मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

निसर्गसाद!




वर्षाऋतूत निसर्ग हिरव्या रंगानं बहरुन जातो. हा निसर्ग कधीकधी आपल्या जवळपासच असतो. ह्यात प्रत्येक वेळा लौकिकार्थानं लोकप्रिय असलेली फुलं झाडं असतातच असं नव्हे ! पण निसर्ग कधीही रंगरुपाच्या आधारावर आपल्या ह्या अपत्यांमध्ये भेदभाव करत नाही!  

निसर्ग आपल्याला का भावतो? निसर्ग रंगांची उधळण करतो ! एखाद्या रंगाच्या किती छटा असु शकतात ह्याची जाणीव आपल्याला करु देण्याचा  निसर्ग प्रयत्न करत राहतो ! 

निसर्ग रंगांसोबत विविध आकारांचे प्रदर्शन भरवतो !  गगनाला भिडु पाहणाऱ्या उंच वृक्षांच्या बरोबरीनं इथं इवली इवली रोपटीसुद्धा आनंदानं नांदत असतात. हे झालं भव्यतेच्या दृष्टीनं आकारांचे वैविध्य ! 

त्यासोबत वर्तुळाकार आणि तत्सम आकारांच्या असंख्य वैविध्याचा नजराणा निसर्ग आपल्यासमोर सादर करतो ! प्रत्येक आकार आपलं एक वैशिष्ट्य बाळगुन असतो ! पावसाळ्यात चार महिना आपल्या समोर बागडणारी इवलीशी रोपटी मग अचानक नाहीशी होतात. त्यांचा रंग, त्यांचा आकार पुन्हा आपल्याला दिसणार की नाही ह्याची काहीशी भिती आपल्या मनात निर्माण होते. परंतु हे सर्व काही वैभव निसर्गानं ह्या रोपट्यांच्या बियांमार्फत  सुखरुप जतन करुन ठेवलेलं असतं ! पुन्हा पावसाळा येतो आणि ह्या बियांद्वारे ह्या असीम सौंदर्याची निसर्ग बहार आणतो ! 

निसर्ग आपल्याला सहजीवनाचा धडा देऊ इच्छितो ! पावसाळ्यात उगवणाऱ्या वेलांचे निरीक्षण करणे हा एक आनंददायी अनुभव असतो ! ही बालमंडळी आपल्याला उभं राहण्यासाठी एखाद्या भरभक्कम आधाराच्या शोधात असतात ! प्रत्येक वेळा हा आधार जवळपास असतोच असं नाही ! मग आपल्याला दिसुन येते ती ह्या वेलांनी आधाराच्या दिशेनं घेतलेली लांबलचक झेप ! 

बऱ्याच वेळा जिथं ही झाडं जन्म घेतात तिथं आधीच त्यांच्या वरिष्ठांनी  जम बसविलेला असतो. अशा वेळी सूर्यप्रकाशाच्या शोधात ह्या झाडांनी केलेली कसरत पाहण्यासारखी असते. सुरणाची काही झाडं अशाच गर्दीच्या ठिकाणी उगवली ! भोवताली असलेल्या जास्वंदीच्या झाडांहून उंच होण्यासाठी ह्या सुरणांनी आधी उंचच उंच खोडाची व्यवस्था केली!  वर्षानुवर्षे कित्येक पावसाळे पाहणारी झाडं आणि चार महिने ह्या भुतलावर येऊन नाहीशी होणारी झाडं ह्यांच्यात नक्की कोणतं हितगुज होत असेल? 

सहजीवन जसं झाडांमध्ये दिसुन येतं तसंच ते झाडं आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा जाणवतं.  धो धो पडत असणाऱ्या पावसानं दहा पंधरा मिनिटं विश्रांती घेतली असताना अचानक लांबवरुन उडत आलेला पक्षी जास्वंदीच्या झाडावर विसावतो. ते झाडसुद्धा आपल्या अंगावरील फुलांतील मधाचं त्या छोट्याशा पक्षाला मनमुराद प्राशन करुन देतं ! "जा बाळा लवकर आपल्या घरट्यात जा, पाऊस येईल आणि तू भिजशील !" जणु काही हे झाड त्याला सांगत असावं असा भास आपल्याला होत राहतो ! 

पावसाळ्यात तेरडा उगवतो ! त्याचं रान होतं. ह्या रानात एक छोटेखानी जैविकसंस्था उदयास येते! गेले कित्येक महिने नाहीशी झालेली फुलपाखरं अचानक ह्या रानात दिसु लागतात. नक्की कोणत्या फुलाचा मध प्यावा ह्याबाबतीत त्यांचा उडालेला गोंधळ पाहण्यात एक वेगळीच गंमत असते ! रंगीबेरंगी फुलपाखरांकडं लक्ष जाणं स्वाभाविक असलं तरीही ह्या तेरड्याच्या रानात भुंगे, चतुर, सुया ही मंडळी सुद्धा गुण्यागोविंदानं राहत असतात.  पावसाळ्यात ह्या निसर्गदर्शनासाठी बाहेर पडलं तर सर्व काही आलबेल असतेच असं नाही ! ऍमेझॉन जंगलात जसे विषारी जनावरांचं वास्तव्य आढळुन येते त्याचप्रमाणं आपल्या भोवताली फेरफटका मारायला बाहेर पडलं की डास, खाज आणणाऱ्या वनस्पती ह्यांपासून सावध रहावं लागतं. एखादा फोटो घेण्यात जरा जास्तच तन्मयता दाखवली की ह्यांच्या उपद्रवी स्पर्शानं आपण तात्काळ भानावर येतो ! पण हेही निसर्गाचा भागच की ! 

अंगणात मोठाले लाल मुंगळे असतात. पावसाळा येण्याआधी महिनाभर आंब्याच्या झाडावर वॉटरप्रुफ घरटे बांधण्यासाठी त्यांची जोरदार धडपड सुरु असते. आंबे पाडण्यासाठी आखा (बहुदा स्थानिक शब्द !) घेऊन आपण आणलेला त्यांच्या ह्या सुनियोजित कामातील व्यत्यय त्यांना अजिबात खपत नाही. जे कोणी एक दोघे आपल्या अंगावर पडतात ते जोरदार चावा घेऊन समस्त मुंगळे मंडळींतर्फे आपला निषेध व्यक्त  करतात.  

हे सहजीवन सदैव शांततामय असतंच असं नाही ! काल बावखलात दुपारच्या वेळी अदिलवट (बहुदा स्थानिक शब्द !) निवांतपणे पाण्याच्या वर डोकं काढुन होता. त्याला बहुदा कसली घाई नसावी! माझी  चाहुल लागताच तो काठाच्या दिशेनं पोहु लागला ! त्याच्यावर कुवाकोंबडीचा  (पुन्हा स्थानिक शब्द) प्रचंड राग असावा. ती बेताबेतानं अंतर राखत त्याचा पाठलाग करु लागली. हा पाठलाग अदिलवट काठाला लागुन बहुदा त्याच्या बिळात जाईस्तोवर चालु होता. बहुदा त्यानं तिची अंडी फस्त केली असावीत ! 

अशाच एका अशांततामय सहजीवनाचं उदाहरण कावळे आणि मांजरीच्या बाबतीत दिसुन आलंय ! ही मांजर अंगणातुन एका टोकाकडुन दुसरीकडे जाताना कावळ्यांनी तिचा असा पिच्छा पुरविला की आधी अगदी आरामात चालणाऱ्या मांजरीला धाव घेण्यावाचुन पर्याय उरला नाही ! 

आता इतक्या प्रदीर्घ प्रस्तावनेनंतर ह्यावर्षातील आणि आधीच्या वर्षात प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांचे हे संकलन !फेसबुकवरील माझ्या मित्रांना ह्या पोस्टमध्ये पुनरावृत्ती आढळणार आहे. वरील उल्लेखलेल्या दृष्टीकोनातुन खालील छायाचित्रांकडं पहा ! वेगळं काही जाणवतं का पहा ! 
















































































शनिवार, २५ जुलै, २०२०

टोमॅटो केचप - भाग 3


आधीच्या भागाच्या लिंक्स 

भाग पहिला 
https://patil2011.blogspot.com/2020/07/blog-post_21.html

भाग दुसरा 
https://patil2011.blogspot.com/2020/07/2.html

आपल्या बॉसचे या महत्वाच्या प्रकरणात लक्ष वेधून घेण्यासाठी बर्नीला बरेच कष्ट करावे लागले. एकतर ६८ वर्षापूर्वी शेवटी लॉगइन झालेले अकाउंटला आता पुन्हा लॉगइन केलं जातं म्हणजे कुठे तरी पाणी मुरत आहे हे बर्नीला नीट समजावून सांगता येत नव्हतं किंवा त्याच्या बॉसला ह्या प्रकरणाचं गांभीर्य कळत नव्हतं. शेवटी एकदाचा  बर्नी आपल्या बॉसला आपलं म्हणणं पटवुन देण्यात यशस्वी झाला. 

मग मात्र बॉसने झटपट सूत्र हलवुन महाराष्ट्र पोलिसांच्या योग्य त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. शाल्मलीचा प्रवास वेगाने चालू होता. रस्त्यावरील वाहतुक एव्हाना काहीशी तुरळक झाल्यानं गाडी ऑटोपायलट मध्ये टाकण्यासाठी सुद्धा तिला संधी मिळाली होती.  त्यामुळे तिचं विचारचक्र जोरात सुरु होतं. तरीही बॅकमिरर मधुन सतत डोकावणाऱ्या गाडीनं तिला काहीसं विचलित करण्यास सुरुवात केली होती.  मग तिनं  स्वतः गाडीचा ताबा घेऊन थोडा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. पण ही कार तिला ओव्हरटेक करण्याच्या अजिबात घाईत नव्हती. 

शाल्मलीचा मेंदू एव्हाना खूपच जागृत झाला होता. तिने आपला पाठलाग केला जात आहे हे तिनं मान्य केलं होतं. आपला पाठलाग पृथ्वीवर तो सुद्धा काहीशा अपरिचित प्रदेशात होत आहे हे तिला पुरेसं धोकादायक वाटलं. काही केलं तरी ती चंद्राची नागरिक होती त्यामुळे तिच्या सुरक्षिततेची प्राथमिक जबाबदारी चंद्रांच्या अधिकाऱ्यांकडे होती. तिनं पुन्हा एकदा गाडी ऑटोपायलट टाकून काही मेसेजेस पाठवले. 

शाल्मलीचा पाठलाग करणारा सामंत पुर्ण  उत्साहात आला होता. बऱ्याच दिवसांनी एखाद्या सनसनाटी कामगिरीत सहभागी व्हायची संधी त्याला मिळाली होती. परंतु सावजाचं लक्ष न वेधता पाठलाग करण्यात त्याला यश मिळाले नव्हतं. अचानक त्याचा फोन खणखणला.  "पाठलाग ताबडतोब थांबवावा!" हा संदेश मिळताच
 ठेवणीतले काही शब्द उच्चारून सामंतने पुढील उपलब्ध एक्झिट घेतला.  तेथील फूड मॉलमध्ये जाऊन तोआपला राग शांत करीत तो बसला. 

सामंतांचा बॉस असणाऱ्या  तळेकरचा मात्र भेजा खलास झाला होता. प्रथम 
अमेरिकेतून कॉल येऊन त्याला द्रुतगती मार्गावर त्याला आपल्या माणसाला पाठलाग करण्याचे  आदेश द्यावे लागले होते. पाठलाग अगदी रंगात येताच मात्र एका तासातच चंद्रावरून एक अशक्यप्राय व्यक्तीने त्याला हुकुमी स्वरात पाठलाग रद्द करण्याचे आदेश दिले होते. 

गाडी जशी दिसेनाशी झाली तसे शाल्मलीने सुटकेचा निश्वास टाकला. गुहागरला पोहोचेस्तोवर रात्रीचे दहा वाजले होते. तिनं तिथलं एक छोटेखानी पण चांगलं हॉटेल बुक केलं. फ्रेश होऊन कुतूहल न शमल्यानं शाल्मली पुन्हा नीलाच्या फेसबुक अकाउंटला लॉग इन करती झाली.  "हॅलो" नीलाच्या अकाउंटवर कोणीतरी तिला पिंग केले होते. "हाय" शाल्मलीने त्या पिंगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला खरा पण त्यानंतर आपण हे बरोबर केले का या विचारात ती पडली होती.  "या अकाउंटवर कोण लॉग इन आहे?" अशी समोरुन विचारणा झाली.  ह्या उद्धट माणसाला काय उत्तर द्यावे ह्या विचारात असताना नीलाला प्रत्यक्षात ओळखणारे कोणीतरी अजूनही जिवंत आहे हा विचार तिला काहीसा दिलासा देऊन गेला. 

"मी आहे राजेश!" शाल्मलीने धडधडीत खोटं उत्तर दिलं.  "आपण कोण आहात?" शाल्मलीने राजेशच्या पडद्याआडून काहीसा धाडसी प्रश्न विचारला. थोडावेळ समोरून काही उत्तर आले नाही. मग आपण कुठे आहात हा प्रश्न तिने विचारला. "मी कोकणात गुहागरला आहे" ह्या उत्तराने तिच्या अंगावर शहाऱ्याची लहर पसरुन गेली. "मी सुद्धा.... " तिच्या तोंडात आलेले हे वाक्य पूर्ण होण्याच्या आधी कोणत्यातरी अद्भुत शक्तीने तिला थांबविलं अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. 

काहीशा भितीनं तिनं घाईघाईनं लॉगआऊट केलं खरं पण  तिची उत्सुकता तिला स्वस्थ बसु देत नव्हती. तिनं पंधरा मिनिटांनी पुन्हा लॉगइन केलं. ती व्यक्ती ऑनलाइन नव्हती. शाल्मलीनं नीलाच्या अकाउंटची बारकाईनं तपासणी सुरू केली. आता ज्या व्यक्तीने पिंग केले होते त्या व्यक्तीचे आणि निलाचे बरेच सामायिक मित्र होते. त्या मित्रांच्या यादीवर लक्ष टाकताना एका नावाने तिचे लक्ष वेधून घेतले. सरंजामे नावाची एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीची आणि नीलाची फ्रेंड हिस्टरी पाहताना बऱ्याच गोष्टी शाल्मलीला उलगडत गेल्या होत्या. 

सरंजामे आणि नीला कॉलेजच्या जीवनात प्रथम एकत्र भेटले होते. त्यानंतर बहुधा एकत्रही आले होते. परंतु काही कारणाने मध्ये अनेक वर्ष दोघांचा संपर्क नसावा असे एकंदरीत वाटत होते. अचानक २०१९ साली पुन्हा सरंजामे नीलाच्या संपर्कात आला होता. तिथून मग मात्र नीलाच्या जीवनात खळबळ माजण्यास सुरुवात झाली होती. शाल्मली इतक्या सर्व काही विचारात असताना " हॅलो!" पुन्हा एकदा समोरील व्यक्तीने पिंग केले! या व्यक्तीचे नाव होते जोशी. वय वर्षे ८५ म्हणजे नीला आणि शाल्मली या दोघांना जाणणारी सध्यातरी एकमेव व्यक्ती ! "मी इथे कोकणातच आहे,  मी उद्या गुहागरला येऊ शकतो!" राजेशच्या अवतारातील शाल्मली म्हणाली.  "सकाळी ११ वाजता!" शाल्मलीला आपला विचार बदलण्याची संधी न देता जोशी आजोबा म्हणाले आणि क्षणार्धात गायब झाले सुद्धा !

शाल्मलीला आता मात्र झोप येऊ लागली होती. पण इतक्यात तिला काहीतरी सुचलं ! तिनं एक मेसेज टाकला आणि पाचव्या मिनिटाला तिचा बॉस नॅथनची हॉलॉग्राफिक प्रतिमा तिच्यासमोर अवतीर्ण झाली होती. "शाल्मली, हा काय प्रकार सुरु आहे?" त्यानं काहीशा दरडावणीच्या सुरात विचारलं. "थोडंसं धाडस सुरु आहे इतकंच !" शाल्मली म्हणाली. तो बहुदा कामात खूप गर्क होता. "टेक केअर !" इतकं बोलुन तो गायब झाला ! आणि दमलीभागली शाल्मली सुद्दा दोन मिनिटात झोपी गेली! 

त्या छोटेखानी रेस्टाँरंटमध्ये जोशीआजोबांना शोधुन काढण्यास शाल्मलीला फारसा वेळ लागला नाही ! "राजेश!" त्यांच्यासमोर आत्मविश्वासानं जात, मिळवत आणि खुर्ची सरकवत आसनस्थ होत शाल्मली म्हणाली. 

"ओह आय सी !" आपल्या चेहऱ्यावरील आश्चर्य लपविण्याचा प्रयत्न करीत आजोबा म्हणाले. 

"तु निलाचे अकाऊंट हॅक का आणि कसं केलंस ?" आजोबांनी थेट मुद्द्याला हात घातला. 

"कोकणाविषयीच्या माझ्या आकर्षणामुळं मी नीलाताईंच्या अकाउंटपर्यंत पोहोचले ! आणि ... " 

"तू करतेस काय? " जोशीआजोबांनी  तिला अडवलं ते बहुदा तिच्याकडुन आपल्याला अकाउंटविषयी काही खरी माहिती मिळणार नाही ह्याची खात्री पटल्यानं !

"मी चंद्रावर असते ! आणि बाकी काही सांगु शकत नाही !" शाल्मली म्हणाली. 

जोशीआजोबांच्या चेहऱ्यावरील भाव पालटले होते ! 

"आपण नीलाताईंचे कोण ?" शाल्मलीने प्रश्न विचारला. 

"त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध होते!" जोशीआजोबा तुटकपणे म्हणाले. त्यांच्या डोक्यात विचारचक्र  सुरु होती ह्यात शंका नव्हती !

आता पुढं बोलायचं काय ह्याविषयी शाल्मलीला प्रश्न पडला होता !  
"त्यावेळचं कोकण किती छान होतं किनई !" तिच्या तोंडुन किनई शब्द ऐकुन जोशीआजोबांइतकीच तीही आश्चर्यचकित झाली होती. आजोबा काही बोलण्याच्या मुडमध्ये नसल्यानं तिचीच गडबड सुरु होती. खरंतर ती एक मितभाषी व्यक्ती होती. परंतु आज काहीतरी आगळंवेगळं घडत होतं!   आणि बोलताबोलता 

"हे सरंजामे कोण हो ?" हा प्रश्न तिच्या तोंडुन निघाला ! आजोबांच्या चेहऱ्यावरील भाव आता पुर्णपणे पालटले. त्यानंतर त्यांना आलेली खोकल्याची उबळ खोटी आहे हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नव्हती ! त्याचं निमित्त करुन "मी आलो थोड्याच वेळात!" म्हणुन ते घाईघाईनं आतील कक्षात असलेल्या वॉशबेसिन मध्ये गेले ! 

का कोणास एका अनामिक भितीच्या भावनेनं शाल्मलीला स्पर्श केला होता. "U5435" तिनं नॅथनला मेसेज केला. "मला मदतीची तातडीनं गरज आहे " असा त्याचा अर्थ होता. नॅथन इतक्या त्वरित कशी मदत करणार ह्याविषयी तिच्या मनात शंका होतीच! घाईघाईनं तिनं रेस्टॉरंटमधुन काढता पाय घेतला.  

"गुड मॉर्निंग !" बाहेर उभ्या असलेल्या एका देखण्या युवकानं तिला साद दिली. साडेअकरा वाजता एकट्या दुकट्या तरुणीला पाहुन गुड मॉर्निंग करणाऱ्या तरुणांविषयी २०९० साली सुद्धा तरुणींच्या मनात काही सॉफ्ट कॉर्नर असण्याची शक्यता कमीच होती ! पण प्रसंग वेगळा होता. शाल्मली त्या तरुणासोबत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्याच्या कारकडं चालु लागली होती !

(क्रमशः)

गुरुवार, २३ जुलै, २०२०

टोमॅटो केचप - भाग 2



T O m A t O K e T c H u P 

लाल भगव्या रंगांच्या त्या अगडबंब अक्षरांनी neela.limayeabcd चे अकाऊंट लॉग इन झालं होते. "अय्या किती मस्त DP होता हिचा !" शाल्मलीच्या तोंडातुन आपसुकच शब्द बाहेर पडले !  शाल्मली हळुहळू त्या नीलाच्या विश्वात रंगत गेली. विसाव्या शतकातील हिरव्यागार कोकणच्या नयनरम्य फोटोंनी निलाची प्रोफाइल व्यापुन टाकली होती. "अरे वा ! " ती मनातल्या मनात म्हणाली. आपण ज्या कोकणच्या केवळ कथाच ऐकल्या ते प्रत्यक्ष फोटोतुन बघण्याची संधी तिला मिळाली होती !

हिचा जन्म किती सालचा असावा बरे ? हा विचार येण्याच्या एका मिनिटातच ती निलाच्या account information विभागात होती. २४-सप्टेंबर-१९६४ ही निलाची जन्मतारीख पाहुन तिच्या पायाखालील जमीन सरकल्याचा  तिला भास झाला. तरीही मनाची समजुत म्हणुन तिनं आपलं ID कार्ड पुन्हा एकदा निरखुन पाहिलं. शाल्मली सरपोतदार जन्मतारीख २४-सप्टेंबर-२०६४!

आता शाल्मली तिथुन बाहेर निघणं केवळ अशक्य होतं. त्यानंतर तिला पुढील एक धक्का मिळाला. नीलाच्या ह्या प्रोफाईलवर २०२२ सालानंतर  नोंदी दिसत नव्हत्या. नाही म्हणायला "तु आमच्या सदैव लक्षात राहशील!" "एक हसतं खेळतं दिलखुलास व्यक्तिमत्व !" वगैरे कॉमेंट्स होत्या ! ह्या नीलाला वाहिलेली श्रद्धांजली आहे हे कळायला शाल्मलीला वेळ लागला होता ! म्हणजे ह्या बाई अठ्ठावनाव्या वर्षी स्वर्गवासी झाल्या ! शाल्मली स्वतःशी म्हणाली ! 

शाल्मली थोडी अजुन पुढे सरकली तर एक विशेष गोष्ट तिच्या ध्यानात आली ! २०१९ सालापासून बऱ्याचशा पोस्टचे प्रायव्हसी सेटिंग Only Me असे होते.  आणि ह्या पोस्टमध्ये बरीचशी गुप्त माहिती नोंदवली गेली आहे हे शाल्मलीला सहजासहजी समजत होते. "कोण्याच्या अकाउंट मध्ये असं डोकावुन पाहणे चुकीचं आहे" हे तिच्या सद्सद् विवेकबुद्धीनं तिला समजावलं. तिने जवळपास लॉग आऊटचा पर्याय स्वीकारला होताच पण अचानक तिचं लक्ष गेलं, "तु मला का त्रास देतोयस ! मी तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टींचा ताबा तुला दिलाय ना ?" ह्या प्रायव्हसी सेटिंग Only Me असलेल्या अजुन एका पोस्टकडे !

तो पुर्ण दिवस शाल्मली त्या अकाऊंटवरच होती ! प्रायव्हसी सेटिंग Only Me असलेल्या नोंदी तिला एका गूढ विश्वात घेऊन जात होत्या ! सायंकाळचे चार वाजले होते. आई वडिलांनी आफ्रिकेतुन केलेला कॉल तिनं धुडकावून लावला होता.  बरोबर चार वाजुन पंधरा मिनिटांनी शाल्मली सरपोतदार आपली आलिशान गाडी घेऊन मुंबई कोकण ह्या बारा पदरी आलिशान द्रुतगती मार्गावरुन निघाल्या होत्या ! 

सॅनफ्रॅन्सिस्को मध्ये राहणारा आणि फेसबुकच्या जुन्या कर्मचारीवर्गापैकी एक बर्नी सकाळी आपल्या घरुन लॉगिन झाला होता. सर्व Health Check रिपोर्ट्सवर नजर टाकुन सर्वकाही आलबेल असल्याची खातरजमा करुन घेण्याची त्याची जबाबदारी होती ! लॉगिन केल्यानंतर बरोबर दुसऱ्या मिनिटाला त्याची चाणाक्ष नजर एका नोंदीवर पडली होती. गेले ६८ वर्षे निष्क्रिय असलेल्या अकाउंटवर कोणीतरी लॉगिन केले होते. ज्या गॅजेटमधुन हे लॉगिन झालं होते ते गॅजेट प्रतिताशी १५० किमी वेगानं अशा ठिकाणी जात होतं जिथं त्या अकाउंटने १९९० ते २०२२ सालांपर्यंत सक्रियता दर्शवली होती ! 

(क्रमशः )

पहिला भाग 
https://patil2011.blogspot.com/2020/07/blog-post_21.html 



मंगळवार, २१ जुलै, २०२०

टोमॅटो केचप - भाग १



साल - २०९० 

चंदावरील आपली आठ महिन्याची वार्षिक नेमणूक संपवून शाल्मली पृथ्वीवर परतली होती.  चंद्रावरून परत येण्याची ही तिची पहिलीच वेळ नसली तरी पृथ्वीवरील वेळेला सराव होण्यासाठी तिला एक आठवडा नक्कीच जात असे. वर्षातून आठ महिने चंद्रावर नेमणूक, पृथ्वीवर त्यानंतर तीन महिने सुट्टी आणि मग पृथ्वीवरून एक महिना कामाला सुरुवात असेच तिचे वेळापत्रक गेले सहा वर्ष सुरू होते. तिचे आई-वडील आफ्रिकेत वसवल्या गेलेल्या मराठी वसाहतीत राहत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते आफ्रिकेतील हवामानाला बरेचसे सरावले होते.  शाल्मली त्यांना महाराष्ट्र मुंबई भेटीला येण्याचा आग्रह करत होती. परंतु यावर्षी मात्र काहीसे तयार नाही असे तिला वाटु लागले होते. 

मुंबईतील त्यांचा फ्लॅट प्रशस्त होता. इथं या अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्स मध्येच  शेती आणि दुग्धव्यवसाय विकसित केले गेल्यामुळे तिची याबाबतीत गैरसोय होण्याची शक्यता तशी कमीच होती. तिच्या लग्नाचा विषय तिच्यासोबत चर्चेला आणणं म्हणजे उगाच मनस्ताप करून घेणं याची तिच्या आईला आई-वडिलांना पूर्ण कल्पना असल्यानं हल्ली त्यांनी हा विषय तिच्यासोबत काढणार टाळलं होतं. मंगळावरील वसाहतीमध्ये कायम वास्तव्य करण्यासाठी आपला क्रमांक कधी लागतो याची ते वाट पाहत होते. 

अशाच एका रात्री झोपेची वाट पाहत असतानाच शाल्मलीने आपले जुने पुराणे फेसबुक अकाउंट उघडले. तिनं दहा वर्षापुर्वी उघडलेलं हे अकाउंट ती पृथ्वीवरील वास्तव्यात वापरत असे. पृथ्वीवरील मित्रमैत्रिणींशी थोडाफार संपर्क ठेवण्यासाठी हे अकाउंट कामास येत असे. चंद्रावरील मनुष्य आणि परग्रहवासी ह्यांच्या संयुक्त वसाहतीत असले उद्योग करणं तिला शक्य होत नसे. तिच्या मेंदुला आकर्षित करेल असला कोणताही अपडेट तिला पहिल्या नजरेत दिसला नाही. ती लॉगऑऊट करणार इतक्यात तिची नजर People You May Know ह्या विभागाकडं गेली. 

