मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ६ जुलै, २०२४

२०२४ - युरोप सहल - भाग ३- लंडन



लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर जुन्या आठवणी जागृत झाल्या. २००० साली प्रथमच परदेशी दौऱ्यावर हीथ्रो विमानतळावर उतरलो होतो.  त्यावेळी संध्याकाळची वेळ असल्यानं विमानतळ गजबजलेले होते.  आता मात्र रात्रीची वेळ असल्यानं जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक अशा विमानतळावर आपण आहोत असं काही वाटत नव्हतं.  पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टीनं विचार करून हे विमानतळ युरोपातील इतर काही  विमानतळाप्रमाणे रात्रीच्या वेळी पाच-सहा तास बंद ठेवले जाते.  आपल्या देशाचा विचार केला असता आपली विमानतळे रात्रीच्या वेळी सर्वात जास्त गजबजलेली असतात.  अर्थात युरोप अमेरिकेला जाण्यासाठी सोयीस्कर वेळ म्हणून हे होत असावे.  
 
इमिग्रेशनसाठी म्हणायला गेलं तर फारशी मोठी रांग नव्हती.  अतुल पुढे आणि त्यामागे वीणा वर्ल्डचे प्रवासी असा एकंदरीत मामला होता.  आमच्या सहलीमध्ये एकूण ४३ जण होते.  त्यातील १३ जण आम्हाला लंडन इथल्या हॉटेलमध्ये सामील होणार होते.  त्यामुळे इथं या रांगेत ३० लोक असावीत.  इमिग्रेशनची रांग नियंत्रित करण्यासाठी अनेक अधिकारी होते.  अतुलचा जसा क्रमांक आला तसं  त्यानं  त्या अधिकाऱ्यांना सांगितले की पुढील सर्व माणसे वीणा वर्ल्डतर्फे बारा दिवसाच्या युरोप सहलीसाठी आली आहेत.  बहुदा मी या रांगेत वीणा वर्ल्डच्या ग्रुपचा सर्वात शेवटचा माणूस होतो.  अतुलच्या सांगण्यामुळं तीन इमिग्रेशन अधिकारी आमच्या गटासाठी नेमण्यात आले.  एकंदरीत आमचा इमिग्रेशनचा अनुभव सुरळीतपणे पार पडला. आम्हांला सोपस्कार म्हणून काही मैत्रीपूर्ण असे प्रश्न विचारण्यात आले.  आमचा इमिग्रेशनचा सोपस्कार पार पडला.  भारतीय ग्राहकांच्या क्रयशक्तीच्या प्रभावाचा आम्हांला ह्या भेटीत आलेला पहिला अनुभव !

त्यानंतर आमचा मोर्चा आमच्या बॅग ताब्यात घेण्याकडे वळला.  सध्या हीथ्रो  विमानतळावर काही नामवंतांच्या बॅग्स उशिरानं मिळाल्याच्या  बातम्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्या आहेत.  परंतु आम्ही बहुदा सेलिब्रिटी नसल्याने आमच्या बॅगा व्यवस्थित आमच्या ताब्यात आल्या.  समाजमाध्यमावर प्रसिद्ध होण्याची संधी बहुदा गमावली अशी खंत आता वाटत आहे.  आमची वाटचाल आमच्या बसच्या दिशेने होऊ लागली.  आमच्या बॅगा घेऊन बाहेर पडताना आम्ही कस्टम्स  अधिकाऱ्यांसमोरून गेलो.  बहुदा त्यांची ड्युटीची वेळ संपत असल्यामुळे किंवा आमच्या चेहऱ्याकडे पाहून ही लोक काय संशयास्पद वस्तू आणणार असा समज झाल्याने त्यांनी आम्हाला विनासायास जाऊ दिले.  

बाहेर पडताच लगेचच  थंड हवेच्या झोक्याने आमचे स्वागत केले.  जून महिना म्हणजे  तर खरं तर उन्हाळ्याचा महिना.  परंतु इंग्लंड, फ्रान्समध्ये आम्हांला  बऱ्यापैकी थंड हवामान आणि बोचरे वारे यांचा अनुभव करावा लागला. युरोपातील   हवामान हे अत्यंत बेभरवशाचे असते.  तिथे पाऊस पडल्यास तापमान अचानक १० अंश सेल्सिअसने सुद्धा खाली येऊ शकते हे अतुल आम्हाला वारंवार बजावत होता. पाऊस केव्हाही येऊ शकतो.  त्यामुळे तुमच्यासोबत छोटी छत्री, स्वेटर किंवा जॅकेट अशा वस्तू असणे केव्हाही उत्तम.  आपण थंडीचा जर फारच बाऊ करत असाल तर कानटोपी, ग्लोज अशा वस्तूसुद्धा आपल्या सोबत ठेवाव्यात.  कुटुंबातील इतर सदस्य किंवा सहप्रवासी यांना अशा वेशभूषेमध्ये फोटो काढायला सांगून सोशल मीडियावर प्रसिद्ध केले तर चांगली प्रतिक्रिया मिळू शकते.  अशावेळी आपल्या सोबत असलेला कोणी खट्याळ सहप्रवासी एखादी टिपण्णी टाकून सोशल मीडियावर आपली खिल्ली उडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही एक दोन दिवसांतच ह्या हवामानाला जुळवून घेता. त्यामुळं त्यानंतर जर वारा नसेल तर तुम्ही १५ डिग्री सेल्सिअस तापमान वगैरे सहजपणे सहन करू शकता. 

सोहम आणि प्राजक्ता ह्यांना प्रथमदर्शी इंग्लंड आवडलं. काही वेळातच आमचं हॉटेल पार्क ग्रँड लंडन हीथ्रो आलं. हे लंडन विमानतळाच्या टर्मिनल पाचच्या क्षेत्रात आहे असं सांगण्यात आलं. विमानतळावरील एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी इतका वेळ लागला ह्यावरून ह्या विमानतळाच्या व्याप्तीची कल्पना यावी.  वीणा वर्ल्डने पार्सलमध्ये जेवणं आणली होती. परंतु लंडनला उतरण्याआधी काही वेळेपूर्वीच जेवणं झाल्यानं आम्ही ह्या बॉक्समधील केवळ पाण्याच्या बाटल्या घेतल्या. प्रत्येक हॉटेलमध्ये बहुधा येणाऱ्या पाहुण्यांना गोंधळवून टाकण्यासाठी शॉवर, गरम / थंड पाणी ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आयोजन केलेलं असतं. त्यामुळं भारतीय सवयीनुसार केवळ हातपाय धुण्यासाठी कोमट पाणी शॉवरमधून हवंय ही गरज पूर्ण करण्याच्या हेतूनं न्हाणीघरात शिरलेले पाहुणे  थंड पाण्याच्या सचैल फवाऱ्यानं अचंबित होऊन जोरदार आरोळी ठोकतात अशा घटना माझ्या ऐकिवात  आहेत. परंतु त्यांनी ही कबुली खाजगीत दिल्यानं त्यांची नावं मी घोषित करू शकत नाही.  दमलेले जीव बिछान्यावर पहुडल्यानंतर काही क्षणांतच निद्राधीन झाले. रात्री झोपण्याआधी अतुलने पुढील दिवसाचा कार्यक्रम व्हाट्सअँप ग्रुपवर घोषित केला. सकाळी सहा वाजता वेकअप कॉल, सात ते पावणेआठ नाश्ता आणि आठ वाजता लंडन दर्शनासाठी प्रस्थान असं दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचं संक्षिप्त स्वरूप होतं. 

सकाळी पाचच्या सुमारास जाग आली. बाहेर लख्ख उजेड होता. तिघेही जण जागे झाल्यानं टीव्ही लावला. आज युरो २०२४ ला प्रारंभ होणार होता. ह्या स्पर्धेमुळं युरोपच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल की नाही ह्याविषयी बातम्यांत चर्चा सुरु होती. २००० साली ब्रायटनला असताना युरो स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध जर्मनी असा सामना झाला होता. त्यावेळी माझी चिंता करणारा सहकारी गाय बॅम्फोर्ड मला म्हणाला होता, "आदित्य, जर जर्मनी जिंकेल अशी चिन्हं दिसू लागली तर अजिबात हॉटेलबाहेर पडू नकोस".  आता मी लंडनमध्ये येत आहे असा संदेश त्याला पाठवला होता. परंतु त्याच्या कार्यबाहुल्यामुळं त्याला लंडनमध्ये भेटायला येणं शक्य नव्हतं. 

हॉटेलातील नाश्ता बहुरंगी होता. माहितीजालावरून ह्या हॉटेलातील नाश्त्याचे घेतलेलं छायाचित्र. 


प्रत्यक्षातही असाच नाश्ता होता. २००० साली ब्रायटनच्या वास्तव्यात ऑफिसात बऱ्याच वेळा जो पर्याय दुपारच्या भोजनासाठी वापरला होता, त्या Jacket Potato with Baked Beans मधील Baked Beans इथं हजर होते. युरोपातील नाश्त्यामध्ये पावाचे विचिध प्रकार, ताजी फळं, फळांचे रस, Scrambled Eggs, कॉफी, चहा, मांसाहाराचे अतर्क्य प्रकार असे विविध पर्याय उपलब्ध असतात. ह्या नाश्त्याचा पुरेपूर आस्वाद घ्यावयाचा असेल तर तुमच्या अंगी खालील गुण असावेत. 

१. कॉफी मशिनमधून योग्य पर्याय निवडून आत्मविश्वासानं कपात / ग्लासात कॉफी घेता येणं. पहिल्या प्रयत्नात गोंधळ उडून टेबलवर कॉफी सांडल्यास ही आपली चूक नव्हेच अशा आविर्भावाने दुसरा प्रयत्न करणं. 
२. आपल्याला हवा असलेला पाव, फळं घेताना आपल्या मागील माणसांना काही शिल्लक राहील का ह्याची चिंता न करणं. 
३. बंदिस्त पुड्यांमधील बटर, चीज, जॅम व तत्सम प्रकार कोणत्या पावाला कोणत्या सुरीनं कशा पद्धतीनं लावावेत ह्याविषयी माहिती बाळगून असणे. किंवा ही माहिती नसल्यास मागच्या माणसांच्या चेहऱ्यांवरील मुद्रांकडे बिल्कुल दुर्लक्ष करीत अतिआत्मविश्वासानं आपल्याला हवं ते करणं. 
४. सूरी, काट्याचा योग्य वापर करत सर्व पदार्थ तोंड किमान उघडून भक्षण करता येतील अशा प्रमाणात सुबक आकारात तोडणे. 

असो, भरपेट नाश्त्यानंतर आम्ही बसमध्ये स्थानापन्न झालो.  पोटाचा घेर दीड सेंमीने वाढला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आज रात्री परत ह्याच हॉटेलात यायचं असल्यानं बॅग्स बसमध्ये आणण्याचे कष्ट घ्यायचे नव्हते. 
बसमध्ये आम्हांला आधीपासूनच (नोंदणीक्रमानुसार) आसने देण्यात आली होती. लंडनच्या लहरी हवामानाचा सामना करण्यासाठी आम्ही सोबत छत्री, जॅकेट वगैरे आयुधं आणि फोटो काढताना व्यक्तिमत्त्व खुलून दिसावं म्हणून काहींनी गॉगल वगैरे गोष्टी घेतल्या होत्या. उन्हापासून संरक्षण म्हणून गॉगल हे विधान मला पटण्याची शक्यता कमीच! 

