मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ११ जून, २०२३

Wilmington Delaware Diaries - भाग३ Brandywine state park

शनिवार दिनांक १० जून २०२३ 




सकाळी नाष्टा आटोपून ब्रँडीवाईन स्टेट पार्कच्या दिशेनं मार्गस्थ झालो. ब्रँडीवाईन ह्या नावानं काही वाचकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण उद्यानात मात्र ह्या दोन्ही गोष्टींना परवानगी नाही. सकाळ अतिप्रसन्न होती. तापमान बहुदा ७० अंश फॅरेनहाईटच्या आसपास असावं. पार्कच्या दिशेनं जाणारा रस्ता हा नेत्रसुख देणारा असा आहे.  



उद्यानात शिरताक्षणी दिसणारं उद्यानात जाणाऱ्या रस्त्याचं आणि त्यानंतर असणाऱ्या इटुकल्या पाऊलवाटचं हे विहंगम दृश्य.  इथं लहान मुलं, तरुण / वृद्ध जोडपी चालण्यासाठी, सायकल चालविण्यासाठी आली होती. समोरासमोर येताच सुस्मित वदनाने सुप्रभात म्हणत होती. 



हिरव्या रंगांच्या ह्या मनसोक्त उधळणीनं मन अगदी प्रसन्न झालं होतं. बऱ्याच दिवसांनी अगदी बालपण स्वीकारून ह्या निसर्गात एकरूप होण्याची इच्छा निर्माण झाली. हवेतील ताजेपणा मनाच चैतन्याची उधळण करत होता. ह्या हिरव्या रंगाच्या मैफिलीत आपलं पिवळेपण मिरवणाऱ्या ह्या इवल्याशा फुलाने लक्ष वेधून घेतलं. 


बाजूला नितळ पाण्याची नदी वाहत होती. वातावरणात पक्ष्यांचा नादरव मनाच्या प्रसन्नतेला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवत होता. पाण्याची शुद्धता मनाला भावत होती. छोटे सर्पवगातील जीव आनंदात पाण्यात मनसोक्त पोहत होते. 








ह्या महाकाय वृक्षाने किंबहुना त्याच्या आकारानं लक्ष वेधून घेतलं. 


वाटेत कापून ठेवलेले हे ओंडके वास्तवाची जाणीव करून देत होते. 

पुन्हा एकदा इवलुश्या फुलांनी लक्ष वेधून घेतलं. 


उद्यानात दिसणारे महाकाय वृक्ष, त्यांचा विस्तार निसर्गापुढं  नतमस्तक होण्याची भावना निर्माण करत होता.  सारं काही विसरून जावं आणि इथंच राहावं असं वाटत होतं. 









निसर्गाला देशाची, खंडांची बंधनं नसतात. वृक्ष, तृण, पक्षी, मासे सर्वांसोबत आपण ह्या बंधनापलीकडं नातं जोडू शकतो. खरंतर इथून पाय निघत नव्हता. पण आमिश वसाहतीला भेट द्यायची होती आणि ती उत्सुकता मनाला स्वस्थ बसून देत नव्हती. 


३ टिप्पण्या:

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...