नीला लिमये ह्या व्यक्तीच्या प्रोफाईलकडे लक्ष जाताच तिच्या मनात काहीशी अस्पष्टशी बैचैनीची भावना जाणवुन गेली. असेल काही तरी अशी मनाची समजुत काढुन ती परत झोपण्याचा प्रयत्न करु लागली.  कधीतरी तिला झोप लागली. तिला अधुनमधून स्वप्नं पडत. आजही असंच काही स्वप्न पडत राहिलं. सुरुवातीला काहीसं सर्वसाधारण भासणाऱ्या स्वप्नानं मग मात्र काहीसं वेगळं रुप घेतलं. भोवताली अफाट विस्तार असलेली पोकळी तिच्यासमोर होती. त्या पोकळीत लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे कोणत्याही क्रमानं तिच्याभोवती वेगानं येत आणि निघुन जात होती. काही वेळ असंबद्ध वाटणारा ह्या क्रमात काहीतरी एक पॅटर्न आहे हे जाणवायला तिच्या कुशाग्र मेंदुला वेळ लागला नाही! Fibonacci series च्या क्रमातील अक्षरेच फक्त जर लक्षात ठेवली तर एक विशिष्ट शब्द तयार होतोय हे तिला समजलं. तो शब्द तिच्या मेंदूने कुठंतरी नोंदवुन ठेवला. ह्या शब्दांची ही कसरत थांबली तेव्हा अचानक @gmail.com ही शब्दसाखळी एक सेकंद तिच्या डोळ्यासमोर आली आणि सर्व काही शांत झालं. ह्या नंतर तिला कधी झोप लागली हे तिला समजलंच नाही !  

दुसऱ्या दिवशी तिला जाग आली तिला जवळपास दुपारचे बारा वाजले होते. सर्व काही आटपुन ती फुरसतीत बसली नसेल तितक्यात तिच्यासमोर ती लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे पुन्हा एकदा पिंगा घालु लागली ! ती खरंतर कधी बैचैन होत नसे पण हा प्रकार तिला नक्कीच त्रासदायक होत होता. तिनं मग काही काळ नृत्य केलं, विविध प्रकारचं संगीत ऐकलं पण फारसा फरक पडत नाही हे तिला ध्यानात आलं. दमली भागली शाल्मली त्रस्त मनानं पुन्हा एकदा लॅपटॉपवर बसली.आजच्या दिवसात तिच्यासाठी काही ठीक घडावं असं नियतीला मान्य नसावं! फेसबुक उघडता क्षणीच तिच्यासमोर नीला लिमयेची प्रोफाइल आली! 

शाल्मली ह्या क्षणी आपलं संतुलन गमवून बसली. चंद्रावरील आपल्या अवतारात ती एक प्रसिद्ध संशोधक होती. तिचा मेंदु कसा विचार करेल ह्याचा तिलाही बऱ्याच वेळा थांगपत्ता लागत नसे. आपल्या मेंदुवर कोणी बाह्य शक्ती ताबा घेत असावी असा तिला दाट संशय होता. आताही असेच झालं. तिनं आपल्या अकाउंटमधुन लॉगऑऊट केलं आणि Login into new account हा पर्याय स्वीकारला. neela.limayeabcd  ह्यातील abcd हे वर्ष आपण का टाईप केला ह्याचा तिला विचार करायचा नव्हता. ई-मेलचा उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी ती गोंधळली ते क्षणभरच ! @gmail.com ची स्वप्नातील शब्दसाखळी तिच्यासमोर स्पष्टपणे झळकली होती ! 

आता प्रश्न होता तो पासवर्डचा ! लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे तिच्या चांगलीच लक्षात होती ! 
(क्रमशः )

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...