मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

Pushing ourselves to the brink! (कडेलोटाच्या दिशेनं )


संदेशभाऊ वर्तक ह्यांना शनिवारी सायंकाळी बोरिवली ते नायगांव हे तीस किलोमीटर अंतर कारने कापण्यासाठी तीन तास लागले. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अचानक पावसानं इन्फिनिटी मॉलच्या बाजुच्या रस्त्यावर मी कारमध्ये एकाच ठिकाणी दहा मिनिटं अडकून होतो. मालाड ते बोरिवली ह्या टप्प्यात मेट्रोच्या कामामुळं मेट्रोच्या बरोबर खालच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेला अत्यंत खडबडीतपणा आला आहे आणि दुसऱ्या कडेला वाहनं अनधिकृतरित्या पार्क करुन ठेवलेली असतात. त्यामुळं बऱ्याच वेळा कृत्रिमरीत्या वाहतुक कोंडी होत राहते. नागरिक मग उलट्या दिशेनं वाहनं चालविणे, सिग्नल तोडणे असले प्रकार करत राहतात. 

प्रचंड वेगानं अजूनही वाढत असलेल्या मुंबई महानगराच्या पाणी, वीज पुरवठ्याच्या गरजा त्याच प्रमाणात वाढत चालल्या आहेत. संबंधित यंत्रणा अजुन तरी ह्या गरजा पुर्ण करण्यात यशस्वी होत असली तरी ही यंत्रणा अत्यंत तणावाखाली असल्याचं वेळोवेळी जाणवत राहतं. सध्यातरी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरमिश्रित कौतुकाची भावना असली तरीही भविष्यात कुठंवर ते वाढत्या शहराच्या गरजांना तोंड देऊ शकतील ह्याविषयी चिंता वाटण्यासारखी परिस्थिती आहे. 

मुंबईला भाजीपुरवठा करणाऱ्या परिसंस्थेवर सुद्धा ताण पडत राहतो. इतकं सारं असलं तरीही विनु म्हणत असल्याप्रमाणं मुंबईतील परिसंस्था बिनबोभाट सुरु ठेवण्याकडं अधिकृत यंत्रणेची महत्तम शक्ती खर्च पडत असते. मुंबईत तुमच्याकडं पैसा असेल तर सर्व काही मिळू शकते. गावात तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरीही तुम्हांला सुद्धा वीजपुरवठा खंडित होणं, अनियमित पाणीपुरवठा वगैरे प्रकारांना तोंड द्यावं लागतं. ह्या सर्व प्रकारांमुळं गांव सोडून मुंबईकडं / परदेशात धाव घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळं मुंबई आणि महानगरांवर अधिक ताण पडत राहतो. 

आमच्या एका घरातून एका दिवसात बाहेर पडणारा कचरा पाहून चिंता वाटू लागते. तीच गोष्ट ई-कचऱ्याच्या बाबतीत! भ्रमणध्वनी, संगणक ही सारी मंडळी मोजक्या वर्षांत एकतर कालबाह्य किंवा नादुरुस्त होतात. लगेचच आपण नवीन घेण्याच्या मागे धाव घेतो. तीच गोष्ट थोड्याफार फरकानं टीव्ही, कार ह्यांच्या बाबतीत. दहा वर्षात ह्या गोष्टी बदलाव्या लागण्याची शक्यता अधिक असते. ऍमेझॉन, झोमॅटो, स्विगी आपल्यासाठी सोयीचे, पण एका शर्टांसोबत, एका मसाला डोश्यासोबत त्यांनी आपल्या घरात आणून टाकलेलं प्लॅस्टिक, आवरणाचा कचरा भयंकर असतो. आपल्यापैकी मोजके लोक प्लॅस्टिक रिसायकल करतात. झोमॅटो, स्वीगीने आपल्या शरीरात आणलेल्या जास्तीच्या कॅलरी जाळण्यासाठी आपल्यातील काहीतरी जिममध्ये जातात, काही जात नाहीत. दोन्ही वर्गातील काही लोकांना विविध आरोग्य समस्येनं ग्रासण्याचं प्रमाण वाढत चाललंय. मोठाली इस्पितळं, आरोग्यविमा ह्या संस्था आता तिथं होणाऱ्या अविश्वसनीय खर्चामुळं आता आश्वासक ऐवजी भितीदायक वाटू लागल्या आहेत. 

आपल्या पुढील पिढ्यांसाठी आपण पृथ्वी कोणत्या स्थितीत सोडणार आहोत हा प्रश्न मनाला भेडसावत राहतो.  गावांमध्ये  उपलब्ध असणाऱ्या उपजीविकेच्या पर्यायांची  कमतरता किंबहुना असे पर्याय निर्माण करण्यात एक राष्ट म्हणून आपल्याला आलेलं अपयश हे महत्वाचं कारण ज्यामुळं सर्वांना शहराकडं धाव घ्यायची आहे. शहरात, परदेशात एकदा मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर सुरु होते ती प्रतिष्ठेची शर्यत! तुमचं घर, नोकरी, कार, तुमच्या सहलींची ठिकाणं, तुमच्या मुलांचा शैक्षणिक प्रवास / यश  ह्यावरुन तुमचं मूल्यमापन करण्यात रस असणारी मंडळी !  तुम्हांला सामाजिक वर्तुळाचा भाग बनून राहायचं असेल तर ह्या मंडळींशी पडणारी तुमची गाठ अनिवार्य आहे.  सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रातील मुखपृष्ठाला ज्यावेळी जाहिरातीची पहिली दोन तीन पानं मागच्या क्रमांकावर ढकलतात त्यावेळी समाजाच्या प्राधान्यक्रमाची आपल्याला स्पष्ट कल्पना येते. मान्यवर व्यक्ती तंबाखूच्या जाहिराती करतात त्यावेळी भोवताली खरोखरच चिंतादायक परिस्थिती निर्माण झाली आहे ह्याची खात्री पटते.  

हे कसं थांबविता येईल ह्याचा आता आपण विचार केला नाही तर पुढील काही वर्षांत परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की हल्ली कोण कोणाचं ऐकायला तयार नाही. त्यामुळं आपण आपला विचार करावा. ठेवले ईश्वरे तैसेची राहावे ! ह्या उक्तीला अनुसरुन वागण्याचा जमेल तितका प्रयत्न करावा. प्रगती करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा पण एका मर्यादेपलीकडं स्वतःला खेचू नये. महानगराच्या बाहेर सुद्धा अनेक मंडळी आनंदात राहतात. ती कशी काय आनंदात राहू शकतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. थोड्याच वेळात आपण आपल्याभोवती निर्माण केलेल्या गैरसमजुतींचे जाळं दूर करण्यात नक्कीच यश मिळेल ! 

Happy Sunday! 

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

निवडीचा संभ्रम

सोमवार सकाळी मी अत्यंत शिस्तबद्ध मनःस्थितीत असतो.  साधारणतः लोक १ जानेवारीला वर्ष कसं घालवायचं ह्याविषयी जे काही निर्धार व्यक्त करत असतात त्याप्रमाणं मी रविवारी सायंकाळी / सोमवारी सकाळी आठवडा कसा शिस्तीत घालवायचा ह्याविषयी मनसुबे रचतो. आज सकाळी एक तास कार्यालयीन काम अगदी गंभीरपणानं केल्यानंतर हा निर्धार मोडकळीस आल्यानं ही पोस्ट लिहीत आहे किंवा ही पोस्ट लिहायचा विचार आल्यानं हा निर्धार मोडला जात आहे. विषय काही नसताना सुद्धा लोकांना छळायचं हा सुप्त मनसुबा ही पोस्ट लिहिताना मनात आहे. 

सध्या महिलांचा T20 आशिया चषक बांगलादेशात खेळला जात आहे. त्यात थायलंड, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात वगैरे आपण कल्पना करु शकणार नाहीत असे देश सुद्धा सहभागी होत आहेत. ह्या महिला ज्या चित्रविचित्र आवाजात सामनाभर ओरडत असतात त्यामुळं घरातील शांततेचा भंग होतो असं आमचं म्हणणं आहे. संयुक्त अरब अमिरात संघात बहुसंख्य भारतीय वंशांच्या महिला आहेत. त्यात एक गोखले सुद्धा आहे! बांगलादेशात एकाच मैदानावर ही स्पर्धा खेळवली जात आहे. त्या दिवशी ह्या स्पर्धेत मोठा चमत्कार झाला. थायलंड संघानं पाकिस्तान संघाला नमविले. दुसऱ्या दिवशी आपण विविध प्रयोग करुन पाकिस्तान संघाकडून हरण्यात यश मिळविलं. 

भारताचा महिला संघ म्हणा की पुरुष संघ असो, आपल्याकडं गरजेपेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असल्यानं सातत्यानं आपण बदल घडवत राहतो. Only thing which is constant in current world is CHANGE हे वाक्य टाळ्या मिळविण्यासाठी चांगलं असलं तरी ह्या बहुपर्यायानं आणि त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या सततच्या बदलांमुळं भारतीय महिला क्रिकेट संघ,  पुरुष क्रिकेट संघ आणि एकंदरीत भारतीय शहरी नागरिक पुर्णपणे गोंधळलेला आहे. ह्या बहुविध पर्यायांतुन आपल्यासाठी नक्की कोणता पर्याय चांगला हेच मुळी आपल्याला समजेनासं झालं आहे. भारतीय पुरुष संघात निवड होऊ शकणारे जे काही वीस बावीस खेळाडू आहेत ते ही जबरदस्त मानसिक तणावाखाली आहेत. जर तुम्ही रोहित शर्मा अथवा विराट कोहली नसाल तर तुम्ही सतत दोन - तीन खेळीनंतर संघाबाहेर जाता. 

BCCI अगदी मनाला येईल तसं वागत राहतं. आपला मूळ (कदाचित तथाकथित ह्या विशेषणासहित ) संघ ऑस्ट्रेलियाला पाठवून आपल्या fringe player च्या संघासहित दक्षिण आफ्रिकेच्या खऱ्या संघासहित पन्नास षटकांचे सामने बिनधास्त खेळतोय. वर्षातील बावन्न रविवारपैकी किती रविवार भारतीय संघ टीव्हीवर जाहिरातींचं उत्पन्न मिळवून देतो ह्याचं विश्लेषण मी निवृत्त झाल्यावर नक्की करणार आहे. तोवर भारताचे (पुरुष आणि महिला) अ, ब , क वगैरे संघ नक्की रविवारी खेळत असतील. इतके सर्व खेळाडू पस्तिशीच्या आसपास निवृत्त झाल्यावर त्यांना समालोचक म्हणून काम मिळण्यासाठी अधिक सामने नक्कीच असायला हवेत. 

घरी घेतलेल्या जिओमुळं सुद्धा विविध पर्याय माझ्यासमोर उभे आहेत. हे पर्याय टीव्ही, भ्रमणध्वनीवर उपलब्ध आहेत. नशिबानं पाच सहा महिन्यातच ह्या बहू पर्यायांचा उबग येऊन त्यातील मोजक्या पर्यायांकडंच मी हल्ली वळतो. 

एकंदरीत आपल्याकडं काहीच नसणं हा जसा प्रश्न असू शकतो तसंच बरेच पर्याय असणं हा तितकाच गंभीर प्रश्न असू शकतो. शहरी भारतीय समाजाचा हाच मोठा प्रश्न बनला आहे. त्यामुळं आपल्या स्वतःसाठी , कुटुंबासाठी नक्की योग्य काय ह्याचा निर्णय जे घेऊ शकतात तेच लोक ह्या काळात समाधानी राहू शकतात. 

जाता जाता माझ्या एका अमेरिकन व्यवस्थापकाचं आवडतं वाक्य - Let Perfect be not the enemy of Good. परिपूर्ण निवडीचा शोध घेतांना आपल्यासमोर आलेल्या चांगल्या पर्यायांना सातत्यानं धुडकावून लावण्याची चूक करु नकात ! 

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

सद्यकाळात संस्कारांचे महत्त्व


म्हटलं तर सर्व काही आलबेल आहे पण तरीही कुठंतरी काहीतरी खटकतंय असं सध्याच्या समाजातील कौटुंबिक  परिस्थितीविषयी म्हणता येईल. काही काळापूर्वी समाजात, घरात वागण्याच्या चालीरिती ह्याविषयी काहीसे लवचिकता नसणारे नियम रुढ होते. ह्या नियमांची अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेणारी वरिष्ठ माणसं घरात, गावांत असत. हे नियम न पाळणाऱ्या बाळगोपाळांचे आणि प्रसंगी मोठ्यांचे कान पकडण्याचा, त्यांना दोन शब्द सुनाविण्याचा अधिकार ह्या वरिष्ठ माणसांना होता. 

पुर्वापार ही पद्धती, हे मॉडेल व्यवस्थित चाललं. आता ह्यातील व्यवस्थित ह्या शब्दप्रयोगावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. ह्या पद्धतीमुळं आपण येणाऱ्या नवीन पिढीला दाबून ठेवलं, त्यांना फुलण्याची संधी दिली नाही वगैरे आक्षेप घेतले जाऊ शकतात. इंग्लिशमध्ये Pandora's Box हा शब्दप्रयोग वापरला जातो. एखादा पर्याय सर्वांना उपलब्ध करुन दिल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य परिणामांची जर आपल्याला कल्पना करता येत नसेल तर तो पर्याय उपलब्ध करुन देऊच नये असा साधारणतः मतितार्थ असतो. कदाचित ह्याच विचारामुळं आपल्या पूर्वजांनी काहीसं कठोर अथवा कर्मठ म्हणता येईल असं धोरण स्वीकारलं होतं.  

ह्या धोरणाविरुद्ध पिढ्यानुपिढ्या काहीशा दबल्या आवाजात होणाऱ्या कुजबुजीचं गेल्या दोन तीन पिढ्यांत जवळपास बंडखोरीत झालं.  हे काहीसं अतिरंजित वर्णन झालं. अजुनही परंपरांचं व्यवस्थित पालन करणारी अनेक कुटुंब भोवताली आहेत, फक्त त्यांचं प्रमाण कमी झालं आहे. आता पोस्टचा ओघ परत मुक्त विचारसरणीकडं वळवुयात. आपल्या कुटुंबातील परंपरांना, चालीरितींना पूर्णपणे बगल देऊन आपल्या इच्छेनुसार वागणारा असा हा वर्ग. त्यांच्या ह्या वागण्याला तात्पुरतं बंडखोरी म्हणुयात. ह्या बंडखोरीमागं विविध कारणं असु शकतात. 

१) जसा काळ बदलत गेला तसं परंपरांचे हस्तांतरण करताना त्यामागील मूळ हेतू नवीन पिढीला व्यवस्थित समजावून देणं आवश्यक होतं. ह्यासाठी नवीन पिढीला आपल्या बरोबरीची वागणूक देऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणं आवश्यक होतं. बऱ्याच कुटुंबात हे घडलं नाही. 

२) नवीन पिढीचा वेगानं पाश्चिमात्य / आधुनिक जीवनपद्धतीशी संपर्क आला, त्या झंझावाताने नवीन पिढी काहीशी बहकली. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व काही ह्या जीवनपद्धतीने आपल्या पुढ्यात ठेवलं.  आपल्या संस्कृतीचा ह्या झंझावातापासून बचाव करण्यासाठी ज्या सुसंवादाची गरज होती त्यात आपण कमी पडलो. 

ह्या झंझावाताला येऊन किंवा आपल्या चालीरितींच्या परीक्षेचा काळ सुरु आता काही वर्षे उलटली आहेत. जसं आता युक्रेन पलटवार करु पाहतोय किंवा वेगवान गोलंदाजांनी आघाडीच्या तिघा चौघांना परत पाठविल्यानंतर वर्षोनुवर्षे मधली फळी आणि यष्टीरक्षक आपला डाव सावरतात तसं आपल्याला आपल्या चालीरीती सावरण्याचा प्रयत्न करता येईल हा महत्वाचा मुद्दा इथं मी मांडू पाहत आहे. 

आपल्या संस्कृतीशी फारकत घेऊन स्वतंत्र वागण्याचा आनंद घेणाऱ्या पिढीला कदाचित ह्यातील त्रुटी जाणवु लागल्या असतील. प्रत्यक्ष जीवनातील त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या प्रसंगामुळं आपल्या आधीच्या पिढीतील लोकांनी आपल्याला विशिष्ट पद्धतीनं वागण्याचा आग्रह का केला हे त्यांना उमजलं असेल. हीच वेळ आहे जेव्हा आपण पुन्हा परंपरा, चालीरीती ह्यांना काळानुसार योग्य रुपात सर्वांच्या समोर आणलं पाहिजे. 

हल्लीच्या काळात एकटेपणाच्या भावनेनं बऱ्याच जणांना ग्रासलं आहे. जुन्या काळातील जमेल तितक्या गोष्टींचा काळानुसार बदललेल्या स्वरुपात स्वीकार केल्यास मानसिक स्थैर्यास नक्कीच मदत होऊ शकेल. नवीन जीवनपद्धतीचा तर आपणांस स्वीकार करायचाच आहे पण त्या प्रवासात जुन्या चालीरीती, जुने संस्कार ह्यांची योग्य रुपात मदत घेतल्यास भविष्य सुखकारक होईल. हा लढा प्रत्येक घराघरातून लढला गेला पाहिजे.  

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

माझे कालवणाचे प्रयोग !

पाककलेतील कौशल्याच्या अनेक पातळी असाव्यात. त्यातही देशानुसार, प्रांतानुसार विविध चविष्ट पदार्थ बनविले जात असतात. त्यामुळं कौशल्य मापनासाठी नवीन परिमाण उपलब्ध होत असतं. माझा आणि पाककलेचा संबंध क्वचितच येतो. ज्यावेळी पत्नी घरात नसेल किंवा पूर्वी अमेरिकेत एकट्यानं गेलो असता मी स्वयंपाक करत असे / असतो. माझ्या स्वयंपाकाची एक खासियत आहे, त्याला कोणी चविष्ट म्हणू शकणार नाही पण तो भूक भागविण्यासाठी एक चांगला पर्याय असतो. मला शिकविण्यात आलेल्या पाककृतींचे मी तंतोतंत पालन करतो. माझी पाककौशल्याची पातळी किमान म्हणून गणली जाऊ शकते. 

आज हा स्वयंपाक करण्याचा प्रसंग ओढवला. रविवारी स्वयंपाक करायचा असेल तर खरं म्हणजे चिकन हा एक सोपा उपलब्ध पर्याय असतो. कांदा, हळद, मसाला आणि बटाटा ह्यांच्या संगतीला चिकन खुलून उठतं.  अगदीच धाडस करायची इच्छा असेल तर भोपळी मिरची चिकनसोबत अशा पाककृतींचे धाडस करावे. पण आज मी त्याहूनही एक मोठं धाडस केलं त्याची ही थोडक्यात कहाणी. 

आज मी आणि सोहमच असल्यानं झोमॅटो हा स्वाभाविक पर्याय होता. पण फ्रीजमध्ये असलेल्या माशाची आठवण झाल्यानं आम्हांला हा पर्याय सुचविण्यात आला. मला सविस्तर पाककृती देण्यात आली तर मी करीन असे मी म्हणालो. साधारणतः अर्ध्या तासात एक सविस्तर पाककृती व्हाटसअँपवर अर्थात इंग्लिश मध्ये मला देण्यात आली. त्याचं हे भाषांतर. 

१. सकाळी उठताक्षणी फ्रीज मधून मासे बाहेर काढून ठेवणे. (Thaw ह्या शब्दाचं स्वैर भाषांतर)
२. प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी मासे स्वच्छ धुवून घ्यावेत. उरलेसुरले कल्ले वगैरे साफ करावेत. स्वच्छ धुतलेला मासा बाजूला ठेवावा. 
३. आता वाटणाची तयारी करायला घ्यावी 
- कोथिंबीर जुडी स्वच्छ धुवून घ्यावी 
- लसण्याच्या आठ ते दहा कळ्या सोलून, धुवून घ्याव्यात. ह्यात त्यांचा सेमीमधील आकार नमूद न करण्यात आल्यानं मी माझ्या अंदाजानुसार ह्यात थोडाफार फेरफार केला. 
- कमी तिखटाच्या दोन मिरच्या मधोमध कापून बिया काढून घ्याव्यात. माझा स्वयंपाक सुरु असताना सोहमने फेरी मारली आणि बिया काढू नयेत ह्यावर आमचं एकमत झालं 
- नखाइतकं आलं. ही सूचना धुडकावून लावत मी मनसोक्त आलं टाकलं. 
- कडीपत्त्याची दहा ते बारा पाने. 
- बिया काढून एक टोमॅटो. सोहमने आधी केलेल्या ऑम्लेटमधील उरलेला अर्धा टोमॅटो सुद्धा ह्यात समाविष्ट करण्यात आला. 
- फ्रीझर मध्ये खिसुन ठेवलेल्या खोबऱ्यातील दोन मोठे चमचे इतकं खोबरं सुरीने काढून घेणे. फ्रीझर मधील विविध डब्यातील खोबऱ्याचा डबा नक्की कोणता हे ठरविण्यासाठी सोहमची मदत घेण्यात आली. 

इतकी मेहनत घेऊन वाटणासाठी बनविण्यात आलेली कच्ची सामुग्री ! 


खोबरं म्हणून वापरण्यात आलेला पांढऱ्या रंगाचा फ्रीझरमधील पदार्थ 

खसखसून धुण्यात आलेले मासे  (केवळ साबण वापरण्याचे बाकी ठेऊन) 



पाककृतीचा पुढील भाग 

४. वरील कच्ची सामुग्री मिक्सर मध्ये घालून मोजक्या पाण्यासहित अगदी चांगली दळून घ्यावी. अपघाताची शक्यता ध्यानात घेता मिक्सरच्या भांड्याच्या झाकणावर हात धरावा. 

हेच ते दळलेले वाटण !



५.  आता हे वाटण मिक्सरच्या भांड्यातून स्वयंपाकघरातील तांब्याचा बेस असलेल्या दोन भांड्यातील मोठ्या भांड्यात हस्तांतरित करावं. 

६. त्यात एक चहाच्या चमच्याइतकी हळद टाकावी. इथं चुकून मोठा चमचा हळदीच्या भांड्यात होता. पण ते नशिबानं माझ्या ध्यानात आलं. 

७.  ** चहाच्या चमच्याइतका मसाला. (पूर्ण रेसिपीचा उलगडा होऊ नये म्हणून काही ठिकाणी ** चा वापर)

८. **  चमचे मीठ ! (खरंतर कापून पण मी भरभरुन घेतलं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य म्हणून अजुन थोडं टाकलं !!)

९. दोन मोठे चमचे तेल. (हे नेमकं संपलं होतं.  मोठ्या डब्यातून काढावं लागलं!)

१०. चवीनुसार चिंचेचं पाणी (हे मिळालंच नाही !!)

हे सर्व केल्यानंतरचा हा फोटो ! 



११. आता अर्धा भांडं भरुन पाणी ! भांडं अर्ध झाकून साधारणतः दहा मिनिटं उकळावं. माशाला तू शिजला का रे हे विचारावं. त्यानं हो म्हणताच गॅस बंद करावा.  कालवणाचा हा फोटो !


आताच जेवून उठलो. बहुदा पाणी थोडं जास्त झालं. पण एकंदरीत चव चांगली होती. पाककृती लिहिणाऱ्याचं आणि स्वयंपाक करणाऱ्याचे कौतुक! 

ह्या सर्व प्रकारात मासे धुणे आणि वाटण करणे ह्या वेळ घेणाऱ्या कृती आहे. बाकी शिजविण्याचा वेळ किमान आहे! 

ह्या सोबत कोळंबी फ्राय करावी असे सोहम म्हणाला. ही सोपी पाककृती असल्यानं मी स्वतः केली. ह्यात कांदा एकसमान कापणे आणि मंद आचेवर संयमाने तो थोडासा तांबूस होईस्तोवर भाजणे ह्या महत्वाच्या बाबी असाव्यात. ह्यात मी कापून बटाटा टाकण्याचा निर्णय घेतला. परंतु कोळंबी लवकर शिजते, त्यामुळं बटाटयाच्या कापाही लवकर शिजण्यासाठी बारीक कापाव्यात हे ध्यानात राहिलं नाही. Masterchef Australia कोळंबी अगदी कमी वेळ शिजवितात हे बऱ्याच वेळा घरी ऐकलं होतं. त्यामुळे संभ्रमात पडून शेवटी बटाटा थोडा कच्चा राहिला ! पण मसाला आणि कोळंबीची चव ह्यामुळे अंतिम पाककृती चविष्ट झाली. 





महागाईच्या झळा! दोनशे रुपयाची इवलीशी कोळंबी ! वसईला हे चित्र पाहताच तुमच्यामुळे कोळीणी भाव वाढवतात हे वाक्य नक्की ठरलेलं ! 




अशा प्रकारे एका धाडसाचा यशस्वी शेवट !

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

शोधिशी मानवा

 


सहसा ऑक्टोबर महिन्यात अनुभवायला मिळणारं परतीच्या पावसाचं वातावरण ह्या आठवड्यात वसईत अनुभवायला मिळालं. सायंकाळी सहानंतर ढगांचा गडगडाट आणि त्यामुळं येणारा थंडावा मनाला सुखावून जातो. झोपही गाढ लागते. पुढील आठवड्याला सामोरं जाण्याचं एक बळ मिळतं. हा परतीचा पाऊस नसावा ही आशा !

दोन वर्षांच्या खंडानंतर मांडलई गावातील गणपती पाहायची संधी मिळाली. गावातील शांत वातावरणात घराघरांतून फिरत गणपती बाप्पाचं दर्शन घेणं मनाला खूप सुखावतं. गणपतीबाप्पा सुद्धा निवांतपणे आनंदात असतात. ते  आपल्याकडं प्रेमळ नजरेनं पाहत आहेत असा भास होतो. खरंतर गणपती पाहायला जायचं ते चालतच अशी पुर्वीची पद्धत! पण काही कारणांनी त्यात बदल झाला आहे. 

दोन तीन दिवस वसईत मुक्काम झाला की काहीबाही सुचतं. आताच संध्याकाळी असंच काहीतरी झालं. भोवताली एकंदरीत मूळ भावनेला बाजूला सारुन त्याभोवताली आपण निर्माण केलेल्या आकर्षक आवरणांनाच  माहात्म्य प्राप्त झालं आहे की काय असं वाटु लागतं. ह्यामागचं कारण काय असावं ही कुतूहलभावना मनात निर्माण झाली. जगातील बरं - वाईट, यौग्य - अयोग्य काय हे ठरविण्याचा अधिकार पूर्वी मोजक्या जाणकार व्यक्तींच्या हाती होता. आता आपण हा अधिकार सर्वांच्या हाती दिला. 

त्यामुळं परीक्षण होणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या मूळ गुणधर्माकडं परीक्षणाचा रोख न राहता त्या गोष्टीच्या आकर्षकतेकडे भर दिला जातो. ह्या परिस्थितीत आता बदल होण्याच्या पलीकडं स्थिती गेली आहे. त्यामुळं उगाचच तक्रारभावना मनात बाळगण्यापेक्षा ह्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला हवं ते कसं मिळविता येईल ह्याचा शोध घ्यायला हवा. चविष्ट घरगुती जेवण, शांत वातावरणातील घरगुती गणपती, प्रमाणपत्राचा ध्यास न घेता केवळ ज्ञानप्राप्तीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा केलेला सखोल अभ्यास, नेहमीच्या बोर्डात शांतपणे छापील पुस्तकांच्या आधारे अभ्यास करणारी मुलं सर्व काही अस्तित्वात आहे, फक्त ते कुठंतरी दडलं गेलं आहे. 

महानगरातील बहुसंख्य जनता ज्याप्रकारे जीवन जगत आहे त्यानुसार (ऍमेझॉन, उबेर, झोमॅटो, स्वीगी आधारित) जीवन जगणं हा आपला निर्णय आहे. असं जीवन जगताना आपल्याला काही प्रमाणात गुदमरायला होत असेल एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की हे जीवन जगण्याची सक्ती आपल्यावर कोणी केली नाही. काहीशा विस्मृतीत गेलेल्या जीवनातील मनाला शांत करणाऱ्या गोष्टीना पुन्हा आपल्या जीवनात समाविष्ट करुन घेता येऊ शकतं. मुंबई ब वरील मंगलप्रभात, डी डी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम शोधून काढून पाहावेत. खासगी वाहिन्यांनी जणू काही शांतपणे बोलणं चालणं आपल्याला विसरायला लावण्याचा चंग बांधला आहे की काय अशी स्थिती निर्माण केली आहे. देवपूजा जमेल तेव्हा करुन पहावी, बरं वाटतं. आपल्या चुका देव कसा माफ करतोय हे पाहून आनंद होतो. घरकाम केलं तरीही बरं वाटतं. सतत आपण दिमतीला भ्रमणध्वनी, संगणक ठेवत असल्यानं सतत अधिकारात राहण्याची आपल्याला सवय लागून राहते. हातात झाडू घेतला की काही काळ का होईना आपल्या भोवतालच्या खऱ्या विश्वात आपला प्रवेश होतो. 

गेल्या आठवड्यातील गुरुवारी सुरु झालेल्या कार्यालयातील समस्येनं (प्रॉडक्शन इश्यू) ह्या आठवड्यातील मंगळवारपर्यंत पिच्छा पुरवला. त्यामुळं मेंदू भणभणला होता. ह्या समस्या जरी निपटल्या तरी त्यांचे सखोल विश्लेषण करणारे  प्रदीर्घ कॉल्स तुमची वाट पाहत असतात. ह्या समस्येचं मूळ कारण तुमच्या टीमकडे अंगुलिदर्शन करत असेल तर अशा प्रदीर्घ कॉल्सची प्रतीक्षा करताना झोपेचं खोबरं झालंच म्हणून समजा. परंतु चांगल्या कंपनीत कोणा व्यक्तीला, अथवा टीमला दोषी न ठरवता ह्या चुकांमधून आपल्याला कसं काय शिकता येईल ह्यावर भर दिला जातो. ह्या आठवड्यात पुन्हा एकदा त्याचा सुखद प्रत्यय आला. जगातील चांगुलपणा काहीसा विरळ झाला असला तरी त्याच्या अस्तित्वाविषयी पुन्हा एकदा खात्री पटली. सद्ययुगात तुमच्या बाबतीत सदैव चांगलं कदाचित होत नसेल परंतु जर जगातील मुलभूत तत्त्वांवर अढळ श्रद्धा ठेवत जर तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच  तुमच्या प्रयत्नांना यश मिळेलच, ह्याची खात्री हे जग देत आहे आणि देत राहील !!

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

गेला राक्षस कुणीकडं?


लहानपणी आपण सर्वजण किंवा मी राक्षसाच्या गोष्टींनी अगदी भयभीत होत असू. राक्षस बहुदा गावाजवळील टेकडीवर राहायचा. राक्षसाचा देह महाकाय. त्याला भूक लागली की तो दणादण पावलं टाकीत टेकडीवरुन, पर्वतावरुन खाली उतरत असे. राक्षसानं टेकडीवर रहावं की पर्वतावर हे बहुदा त्याच्या आकारमानावर अवलंबुन असावं. 

वाचलेल्या सर्व गोष्टींत राक्षस आणि गावकरी ह्याच्यात व्यवस्थित सामंजस्य होते. बकासुराला महिन्याला गाडाभर अन्नधान्य दिलं की तो गावकऱ्यांना बाकीचे दिवस त्रास देत नसे. ह्याआधीचे राक्षस इतके समजुतदार होते की नाही हे समजायला मार्ग नाही. राक्षसाला मोजकी कामे असावीत. दिवसाचं, आठवड्याचं किंवा महिन्याचं एकदाच खाऊन घ्यावं आणि मग झोपी जावं. पुन्हा भूक लागली की टेकडी, पर्वत जे काही असेल ते उतरावं आणि ... 

गोष्टीत कधी वाचलं नाही पण बहुदा राक्षस एकटेच टेकडीवर रहात असावेत. त्यांनाही कदाचित समूहाने राहणाऱ्या माणसांचा हेवा वाटत असावा. ते ही कदाचित रात्री एकटेच टेकडीवर आकाशातील तारकांकडे पाहून उदास गाणी म्हणत असावेत. ह्याचाच परिणाम असेल बहुदा पण कालांतरानं राक्षस त्यांच्या मूळ रुपांतून नाहीसे झाले. एकट्यानं मनुष्यजातीपासुन वेगळं राहणं त्यांना कदाचित आवडलं नसावं. त्यांच्यात उत्क्रांती होत गेली. हळुहळू राक्षस मनुष्यरुपात बाकीच्या माणसांसोबत येऊन राहू लागले. 

ह्या पर्वाच्या सुरुवातीच्या कालावधीत कदाचित बाह्यरुपाद्वारे राक्षस आणि इतर मनुष्यगण ह्यांच्यातील फरक समजू शकत असावा. पण त्यामुळं आपल्याला अजुनही वेगळी वागणुक मिळतेय ह्याला कंटाळून राक्षसांच्या उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यात मनुष्य आणि राक्षस ह्यांच्या बाह्यरुपातील उरलासुरला फरकही नाहीसा झाला. आता राहिला होता तो केवळ विचारातील, वागण्यातील फरक.  

बाकीचा मनुष्यगण इतक्या कालावधीत गप्प बसला होता असे नाही. राक्षसाचे गुणधर्म, विचारसरणी ओळखायला आणि त्यावर मात करायला शस्त्रासोबत मंत्र, बोधपर कथा, संस्कार इत्यादी मार्गांचा अवलंब केला गेला. मनुष्यानं आपल्यावर अजुनही पूर्ण विश्वास ठेवला नाही ह्याचं राक्षसाला खूप वाईट वाटलं असणार. त्यामुळं हळूहळू राक्षसानं आता मनुष्यांच्या मनांत प्रवेश करायला सुरुवात केली. बहुतांश सर्व माणसांच्या वागण्यात आता हे गुण दिसु लागले आहेत. 

त्यामुळं वाचकहो, अवतीभोवती टेकडी दिसलं तरी त्यावर राक्षस कुठे दिसतोय का ह्याचा शोध घेऊ नका! 

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

स्कॅनर




अभिमानानं सांगण्याची गोष्ट नक्कीच नाही परंतु कार्यालयीन ई-मेलच्या बाबतीत कधीकधी असा प्रसंग येतो की माझ्या इनबॉक्समध्ये पाचशेपेक्षा जास्त न वाचलेली 
ई-मेल्स असतात. आता म्हणायला गेलं तर ती न वाचलेली असतात, परंतु मी त्यांचा विषय आणि ती कोणाकडून आली आहेत यावर नजर फिरवून ती ईमेल उघडायची की नाही याचा मनातल्या मनात निर्णय घेतलेला असतो. बऱ्याच वेळा हा निर्णय योग्य असावा कारण ही ई-मेल्स न उघडल्यामुळे आणि त्यांना प्रतिसाद न दिल्यामुळे बोंबाबोंब झाल्याची उदाहरणे त्यावेळी नसतात. परंतु कधीतरी गोंधळ होतो आणि एखादं महत्त्वाचं ई-मेल उघडण्याचं आणि त्याला प्रतिसाद देण्याचं राहून जातं. 

आता मी जे काही करतो म्हणजे  ई-मेलवरून नजर टाकून त्यांचं महत्त्व जाणुन घेण्याचा जो माझा प्रयत्न असतो त्याला स्कॅनर म्हणण्याची माझी सवय आहे. त्यामागे बहुदा मी विकसित केलेली माझी निर्णयप्रणाली आहे. त्या निर्णयप्रणालीनुसार निर्णय मी घेत असतो. ही सवय जोवर कार्यालयीन वापरापुरता मर्यादित आहे तोपर्यंत ठीक आहे. परंतु शनिवार रविवार आला तरीही ही सवय कायम राहते.  शनिवार रविवारी मराठी वर्तमानपत्राच्या दर्जेदार लेखांनी सजवलेल्या पुरवण्या असोत किंवा एखादं पुस्तक वाचायला घेतलं तरीही हल्ली हा स्कॅनर कार्यान्वित होतो.  पुरवणीतील लेखात किंवा पुस्तकात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत याचाच शोध घेत राहतो.  झटपट पुरवणी वाचून किंवा पुस्तक वाचून बाजूला ठेवलं जातं. मला लागलेली ही सवय आता आयुष्यभर माझ्या सोबत राहणार की काय याची चिंता मला आता लागून राहिली आहे. 

हे झालं लिखाणाच्या बाबतीत छापील मजकुराच्या, पुस्तकांच्या बाबतीत ! परंतु हीच सवय हळूहळू आता उपलब्ध असलेले टीव्ही, मोबाईल वरील विविध चित्रपट, वेब सिरीज यावर नजर टाकून ते पाहायचं की नाही याचा निर्णय मी घेत असतो. विविध जाणकार लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचून सुद्धा हा निर्णय घेण्यात मदत होत असते. प्रतिक्रिया वाचून एखादा चित्रपट किंवा मालिका बघण्यात त्या प्रतिक्रियेतील मतांमुळे आपण काहीसा पूर्वग्रह बनवतो आणि त्या कलाकृतीला न्याय देत नाही असं मला कधी कधी जाणवतं. त्यामुळे हा पर्याय स्वीकारावा की नाही असा सदैव संभ्रमात मी असतो. 

मनाची समजूत घालण्यासाठी हा प्रश्न केवळ माझाच नव्हे तर सद्ययुगातील  बहुतेकजणांचा असावा असे मी वाटून घेतो. उपलब्ध असलेल्या मजकुरांची किंवा विविध दृकश्राव्य माध्यमातील उपलब्ध पर्यायांची संख्या खूप असल्यामुळे हा संभ्रम निर्माण होत असावा. परंतु यात एक दीर्घकालीन प्रभाव मनुष्य जमातीवर होत असावा; तो म्हणजे एखाद्या छापील मजकुराचं, संगीताचं किंवा चित्रपटाचं रसग्रहण करण्याचं जी आपण क्षमता किंवा इच्छा बाळगून आहोत अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस आता कमी होत आहे. 

तीस चाळीस वर्षांपूर्वी मोजक्या कलाकृती निर्माण होत असल्यानं त्यातील बहुतेकांचं रसिकांद्वारे रसग्रहण होत असे. त्यामुळं छोट्या छोट्या तपशीलाकडं, लिखाणातील शुद्धलेखनाकडं काटेकोरपणे लक्ष दिलं जात असणार. अशा कलाकृतींचे बहुमत होतं. आता दर्जात्मक कलाकृतींचं प्रमाण झपाट्यानं कमी होत असणार कारण अशा कलाकृतींना त्यांना अपेक्षित असलेली दाद मिळणं कठीण होत आहे. 

मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या प्रवासात पुढील काही वर्षांत मोजक्या कलाकृतींचं सखोल विश्लेषण करण्याची क्षमता बाळगून असलेल्या मानवांची संख्या कदाचित कमी होईल. भरमसाट मजकूर, दृक श्राव्य कलाकृती ह्यांना वाचून, पाहून संतुष्ट होणारी माणसं आणि कृत्रिम बुद्धिमता असलेला यंत्रमानव ह्यात कदाचित फारसा फरक उरणार नाही. त्यामुळं आपल्या मेंदूला सतत खाद्य पुरवून त्याला सतर्क ठेवा. तुमच्या मेंदूचा एकंदरीत प्रवास मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या प्रवासात अगदी थोडक्या प्रमाणात का होईना पण आपला प्रभाव टाकतोय ! 

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...