बसमधून शुक्रवार सकाळचे लंडन अगदी प्रसन्न वाटत होते. बसचा चालक डेव्हिड होता. 
आमची मार्गदर्शक क्लारा ही आम्हांला काही वेळानं शहरात भेटणार होती. लंडन शहरात Please, Excuse me, Sorry आणि Thank You ह्या शब्दांचा मुक्तहस्ते (किंवा मुक्तमुखे ) वापर करा असे अतुल म्हणाला. अर्थात ह्यातील कोणत्या शब्दाचा कोणत्या प्रसंगी वापर करायचा ह्याची जाण नसेल तर अनावस्था प्रसंग ओढवू शकतो. 
लंडन हे शहर रोमन लोकांनी दोन हजार वर्षांपूर्वी वसवले असे म्हणता येईल.  लंडन शहराने आपल्या इतिहासामध्ये प्लेग, भीषण आग, नागरी युद्ध, हवाई हल्ले, दंगली,  नजीकच्या भूतकाळात काही दहशतवादी हल्ले यांचा यशस्वीरित्या मुकाबला केला आहे. १६६६ साली लंडनमध्ये लागलेली, पाच दिवस सतत चाललेली आग पूर्ण लंडन शहराचा विध्वंस करून गेली.  ही आग एका छोट्या बेकरीमध्ये मध्यरात्रीनंतर सुरू होऊन प्रचंड वेगाने संपूर्ण शहरभर पसरली.  त्या वेळच्या महापौराची आणि अधिकारी लोकांची निर्णय घेण्यातील दिरंगाई ही आग पसरण्यास मुख्यतः कारणीभूत ठरली असे वाचनात आलं आहे. या आगीनंतर लंडन शहराची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. सर क्रिस्तोफर Wren यांनी लंडन शहराच्या पुनर्बांधणीमध्ये मोलाचा वाटा उचलला.  

ह्या बसप्रवासात पावलोपावली (बसमधून जात असल्यानं टायराटायरी) लंडन शहरातील  ऐतिहासिक महत्व असलेल्या वास्तू सामोऱ्या येत होत्या. आधी अतुल मग क्लारा आम्हांला त्यांचं महत्व विशद करून सांगत होते. Cleopatra Needles  - ही इजिप्तमधील ऐतिहासिक महत्त्व असलेली दोन शिल्पं १८७८ आणि १८८१ साली अनुक्रमे लंडन आणि न्यूयॉर्क इथं पुर्नस्थापित करण्यात आली. ह्या शिल्पाचे पूर्ण छायाचित्र माहितीमायाजालावरून आपणास मिळू शकेल. 

 
बसमधून दिसलेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लंडनमधील विविध वास्तू / स्मारकं  ह्यांची छायाचित्रं बसमधून जशी दिसली तशी इथं सादर करण्यात आली आहेत! ह्यातील काही चित्रं वीणा वर्ल्ड सहप्रवासी आणि अतुल ह्यांच्या कॅमेरातून टिपली गेली आहेत. ह्यात Big Ben Miniature, Westminister Abbey Church of Royal Family, Dragon Statue entry point Westminster Abbey, Tower Bridge, London Bridge Railway Station (जगातील सर्वात जुनं रेल्वे स्थानक), Fire Monument, St. Paul Catheral London, Piccadilly Circus, BBC Radio Station, 10 Downing Street, Monument of Victoria, Hercules Statue, Chlesea Monument इत्यादींचा समावेश आहे. तिथं आपलं इंडिया हाऊस पाहून अभिमान वाटला.  वर उल्लेखलेल्या प्रत्येक स्थळाला ऐतिहासिक महत्व आहे. अतुल, क्लारा अत्यंत वेगानं ह्या प्रत्येक स्थळाची माहिती आम्हांला देत होते. लंडनमध्ये वर उल्लेखलेल्या स्थळांप्रमाणे इतरही असंख्य ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तू आहेत. लंडन शहरात जवळपास दोनशेच्या आसपास संग्रहालये आहेत. ब्रिटिश म्युझिअम हे सर्वात नावाजलेल्या संग्रहालयातील एक!  जर आपण खरोखर इतिहासाचे चाहते असाल तर ह्या सर्व वास्तूंची सविस्तर माहिती करून घेण्यासाठी, त्यांना जवळून पाहण्यासाठी अनेक दिवस लागतील. आम्ही हे सारे अर्ध्या  तासाच्या प्रवासात आटपलं! १० डाउनिंग स्ट्रीटवरून ज्यावेळी आम्ही बसमधून गेलो, त्यावेळी ऋषी सुनक हे  इंग्लंडचे पंतप्रधान होते. आज ही पोस्ट लिहिताना त्यांनी हे पद गमावलं आहे. कालाय तस्मै नमः ! 




टॉवर ब्रिजवर घेतलेली छायाचित्रं  ! अर्थात इथं बस थांबू शकत नाही. मुंबईत काळाच्या पडद्याआड गेलेल्या डबलडेकर लंडनमध्ये अजूनही रस्त्यावर जोमानं धावत आहेत हे पाहून माझ्यासारखे जुन्या गोष्टींचे अनेक पुरस्कर्ते  आनंदी होतात. 








इंग्लंडच्या संसदेची हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स ही दोन सभागृहे आहेत. आपल्या लोकसभा आणि राज्यसभेशी मिळतीजुळती अशी ही संरचना आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये काही उमरावांना तहहयात सदस्यत्व मिळतं असं क्लारा म्हणाली असं पुसटसं आठवत होतं. परंतु माहितीमायाजालावर त्याला दुजोरा देणारी माहिती सापडली नाही. क्लारा काहीशी मिश्किल स्वभावाची होती. ब्रिटिश राजघराण्याच्या गडगंज संपत्तीविषयी ती अधूनमधून संदर्भ देत होती. त्यांची बँक कोणती, ते कोणत्या दुकानातून किराणामाल खरेदी करतात हे सांगताना ह्या आस्थापनाचं सदस्य बनण्यासाठी सदस्य फी किती महागडी आहे हे ती हळूच सांगत असे. राजघराणे वर्षातून एकदा काही नागरिकांसाठी पार्टीचे आयोजन करते. क्लाराच्या नवऱ्याला एकदा अशा पार्टीचे निमंत्रण मिळालं. पण तो क्लाराला सोबत घेऊन न जाता  त्याच्या व्यावसायिक सहकाऱ्याला घेऊन गेला. परत आल्यावर त्या पार्टीत फारसा काही पाहुणचार झाला नाही, डम्पलिंग वगैरेच मिळाले हे त्यानं सांगितल्यावर बरी अद्दल घडली असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. 

आता आमचं आगमन ट्रॅफल्गार चौकात झालं. ह्या चौकाच्या जवळ बस पार्किंगसाठी केवळ दोन जागा असतात. त्यातील एक आम्हांला मिळाली म्हणून क्लारा अत्यानंदित झाली. ट्रॅफल्गार स्क्वेअर हा सिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर सेंट्रल लंडन इथे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी उभारला गेलेला सुप्रसिद्ध चौक आहे. नेपोलियनिक युद्धांमधील (Napoleonic Wars) ब्रिटिश नौदलाने फ्रान्स आणि स्पेन यांच्या सेनेवर ट्रॅफल्गार युद्धात २१ ऑक्टोबर १८०५ साली मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ या चौकास हे नाव देण्यात आले आहे.  या भागास पूर्वी रिंग क्रॉस या नावाने सुद्धा संबोधले जात होते. हा चौक अत्यंत प्रशस्त असल्यामुळे विविध जाहीर सभा, राजकीय प्रदर्शने यासाठी वापरण्यात येतो.  नववर्षाच्या स्वागतासाठी आणि आतिषबाजीसाठी करण्यात येणाऱ्या समारंभाचे हे मुख्य केंद्र आहे.  इथं आल्यावर आपल्या मौल्यवान वस्तुंची  काळजी घ्या असे अतुलने आम्हांला बजावले.  छायाचित्रं काढण्याच्या नादात आपल्या मौल्यवान ऐवज असलेल्या बॅग्स  लांब ठेवू नका असे त्याचे म्हणणे होते.  सकाळी लवकर आल्यामुळे हा चौक बऱ्यापैकी रिकामी होता.  





त्यामुळे आम्हांला छायाचित्रणासाठी उत्तम संधी उपलब्ध झाली.  आम्ही सुदैवी होतो असे क्लाराचे म्हणणे होते.  आदल्या दिवशी इथं खूप पाऊस पडला होता, दुसऱ्या दिवशी देखील पाऊस पडेल असे वेधशाळेचे भाकीत होते.  इथले छायाचित्रण सत्र आटपून आम्ही पुन्हा बसमध्ये स्थानापन्न झालो. 

थेम्स नदीवर असंख्य पूल आहेत. प्रत्येक पुलाची काही वैशिष्टयं आहेत. जसे की वॉटर्लू पुलाच्या बांधकामात बहुतांशी स्त्रियांचा पुढाकार होता. पुरुष दुसऱ्या महायुद्धात गुंतल्यानं त्यांनी हम किसीसे कम नहीं हे दाखवून दिलं. बस टॉवर ब्रिजच्या दिशेने निघाली होती. टॉवर ब्रिज हा थेम्स नदीवरील पुलांमध्ये  प्रामुख्याने गणला जाणारा असा पूल आहे. टॉवर ब्रिजला जवळून पाहण्यासाठी, त्याचा सखोल इतिहास जाणून घेण्यासाठी  टॉवर ब्रिजची टूर घेणे हा एक उत्तम पर्याय आहे.  अर्थातच ह्यासाठी  आमच्याकडे वेळ नव्हता. २००० साली मी ही टूर घेतली होती.  त्यावेळी तेथील मार्गदर्शकाने बरीच काही माहिती दिली होती.  अर्थात ती आठवण्याची आता काही शक्यता नाही.  पुलाच्या खालून जाणाऱ्या मोठ्या जहाजांचा मार्ग सुकर व्हावा म्हणून हा पूल मधोमध उघडला जातो.  अर्थात अशा जहाजांची संख्या व वर्दळ हल्ली कमी झाल्यानं पुलाची उघडझाप कमी प्रमाणात होते. माहितीमायाजालावर याविषयी अनेक पोस्ट आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत.  आम्ही काही अंतरावरील एका जागेवरून  टॉवर ब्रिजला कॅमेरामध्ये चित्रित केले.  टॉवर ब्रिज हे केवळ निमित्त असावे असं वाटावं इतकी आम्ही स्वतःची छायाचित्रे घेतली. 




