मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १९ मार्च, २०२३

Bella Vista, महाबळेश्वर



अचानक ठरवून केलेल्या काही गोष्टी बऱ्याच वेळा व्यवस्थित पार पडतात. मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यातील महाबळेश्वर भेटीचं बरंचसं असंच काही झालं. त्याआधीच्या शनिवार सकाळी शांतपणे चहाचे कप घेऊन आम्ही दोघं बसलो असता सोहमच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेच्या समाप्ती आणि दुसऱ्या सत्राच्या आरंभामध्ये चार दिवसांचा प्रचंड कालावधी असल्याचा साक्षात्कार आम्हांला झाला. खरंतर मला आधीच झाला होता. पण मी ह्याबाबतीत सोयीस्कररित्या मौन बाळगून होतो. शनिवारी सकाळी चहाचे कप घेऊन बसलो असताना जर सकाळची वर्तमानपत्रे आली नसतील तर जगातील सर्वात गंभीर समस्या चर्चिल्या जाण्याची दाट शक्यता असते. तुर्कस्थान हा भूकंपप्रवण क्षेत्रात आहे हा विषय चर्चेला घेण्यात माझी काही हरकत नसते. कारण त्यात मी करण्यासारखं काही नसतं. परंतु ह्यावेळी मात्र "आपण हे चार दिवस काय करतो आहोत ?" हा प्रश्न चर्चेला घेण्यात आला.  

"प्रबोधनकारला कोणतं नाटक आहे?"  चेहरा जमेल तितका गंभीर ठेवत मी ठेवणीतला प्रश्न विचारला. पुढील पाच मिनिटं दिवाणखान्यात अगदी शांतता होती. "सिक्कीम" असं बोलून मी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही काळ चर्चा होऊन महाबळेश्वरला जाऊयात ह्याविषयी आमच्या दोघांच्यात एकमत झालं. हल्ली केवळ दोघांच्यात एकमत होऊन पुरेसं नसतं. "तुम्ही जा, मी इथं एकटा राहीन" ह्या बिछान्यात लोळत पडलेल्या सोहमच्या उत्तरानंतर आम्ही परत हॉलमध्ये परतलो. 

 काही गोष्टीवर फारशी चर्चा करण्यात अर्थ नसतो हे मला हल्ली कळून चुकलं आहे. घरच्या बॉसला महाबळेश्वर हा स्वीकारार्ह पर्याय आहे ह्याची खात्री पटल्यामुळं मी तात्काळ संगणक घेऊन बसलो. का कोणास ठाऊक पण मी हॉटेल बुकिंग वगैरे प्रकार फारसं संशोधन न करता पार पाडतो. प्रत्येक वेळा हा निर्णय योग्य असतोच असे नाही. पण हे दोघं  मला ह्याबाबतीत चांगली साथ देतात. फारशी कुरबुर करत नाहीत. तर पुढील वीस पंचवीस मिनिटांत हॉटेल आणि महाबळेश्वरची बस तिकिटं आरक्षित करण्यात आली होती. 

महाबळेश्वर म्हटलं की खरंतर आमच्या डोळयांसमोर राजेश आणि हॉटेल ड्रीमलँड ही हॉटेल्स येतात. पण ह्यावेळी मी बदल म्हणून Bella Vista हे काहीसं महाबळेश्वरच्या बाहेर असणारं हॉटेल बुक केलं. काहीसं वेगळं नांव असल्यामुळं मी बहुदा ते बुक केलं असावं अशी मला दाट शंका आहे. अशा ठिकाणी हॉटेल बुक करण्यात काही फायदे आणि काही तोटे असतात. महाबळेश्वरच्या गर्दीपासून दूर ही एक जमेची बाजू. पण मुख्य शहरात जाण्यासाठी प्रत्येक वेळी टॅक्सी करावी लागणार ही काहीशी त्रासदायक बाब. मी महाबळेश्वरला कार चालवत का गेलो नाही किंवा एखाद्या चालकाला का घेऊन गेलो नाही हा एका स्वतंत्र पोस्टचा विषय. 

गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता हॉटेलला हजर रहायचं होतं. रात्री दहा वाजता कार्यालयातून परतलो. त्यामुळं माझं पूर्ण पॅकिंग प्राजक्तानंच केलं. ह्यात म्हणा काही नवीन नाही.  बस वेळेवर सुटली. मधल्या एका थांब्यावर सोहमच्या महाविद्यालयात शिकणारा सोहम नावाचा मित्र त्याच्या आईबाबांसोबत बसमध्ये प्रवेश करता झाला. सोहमची कळी खुलली, आमचा जीव भांड्यात पडला.  नीता ट्रॅव्हल्सच्या बसेस अगदी आरामदायी आणि वेळापत्रक पाळणाऱ्या होत्या. मध्ये नाश्त्यासाठी एक थांबा घेण्यात आला. साधारणतः सव्वा वाजता आमची बस Bella Vista च्या थांब्यावर थांबली. नीता ट्रॅव्हलच्या भाषेत हा हॉटेल सूर्याचा थांबा होता. इथं Bella Vista चा कर्मचारी आमच्या बॅग्स घेण्यासाठी तत्परतेनं हजर होता. 

हॉटेलच्या खोलीचा ताबा घेऊन आम्ही जेवणासाठी त्यांच्या उपहारगृहाकडं धाव घेतली. "बाहेर जातांना खोलीच्या खिडक्या घट्ट बंद करायला विसरू नका. इथं माकडं भरपूर आहेत!" स्वागतकक्षातील कर्मचाऱ्याने आम्हांला प्रेमानं बजावलं होतं. 

Bella Vista चे उपहारगृह अत्यंत सुखद अनुभव देऊन गेलं. इथला कर्मचारीवर्ग अत्यंत आतिथ्यशील आहे. सामोरा येणारा प्रत्येक कर्मचारी आपल्याला नमस्कार असं म्हणून आपलं स्वागत करतो. उपहारगृह अगदी प्रशस्त आणि टापटीप आहे.  त्यातील कर्मचारी आपल्याला विविध  डिशेशविषयी माहिती / सूचना देतात.  रात्री एक गायक न दमता अनेक गाणी गात असतो. "तु ह्याच्याइतकेच किंबहुना अधिक चांगलं गातो" माझ्या अतिआत्मविश्वासानं उचल खात मला सांगितलं. आमचं भाजीप्रेम इथंही शाबूत असल्यानं आम्ही विविध भाज्यांचा समावेश असलेली कोणतीतरी एक डिश मागवली. एकंदरीत सोहम खुश वाटत होता.  जेवणानंतर मी ताणून दिली. 

हॉटेलचा निसर्गरम्य परिसर सायंकाळी अधिकच खुलून दिसत होता. उपहारगृहाच्या बाह्यकक्षातून सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसत होते. चहासोबतची खारी बिस्किटं वातावरणाला परिपूर्णतेकडे घेऊन जात होती. 

परिसर जैववैविध्यानं नटलेला आहे. विविध प्रकारची फुलझाडं, पक्षी परिसरात गुण्यागोविंदानं नांदत आहेत. म्हटलं तर त्यांच्या ह्या वास्तव्याच्या ठिकाणी आपण अतिक्रमण केलं आहे. 

 

रात्रीच्या जेवणानंतर परिसर अजूनही नयनरम्य वाटत असला तरीही ही रोषणाई नैसर्गिक अंधारात करता येण्यासारख्या आकाशदर्शनाच्या आनंदापासून आपल्याला वंचित ठेवत आहे हा विचार नक्कीच मनात डोकावत होता. 

मुंबईतील हवेचा दर्जा अत्यंत खालावला असल्यानं महाबळेश्वरला आल्यानंतर फुफ्फुसांमध्ये  जमेल तितका शुद्ध ऑक्सिजन भरून घेतला पाहिजे ह्यावर आमचं एकमत झालं होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता खोलीबाहेर पडून फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन भरण्याची तयारी दाखविणारा मीच एकटा होतो. 



वातावरणात मस्त गारवा होता. उतारावर गावांकडे जाणारे मार्ग दाखविणाऱ्या पाट्या होत्या. ह्या सर्व नैसर्गिक वातावरणात शहरी लोकांच्या सहलीच्या गरजा भागविण्यासाठी निसर्गाला ओरबाडून उभारलेली Bella Vista आणि अनेक हॉटेल्स दिमाखानं उभी होती. पुढं एक शेतकरी स्ट्रॉबेरी विकत होते. मी त्यांच्याकडून एक किलो स्ट्रॉबेरी एकशे ऐंशी रुपये ह्या दराने विकत घेतली. रूमवर आल्यानंतर आम्ही तिघांनी ह्या स्ट्रॉबेरीचा मनमुराद फडशा पाडला. 

हल्ली अशा हॉटेलात मनमुराद नाश्त्याची प्रथा रूढ झाली आहे. इथंही पहिल्या दिवशी उपमा, मसालाडोसा, पावभाजी, छोले, फळं असल्या प्रकारांसोबत बेकरीतील असंख्य प्रकार उपलब्ध होते. नको नको म्हणताना त्याचा गरजेपेक्षा जास्तच आस्वाद घेतला गेला. हे पुढील तीन दिवस सुरु राहिले. 

बाहेर फिरायला गेल्यानंतर, विविध समारंभाच्या निमित्तानं,  कार्यालयीन पार्टीच्या निमित्तानं आपण हल्ली गरजेपेक्षा जास्तच आहार करण्याचे प्रसंग वारंवार उद्भवत राहतात.  नेहमीच्या जीवनात सायंकालीन जेवण कमीत कमी घेऊन ते आठच्या आत घेण्याचा मी प्रयत्न करीत असतो. परंतु अशा विचलित करणाऱ्या प्रसंगामुळं त्यात बाधा येत राहते. चांगली गोष्ट अशी की तिथल्या हवेमुळं इतकं सारं भरपेट खाऊन सुद्धा प्रसन्न वाटत राहिलं. 

पुढील तीन दिवसांत मॅप्रो गार्डन, जुनं महाबळेश्वर, इको आणि त्याच्या समवेत असलेले अनेक पॉईंट, वेण्णा लेक ह्या स्थळांना भेटी दिल्या.  ह्यात काही खास लिहिण्यासारखं असं नाही. फक्त कार्यालयीन व्यापाला विसरून मुंबईबाहेर गेल्यानंतर मनाला जी एक नवीन उभारी मिळते तिचा खास उल्लेख करण्याजोगा. 

दहावी - बारावी परीक्षा अजूनही आटोपल्या नसल्यानं महाबळेश्वर बऱ्यापैकी शांत होतं. अपवाद फक्त शनिवारी सायंकाळच्या वेण्णा लेकच्या भेटीचा. तिथं खूप गर्दी होती. हॉटेल ड्रीमलँड, राजेश ह्यांची पुर्वीची शान गेली आहे असं वाटलं. तिथल्या जेवणाच्या आठवणी अजूनही मनात कायम आहेत. मार्केटमध्ये येणारा बहुतांश माल मुंबई-पुण्यातून येतो असे ड्रायव्हर म्हणाला. 

परत येताना नीता ट्रॅव्हल्सच्या स्लीपरबसचा अनुभव मिळाला. घाईघाईनं बुकिंग केल्याचा हा परिणाम. रात्रीच्या प्रवासासाठी ह्या उत्तम असल्या तरीही दिवसा त्यात कोंडले गेल्याची भावना निर्माण होऊ शकते. 






































































पोस्टचा बराचसा  भाग हा ह्या भेटीतील फुलांच्या, हॉटेल परिसराच्या आणि विविध स्थळांच्या छायाचित्रांनी व्यापलेला आहे.  ही पोस्ट प्रवासवर्णनापेक्षा जास्त फुलांच्या छायाचित्रांची आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही इतकं म्हणून ह्या पोस्टची सांगता करतोय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...