मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, १ मे, २०२३

मेनफ्रेमपासून शिकण्यासारखं !


 

कार्यालयीन कामाबद्दल खोलात काही लिहायचं नाही हा अलिखित नियम मी ब्लॉग लिहिताना पाळतो. तरीही काही खास प्रसंगी कार्यालयीन घटना पोस्ट लिहण्यास उद्युक्त करतात.  तर मेनफ्रेमचा ५९ वा वाढदिवस आम्ही ह्या महिन्यात साजरा केला. मेनफ्रेम तशी प्रसिद्धीपासून दूर राहणारी. त्यामुळं पोस्टला फोटो दिलाय तो मेनफ्रेमचा प्रतिस्पर्धी क्लाउड (ढगाचा !). 

मेनफ्रेमपासून बरंच काही शिकण्यासारखं ! वर्षानुवर्षे सातत्यानं दशलक्षाच्या पटीतील ग्राहकांची माहिती अत्यंत वेगानं हाताळून शांतपणे काम करणारे हे मेनफ्रेम संगणक ! माहिती आणि संगणक क्षेत्रातील आधुनिकीकरणामुळं गेले कित्येक वर्षे म्हटलं तर हे धोक्याच्या पटलावर आहेत. परंतु ह्या मेनफ्रेम संगणकावरील लक्षावधी ओळींची क्लिष्ट आज्ञावली ज्या सफाईदारपणे काम करतेय त्यामुळं तिला सहजासहजी बदलणं भल्याभल्यांना कठीण जात आहे. ह्यात सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे मेनफ्रेमवर जी आज्ञावली आहे त्याद्वारे जे अनेक व्यावसायिक नियम लक्षावधी ग्राहकांच्या डेटावर अंमलात आणले जातात, त्यात खूपच खोलवर क्लिष्टता आहे. ह्यालाच Domain Knowledge असं म्हटलं जातं. 

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अजूनही एक असा वर्ग आहे जो ह्या व्यावसायिक नियमांच्या ज्ञानाच्या आधारे आपलं स्थान अबाधित राखून आहे. मुद्दा असा आहे की Domain Knowledge आणि तंत्रज्ञान ह्यात नक्की समन्वय कसा साधावा?  तुम्ही कितीही काही म्हणा पण एका विशिष्ट वयानंतर बहुतांशी व्यावसायिकांची तंत्रज्ञानात होणाऱ्या सततच्या बदलासोबत त्या वेगानं बदलण्याची क्षमता काही प्रमाणात कमी होत जाते. पण जर तुमच्याकडं खोलवर Domain Knowledge असेल तर तुम्ही ह्या झपाट्यात टिकाव धरण्याची शक्यता वाढीस लागते. 

त्यामुळं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्येक वर्षांच्या शेवटी आपण कोणत्या नवीन भाषा शिकलो ह्यासोबत आपण Domain Knowledge मध्ये काय भर घातली ह्याचा आढावा घेणं आवश्यक आहे. इथं ह्यासोबत एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याजवळील ह्या व्यावसायिक ज्ञानाला विविध व्यासपीठांवर सादर करण्याची कला. हे व्यावसायिक ज्ञान तुम्हांला कनिष्ठ प्रोग्रॅमर्ससमोर, तुमच्या बरोबरच्या व्यवस्थापकांसमोर, CIO समोर आणि ज्यांना ह्यातील ओ की ठो समजत नाही अशा लोकांसमोर सादर करावं लागतं. अशावेळी आपल्याला  समोर असलेल्या गटानुसार  त्याच माहितीचे विशिष्ट  शब्दांत, उपलब्ध वेळेनुसार, त्यांना रुचेल अशा पद्धतीनं सादरीकरण करता यायला हवं. बऱ्याच वेळा CIO / CEO माणसं आपल्याला सांगतात की "तुझ्याकडं तुझा मुद्दा समजावून द्यायला ९० सेकंद आहेत, त्यात तुला काय म्हणायचंच ते सांग!"

अजून एक मुद्दा स्मरणशक्तीचा. काही दीर्घकालीन चालणाऱ्या प्रोजेक्ट्स मध्ये एक - दीड वर्षांपूवी चर्चिला गेलेला मुद्दा अचानक परत ऐरणीवर येतो. अशावेळी त्यावेळी नक्की काय ठरलं होतं ह्यासंबंधी तुम्हांला एक तर तात्काळ आठवून सांगता यायला हवं किंवा त्यावेळचे ई - मेल झटकन शोधून काढता यायला हवं. इथं तुमची शिस्तबद्धता कामास येते. शिस्तबद्धतेवरून आठवलं ते म्हणजे तुमची नियमितता. महत्वाच्या कॉल्ससाठी वेळेवर हजर राहणं, त्या कॉलसाठी आपल्याकडून जी माहिती अपेक्षित आहे त्यासाठी पूर्वतयारी करून ती माहिती सादर करणे ह्या वरकरणी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी ecosystem मध्ये  नक्कीच नोंदल्या जात असतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून तुमचा ब्रँड बनत जातो. ही नियमितता आणण्यासाठी तुमच्या जीवनात जर एक विशिष्ट वेळापत्रक असेल, आहारात शिस्त असेल तर त्याचा नक्कीच उपयोग होतो. 

