भारतीय समाजात, साहित्यात गाढवांना सदैव उपेक्षेचेच स्थान मिळालं आहे. ह्यामागे एखाद्या गोष्टीच्या रंगरूपावरुन त्याविषयी पूर्वग्रह बनविण्याच्या आपल्या समाजाच्या मानसिकतेचा मोठा वाटा असावा असं मानायला वाव आहे. खरंतर गाढव हा किती कष्टाळू प्राणी आहे. भारतीय ग्रामीण जीवनात ओझी वाहून नेण्यासाठी गाढवांनी पिढ्यानपिढ्या मोलाचं योगदान दिलं आहे. इतकंच काय तर सीमारेषेवरील अत्यंत प्रतिकूल हवामानात सुद्धा ओझी वाहून नेण्यासाठी गाढवांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. गाढवांच्या केवळ रुपावरुन आपण त्यांना हिणवत नाही तर त्यांची बुद्धी सुद्धा सुमार असावी असा विनाकारण ग्रह आपण करुन घेतला आहे. ओझं कमी व्हावं ह्यासाठी मिठाचं पोतं घेऊन जाणारा गाढव नदीत बसतो आणि मीठ विरघळून त्याचं ओझं कमी होतं. त्याला अद्दल घडावी म्हणून मग मालक त्याच्या पाठीवरील पोत्यात दुसऱ्या दिवशी पाला भरतो; मग पाण्यानं त्याचं ओझं वाढून गाढवाचे कष्ट अधिकच वाढतात अशी गोष्ट आपण लहानपणी वाचली / ऐकली असेल. गाढवांच्या बाजुनं विचार केला तर कामचुकारपणा आणि मूर्खपणा ही दोन वैशिष्टयं कोणत्याही सबळ पुराव्याअभावी ह्या गोष्टीत त्यांना बहाल केलेली दिसतात.
एखाद्या गोष्टीच्या रंगरूपावरुन त्याविषयी पूर्वग्रह बनविण्याची मानसिकता ह्या सत्याकडं आपण पाहुयात. मोराचा आपण इतका उदोउदो करतो ते बहुदा त्याच्या सुंदर अशा मोरपिसांमुळं आणि प्रेक्षणीय नृत्यामुळं ! प्रत्यक्ष मोर काय कष्ट करतो? काही नाही ! मग मोराला आपल्या साहित्यात मानाचं स्थान आणि गाढवांना दुजाभाव हा विरोधाभास वर्षोनुवर्षे आपण का जोपासला ? कारण आपल्याला जे सुखावतं तेच पाहायला, ऐकायला, वाचायला आवडतं ! आपल्या समाजात कष्टकरी माणसांना, प्राण्यांना प्रतिष्ठाच नाही. आपल्या घरांत सुद्धा आपण अगदी प्रेक्षणीय वस्तू दर्शनीय भागात ठेवतो. परिसरात पुर्वी रानटी झाडं मुक्त जीवन जगायची. आता फक्त फेसबुकात लाईक मिळवून देणारी झाडं आपण ठेवतोय की काय असा संशय येण्याजोगी परिस्थिती आहे.
सकाळसकाळी इतका भावनिक स्फोट होण्याचं कारण म्हणजे आजच्या लोकसत्तेत आलेली "चिनी कुरापतींमुळं भारतात गाढवटंचाई" ही बातमी. बिहार वगळता भारतातील बहुतांश राज्यांतील गाढवांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे असा त्या बातमीचा सारांश! प्रामुख्यानं वैद्यकीय कारणास्तव ही तस्करी होत असली हा मला समजलेला मुद्दा असला तरी "ह्यामागे भारतातील लोकशाहीला नख लावण्याच्या दीर्घकालीन कटाचा भाग म्हणून चीन आपली गाढवं पळवून नेत असावा असा काही जणांचा वहीम आहे" ह्या विधानानं माझी आठ तास पूर्ण झालेली झोप सुद्धा उडाली आहे. भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वात मोलाचे योगदान बजावणाऱ्या हे गाढवांनो, तुम्हांला भारतीय आणि खास करुन मराठी समाजानं जी दुय्यम वागणूक दिली आहे त्याबद्दल मी तुमची माफी मागू इच्छितो.
परिस्थिती वाटते तितकी निराशाजनक नाही हे गेल्या काही दिवसांत मला जाणवत चाललं आहे. दुनियेपासून हटके करण्याची नवीन पिढीला खूप हौस आहे. जुन्या चांगल्या गोष्टी जितक्या दुर्मिळ होत जाणार तसतसा त्या जुन्या गोष्टींचा दुर्मिळपणा, heritage quotient झपाट्यानं उंचावणार! त्यामुळं काही वर्षात नवीन पिढी धोतर, पगडी वगैरे घालून CBSE, ICSE International शाळेत जाईल असा जबरदस्त आशावाद मी बाळगून आहे. रस्त्याच्या कडेला, घराभोवती रानटी झाडे जाणीवपूर्वक लावली जातील, त्यांची निगराणी केली जाईल! आजच्या लोकसत्तेतील लेखांमुळे गाढवांना भारतीय समाजातील, साहित्यातील योग्य ते स्थान लवकरच प्राप्त होईल. नवीन पिढी गाढवाची पाळीव प्राणी म्हणून निवड करतील आणि एखादा टीनएजर आपल्या पाळीव गाढवासोबत फोटो टाकून शेकडो लाईक मिळवून जाईल अशी आशा मी करत आहे!
लेखाला काहीशी विनोदाची छटा असली (हा माझा गैरसमज आणि फुकाचा आत्मविश्वास !) तरी आपल्या समाजाच्या मानसिकेतचा मुद्दा गाढवांच्या मुद्द्याच्या रुपाने पुढे आणणाऱ्या लोकसत्तेचे आभार ! बाकी ते गाढव आणि भारतीय लोकशाहीचा संबंध आपल्यास माहिती असल्यास नक्की कळवा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा