मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

एक संध्याकाळ



सायंकाळी घरातील खिडकीत बसून रस्त्यावरुन फिरायला जाणाऱ्या माणसांचं निरीक्षण करणं हा एक जीवनानुभव आहे. सायंकाळी माणसं काहीशी भावुक होत असावीत. आपल्या पूर्वजांच्या मनात सुर्यास्तानंतर येणाऱ्या अंधारामुळं एक भयाची भावना मनात निर्माण होत असावी. त्यानंतर हजारो वर्षे गेली असली तरी ती भावना रेंगाळलेल्या रुपात आपल्या मनात कुठंतरी असावी आणि त्यामुळं आपण भावुक होत असू असा माझा कयास. पण त्यासाठी टीव्ही, मोबाईलपासून आपण दूर असावं ही पूर्वअट ! बऱ्याच दिवसांनी अशी निरीक्षण संधी आज मला मिळाली. ह्यात जोडपी होती, मैदानावर खेळून हातात बॅट, बॉल घेऊन परतणारी मुलं होती, कष्टाचं काम आटपून घरी परतणारे मजूर होते.

एकत्र फिरायला जाणाऱ्या जोडप्याचं निरीक्षण करणं हा एक खास अनुभव असतो.  तिला खूप काही बोलायचं असतं. तो बऱ्याच वेळा मनाविरुद्ध तिच्या आवडीखातर घराबाहेर पडलेला असतो. त्यामुळं तिच्या बोलण्याकडं अगदी एकाग्रतेनं लक्ष देणं हे एकंदरीत अवघडच असतं. त्याच्या मनात कदाचित ऑफिसातील कामाचे, आर्थिक घडीचे किंवा IPL लिलावाचे विचार घोळत असतात. अधून मधून "असं होय?" "तिला काहीच काय कळत नाही का?" वगैरे प्रश्न विचारुन आपली तन्मयता सिद्ध करण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न सुरु असतो. त्यात काहीतरी चुकीचे प्रश्न विचारुन त्याचं तिच्या बोलण्याकडं लक्ष नाही हे तो सिद्ध करतो. पण केवळ त्याच्याकडं लटक्या रागानं पाहण्याव्यतिरिक्त किंवा त्याला चापटी मारण्याव्यतिरिक्त ती काहीच करत नाही. त्यानं आपल्या बोलण्याकडं लक्ष द्यावं अशी तिची अपेक्षाच नसते मुळी! तिला त्याचं आपल्यासोबत असणं महत्वाचं असतं. तिला बोलायचं असतं आणि ते ऐकून घेणारं कोणीतरी हक्काचं आपल्या सोबत आहे हेच तिच्यासाठी पुरेसं असतं. घर जसं जवळ येतं तेव्हा मात्र तिच्या बोलण्यात कदाचित सायंकाळच्या जेवणाचे विचार येऊ लागतात. मग तीही काहीशी गप्प होते. काळ जसा बदलेल तसं अर्थार्जन करणारी स्त्री आणि घर सांभाळणारा नवरा असंही चित्र दिसेल. अशी जोडपी फिरायला जातील तेव्हा कशी चर्चा होईल ह्याच्या विविध शक्यता मनात येतात. ही झाली तरुण जोडपी. वयस्क जोडप्यांची कथा काहीशी वेगळी असते. जे काही बोलण्यासारखं असतं ते आयुष्यभरात बोलून झालेलं असतं आणि त्यावर दिवसभर एकत्र असल्यानं सायंकाळी अजून काही खास बोलण्यासारखं नसावं. कदाचित आजोबा पुढं चालत असतील आणि आजी आपल्या बेतानं त्यांच्या मागे मागे चालत असतील. आयुष्यभर चालल्या तशा !

मैदानावर खेळून परतणारी मुलं म्हणजे मनुष्यजातीचा भविष्यकाळ! उत्साहाच्या चैतन्याचे झरे त्यांच्या चालण्याबोलण्यातून वातावरणात मिसळत असतात. मैदानावर आपण कसा पराक्रम गाजवला ह्याचा आढावा ते घेत असतात. कदाचित आपल्यातील एखाद्या मित्राची मजेत टर उडवत असतात आणि तो ही त्याचा आनंद घेत असतो. कष्टाचा दिवस आटोपून घरी जाणारे कष्टकरी पाहिले की आपसूक माझ्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण होते. प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आलो म्हणून ना दुःखाची भावना किंवा सुरक्षित भविष्याची खात्री आज देता येणार नाही म्हणून ना चिंतेची भावना. आपल्या स्वतःच्या कष्ट करण्याच्या क्षमतेवर अफाट विश्वास आणि त्या विश्वासावर आयुष्याचा लढा लढण्याची जिद्द. 

पाहता पाहता सूर्य मावळतो. मनुष्यजातीच्या जीवनसंघर्षांचं एक पान उलटलेलं असतं. ह्या पानावर लिहिले गेलेले असतात अनेक बरे वाईट अनुभव प्रत्येकाच्या नजरेतून ! आकाशात एव्हाना चंद्राने आपल्या शीतल किरणांची जादू पसरवलेली असते. शहरातील माणसं बहुदा ह्या जादूपासून अनभिज्ञ राहून केव्हातरी मध्यरात्रीनंतर झोपी जातील, गावातील माणसांना हा चंद्र बहुदा दर्शन देतीलच. पण सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे एक नवीन आशेनं दुसऱ्या दिवसाला सामोरे जाण्याची.  

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

मेरी आवाज ही पहचान हैं


लता मंगेशकर! आयुष्यभर सदैव सोबत असलेल्या लतादीदी.  लहानपणी विविधभारतीवरील मंगलप्रभात हा कार्यक्रम ऐकत सकाळची सुरुवात व्हायची. त्यावेळी बऱ्याच वेळा लतादिदींच्या स्वर्गीय आवाजानं घरातील वातावरण मंगलमय होत असे. त्यातील काही  मोजकी गाणी सांगायची झाली तर 

गणराज रंगी नाचतो 

गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया 

भेटी लागी जीवा लागली से आस

विठ्ठल तो आला आला मला 

भावनांचा तु भुकेला रे मुरारी 

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला - पंडित नगरकर आणि लता मंगेशकर  

ह्यातील घनश्याम सुंदरा श्रीधरा हे गाणं तर सकाळच्या पावित्र्याला अगदी पुरेपूर शब्दांत सामावून घेणारं.  लताजींच्या त्या स्वर्गीय आवाजानं लहानपणी मनावर खूप खोलवर संस्कार होत गेले.  अनेक शतकांपासून चालत आलेल्या संस्कृतीचा आपण भाग आहोत ही भावना ही सकाळची भक्तिगीतं ऐकत दृढ होत गेली. ह्या गीतांनी मनाला दिलेल्या स्थिरतेचे वरदान अजूनही वेळोवेळी उपयोगी येते. 

घरगुती गणपतीसोबत अतूट नातं असणारी अनेक पिढ्यांतील मराठी बालमंडळी ! गणराज रंगी नाचतो ,  गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ह्या गाण्याचे सूर कानावर पडले की लहानपण कसं अगदी नाचत बागडत आपल्याजवळ येतं. त्या न विसरण्याजोग्या सात दिवसांच्या गणेशोत्सवात लतादीदी सदैव आपल्यासोबत राहिल्या, अजूनही राहतात आणि सदैव राहतील. 

मराठी मनाचा एक संस्कृतीमय कप्पा म्हणजे ज्ञानेश्वरी ! लतादिदींच्या आवाजातील ज्ञानेश्वरीतील रचना ऐकणं म्हणजे एक स्वर्गीय अनुभव! 

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले 

अजि सोनियाचा दिनु 

अरे अरे ज्ञाना झालासी पावन 

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा 

अवचिता परिमळू 

पैल तो गे काऊ 

पसायदान 

संभ्रमात पडलेल्या मनाला शांतीच्या भावनेची अनुभूती देणारी ह्या ज्ञानेश्वरांच्या कालातीत रचना ! ह्या रचनांचा अर्थ समजणं हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडील, पण लतादीदींच्या आवाजानं ह्या रचनांना सामान्य माणसांच्या हृदयात कायमचं बसवलं. 

त्या काळातील मराठी कुटुंबाचा अविभाज्य घटक असलेला रेडिओ आमच्या घरातही होता. सकाळी भक्तिगीतांनी वातावरण मंगलमय करणाऱ्या लतादीदी नंतर हिंदी गाण्यांच्या माध्यमातून वेगळ्या रुपात भेटायच्या. रात्री छायागीत मध्ये त्यांची गाणी ऐकताना स्वरांच्या माध्यमातून भावना कशा थेट हृदयापर्यंत पोहचू शकतात ह्याची पुरेपूर जाणीव होते. 

लतादीदींनी देशभक्तीपर काही अविस्मरणीय गीतं गायली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी "ऐ मेरे वतन के लोगों" हे  गीत सदैव प्रेरणादायक राहील.  त्यांच्या आवाजातील "अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत" हे गाणं ऐकून ज्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत असा माणुस विरळाच ! "वंदे मातरम" हे ही एक संस्मरणीय देशभक्तीपर गीत ! भीमसेन जोशी रचित "मिले सूर मेरा तुम्हांरा" ह्या गाण्यात संपुर्ण देशाला एकत्र जोडण्याची ताकद आहे. ह्या गाण्यात लतादीदींनी सहगायकांसमवेत आपल्या स्वरांची जादू आपल्यासमोर साकार केली आहे. 

जयोऽस्तु ते

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!

श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

स्वातंत्र्यवीर सावरकर रचित ही देशभक्तीपर रचना दीदींच्या आवाजात ऐकून स्वातंत्र्यसैनिकांच्या भावना ह्या काळात सुद्धा आपल्यापर्यंत अगदी यथार्थपणे पोहोचतात. 

लतादिदींनी जवळपास सात दशकं अनेक भाषांतून अविस्मरणीय गीतं गायली. त्याचा आढावा घेण्याची माझी कुवत नाही. त्यांनी एकल आणि पुरुष गायकांसोबत मिळून अनेक गाणी गायली. त्यातील माझी आवडती ही काही गीतं !

आयेगा आयेगा आयेगा आयेगा आनेवाला 

अजीब दास्तां हैं ये 

अल्लाह तेरो नाम 

फैली हुई हैं सपनों की बाहें 

आप की नजरों ने समझा प्यार के काबील मुझे 

लग जा गले के फिर ये रात 

तू जहाँ जहाँ चलेगा 

प्यार किया तो डरना क्या 

सीने में सुलगते हैं अरमान 

ये दिल और उनकी निगाहो के साये 

बीती ना बिताई रैना 

चलते  चलते युंही कोई मिल गया था 

इन्ही लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा 

अपलम चपलम चपलायी रे 

आजा रे परदेसी 

हम चूप हैं के दिल सून रहें हैं 

लिखनेवाले ने लिख डाले 

चाँद फिर निकला मगर तुम ना आये 

तेरा जाना दिल के अरमानोका 

मोरा गोरा रंग ले ले 

मैं तो भूल चली बाबुल का देश 

दिल की नजर से ये बात क्या हैं 

कहीं दीप जलें कहीं दिल 

धीरे धीरे चल 

सरसे सरके सरकी चुनरिया 

नैना बरसे रिमझिम 

तुने ओ रंगीले कैसे जादू किया 

दो नैनो में आंसू बसे हैं 

आप यूं फासलों से चलते रहें 

ये रातें नयी पुरानी 

ये कहाँ आ गये हम 

जिया जले जाँ  जले 

खुद् से बातें करती रहती हैं 

ये शहर बडा अजनबी हैं 

अखेरचा हा तुला हा दंडवत 

मोगरा फुलला 
मी रात टाकली मी कात टाकली 
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या 
विसरु नको श्रीरामा मला 
झुलतो बाई रास झुला 
सख्या रे घायाळ मी हरिणी 

ह्या गाण्यांची यादी न संपणारी आहे. ह्या गाण्यातीलच नव्हे तर त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्यातील प्रत्येक शब्द, सूर अगदी मनात साठवून ठेवावा असा! प्रणयाधीन नायिकेच्या प्रत्येक भावनेला अगदी पुरेपूर न्याय देण्याची जादू दिदींनी सर्वच गाण्यांत केली आहे.  

लतादिदींनी साधारणतः १९५० सालापासून आपल्या स्वरांची जादू संपूर्ण भारतदेशावरच नव्हे तर जगभर पसरवली.  संपूर्ण मनुष्यजातीच्या इतिहास भारतखंडातील अविस्मरणीय गायिका म्हणून लतादिदींचे नांव सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल. लतादीदी आज लौकिकार्थानं जरी आज आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या सुरांच्या माध्यमातून सदैव आपल्यात राहतील. आपण ह्या बाबतीत अगदी सुदैवी ठरलो. एका ईश्वरी अवताराचे प्रत्यक्ष साक्षीदार असण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. आपण हा संगीताचा हा अमुल्य ठेवा जर आपल्या पुढील पिढीला त्यांच्यात ह्या गीतांची आवड निर्माण करुन देऊ शकलो तर ही लतादिदींना खरी श्रद्धांजली ठरेल ! 

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

माझी दिनचर्या





मनात ठाम निर्धार करुन मी हिमालयाची त्या पायवाटीचा मार्ग धरला होता. बोचरे वारे, दूरवर दिसणारी हिमालयीन रानटी जनावरे ह्यांना न भीता मी शेवटी एकदाचा त्या महर्षींच्या गुहेसमोर पोहोचलो. माझ्या सुदैवानं काही वेळातच महर्षींची समाधी समाप्त झाली. 

स्मित हास्य करत महर्षी मला म्हणाले, " वत्सा, वसई क्षेत्री सर्व काही कुशल आहे ना ? 
मी - "हो महर्षी !"
महर्षी - "भोवताली इतके निर्बंध असताना तू इथंवर कसा काय येऊन पोहोचलास ?"
मी - "महर्षी,  मी स्वनिर्मित संकटात सापडलो आहे.  आपल्या मदतीसाठी इथंवर धाव घेतली आहे !"
इतक्यात टिंग असा आवाज येताच माझं लक्ष भ्रमणध्वनीकडं गेलं. 
महर्षी - "हा ध्वनी कसला?"
मी - (काहीशा अपराधी भावनेनं) - "माझ्या शनिवारी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टला लाईक आणि कमेंट आली आहे "
महर्षी (काहीसे प्रक्षुब्ध होऊन) :- "आपण इथल्या संवादाकडे लक्ष केंद्रित करुयात का ?"
मी - "हो महर्षीं. प्रमादाबद्दल क्षमा असावी"
महर्षी - "तुझी नक्की समस्या काय आहे ?"
मी - "हीच ती समस्या "
महर्षी - "नक्की समजेल असं बोलशील का "
मी - "कोणतेही काम एकाग्रतेनं करण्याची माझी क्षमता प्रत्येक दिवसाला कमी होत चालली आहे"
महर्षी - "हे असे का व्हावं ?"
मी - "मघाशी जे घडलं ते सदैव होत राहतं. हा भ्रमणध्वनी विविध संदेशांची सूचना देत राहतो आणि मी माझं मुख्य कामातील लक्ष गमावून बसतो !"
महर्षी - "ह्यावर उपाय काय असं तुला वाटतंय ?"
मी - "काही उपाय लागू पडतील असे मला वाटतंय, पण खात्री नाही"
महर्षी - "उदाहरणार्थ ?"
मी - "एक दररोजचं वेळापत्रक आखावे आणि त्यानुसार दिवस व्यतित करावा "

मान डोलावून संमती दर्शवित महर्षीनी मला अर्धा तास दिला.  महत्प्रयासाने मी खालील मजकूर नोंदविला 

पहाटे सूर्योदयाच्या किमान पंधरा मिनिटं आधी उठावं. ब्रश करुन एका प्रसन्न मनानं सूर्योदय पहावा. अशा ह्या प्रसन्न वेळी किमान दहा सूर्यनमस्कार, पाच उठाबशा आणि पाच सीटअप्स असा निसर्गाशी नातं जोडणारा व्यायाम करावं. सूर्यनमस्कार जसे जमतील तसे काढावेत. उगाचच त्यातील प्रत्येक स्थितीच्या अचूकतेविषयी साशंक होऊ नये. नाहीतर दुसऱ्या दिवसापासून हे सूर्यनमस्कार काढण्याची इच्छाशक्ती झपाट्यानं कमी होऊ शकते.  आपण अगदी तंदुरुस्त दिसावं असा स्वार्थी विचार करुन व्यायाम करु नयेत. आनंदी मनासाठी हा सकाळचा व्यायाम आपण करत आहोत ही भावना मनात ठेवावी. उठल्यापासून एका तासाच्या आत स्नान आटोपून घ्यावं. सकाळी लवकर स्नान केल्यानंतर सकाळच्या प्रत्येक क्षणाचा दर्जा, त्या क्षणातील तुमची एकाग्रता ह्यात कमालीची सुधारणा होते. स्नानानंतर पाठांतरशक्ती / इच्छाशक्तीनुसार मारुतीस्तोत्र, गणपतीस्तोत्र पठण करावे. स्नानानंतर एक चषक धारोष्ण दूध प्राशन करावं. दूध प्राशन केल्यावर वाय फाय सुरु करावे पण ते केवळ कार्यालयीन ई - मेल्स तपासून पाहण्यासाठी. कार्यालयीन ई - मेल्समधील अगदी महत्वाच्या मेल्सना उत्तर द्यावं. बाकीच्यांचे वर्गीकरण करुन दिवसभरात त्यावर योग्य कार्यवाही करावी. ह्या नंतर शिरा, पोहे, उपमा असा गरमागरम नाश्ता घेत असताना दारी आलेल्या वर्तमानपत्रांचे वाचन करावे. ह्यातील मनाला क्लेशदायक बातम्या जसे की बेजबाबदार फटका मारुन पंतचे बाद होणे किंवा भारतीय गोलंदाज व फलंदाज ह्यांना एकत्रितपणे चांगली कामगिरी न करता येणे जमतील तितक्या टाळाव्यात. अग्रलेखाकडे नजर फिरवावी आणि न समजणारे तीन शब्द सापडल्यावर अग्रलेख वाचणे थांबवावे. नाश्ता आटोपल्यावर स्वयंपाकघरातील हिरव्यागार भाज्यांकडे लक्ष देऊन प्रसन्न व्हावं. ह्या क्षणी पंधरा मिनिटं सोशल मीडियाला बहाल करावीत पण ती केवळ वाचकाच्या भूमिकेत. कोणत्याही विषयावर आपले मतप्रदर्शन करणे प्रकर्षानं टाळावे. ह्यानंतर सध्या वर्क फ्रॉम होम सुरु असल्यानं कार्यालयीन कामात शिरण्याची मानसिक तयारी करावी. शर्टाला इस्त्री करणे हा ह्या मानसिकेत शिरण्याचा जालीम उपाय आहे. लॅपटॉप, मोबाईल ही सर्व आयुधं विद्युतप्रभारीत करून ठेवावीत. पुढील नऊ तास फेसबुक लाईक, टिपण्णी, व्हाट्सअप चर्चा आणि ब्लॉग हिट्स संख्या ह्याकडे दुर्लक्ष करावे. रात्रौ नऊच्या आसपास कार्यालयीन कामं आटोपल्यावर जेवण आटोपून मगच मोबाईल हाती घ्यावा. जो काही धुमाकूळ, वादविवाद घालायचे असतील ते ह्यावेळी घालावेत. पार्श्वभूमीवर जुनी हिंदी गाणी सुरु ठेवावीत. रात्री दहा वाजता वाय फाय बंद करावे ! 

महर्षीनी त्या कागदावर नजर फिरवली आणि म्हणाले - "शुभस्य शीघ्रम !" 

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

जीवना कसा मी असा !


सद्यकाळात माणसं आपापल्या कोशात जाऊ लागली आहेत. माणसांच्या वर्गीकरणाच्या अनेक पद्धती पुर्वापार अस्तित्वात होत्याच. सध्या त्यात काहींची भर पडली आहे तर काही अस्तित्वातील प्रकारांना सद्यकालानं नवीन पैलू प्राप्त करुन दिले आहेत. 

आशावादी आणि निराशावादी हा पूर्वापार चालत आलेला माणसांच्या वर्गीकरणाचा प्रकार! सध्या आशावादींना आपली मनोवृत्ती कायम ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागत आहेत तर निराशावादींना आपल्या स्वभाववैशिष्ट्यांना अनुकूल असे वातावरण सापडलं असल्यानं ते निराशेच्या गर्तेत खोलवर जाण्याची शक्यता वाढीस लागली आहे. 

आशावादी माणसांनी मनुष्यजातीच्या दृष्टिकोनातून पाहता एक अधिक जबाबदारी स्वीकारायला हवी ती म्हणजे ही सकारात्मकता आपल्या भोवतालच्या, आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांत पसरवायला हवी. ही सकारात्मकता पसरविताना समोरच्या माणसाचा विश्वास बसेल असे स्पष्टीकरण, अशी उदाहरणं द्यायला हवीत. मनुष्यजातीच्या बाबतीत सदैव चांगल्याच घटना घडतील असे नाही. मनुष्याचा इतिहास पाहता ह्याहून अधिक खडतर काळाला आपल्या पूर्वजांना सामोरे जावे लागले आहे; तेही तंत्रज्ञान इतके प्रगत नसताना. त्यावेळच्या माणसांना बहुदा जीवनाकडून सदैव आनंद अपेक्षित नव्हता. आपण मात्र सदैव आनंदी राहण्याची अपेक्षा करतो आणि तिथंच जीवन आपला वारंवार अपेक्षाभंग करतं. 

परत एकदा कोशात जाण्याकडं वळून माणसांच्या वर्गीकरणाचा एक नवीन प्रकार पाहुयात. पहिला प्रकार म्हणजे सदैव आपल्या भ्रमणध्वनीमध्ये / गॅझेटमध्ये गुंतून राहणारी, तिथे भेटणाऱ्या आभासी किंवा खऱ्या माणसांशीच जोडली जाणारी माणसं. ही माणसं अनुकूलतेच्या शोधात वेगवेगळ्या मालिका, चित्रपट धुंडाळत राहतात, किंवा आपल्याला आनंद देणाऱ्या माणसांशीच संपर्क जोडत राहतात. ह्या विश्वातून प्रत्यक्ष जीवनात जो काही थोडा काळ ते येतात त्या वेळी ते कमीतकमी संवाद साधत असतात. ह्याउलट काही माणसांनी अजूनही स्वतःला ह्या मोहापासून दूर ठेवले आहे. प्रत्यक्ष जीवनातील वैविध्यपूर्ण माणसांसोबत संवाद साधणे किंवा आयुष्यातील खडतर प्रसंगाना स्वतःहून सामोरे जाणे असले प्रकार ही माणसे स्वखुशीने करत असतात. 

माणसांचा प्रकार कोणताही असो पण आपल्या नकळत आपल्या मेंदूत एक स्वतःविषयी आपल्याला कसं वाटत आहे / आपण कितपत आनंदी आहोत  ह्याचा एक निर्देशांक वावरत असतो. माणसं आपल्या अर्थाजनासाठी जो नोकरी व्यवसाय करतात त्यावेळी हा निर्देशांक बासनात गुंडाळून ठेवला जातो. दिवसातील ज्या क्षणी आपण त्या दिवशीची नोकरी व्यवसायाची आणि कौटुंबिक जबाबदारी आटपतो त्यावेळी हा स्वखुशीचा, आत्मसन्मानाचा निर्देशांक उसळी मारुन बाहेर येतो आणि माणसं ह्या निर्देशांकाच्या इच्छेनुसार वागू लागतात. ह्या अनुषंगानं माणसांचा एक नवीन प्रकार अस्तित्वात आला आहे.  जीवन ज्यांना ह्या निर्देशांकाच्या मर्जीनुसार काही काळ व्यतीत करण्याची संधी देते अशी काही माणसं तर ज्यांना देत नाही ती उरलेली माणसं !

कोणत्याही कोशाचा अतिरेक वाईटच ! प्रत्येक दिवस आपल्याला आयुष्य नव्या पद्धतीनं जगण्याची संधी देत असतो. आपल्या मागील आयुष्याच्या जीवनपद्धतीला कुरवाळून बसण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की आपण नव्या पद्धतीनं दैनंदिन जीवनाकडं पाहण्याचे कष्ट क्वचितच घेतो. 

मनुष्यांच्या जीवनात हल्ली जास्त ताणतणाव का निर्माण झाला आहे ह्याचा मला प्रश्न पडतो. पण बहुदा ह्याचं उत्तर सोपं असावं असं मला वाटत रहातं. मनुष्यांची संख्या तर वाढलीच आहे; त्याचबरोबर स्वतःविषयी भ्रामक आत्मसन्मानाच्या कल्पना निर्माण झाल्या आहेत. ह्या आत्मसन्मानाच्या कल्पना आपल्या सभोवतालच्या वास्तविक आणि आभासी जीवनात विशिष्ट लहरी सोडत राहतात. जेव्हा दोन भिन्न व्यक्तींच्या भिन्न ध्येयाने प्रेरित लहरी एकमेकांवर आदळतात तेव्हा तणावनिर्मिती होते. काही काळानंतर मनुष्यांचा अवास्तव वाढलेला आत्मसन्मान हीच मनुष्यांची सर्वात मोठी समस्या बनणार आहे! मला माझ्या एका ज्येष्ठ अमेरिकन सहकाऱ्याने दिलेला सल्ला मी वारंवार वापरतो. तो म्हणाला होता, "आदित्य, कधीकधी स्वतःकडे गांभीर्यानं पाहणं सोडून दे! आयुष्य सोपं होईल ! 

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

आर्या




एकेकाळी स्वतःच्या व्यक्तिमत्वात, विचारसरणीत जे काही बदल कदापि होऊ शकणार नाहीत असं आपल्याला वाटत असतं ते कालांतरानं घडून येतात. हा आपल्या मूळ विचारसरणीचा पराभव समजून दुःखी व्हायचं की काळानुसार आपल्यात बदल घडवून आणल्याबद्दल आनंद मानायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न! ही प्रस्तावना आर्या ह्या वेब मालिकेचे पहिल्या आणि दुसऱ्या मोसमाचे भाग ज्या झपाट्यानं मी गेल्या चार दिवसांत संपवत आणले आहेत त्या संदर्भात ! Binge Watch हा शब्दप्रयोग साधारणतः एका बैठकीत एखाद्या मालिकेच्या सर्व भागांचा फडशा पाडणे ह्या घटनेसाठी वापरला जात असावा. त्यामुळं माझं हे शब्दशः Binge Watch म्हणता येणार नाही. मी एखाद्या मालिकेमुळे इतका झपाटला जाऊ शकतो हा कधीकाळी मला वाटणाऱ्या माझ्या संयमित मनाचा पराभव मानावा का हा विचार करण्याच्या पलीकडं मी सध्या आहे. 

एका मोठ्या कुटुंबातील नातेसंबंध हळुवार उलगडणारी एक मालिका हे ह्या कथेचा मूळ गाभा ! पिझाचा बेस म्हणावं तसं ! मग त्यावर एकेक थर येत राहतात. हे साधंसुधं कुटुंब नाही, तर कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे कुटुंब. पैशामुळं नातेसंबंधातील बंध बदलत जातात. ह्या मालिकेतील पैसा हा वैध मार्गानं कमावलेला पैसा नसुन तो एका वैध व्यवसायाच्या मागे दडलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळवलेला आहे. हे क्षेत्र मुळातच गुन्हेगारी आणि त्यामुळं ह्या कुटुंबांच्या कर्त्या लोकांचे गुन्हेगारी विश्वाशी आणि पोलिसांशी सदैव संबंध येत राहतात. प्रचंड पैसा जिथं गुंतलेला असतो तिथं सर्वोच्च पदावरील व्यक्तीला कठोर निर्णय घ्यावेच लागतात. ह्या व्यवसायाच्या क्रूर रुपामुळं इथले कठोर निर्णय  आपल्या निर्णयांच्या आड येणाऱ्या व्यक्तीच्या हत्येपर्यंत सातत्यानं पोहोचत राहतात; मग ती व्यक्ती आपली अगदी जवळची नातलग का असेना ! 

नातेसंबंध, श्रीमंती, अवैध धंदा ह्यानंतर कथेचा मुख्य रंग आपल्यासमोर येतो तो म्हणजे आपल्या तीन मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी एका आईचा संघर्ष ! बाहेरच्या विश्वात अगदी निष्ठुरपणे वागणारी सुश्मिता शेवटी आपल्या पिल्लांना बाहेरच्या जगापासून वाचवू पाहणारी एक माताच आहे हे विविध प्रसंगातून जाणवत राहते. सुश्मिताच्या बाबतीत एकामागून एक ज्या भयंकर घटनांची मालिका घडत राहते त्यामागं बऱ्याच वेळा असतात ती तिची नातलग मंडळीच आणि त्यात बहुतांश वेळा तिचे जन्मदाते वडीलच. आर्या आपल्यासोबत आपल्या ह्या व्यवसायातच असावी ह्या वेड्या अट्टाहासापायी कोणत्याही थराला जाऊ शकणारे तिचे वडील ! 

वेब मालिका असल्यानं इथं सेन्सॉर बोर्डाचं नेहमीप्रमाणं नियंत्रण नाही. त्यामुळं अमली पदार्थ सेवन, शारीरिक जवळीक, शिव्या हे सारं काही कुठंही फारशी कात्री न लावता दाखवलं जातं. खरोखर वास्तववादी वाटत राहते. सुरुवातीला फारसं  न जाणवलेल्या  ह्या मुद्द्याचं गांभीर्य जसजसे पुढील भाग पाहत गेलो तसतसं मला प्रकर्षानं जाणवत गेलं. बहुतांशी पंधरा - सोळा वर्षांच्या मुलांना सुद्धा ही किंवा अशा तत्सम मालिका, चित्रपट पाहण्याचं स्वातंत्र्य आज आहे. त्यांच्यावर ह्या मालिकांच्या कथानकाद्वारे आणि अगदी वास्तववादी चित्रीकरणामुळं कोणता परिणाम होणार आहे ह्याचा विचार करुन अंगावर काटा येतो. 

पहिल्या मोसमात जी काही गूढता सर्व भागांत टिकवून राहते त्याचं नावीन्य दुसऱ्या मोसमात काहीसं नाहीसे होत जातेय. कदाचित ह्या मालिकेतील विविध व्यक्तिरेखांना हळूहळू आपण चांगले जाणू लागतो आणि त्यांनतर ह्यातील कोणत्या घटनांना कोण जबाबदार असू शकतील ह्याचे बऱ्यापैकी अचूक आडाखे आपण बांधू शकतो. म्हणायला गेलं तर व्यक्तिरेखांच्या सातत्यपूर्ण चित्रीकरणाबद्दल ह्या मालिकाकारांना दिलेली ही दाद आहे पण त्याचवेळी मालिका काहीशी साचेबंद होण्याकडे झुकते. 

मालिकेतील एका श्रीमंत कुटुंबातील वातावरण कसं असू शकते ह्याचं ज्या प्रकारे चित्रीकरण करण्यात आले आहे त्याला खरोखरच मनापासून दाद द्यावीशी वाटते. वयात येणाऱ्या मुलांना पालकांची किती गरज आहे हा ही मुद्दा इथं अप्रत्यक्षरीत्या जाणवत राहतो.बऱ्याच वेळा होतं काय की वयात येणाऱ्या मुलांची एकाच पालकांसोबत जास्त भावनिक गुंतवणूक असते. दुर्दैवानं जर नेमका तोच काळाच्या पडद्यामागं गेला तर मग दुसऱ्याची होणारी घालमेल शब्दांच्या पलीकडील ! 

कदाचित पुढील दोन तीन दिवसांत दुसऱ्या मोसमाचे सर्व भाग पाहून होतील! तीनशे कोटींचा ह्या मालिकेतील संदर्भ आणि त्या अनुषंगानं केलेलं चित्रीकरण खरोखर मनाला पटतात. पण उगाचच तीनशे कोटींचा संदर्भ ओढूनताणून  आणलेली मराठी मालिका सुद्धा आठवत राहते! एका वास्तववादी मालिकेबद्दल निर्मात्यांचे अभिनंदन पण  त्याचबरोबर वेब मालिकांद्वारे जे काही कोणत्याही बंधनांशिवाय आपल्या मुलांना उपलब्ध करुन दिले जात आहे त्याविषयी मनात उठलेली चिंतेची लहर अशा संमिश्र भावनेनं ह्या पोस्टची सांगता करत आहे ! 

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

अतरंगी रे !


हा चित्रपट पाहण्याआधी एक वैधानिक इशारा मी आपणास देऊ इच्छितो.  आपण जर पेशानं डॉक्टर असाल किंवा आपण सध्या वैद्यकीय उपचार घेत असाल तर हा चित्रपट पाहण्याचं धारिष्ट्य करु नये. एक डॉक्टर म्हणून तुमचा स्वतःचा आत्मविश्वास किंवा एक पेशंट म्हणून तुमच्या डॉक्टरवरील तुमचा विश्वास तुम्ही मोठ्या प्रमाणात गमावू शकता! 

मला वारंवार भयावह स्वप्नं पडतात. ह्या स्वप्नांवर आपलं नियंत्रण नसलं तरी मेंदू कुठंतरी त्यावर लक्ष ठेऊन असतो. म्हणजे मोकळ्या पठारावर वाघ माझा पाठलाग करत असेल तर मेंदू स्वप्न सुरु ठेवून देतो. पण समजा पळता पळता समोर विहीर आली तर मेंदू मला जाग आणतो. हा चित्रपट म्हणजे मोकळ्या पठारावर वाघानं पाठलाग सुरु ठेवण्यासारखा होता. भयावह होता पण इतकाही नाही की चित्रपट पूर्ण बंद करावा. 

चित्रपट पाहिला तो डिस्नी हॉटस्टार सबस्क्रिप्शनवर ! गेल्या महिनाभर जिओचे इंटरनेट आणि केबल घेतलं आहे. इंटरनेटचा स्पीड खूप जलद आणि केबलवरील विविध पर्यायांची उपलब्धता मुबलक आहे. पण केबल वापरण्याचं एक वेगळं तंत्र आहे. ते आत्मसात करता यायला हवं. कोणत्याही चॅनेलला नंबर नाही. ते चॅनेल ज्या प्रकारात मोडतं त्या प्रकारात जाऊन ते निवडायचं किंवा त्या चॅनेलचे नाव बोलून सांगायचं. हे म्हणजे घरी भाजीत मीठ जास्त पडलंय हे सांगायचं असेल तर आधी आहार - प्रतिक्रिया - भोजन - भाजी क्रमांक १ - मीठ जास्त अशा प्रकारे प्रतिक्रिया देणं झालं. त्यानंतर चपात्या सुरेख झाल्या आहेत हे सांगायचं असेल तर दोन वेळा back दाबून  आहार - प्रतिक्रिया - भोजन  पर्यंत पोहोचून चपात्या हा पर्याय निवडायचा आणि मग सुरेख म्हणायचं असं झालं. 

असो ! डिस्नी हॉटस्टारवर चित्रपट पाहिल्याने केवळ वेळ वाया गेल्याचं दुःख आणि दोन मराठी मालिकांपासून मुक्तता मिळाल्याचा आनंद ! आपण एखादा चित्रपट पाहताना सारासार विचाराची पातळी किती टक्क्यांवर ठेवली असा मी चित्रपट संपल्यावर विचार करतो. ह्या चित्रपटानंतर ही पातळी १२ टक्के होती की साडेबारा ह्यावर माझा भयंकर गोंधळ झाला आहे. तरीही इथं काही शंका उपस्थित करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. 

१) मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात केवळ एकाच मुलाला (?) सपत्निक राहण्याची परवानगी का देण्यात आली. वैद्यकीय शिक्षणाचं खास करुन पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सर्वच डॉक्टरांना ही सवलत देण्यात यावी अशी मागणी जोर धरण्याची शक्यता आता नाकारता येत नाही! 

२) संपूर्ण चित्रपटात अक्षयकुमार प्रचंड थकलेला दिसतोय. हा इतका थकलेला का दिसतोय हा प्रश्न पत्नीनं मला विचारला. मग काही वेळानं तो बाळसं धरलेल्या साराला उचलून धरतो असा प्रसंग आला. बहुदा ह्यामुळंच त्याला पाठदुखी झाली असावी आणि तो दमलेला दिसत असावा असा निष्कर्ष आम्ही काढला. आणि पुढील सर्व शक्यतांच्या चर्चेपासून मुक्तता झाली म्हणून मी सुटकेचा निःश्वास टाकला. 

३) चित्रपटाच्या सुरुवातीला सारा स्टेशनवर काचेचा प्रचंड चुराडा करते. पुढे धनुष आपल्या डोक्यावर मद्याने भरलेल्या अनेक बाटल्या फोडून घेतो. ह्यापुढं ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणात मुक्या प्राण्यांचा छळ करण्यात आलेला नाही ह्यासोबत उगाचच काचेचा चुराडा करण्यात आलेला नाही हे कलम टाकण्यात यावं ही मागणी मी ह्या पोस्टद्वारे करत आहे. त्याचबरोबर त्या बाटल्यांमध्ये केवळ पाणी भरलेलं होतं असा खुलासा सुद्धा माझ्या मित्रांच्या भावनांचा विचार करुन देण्यात यावा ही मागणी सुद्धा मी करतोय !

४) जिथं आपल्याला खरंखुरं लग्न करायचं आहे तिथं खोट्या लग्नातील बायको नेणं हे का पटावं? आणि केवळ तिला एक वाक्य आपला होणारा सासरा बोलला म्हणून समस्त स्त्री वर्गाला आदरानं पाहण्याचा साक्षात्कार व्हावा ! हे सारं पाहून मी धन्य झालो. पण त्याचबरोबर जिला इतके दिवस लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि जिच्याशी प्रत्यक्ष लग्न करायला आला होतास त्या मुलीचं पुढे काय ? असा प्रश्न विचारावासा वाटतो. 

५) दिल्लीहून भरपावसात विजेच्या खांबावर चढून दक्षिण भारतात landline वर फोन लावण्याची वेळ येणं हे दृश्य पाहून हा चित्रपट सत्तर / ऐशीच्या काळातील असावा असा निर्माण झालेला समज पुढे येणाऱ्या करोनाच्या संदर्भाने दूर झाला!  

आता चित्रपटाच्या कथानकाकडं वळावं असं म्हणतोय ! पण धारिष्ट्यच  होत नाही! कदाचित माझ्या बाजूला सध्या सांता वावरत असावा आणि त्यानेच ही पोस्ट माझ्याकडून लिहून घेतली असावी ! असंच काहीतरी चित्रपटात होत राहतं. साराचा चांगला म्हणावा असा अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजु ! कोलावेरी गाण्याच्या पलीकडं धनुषला स्वतःची काहीतरी वेगळी प्रतिमा निर्माण करता यावी ह्यासाठी त्याला शुभेच्छा ! बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट येत असतात त्यामुळं क्रिसमसच्या आनंदी पर्वात हा चित्रपट बघायला तशी काही हरकत नाही फक्त सुरुवातीचा वैधानिक इशारा लक्षात घ्यावा !

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

गाढवांच्या व्यथा !


भारतीय समाजात, साहित्यात गाढवांना सदैव उपेक्षेचेच स्थान मिळालं आहे. ह्यामागे एखाद्या गोष्टीच्या रंगरूपावरुन त्याविषयी पूर्वग्रह बनविण्याच्या आपल्या समाजाच्या मानसिकतेचा मोठा वाटा असावा असं मानायला वाव आहे. खरंतर गाढव हा किती कष्टाळू प्राणी आहे. भारतीय ग्रामीण जीवनात ओझी वाहून नेण्यासाठी गाढवांनी पिढ्यानपिढ्या मोलाचं योगदान दिलं आहे. इतकंच काय तर सीमारेषेवरील अत्यंत प्रतिकूल हवामानात सुद्धा ओझी वाहून नेण्यासाठी गाढवांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. गाढवांच्या केवळ रुपावरुन आपण त्यांना हिणवत नाही तर त्यांची बुद्धी सुद्धा सुमार असावी असा विनाकारण ग्रह आपण करुन घेतला आहे. ओझं कमी व्हावं ह्यासाठी मिठाचं पोतं घेऊन जाणारा गाढव नदीत बसतो आणि मीठ विरघळून त्याचं ओझं कमी होतं. त्याला अद्दल घडावी म्हणून मग मालक त्याच्या पाठीवरील पोत्यात दुसऱ्या दिवशी पाला भरतो; मग पाण्यानं त्याचं ओझं वाढून गाढवाचे कष्ट अधिकच वाढतात अशी गोष्ट आपण लहानपणी वाचली / ऐकली असेल. गाढवांच्या बाजुनं विचार केला तर कामचुकारपणा आणि मूर्खपणा ही दोन वैशिष्टयं कोणत्याही सबळ पुराव्याअभावी ह्या गोष्टीत त्यांना बहाल केलेली दिसतात. 

एखाद्या गोष्टीच्या रंगरूपावरुन त्याविषयी पूर्वग्रह बनविण्याची मानसिकता ह्या सत्याकडं आपण पाहुयात. मोराचा आपण इतका उदोउदो करतो ते बहुदा त्याच्या सुंदर अशा मोरपिसांमुळं आणि प्रेक्षणीय नृत्यामुळं ! प्रत्यक्ष मोर काय कष्ट करतो? काही नाही ! मग मोराला आपल्या साहित्यात मानाचं स्थान आणि गाढवांना दुजाभाव हा विरोधाभास वर्षोनुवर्षे आपण का जोपासला ? कारण आपल्याला जे सुखावतं तेच पाहायला, ऐकायला, वाचायला आवडतं ! आपल्या समाजात कष्टकरी माणसांना, प्राण्यांना प्रतिष्ठाच नाही.  आपल्या घरांत सुद्धा आपण अगदी प्रेक्षणीय वस्तू दर्शनीय भागात ठेवतो. परिसरात पुर्वी रानटी झाडं मुक्त जीवन जगायची. आता फक्त फेसबुकात लाईक मिळवून देणारी झाडं आपण ठेवतोय की काय असा संशय येण्याजोगी परिस्थिती आहे. 

सकाळसकाळी इतका भावनिक स्फोट होण्याचं कारण म्हणजे आजच्या लोकसत्तेत आलेली "चिनी कुरापतींमुळं भारतात गाढवटंचाई" ही बातमी. बिहार वगळता भारतातील बहुतांश राज्यांतील गाढवांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे असा त्या बातमीचा सारांश! प्रामुख्यानं वैद्यकीय कारणास्तव ही तस्करी होत असली हा मला समजलेला मुद्दा असला तरी "ह्यामागे भारतातील लोकशाहीला नख लावण्याच्या दीर्घकालीन कटाचा भाग म्हणून चीन आपली गाढवं पळवून नेत असावा असा काही जणांचा वहीम आहे" ह्या विधानानं माझी आठ तास पूर्ण झालेली झोप सुद्धा उडाली आहे. भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वात मोलाचे योगदान बजावणाऱ्या हे गाढवांनो, तुम्हांला भारतीय आणि खास करुन मराठी समाजानं जी दुय्यम वागणूक दिली आहे त्याबद्दल मी तुमची माफी मागू इच्छितो. 

परिस्थिती वाटते तितकी निराशाजनक नाही हे गेल्या काही दिवसांत मला जाणवत चाललं आहे. दुनियेपासून हटके करण्याची नवीन पिढीला खूप हौस आहे. जुन्या चांगल्या गोष्टी जितक्या दुर्मिळ होत जाणार तसतसा त्या जुन्या गोष्टींचा दुर्मिळपणा, heritage quotient झपाट्यानं उंचावणार! त्यामुळं काही वर्षात नवीन पिढी धोतर, पगडी वगैरे घालून CBSE, ICSE International शाळेत जाईल असा जबरदस्त आशावाद मी बाळगून आहे. रस्त्याच्या कडेला, घराभोवती रानटी झाडे जाणीवपूर्वक लावली जातील, त्यांची निगराणी केली जाईल! आजच्या लोकसत्तेतील लेखांमुळे गाढवांना भारतीय समाजातील, साहित्यातील योग्य ते स्थान लवकरच प्राप्त होईल.  नवीन पिढी गाढवाची पाळीव प्राणी म्हणून निवड करतील आणि एखादा टीनएजर आपल्या पाळीव गाढवासोबत फोटो टाकून शेकडो लाईक मिळवून जाईल अशी आशा मी करत आहे!

लेखाला काहीशी विनोदाची छटा असली  (हा माझा गैरसमज आणि फुकाचा आत्मविश्वास !) तरी आपल्या समाजाच्या  मानसिकेतचा मुद्दा गाढवांच्या मुद्द्याच्या रुपाने पुढे आणणाऱ्या लोकसत्तेचे आभार ! बाकी ते गाढव आणि भारतीय लोकशाहीचा संबंध आपल्यास माहिती असल्यास नक्की कळवा !

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...