मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

निसर्गसाद!




वर्षाऋतूत निसर्ग हिरव्या रंगानं बहरुन जातो. हा निसर्ग कधीकधी आपल्या जवळपासच असतो. ह्यात प्रत्येक वेळा लौकिकार्थानं लोकप्रिय असलेली फुलं झाडं असतातच असं नव्हे ! पण निसर्ग कधीही रंगरुपाच्या आधारावर आपल्या ह्या अपत्यांमध्ये भेदभाव करत नाही!  

निसर्ग आपल्याला का भावतो? निसर्ग रंगांची उधळण करतो ! एखाद्या रंगाच्या किती छटा असु शकतात ह्याची जाणीव आपल्याला करु देण्याचा  निसर्ग प्रयत्न करत राहतो ! 

निसर्ग रंगांसोबत विविध आकारांचे प्रदर्शन भरवतो !  गगनाला भिडु पाहणाऱ्या उंच वृक्षांच्या बरोबरीनं इथं इवली इवली रोपटीसुद्धा आनंदानं नांदत असतात. हे झालं भव्यतेच्या दृष्टीनं आकारांचे वैविध्य ! 

त्यासोबत वर्तुळाकार आणि तत्सम आकारांच्या असंख्य वैविध्याचा नजराणा निसर्ग आपल्यासमोर सादर करतो ! प्रत्येक आकार आपलं एक वैशिष्ट्य बाळगुन असतो ! पावसाळ्यात चार महिना आपल्या समोर बागडणारी इवलीशी रोपटी मग अचानक नाहीशी होतात. त्यांचा रंग, त्यांचा आकार पुन्हा आपल्याला दिसणार की नाही ह्याची काहीशी भिती आपल्या मनात निर्माण होते. परंतु हे सर्व काही वैभव निसर्गानं ह्या रोपट्यांच्या बियांमार्फत  सुखरुप जतन करुन ठेवलेलं असतं ! पुन्हा पावसाळा येतो आणि ह्या बियांद्वारे ह्या असीम सौंदर्याची निसर्ग बहार आणतो ! 

निसर्ग आपल्याला सहजीवनाचा धडा देऊ इच्छितो ! पावसाळ्यात उगवणाऱ्या वेलांचे निरीक्षण करणे हा एक आनंददायी अनुभव असतो ! ही बालमंडळी आपल्याला उभं राहण्यासाठी एखाद्या भरभक्कम आधाराच्या शोधात असतात ! प्रत्येक वेळा हा आधार जवळपास असतोच असं नाही ! मग आपल्याला दिसुन येते ती ह्या वेलांनी आधाराच्या दिशेनं घेतलेली लांबलचक झेप ! 

बऱ्याच वेळा जिथं ही झाडं जन्म घेतात तिथं आधीच त्यांच्या वरिष्ठांनी  जम बसविलेला असतो. अशा वेळी सूर्यप्रकाशाच्या शोधात ह्या झाडांनी केलेली कसरत पाहण्यासारखी असते. सुरणाची काही झाडं अशाच गर्दीच्या ठिकाणी उगवली ! भोवताली असलेल्या जास्वंदीच्या झाडांहून उंच होण्यासाठी ह्या सुरणांनी आधी उंचच उंच खोडाची व्यवस्था केली!  वर्षानुवर्षे कित्येक पावसाळे पाहणारी झाडं आणि चार महिने ह्या भुतलावर येऊन नाहीशी होणारी झाडं ह्यांच्यात नक्की कोणतं हितगुज होत असेल? 

सहजीवन जसं झाडांमध्ये दिसुन येतं तसंच ते झाडं आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा जाणवतं.  धो धो पडत असणाऱ्या पावसानं दहा पंधरा मिनिटं विश्रांती घेतली असताना अचानक लांबवरुन उडत आलेला पक्षी जास्वंदीच्या झाडावर विसावतो. ते झाडसुद्धा आपल्या अंगावरील फुलांतील मधाचं त्या छोट्याशा पक्षाला मनमुराद प्राशन करुन देतं ! "जा बाळा लवकर आपल्या घरट्यात जा, पाऊस येईल आणि तू भिजशील !" जणु काही हे झाड त्याला सांगत असावं असा भास आपल्याला होत राहतो ! 

पावसाळ्यात तेरडा उगवतो ! त्याचं रान होतं. ह्या रानात एक छोटेखानी जैविकसंस्था उदयास येते! गेले कित्येक महिने नाहीशी झालेली फुलपाखरं अचानक ह्या रानात दिसु लागतात. नक्की कोणत्या फुलाचा मध प्यावा ह्याबाबतीत त्यांचा उडालेला गोंधळ पाहण्यात एक वेगळीच गंमत असते ! रंगीबेरंगी फुलपाखरांकडं लक्ष जाणं स्वाभाविक असलं तरीही ह्या तेरड्याच्या रानात भुंगे, चतुर, सुया ही मंडळी सुद्धा गुण्यागोविंदानं राहत असतात.  पावसाळ्यात ह्या निसर्गदर्शनासाठी बाहेर पडलं तर सर्व काही आलबेल असतेच असं नाही ! ऍमेझॉन जंगलात जसे विषारी जनावरांचं वास्तव्य आढळुन येते त्याचप्रमाणं आपल्या भोवताली फेरफटका मारायला बाहेर पडलं की डास, खाज आणणाऱ्या वनस्पती ह्यांपासून सावध रहावं लागतं. एखादा फोटो घेण्यात जरा जास्तच तन्मयता दाखवली की ह्यांच्या उपद्रवी स्पर्शानं आपण तात्काळ भानावर येतो ! पण हेही निसर्गाचा भागच की ! 

अंगणात मोठाले लाल मुंगळे असतात. पावसाळा येण्याआधी महिनाभर आंब्याच्या झाडावर वॉटरप्रुफ घरटे बांधण्यासाठी त्यांची जोरदार धडपड सुरु असते. आंबे पाडण्यासाठी आखा (बहुदा स्थानिक शब्द !) घेऊन आपण आणलेला त्यांच्या ह्या सुनियोजित कामातील व्यत्यय त्यांना अजिबात खपत नाही. जे कोणी एक दोघे आपल्या अंगावर पडतात ते जोरदार चावा घेऊन समस्त मुंगळे मंडळींतर्फे आपला निषेध व्यक्त  करतात.  

हे सहजीवन सदैव शांततामय असतंच असं नाही ! काल बावखलात दुपारच्या वेळी अदिलवट (बहुदा स्थानिक शब्द !) निवांतपणे पाण्याच्या वर डोकं काढुन होता. त्याला बहुदा कसली घाई नसावी! माझी  चाहुल लागताच तो काठाच्या दिशेनं पोहु लागला ! त्याच्यावर कुवाकोंबडीचा  (पुन्हा स्थानिक शब्द) प्रचंड राग असावा. ती बेताबेतानं अंतर राखत त्याचा पाठलाग करु लागली. हा पाठलाग अदिलवट काठाला लागुन बहुदा त्याच्या बिळात जाईस्तोवर चालु होता. बहुदा त्यानं तिची अंडी फस्त केली असावीत ! 

अशाच एका अशांततामय सहजीवनाचं उदाहरण कावळे आणि मांजरीच्या बाबतीत दिसुन आलंय ! ही मांजर अंगणातुन एका टोकाकडुन दुसरीकडे जाताना कावळ्यांनी तिचा असा पिच्छा पुरविला की आधी अगदी आरामात चालणाऱ्या मांजरीला धाव घेण्यावाचुन पर्याय उरला नाही ! 

आता इतक्या प्रदीर्घ प्रस्तावनेनंतर ह्यावर्षातील आणि आधीच्या वर्षात प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांचे हे संकलन !फेसबुकवरील माझ्या मित्रांना ह्या पोस्टमध्ये पुनरावृत्ती आढळणार आहे. वरील उल्लेखलेल्या दृष्टीकोनातुन खालील छायाचित्रांकडं पहा ! वेगळं काही जाणवतं का पहा ! 
















































































1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...