आज सकाळी सदानंद लवकरच तयार होऊन धावायला निघाला. टी शर्ट, स्पोर्ट्स शूज अशा तयारीनिशी मैदानाभोवती फेऱ्या मारणाऱ्या सदानंदला पाहून लोक अचंबित झाले. किंबहुना ते अचंबित झाले असावे असा त्यानं समज करुन घेतला. अर्थात दुसऱ्या फेरीनंतर दमछाक झाल्यानं तो एका डेरेदार वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसला.
तितक्यात तो आला. कॅव् कॅव् करत त्या वृक्षावर बसला.
"मी काय करतोय ह्यात लोकांनी का नाक खुपसावं ?" तो आता सदानंदच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्यानं त्यानं थेट मुद्द्याला हात घातला.
"कॅव् कॅव्! आईवडिलांनी तुझं नांव सदानंद का ठेवलं असावं ह्याचा क्षणभर तरी विचार केला आहे का तू ?"
त्याला काय म्हणायचं आहे हे समजल्यानं सदानंदनं त्याच्याकडं सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत पाणी पिण्याकडं लक्ष केंद्रित केलं.
"कॅव् कॅव्! तुझ्याकडं काही मिनिटं आहेत असं गृहीत धरुन मी पुढील काही काळ तुला अनुभवाचे दोन शब्द ऐकवत आहे.
१. आधुनिक काळातील कोणतीही व्यक्ती सामाजिक जीवनात प्रवेश करण्याचे ठरविते त्यावेळी ती भोवताली असलेल्या समाजाला आपल्यावर टिपण्णी करण्याचा अधिकार प्रदान करत असते.
२. ज्याप्रमाणे निवृत्त झालेला प्रत्येक क्रिकेटर / क्रिकेटरीण समालोचक होण्याची दाट शक्यता असते त्याप्रमाणं नोकरीव्यवसायातून निवृत्त झालेला प्रत्येक माणूस भोवतालच्या समाजाला अधिकारवाणीने सल्ले देत असतो.
३. आपल्याला काय हवं आहे हे ज्याला समजलं आहे आणि त्याप्रमाणं जीवन जगण्याचा ठामपणा जो दाखवु शकतो तोच माणुस आजच्या काळात आपलं मन:स्वास्थ्य टिकवू शकतो. विचारांतील सुस्पष्टता ही सध्या मनुष्यस्वभावातील सर्वात महत्वाची गोष्ट बनली आहे.
४. समाजात परस्परांविषयी अविश्वासाची भावना वाढत चालली आहे. समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीचा चुकीचाच अर्थ लावणारी माणसं बहुसंख्येनं तुझ्या भोवती वावरत असतील. ह्या व्यक्तींमुळे प्रभावित होऊ नकोस. अशा व्यक्ती मालिकांमधून तुला भेटत असतील तर अशा मालिका बघणं बंद कर. त्यापेक्षा हॉलिवूड चित्रपट परवडले. जे काही भांडण करायचं असेल ते थेट करण्याची त्यांची तयारी असते.
५. उघडपणे भांडणं करण्याची मानसिकता लोक हल्ली दाखवत नाहीत. टोमणे मारून समोरच्याचं मनःस्वास्थ बिघडविण्याचा हलकासा प्रयत्न केला जातो. त्यामुळं हा प्रकार आपल्याला समजलाच नाही ही कला अवगत करणे योग्य !
६. सद्यकाळात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पुर्वी वाढत्या वयानुसार मोकळेपणानं जीवनातील विविध कलांचा आस्वाद घेण्याची संधी, पर्यटन वगैरे गोष्टींवर जी बंधनं येत ती आज बऱ्याच प्रमाणात नाहीशी झाली आहेत. नव्या जगानं पुर्वीच्या आचारविचारांत काहीसे फेरफार केले आहेत. थोडासा विचार करुन हे नियम समजावून घेतलं तर आयुष्य खूप सुखकर होऊ शकतं. ह्यासाठी थोडंफार व्यवहारचातुर्य दाखवता यायला हवं. पूर्वी भाबडेपणा हा एक चांगला गुण समजला जात असे. आज तसं नाही!"
"कॅव् कॅव् येतो मी" आणि तो उडून गेला.
"आपल्याला बोलायची अजिबातच संधी न देता गेला तो!" सदानंद पुटपुटला. "हा सुद्धा हॉलिवूड चित्रपट पाहतो. अमॅझॉन प्राईम घ्यायला हवं, त्या सोबत प्राईम व्हिडिओ फुकटात मिळेल!" नव्या जोमानं सदानंद मैदानाला फेऱ्या मारू लागला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा