आपल्या संघानं फिटनेसमध्ये सुद्धा आता कमालीची प्रगती केली आहे. ह्या खेळात कमालीची स्पर्धा आहे. आघाडीचे सात आठ संघ तोडीस तोड आहेत. हे सारे लक्षात घेता भारतीय संघाची ही कामगिरी अधिकच प्रशंसनीय ठरते. पुरुष आणि महिला हॉकी संघांच्या कामगिरीचा आलेख असाच उंचावत जावो ह्या शुभेच्छा ! 

ह्या ऑलिंपिक स्पर्धेआधी अदिती अशोक हे नाव फार थोड्या भारतीय रसिकांनी ऐकलं असावं! ही भारतीय महिला गोल्फ खेळाडू जगात दोनशेव्या स्थानावर होती. पण तिने कमालीची कामगिरी करत चार दिवस चाललेल्या बहात्तर फेऱ्यांच्या स्पर्धेत बहुतांश काळ पहिल्या तिघांत स्थान कायम ठेवलं होतं. पण दुर्दैवानं ती अगदी शेवटच्या क्षणी चौथ्या स्थानावर गेली. तिच्या जिद्दीला सलाम ! 

आणि शेवटी भारताच्या ऑलिंपिक इतिहासात ज्याचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल त्या नीरज चोप्राविषयी ! त्यानं ह्या स्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम फेरी ज्या आत्मविश्वासानं कामगिरी बजावली त्याला तोड नाही ! आज ज्या पद्धतीनं तो वावरत होता त्यावेळी सुवर्णपदकावर केवळ माझा आणि माझाच हक्क आहे ह्याविषयी त्याला पूर्ण खात्री होती. ऑलिंपिक सारख्या जागतिक स्पर्धेत इतक्या शांतपणे इतका आत्मविश्वास दर्शविणे ह्याला तोड नाही ! नीरज तुझा आम्हां सर्वांना खूप खूप अभिमान आहे ! तुझी ही कामगिरी भारताच्या युवा पिढीला खूप प्रोत्साहन देईल ह्याविषयी मला तिळमात्र शंका नाही ! 

"पाने घ्यायची का? " ह्या आवाजानं मी दचकलो. धीरगंभीर आवाज, तो काउंटर सारे काही गायब झाले होते. दिवाणखान्यात अजून बरसात आहे सुरु होते. परंतु मला तिळमात्र दुःख झाले नव्हते. नीरजने भरभरुन आनंदाचं, अभिमानाचे दान साऱ्या भारतीयांच्या पदरात टाकलं आहे ! नीरज, टोकियो ऑलिंपिक मध्ये सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यात स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर आपली सर्वोकृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सर्व क्रीडापटूंचा आम्हांला खूप खूप अभिमान आहे! खेळ आणि खेळाडू एक संस्कृतिपूर्ण राष्ट्र घडवितात . भारताची वाटचाल अगदी योग्य दिशेनं चालू आहे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...