शेवटचा मुद्धा म्हणजे तुमचं People Skill. लोकांना तुमच्यासोबत काम करायला कितपत आवडतं हा मुद्दा एका विशिष्ट वर्षांच्या अनुभवानंतर महत्वाचा बनत जातो. इथं तुमच्या वागण्यात कितपत खरेपणा (genuine) आहे, वरिष्ठ आणि कनिष्ठ लोकांसमोर तुमच्या वागण्यात सातत्य आहे का वगैरे मुद्दे महत्वाचे असतात. अर्थात काही लोकांसाठी ह्या मुद्द्यापेक्षा यशाच्या शिड्या वेगाने चढणे हे  अधिक महत्वाचे असते. 

हा लेख लिहिण्याचं प्रयोजन - ह्या क्षेत्रातील नवीन पिढीला हा संदेश द्यायचा आहे की माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दीर्घकालीन पल्ला गाठण्यासाठी सतत  तंत्रज्ञान शिकण्यासोबत जुन्या काळातील अनेक मुल्यांचा अंगीकार करणे हे सुद्धा महत्वाचं आहे.  तात्काळ यशाइतकीच  दीर्घकालीन संयत कारकीर्द सुद्धा समाधानकारक असते! 

(तळटीप - हा माणूस मेनफ्रेमपासून आरंभ करीत इथं कसा पोहोचला असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर तुम्ही एकटे नाही आहात, मी ही तुमच्यासोबत आहे !)

रविवार, २३ एप्रिल, २०२३

Sponge, Fresh Farm Produce वगैरे वगैरे


शनिवारी नियोजित असलेल्या माझ्या उद्योगांमुळं  शुक्रवारी वसईहून कार्यालयीन काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी वसईला जाणं हे क्वचितच घडतं. हा एक निश्चितच आनंददायी अनुभव असतो. वसई स्थानकाबाहेर पडलं की शेअर रिक्षा उभ्या असतात. त्यात तिसऱ्या सीटवर बसणं हा मनात विविध विचार निर्माण करणारा प्रसंग असतो. केवळ स्वतः साठी रिक्षा केली तर होणारं भाडं मनाला पटत नाही. लहानपणी नव्वद पैसे होळी आणि एक रुपया रमेदी असं तिकीट काढल्याच्या आठवणी मनात असल्यानं कदाचित असं होत असावं. 

तिथं एक मध्यमवयीन जोडपं तिसऱ्या प्रवाशाच्या प्रतीक्षेत स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडे काहीशा आशेनं पाहत होतं. मध्यमवयीन जोडपं, वयस्क जोडपं ह्या संज्ञा नक्की कधी वापराव्यात ह्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं उपलब्ध असल्यास सुजाण वाचकांनी मला नक्कीच त्याची जाणीव करून द्यावी. मी एकंदरीत रिक्षाची पाहणी करत त्यात प्रवेश केला. त्यांनीही मला सरकून खरोखरीच  जागा करुन दिली. खरोखरीच  म्हणण्याचं प्रयोजन असं की काही वेळा लोकं सरकून पुन्हा मूळ जागी येतात किंबहुना त्याहून अधिक क्षेत्र व्यापतात. मग मला उगाचच चीनची आठवण येते. 

रिक्षा भरधाव (?) वेगानं वसई गावाकडं निघाली.  डाव्या बाजूला वसई महानगरपालिकेच्या बसेस उभ्या होत्या. "Look at those buses, how stupid they look!" ह्या बसेसनी काय गुन्हा केला असावा हे मला समजलं नाही. मी काहीशा रागानं त्या दिशेनं रिक्षाबाहेर पाहिलं. ते त्यांना बहुदा समजलं नसावं.  रिक्षात तिसरा माणूस उपस्थित असतांना शक्यतो जोडप्यांनी काही संवाद सुरु करणं हे काहीसं धोकादायक असतं असा माझा समज आहे. परंतु ह्या दोघांमध्ये खूपच सुसंवाद दिसत होता. मी खरंतर माझ्या भ्रमणध्वनीत गुंतलो होतो.

"I have become like a sponge!" रिक्षातील पत्नीचं हे वाक्य अचानक पडताच मी एकदम हडबडलो. परंतु पुढच्याच वाक्यानं मला संदर्भ मिळाला. "I have taken so many things in my stride that I no longer can take anything more. I am saturated" बहुदा मी रिक्षाबाहेर फेकला जाईन इतकं वजनदार वाक्य होतं ते ! "But you can squeeze it and absorb more!" पतीदेव म्हणाले. इतकं धाडशी विधान करणाऱ्या पतिदेवांचे चरण धरावे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण झाली असली तरी रिक्षाच्या आणि त्यातील प्रवाशांच्या आकारमानाचा विचार करता हे शक्य नव्हतं. "Technically I can do it but I don't want to it!" किती हा सुसंवाद !

त्यानंतर चर्चा दुसऱ्या विषयांच्या दिशेनं गेली. "AC Trains are awesome!" वसईतील रिक्षात awesome हा शब्द ऐकायला मिळेल अशी मी कधी अपेक्षा केली नव्हती. शुक्रवारी work from home घेऊन शनिवार - रविवार वसईत राहावं आणि रविवारी रात्री मुंबईला परतावं अशी योजना साकारली जात होती. मी काहीसा बावरलो. आपली योजना ह्यांना कशी कळली ह्याच मला आश्चर्य वाटलं. मध्येच त्यांच्या  चिरंजीवांचा फोन आला. "I will prepare rotis which you can have with Chicken ..." असं काहीसं  बोलणं झालं. 

एव्हाना पापडी आलं. पापडीचा बाजार नुसता पाहणं हे सुद्धा एक आनंददायी अनुभव असतो. तजेलदार पांढऱ्या कांद्याच्या माळी, गलका, पडवळ, दुधी, वसईच्या हिरव्यागार पालेभाज्या, विविध गृहोपयोगी वस्तू इत्यादींची विक्री करणारे विक्रेते रस्त्याच्या कडेला बसले होते. बाजारात तर ह्याहुनही अधिक प्रमाणात वैविध्यपूर्ण गोष्टी उपलब्ध असणार. मला ताज्या हिरव्यागार भाज्या अशा एकत्र पाहायला खूप आवडतं. त्यांच्या दर्शनानं डोळे आपसूक सुखावतात. तिथुन निघालेली समाधानाची लहर थेट मनाला स्पर्श करुन जाते. 

"In our childhood we used to come here for shopping. Lots of fresh farm produce is sold here. It is really fresh!" झालं ! जे काही सर्व गलका, पडवळ, दुधी, वसईच्या हिरव्यागार पालेभाज्या ह्यांना मनाच्या समाधानाच्या कप्प्यात साठवलं होतं ते fresh farm produce ने नाहीसं केलं. मन खट्टू झालं. 

दोन मिनिटांतच त्यांचं इच्छित स्थळ आलं. "जरा रिक्षा बाजूला घ्या!" अगदी शुद्ध मराठीत पत्नीनं रिक्षावाल्याला विनंती केली. रिक्षावाल्याचं माहिती नाही पण मी मात्र पुरता गार झालो.  

एक वसई महानगरपालिकेच्या बसेसना stupid म्हणणं वगळलं तर बाकी त्यांचं बोलणं अगदी व्यवस्थित होतं.  त्यांच्यातील सुसंवाद वाखाणण्याजोगा होता. कदाचित पती अमराठी असल्यानं ती इंग्लिश मध्ये बोलत असावी.  तरीही तिनं गलका, पडवळ, दुधी, वसईच्या हिरव्यागार पालेभाज्या ह्यांना fresh farm produce संबोधणे मला उगाचच खटकलं. बाकी नवऱ्याचं अजून सोशिक बन हे सांगणं आणि ते शांतपणे ऐकून घेतलं जाणं - Hats off to both of them!! 

बाकी चित्रातील दुधी वाडीतला! मोठ्याआईनं काही वर्षांपूर्वी लावलेला. ह्या वेलीचं दृश्य किती विहंगम ! 

सोमवार, १७ एप्रिल, २०२३

अगतिक


गेल्या दोन दिवसांत मन सुन्न करणाऱ्या दोन घटना घडल्या. पन्नाशीतील एक हसतमुख, उत्साही मित्र अगदी अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं गेला. त्यानंतर काल एका शासकीय  कार्यक्रमात ११ जण उष्माघातामुळं मृत्युमुखी पडले. 

