मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ११ जून, २०२३

Wilmington Delaware Diaries - भाग३ Brandywine state park

शनिवार दिनांक १० जून २०२३ 




सकाळी नाष्टा आटोपून ब्रँडीवाईन स्टेट पार्कच्या दिशेनं मार्गस्थ झालो. ब्रँडीवाईन ह्या नावानं काही वाचकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण उद्यानात मात्र ह्या दोन्ही गोष्टींना परवानगी नाही. सकाळ अतिप्रसन्न होती. तापमान बहुदा ७० अंश फॅरेनहाईटच्या आसपास असावं. पार्कच्या दिशेनं जाणारा रस्ता हा नेत्रसुख देणारा असा आहे.  



उद्यानात शिरताक्षणी दिसणारं उद्यानात जाणाऱ्या रस्त्याचं आणि त्यानंतर असणाऱ्या इटुकल्या पाऊलवाटचं हे विहंगम दृश्य.  इथं लहान मुलं, तरुण / वृद्ध जोडपी चालण्यासाठी, सायकल चालविण्यासाठी आली होती. समोरासमोर येताच सुस्मित वदनाने सुप्रभात म्हणत होती. 



हिरव्या रंगांच्या ह्या मनसोक्त उधळणीनं मन अगदी प्रसन्न झालं होतं. बऱ्याच दिवसांनी अगदी बालपण स्वीकारून ह्या निसर्गात एकरूप होण्याची इच्छा निर्माण झाली. हवेतील ताजेपणा मनाच चैतन्याची उधळण करत होता. ह्या हिरव्या रंगाच्या मैफिलीत आपलं पिवळेपण मिरवणाऱ्या ह्या इवल्याशा फुलाने लक्ष वेधून घेतलं. 


बाजूला नितळ पाण्याची नदी वाहत होती. वातावरणात पक्ष्यांचा नादरव मनाच्या प्रसन्नतेला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवत होता. पाण्याची शुद्धता मनाला भावत होती. छोटे सर्पवगातील जीव आनंदात पाण्यात मनसोक्त पोहत होते. 








ह्या महाकाय वृक्षाने किंबहुना त्याच्या आकारानं लक्ष वेधून घेतलं. 


वाटेत कापून ठेवलेले हे ओंडके वास्तवाची जाणीव करून देत होते. 

पुन्हा एकदा इवलुश्या फुलांनी लक्ष वेधून घेतलं. 


उद्यानात दिसणारे महाकाय वृक्ष, त्यांचा विस्तार निसर्गापुढं  नतमस्तक होण्याची भावना निर्माण करत होता.  सारं काही विसरून जावं आणि इथंच राहावं असं वाटत होतं. 









निसर्गाला देशाची, खंडांची बंधनं नसतात. वृक्ष, तृण, पक्षी, मासे सर्वांसोबत आपण ह्या बंधनापलीकडं नातं जोडू शकतो. खरंतर इथून पाय निघत नव्हता. पण आमिश वसाहतीला भेट द्यायची होती आणि ती उत्सुकता मनाला स्वस्थ बसून देत नव्हती. 


मंगळवार, ६ जून, २०२३

Wilmington Delaware Diaries - भाग २





अमेरिकेतील महानगरांचा अपवाद सोडला तर निसर्गाच्या सोबतीनं जीवन जगण्याची कला इथल्या लोकांनी अवगत केली आहे असं म्हणावं लागेल. आज खरंतर सोमवार असल्यानं सकाळी अंगात कंटाळा भिनला होता. परंतु कार्यालयात एक दिवस पूर्ण केल्यावर चांगलं वाटलं. सायंकाळी रूमवर आलो तर रूम टापटीप करून ठेवण्यात आली होती.  इस्त्रीचा स्टॅन्ड मी सकाळी काढला होता. 





संध्याकाळी साडेसात वाजता जेवण आटपून बाहेर पाहिलं तर अजूनही बऱ्यापैकी उजेड होता. मित्रांसोबत चालायला बाहेर पडलो. मोकळ्या रस्त्याला "कुठे जातोस रे बाबा?" असा प्रश्न विचारावासा वाटला.  भोवतालच्या परिसरातील रस्त्यांची ही मोहक रूपे! ह्यातील उन्हं वर आल्यानंतरचे फोटो शनिवार सकाळी काढलेले. 









ह्या गुलाबाच्या फुलाचा रंग खासच मोहक !



इथं पानांचीच फुले झाली असावीत की काय असा प्रश्न दूरवरून पाहता क्षणी पडला होता. 





शनिवारच्या फेरफटक्यात काढलेली ही दोन छायचित्रे !





ह्याचा नक्की उपयोग कशासाठी केला जातो हा मला पडलेला प्रश्न !











एकंदरीत संध्याकाळी मारलेल्या ह्या फेरफटक्यानं मन प्रसन्न झालं. मुंबईत असताना सुद्धा पाच वाजता घरी जायला मिळायला हवं ना !

शनिवार, ३ जून, २०२३

Wilmington Delaware Diaries - भाग १

अमेरिका भेटीचा तिसरा दिवस. आतापर्यंतच्या प्रवासातील ही काही छायाचित्रे ! ह्याआधीच्या पोस्टमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासातील सर्व टप्प्यांचे सविस्तर वर्णन करून वाचकांना कंटाळा आणल्यामुळं आता फक्त छायाचित्रं आणि त्यांचे संदर्भ असं ह्या पोस्टचे स्वरूप !

मुंबई - लंडन प्रवासात विमानामध्ये स्वागत ! सोबतीला संत्रा रस !



साडेनऊ तासांच्या प्रवासामध्ये झोपी जाण्याआधी देण्यात आलेला चिकन रोल ! मागच्या वेळी बहुदा हा हलका नाश्ता देण्यात आला नव्हता ! मांसाहाराच्या बाबतीत असलेली वारांची बंधनं हवेत न पाळण्याचा ह्यावेळी घेण्यात आलेला  निर्णय! 


लंडनला उतरण्याआधी देण्यात आलेला मनसोक्त नाश्ता ! हा फोटो फक्त स्टार्टरचा आहे ! मेन कोर्स पाहताक्षणी त्यावर तुटून पडल्यानं फोटो घेण्याचं राहून गेलं !


लंडन विमानतळावर उतरण्याआधी असलेलं ढगांचं आवरण !


लंडन विमानतळावर टर्मिनल पाचवरून टर्मिनल तीनकडे जाणाऱ्या बसमधून दिसणारी विमानं !




लंडन विमानतळावरील ब्रिटिश एअरवेयसच्या लाऊंज मधील फोटो !


इथं फळांचाच जास्त फडशा पाडण्यात आला ! 


टर्मिनल पाचवरील शॉपिंग विभागात निर्मोही मनानं घेतलेला फोटो !


आता उड्डाण अमेरिकेच्या दिशेनं !


इथं आलेल्या भोजनातील स्टार्टर ! पुन्हा एकदा मेन कोर्सचे फोटो घ्यायचं राहून गेलं ! मेन कोर्स खरंतर मी salman मासा सांगितला होता. पण एअर होस्टेसने चिकन आणि बासमती भात आणून दिला !



पण डेसर्टचा फोटो न चुकता घेतला ! हे इतकं चविष्ट होतं की पोट गच्च  भरलेलं असून सुद्धा संपूर्ण संपविलं !



फिलाडेल्फियाला उतारण्याआधी ! नेहमीप्रमाणं काचा टिंटेड करण्यात आल्यानं अंधार झाला होता!


विमानतळावरून हॉटेलमध्ये सोडणारा अमेरिकेच्या सैन्यात काम केलेला मायकल ! हा तीस वर्षांपूर्वी फिलिपाइन्स मध्ये होता. ह्याच्या म्हणण्यानुसार भारतीय जेवण ह्याच्या आवडीचं ! तो बहुदा पालक पनीर खूप आवडतं असं म्हणाला ! खूप चांगला माणूस! 


कालची रम्य पहाट !


सकाळच्या नाश्त्याच्या वेळी हॉटेलच्या डायनींग भागात घेतलेला फोटो! 


कालचा नाश्ता ! 



काल सकाळी कार्यालयात जाण्याआधी घेतलेलं छायाचित्र !




कार्यालयातील डेस्कजवळील खिडकीतून दिसणारे मनोहर दृश्य ! 

पहिल्या दिवस संपला ! सहकाऱ्यांसोबत बाहेर पडल्यानंतर एका टेक अवेच्या बाहेर घेतलेलं छायाचित्र 


सहकाऱ्याच्या घरी जेवायला गेलो. तिथं सायंकाळी त्याच्या कुत्रीसोबत  चालायला गेलं असतांना दिसलेला ससा !


सहकाऱ्याने पाळलेली सुंदर कुत्री ! पण तिनं माझ्या अंगावर उड्या मारण्याचे असंख्य प्रयत्न करून मला हैराण केलं !



नेहमीप्रमाणं जेट lag खूप सतावतोय ! परवा सहा आणि आज चार तास झोप मिळाली आहे ! बघुयात पुढं काय सुधारणा होते का !

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...