हा चित्रपट पाहण्याआधी एक वैधानिक इशारा मी आपणास देऊ इच्छितो. आपण जर पेशानं डॉक्टर असाल किंवा आपण सध्या वैद्यकीय उपचार घेत असाल तर हा चित्रपट पाहण्याचं धारिष्ट्य करु नये. एक डॉक्टर म्हणून तुमचा स्वतःचा आत्मविश्वास किंवा एक पेशंट म्हणून तुमच्या डॉक्टरवरील तुमचा विश्वास तुम्ही मोठ्या प्रमाणात गमावू शकता!
मला वारंवार भयावह स्वप्नं पडतात. ह्या स्वप्नांवर आपलं नियंत्रण नसलं तरी मेंदू कुठंतरी त्यावर लक्ष ठेऊन असतो. म्हणजे मोकळ्या पठारावर वाघ माझा पाठलाग करत असेल तर मेंदू स्वप्न सुरु ठेवून देतो. पण समजा पळता पळता समोर विहीर आली तर मेंदू मला जाग आणतो. हा चित्रपट म्हणजे मोकळ्या पठारावर वाघानं पाठलाग सुरु ठेवण्यासारखा होता. भयावह होता पण इतकाही नाही की चित्रपट पूर्ण बंद करावा.
चित्रपट पाहिला तो डिस्नी हॉटस्टार सबस्क्रिप्शनवर ! गेल्या महिनाभर जिओचे इंटरनेट आणि केबल घेतलं आहे. इंटरनेटचा स्पीड खूप जलद आणि केबलवरील विविध पर्यायांची उपलब्धता मुबलक आहे. पण केबल वापरण्याचं एक वेगळं तंत्र आहे. ते आत्मसात करता यायला हवं. कोणत्याही चॅनेलला नंबर नाही. ते चॅनेल ज्या प्रकारात मोडतं त्या प्रकारात जाऊन ते निवडायचं किंवा त्या चॅनेलचे नाव बोलून सांगायचं. हे म्हणजे घरी भाजीत मीठ जास्त पडलंय हे सांगायचं असेल तर आधी आहार - प्रतिक्रिया - भोजन - भाजी क्रमांक १ - मीठ जास्त अशा प्रकारे प्रतिक्रिया देणं झालं. त्यानंतर चपात्या सुरेख झाल्या आहेत हे सांगायचं असेल तर दोन वेळा back दाबून आहार - प्रतिक्रिया - भोजन पर्यंत पोहोचून चपात्या हा पर्याय निवडायचा आणि मग सुरेख म्हणायचं असं झालं.
असो ! डिस्नी हॉटस्टारवर चित्रपट पाहिल्याने केवळ वेळ वाया गेल्याचं दुःख आणि दोन मराठी मालिकांपासून मुक्तता मिळाल्याचा आनंद ! आपण एखादा चित्रपट पाहताना सारासार विचाराची पातळी किती टक्क्यांवर ठेवली असा मी चित्रपट संपल्यावर विचार करतो. ह्या चित्रपटानंतर ही पातळी १२ टक्के होती की साडेबारा ह्यावर माझा भयंकर गोंधळ झाला आहे. तरीही इथं काही शंका उपस्थित करणे हे मी माझे कर्तव्य समजतो.
१) मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात केवळ एकाच मुलाला (?) सपत्निक राहण्याची परवानगी का देण्यात आली. वैद्यकीय शिक्षणाचं खास करुन पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सर्वच डॉक्टरांना ही सवलत देण्यात यावी अशी मागणी जोर धरण्याची शक्यता आता नाकारता येत नाही!
२) संपूर्ण चित्रपटात अक्षयकुमार प्रचंड थकलेला दिसतोय. हा इतका थकलेला का दिसतोय हा प्रश्न पत्नीनं मला विचारला. मग काही वेळानं तो बाळसं धरलेल्या साराला उचलून धरतो असा प्रसंग आला. बहुदा ह्यामुळंच त्याला पाठदुखी झाली असावी आणि तो दमलेला दिसत असावा असा निष्कर्ष आम्ही काढला. आणि पुढील सर्व शक्यतांच्या चर्चेपासून मुक्तता झाली म्हणून मी सुटकेचा निःश्वास टाकला.
३) चित्रपटाच्या सुरुवातीला सारा स्टेशनवर काचेचा प्रचंड चुराडा करते. पुढे धनुष आपल्या डोक्यावर मद्याने भरलेल्या अनेक बाटल्या फोडून घेतो. ह्यापुढं ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणात मुक्या प्राण्यांचा छळ करण्यात आलेला नाही ह्यासोबत उगाचच काचेचा चुराडा करण्यात आलेला नाही हे कलम टाकण्यात यावं ही मागणी मी ह्या पोस्टद्वारे करत आहे. त्याचबरोबर त्या बाटल्यांमध्ये केवळ पाणी भरलेलं होतं असा खुलासा सुद्धा माझ्या मित्रांच्या भावनांचा विचार करुन देण्यात यावा ही मागणी सुद्धा मी करतोय !
४) जिथं आपल्याला खरंखुरं लग्न करायचं आहे तिथं खोट्या लग्नातील बायको नेणं हे का पटावं? आणि केवळ तिला एक वाक्य आपला होणारा सासरा बोलला म्हणून समस्त स्त्री वर्गाला आदरानं पाहण्याचा साक्षात्कार व्हावा ! हे सारं पाहून मी धन्य झालो. पण त्याचबरोबर जिला इतके दिवस लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि जिच्याशी प्रत्यक्ष लग्न करायला आला होतास त्या मुलीचं पुढे काय ? असा प्रश्न विचारावासा वाटतो.
५) दिल्लीहून भरपावसात विजेच्या खांबावर चढून दक्षिण भारतात landline वर फोन लावण्याची वेळ येणं हे दृश्य पाहून हा चित्रपट सत्तर / ऐशीच्या काळातील असावा असा निर्माण झालेला समज पुढे येणाऱ्या करोनाच्या संदर्भाने दूर झाला!
आता चित्रपटाच्या कथानकाकडं वळावं असं म्हणतोय ! पण धारिष्ट्यच होत नाही! कदाचित माझ्या बाजूला सध्या सांता वावरत असावा आणि त्यानेच ही पोस्ट माझ्याकडून लिहून घेतली असावी ! असंच काहीतरी चित्रपटात होत राहतं. साराचा चांगला म्हणावा असा अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजु ! कोलावेरी गाण्याच्या पलीकडं धनुषला स्वतःची काहीतरी वेगळी प्रतिमा निर्माण करता यावी ह्यासाठी त्याला शुभेच्छा ! बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट येत असतात त्यामुळं क्रिसमसच्या आनंदी पर्वात हा चित्रपट बघायला तशी काही हरकत नाही फक्त सुरुवातीचा वैधानिक इशारा लक्षात घ्यावा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा