मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

चिंतन Times !



एका खरोखरीच्या तणावपुर्व वर्षाची अखेर आता दृष्टीक्षेपात आली आहे असं वाटतंय. वाटतंय म्हणायचं कारण की असे काही प्रश्न उद्भवत आहेत की सुट्टीवर गेलेल्या सहकाऱ्यांना फोन करुन कॉलवर येण्याची विनंती करावी लागत आहे. एक व्यवस्थापक म्हणून रविवार सकाळी असे कॉल करणे हे खूपच नकोसे वाटते. 

वर्ष तणावात का गेलं? सद्यस्थितीत काही उद्योगधंद्यांवर परिणाम झाला, काहींच्या नोकऱ्या गेल्या. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे झालेलं आर्थिक नुकसान किंवा एका विशिष्ट वयानंतर गमावलेली नोकरी ह्यातून पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी ह्या प्रसंगाला सामोरी जाणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खूप कणखर असावी लागते.  आर्थिकदृष्ट्या सर्व काही आलबेल असले तरीही केवळ नित्यनेमाच्या गोष्टी जसे की समारंभ, मित्रमंडळींशी बोलणं - चालणं ह्या बाबतीत बंधनं आल्यामुळं मनात साचुन राहिलेल्या भावभावनांचा वेळीच निचरा झाला नाही. त्यामुळं सुद्धा लोकांच्या मनःस्वास्थ्यावर परिणाम झाला. सर्वसाधारण परिस्थितीत समाजाचं मानसिक स्वास्थ व्यवस्थित असताना ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक कणखरता बरेचजण दाखवायचे देखील ! पण आता मात्र माणसं काहीशी गोंधळलेल्या मनःस्थितीत वावरताना आढळतात. ह्या बाबत लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी! 

१. आपल्याला सल्ल्याची, दोन चांगल्या आपुलकीच्या शब्दांची गरज आहे हे बऱ्याच जणांना समजत नसावं किंवा समजलं तरी मान्य करता येण्याची तयारी नसावी. 

२. आपली खरी समस्या काय आहे हे बहुतेक जणांना माहिती असते. परंतु त्या समस्येचं निराकरण करु शकेल अशा माणसांसोबत गाठ पडेपर्यंत ही समस्याग्रस्त माणसे काहीशा वैफल्यग्रस्त परिस्थितीत वावरत राहतात. हे वैफल्य, हा संताप समोर येणाऱ्या माणसावर दिसेल त्या कारणाच्या निमित्तानं बाहेर काढण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. 

३. भूतकाळात आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय ह्या समजुतीखाली संपूर्ण आयुष्य व्यतित करण्याची काही जणांची प्रवृत्तीअसू शकते. ह्या काळात विचार करायला वेळ मिळाल्यानं ह्या अप्रिय आठवणी काही जास्तच प्रमाणात उफाळून आल्या आहेत. त्यामुळं फार पूर्वीच्या प्रसंगांचा दाखला देऊन काही व्यक्ती उगाचच तणावाचे प्रसंग निर्माण करताना आढळतात. "Move on with the life" ह्या उक्तीची कधी नव्हे ती आज खूप आवश्यकता आहे. 

४. इथं एक महत्वाचा मुद्दा ! आयुष्यानं आपल्याला जशा समस्या दिल्या आहेत त्याचप्रमाणे काही बाबतीत भरभरुन सुद्धा दिलं आहे. त्यामुळं आपल्या पदरात दैवाने टाकलेल्या काही मोजक्या प्रतिकूल गोष्टींमुळं सदैव वैफल्यग्रस्त राहावं हे योग्य ठरणार नाही.  The Glass is half full as well हे ध्यानात घेऊन जमेल तसं आशावादी राहता यायला हवं. 

५.  माणसं आपल्यासोबत अनाकलनीय पद्धतीनं वागू शकतात. त्यामागचं मूळ कारण कदाचित त्यांच्याशी सखोल बोलल्याशिवाय आपल्याला समजणार देखील नाही. पण हल्ली एकदा का विवादाची परिस्थिती उद्भवली की संवादाद्वारे ही परिस्थिती निवळण्याची तयारी दाखवणारे लोक कमीच ! मुद्दा क्रमांक तीन मध्ये उल्लेखल्याप्रमाणं आयुष्यानं तुमच्या ओंजळीत तर काही चांगलं टाकलंय असा तुमचा विश्वास असेल तर त्याची परतफेड कोणाच्या तरी ओंजळीत जमेल तितकं चांगलं टाकून करा ! काही लोक अनाकलनीय पद्धतीनं तुमच्याशी वागली तरी त्यांना अजून काही संधी द्या, कदाचित त्यांच्या मूळ समस्यांचं निराकरण झालं की तीच माणसं तुमच्याशी अगदी नीट वागू लागतील. 

व्यवसायाला अनुकूल अशी वर्षाच्या शेवटच्या दोन आठवड्यात घेतलेली ही सुट्टी! ह्या  सुट्टीचा आजचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस ! ह्या सुट्टीत जमेल तसे लिखाण करावं असं म्हणतोय ! बघुयात !!

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

चाकोरीबाहेर




चाकोरीबाहेर जगण्याची इच्छा सद्यकालीन बहुतांश जनांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. किंबहुना समाजातील सद्यकाळाला अनुसरुन सर्वसाधारण जगणं म्हणजे काय हे समजावून सांगणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था ह्यांचा झपाट्यानं ऱ्हास होत आहे. ह्या व्यक्ती, संस्था ह्यांच्या अनुपस्थितीमुळं आपल्या वागण्यावरील अंकुश नाहीसा होत आहे. त्यामुळं जाणता अजाणता बहुतांश लोक त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी जगलेल्या जीवनापेक्षा वेगळं असं जीवन जगत आहेत.  

चाकोरीबाहेरील जगण्याची एक किंमत चुकवावी लागते ह्या गोष्टीचा असं जगणं जगु इच्छिणाऱ्या व्यक्तींना सुरुवातीला अंदाज येत नाही. ही किंमत चुकविणे ही काही अगदी अवघड गोष्ट आहे असं नव्हे पण ते सर्वांनाच जमत नाही. त्यासाठी तुमच्याकडं खरोखर काही कौशल्य असायला हवं ! नाहीतर मोठ्या उत्साहानं घेतली भरारी, गगनी जाता गोंधळली स्वारी अशी अवस्था होण्याची दाट शक्यता असते. 

उगवणारा दिवस कसा असेल ह्याविषयी खात्री नसणे,  आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे ह्याविषयी विचारांची सुस्पष्टता नसणे, जवळच्या नात्यांना टिकविण्यासाठी जो वेळ खर्च करावा लागतो तो नसणे, गैरसमजांना दूर ठेवण्यासाठी जे भावनिक बंध निर्माण करावे लागतात त्यासाठी  मनाची असणारी आवश्यक प्रगल्भता नसणे हे सारे घटक चाकोरीबाहेर जगण्याच्या निर्णयाच्या सोबत आपल्याला स्वीकारावे लागतात. 

चाकोरीबाहेरील जगणे दोन पातळीवरील आहे.पहिली पातळी आहे ती एक समाज म्हणून आपण मागच्या पिढीच्या तुलनेनं चाकोरीबाहेरील जगणे जगत आहोत; पण ह्यात आपल्या सर्वांचा काही प्रमाणात नाईलाज आहे. आता हे जे काही बदल झाले त्यामुळं आपली जी ठोस नियमांत न बसणारी जीवनशैली निर्माण झाली त्याला पुढील पिढीसाठी चाकोरीतलं जगणं असं म्हणण्याची आपली इच्छा होऊ शकते. 

चाकोरीबाहेरील जगण्याची दुसरी पातळी म्हणजे वरील परिच्छेदातील एक समाज म्हणून निर्माण झालेल्या चाकोरीबाहेरील जगण्याहुन वेगळी अशी काही व्यक्तींनी निर्माण केलेली स्वतःची अशी जीवनशैली ! इथं मी चाकोरीपलीकडील जगणं म्हणजे काय ह्याचं एकही उदाहरण न दिल्यानं काहीशी अस्पष्टता आपल्या मनात राहील. पण हे जाणीवपूर्वक आहे. चाकोरीबाहेरील जगणं म्हणजे काय ह्याचा अर्थ व्यक्तीनुसार बदलतो आणि म्हणूनच मी मला अभिप्रेत असलेला अर्थ इथं नमूद करुन ह्या पोस्टद्वारे तुमच्यामनात येणाऱ्या विचारांना संकुचित करू इच्छित नाही ! 

चाकोरीत जगणाऱ्या लोकांना आयुष्याच्या उत्तरार्धात मनात काहीशी खंत निर्माण होऊ शकते. देवाने दिलेलं एकच आयुष्य, अगदी सर्वसाधारणपणे जगलो, विशेष काही वेगळं केलं नाही ही ती खंत ! स्वकेंद्रित जीवन जगावं ह्या विचारसरणीचा झपाट्यानं प्रसार होत असल्यानं त्याग हे ज्याचं अधिष्ठान आहे अशा चाकोरीतील जगणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं कमी होत जाणार आहे. आणि आपल्यासमोर येणार आहे तो स्थिर मनाचा अभाव असणाऱ्या लोकांची बहुसंख्यता असणारा एक आर्थिकदृष्टया सबळ समाज ! 

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

जन्मदिन चिंतन

 


आपण  सर्वजण आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यानंतर एका अविरत जगरहाटीचा अविभाज्य भाग बनलेलोअसतो. जगाच्या शर्यतीत राहून आपण आपली एक वेगळी अशी शर्यत धावत असतो. जत्रेतील गोल फिरणारे चक्र असो किंवा हल्लीच्या मनोरंजन पार्क मधील राइड्स असोत; एका संथ सुरुवातीनंतर  तुफान वेग पकडला जातो. त्यावेळी फक्त या राइड्सचा एक असहाय्य प्रवासी बनणं आपल्या हातात असते. त्याचप्रमाणे हल्लीच्या जीवन शर्यतीत बहुतांश प्रमाणात बाह्यघटकांच्या प्रभावाखाली जीवन जगणे हा एकमेव पर्याय आपल्या समोर उभा असतो. 

खरं बघायला गेलं तर या राइड्समध्ये सहभागी होणे हे आपल्यावर बंधनकारक नसते. आपणच स्वखुषीने हा निर्णय घेतलेला असतो. बऱ्याच वेळा आपल्याला ज्याचा अर्थ आणि परिणाम पूर्णपणे समजले नाहीत अशा प्रगतीच्या ध्येयामागे लागून आपण राइड्समध्ये सहभागी झालेलो असतो. काही काळातच आपल्याला समजून चुकलेलं असतं की हे जे काही प्रगतीचे ध्येय आहे ते स्थिर नसून मृगजळाप्रमाणे सतत पुढं पुढं सरकणारे आहे. ध्येयाची जी पातळी गाठण्यासाठी आपण शर्यतीत भाग घेतलेला असतो ती पातळी जरी गाठली तरी त्यानंतरची पातळी तुम्हांला खुणावत असते. एका पातळीवर शांततेने बसून राहणं हे ह्या शर्यतीतील नियमांचं उल्लंघन करणारं असतं. विशिष्ट काळात ही जागा मागून येणाऱ्यांसाठी मोकळी करुन द्यायची असते. 

अशा काहीशा निर्दयी वाटू पाहणाऱ्या शर्यतीतील जीवनक्रमात काही क्षण असे येतात जे आपणास अंतर्मुख करतात. आपल्या शर्यतीपलीकडील विश्वाच्या अस्तित्वाची जाणीव करुन देतात. आणि शर्यतीत भाग घेण्याच्या आपल्या निर्णयाचे पुनर्मूल्यमापन करण्याची संधी उपलब्ध करुन देतात. सणवार, वाढदिवस हे ते काही क्षण! ह्या शर्यतीत भाग घेण्याच्या फायद्यासोबत तिची किंमत सुद्धा आपणास चुकवावी लागत असते. ही किंमत असते कधी आपल्या तब्येतीकडे कराव्या लागणाऱ्या हेळसांडीची, कधी जवळच्या माणसांसोबत व्यतीत न करता आलेल्या अमुल्य क्षणांची तर कधी नातेसंबंधातील कदापि भरु न येऊ शकणाऱ्या भेगांची ! 

आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आपलीच भूमिका सदैव बरोबर हा अट्टहास केव्हाचा मागे पडलेला असतो. त्यामुळं योग्य लोकांसमोर, योग्य प्रसंगी पडती बाजू घेण्याची आपली तयारी असते. इथं योग्य हा घटक महत्वाचा ! आपल्यासारखी ज्यांची मनोभूमिका आहे, ज्यांच्यासोबत आपले विचार जुळतात अशा लोकांसमोर आपण आपल्या आयुष्याचं पुस्तक उघडं करण्यासाठी तयार असतो. इथंही आपली निवड कधीतरी चुकतेसुद्धा. परंतु आपल्या निर्णयांच्या भल्याबुऱ्या परिणामांना खंत न बाळगता सामोरं जाण्याची, जीवनगाणे गात राहण्याची स्थिती आपण मिळवलेली असते. ज्या लोकांसोबत आपलं कधीही जमू शकणार नाही अशा लोकांशी वाद घालण्यापेक्षा त्यांच्यापासून दूर राहणं हा पर्याय बऱ्याच वेळा स्वीकारण्याची आपली मानसिकता असते ! 

ही मनोभूमिका बाळगण्यासाठी आवश्यक ते मनोबल देणारे आणि आपली अगदी अटीतटीची शर्यत लढतांना अदृश्यरूपात सदैव आपल्यासोबत असणाऱ्या नातेवाईक,  मित्रमंडळी ह्यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! आपल्या शर्यतीत आपण एकटेच नसुन ही सर्व मंडळी केवळ एका हाकेच्या अंतरावर आहेत ही भावनाच खूप सुखावह असते! 

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

ते दोन तास


ट्रिंग ट्रिंग ! रविवारी सकाळी घरच्या दूरध्वनीची बेल वाजली तसा मी कुतूहल भावनेनं व्यापून 
दूरध्वनीकडे गेलो. बरेच दिवसांत ही बेल वाजली नसल्यानं हा दूरध्वनी घरात आहे ह्याचाच मला विसर पडला होता. 

मी  - "हॅलो" 

समोरचा माणूस - "हॅलो " (अति  उत्साहानं )

आवाज ओळखीचा वाटल्यानं मी स्मरणशक्तीला ताण दिला. 

मी  - "अति गंभीर ?"

समोरचा माणूस - "काय ?" (काहीशा रागानं )

मी - "नाही म्हणजे आपण गेल्याच आठवड्यात बोललो ना !" ( सारवासारव करण्याचा प्रयत्न करत )

समोरचा माणूस -  "हो  तोच तो मी ! कसे  आहात  पंखवाले !"

मी  - "ठीक आहे ! (काहीशा रागानं )

समोरचा माणूस -  "तर थेट मुद्दयाला हात घालतोय मी ! तुमच्या मागच्या आठवड्यातील  पंखांच्या कल्पनाविस्तारावर आम्ही  म्हणजे आमची कंपनी खूप खुश झाली आहे . त्यामुळं आज आम्ही तुमच्याकडं नवीन प्रस्ताव घेऊन आलो आहे !"

मी  - "असं होय "

थोड्याच वेळात मी अतिगंभीर आणि त्याची एक स्त्री सहकारी ह्यांच्या सोबत व्हिडिओ कॉल वर होतो. 

अतिगंभीर आणि सहकारी - "शुभ प्रभात !"

मी  - अतिगंभीरकडे पाहत "आपलं झालंय सुप्रभात!"  त्याच्या सहकारीला  "सुप्रभात !"

सहकारी  - "आजचा  आपला  विषय आहे  - ते दोन तास !"

मी - " लहानपणी शाळेत असताना रेल्वे प्लॅटफॉर्मवर अर्धा तास ह्या विषयावर निबंध लिहिण्याची सवय वगळता मला असल्या विषयावर बोलायची अथवा लिहायची सवय नाही ! आणि  मला अभ्यासानं व्यापून टाकल्यानं क्रिकेटर बनता आलं नाही  अन्यथा वकार आणि अक्रमसमोर दोन तास  असं मी नक्कीच लिहू शकलो असतो "

अतिगंभीर - " म्हणजे त्यांच्यासमोर दोन तास टिकला असता असं म्हणायचं आहे का तुम्हांला ? चांगला आत्मविश्वास आहे तुमचा "  

सहकारी  - "आपण जरा मुद्द्याकडे वळूयात का ? तर विषय असा आहे की  एके दिवशी सकाळी अचानक तुम्हांला  ह्या पृथ्वीचा पुढील दोन तासांनंतर  सर्वनाश होणार आहे असं सांगण्यात आलं , तर तुम्ही ते दोन तास कसे  घालवाल , त्यात काय काय कराल? तुम्हांला विचार करण्यासाठी म्हणून आम्ही काही वेळ देत आहोत ! आपण सायंकाळी चार वाजता भेटूयात !"

सायंकाळी चार वाजता - 

अतिगंभीर आणि सहकारी - "शुभ दुपार , संध्याकाळ !"

मी (त्रासिक मुद्रेने ) - "ठीक आहे, ठीक आहे

अतिगंभीर - "तुम्ही  इतके  त्रस्त का दिसत  आहात ? विचार करुन त्रास झाला का?"

मी (वैतागून ) -  "अहो त्या विचारांपेक्षा झोप न झाल्यानं त्रास झालाय !" 

सहकारी  - "आपल्याला झालेल्या तसदीबद्दल आम्ही खरोखर तुमची माफी मागू  इच्छितो . आपण हे थोडक्यात आटपुयात ! तर तुम्हांला  नक्की काय वाटतंय !"

मी (उत्साहानं पुढ्यातील कागद वाचत ) - 

१. "आमच्या  इथं नाक्यावर एक मस्त केकचे नवीन दुकान निघालं  आहे . काय एकाहून एक मस्त  केक ठेवलेले असतात डिस्प्ले ला ! पण खूप महागडा आहे तो ! ही बातमी जाहीर झाली रे झाली की मी त्याच्याकडे धावत जाणार आणि सांगणार  - अरे मित्रा , आता काय सर्वच नाश पावणार आहे ! तर आपण दोघे मिळून हे सर्व केक खाउयात ! "

सहकारीच्या चेहऱ्यावर काय हा बालिश विचार आहे ह्यांचा हे भाव स्पष्ट दिसत होते.  तुम्हांला दुसरा कोणी मिळाला नाही का ह्या प्रकारच्या भावानं तिनं अतिगंभीरकडे पाहिलं. त्यामुळं विचलित न होता मी माझे वाचन पुढे सुरु ठेवले. 

२."आयुष्यात मी काही जणांशी चुकीचं वागलो,  काहींना काही सांगायचं राहून गेलं. ते ह्या दोन तासांत सांगण्याचा प्रयत्न  करीन "

सहकारी  (तिचे डोळे चकाकले होते) - "मग हे आत्ताच का नाही सांगायचं ?"

मी - "त्यानंतरचे परिणाम दोन तासांपलीकडं पेलण्याची कदाचित  ताकत माझ्यात नाही म्हणून !" 

सहकारी - "यादी तयार आहे ?"

मी - "नाही, त्यावेळेला जे आठवणार त्यांनाच "

३. "पुढे अब्जावधी वर्षानंतर पृथ्वीवर अथवा ह्या विश्वात नवीन जीवसृष्टी येईल. त्यांना संदर्भ म्हणून शेवटच्या दोन तासांत पृथ्वीवरील सोशल मीडिया, टीव्हीवरील बातम्यांच्या वाहिन्या ह्यावर कसा धुमाकूळ घातला गेला  ह्याविषयी माझ्या क्षमतेनुसार नोंद ठेवीन ! 

अतिगंभीर - "विचारात घेण्यासारखी बाब आहे"

४. "जगातील महत्वाच्या माणसांना उद्देशून माझ्या फेसबुक वॉलवर संदेश लिहीन"

अतिगंभीर - "म्हणजे चीनचे अध्यक्ष माहिती आहेत, पण अजून कोणाला ?"

मी (त्याला लूक देत ) - " त्यांच्या व्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प, विराट कोहली "

सहकारी - "अय्या , विराटला काय मेसेज देणार तुम्ही ?"

मी - "म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे पण पाकिस्तानविरुद्ध पांड्याला का घेतला ह्याचा जबाब विचारीन !"

सहकारी (निराशेनं ) - "हम्म "

अतिगंभीर आणि सहकारी - "अजून काही?"

मी - "सध्या तरी इतकेच सुचतंय ! "

अतिगंभीर आणि सहकारी - "आपल्या अमूल्य वेळेबद्दल खूप खूप आभार ! आम्ही निघतो आता"

मी - "आभार कसले त्यात, येत जा असे अधूनमधून वेळ घालवायला. फक्त माझ्यावर एक कृपा करा "

अतिगंभीर आणि सहकारी (उत्साहानं ) - "कोणती ?"

मी - "त्या नाक्यावरील केकवाल्याला ह्यातलं काही सांगू नका !" 

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

मला पंख असते तर !!




"आपली खरेदी नोंदवा"
मी - "पंख!" 
"आपल्याला पंख हवे आहेत की पंखा ?"
मी - "पंख" 
"कृपया दूरध्वनीवर टिकून रहा. ही विशेष खरेदी आहे. मी आपला कॉल विशेष कक्षाकडे पाठवत आहे. आणि व्हिडिओ कॉलच्या तयारीत रहा !"
मी - "ठीक आहे !"

काही वेळातच मी माझ्याहून धीरगंभीर चेहऱ्याच्या माणसासोबत व्हिडिओ कॉलवर होतो. 
अतिगंभीर - "कसे काय आहात आपण आज सकाळी !"
मी - "ह्या प्रश्नाचा आणि माझ्या इच्छित खरेदीचा काही संबंध आहे का ?"
अतिगंभीर - "कदाचित असू शकतो ! ठीक आहे आपण मुख्य चर्चेकडे वळूयात !"
अतिगंभीर - "तुम्हांला मनुष्यदेहात पंख हवे आहेत की पक्षी बनून पंख हवे आहेत?
मी - "पक्षी बनून पंखांचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे का?"
अतिगंभीर - "एखादा खात्रीलायक ज्योतिषी सुचवू तुम्हांला ! पुढील जन्मात पक्षी बनण्यासाठी काय करावं ह्याविषयी तो मार्गदर्शन करेल !"
मी - "मनुष्यदेहात पंख हवे आहेत !"
अतिगंभीर - "किती वजन वाहून नेण्याची क्षमता हवी आहे ?"
मी - "माझे वजन आणि आठवडाभराचा किराणा माल !"
अतिगंभीरच्या चेहऱ्यावर कुठेतरी मंद स्मितहास्य फुलल्याचा मला भास झाला. 
अतिगंभीर - "आपण एक करुयात ! तुम्ही पंख लावल्यानंतर नक्की काय करणार ह्याची थोडी कल्पना द्याल का मला?
मी (फुललेल्या चेहऱ्यानं ) - "नक्की नक्की !"
१) मी हिमालयीन पर्वतरांगांत मुक्त विहार करीन ! तिथल्या गगनभेदी वृक्षांच्या शेंड्यांवर बसून तिथल्या शुद्ध हवेला फुफुसांत भरुन ठेवीन ! तिथल्या स्वर्गीय पर्वतरांगांचं दृश्य नजरेत कायमचं भरुन ठेवीन !
२) कोकणातील, फ्लोरिडातील निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्यांवर विहार करीन ! तिथल्या लाटांसोबत खेळीन. समुद्रातील माश्यांसोबत हितगुज करीन !
३) आफ्रिकेतील घनदाट जंगलातील वाघ सिंहांच्या गुहांमध्ये शिरुन त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून ते नक्की काय करतात ह्याचे निरीक्षण करीन !
४) T20 विश्वचषक सामन्यांच्या मैदानावरुन भ्रमण करीन आणि त्या सामन्यांचा आनंद लुटीन !
५) चीनचे अध्यक्ष गुप्त वाटाघाटी करत असताना त्यांच्या प्रासादाभोवती घिरट्या मारीन आणि संवाद ऐकीन !
अतिगंभीर - "आपण थोडं दमानं घेऊयात ! आपण फक्त भटकणार की नोकरी चालू ठेवणार?"
मी - "वरीलपैकी पहिल्या तीन अनुभवांवर आधारित ब्लॉग, चौथ्या मुद्द्यावर माझ्यासोबत असणारा कॅमेरा आणि पाचव्या मुद्द्यावर भारत सरकारकडून मिळणारा मोबदला विचारात घेता मी कदाचित नोकरी करणार नाही ! 
अतिगंभीर - "तरीही कार, रिक्षात, बेस्ट मध्ये वगैरे बसणार का?
मी - "ते का?"
अतिगंभीर - "उत्तर हो असेल तर पंख फोल्डेबल बनवायला बर ना !" 
मी - "नाही बसणार"
अतिगंभीर - "पंखांचा रंग ?"
मी - "अर्थात निळा!"
अतिगंभीर - "आकाशाशी रंगसंगती म्हणून निळा सांगत असाल तर मी तुमच्या ध्यानात आणू इच्छितो की हिमालयात भोवताली शुभ्र बर्फाच्छादित रांगा असतील, युरोपात सदैव ढग असणार !"
मी - " फक्त निळा !"
अतिगंभीर - "एका उड्डाणात किती महत्तम अंतर पार करणार?"
मी - "मुंबई ते युरोप, युरोप ते अमेरिका आणि मुंबई ते आफ्रिका ह्यातील समुद्रमार्गे जे काही सर्वात जास्त असेल ते!"
अतिगंभीर - "न्यूझीलंडला वगैरे जाणार असाल तर ?"
मी - "ठीक आहे पृथ्वीवरील दोन भूभागामधील समुद्रमार्गे जे काही महत्तम अंतर असेल ते !"
अतिगंभीर - "अलार्म बसवून हवा आहे का?"
मी - "तो कशाला ?"
अतिगंभीर - "इतकं उडणार तर मध्ये झोप वगैरे आली तर! समुद्राच्या पृष्ठभागापासून पंधरा मीटर अंतरावर आलात की जोरजोरात अलार्म वाजणार!
मी - "ठीक आहे ! बसवा "
अतिगंभीर - "वॉटरबॅगसाठी एक कप्पा आणि जेवण्याच्या डब्यासाठी दोन कप्पे पुरेसे होतील?
मी - "उडताना जेवणार कसे?"
अतिगंभीर - "मध्ये छोटी छोटी बेटं लागतील ! तिथं उतरायचं !"
मी - "ठीक आहे ! बसवा "
अतिगंभीर - "अदृश्य होण्याचा स्प्रे वगैरे बसवून हवा आहे का?"
मी - "तो कशाला ?"
अतिगंभीर - "चीनच्या अध्यक्षांवर हेरगिरी करताना, महासागरातील निर्मनुष्य बेटांवर उतरल्यावर तुमच्या सुरक्षेचा विचार करायला नको का?
मी - "ठीक आहे ! ठीक आहे !"
अतिगंभीर - "पंखांची एक जोडी हवी आहे की ...?"
मी - "एकच ! एकच !"
अतिगंभीर - "भ्रमणध्वनी inbuilt हवाय की तुमचाच तो जुना मोबाईल, त्याच्यासाठी कप्पा बनवून देऊ? 
मी - " माझ्या ह्या तुलनेनं नव्या भ्रमणध्वनीसाठी कप्पा बनवा !" 
अतिगंभीर - "ठीक आहे! आम्हांला आवश्यक असणारी सर्व माहिती पुरविल्याबद्दल धन्यवाद !"
मी - "अहो तुम्ही किंमत आणि पंख कधी देणार ह्याची नक्की तारीख नाही सांगितलीत?
अतिगंभीर - "साहेब त्याचं असं आहे ना, तुम्हांला जसा वेळ घालवायची खुमखुमी आली, तशी आम्हांला सुद्धा येऊ शकते !"

एव्हाना तो अतिगंभीर आतापर्यंतचा सर्व गंभीरपणा सोडून खळखळा हसू लागला होता ! 

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

मी आणि माझं नमुनापण !

प्रत्येक मनुष्य हा एक खास नमुना असतो. बऱ्यावाईट गोष्टींचं मिश्रण असलेला हा नमुना दर दिवशी दुनियेसमोर पेश होत असतो. ह्या नमुन्याच्या समाजासमोरील कृती ढोबळमानाने तीन प्रकारात मोडतात. 

१) समाजमान्य कृती - ज्यात समाजानं आखून दिलेल्या चौकटीत राहून ही व्यक्ती वागत असते. 

२) समाजाला आनंद देणारी कृती - समाजाच्या अपेक्षेपलीकडं जाऊन अवतीभोवती आनंदाची पखरण करणारं वागणं. 

३) भुवया उंचावणारी कृती - काहीतरी वेगळंच वागणं ! हा प्रकार बहुतांशी माणसाच्या नमुन्यापणाच्या प्रतिमेला कारणीभूत ठरतो. 

कालांतरानं माणसं आपल्या नमुन्यापणाला सरावतात. नमुनापण सोबतीला घेऊन जगणं स्वीकारतात. ह्यातील काही नमुनापण आपल्या स्वभावात इतकं काही खोलवर जाऊन बसलेलं असतं की आपल्या दृष्टीनं ते सर्वसामान्य असतं. पण काही नमुनापण मात्र आपलं आपल्यालाच खुपत असतं. ह्या असल्या नमुन्यापणाने  आपला अविभाज्य भाग बनून राहणं आपल्याला अजिबात आवडत नाही. "तू मला सोडून जा पाहू!" आपण ह्या असल्या हट्टी नमुन्यापणाला ठणकावून सांगतो. पण हे असलं सांगणं निरर्थक असतं. कधीतरी हे आपलं आपल्यालाच खुपणाऱ्या नमुन्यापणाने चारचौघात आपली फटफजिती होते. म्हणजे कधी अगदी दृश्य स्वरुपात तर कधी अदृश्य स्वरुपात! कसबसं  मग घरी येऊन एका कोपऱ्यात आपण बसतो. हे वाह्यात नमुनापण घाबरलेलं असतं. आपण कशी आता त्याची खरडपट्टी काढणार ह्याची भिती त्याला वाटत असते. आपणही त्याच मूडमध्ये त्याच्याशी बोलायला सुरुवात करतो. पण काय होतं कोणास ठाऊक! जादूची कांडी फिरावी तसं अचानक ह्या नमुन्यापणाची आपल्याला दया येते. "कसा आहेस रे तू?" आपण त्याला विचारतो. दोघंही क्षणभर स्तब्ध होतो आणि मग खळखळून हसू लागतो. मी आणि माझं नमुनापण ही जन्मभराची गाठ असते. बाहेरच्या दुनियेच्या प्रतिक्रियांनी मी माझं नमुनापण सोडणार नसतो! 

पोस्टच्या शेवटी नमुन्यापणाला सुसंगत असा हा फोटो आणि त्यासोबतच्या काही पंक्ती ! 


अनेक दिवसांनी प्रगटला नभी तो रविराज ।
दूर ढळले मळभ नभातले अन मनातले ।।

न्हाऊन निघाली सारी सृष्टी त्या सोनेरी रवीकिरणात ।
नटून आकाशाकडं झेपावले ते एक रक्तवर्णी जास्वंदफुल ।।

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

शिक्षकदिन





आज शिक्षक दिन ! आयुष्यातील विविध टप्प्यांवर शिक्षकांनी आपल्या सर्वांना पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पनांचे ज्ञान दिलेच पण त्याव्यतिरिक्त कान, डोळे व्यवस्थित उघडे ठेऊन त्यांच्या बोलण्याकडे आणि वर्तवणुकीकडे ज्यांनी कोणी लक्ष दिलं त्या सर्वांना जीवनसंकल्पनांचा फार मोठा ठेवा मिळाला. आजचा हा छोटासा लेख माझ्या शालेय जीवनातील आणि शिकवणीतील सर्व माननीय शिक्षकांना समर्पित ! आदरणीय गुरुवर्गातील नावांचा उल्लेख करणे जाणीवपूर्वक टाळत आहे. 

कोणतीही संकल्पना शिकवताना मुलांना अधिकाधिक गुण मिळावेत हा प्राथमिक दृष्टिकोन ठेवून ती संकल्पना शिकविणे किंवा त्या संकल्पनांच्या मूलभूत भागाला स्पर्शुन जाणे हे दोन पर्याय शिक्षकांकडे असतात. त्याकाळी बहुतांशी शिक्षकांनी संकल्पनांच्या मुलभूत भागांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. १९९० सालानंतर ज्या वेगानं सर्वत्र बदल घडून आले त्याची पुर्वकल्पना ना शिक्षकांना होती ना मुलांना. परंतु ह्या गुरुजनांनी जीवनातील समस्यांचा देखील आपल्या बोलण्यात समावेश केला, जीवन हे काही पायघड्यांवरील वाटचाल असणार नाही हे कळत नकळत मनावर बिंबविले. कदाचित व्यावसायिक जगात अगदी शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कसं बदलावं ह्या भागाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविलं नसेल पण आयुष्यातील मोठ्यात मोठ्या अपयशातुन स्वतःला कसं सावरावे, मिळालेल्या यशाकडे सुद्धा काहीसं विरक्तपणे कसं पाहावं  ह्याचे अप्रत्यक्ष धडे त्यांनी आम्हांला दिले.

१९९० नंतर झपाट्यानं बदल होण्यास जी काही सुरुवात झाली ते बदल आजही सुरु आहेत आणि पुढेही सुरु राहतील. ह्या बदलांच्या वादळांत , यशापयशांच्या मालिकेत एक माणुस म्हणून आनंदानं जगायला शिकवणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन ! वर्षे जातील, काळ बदलेल पण एखाद्या शांत क्षणी मनाला दिलासा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनमोल क्षणांचा ठेवा तुम्ही आम्हांला दिला आहे, तो आम्हांला शेवटपर्यंत पुरणार आहे! 

पोह्यांचा ऊहापोह

पारंपरिक मराठी घरांमध्ये दररोज सकाळी सर्वसाधारणपणे शिरा, उपमा आणि पोहा हे तीन होतकरू उमेदवार आपला अर्ज दाखल करत असत. घरातील मुख्य गृहिणी विव...