आम्ही क्लारा हिला एका छायाचित्रात आमच्यासोबत येण्याची विनंती केली.  तिनं आनंदाने ती मान्य केली. हे छायाचित्रण सत्र संपवून बसच्या दिशेने वाटचाल करत असताना फुलांची बाग दिसली.  अर्थात इथे छायाचित्रण करणे अत्यावश्यक होते.  आम्ही लवकर बसमध्ये परतावे म्हणून अतुलने थोडीशी घाई केली.  यापुढील पॉईंट होता तो म्हणजे बॅकिंगहॅम पॅलेस अर्थात इंग्लंडच्या राजघराण्याचा लंडनमधील राजवाडा! ज्यावेळी राजाचे ह्या महालात वास्तव्य असतं त्यावेळी इंग्लंडच्या साम्राज्याच्या सार्वभौमत्वाचे प्रतिक असणारा "रॉयल फ्लॅग" ध्वज राजवाड्यावर फडकत असतो. अन्य वेळी "युनिअन जॅक" ला हा मान मिळतो. 

"चेंजिंग द गार्ड" किंवा "गार्ड माउंटिंग" (जी एक अधिकृत संज्ञा आहे) हा समारंभ बॅकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी पावणे अकरा वाजता सुरू होतो.  साधारणतः ४५ मिनिटं अवधी असलेल्या या समारंभात राजवाड्याच्या पहाऱ्यावर असलेले जुने पहारेकरी नवीन पहारेकऱ्यांच्या हाती सूत्रं  हवाली करतात.  सुदैवाने आम्ही वेळेतच तिथं पोहोचलो  असल्याने आम्ही तेथील रस्त्यावर मोक्याच्या जागा पटकावल्या.  ही जागा राजवाड्यापासून थोडी लांब होती.  अकरा वाजताच्या सुमारास राजवाड्याच्या आसपास बिगुल आणि ढोल यांचे आवाज येऊ लागले.  बहुदा जुन्या पहारेकर्‍यांनी सूत्रं नवीन पहारेकरांच्या हाती दिली असावीत.  घोड्यावर स्वार असलेल्या पहारेकऱ्यांची एक मोठी तुकडी आता आमच्या दिशेने येऊ लागली होती.  लाल रंगाचा वेष आणि काळी टोपी परिधान केलेल्या, अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या सैनिकांची घोड्यावर स्वार झालेली तुकडी अगदी जवळून पाहणं हा  नक्कीच एक अविस्मरणीय असा अनुभव होता. 




राजवाड्याच्या भोवताली असलेल्या हिरवळीवर अनेक लोकांची गर्दी जमली होती.  इथं छायाचित्रण करण्यात वेळ घालवू नका असे अतुलने आम्हाला सुचविले.  आमचा मोर्चा आता दुपारच्या भोजनासाठी वळला. 
लंडन शहरातील मुमताज हॉटेलमध्ये आम्ही दुपारच्या भोजनासाठी पोहोचलो.  या हॉटेलमध्ये गेले कित्येक वर्ष मी येत आहे असे अतुल म्हणाला.  युरोपातील मुख्य शहरांमध्ये वीणा वर्ल्ड, केसरीचे प्रवासी ग्रुप काही ठराविक उपहारगृहांमध्येच दुपार आणि संध्याकाळच्या जेवणासाठी जात असतात.  त्यामुळे प्रत्येक ग्रुपसाठी साधारणतः ४५ मिनिटांचा अवधी दिला गेलेला असतो. या अवधीमध्ये सर्वांनी लवकर जेवण आटपणे अपेक्षित असते. आमच्या ग्रुपच्या वक्तशीरपणामुळे किंवा अतुलच्या ज्येष्ठतेमुळं बहुतेक ठिकाणी आम्ही सर्वप्रथम पोहोचत असू. प्रवासातील उपहारगृहात जाताना वॉशरूमचा ब्रेक हा सुद्धा एक हेतू असायचा.  काहीशी खेदाची गोष्ट म्हणजे ही वॉशरूम पूर्णपणे स्वच्छ नसायची.  ही वॉशरूम तळघरात असायची.  इतक्या मोठ्या संख्येने थोड्या अवधीमध्ये प्रवासी आल्यावर त्यांच्या स्वच्छतेचा काहीसा प्रश्न उद्भवणार हे ओघाने आलेच.  
इतका वेळ प्रवास केल्यानंतर सर्वजण अर्थातच भुकेलेले होते.  जेवण हे रुचकर असे होते तरीही त्यात का कोणास ठाऊक पण यांत्रिकी पद्धतीनं जेवण बनविल्याचा फील येत होता.  युरोपातील भारतीय उपहारगृहातील आमची जेवणं एका विशिष्ट पॅटर्न मध्ये असायची.  सुरुवातीला नान, सॅलड,  शाकाहारी दोन-तीन पर्याय, वरण, भात असे ओळीने मांडून ठेवलेले पदार्थ असायचे.  मांसाहारी लोकांसाठी एक पर्याय म्हणून बहुदा चिकन एका कोपऱ्यात उपलब्ध असायचे. ज्या उपाहारगृहात वीणा वर्ल्डचेच पाहुणे असायचे,  तिथं मांसाहारी पर्याय एका कोपऱ्यात ठेवून देण्यासाठी आग्रह केला जायचा.  परंतु ज्या उपाहारगृहांमध्ये त्यांची स्वतःची व्यवस्था असायची तिथं मात्र मांसाहारी पदार्थ शाकाहारी पदार्थांच्या सोबत ठेवले असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती.  भरपेट  जेवण घेऊन पुन्हा एकदा बसमध्ये बसायला जीवावर आले होते.  पोटाचा घेर अजून दोन सेंमीने वाढला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. .सुदैवाने थोड्या वेळातच मॅडम टुसॉ या मेणांच्या पुतळ्याच्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारापाशी येऊन आम्ही थडकलो. 
आमच्या  ग्रुप बुकिंगसाठी एक विशिष्ट वेळ देण्यात आल्यामुळे आम्हाला काही वेळ थांबणे भाग पडले.  हवामान अत्यंत थंड होते.  बोचरे वारे वाहत होते.  तिथं स्मृतिचिन्ह विकणारी अनेक दुकाने होती.  सहप्रवाशांनी ह्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला.  थोड्याच वेळात आम्ही संग्रहालयात प्रवेश केला. मॅडम टुसॉ यांचा जन्म १७६१ साली  फ्रान्समध्ये झाला.  तिची आई स्वित्झर्लंडमधील एका फिलिप कर्टिस नामक कारागिराकडे काम करीत असे.  त्यांनी मॅडमना मेणापासून पुतळे बनवण्याचे प्राथमिक शिक्षण दिले . सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या कलेचा मॅडम टुसॉ यांनी पुढं मोठ्या प्रमाणावर विस्तार केला.  त्यांना लंडनमध्ये बोलावण्यात आले.  नेपोलियनिक युद्धाचे निमित्त होऊन त्यांना लंडनमध्येच राहावे लागले.  त्यांनी १८३१ सालापासून छोट्या छोट्या कालावधीच्या भाडेतत्त्वावर बेकर्स स्टेट बाजार इथं वरच्या मजल्यावर आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यास सुरुवात केली.  कालांतराने याच वास्तूचे मॅडम टुसॉ संग्रहालयात रूपांतर झाले. २००० सालच्या लंडन भेटीत सुद्धा या संग्रहालयात मी गेलो होतो. इथं विविध राजकारणी, क्रीडापटू, सिनेसृष्टीतील कलाकार,  विविध लेखक, शास्त्रज्ञ यांचे अगदी हुबेहूब वाटतील असे पुतळे आहेत. 

आपण भारतीय सदैव आपल्याच मान्यवरांच्या पुतळ्यांच्या शोधात असतो.  यावेळी आम्हांला नव्याने एक गोष्ट कळली.  जगभरात, युरोपात आता बऱ्याच ठिकाणी मॅडम टुसॉ संग्रहालये झाली आहेत.  मान्यवरांचे पुतळे या विविध संग्रहालयात छोट्या छोट्या कालावधीनंतर स्थलांतरित करण्यात येतात.  आमच्या गटातील लोकांना पंतप्रधान मोदी,  माधुरी दीक्षित इत्यादींचे पुतळे पहायचे होते.  परंतु सध्या तरी लंडन येथील या संग्रहालयात हे पुतळे पाहायला मिळत नाहीत.  आमच्या कुटुंबासाठी मात्र अशी काही विशिष्ट आवड नव्हती.  त्यामुळे जशी हॉलीवुड कलाकार, फुटबॉल खेळाडू, आपला सचिन, बीटल्स ही  जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व दिसली त्यांच्यासोबत आम्ही आमची छायाचित्रे काढून घेतली. 

 



अशा प्रसंगी अँजेलिना जोली, टेलर स्विफ्टच्या पुतळ्यांसोबत फोटो काढून घेण्याचा आग्रह धरणे प्रशस्त होणार नाही हे मी स्वतःला निक्षून बजावले. शेकस्पियर, आपला सचिन ह्यांच्यासोबत वार्तालाप करून आम्ही पुढे निघालो. 



शाहरुख खानच्या पुतळ्याने मात्र घोर निराशा केली.  प्राजक्ताच्या भाषेत बोलायचे झाले तर तो कोणत्याही अँगलने शाहरुख खान वाटत नव्हता.  या संग्रहालयात अनेक चेंबर्स असतात.  काही गरज नसताना तिथे चेंबर ऑफ हॉरर वगैरे प्रकार ठेवले आहेत.  अजून एक घाबरवणारा प्रकार म्हणजे तुम्ही पुढे जसे सरकत जाता तसे चेंबर ऑफ हॉरर वगैरे विभागातून तुम्हाला जावं लागतं.  तिथून पळवाट काढण्यासाठी जो मार्ग असतो तो केवळ जाणकारच सहजपणे शोधू शकतो.  महत्प्रयासाने शोधलेली पळवाट आम्हाला दुसऱ्या एका राईडकडे घेऊन गेली. त्या राईडमध्ये आम्ही दोघेजण बसलो.  टॅक्सी राईड हा  लंडन शहराच्या इतिहासात प्रवास घडवून आणणारा एक उत्तम असा अनुभव  आहे लंडन शहराची ओळख असलेल्या काळ्या टॅक्सीमध्ये आपल्याला दोघा-दोघांच्या गटानं  बसवले जाते.  ज्यांनी लंडन शहराला घडविले अशा लंडन शहराच्या इतिहासातील विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटनांचे साक्षीदार होण्याची संधी ही राईड आपल्याला देते.  प्लेगने ग्रासलेले लंडन शहर, भीषण आगीने नष्ट  झालेले लंडन शहर, सर ख्रिस्तोफर यांच्या मेहनतीने फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा उभारले गेलेले शहर,  दुसऱ्या महायुद्धात पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीला कडवी लढत देणाऱ्या इंग्लंडची राजधानी असलेले लंडन शहर असा सर्व इतिहास आपल्याला या थोड्या अवधीमध्ये पाहायला मिळतो. ही एक रंजक राईड आटपून आम्ही संग्रहालयाच्या बाहेर पडलो.  का कोणास ठाऊक पण मॅडम टुसॉ संग्रहालय पाहताना म्हणावा तितका आनंद झाला नाही.  सिंगापूरमध्ये सुद्धा असेच संग्रहालय पाहिले होते.  हल्ली भारतात सुद्धा अशी संग्रहालय उभी राहू लागली आहेत. 

