प्रस्तावना - सदानंदच्या जीवनातील संभ्रमांचा उहापोह करू पाहणारी ही शृंखला. ह्यात काही ठोस विचारांचं पाठबळ घेऊन सुरुवात करत नाहीय. जमेल तसं लिहीन. सदानंदचे जीवन असे शीर्षक द्यावं की Life ऑफ सदानंद असं लिहावं ह्यावर बराच विचार करून उत्तर सापडलं नाही. आताशा असंच होतंय. शंभर टक्के बरोबर किंवा शंभर टक्के चूक असं हल्ली नसतंच काही. असो बघुयात काय होतंय ते !
सकाळ झाली. सदानंद चहाचा कप घेऊन अंगणात येऊन बसला. मार्च महिना असला तरी गेल्या आठवड्यातील पावसानं वातावरणात आलेला गारवा अजूनही तग धरून होता. गारवा असला की कसं मन चैतन्यानं भरून जातं असं सदानंदला वाटून गेलं. भोवतालच्या वातावरणाचा आपल्याला मूडवर परिणाम होता कामा नये असं वारंवार बजावून सुद्धा काही परिणाम होत नाही ह्याचा नेहमीप्रमाणं सदानंदला राग आला.
तितक्यात तो आला. कॅव् कॅव् करत सदानंदच्या जवळच्या झाडावर बसला. त्याच्या अस्तित्वाची दखल घेणं टाळायचं असं सदानंदने कितीही ठरवलं असलं तरीही त्याच्या बंडखोर मनानं त्याची साथ दिली नाही.
"कसा आहेस तू" काहीशा नाखुषीनं सदानंदने त्याला विचारलं. "मी सदैव मजेतच असतो" तो म्हणाला. "तूच काहीसा सैरभैर झालेला दिसतोयस!" त्यानं थेट आपल्या खासगी बाबीत घुसावं ह्याचा खरं तर सदानंदला राग आला होता. पण आता नाईलाज होता.
"मनातील द्वंदाचा सामना करतोय मी. आप्तजनांचं अचानक निघून जाणं, विविध लोकांच्या, कुटुंबाच्या आपल्याकडून / स्वतःच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षांची पुर्तता न करता आल्यामुळं सदैव असमाधानी राहावं लागणं, भोवतालच्या लोकांसोबत होणाऱ्या आपल्या मतभेदांची वारंवारता वाढत जाणं, संपूर्ण समाधानी असल्याचे क्षण क्वचितच येणं ह्या साऱ्या गोष्टींमुळं सैरभैर झालोय मी!"
" कॅव् कॅव्, तू खरोखरंच अज्ञानी आहेस. तू ज्या गोष्टीमुळं सैरभैर होतोय त्या सर्व गोष्टी तुझ्या वयोगटातील बहुसंख्य माणसांच्या आयुष्यात सातत्यानं घडत राहतात. त्यानं ते सुद्धा काही काळ विचलित होतात. पण लगेचच दुसऱ्या गोष्टीत आपलं मन रमवून घेतात. तुझं जे मन आहे ना त्याला तुला सांभाळता येत नाहीये ! उगाचच त्याला डोक्यावर चढवून ठेवलं आहेस त्याला तू!"
"आता हेच बघ ना - लोकांसोबत होणाऱ्या आपल्या मतभेदांची वारंवारता वाढत जाणं. जर तू हा मुद्दा लक्षात घेतलास तर त्यात चिंता करण्यासारखं फारसं काही नाही. वयानुसार तुझ्या कार्यालयीन, वैयक्तिक जीवनातील भूमिका बदलत गेल्या आहेत. मनुष्य जन्मातील काही भुमिकांमध्ये तुम्हांला एक ठाम निर्णय घ्यावाच लागतो. हा ठाम निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत असताना तू सर्वांना खुश ठेऊ शकत नाहीस. त्यामुळं त्या भूमिकेला जे योग्य आहे ते करावं. आपण हे का करत आहोत हे समजावून सांगण्याचा एकदा प्रयत्न करावा. आणि आयुष्यात पुढे चालायला सुरुवात करावी. एक लक्षात ठेव. म्हटलं तर आयुष्य फार छोटं आहे. मागं काय घडलं त्याचा फारसा विचार करण्याइतका तुझ्याकडं वेळ नाही! येतो मी, तुझ्या कार्यालयाची वेळ तुला पाळायला हवी!"
कॅव् कॅव् करत तो उडून गेला. "तुझं आयुष्य किती सोपं आहे ना !" असा प्रश्न त्याला विचारला असता तो वैतागला असता का असला विचार करतच सदानंद कार्यालयाच्या तयारीला लागला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा