मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

जन्मदिन चिंतन

 


आपण  सर्वजण आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यानंतर एका अविरत जगरहाटीचा अविभाज्य भाग बनलेलोअसतो. जगाच्या शर्यतीत राहून आपण आपली एक वेगळी अशी शर्यत धावत असतो. जत्रेतील गोल फिरणारे चक्र असो किंवा हल्लीच्या मनोरंजन पार्क मधील राइड्स असोत; एका संथ सुरुवातीनंतर  तुफान वेग पकडला जातो. त्यावेळी फक्त या राइड्सचा एक असहाय्य प्रवासी बनणं आपल्या हातात असते. त्याचप्रमाणे हल्लीच्या जीवन शर्यतीत बहुतांश प्रमाणात बाह्यघटकांच्या प्रभावाखाली जीवन जगणे हा एकमेव पर्याय आपल्या समोर उभा असतो. 

खरं बघायला गेलं तर या राइड्समध्ये सहभागी होणे हे आपल्यावर बंधनकारक नसते. आपणच स्वखुषीने हा निर्णय घेतलेला असतो. बऱ्याच वेळा आपल्याला ज्याचा अर्थ आणि परिणाम पूर्णपणे समजले नाहीत अशा प्रगतीच्या ध्येयामागे लागून आपण राइड्समध्ये सहभागी झालेलो असतो. काही काळातच आपल्याला समजून चुकलेलं असतं की हे जे काही प्रगतीचे ध्येय आहे ते स्थिर नसून मृगजळाप्रमाणे सतत पुढं पुढं सरकणारे आहे. ध्येयाची जी पातळी गाठण्यासाठी आपण शर्यतीत भाग घेतलेला असतो ती पातळी जरी गाठली तरी त्यानंतरची पातळी तुम्हांला खुणावत असते. एका पातळीवर शांततेने बसून राहणं हे ह्या शर्यतीतील नियमांचं उल्लंघन करणारं असतं. विशिष्ट काळात ही जागा मागून येणाऱ्यांसाठी मोकळी करुन द्यायची असते. 

अशा काहीशा निर्दयी वाटू पाहणाऱ्या शर्यतीतील जीवनक्रमात काही क्षण असे येतात जे आपणास अंतर्मुख करतात. आपल्या शर्यतीपलीकडील विश्वाच्या अस्तित्वाची जाणीव करुन देतात. आणि शर्यतीत भाग घेण्याच्या आपल्या निर्णयाचे पुनर्मूल्यमापन करण्याची संधी उपलब्ध करुन देतात. सणवार, वाढदिवस हे ते काही क्षण! ह्या शर्यतीत भाग घेण्याच्या फायद्यासोबत तिची किंमत सुद्धा आपणास चुकवावी लागत असते. ही किंमत असते कधी आपल्या तब्येतीकडे कराव्या लागणाऱ्या हेळसांडीची, कधी जवळच्या माणसांसोबत व्यतीत न करता आलेल्या अमुल्य क्षणांची तर कधी नातेसंबंधातील कदापि भरु न येऊ शकणाऱ्या भेगांची ! 

आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आपलीच भूमिका सदैव बरोबर हा अट्टहास केव्हाचा मागे पडलेला असतो. त्यामुळं योग्य लोकांसमोर, योग्य प्रसंगी पडती बाजू घेण्याची आपली तयारी असते. इथं योग्य हा घटक महत्वाचा ! आपल्यासारखी ज्यांची मनोभूमिका आहे, ज्यांच्यासोबत आपले विचार जुळतात अशा लोकांसमोर आपण आपल्या आयुष्याचं पुस्तक उघडं करण्यासाठी तयार असतो. इथंही आपली निवड कधीतरी चुकतेसुद्धा. परंतु आपल्या निर्णयांच्या भल्याबुऱ्या परिणामांना खंत न बाळगता सामोरं जाण्याची, जीवनगाणे गात राहण्याची स्थिती आपण मिळवलेली असते. ज्या लोकांसोबत आपलं कधीही जमू शकणार नाही अशा लोकांशी वाद घालण्यापेक्षा त्यांच्यापासून दूर राहणं हा पर्याय बऱ्याच वेळा स्वीकारण्याची आपली मानसिकता असते ! 

ही मनोभूमिका बाळगण्यासाठी आवश्यक ते मनोबल देणारे आणि आपली अगदी अटीतटीची शर्यत लढतांना अदृश्यरूपात सदैव आपल्यासोबत असणाऱ्या नातेवाईक,  मित्रमंडळी ह्यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ! आपल्या शर्यतीत आपण एकटेच नसुन ही सर्व मंडळी केवळ एका हाकेच्या अंतरावर आहेत ही भावनाच खूप सुखावह असते! 

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

ते दोन तास


ट्रिंग ट्रिंग ! रविवारी सकाळी घरच्या दूरध्वनीची बेल वाजली तसा मी कुतूहल भावनेनं व्यापून 
दूरध्वनीकडे गेलो. बरेच दिवसांत ही बेल वाजली नसल्यानं हा दूरध्वनी घरात आहे ह्याचाच मला विसर पडला होता. 

मी  - "हॅलो" 

समोरचा माणूस - "हॅलो " (अति  उत्साहानं )

आवाज ओळखीचा वाटल्यानं मी स्मरणशक्तीला ताण दिला. 

मी  - "अति गंभीर ?"

समोरचा माणूस - "काय ?" (काहीशा रागानं )

मी - "नाही म्हणजे आपण गेल्याच आठवड्यात बोललो ना !" ( सारवासारव करण्याचा प्रयत्न करत )

समोरचा माणूस -  "हो  तोच तो मी ! कसे  आहात  पंखवाले !"

मी  - "ठीक आहे ! (काहीशा रागानं )

समोरचा माणूस -  "तर थेट मुद्दयाला हात घालतोय मी ! तुमच्या मागच्या आठवड्यातील  पंखांच्या कल्पनाविस्तारावर आम्ही  म्हणजे आमची कंपनी खूप खुश झाली आहे . त्यामुळं आज आम्ही तुमच्याकडं नवीन प्रस्ताव घेऊन आलो आहे !"

मी  - "असं होय "

थोड्याच वेळात मी अतिगंभीर आणि त्याची एक स्त्री सहकारी ह्यांच्या सोबत व्हिडिओ कॉल वर होतो. 

अतिगंभीर आणि सहकारी - "शुभ प्रभात !"

मी  - अतिगंभीरकडे पाहत "आपलं झालंय सुप्रभात!"  त्याच्या सहकारीला  "सुप्रभात !"

सहकारी  - "आजचा  आपला  विषय आहे  - ते दोन तास !"

मी - " लहानपणी शाळेत असताना रेल्वे प्लॅटफॉर्मवर अर्धा तास ह्या विषयावर निबंध लिहिण्याची सवय वगळता मला असल्या विषयावर बोलायची अथवा लिहायची सवय नाही ! आणि  मला अभ्यासानं व्यापून टाकल्यानं क्रिकेटर बनता आलं नाही  अन्यथा वकार आणि अक्रमसमोर दोन तास  असं मी नक्कीच लिहू शकलो असतो "

अतिगंभीर - " म्हणजे त्यांच्यासमोर दोन तास टिकला असता असं म्हणायचं आहे का तुम्हांला ? चांगला आत्मविश्वास आहे तुमचा "  

सहकारी  - "आपण जरा मुद्द्याकडे वळूयात का ? तर विषय असा आहे की  एके दिवशी सकाळी अचानक तुम्हांला  ह्या पृथ्वीचा पुढील दोन तासांनंतर  सर्वनाश होणार आहे असं सांगण्यात आलं , तर तुम्ही ते दोन तास कसे  घालवाल , त्यात काय काय कराल? तुम्हांला विचार करण्यासाठी म्हणून आम्ही काही वेळ देत आहोत ! आपण सायंकाळी चार वाजता भेटूयात !"

सायंकाळी चार वाजता - 

अतिगंभीर आणि सहकारी - "शुभ दुपार , संध्याकाळ !"

मी (त्रासिक मुद्रेने ) - "ठीक आहे, ठीक आहे

अतिगंभीर - "तुम्ही  इतके  त्रस्त का दिसत  आहात ? विचार करुन त्रास झाला का?"

मी (वैतागून ) -  "अहो त्या विचारांपेक्षा झोप न झाल्यानं त्रास झालाय !" 

सहकारी  - "आपल्याला झालेल्या तसदीबद्दल आम्ही खरोखर तुमची माफी मागू  इच्छितो . आपण हे थोडक्यात आटपुयात ! तर तुम्हांला  नक्की काय वाटतंय !"

मी (उत्साहानं पुढ्यातील कागद वाचत ) - 

१. "आमच्या  इथं नाक्यावर एक मस्त केकचे नवीन दुकान निघालं  आहे . काय एकाहून एक मस्त  केक ठेवलेले असतात डिस्प्ले ला ! पण खूप महागडा आहे तो ! ही बातमी जाहीर झाली रे झाली की मी त्याच्याकडे धावत जाणार आणि सांगणार  - अरे मित्रा , आता काय सर्वच नाश पावणार आहे ! तर आपण दोघे मिळून हे सर्व केक खाउयात ! "

सहकारीच्या चेहऱ्यावर काय हा बालिश विचार आहे ह्यांचा हे भाव स्पष्ट दिसत होते.  तुम्हांला दुसरा कोणी मिळाला नाही का ह्या प्रकारच्या भावानं तिनं अतिगंभीरकडे पाहिलं. त्यामुळं विचलित न होता मी माझे वाचन पुढे सुरु ठेवले. 

२."आयुष्यात मी काही जणांशी चुकीचं वागलो,  काहींना काही सांगायचं राहून गेलं. ते ह्या दोन तासांत सांगण्याचा प्रयत्न  करीन "

सहकारी  (तिचे डोळे चकाकले होते) - "मग हे आत्ताच का नाही सांगायचं ?"

मी - "त्यानंतरचे परिणाम दोन तासांपलीकडं पेलण्याची कदाचित  ताकत माझ्यात नाही म्हणून !" 

सहकारी - "यादी तयार आहे ?"

मी - "नाही, त्यावेळेला जे आठवणार त्यांनाच "

३. "पुढे अब्जावधी वर्षानंतर पृथ्वीवर अथवा ह्या विश्वात नवीन जीवसृष्टी येईल. त्यांना संदर्भ म्हणून शेवटच्या दोन तासांत पृथ्वीवरील सोशल मीडिया, टीव्हीवरील बातम्यांच्या वाहिन्या ह्यावर कसा धुमाकूळ घातला गेला  ह्याविषयी माझ्या क्षमतेनुसार नोंद ठेवीन ! 

अतिगंभीर - "विचारात घेण्यासारखी बाब आहे"

४. "जगातील महत्वाच्या माणसांना उद्देशून माझ्या फेसबुक वॉलवर संदेश लिहीन"

अतिगंभीर - "म्हणजे चीनचे अध्यक्ष माहिती आहेत, पण अजून कोणाला ?"

मी (त्याला लूक देत ) - " त्यांच्या व्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प, विराट कोहली "

सहकारी - "अय्या , विराटला काय मेसेज देणार तुम्ही ?"

मी - "म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे पण पाकिस्तानविरुद्ध पांड्याला का घेतला ह्याचा जबाब विचारीन !"

सहकारी (निराशेनं ) - "हम्म "

अतिगंभीर आणि सहकारी - "अजून काही?"

मी - "सध्या तरी इतकेच सुचतंय ! "

अतिगंभीर आणि सहकारी - "आपल्या अमूल्य वेळेबद्दल खूप खूप आभार ! आम्ही निघतो आता"

मी - "आभार कसले त्यात, येत जा असे अधूनमधून वेळ घालवायला. फक्त माझ्यावर एक कृपा करा "

अतिगंभीर आणि सहकारी (उत्साहानं ) - "कोणती ?"

मी - "त्या नाक्यावरील केकवाल्याला ह्यातलं काही सांगू नका !" 

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

मला पंख असते तर !!




"आपली खरेदी नोंदवा"
मी - "पंख!" 
"आपल्याला पंख हवे आहेत की पंखा ?"
मी - "पंख" 
"कृपया दूरध्वनीवर टिकून रहा. ही विशेष खरेदी आहे. मी आपला कॉल विशेष कक्षाकडे पाठवत आहे. आणि व्हिडिओ कॉलच्या तयारीत रहा !"
मी - "ठीक आहे !"

काही वेळातच मी माझ्याहून धीरगंभीर चेहऱ्याच्या माणसासोबत व्हिडिओ कॉलवर होतो. 
अतिगंभीर - "कसे काय आहात आपण आज सकाळी !"
मी - "ह्या प्रश्नाचा आणि माझ्या इच्छित खरेदीचा काही संबंध आहे का ?"
अतिगंभीर - "कदाचित असू शकतो ! ठीक आहे आपण मुख्य चर्चेकडे वळूयात !"
अतिगंभीर - "तुम्हांला मनुष्यदेहात पंख हवे आहेत की पक्षी बनून पंख हवे आहेत?
मी - "पक्षी बनून पंखांचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे का?"
अतिगंभीर - "एखादा खात्रीलायक ज्योतिषी सुचवू तुम्हांला ! पुढील जन्मात पक्षी बनण्यासाठी काय करावं ह्याविषयी तो मार्गदर्शन करेल !"
मी - "मनुष्यदेहात पंख हवे आहेत !"
अतिगंभीर - "किती वजन वाहून नेण्याची क्षमता हवी आहे ?"
मी - "माझे वजन आणि आठवडाभराचा किराणा माल !"
अतिगंभीरच्या चेहऱ्यावर कुठेतरी मंद स्मितहास्य फुलल्याचा मला भास झाला. 
अतिगंभीर - "आपण एक करुयात ! तुम्ही पंख लावल्यानंतर नक्की काय करणार ह्याची थोडी कल्पना द्याल का मला?
मी (फुललेल्या चेहऱ्यानं ) - "नक्की नक्की !"
१) मी हिमालयीन पर्वतरांगांत मुक्त विहार करीन ! तिथल्या गगनभेदी वृक्षांच्या शेंड्यांवर बसून तिथल्या शुद्ध हवेला फुफुसांत भरुन ठेवीन ! तिथल्या स्वर्गीय पर्वतरांगांचं दृश्य नजरेत कायमचं भरुन ठेवीन !
२) कोकणातील, फ्लोरिडातील निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्यांवर विहार करीन ! तिथल्या लाटांसोबत खेळीन. समुद्रातील माश्यांसोबत हितगुज करीन !
३) आफ्रिकेतील घनदाट जंगलातील वाघ सिंहांच्या गुहांमध्ये शिरुन त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून ते नक्की काय करतात ह्याचे निरीक्षण करीन !
४) T20 विश्वचषक सामन्यांच्या मैदानावरुन भ्रमण करीन आणि त्या सामन्यांचा आनंद लुटीन !
५) चीनचे अध्यक्ष गुप्त वाटाघाटी करत असताना त्यांच्या प्रासादाभोवती घिरट्या मारीन आणि संवाद ऐकीन !
अतिगंभीर - "आपण थोडं दमानं घेऊयात ! आपण फक्त भटकणार की नोकरी चालू ठेवणार?"
मी - "वरीलपैकी पहिल्या तीन अनुभवांवर आधारित ब्लॉग, चौथ्या मुद्द्यावर माझ्यासोबत असणारा कॅमेरा आणि पाचव्या मुद्द्यावर भारत सरकारकडून मिळणारा मोबदला विचारात घेता मी कदाचित नोकरी करणार नाही ! 
अतिगंभीर - "तरीही कार, रिक्षात, बेस्ट मध्ये वगैरे बसणार का?
मी - "ते का?"
अतिगंभीर - "उत्तर हो असेल तर पंख फोल्डेबल बनवायला बर ना !" 
मी - "नाही बसणार"
अतिगंभीर - "पंखांचा रंग ?"
मी - "अर्थात निळा!"
अतिगंभीर - "आकाशाशी रंगसंगती म्हणून निळा सांगत असाल तर मी तुमच्या ध्यानात आणू इच्छितो की हिमालयात भोवताली शुभ्र बर्फाच्छादित रांगा असतील, युरोपात सदैव ढग असणार !"
मी - " फक्त निळा !"
अतिगंभीर - "एका उड्डाणात किती महत्तम अंतर पार करणार?"
मी - "मुंबई ते युरोप, युरोप ते अमेरिका आणि मुंबई ते आफ्रिका ह्यातील समुद्रमार्गे जे काही सर्वात जास्त असेल ते!"
अतिगंभीर - "न्यूझीलंडला वगैरे जाणार असाल तर ?"
मी - "ठीक आहे पृथ्वीवरील दोन भूभागामधील समुद्रमार्गे जे काही महत्तम अंतर असेल ते !"
अतिगंभीर - "अलार्म बसवून हवा आहे का?"
मी - "तो कशाला ?"
अतिगंभीर - "इतकं उडणार तर मध्ये झोप वगैरे आली तर! समुद्राच्या पृष्ठभागापासून पंधरा मीटर अंतरावर आलात की जोरजोरात अलार्म वाजणार!
मी - "ठीक आहे ! बसवा "
अतिगंभीर - "वॉटरबॅगसाठी एक कप्पा आणि जेवण्याच्या डब्यासाठी दोन कप्पे पुरेसे होतील?
मी - "उडताना जेवणार कसे?"
अतिगंभीर - "मध्ये छोटी छोटी बेटं लागतील ! तिथं उतरायचं !"
मी - "ठीक आहे ! बसवा "
अतिगंभीर - "अदृश्य होण्याचा स्प्रे वगैरे बसवून हवा आहे का?"
मी - "तो कशाला ?"
अतिगंभीर - "चीनच्या अध्यक्षांवर हेरगिरी करताना, महासागरातील निर्मनुष्य बेटांवर उतरल्यावर तुमच्या सुरक्षेचा विचार करायला नको का?
मी - "ठीक आहे ! ठीक आहे !"
अतिगंभीर - "पंखांची एक जोडी हवी आहे की ...?"
मी - "एकच ! एकच !"
अतिगंभीर - "भ्रमणध्वनी inbuilt हवाय की तुमचाच तो जुना मोबाईल, त्याच्यासाठी कप्पा बनवून देऊ? 
मी - " माझ्या ह्या तुलनेनं नव्या भ्रमणध्वनीसाठी कप्पा बनवा !" 
अतिगंभीर - "ठीक आहे! आम्हांला आवश्यक असणारी सर्व माहिती पुरविल्याबद्दल धन्यवाद !"
मी - "अहो तुम्ही किंमत आणि पंख कधी देणार ह्याची नक्की तारीख नाही सांगितलीत?
अतिगंभीर - "साहेब त्याचं असं आहे ना, तुम्हांला जसा वेळ घालवायची खुमखुमी आली, तशी आम्हांला सुद्धा येऊ शकते !"

एव्हाना तो अतिगंभीर आतापर्यंतचा सर्व गंभीरपणा सोडून खळखळा हसू लागला होता ! 

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

मी आणि माझं नमुनापण !

प्रत्येक मनुष्य हा एक खास नमुना असतो. बऱ्यावाईट गोष्टींचं मिश्रण असलेला हा नमुना दर दिवशी दुनियेसमोर पेश होत असतो. ह्या नमुन्याच्या समाजासमोरील कृती ढोबळमानाने तीन प्रकारात मोडतात. 

१) समाजमान्य कृती - ज्यात समाजानं आखून दिलेल्या चौकटीत राहून ही व्यक्ती वागत असते. 

२) समाजाला आनंद देणारी कृती - समाजाच्या अपेक्षेपलीकडं जाऊन अवतीभोवती आनंदाची पखरण करणारं वागणं. 

३) भुवया उंचावणारी कृती - काहीतरी वेगळंच वागणं ! हा प्रकार बहुतांशी माणसाच्या नमुन्यापणाच्या प्रतिमेला कारणीभूत ठरतो. 

कालांतरानं माणसं आपल्या नमुन्यापणाला सरावतात. नमुनापण सोबतीला घेऊन जगणं स्वीकारतात. ह्यातील काही नमुनापण आपल्या स्वभावात इतकं काही खोलवर जाऊन बसलेलं असतं की आपल्या दृष्टीनं ते सर्वसामान्य असतं. पण काही नमुनापण मात्र आपलं आपल्यालाच खुपत असतं. ह्या असल्या नमुन्यापणाने  आपला अविभाज्य भाग बनून राहणं आपल्याला अजिबात आवडत नाही. "तू मला सोडून जा पाहू!" आपण ह्या असल्या हट्टी नमुन्यापणाला ठणकावून सांगतो. पण हे असलं सांगणं निरर्थक असतं. कधीतरी हे आपलं आपल्यालाच खुपणाऱ्या नमुन्यापणाने चारचौघात आपली फटफजिती होते. म्हणजे कधी अगदी दृश्य स्वरुपात तर कधी अदृश्य स्वरुपात! कसबसं  मग घरी येऊन एका कोपऱ्यात आपण बसतो. हे वाह्यात नमुनापण घाबरलेलं असतं. आपण कशी आता त्याची खरडपट्टी काढणार ह्याची भिती त्याला वाटत असते. आपणही त्याच मूडमध्ये त्याच्याशी बोलायला सुरुवात करतो. पण काय होतं कोणास ठाऊक! जादूची कांडी फिरावी तसं अचानक ह्या नमुन्यापणाची आपल्याला दया येते. "कसा आहेस रे तू?" आपण त्याला विचारतो. दोघंही क्षणभर स्तब्ध होतो आणि मग खळखळून हसू लागतो. मी आणि माझं नमुनापण ही जन्मभराची गाठ असते. बाहेरच्या दुनियेच्या प्रतिक्रियांनी मी माझं नमुनापण सोडणार नसतो! 

पोस्टच्या शेवटी नमुन्यापणाला सुसंगत असा हा फोटो आणि त्यासोबतच्या काही पंक्ती ! 


अनेक दिवसांनी प्रगटला नभी तो रविराज ।
दूर ढळले मळभ नभातले अन मनातले ।।

न्हाऊन निघाली सारी सृष्टी त्या सोनेरी रवीकिरणात ।
नटून आकाशाकडं झेपावले ते एक रक्तवर्णी जास्वंदफुल ।।

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

शिक्षकदिन





आज शिक्षक दिन ! आयुष्यातील विविध टप्प्यांवर शिक्षकांनी आपल्या सर्वांना पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पनांचे ज्ञान दिलेच पण त्याव्यतिरिक्त कान, डोळे व्यवस्थित उघडे ठेऊन त्यांच्या बोलण्याकडे आणि वर्तवणुकीकडे ज्यांनी कोणी लक्ष दिलं त्या सर्वांना जीवनसंकल्पनांचा फार मोठा ठेवा मिळाला. आजचा हा छोटासा लेख माझ्या शालेय जीवनातील आणि शिकवणीतील सर्व माननीय शिक्षकांना समर्पित ! आदरणीय गुरुवर्गातील नावांचा उल्लेख करणे जाणीवपूर्वक टाळत आहे. 

कोणतीही संकल्पना शिकवताना मुलांना अधिकाधिक गुण मिळावेत हा प्राथमिक दृष्टिकोन ठेवून ती संकल्पना शिकविणे किंवा त्या संकल्पनांच्या मूलभूत भागाला स्पर्शुन जाणे हे दोन पर्याय शिक्षकांकडे असतात. त्याकाळी बहुतांशी शिक्षकांनी संकल्पनांच्या मुलभूत भागांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. १९९० सालानंतर ज्या वेगानं सर्वत्र बदल घडून आले त्याची पुर्वकल्पना ना शिक्षकांना होती ना मुलांना. परंतु ह्या गुरुजनांनी जीवनातील समस्यांचा देखील आपल्या बोलण्यात समावेश केला, जीवन हे काही पायघड्यांवरील वाटचाल असणार नाही हे कळत नकळत मनावर बिंबविले. कदाचित व्यावसायिक जगात अगदी शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कसं बदलावं ह्या भागाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविलं नसेल पण आयुष्यातील मोठ्यात मोठ्या अपयशातुन स्वतःला कसं सावरावे, मिळालेल्या यशाकडे सुद्धा काहीसं विरक्तपणे कसं पाहावं  ह्याचे अप्रत्यक्ष धडे त्यांनी आम्हांला दिले.

१९९० नंतर झपाट्यानं बदल होण्यास जी काही सुरुवात झाली ते बदल आजही सुरु आहेत आणि पुढेही सुरु राहतील. ह्या बदलांच्या वादळांत , यशापयशांच्या मालिकेत एक माणुस म्हणून आनंदानं जगायला शिकवणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन ! वर्षे जातील, काळ बदलेल पण एखाद्या शांत क्षणी मनाला दिलासा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनमोल क्षणांचा ठेवा तुम्ही आम्हांला दिला आहे, तो आम्हांला शेवटपर्यंत पुरणार आहे! 

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

स्वातंत्र्यदिन शुभेच्छा !


रविवारी आपण सर्वांनी भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहानं साजरा केला. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा ! रविवारी सकाळी वडिलांनी आम्हांला पहिल्या स्वातंत्र्यदिनी शाळेत मिठाई दिली होती अशी आठवण काढली.आजच्या घडीला ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा क्षण प्रत्यक्ष पाहिला अशी मोजकी मंडळी आहेत. त्यामुळं बहुतांशी नागरिकांना स्वातंत्र्याचं खरं मोल समजत असेल का हा प्रश्न डोळ्यासमोर उभा रहातो. सद्ययुगात स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ते कशापासून हा प्रश्न रविवारी सकाळपासून माझ्या डोक्यात घोंघावत होता. गॅझेट्सपासुन स्वातंत्र्य हे बऱ्याच जणांचं मत असण्याची शक्यता आहे. अशा मनःस्थितीत असताना सायंकाळी मी स्वतः संगणकापासून दूर जाऊन वर्तमानपत्र वाचनाकडं वळलो. 

लोकरंगमध्ये राजरत्न भोजने ह्यांचा "स्वगत ... ध्येयहीन तरुणाईचे !" हा एक उत्तम लेख वाचावयास मिळाला.  ह्या लेखातील काही महत्वाचे मुद्दे 

१. नक्की करायचंच काय " हा आजच्या तरुणाईला भेडसावणारा प्रश्न 

२. थोड्याथोडक्यानं समाधान न मानणाऱ्या आणि स्वतःकडून असामान्य अपेक्षा बाळगणाऱ्या हा प्रश्न अधिक त्रास देत आहे 

३. अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आता मायबोलीतून आणि दुसरीकडे मराठी शाळांना विद्यार्थ्यांची वानवा असा विरोधाभास 

४. Uncertainty Principle (Heisenberg) - आजच्या तरुणांच्या मनावर घिरट्या घालणाऱ्या भविष्याला घेरुन असलेल्या अनिश्चिततेच्या प्रश्नांवर कुणीतरी आपलं लक्ष वेधून घेत आहे का? नोकरी मिळविण्याची अनिश्चितता , नोकरी टिकविण्याची अनिश्चितता, योग्य मोबदला मिळेल की नाही ह्याची अनिश्चितता, हा मोबदला भविष्यासाठी पुरेसा ठरेल की नाही ह्याची अनिश्चितता, मन मारुन काम करत राहिल्यानं मानसिक समाधान न मिळण्याची अनिश्चितता, ध्येयपूर्ती होईल की नाही ह्याची अनिश्चितता, जगाच्या पटलावर नावलौकिक मिळेल की नाही ह्याबाबत अनिश्चितता

आता माझे मुद्दे 

मुलांशी सुसंवाद 

फार थोड्या उदाहरणांत पालकांना तरुण पिढीशी सुसंवाद साधता येतो. एकतर पूर्णपणे संवादाचा अभाव नाहीतर दोघांतील एक पिढी सांगेल तसं दुसऱ्यांनी ऐकायचं हेच बऱ्याच उदाहरणांत पाहायला मिळतं. 

१) जेव्हा केव्हा तुम्ही मुलांशी चर्चेस सुरुवात करता त्यावेळी "ठेव तो मोबाईल बाजूला आणि मग बोल माझ्याशी" अशी सुरुवात केली तर मग संपलंच. अमेरिकन सहकारी म्हणतात त्याप्रमाणं You lost me there अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा सुरुवातीनंतर मुलं तुमचं बोलणं कितपत मनापासून ऐकून घेतील ह्याविषयी शंकाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या काळातील एखादं दुसरं उदाहरण देऊन मग मुलांना बोलण्याची संधी द्यावी. नुसतं ज्ञान पाजळु नये.  नाहीतरी एका क्षणी त्यांच्या मनात तुमच्या परीक्षणाचे विचार येण्यास सुरुवात होते. 

२) मुलांशी चर्चा करताना आपण किती आत्मविश्वासानं बोलतो आहोत हा महत्वाचा घटक. बऱ्याच वेळा आपण अगतिकतेने बोलत असतो. पुढील काळ कठीण असणार आहे असाच एकंदरीत आपल्या बोलण्याचा सूर असतो. मग अशा वेळी मुलांनी तुमचं बोलणं गांभीर्यानं का घ्यावं? जर तुम्ही आम्हांला पुढील काळासाठी आत्मविश्वास देऊ शकत नसाल तर किमान उगाचच फारशी उपयोगी न पडणारी जुन्या काळातील उदाहरणं देऊन आमचा मूड खराब करु नकात अशीच त्यांची मनोधारणा दिसून येते. 

३) दर पिढीनुसार मुलांच्या भावविश्वातील पालकांनी व्यापलेला टक्का कमी होत जाणार आहे. तुम्ही तुमच्या पालकांवर जितक्या प्रमाणात अवलंबून होता तितक्या प्रमाणात मुलं तुमच्यावर अवलंबून नसणार. आजच्या जगात स्वावलंबी बनणं ही काळाची आवश्यकता आहे. ह्या स्वावलंबितेचा side effect म्हणजे त्यांचे तुमच्या पासून काही प्रमाणात दूर जाणं ! त्यामुळं ही बाब वैयक्तिक पातळीवर घेता कामा नये. 

४) ज्या प्रमाणात पालक आता सोशल मीडियावर व्यक्त होत चालले आहेत ते बहुदा नवीन पिढीला आवडत नसावं असा माझा कयास आहे. म्हणजे त्यांचा आक्षेप सोशल मीडियावर व्यक्त होण्यावर नसुन ते व्यक्त होणे सतत चर्चेच्या रुपानं घरात रेंगाळत राहण्याला असावा.

५) भोजने ह्यांनी वर्णिलेली अनिश्चितता आहे हे अगदी शंभर टक्के खरे. पण ह्या अनिश्चिततेची बहुसंख्य कारणे बाह्य जगात नसून आपल्या मनात आहेत. आपण सर्वांनी स्वतःला सिद्ध करण्याचं खूळ डोक्यात घेतलं आहे.  प्रत्येकानं आपल्याला सिद्ध करायलाच हवं का? कदाचित समाजाच्या ज्या विविध संक्रमणावस्था असतील त्यातील एक ही असावी. कालांतरानं एक समाज म्हणून आपल्याला ह्या सिद्धतेच्या मागे धावण्यातील फोलपणा ध्यानात येऊन आपला कल आपल्या स्वभावाला अनुकूल असे राहण्याकडे वळेल. 

६) आता मुख्य मुद्दा म्हणजे हे मुलांना पटवून द्यायचं कसं ? खूप पैसा कमवावा, खूप खर्चावा हा आजच्या जगताचा मूलमंत्र आहे. आधीच्या पिढीनं वेगळं जग पाहिलं असल्यानं ते बहू पैसा कमवावा, बहू पैसा खर्चावा ह्या तत्वाच्या विरोधात विचार करण्याचं त्यांच्याकडं स्वातंत्र्य आहे. पण मुलांना मात्र जीवन जगण्याचा हा एकमेव मार्गवाटत असावा. 

बहुदा वरील विचार सुसंगतपणे मांडण्यात मला अपयश आलंय. पण हेच आजच्या पिढीच्या मानसिक गोंधळाचं प्रतीक आहे. आपले विचार आणि भोवतालची परिस्थिती / भविष्यकालीन जगाची दिशा ह्याची सांगड घालण्यात जो आपला गोंधळ होत आहे त्यातून बाहेर पडण्यात एक समाज म्हणून आपल्याला यश मिळावं हीच ह्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाची आवश्यकता आहे! 

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

बलसागर भारत होवो !




पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटानं मला जाग आली. आसमंताच्या रोमारोमात नैसर्गिकता भरुन राहिली होती. मी खोलीत नजर फिरवली. प्रशस्त अशी खोली पुर्णपणे नैसर्गिक सामुग्रीने बनविण्यात आली आहे हे सांगण्यासाठी कोण्या तज्ञाची गरज नव्हती. समुद्राच्या लाटांच्या आवाजांनी मला अजून एक धक्का बसला. खोलीबाहेर पडताच दिसलेल्या भव्य दिवाणखान्याकडं दुर्लक्ष करुन मी थेट घराबाहेर पडलो. समोरच निळ्याशार समुद्राच्या दर्शनानं नयन सुखावून गेले. भवताली विविध इवले पक्षी आनंदानं बागडत होते. 




काही काळ ह्या प्रसन्न दुनियेत वावरुन मी परत दिवाणखान्यात परतलो.  दिवाणखाना अत्यंत प्रशस्त होता. त्याच्या एका कोपऱ्यात एक काउंटर होता. तिथं विविध फळं आणि फळांच्या रसांनी भरलेले चषक भरुन ठेवले होते. त्यातील एक चषक उचलून मी मऊ अशा सोफ्यावर येऊन बसलो. समोर नजर जाताच मला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला. तिथं पाच मोठाले सोनी कंपनीचे HD दूरदर्शन संच व्यवस्थित मांडून ठेवले होते. त्या मधुर अशा फलरसाचा पहिला घोट घेतला आणि आपल्या आयुष्यात हे काय चाललं आहे ह्याविषयी विचार करण्याची मला प्रथमच उसंत मिळाली. 

अचानक पक्षांचा किलबिलाट थांबला. आणि एक धीरगंभीर आवाज दिवाणखान्याभर पसरला. "वत्सा, हे जे काही चालले आहे त्याविषयी तू चिंता करण्याचे काहीही कारण नाही.  तुला एकंदरीत क्रीडाप्रकाराविषयी अत्यंत प्रेम आहे हे आमच्या ध्यानात आले. तू सध्या जपानपासून हजार मैल दूर असलेल्या एका निसर्गरम्य बेटावर आहेस. इथं पुढील सोळा सतरा दिवस तुझं वास्तव्य असेल. तुझ्यासमोर जे भलेमोठे दूरदर्शन संच आहेत त्यावर त्याक्षणी सुरु असलेल्या ऑलिंपिक खेळांचे थेट प्रक्षेपण सर्व दिवस चालू राहील. एकाच वेळी दोन तीन स्पर्धा बघण्याचा तुझा मोह पाहून आम्ही इतक्या संचांची व्यवस्था केली आहे. ज्या काउंटरवरुन तू हे चषक घेतलेस तिथं चोवीस तास विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. तुझ्या मनात जो काही पदार्थ येईल तो तिथं हजर असेल. आणि हो, पुढील सोळा - सतरा दिवस तू इथं आहेस हे तुझ्या कार्यालयात आणि घरी कळविण्यात आलं आहे!" "कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना?" हा प्रश्न त्या धीरगंभीर ध्वनीला विचारण्याचं धारिष्ट्य मला झालं नाही. 

तो आवाज थांबला आणि पुन्हा पक्षांचा किलबिलाट सुरु झाला. मी पहिला दूरदर्शन संच सुरु केला. ऑलिम्पिक सुरु होण्यासाठी दोन दिवस असले तरीही पुरुष आणि महिला फूटबॉल सामने सुरु झाले होते. उदघाटन सोहळ्याआधी हे सामने सुरु होण्याची पुर्वापार प्रथा आहे.  मला फूटबॉल सामन्यांत फारसा रस नसल्यानं मी ह्या दोन दिवसातील बराचसा भाग खाण्यापिण्यात आणि झोपण्यात घालविला. सायंकाळी दिसणारा सूर्यास्त डोळ्याचं पारणं फिटून टाकणारा होता. फूटबॉल विश्वचषक स्पर्धेला जितक्या प्रमाणात लोकाश्रय मिळतो त्याच्या दहा टक्के सुद्धा ऑलिंपिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या फूटबॉल स्पर्धेला मिळत नाही. बहुदा आघाडीच्या व्यावसायिक खेळाडूंची ऑलिंपिकमध्ये सहभागी न होण्याची मानसिकता हे ह्यामागील मुख्य कारण असावे ! 


२३ जुलै - आज टोकियो ऑलिंपिकच्या उदघाटन सोहळ्याचा दिवस ! जपानी लोकांचे कौतुक करावं तितकं थोडं ! सध्याच्या परिस्थितीत जगातील विविध आघाडीच्या खेळाडूंना आपल्या देशात बोलाविण्याचे, त्या सर्वांना ऑलिंपिक गावात राहण्यासाठी एकत्र ठेवण्याचं धाडस त्यांनी केलं. आणि बऱ्यापैकी निभावलं देखील. उदघाटन सोहळा साधा पण मन प्रसन्न करणारा होता. त्या धीरगंभीर आवाजाच्या सुचनांचे नेमानं पालन करत मी विविध लज्जतदार पदार्थांचे स्मरण करुन त्यांना काउंटरवर पाचारण करत होतो.  खिडकीमध्ये मी उदघाटन सोहळा पाहत असताना काही रंगीबेरंगी पक्षीसुद्धा येऊन बसले होते.

२४ जुलै - आज मुख्य स्पर्धांना प्रारंभ होण्याचा दिवस. मी सकाळीच सज्ज होऊन माझ्या आसनकक्षात स्थानापन्न झालो. नेमबाजी, वेटलिफ्टिंग ह्या स्पर्धा सर्वसाधारणपणे पहिल्या दिवशी आयोजिलेल्या असतात. जागतिक पातळीवरील स्पर्धेत एखाद्या देशाला मिळालेल्या पदकांची संख्या त्या देशात रुजलेल्या क्रीडासंस्कृतीचे प्रतीक असते.  ह्या बाबतीत नक्कीच योग्य दिशेनं सुरु आहे. ह्यात खास उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील काही राज्यं, विभाग ह्याबाबतीत पुढाकार घेत आहेत. हॉकीसाठी ओरिसा, बॅडमिंटनसाठी हैद्राबाद ह्यांनी खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा प्राप्त होतील ह्यासाठी मेहनत घेतली आहे.  बॉक्सिंग, वेटलिफ्टिंगसाठी पुर्वेकडील राज्यं ह्यांनी आपला एक खास ब्रँड निर्माण केला आहे.  महाराष्ट्रातील महिला नेमबाज सुद्धा आशियाई आणि ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बऱ्याच वेळा आशा निर्माण करतात.

पहिल्याच दिवशी मीराबाई चानू हिनं ४९ किलो वेटलिफ्टिंग गटात रौप्य पदक मिळवून देऊन भारताला सुंदर सुरवात करुन दिली. ह्या पूर्वेकडील राज्यातून गेले काही वर्षे भारताला जागतिक दर्जाचे खेळाडू मिळाले आहेत. आपल्या जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी हे खेळाडू खेळाचा आधार घेताना दिसतात. पण भारताच्या महानगरातील युवा मंडळी मात्र बऱ्याच वेळा शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीत मागे पडलेली आहेत! मीराबाई चानूचे मनापासून अभिनंदन करण्यात माझ्यासोबत माझी मित्र बनलेली पक्षी मंडळी सुद्धा सामील झाली होती. 

धनुर्धारी स्पर्धा - विश्वचषक आणि इतर जागतिक स्पर्धांमध्ये भारताची बऱ्याच वेळा चांगली कामगिरी असते. परंतु काही कारणास्तव ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय तिरंदाजांना आपला ठसा उमटवता येत नाही असं आढळून येतं. दीपिकाकुमारी ही अशीच एक गुणी तिरंदाज आहे. भविष्यातील स्पर्धांसाठी दीपिकाला शुभेच्छा. 

ऑलिंपिक हा आनंदसोहळा आहे. जगातील सर्वोत्तम ऍथलिट आपल्या खेळाचा नजराणा आपल्यासमोर पेश करत असतात. केवळ भारताचा सहभाग असलेल्या खेळाच्या वेळीच टीव्ही पाहायला हवा असे नाही. मी मिळालेल्या संधीचा वापर करत व्हॉलीबॉल स्पर्धेतील पुरुष आणि महिला अशा दोन्ही वर्गातील सामने पाहिले. ज्या पद्धतीनं नेटजवळ येऊन ह्या खेळाडू जोरदार फटके मारतात, किंवा वेगानं धावत जाऊन संपूर्ण कोर्ट व्यापतात ते प्रेक्षणीय असते. प्रतिस्पर्धी संघ सर्व्हिस करत असताना ज्या पद्धतीनं आपल्या सहकाऱ्यांना बोटानं खुणा केल्या जातात ते ही बघण्यासारखा ! 

बीच व्हॉलीबॉल मध्ये दोघांचा संघ असतो. हा खेळ आशिया खंडात फारसा प्रसिद्ध नसावा. त्यानंतर लक्षवेधी म्हणजे टेबल टेनिस. ह्यात मा लॉंग ह्या चिनी खेळाडूने माझे लक्ष वेधून घेतलं. भारताच्या शरथ कमलने मा लॉंग विरुद्ध एक गेम जिंकुन माझ्या आशा उंचावल्या होत्या. परंतु मा लॉंग हा खरा जगज्जेता आहे. अत्यंत थंड डोक्यानं ज्या अचुकतेने तो टेबलवर फटके मारतो ते प्रेक्षणीय असते. त्यानं ह्या ऑलिंपिकमध्ये पुन्हा एकदा पुरुष एकेरी स्पर्धेत विजेतेपद पटकावलं!  मोनिका बात्रा ही भारताची आघाडीची खेळाडू. तिनेही तिसरी वा चौथी फेरी गाठली. परंतु मनापासून सांगायचं झालं तर चिनी, कोरिआई स्पर्धकांच्या तोडीस तोड करण्यासाठी अजून आपल्या टेबल टेनिस खेळाडूंना बरीच मजल मारायची आहे. 

टेनिस खेळात अंकिता रैना आणि सानिया मिर्झा ह्या दुहेरीतील जोडीला सलामीच्या सामन्यातच पराभव पत्करावा लागला. अंकिता रैना एकंदरीत गुणी खेळाडू आहे. भविष्यात तिच्याकडून आपल्याला बऱ्याच अपेक्षा बाळगता येतील. टेनिस म्हटलं की लिअँडर पेस आठवला नाही असं होऊ शकत नाही. ह्या गड्याने १९९६ साली आपल्या देशाला वैयक्तिक कांस्य पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर बहुदा २०१६ सालापर्यंत हा जिद्दी खेळाडू ऑलिंपिक खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत राहिला. जोकोव्हिक हा आघाडीचा खेळाडू पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यात अयशस्वी ठरला. टोकियोतील उन्हाळा ह्या आघाडीच्या खेळाडूला झेपला नसावा ! जपान जिच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगून होता ती नेओमी तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानं जपानच्या आशांवर पाणी फिरलं. 

अशाच एका सायंकाळी मी निवांत समुद्रकिनारी विचार करत बसलो होतो. एका ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूमागे बहुदा आठ - दहा हजार प्रयत्नशील खेळाडू असावेत. एखाद्या देशाची क्रीडा संस्कृती ही तो देश ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूचा सन्मान कसा करतो ह्यावर नाही तर त्या प्रयत्नशील आठ - दहा हजार खेळाडूंना सन्मानानं जगण्याची कितपत संधी देतो ह्यावर ठरत असते. 

जिम्नॅस्टिक स्पर्धेतील विविध क्रीडाप्रकार त्यातील सहभागी खेळाडूंनी वर्षोनुवर्षे घेतलेल्या मेहनतीचे आपल्याला दर्शन घडवितात. ह्यातील एखाद्या छोट्या स्टेपमधील चूक सुद्धा तुम्हांला पदकापासून वंचित ठेऊ शकते.  जिम्नॅस्टिक असो वा डायविंग स्पर्धा असो, तुम्ही जमीन अथवा पाण्यावर ज्याप्रकारे पदस्पर्श अथवा मस्तकस्पर्श करता ह्यावर बरेच गुण अवलंबून असतात. 

भारतीय नेमबाजांकडून खूप अपेक्षा होत्या. दुर्दैवानं ह्या ऑलिंपिकमध्ये भारतीय नेमबाजांना फारसं यश मिळालं नाही. ह्या पराभवानं खचून न जाता भारतीय नेमबाजांनी पुढील स्पर्धांत नेत्रदीपक यश मिळवावं ह्याबद्दल त्यांना शुभेच्छा ! हा एक खर्चिक खेळ असल्यानं त्यातील खर्चाचा हिशोब प्रत्येक स्पर्धेनंतर कोणीही मांडू नये ही नम्र विनंती!

बॅडमिंटन हा खेळ आता खऱ्या अर्थानं देशात रुजला आहे. सायना नेहवाल आणि सिंधू ह्या जोडगोळीने जागतिक पातळीवर बऱ्याच स्पर्धांत उच्च दर्जाची कामगिरी केली आहे. सिंधूने ह्या ऑलिंपिकमध्येसुद्धा अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन केले. परंतु दुर्दैवानं उपांत्य फेरीच्या सामन्यात ताई यिंग ह्या तैपेईच्या खेळाडूपुढे तिचा टिकाव लागला नाही. ह्या अगदी बारीक चणीच्या खेळाडूने पहिल्या गेमचा सुरुवातीचा काळ वगळता सिंधूला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. परंतु ह्या पराभवानं खचून न जाता सिंधूने कांस्य पदकाच्या सामन्यात विजयश्री खेचून आणली. लागोपाठच्या दोन ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदके मिळविणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू ! 

कुस्तीमध्ये रवी दहियाने रौप्य आणि बजरंग पुनियाने कांस्य पदकाची कमाई करुन भारतीय चाहत्यांना दिलासा दिला. हळूहळू भारत कुस्तीमध्ये आता ताकदवान राष्ट्रांच्या यादीत जाऊन बसावा ही आशा ! महिला वर्गात सुद्धा कुस्ती स्पर्धेत बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु दुर्दैवानं त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. कुस्तीमध्ये Repechage हा एक लक्षवेधी प्रकार आहे. एखादा कुस्तीवीर प्राथमिक फेरीत समजा हरला पण त्याला हरविणारा खेळाडू जर अंतिम फेरीपर्यंत पोहोचला तर अशा Repechage प्रकाराद्वारे कांस्य पदकापर्यंत मजल मारता येऊ शकते. 

छत्तीस वर्षाच्या मेरी कोमची जिद्द वाखाणण्याजोगी! हिने मोठ्या जिद्दीनं पुढील फेऱ्यांत मजल मारली. बॉक्सिंग ह्या खेळातली गुणपद्धती ही अगम्य असते. ती केवळ मलाच समजत नसावी अशी माझी समजूत होती. पण मेरीचा सुद्धा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. आपण पदक जिंकलो आहोत ही तिची समजूत गैरसमजूत ठरली आणि यंदा ऑलिंपिक पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न अधुरे राहिले. परंतु लोव्हलीना हिने मात्र महिलांच्या Welterweight बॉक्सिंग प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

भारतीय महिला हॉकी संघानं सुरुवातीच्या निराशाजनक कामगिरीनंतर मात्र अत्यंत सुरेख खेळ करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत मिळवलेला विजय दीर्घकाळ लक्षात राहील. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या साखळी सामन्यात हरविले खरे पण नंतर मात्र त्यांनी आपल्या गटातील बाकीच्या संघांना हरवून नेत्रदीपक कामगिरीचे प्रदर्शन केले. साखळीतील त्यांनी अर्जेंटिना संघाविरुद्ध मिळविलेला आणि उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटन संघाविरुद्ध  मिळविलेला विजय संस्मरणीयच म्हणावा लागेल ! कृत्रिम पृष्ठभागावर खेळविल्या जाणाऱ्या हॉकीमध्ये खेळाडूंचा फिटनेस खूप महत्त्वाचा घटक ठरतो. चेंडूवर नियंत्रण मिळविण्यासोबत आपल्या संघानं फिटनेसमध्ये सुद्धा आता कमालीची प्रगती केली आहे. ह्या खेळात कमालीची स्पर्धा आहे. आघाडीचे सात आठ संघ तोडीस तोड आहेत. हे सारे लक्षात घेता भारतीय संघाची ही कामगिरी अधिकच प्रशंसनीय ठरते. पुरुष आणि महिला हॉकी संघांच्या कामगिरीचा आलेख असाच उंचावत जावो ह्या शुभेच्छा ! 

ह्या ऑलिंपिक स्पर्धेआधी अदिती अशोक हे नाव फार थोड्या भारतीय रसिकांनी ऐकलं असावं! ही भारतीय महिला गोल्फ खेळाडू जगात दोनशेव्या स्थानावर होती. पण तिने कमालीची कामगिरी करत चार दिवस चाललेल्या बहात्तर फेऱ्यांच्या स्पर्धेत बहुतांश काळ पहिल्या तिघांत स्थान कायम ठेवलं होतं. पण दुर्दैवानं ती अगदी शेवटच्या क्षणी चौथ्या स्थानावर गेली. तिच्या जिद्दीला सलाम ! 

आणि शेवटी भारताच्या ऑलिंपिक इतिहासात ज्याचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल त्या नीरज चोप्राविषयी ! त्यानं ह्या स्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम फेरी ज्या आत्मविश्वासानं कामगिरी बजावली त्याला तोड नाही ! आज ज्या पद्धतीनं तो वावरत होता त्यावेळी सुवर्णपदकावर केवळ माझा आणि माझाच हक्क आहे ह्याविषयी त्याला पूर्ण खात्री होती. ऑलिंपिक सारख्या जागतिक स्पर्धेत इतक्या शांतपणे इतका आत्मविश्वास दर्शविणे ह्याला तोड नाही ! नीरज तुझा आम्हां सर्वांना खूप खूप अभिमान आहे ! तुझी ही कामगिरी भारताच्या युवा पिढीला खूप प्रोत्साहन देईल ह्याविषयी मला तिळमात्र शंका नाही ! 

"पाने घ्यायची का? " ह्या आवाजानं मी दचकलो. धीरगंभीर आवाज, तो काउंटर सारे काही गायब झाले होते. दिवाणखान्यात अजून बरसात आहे सुरु होते. परंतु मला तिळमात्र दुःख झाले नव्हते. नीरजने भरभरुन आनंदाचं, अभिमानाचे दान साऱ्या भारतीयांच्या पदरात टाकलं आहे ! नीरज, टोकियो ऑलिंपिक मध्ये सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यात स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर आपली सर्वोकृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सर्व क्रीडापटूंचा आम्हांला खूप खूप अभिमान आहे! खेळ आणि खेळाडू एक संस्कृतिपूर्ण राष्ट्र घडवितात . भारताची वाटचाल अगदी योग्य दिशेनं चालू आहे !

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...