संग्रहालयाच्या बाहेर असलेल्या स्टॉलवर आमच्यासाठी गरमागरम मसाला चहाची व्यवस्था करण्यात आली होती.  इतक्या थंड हवेमध्ये गरमागरम मसाला चहा  मिळणं हा एक अत्यंत सुखद अनुभव होता.  ह्यापुढील मसाला चहा हा पंचवीस तारखेला आपापल्या घरी हे हसतहसत सांगायला अतुल विसरला नाही. 

यानंतर आमची पावलं किंवा बसचे टायर हे लंडन आयच्या दिशेने निघाले. 
इंग्लंडची राष्ट्रीय विमान कंपनी ब्रिटिश एअरवेजने लंडन आयच्या उभारणीसाठी प्रामुख्याने अर्थपुरवठा केला.  थेम्स नदीवर १९९९ साली उभारण्यात आलेल्या या प्रचंड मोठ्या जायंट व्हीलचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ३१ डिसेंबर १९९९ रोजी केलं खरं परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे याचे सामान्य जनतेसाठी उद्घाटन मार्च २००० मध्ये झाले.  आम्ही ज्यावेळी २००० च्या जून महिन्यात लंडनच्या भेटीसाठी गेलो होतो त्यावेळी लंडन आयची तिकिटं मिळाली नव्हती.  त्यामुळे त्यावेळी मला यात बसता आले नव्हते. 
 
लंडन आयमध्ये एकंदरीत बंदिस्त आणि वातानुकूलित ३२ कॅप्सुल्स (कुपिका) आहेत.  या कुपिकांना एक ते ३३ असे क्रमांक देण्यात आले आहे.  कोणता क्रमांक वापरण्यात आला नाही याचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी कोणतेही बक्षीस देण्यात येणार नाही!! एका कॅप्सूल मध्ये अंदाजे २५ लोक सामावले जातात.  एक पूर्ण फेरी साधारणतः ३५ मिनिटांत पूर्ण होते.  प्रवाशांच्या चढउतारासाठी हे व्हील पूर्णपणे थांबवले जात नाही.  ह्या व्हीलचा वेग प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी शक्य होईल इतका माफक असतो.  वरती गेल्यानंतर लंडन शहराचे अत्यंत विहंगम असे दृश्य दिसलं.  सोबत भ्रमणध्वनी असल्यामुळे ही सर्व दृश्यं  डोळ्यात सामावून घेण्यापेक्षा भ्रमणध्वनीद्वारे त्यांची छायाचित्र घेण्याकडेच सर्वांचे लक्ष होते.  आमच्या कॅप्सूलमध्ये आम्ही सर्व बहुदा वीणा वर्ल्डचेच सहप्रवासी होतो.  आमचे काही सहप्रवासी बाजूच्या कॅप्सूलमध्ये होते.  त्यामुळे आम्ही एकमेकांचे फोटोसुद्धा काढले.  आमच्यातील काही सहप्रवासी चौकस बुद्धीचे होते.  ही चौकस बुद्धी त्यांनी वयाच्या ६५ वर्षानंतर सुद्धा शाबूत ठेवली होती.  त्यामुळे विमानतळ कोणत्या दिशेला असेल,  या इमारतीला छप्पर कोणत्या पद्धतीचे असेल अशा पद्धतीच्या शंका त्यांनी मला विचारल्या.  मी मला जमतील त्या पद्धतीने त्यांच्या उत्साहावर विरजण पडेल याची योग्य ती काळजी घेत त्यांना उत्तरे दिली.  माझ्या चेहऱ्याकडे बघत हा माणूस दिसतो तितका साधासुधा नाही असे भाव देत त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दुसऱ्या लोकांकडे मोर्चा वळविला.  साधारणतः सहा वाजता आम्ही या व्हीलमधून  खाली उतरलो. 











आता परत आमचा प्रवास हॉटेलकडे सुरू झाला होता.  शुक्रवार संध्याकाळच्या लंडनच्या वाहतूक कोंडीचा थोडाफार अनुभव आम्हांला मिळाला.  वाटेत येणाऱ्या विविध इमारतींची माहिती देणे अतुलने सुरू ठेवलं होतं.  चेल्सी क्लब हा केवळ फुटबॉलच्या सामन्यांसाठी प्रसिद्ध नसून विविध सामाजिक उपक्रमासाठीसुद्धा ते कार्यरत असतात.  त्यांच्या सामाजिक उपक्रमासाठी उभारल्या गेलेल्या काही संकुलांची माहिती अतुलने दिली.  मुख्य शहर थोडसं मागे सरलं तसं रस्त्यावर झाडांचे प्रमाण काहीसं वाढलं.  झाडांवर फुलं फळ दिसू लागली.  बसमधून छायाचित्रण करण्याचा एक तोटा म्हणजे बसच्या काचेमध्ये पडणारं  आपलं आणि सहप्रवाशांचं प्रतिबिंबसुद्धा छायाचित्रांमध्ये येतं.  तरीही आमचा उत्साह कमी झाला नाही.  सात वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो.  रात्रीचे जेवण हे साडेसात वाजता सुरू होणार होते.  दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पॅरिसच्या दिशेने वाटचाल सुरू करणार होतो.  युरो स्टार ही अत्यंत वेगाने धावणारी आगगाडी आम्ही पकडणार होतो.  ते स्टेशन एक तासाच्या प्रवासावर होते.  दुसऱ्या देशात जाण्यासाठी आम्हाला या रेल्वे स्टेशनवर इमिग्रेशन करणे आवश्यक होते.  सकाळी साडेसात वाजताची गाडी असली तरी बसमध्ये बॅगा भरणं,  रेल्वे स्टेशन मध्ये गेल्यावर त्या बॅगा काढणं, इमिग्रेशन चेक करणे,  रेल्वेगाडी आल्यानंतर  त्यामध्ये या सर्व बॅग्स भरणे ह्या सर्व गोष्टींना  वेळ मिळावा म्हणून भल्या पहाटे सव्वाचार वाजता हॉटेल सोडावं लागेल असे फर्मान अतुलने काढले. आम्हांला दिलासा मिळावा म्हणून इथल्या तीन  वाजता भारताच्या  वेळेनुसार सकाळचे साडेसात झाले असतील त्यामुळे तुम्हांला  उठायला अजिबात त्रास होणार नाही असे आपल्या मिश्किल स्वरात तो म्हणाला. 
 
आमच्या कीर्तीमामाची दोन्ही मुलं प्रेषित आणि श्वेता हे लंडन येथे वास्तव्य करून आहेत. आम्ही लंडनला धावती भेट देणार आहोत हे आम्ही त्यांना कळविले होते. आम्हांला  भेटल्याशिवाय तुम्ही लंडनमधून जाऊ शकत नाही हे त्यांनी आम्हांला ठामपणे बजावून सांगितले होते.  खरंतर गुरुवारी त्यांना भेटण्याची सुरुवातीची योजना होती.  परंतु आम्ही खूपच उशिरा पोहोचल्यामुळे गुरुवारी भेटणं आम्हाला शक्य झालं नाही.  शुक्रवारी मात्र ते दोघेही मुलांसह आले. प्रेषितची पत्नी अभिज्ञासुद्धा आली. इतका लांबचा प्रवास करीत ते आम्हांला भेटायला आले.  वसईतील आपल्या जवळच्या नातलगांना परदेशात भेटण्यासारखा आनंददायी प्रसंग नाही. आमच्या गप्पांना खूपच रंग चढत होता.  परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी तीन वाजताचा अतुलचा अलार्म असल्यामुळे आम्ही लवकर झोपावे असे त्या दोघांनी आग्रह केला.  पुढच्या वेळी प्रवासाची चांगली आखणी करून घरी नक्की या असा ठराव मांडून ते सर्वजण परतले.  हा प्रसंग नक्कीच आयुष्यभर लक्षात राहील.  

सकाळी पाच वाजता सुरू झालेला दिवस रात्री दहानंतर संपला.  नमूद करण्यासारखी  गोष्ट म्हणजे दोन्ही वेळा दिवसाचा उजेड आमच्या सोबतीला होता. 
मी काही फारसा फिरलो नाही. परंतु न्यूयॉर्क आणि लंडन ही दोन शहरे जागतिक शहरांचा एक फील आणून देतात.  या शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली होत असतात. जगातील प्रमुख आर्थिक कंपन्यांची या दोन शहरांमध्ये कार्यालये आहेत.  हवामानाच्या दृष्टीने पाहिलं तर तीव्र हिवाळा हे साधर्म्य या दोन शहरांमध्ये आढळतं.  बिजनेस फॉर्मल वेश परिधान केलेले आकर्षक व्यक्तिमत्वाचे स्त्री पुरुष सकाळी ज्यावेळी या शहरांच्या डाउनटाउन मध्ये आपल्या कार्यालयांकडे चालत जात असतात त्यावेळी जगातील आर्थिक शहाणपण इथं एकवटलेलं  आहे असा भास होत असतो. या दोन्ही शहरांत तुम्ही चालत बराच वेळ फिरू शकता. मेट्रोचे व्यवस्थित जाळे या दोन्ही शहरांमध्ये आहे. टॅक्सी सहज उपलब्ध होतात.  त्यामुळे स्वतःच्या कार वर  अवलंबून राहणे फारसे होत नाही.  किंबहुना शहराच्या मुख्य भागांमध्ये कार आणणे हे या दोन्ही शहरांमध्ये फारसे प्रोत्साहित केले जात नाही.  लंडन शहरातील पार्क सुद्धा प्रेक्षणीय स्थळांमध्ये मानली जातात.  बरेच जण इथं कुटुंबीयांसमवेत तासनतास वेळ व्यतित करण्यासाठी येत असतात.  शहरांमध्ये सुद्धा निसर्ग कसा जोपासावा याचे हे उत्तम उदाहरण आहे! 

आधी लेखात म्हटल्याप्रमाणे ही झाली लंडन शहराची धावती भेट! एक जाणकार म्हणून ह्या शहराला भेट देण्याचा योग भविष्यात यावा ही इच्छा !

ऋणनिर्देश 
श्री संदीप पाटील - सहलनोंदी 
श्री मनोहर राय - सहलनोंदी 
विकिपीडिया 
सौ. प्राजक्ता पाटील - प्रूफ रिडींग, मराठी शब्द सूचना. 

आधीच्या भागाच्या लिंक्स 

रविवार, ३० जून, २०२४

२०२४ - युरोप सहल - पूर्वतयारी, बोरिवली ते लंडन व्हाया T2

युरोप सहलीचा बेत खरं तर २०२० मध्ये आखला होता.  त्यावेळी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडचा व्हिसा मिळाला सुद्धा होता. शेंघेन व्हिसासाठी कागदपत्रांची जमवाजमव सुरू असतानाच कोविड सुरू झाला.  अर्थातच सर्व सहली पुढे ढकलल्या गेल्या. २०२२ पर्यंत सहली सुरू झाल्या नव्हत्या किंवा मर्यादित प्रमाणात सुरु होत्या. त्यानंतर वीणा वर्ल्डने आमच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.  आमच्यासमोर दोन पर्याय होते. पहिला म्हणजे बुकिंगसाठी दिलेल्या काही रकमेवर पाणी सोडून बाकी रक्कम परत घेणे.  दुसरा पर्याय म्हणजे आता वाढलेल्या किंमतीनुसार फरक भरून काढून उपलब्ध असलेल्या सहलीमध्ये सहभागी होणे.  २०२३ साली आम्हां सर्वांचे वेळापत्रक वीणा वर्ल्डच्या उपलब्ध असलेल्या सहलींच्या वेळापत्रकासोबत न जमल्यामुळे तेव्हा आम्ही युरोप सहलीला जाऊ शकलो नाही. 