मध्यमवर्गीय पुरुष हृदयविकाराच्या धक्क्यानं अचानक मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण वाढीस लागलं आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक बांधिलकी पार पडतांना स्वतःकडे कदाचित दुर्लक्ष होत असावं. स्त्रियांना नैसर्गिक कारणांमुळं बऱ्याच कालावधीपर्यंत  हृदयविकाराच्या धक्क्यापासून उपजत संरक्षण मिळतं असं पत्नी म्हणाली. इथं काही महत्वाचे मुद्दे 

१.  कुटुंबाचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी अथक प्रयत्न करावेत असं कर्त्या पुरुषाला वाटणं स्वाभाविक आहे. परंतु कुटुंबासाठी आपलं अस्तित्व त्याहून महत्वाचं आहे. 

२. प्रत्येकाची शरीररचना, क्षमता वेगवेगळी असते. आपल्या मर्यादा वेळीच ओळखायला हव्यात. नाही म्हणायला शिका. आपले मित्र, नातेवाईक तुमच्यावर रागावतील. पण त्यांना शांतपणे मला आरामाची गरज आहे हे सांगा. मी हे वारंवार करतो. 

३. शरीर वेळोवेळी आपल्याला संदेश देत राहतं. त्याकडं लक्ष द्या. 

४. जर का आपल्याला काही त्रास होत असेल तर आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे त्याची जाणीव करून द्या.  आपल्याला आरामाची गरज असेल तर परिवारातील सदस्यांना ते स्पष्ट सांगा. 

५. तेलकट, तिखट, मीठ अधिक असलेल्या पदार्थांना कटाक्षानं टाळा. जिभेवर नियंत्रण ठेवा. 

आता वळूयात ते कालच्या दुर्घटनेकडं. 

१. हा समारंभ भर दुपारी उघड्या मैदानात दीड वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. लाखो लोकांना  ह्या समारंभासाठी बहुदा ट्रकमधून आणण्यात आलं होतं. 

२. ही लोक रात्री कुठं राहिली, त्यांना सकाळी काही खायला देण्यात आलं होतं की नाही ह्याचा अंदाज नाही. 

३. दीड वाजता समारंभ संपल्यानंतर इतक्या सगळ्या लोकांना तिथून बाहेर पडायला अजून एक - दीड तास लागला. इतक्या रखरखत्या उन्हांत ह्या लोकांना पुरेसं पाणी मिळालं की नाही'ह्याचा अंदाज नाही. 

ही लोक स्वतःहून तर नक्कीच आली नसणार. केवळ पैशाची अगतिकता ह्या लोकांना ह्या समारंभात घेऊन आली असणार. व्यासपीठावरील लोकांनी फक्त एकच विचार करायला हवा होता की मी माझ्या आईवडिलांना, पत्नी, मुलांना ह्या उन्हात बसविले असते का? लाखोंचा समुदाय आपल्याला कशासाठी हवा आहे ? ह्या मृत्युमुखी पडलेल्या बिचाऱ्या जीवांच्या नातेवाईकांना मदत देऊन काय साध्य होणार आहे?

सर्वपक्षीय नेत्यांना एकच कळकळीची विनंती - "तुम्ही शपथ घ्या की ह्यापुढं अशा मोठ्या सभांचे आयोजन करण्याचा अट्टाहास मी धरणार नाही !" 


सोमवार, १० एप्रिल, २०२३

Life ऑफ सदानंद ! -भाग ४ Testing (परीक्षण)



बराच वेळ काही न सुचल्यामुळं सदानंद खिडकीबाहेर टक लावून पाहत होता.  ज्या झाडाकडं सदानंद टक लावून पाहत होता बहुदा त्याच झाडावर तो बसला होता. फडफड उडत तो खिडकीवर येऊन बसला. 

"तू माझ्याकडं का पाहत आहेस?"

"छे छे ! मी असाच बाहेर खिडकीबाहेर बघतोय. "

"गेली पाच मिनिटं तू काही न करता बाहेर कसा काय पाहू शकतोस? तुझ्या कामाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होणार नाही का?"

"प्रत्यक्ष संगणकावर घालवलेला वेळ आणि उत्पादकता समप्रमाणात असणं हे समीकरण केवळ यांत्रिक कामांच्या बाबतीत लागू होतं. बौद्धिक कामाच्या बाबतीत तुम्ही संगणकावर घालवलेल्या वेळेपेक्षा तुमच्या कामाच्या दर्जा महत्वाचा ठरतो. सतत संगणकावर काम करण्यापेक्षा तुम्ही विचारपूर्वक दीर्घकालीन धोरण आखणं हे अधिक महत्वाचं आहे"

"अबब, सदानंद महाराज आता कसलं धोरण आखात आहेत? ChatGPT च्या वादळाला कसं तोंड द्यायचं त्याचं ?"

ChatGPT प्रकरण अगदी ह्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं ह्याचं आश्चर्य करण्याची ही वेळ नव्हती. 

"मी आणि माझ्या टीमने विकसित केलेल्या आज्ञावलीवर विविध प्रकारचे परीक्षण करून मगच ती प्रत्यक्ष production मध्ये अंमलात आणायची असते, त्यात सुद्धा मानवानं स्वतः परीक्षण करण्यापेक्षा विविध स्क्रिप्ट्स विकसित करून संगणकाला केवळ एका कळीच्या आधारे  ह्या स्क्रिप्ट्स धावायला सांगायच्या ह्यावर खरंतर भर आहे. बोलायला आणि वरिष्ठांसमोर रंगीबेरंगी स्लाईडसच्या आधारे सादर करायला हे सारं सोपं असलं तरी प्रत्यक्षात अंमलात आणायला खूप विचार करावा लागतो"

"तुम्हांला त्याचेच पैसे मिळतात. बाकी तू माझ्याशी बोलताना एक तर धड पूर्ण मराठीत बोलत जा किंवा पूर्ण इंग्लिश मध्ये! उगाचच अधूनमधून इंग्लिश शब्दांचा वापर करतोस, मराठी शब्दांचा हास्यास्पद वापर करतोस जसे की स्क्रिप्ट्स धावायला"

"अजूनही माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील साधारणतः २५ टक्के संज्ञांना योग्य असे पर्यायी मराठी शब्द नाहीत. त्यामुळं तू मला दोष देऊ नकोस !"

"बरं ते जाऊ देत ! तुम्हां माणसांचं मला कळत नाही. एकीकडं तुम्ही म्हणता की आज्ञावलीवर विविध प्रकारचे परीक्षण करून मगच ती प्रत्यक्ष production मध्ये अंमलात आणायची असते, आणि दुसरीकडं नव्या पिढीनं लग्नाआधी लिव्ह - इन च्या गोष्टी केल्या की तुम्ही नाकं मुरडता !" 

सदानंदला मोठा धक्का बसतो. ह्याला सर्व कसं माहिती हे अगदी समजेनासं होतं. पण हार मानेल तो सदानंद कसला !

"अर्धवट ज्ञान हे संपूर्ण अज्ञानापेक्षा धोकादायक असतं असं म्हणतात ते खरंच आहे. अरे आज्ञावलीचं परीक्षण करण्यासाठी वेगळे environment असतं. तिथं केलेल्या टेस्टिंगमुळे प्रत्यक्ष प्रॉडक्शनवर काही परिणाम होत नाही. लिव्ह - इनचं तसं नसतं तिथं तुम्ही थेट तुमच्या आयुष्याशी खेळत असता !"

"सर्व काही मीच समजावून सांगायचं का तुम्हांला ? अरे तुम्ही मोठमोठाली आभासी जगं उभारता , तुमचे विकसित अवतार बनवता. मग तुमची तरुण जोडपी त्यांच्या अवतारांना आभासी दुनियेत लिव्ह - इन ला का पाठवत नाहीत? "

त्याच्या ह्या प्रश्नावर सदानंदकडं उत्तर नव्हतं. कदाचित ही कल्पना एखाद्या स्टार्टअपला विकावी असा विचार त्याच्या मनात आला. 

"आणि हो नुसतं टक लावायला हेच झाड नेहमी निवडणार असशील तर नक्की सांग ! मी दुसरीकडं जाऊन बसेन. मलाही झोन मध्ये असायला आवडतं !" 

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

Life ऑफ सदानंद ! -भाग ३ सम्यक विचार साधी राहणी


कारचे सारथ्य करत महानगरातील सिग्नलवर थांबलेल्या असलेल्या सदानंदची विचारशृंखला कॅव् कॅव् ह्या आवाजानं भंगली. काचेवर तो बसला होता. खरंतर तो सदानंदच्या विचारशृंखलेचा अविभाज्य घटक होता.  सदानंदने काच खाली करुन त्याला आत घेतलं. 

"इतक्या गंभीरपणे कसला विचार करतोयस?"

"ह्यांचा, ह्यांचा !" समोरील बांधकाम सुरु असलेल्या गगनचुंबी इमारतीकडं अंगुलीनिर्देश करत सदानंद म्हणाला. 

"अगदी वखवखल्यासारखं एका चांगल्या शहराला ओरबाडून घेण्याचा चंग बांधला आहे जणू त्यांनी !" 

"संतापण्याचं काही कारण नाही. इतक्या सर्वाना व्यवस्थित पाणीपुरवठा केला जातोय, वाहतुकीसाठी सदैव नवनवीन माध्यमांचा वापर केला जातोय. असलेल्या माध्यमांना सुधारलं जातंय.  घरबसल्या खाद्यपदार्थ, किराणा माल, कपडे इतकंच काय तर मदिरासुद्धा उपलब्ध होत आहे. शहरात राहणाऱ्या माणसाच्या जीवनाच्या दर्जात सदैव सुधारणा होतेय! म्हणून तर तुझ्यासारखी माणसं गावं सोडून शहराच्या दिशेनं धाव घेताहेत" 

सदानंद काहीसा सावध झाला.  त्याच्या बोलण्याचा वरवर दिसतो तसा अर्थ घ्यायचा नाहीये हे त्याला बऱ्यापैकी समजलं होतं. 

"मला कमी वेळ असतो त्यामुळं माझ्याशी प्रदीर्घ संवाद  करुन हळुवारपणे तुला हव्या त्या मुद्द्याकडं मला घेऊन जायला आपल्याला वेळ नाही. त्यामुळं तुला हवं ते स्पष्टपणं सांग. मागच्या वेळेसारखं अगदी मुद्द्यांना क्रमांक देऊन सांगितलं तरीसुद्धा चालेल!"

"अगदी कसं शहाण्यासारखं बोललास" ची नजर देऊन तो बोलू लागला. 

"पृथ्वीची  निर्मिती ज्यावेळी झाली त्यावेळी पृथ्वी अगदी संतुलित अवस्थेत होती. मानवजातीच्या उत्क्रांतीतील प्राथमिक टप्प्यापर्यंत  ही संतुलित अवस्था कायम होती. काही कारणास्तव सर्वशक्तिमानानं मनुष्याच्या शरीरात असा मेंदू दिला जो काळानुसार प्रगत होत गेला. ह्या प्रगत मेंदूचा वापर मनुष्यानं प्रारंभींच्या काळात आपल्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी केला . त्यानंतर मात्र  जमीनविस्तार, संपत्तीसंकलन, धर्मप्रसार, शस्त्रास्त्रं अशा दिशेनं  त्याची वाटचाल झाली. आता  त्यात चंगळवादाची भर पडली आहे. "

"आधुनिक काळातील माणूस ज्या ज्या वेळी चंगळवादी गोष्टीचा वापर करतो त्या त्या वेळी तो पृथ्वीला संतुलित स्थितीपासून दूर नेत असतो. पृथ्वीला एका विशिष्ट प्रमाणाबाहेर संतुलित स्थितीपासून  दूर नेल्यास निसर्गचक्र बिघडतं आणि त्याचे दृश्य स्वरूपातील दुष्परिणाम मानवाला भोगावे लागतात. सध्यातरी निसर्गाचा कोप स्थानिक पातळीवर दिसतोय. परंतु ज्या वेगानं हे सारं काही ढेपाळत आहे तो वेग पाहता जागतिक पातळीवर निसर्गाचा कोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सारं मानवाला कळतंय . परंतु हे थांबविण्याची इच्छाशक्ती मानवाकडं नाही. काहीजण  आपल्या परीनं प्रयत्न करत आहे. परंतु ते अल्पसंख्य आहेत आणि इतके बलाढ्यसुद्धा नाहीत की हे दुष्टचक्र थांबवू शकतील. "

जोरात सुरु असलेल्या AC मध्ये सुद्धा सदानंदला घाम फुटला होता. 

"ह्यावर काही उपाय नाही का?"

"खात्रीचा असा उपाय नाही. पण गावात जाऊन राहिल्यास जेव्हा केव्हा मोठा नैसर्गिक कोप येईल  तेव्हा तुमच्या वाचण्याची शक्यता अधिक असेल. नैसर्गिक कोप आल्यास शहरातील आपत्कालीन व्यवस्था किती सहजपणे कोलमडून पडते ह्याचा अनुभव तर तू घेतलाच असेल. एकदा का शहरात प्राथमिक सुविधा कोलमडून पडल्या की मानवांनी परिधान केलेले बुरखे कोलमडून पडायला आणि त्यांचे राक्षसी चेहरे बाहेर येण्याची शक्यता दाट आहे. 

गावात मात्र अगदी प्राथमिक पातळीवरील गरजा पूर्ण होण्याची आणि माणसांची माणुसकी टिकून राहण्याची शक्यता अधिक असेल !"

"तुझं काय ?" न राहवून सदानंदने विचारलं. 

"काच वरती कर , येतो मी !" असे म्हणत तो उडून गेला. आपल्या प्रश्नात काही खोट होती का ह्याचा विचार करत सदानंद गाडी पार्क करण्यामागं लागला. 

शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

Life ऑफ सदानंद ! -भाग २ आनंदमय


 

आज सकाळी सदानंद लवकरच तयार होऊन धावायला निघाला. टी शर्ट, स्पोर्ट्स शूज अशा तयारीनिशी मैदानाभोवती फेऱ्या मारणाऱ्या सदानंदला पाहून लोक अचंबित झाले. किंबहुना ते अचंबित झाले असावे असा त्यानं समज करुन घेतला. अर्थात दुसऱ्या फेरीनंतर दमछाक झाल्यानं तो एका डेरेदार वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसला. 

तितक्यात तो आला. कॅव् कॅव् करत त्या वृक्षावर बसला. 

"मी काय करतोय ह्यात लोकांनी का नाक खुपसावं ?" तो आता सदानंदच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्यानं त्यानं थेट मुद्द्याला हात घातला. 

"कॅव्  कॅव्! आईवडिलांनी तुझं  नांव सदानंद का ठेवलं असावं ह्याचा क्षणभर तरी विचार केला आहे का तू ?"

त्याला काय म्हणायचं आहे हे समजल्यानं सदानंदनं त्याच्याकडं सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत पाणी पिण्याकडं लक्ष केंद्रित केलं. 

"कॅव्  कॅव्! तुझ्याकडं काही मिनिटं आहेत असं गृहीत धरुन मी पुढील काही काळ तुला अनुभवाचे दोन शब्द ऐकवत आहे. 

१.  आधुनिक काळातील कोणतीही व्यक्ती सामाजिक जीवनात प्रवेश करण्याचे ठरविते त्यावेळी ती भोवताली असलेल्या समाजाला आपल्यावर टिपण्णी करण्याचा अधिकार प्रदान करत असते. 

२. ज्याप्रमाणे निवृत्त झालेला प्रत्येक क्रिकेटर / क्रिकेटरीण समालोचक होण्याची दाट शक्यता असते त्याप्रमाणं नोकरीव्यवसायातून निवृत्त झालेला प्रत्येक माणूस भोवतालच्या समाजाला अधिकारवाणीने सल्ले देत असतो. 

३. आपल्याला काय हवं आहे हे ज्याला समजलं आहे आणि त्याप्रमाणं जीवन जगण्याचा ठामपणा जो दाखवु शकतो तोच माणुस आजच्या काळात  आपलं मन:स्वास्थ्य टिकवू शकतो.  विचारांतील सुस्पष्टता ही सध्या मनुष्यस्वभावातील सर्वात महत्वाची गोष्ट बनली आहे. 

४. समाजात परस्परांविषयी अविश्वासाची भावना वाढत चालली आहे. समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीचा चुकीचाच अर्थ लावणारी माणसं बहुसंख्येनं तुझ्या भोवती वावरत असतील. ह्या व्यक्तींमुळे प्रभावित होऊ नकोस. अशा व्यक्ती मालिकांमधून तुला भेटत असतील तर अशा मालिका बघणं बंद कर. त्यापेक्षा हॉलिवूड चित्रपट परवडले. जे काही भांडण करायचं असेल ते थेट करण्याची त्यांची तयारी असते. 

५. उघडपणे भांडणं करण्याची मानसिकता लोक हल्ली दाखवत नाहीत. टोमणे मारून समोरच्याचं मनःस्वास्थ बिघडविण्याचा हलकासा प्रयत्न केला जातो. त्यामुळं हा प्रकार आपल्याला समजलाच नाही ही कला अवगत करणे योग्य !

६. सद्यकाळात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पुर्वी वाढत्या  वयानुसार मोकळेपणानं जीवनातील विविध कलांचा आस्वाद घेण्याची संधी, पर्यटन वगैरे गोष्टींवर जी बंधनं येत ती आज बऱ्याच प्रमाणात नाहीशी झाली आहेत. नव्या जगानं पुर्वीच्या आचारविचारांत काहीसे फेरफार केले आहेत. थोडासा विचार करुन हे नियम समजावून घेतलं तर आयुष्य खूप सुखकर होऊ शकतं. ह्यासाठी थोडंफार व्यवहारचातुर्य दाखवता यायला हवं. पूर्वी भाबडेपणा हा एक चांगला गुण समजला जात असे. आज तसं नाही!"

"कॅव् कॅव् येतो मी" आणि तो उडून गेला. 

"आपल्याला बोलायची अजिबातच संधी न देता गेला तो!" सदानंद पुटपुटला. "हा सुद्धा हॉलिवूड चित्रपट पाहतो. अमॅझॉन प्राईम घ्यायला हवं, त्या सोबत प्राईम व्हिडिओ फुकटात मिळेल!" नव्या जोमानं सदानंद मैदानाला फेऱ्या मारू लागला होता. 

बुधवार, २९ मार्च, २०२३

Life ऑफ सदानंद ! -भाग १ सैरभैर

प्रस्तावना - सदानंदच्या जीवनातील संभ्रमांचा उहापोह करू पाहणारी ही शृंखला. ह्यात काही ठोस विचारांचं पाठबळ घेऊन सुरुवात करत नाहीय. जमेल तसं लिहीन.  सदानंदचे जीवन असे शीर्षक द्यावं की Life  ऑफ सदानंद असं लिहावं ह्यावर बराच विचार करून उत्तर सापडलं नाही. आताशा असंच होतंय. शंभर टक्के बरोबर किंवा शंभर टक्के चूक असं हल्ली नसतंच काही. असो बघुयात काय होतंय ते !





सकाळ झाली. सदानंद चहाचा कप घेऊन अंगणात येऊन बसला. मार्च महिना असला तरी गेल्या आठवड्यातील पावसानं वातावरणात आलेला गारवा अजूनही तग धरून होता. गारवा असला की कसं मन चैतन्यानं भरून जातं असं सदानंदला वाटून गेलं. भोवतालच्या वातावरणाचा आपल्याला मूडवर परिणाम होता कामा नये असं वारंवार बजावून सुद्धा काही परिणाम होत नाही ह्याचा नेहमीप्रमाणं सदानंदला राग आला. 

तितक्यात तो आला. कॅव् कॅव् करत सदानंदच्या जवळच्या झाडावर बसला. त्याच्या अस्तित्वाची दखल घेणं टाळायचं असं सदानंदने कितीही ठरवलं असलं तरीही त्याच्या बंडखोर मनानं त्याची साथ दिली नाही. 

"कसा आहेस तू" काहीशा नाखुषीनं सदानंदने त्याला विचारलं. "मी सदैव मजेतच असतो" तो म्हणाला. "तूच काहीसा सैरभैर झालेला दिसतोयस!" त्यानं थेट आपल्या खासगी बाबीत घुसावं ह्याचा खरं तर सदानंदला राग आला होता. पण आता नाईलाज होता. 

"मनातील द्वंदाचा सामना करतोय मी. आप्तजनांचं अचानक निघून जाणं, विविध लोकांच्या, कुटुंबाच्या आपल्याकडून / स्वतःच्या  स्वतःकडून असलेल्या अपेक्षांची पुर्तता न करता आल्यामुळं सदैव असमाधानी राहावं लागणं, भोवतालच्या लोकांसोबत होणाऱ्या आपल्या मतभेदांची वारंवारता वाढत जाणं, संपूर्ण समाधानी असल्याचे क्षण क्वचितच येणं ह्या साऱ्या गोष्टींमुळं  सैरभैर झालोय मी!" 

" कॅव् कॅव्, तू खरोखरंच अज्ञानी आहेस. तू ज्या गोष्टीमुळं सैरभैर होतोय त्या सर्व गोष्टी तुझ्या वयोगटातील बहुसंख्य माणसांच्या आयुष्यात सातत्यानं घडत राहतात. त्यानं ते सुद्धा काही काळ विचलित होतात. पण लगेचच दुसऱ्या गोष्टीत आपलं मन रमवून घेतात. तुझं जे मन आहे ना त्याला तुला सांभाळता येत नाहीये ! उगाचच त्याला डोक्यावर चढवून ठेवलं आहेस त्याला तू!" 

"आता हेच बघ ना -  लोकांसोबत होणाऱ्या आपल्या मतभेदांची वारंवारता वाढत जाणं. जर तू हा मुद्दा लक्षात घेतलास तर त्यात चिंता करण्यासारखं फारसं काही नाही. वयानुसार तुझ्या कार्यालयीन, वैयक्तिक जीवनातील भूमिका बदलत गेल्या आहेत. मनुष्य जन्मातील काही भुमिकांमध्ये तुम्हांला एक ठाम निर्णय घ्यावाच लागतो. हा ठाम निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत असताना तू सर्वांना खुश ठेऊ शकत नाहीस. त्यामुळं त्या भूमिकेला जे योग्य आहे ते करावं. आपण हे का करत आहोत हे समजावून सांगण्याचा एकदा प्रयत्न करावा. आणि आयुष्यात पुढे चालायला सुरुवात करावी. एक लक्षात ठेव. म्हटलं तर आयुष्य फार छोटं आहे. मागं काय घडलं त्याचा फारसा विचार करण्याइतका तुझ्याकडं वेळ नाही! येतो मी, तुझ्या कार्यालयाची वेळ तुला पाळायला हवी!" 

कॅव् कॅव् करत तो उडून गेला. "तुझं आयुष्य किती सोपं आहे ना !" असा प्रश्न त्याला विचारला असता तो वैतागला असता का असला विचार करतच सदानंद कार्यालयाच्या तयारीला लागला. 

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...