साधारणतः २०२३ च्या उत्तरार्धात वीणा वर्ल्डने आता ही रक्कम अशीच राखून ठेवणे शक्य होणार नाही असा निर्वाणीचा खलिता पाठविला. त्यामुळे एकतर भारतातील सहलींसाठी ही रक्कम वापरणे किंवा तात्काळ युरोप सहलींचे नियोजन करणे हेच  पर्याय आमच्यापुढे शिल्लक राहिले. आम्ही दुसऱ्या पर्यायाची निवड करत "युरोपियन हायलाईट" ही १३ जूनपासून सुरू होणारी बारा दिवसांची सहल निवडली. 

साधारणतः फेब्रुवारीमध्ये सहलीची निवड केल्यानंतर इंग्लंडचा व्हिसा आणि शेंघेन व्हिसा यासाठी तयारी सुरू झाली.  दोन्ही व्हिसासाठी बऱ्यापैकी सारख्याच कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये प्रामुख्याने तुमच्या बँक अकाउंटमध्ये गेल्या सहा महिन्यात बचत खात्यामध्ये उपलब्ध असलेली सरासरी रक्कम, तुमच्या मुदत ठेवींची माहिती,  तुमच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती, तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तुमच्या कंपनीकडून सहलीच्या कालावधीसाठी तुमची सुट्टी मंजूर झाल्याचे पत्र इत्यादी माहितीचा समावेश होतो.  यातील बरीचशी माहिती आपल्या खाजगी माहितीत समावेश होते अशी भावना निर्माण होते.  मुख्य म्हणजे ही माहिती त्या देशांच्या वकिलातीपर्यंत पोहोचेपर्यंत मध्यस्थ कर्मचाऱ्यांना देखील ही माहिती उपलब्ध होते.  हे खरोखरच आवश्यक आहे काय हा प्रश्न निर्माण होतो. 

ही बाब वगळता वीणा वर्ल्डतर्फे व्हिसाचे नियोजन करणे हा एक चांगला अनुभव असतो. ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वीणा वर्ल्ड तुम्हाला खूप सहकार्य करते.  तुम्ही भरलेल्या अर्जाची सखोल छाननी करून त्यात काही चुका असल्यास त्या तुम्हांला दुरुस्तीसाठी पाठवून देण्यात येतात.  त्याचप्रमाणे इंग्लंड  आणि शेंघेन देशांपैकी ज्या देशाच्या व्हिसा मुलाखतीसाठी सर्वात पहिली तारीख मिळू शकते त्या देशाच्या वकिलातीमध्ये व्हिसासाठी तुम्हाला तारीख मिळवून देण्यात वीणा वर्ल्ड अत्यंत मोलाचे सहकार्य करते.  प्रत्येक माणसाच्या दृष्टीने वेळ आणि पैसा या दोन महत्त्वाच्या घटकांपैकी प्राधान्यक्रम ठरलेला असतो.  काहींसाठी वेळ महत्त्वाचा तर काहींसाठी पैसा! तुम्ही स्वतः ही संपुर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुमचा पैसा वाचेल पण तुम्हांला  त्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल, हजारो लोकांचे व्हिसा करून दिलेल्या अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाला तुम्ही मुकाल.  हे काही मोठे क्लिष्ट काम आहे असे मला म्हणायचे नाही.  परंतु ते मोठे डोकेदुखीचे काम आहे हे मात्र नक्की! यामुळे वीणा वर्ल्डचा या प्रक्रियेतील सहभाग आमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरला असे मी म्हणेन. 

आम्हांला इंग्लंड व्हिसासाठी वांद्रा,  कुर्ला संकुलात बोलवण्यात आले.  शेंघेन व्हिसासाठी आम्ही महालक्ष्मी येथील ऑफिसमध्ये गेलो.  दोन्ही ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजित केलेली प्रक्रिया आहे.  सर्वप्रथम तुम्ही आणलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते.  या कार्यालयात ज्या क्रमानं कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्याच क्रमवारीने वीणा वर्ल्डने आम्हांला कागदपत्रांची आखणी करून दिली होती.  त्यामुळे तेथील कर्मचारी वर्गांची बरीच मेहनत वाचली.  ही कागदपत्रांची छाननी करून झाली की मग पुढे तुमचे बायोमेट्रिक, व्हिसाची फी भरणे इत्यादी सोपस्कार पार पाडले जातात.   या सर्व प्रकारास दीड तास लागतो.  त्यानंतर एका वकिलातींद्वारे सर्व तपासणी होऊन एका आठवड्यात तुमची पारपत्र तुमच्या घरी कुरियरने पोहोचवली जातात.  ह्या कार्यालयात  जाऊन पारपत्र स्वीकारण्याचा पर्याय सुद्धा तुमच्यासमोर उपलब्ध असतो.  परंतु इतक्या उन्हात या दोन लांबच्या ठिकाणी पुन्हा जाण्यापेक्षा थोडे अधिक पैसे देऊन पारपत्रे घरी स्वीकारण्याचा पर्याय आम्ही निवडला. 

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये व्हिसासकट पारपत्रे आमच्या हाती आली होती.  त्यामुळे एक प्रकारची काहीशी आश्वासकता निर्माण झाली होती.  आता सहलीची तयारी करण्यास आम्ही मोकळे होतो. वीणा वर्ल्ड  युरोपच्या सहलीसाठी जाणाऱ्या भावी प्रवाशांना माहिती देण्यासाठी अनेक झूम बैठकींचे आयोजन केले जाते करते. त्यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश होतो. 

  1. सहलीमध्ये घेऊन जाण्यासाठी आवश्यक असणारी पौंड, युरो रक्कम 
  2. सहलीत किती बॅगा घेऊन जाव्यात. चेक इन, केबिन बॅगांची संख्या किती असावी? त्यात नेऊ शकू अशी शिफारस करण्यात आलेल्या गोष्टी. 
  3.  युरोपमध्ये आपल्या मौल्यवान गोष्टींची कशी काळजी घ्यावी.  पारपत्र हरवल्यास किती गंभीर प्रसंगास तोंड द्यावे लागू शकते ह्याची आपणास वारंवार जाणीव करून दिली जाते. 
  4.  युरोपात हॉटेलमधील खोल्या आकाराने अगदी छोट्या असतात. ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही सुद्धा घेतला. एका हॉटेलात आमच्या तिन्ही बॅग्स उघडल्यानंतर संपूर्ण खोली व्यापून गेली होती. 
  5. इथे सार्वजनिक नळातील पाणी थेट तुम्ही घेऊन गेलेल्या बाटलीमध्ये भरून पिऊ शकता. त्यामुळं रिकामी बाटली नेणं आवश्यक आहे. ह्या विधानावर उगाचच भुवया उंचावू नये. 
  6.  सुके खाद्यपदार्थ नेणे आवश्यक आहे की नाही ह्यावर मार्गदर्शन करण्यात येतं. माझ्या अनुभवानुसार तुम्ही वीणा, केसरीसारख्या कंपन्यांद्वारे प्रवास करत असाल तर सुक्या खाद्यपदार्थांची अजिबात आवशक्यता नाही. 
  7.  लोकरी कपडे किती न्यावेत. 
  8.  युरोपातील कित्येक ठिकाणी आढळणाऱ्या चोरट्यांपासून आपल्या मौल्यवान वस्तूंचे कसे संरक्षण करावे. 

सतत बारा दिवस प्रवास करत असल्यामुळे कपड्यांचे नियोजन हे प्रत्येकाने आपापल्या सवयीनुसार, आवडीनुसार करणे आवश्यक आहे.  बहुतेक विमानकंपन्या तुम्हाला दोन चेक इन बॅग्स नेण्यास परवानगी देतात.  वीणा किंवा तत्सम प्रवास कंपन्यांबरोबर आपण स्वदेशामध्ये प्रवास केला असल्यास आपण अत्यंत खुशीत असतो. हॉटेलमधील खोली ते प्रवासाची बस यामध्ये बॅग्सची ने आण करण्यासाठी हॉटेलमधील कर्मचारी आपल्याला मदत करतील अशी नियोजन ह्या प्रवासकंपन्यांनी केलेले असते. परंतु परदेशामध्ये मात्र मनुष्यबळ इतक्या सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने किंवा असे मनुष्यबळ उपलब्ध करणे ही खर्चिक बाब असल्यानं आपल्या बॅग्सची बस ते हॉटेलची खोली यामधील ने आण आपल्यालाच करावी लागते. त्यामुळे माणशी दोन चेकिंग बॅगा हा योग्य पर्याय असू शकत नाही.  बऱ्याच वेळा या बस हॉटेलपासून बऱ्यापैकी दूर अंतरावर थांबतात.  अशावेळी दोन चेकिंग बॅगा, एक केबिन बॅग स्वतः वाहून नेणे हे बहुतांशी प्रवाशांना सहजसाध्य होत नाही.  त्यामुळे "Travel Light Travel Smart" या तत्त्वाचे अंगीकरण करणे हे अत्यंत आवश्यक आहे.  

सतत बारा दिवस तुम्ही घराबाहेर राहता.  युरोपातील ज्या हॉटेलमध्ये आपण वास्तव्य करतो तिथं वॉशिंग मशीन सहजासहजी उपलब्ध असल्याचे मी तरी पाहिले नाही.  जरी ती उपलब्ध असली तरी कपडे धुण्याचे आणि वाळवण्याचे वेगळे मशीन अशा एकंदरीत प्रकारात तुमचा सहजासहजी दीड दोन तास वाया जाण्याची शक्यता असते.  बहुतांशी वेळा रात्रीचे जेवण आटपून आम्ही खोलीत प्रवेश करेस्तोवर दहा वाजले होते.  सकाळचा गजर सर्वात लवकर तीन वाजता आणि सरासरी सहा वाजता होत असे.  या सर्व प्रकारात हॉटेलमधल्या लॉन्ड्रीचा वापर करत कपडे धुणे हे बऱ्यापैकी कठीण आहे.  त्यामुळे तुम्ही बारा दिवसांचे कपडे आपापल्या सवयीनुसार घेऊन जाणे आवश्यक आहे.  आता यामध्ये अधिक खोलात शिरणे मी प्रशस्त समजत नाही.  केवळ दोन जीन्सवर बारा दिवस काढणारी मंडळी सुद्धा असू शकतात असे विधान करून मी या विषयावर पडदा पडत आहे. सोशल मीडियावरील सर्व फोटोत दोनच रंगांच्या जीन्स दिसतील हे योग्य आहे का अशा शंका असतील तर त्यावर विविध उपाय आहेत. 

भले तुम्ही दोन आठवडाभर आधी पॅकिंगला सुरुवात करा.  खरं पॅकिंग हे प्रवासाच्या आदल्या दिवशी होते.  त्यावेळी रात्री झोपताना सर्व चेक-इन बॅगा कुलूपबंद  करून दिवाणखान्यात आणल्या गेलेल्या असाव्यात. लॉकसाठी टीएसए कुलुपं  नावाचा प्रकार असतो.  माझ्या समजूतीनुसार सुरक्षा यंत्रणेकडे टीएसए कुलुपं उघडू शकतील अशा किल्ल्या असतात.  त्यामुळे जर त्यांना संशय आला तर ते त्या किल्ल्यांद्वारे टीएसए कुलुपं लावलेल्या बॅग्स उघडून तपासणी करून पुन्हा त्या बंद करून ठेवतात.  जर तुम्ही या कुलुपांव्यतिरिक्त दुसरी कुलुपं वापरलीत तर त्यांना ती कुलुपं तोडण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नसतो.  माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात अशी कुलुपं फोडली गेली होती.  परंतु तो अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय प्रवास असल्याने त्यांनी आमच्यासाठी  दुसरी कुलुपं बॅगेमध्ये ठेवली होती.  असो! 

ज्याक्षणी तुम्ही विमानतळासाठी बोलावलेल्या टॅक्सीचे इमारतीखाली आगमन झालं आहे असा टॅक्सी चालकाचा मेसेज किंवा फोन येतो त्यावेळी दोन मिनिटं थांबून आपल्या सर्वांची पारपत्रे आणि आपण घेतलेले परकीय चलन हे नक्की कोणत्या बॅग्समध्ये आहे याची खातरजमा करून घ्यावी.  संपूर्ण प्रवासामध्ये या दोन गोष्टी शक्यतोवर एकाच ठिकाणी ठेवाव्यात आणि ह्या बॅग / पाकिटाकडं दुर्लक्ष करण्याचा वेंधळेपणा करू नये.  प्रत्येक ठिकाणी बसमधून उतरताना पारपत्र आपल्यासोबत घेऊन जाण्याची दक्षता घ्यायला हवी.  आता चलनाच्या बाबतीत! हल्ली  चलन तुम्ही रोख रकमेच्या स्वरूपात घेऊ शकता किंवा तुमचे क्रेडिट, डेबिट कार्ड आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी सक्षम करू शकता किंवा फॉरेक्स कार्ड घेऊ शकता.  तुम्ही जरी कार्डद्वारे परदेशात  खरेदी करणे हा योग्य पर्याय समजत असाल तरी काही दुकानांमध्ये ही स्वीकारली न जाण्याची शक्यता असल्यानं तुमच्यासोबत किमान रोख रक्कम असणे आवश्यक आहे.  इंग्लंडमध्ये केवळ पौंड स्वीकारले जातात.  बाकी सर्व युरोपियन देशांमध्ये युरो स्वीकारले जातात.  आम्ही भेट दिलेल्या देशांमध्ये याला अपवाद स्वित्झर्लंडचा होता.  तिथलं स्थानिक चलन स्विस फ्रॅंक आहे.  त्यामुळे ते तुम्हाला शिलकीची रक्कम फ्रॅंक नाण्यांमध्ये देतात.  आता फ्रॅंकमधील नोटा व नाणी हे दोन वेगळे प्रकार आहेत. तुम्ही जर भारतात परकीय चलन परत आणून ते स्वीकारणाऱ्या  आस्थापनांमध्ये गेलात तर तिथे नोटा स्वीकारल्या जातील परंतु नाणी नाहीत.  त्यामुळे स्वित्झर्लंडमधून बाहेर पडताना सर्व फ्रॅंकची नाणी खरेदीसाठी वापरून टाकणे आवश्यक आहे.  त्याचबरोबर युरोप प्रवास समाप्तीआधी युरोपमधील सर्व नाणी खरेदीसाठी वापरावीत.  मी या गोष्टींकडे पैसे वेगळ्या प्रकारे बघतो.  माझ्याकडे अशी सुट्टी नाणी बरीच आहेत.  अशीच ही नाणी पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित करून दीडशे दोनशे वर्षानंतर त्यांना दुर्मिळ वस्तूंचा खजिना  उपलब्ध असेल अशी माझी विचारसरणी आहे. 

आमचं लंडनला जाणार विमान खरं तर दुपारी पावणेदोन वाजता मुंबई विमानतळावरून निघणार होते.  परंतु एक दिवस आधी या विमानाची वेळ पुढे आणण्यात आली असून  आता हे विमान एक वाजून दहा मिनिटांनी विमानतळावरून निघेल असा संदेश आम्हांला  एअर इंडिया आणि वीणा वर्ल्ड या दोघांकडून आला.  आतापर्यंतच्या इतिहासात विमान आधी सुटण्याचा ( ते ही केवळ पत्तीस मिनिटं) संदेश येण्याची ही पहिलीच वेळ होती.  त्यामुळे मी स्वतःला चिमटा काढून हे खरोखरच होत आहे ना याची खात्री करून घेतली.  आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी चार तास आधी विमानतळावर हजर व्हायला हवं असा नियम मी स्वतःसाठी घालून घेतला आहे.  बरेचजण  यावर माझी फिरकी घेतात.  परंतु मी याबाबतीत ठाम आहे.  मर्फी नामक सद्गृहस्थाचा नियम आहे - एखादी गोष्ट चुकीची घडण्याची जर शक्यता असेल तर ती केव्हातरी नक्कीच चुकीची घडणार.  विमानतळावर प्रवेश करण्याआधी सुरक्षाकर्मचाऱ्याने केलेली तपासणी, चेकइन बॅग्स एअरलाईनला हस्तांतरित करून बोर्डिंग पास घेणं, सुरक्षातपासणी, इमिग्रेशन आणि इच्छित गेटसमोर उड्डाणाआधी एक तास पोहोचणं ह्या सर्व सोपस्कारांचा विचार करता हे चार तास आवश्यक आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे.  

कंपनीद्वारे होणारा विमानप्रवास बिझनेस  क्लासने होत असल्यामुळे तिथं ही सर्व प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडते.  त्यामुळे बऱ्याच दिवसांनी इकॉनॉमी क्लासने करत असलेल्या या प्रवासाविषयी माझ्या मनात काहीशी साशंकता निर्माण झाली होती.  त्यामुळे घरच्या सर्वांना लवकरात लवकर निघण्याची मी विनंतीवजा धमकी देत होतो.  एक वाजून दहा मिनिटाचे विमान लक्षात घेता त्यातून चार तास वजा केले तर नऊ वाजून दहा मिनिटांनी विमानतळावर पोहोचायला हवे.  मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग हा आठ वाजल्यानंतर कांदिवलीच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपासून अत्यंत गजबजलेला असतो.  आठ वाजल्यानंतर त्या बिंदूपासून विमानतळावर पोहोचण्यासाठी नक्की किती वेळ लागू शकतो याविषयी छातीठोकपणे कोणताही तज्ञ सांगू शकत नाही.  त्यामुळे असे सर्व अशाश्वततेला आमंत्रण देणारे घटक लक्षात घेता घरातून साडेसात वाजता सर्वांनी निघावे असे फर्मान मी काढले.  सर्व आटपून आम्ही पावणेआठ वाजता विमानतळाकडं प्रस्थान केलं.  सुदैवाने पश्चिम द्रुतगती मार्ग हा बऱ्यापैकी मोकळा होता.  आम्ही त्यामुळे साडेआठ वाजता विमानतळावर पोहोचलो.  आमच्या सोबत माझी मोठी बहीण सुस्मितताई आणि तिचे यजमान संदीपभाई सुद्धा होते.  ते अंधेरीहुन निघाले होते.  आमची लगबग ध्यानात  घेता ते सुद्धा लवकरच निघाले होते.  योगायोगाने ते आणि आम्ही एकाच वेळी विमानतळावर पोहोचलो.  तेथील सुरक्षा रक्षकाने आमच्या तिकिटांकडे  पाहत तुम्ही इतक्या लवकर का आलात अशी प्रश्नार्थक मुद्रा केली.  ती मुद्रा प्राजक्ताने माझ्याकडे हस्तांतरित केली.  कोणत्या क्षणी आकाशाकडे पाहावे हे इतक्या वर्षानंतर मला नक्की ठाऊक असल्यामुळे मी आकाशातील ढगांकडे पाहत असल्याचे ढोंग केले.  थोड्याच वेळात आम्ही एअर इंडियाच्या चेक इन रांगेत होतो.  माझ्या दुर्दैवाने म्हणा पण इथं सुद्धा कोणीच नव्हते.  त्यामुळे लगेचच आम्ही तेथील स्त्री कर्मचाऱ्याच्या समोर आमच्या पाच चेक इन बॅग्स घेऊन हजर होतो.  तिथेच आमची वीणा वर्ल्डचे  टूर मॅनेजर अतुल भोबे यांच्यासोबत भेट झाली.  त्यांनी माणशी  एक अशी ठेपल्याची पाच पाकिटे आमच्या स्वाधीन केली.  थोड्याच वेळात आमच्या पाचही बॅगा एअर इंडियाच्या पट्ट्यांवर होत्या. त्यांनी योग्य पट्ट्यांवर योग्य दिशेने प्रवास करून आमच्याच विमानाच्या पोटात जावे  अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना केली.  

इतक्यात आम्हांला  एक अत्यंत धक्कादायक बातमी कळाली. अर्धा तास लवकर उड्डाण करणे अपेक्षित असलेलं आमचे विमान बऱ्याच उशिराने प्रस्थान करणार होते. आमची  बोर्डिंग वेळ  ही आता सव्वा दोन वाजताची करण्यात आली होती.  या क्षणी नऊसुद्धा वाजले नव्हते.  आम्हांला आता जवळपास पाच तास वेळ घालवायचा होता.  सुरक्षातपासणी सुद्धा अत्यंत वेगाने झाली.  तेथील अधिकाऱ्यांनी युरोपातील हवामान कसे असेल याविषयी प्राजक्ताशी बातचीत केली.  सुरक्षातपासणी झाल्यानंतर आम्ही फूडकोर्ट मधील एक मोक्याची जागा पकडली.  आमच्या विमानाचा गेट क्रमांक ७६ होता.  ते गेट आम्हांला आम्ही  बसलेल्या जागेवरून दिसत होते.  एव्हांना आम्हांला बऱ्यापैकी भूक लागली होती.  मसाला डोसा फक्त ३८० रुपये,  चहा १८० ते २१० रुपये असे माफक दर पाहून आमच्या डोळ्यांत आलेल्या आनंदाश्रूंना न जुमानत आम्ही हे पदार्थ ग्रहण केले.  वीणा वर्ल्डने दिलेले ठेपलेच्या पाकीट उघडले, ते जास्तच  तेलकट आहेत  असा निष्कर्ष काढण्यात आणला.  




बराच वेळ काहीच घडत नव्हते.  मग थोड्या वेळाने त्या गेटवर एअर इंडियाचे एक विमान आले.  त्या विमानाभोवती कर्मचारी येऊन थोडावेळ काही घडामोडी झाल्या.  त्या बघण्यात आमचा वेळ गेला.  त्यानंतर  जवळच्या गेटवर दुसरे एक एअर इंडियाचे विमान आले.  तिथे सुद्धा कर्मचारी येऊन बऱ्याच काही घडामोडी होऊ लागल्या.  तेव्हा बारा वाजत आले होते.  वैतागून मी सोहमला एअर इंडियाला ट्विटरवर मेसेज कर असा सल्ला दिला.  कधी नव्हे त्यांनं तो मानला.  अहो आश्चर्यम!  पुढील पाच मिनिटांत एअर इंडियाचा प्रतिसाद आला.  या उशिराबद्दल त्यांनी खेद व्यक्त करून आम्ही त्याची नोंद घेतली आहे; यावर आम्ही नक्कीच कृती करू असा संदेश पाठवला. योगायोगाची गोष्ट म्हणजे  थोड्याच वेळात आम्हांला वीणा वर्ल्डच्या अतुल यांनी पाठवलेला एअर इंडियातर्फे त्या विमानातील सर्वांच्या भोजनाची सोय करण्यात आली आहे असा संदेश मिळाला.  त्यात वरण-भात आणि भाजी असा मेनू होता.   जेवण जरी अत्यंत साधे असले तरी अगदी योग्य वेळ मिळाल्याने ते अमूल्य वाटले. 

अशा प्रकारात सर्व वेळ गेल्यामुळे आता दोन वाजू लागले होते.   जवळच्या गेटमधील विमानामध्ये वेगाने घडामोडी होत असल्याचे दिसू लागले होते.  थोड्याच वेळात विमानाचे गेट बदलून या नवीन विमानाच्या गेटची घोषणा करण्यात आली.  आम्ही तीन वाजताच्या सुमारास तिथे गेलो.  विमानाचे बोर्डिंग काही वेळात सुरू झाले.  अचानक मला तिथं चेतेश्वर पुजारा दिसला.  तो बिझनेस क्लासने जरी प्रवास करत असला तरी एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्यांने  त्याला काहीतरी  सांगितले. तो बिचारा शांतपणे बाजूला कोपऱ्यात जाऊन वाट बघत राहिला.  थोड्याच वेळात त्याला बोलावण्यात आले.  इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसोबतच त्याने प्रवेश केला.  ही संधी साधून मी सोहमला  त्याच्यासोबत सेल्फी घ्यायला सांगितले.  सोहमची विनंती त्याने तात्काळ मान्य केली. 

विमान अत्यंत टुकार होते.  बहुदा खूप जुने होते.  आतल्या स्वच्छतेच्या नावाने अत्यंत बोंब होती.  स्वच्छतागृहे सुद्धा नीट स्वच्छ केली गेली नव्हती.  शेवटी एकदाचे  पावणेचार ते चार मध्ये कधीतरी विमानाने लंडनच्या दिशेने उड्डाण केले.  वादळी हवामानामुळे विमान हेलकावे खात होते.  विमान ज्या ज्या वेळी हेलकावे खात होते त्या त्या वेळी जलपान खानपान सेवा स्थगित केली जाण्याची  उद्घोषणा अत्यंत तत्परतेने विमानात केली जात होती.  बऱ्याच रांगांतील प्रवाशांना केवळ एकच हवाई सुंदरी सर्व काही आणून देत होती.  त्या बिचारीची दया यावी अशी परिस्थिती होती.  ती आपल्या परीने खूप प्रयत्न करत असली तरी इतक्या सर्व प्रवाशांना वेळेवर जलपान खानपान सेवा देणे तिच्या दृष्टीने शक्य नव्हते.  त्यातच भरीला वादळी हवामानामुळे तिला सतत  आपल्या जागी जाऊन बसावे लागत होते.  विमानात थंड हवा झाली तर आवश्यक असणारी ब्लॅंकेट सुद्धा प्रत्येक सीट्सवर उपलब्ध करून देण्यात आली नव्हती.  त्यामुळे प्राजक्ताने विनंती केलेले ब्लॅंकेट येण्यासाठी अर्धा पाऊण तास लागला. प्रवासी अचानक उठून डोक्यावरील केबिनमधील बॅग्समधील जिन्नस काढून घेत होते. ती हवाईसुंदरी ही सर्व केबिन्स पुन्हा बंद करत होती. सीटसमोरील स्क्रीन कशीबशी चालू होती.  परंतु त्यातही सर्व काही पर्याय उपलब्ध नव्हते.  टॉयलेटच्या स्वच्छतेविषयी न बोललेलेच बरे! जेवण ठीकठाक होते.   त्यात नाव ठेवण्यासारखं काही नसलं तरी आठवणीत राहील असंही काही नव्हतं.  अशा प्रकारे एका अत्यंत निरस आणि वैतागवाणा साडेनऊ तासाचा प्रवास करून आम्ही एकदाचे हीथ्रो  विमानतळावर स्थानिक वेळेनुसार साडेनऊच्या आसपास उतरलो.  

(क्रमशः) 

आधीच्या भागाची लिंक 

शनिवार, २९ जून, २०२४

२०२४ - युरोप सहल - प्रस्तावना






नुकत्याच आटोपलेल्या बारा दिवसांच्या युरोप दौऱ्यानंतर मनात अनेक सकारात्मक भावना दाटल्या आहेत. भव्य ऐतिहासिक वास्तू, निसर्गाची डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी क्षणाक्षणाला समोर येणारी रूपं आपल्याला थक्क करत राहतात. देशानुसार बदलणारं भोवतालच्या निसर्गाचं सौंदर्य, रूप नुसतं अनुभवायचं नसतं तर निवांत क्षणी त्याचा सखोल अभ्यास करायचा असतो. खूप थोड्या कालावधीत इतकं काही अनुभवायला मिळतं की हे थोड्या सावकाशपणं अनुभवायला मिळायला हवं होतं असं वाटत राहतं. 

वीणा वर्ल्डतर्फे आयोजिलेल्या ह्या सहलीत आम्ही इंग्लंड, फ्रान्स, नेदरलँड्स (हॉलंड), बेल्जियम, लक्सेनबर्ग, जर्मनी, स्वित्झर्लंड, लिचेनस्टिन, ऑस्ट्रिया, इटली, सॅन मरिनो, व्हॅटिकन सिटी (जगातील सर्वात छोटा देश) अशा बारा देशांना धावती भेट दिली. युरोप अनुभवायच्या अनेक पद्धती आहेत. ही सहल बहुदा तोंडओळख ह्या प्रकारात मोडणारी. पुढं वेळ, पैसा, तब्येत ह्या सर्वांचे समीकरण जुळून आलं तर ह्या देशांतील आवडलेल्या ठिकाणांना निवांत भेट देण्याची इच्छा सदैव मनात राहील. 

केवळ एकच ठिकाण निवडायचं झालं तर स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया मधील एखाद्या अनामिक डोंगरातील एका छोट्या घरात होम स्टे च्या माध्यमातून आठवडाभर रहायला आवडेल. यजमानांकडे एका सायकलची विनंती करायची आणि सकाळी नाश्ता आटपून त्या हिरव्यागार डोंगरांच्या दिशेनं कूच करायचं. वाटेत येणाऱ्या झऱ्यांतील निर्मळ जलाने तहान भागवावी, अधूनमधून झाडांखाली हिरव्यागार गवतावर लोळत पडावं. चरणाऱ्या गायींना हळुवार स्पर्श करावा, रात्री नऊ - दहापर्यंत आकाशात रेंगाळणाऱ्या दिनकरावर विसंबून न राहता सायंकाळी परत यजमानाच्या घरी परतावं, त्यांनी बनविलेल्या रुचकर पास्ता, पिझ्झाचा आस्वाद घेऊन झोपी जावं. 

पुढील भागांत मुंबईपासून सुरु झालेल्या आमच्या प्रवासाचा, प्रत्येक देशात काय अनुभवलं ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न राहील. जे काही अनुभवता आलं नाही त्याविषयी अर्थात अधिकारवाणीने बोलता येणार नाही. तरीही त्याविषयी टिपणी करण्याचा प्रयत्न राहील. एअर इंडियाविषयी काही नकारात्मक, काही सकारात्मक अभिप्राय, वीणा वर्ल्डसोबत प्रवास करत असल्यानं इमिग्रेशन, दूरदूरची ठिकाणं एका दिवसांत कूच करण्यात आलेली सहजता, राहण्याची नाश्ता-जेवणाची उत्तम सोय, सहल व्यवस्थापक अतुल भोबे ह्यांनी अत्यंत व्यावसायिकपणे  तरीही माणुसकीची शिंपड करत पार पाडलेली सहल, भारताच्या क्रयशक्तीने जगभर निर्माण केलेला दबदबा, त्यामुळं भारतीय संस्कृती, भोजनपद्धतीला स्वीकारण्यासाठी चाललेली पाश्चात्य देशांची धडपड, त्यामुळं कुठंतरी सुखावणारं आपलं मन पण त्याचबरोबर सुधारलेल्या आर्थिक स्थितीमुळं आपल्या देशवासीयांच्या वागण्यात जाणवणारा आणि काहीसा उद्धटपणाकडं झुकणारा आत्मविश्वास पाहून दुखावणारं आपलं मन हे सारं काही जमेल तसं पुढील दहा - बारा भागांत सादर करण्याचा प्रयत्न राहील. खरंतर घाईघाईनं ब्लॉगपोस्ट प्रसिद्ध करण्याची माझी खासियत. पण ह्यावेळी मात्र शांतपणे हे प्रवासवर्णन प्रसिद्ध करण्याचा माझा प्रयत्न राहील. दीर्घकाळ थांबलो तर दैनंदिन आयुष्यातील संघर्ष ह्या निसर्गरम्य आठवणींना पुसून टाकण्याचा किंवा त्यांना विरळ बनविण्याचा धोका राहीलच. So All the Best - Aditya !!

रविवार, २६ मे, २०२४

अनियोजित महानगर वाढ आणि संभाव्य धोके !



आपल्याभोवताली सर्वत्र महानगरांचा कायापालट सुरू आहे.  जर मुंबई शहरात आपण राहत असाल तर सभोवताली मोठ्या वेगानं पसरणारे गगनचुंबी इमारतींचे जाळं, विविध ठिकाणी उभारले जाणारे उड्डाणपूल आणि सर्वत्र खणलेले रस्ते हे चित्र आपल्याला सतत दिसत राहतं.  आजच्या लेखाचा विषय मुंबई शहरात उभारल्या जाणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि ह्या इमारतींना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयींचं प्रशासनानं कसं सखोल, विचारपूर्वक नियोजन केलं पाहिजे याविषयी आहे.  

पाणीपुरवठा 

सर्वात प्रथम मुद्दा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे ह्या इमारतींमध्ये  वास्तव्य करण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक पाणीपुरवठ्याची तरतूद कशा प्रकारे करण्यात आली आहे? जर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रामध्ये व्यवस्थित पाऊस पडला आणि ही वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन आखल्या गेलेल्या सर्व अतिरिक्त पाणीपुरवठाच्या योजना वेळीच पूर्ण झाल्या तर कदाचित सर्वकाही आलबेल असू शकेल.  परंतु एखाद्या वर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने कृपादृष्टी केली नाही तर इतक्या प्रचंड लोकसंख्येला कसा पाणीपुरवठा करणार हा एक मोठा यक्ष प्रश्न होऊ शकतो. मुंबईच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य देऊन बाकीच्या शहर, गावांचे पाणी मुंबईकडं खेचलं जाऊ शकतं, पण नैतिकदृष्ट्या ही चुकीची उपाययोजना आहे. 

पावसाच्या पाणीसाठवणाविषयी (Rainwater Harvesting) काही बांधकाम व्यावसायिक जागरूकता दाखवितात. परंतु ह्याची अधिक व्यापकतेने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ही बाब जर ऐच्छिक असेल तर ती बंधनकारक करायला हवी.  

प्लॅस्टिक वापर आणि कचरा व्यवस्थापन 

प्लॅस्टिकबंदी ही हल्ली तात्कालिक घटना बनली आहे. काही काळ अचानक प्रशासन जागं होतं आणि प्लॅस्टिकबंदी घोषित केली जाते. काही काळाने पुन्हा येरे माझ्या मागल्या असा प्रकार दिसून येतो. उंच इमारतीमधील रहिवाशी सुजाण असल्याची आशा आपण करू शकतो. त्यामुळं त्यांनी ह्याबाबतीत जागरूकता दाखवावी ह्यासाठी खास प्रयत्न केले जावेत. 

सुका आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून मगच तो कचरापेटीपर्यंत पोहोचावा ह्याबाबत सुद्धा हीच गोष्ट दिसून येते. ह्या बाबतीत अत्यंत कडक नियम लागू का केले जात नाहीत ही माझ्या समजुतीपलीकडली गोष्ट आहे. दैनंदिन दिवसात जर प्रत्येक नागरिकाने ह्यासाठी काही मिनिटं राखून ठेवली तर पर्यावरण हानी वाचविण्यासाठी आपण मोठा हातभार लावू शकतो. 

विद्युतपुरवठा 

मुंबई शहरातील उन्हाळा हा अत्यंत दाहक होऊ लागला आहे. पूर्वी केवळ मे महिन्यात AC सुरु व्हायचे, पण हल्ली वर्षातील अनेक महिन्यात वातानुकूलित यंत्रणेशिवाय घरात बसणे जवळपास अशक्य होऊ लागले आहे. नवीन पिढीनं शाळेपासूनच वातानुकूलित यंत्रणेनं थंड केलेल्या वर्गात दिवस काढल्याने त्यांना AC शिवाय घरात बसणं म्हणजे मानवाधिकार हक्कांची पायमल्ली वगैरे प्रकार वाटू शकतो.  या इमारतींमध्ये प्रचंड संख्येने निर्माण झालेल्या सदनिकांची वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी अत्यंत मोठ्या  प्रमाणात अधिक विद्युतनिर्मिती करणे आवश्यक आहे. ह्या अत्याधुनिक घरांना प्रत्येक गोष्टीसाठी विद्युत पुरवठ्याची गरज लागते.  त्याच बरोबर या बऱ्याच  इमारतींमध्ये पार्किंगसाठी पहिले सात-आठ मजले राखून ठेवण्यात येतात.  बऱ्याच इमारतीमध्ये त्यातील रहिवाशांच्या कार या उद्वाहकाच्या साहाय्यानं वर खाली केल्या जातात. 

इमारतींमध्ये रहिवाशांना, इस्त्रीवाले, झोमॅटो, ऍमेझॉन डिलिव्हरी मुले ह्या सर्वांना वर खाली आणण्यासाठी उद्वाहकांना सतत मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा करावा लागतो.  मुंबई शहराला हा इतका अतिरिक्त विद्युतपुरवठा सातत्यानं २४ तास करणे शक्य होणार आहे का याचा विचार करणे खूप गरजेचे झाले आहे. 

आपत्कालीन नियोजन (डिझास्टर मॅनेजमेंट) हे एक सद्यकाळातील अत्यावश्यक तंत्र आहे.  ज्या काळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते त्यावेळी विविध मूलभूत सुविधा कशा सुरळीतपणे चालू ठेवल्या जाऊ शकतील, अशा वेळी निर्णय घेण्याचे अधिकार नक्की कोणाकडे असतील याविषयी अत्यंत बारकाव्यांनिशी  नियोजन करणे आवश्यक असते. हे नियोजन लिखित स्वरूपात असणं आणि आपत्कालीन परिस्थिती घोषित करणाऱ्या अधिकारी व्यक्तीची निवड करणे ह्या सर्व गोष्टी सुस्पष्ट असाव्यात, वेळोवेळी त्यांची तपासणी करून त्यांना अचूक स्वरूपात ठेवायला हवं. 

मुंबईला विद्युतपुरवठा करणारी यंत्रणा जर काही मिनिटं किंवा तासांकरता  खंडित झाली तर या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होईल याचा सखोल अभ्यास कशा पद्धतीने केले करण्यात आला आहे हे सर्व नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे.  साधा मुद्दा म्हणजे जर विद्युत पुरवठा खंडित झाला आणि बॅकअप प्लॅन म्हणून असलेली जनित्र यंत्रणा सुद्धा जर बंद पडली तर उंचावरील मजल्यावर राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना आणीबाणीची परिस्थितीत सुरक्षितरित्या कसं खाली आणता येईल ह्याचं नियोजन झालेलं असणं आवश्यक आहे. 

वाहतुकीवर पडणारा अतिरिक्त ताण 

या इमारतींमध्ये प्रत्येक सदनिकेत सरासरी दीड ते दोन कार असणार. ही सर्व वाहने सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळी एकत्र रस्त्यावर आली तर त्या रस्त्यांची क्षमता हा अतिरिक्त ताण सहन करण्यासाठी सक्षम आहे का याचा विचार कितपत करण्यात आला आहे? प्रशासनाला सतत रस्ते खोदून ठेवण्याची सवय आहे.  रस्त्याच्या एका भागात थोडं जरी खणकाम केलं तरी  बराच लांबवर त्याचे परिणाम जाणवतात.  या उंच मजल्यांच्या इमारतींच्या आसपास ही वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण आता अत्यंत वारंवारतेने दिसून येणार आहे. अशावेळी रुग्णवाहिका, अग्निशमनदलाची वाहने ह्यांना आपल्या लक्ष्य असलेल्या ठिकाणी पोहचण्यास विलंब होऊ शकतो जो जीवघेणा ठरू शकतो. 

अग्निशमन दलावर पडणारा ताण 

सात ते आठ मजली उंच इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा मुंबई अग्निशामक दलाकडे आहे. त्यांनी अशा इमारतींमध्ये अग्निशमन करण्याचे आपले कौशल्य वारंवार प्रदर्शित केले आहे. आपल्या सर्वांना त्याचा यथार्थ अभिमान आहे,  परंतु आता मुंबई शहराच्या विविध भागांच्या उंच इमारती झाल्या आहेत की एकाच वेळी समजा तीन चार ठिकाणी दुर्दैवाने अशा उंच इमारतींमध्ये आग लागली तर मुंबई अग्निशमन दलाकडे  या आगी विझवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात लागणारं मनुष्यबळ आणि यंत्रणा देखील उपलब्ध आहे का याचा कोणी विचार केला आहे का?

नागरिकांचे मनोस्वास्थ  
अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या एकट्या राहणाऱ्या वयस्कर नागरिकांच्या मनोस्वास्थ्याचा सखोल विचार करायला हवा? पाचव्या सहाव्या मजल्यावर राहताना  आपण जमिनीजवळ असल्याची भावना सुखदायक असते. काही अनिष्ट प्रकार घडला तर कसे का होईना आपण खालच्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतो असा आत्मविश्वास किमान सत्तरीपर्यंच्या नागरिकांमध्ये तरी असतो.  परंतु समजा असे नागरिक पन्नासाव्या मजल्यावर राहत असतील तर मात्र त्यांच्या मनात हे भय सदैव राहणार की काही अनिष्ट प्रसंग उठवला तर आपण कसे खाली पोहोचू शकतो?  त्याच बरोबर या मजल्यांवर जो सतत वेगानं वारा वाहत असतो त्याचे परिणाम कसे होतात हे येणारा काळच आपल्याला सांगेल. 

गगनचुंबी इमारतींचा भविष्यातील पुनर्विकास  
साधारणता १९८० - ९० साली बांधण्यात आलेल्या इमारती आता पुनर्विकासासाठी जात आहेत.  त्या इमारतींना ज्यावेळी उद्ध्वस्त केले जाते त्यावेळी जे  सिमेंट, स्टील आणि अतिरिक्त सामानाचे जे भंगार निर्माण होतं ते शहराबाहेरील डम्पिंग ग्राउंड वर टाकलं जातं.  आज निर्माण होणाऱ्या या तीस - चाळीस मजल्याच्या इमारती पुढील ५० वर्षानंतर ज्यावेळी पुनर्विकासासाठी जातील त्यावेळी निर्माण होणारा बांधकाम साहित्याचा हा अतिरिक्त भार आपल्या जमिनीवर किती प्रदूषणाचे ओझे निर्माण करणार आहे केवळ याचा विचारच असह्य होतो. 

मुलांसाठी मोकळी मैदानं 

ह्या सर्व उंच इमारतीमुळं लोकसंख्येचं केंद्रीकरण होत आहे. ह्या एकत्रित लोकसंख्येला आवश्यक मैदानं आपण पुरवत आहोत का? कमी मैदानांमुळं मुलांना खेळण्यासाठी आणि नागरिकांना चालण्यासाठी मोकळ्या जागांची कमतरता भासणार आहे. वातानुकूलित व्यायामशाळेतील व्यायाम सर्वांनाच परवडणारा नसतो आणि तसंही म्हटलं तर मोकळ्या जागेतील खेळण्याचालण्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. 

सारांश 

आपल्याभोवताली  शहरात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत. त्या आपल्याला दिसतात, जाणवतात.  परंतु आपल्याला त्याविषयी फारसं काही बोलता येत नाही.  कारण हे असंच होणार हे सर्वांनी एकंदरीत गृहीत धरले आहे की काय अशी भोवतालची परिस्थिती आहे.  परंतु ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते त्यावेळी मात्र मग या सर्वांना माहीत असलेल्या गोष्टीच या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्या आहेत हे जाणवतं.  मुंबई शहर आणि त्यात या झपाट्याने वाढणाऱ्या गगनचुंबी  इमारती या अशा अनेक समस्यांचे मूळ बनणार आहेत.  या संभाव्य समस्यांची प्रशासनास जाण आहे का, प्रशासनानं आपत्कालीन नियोजन किती सखोलपणे केले आहे आणि त्या नियोजनाचे ऑडिट करण्यात आले आहे काय हेच मुद्दे आज मला या पोस्टद्वारे मांडायचे आहेत. नागरिकांच्या बाजूनं विचार करायचा झाला तर भविष्यात मुंबई शहरात राहण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक कणखरता आपण दाखवू शकतो ह्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करणं आवश्यक आहे. 

मुंबई हे राहण्यासाठी गेली शंभर - दीडशे वर्षे एक उत्तम नगर, महानगर होतं. ह्या शहरात आपल्या पुढील पिढीसाठी एका किमान दर्जाच्या आयुष्याची तजवीज करून ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.  

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...