मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

२०२५ - शिकवण


'२०२५ - आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा जरी चांगला लेख असला तरी छायाचित्रांनीच जास्त व्यापलेला होता अशी दिलखुलास प्रतिक्रिया मिळाली. तिचा स्वीकार करून २०२५ ने दिलेल्या काही शिकवणुकींची ही नोंद !

१.  मनुष्य निसर्गाचा झपाट्यानं ऱ्हास करत आहे, हे न पटणारी आपल्यासारखी अनेक माणसं भोवताली भेटतात. परंतु भोवतालच्या परिस्थितीवर अशा माणसांच्या मतांचा काहीच प्रभाव पडू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मी २०१० साली ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी आपल्या लिखाणानं भोवतालच्या परिस्थितीत काही सकारात्मक बदल घडून येईल असा भोळा आशावाद बाळगुन होतो. हा आशावाद संपुन काही वर्षे झाली, पण ज्या मोजक्या लोकांना ही मतं वाचुन बरं वाटत राहतं त्यांच्यासाठी आणि माझ्या मानसिक समाधानासाठी माझं हे लिहिणं मी सुरु ठेवणार आहे. 

२. कार्यालयात भोवताली असणारी बुद्धिमान तरूण मुलं ही मला भवितव्याविषयी असणारा माझा आशावाद कायम ठेवायला प्रचंड मदत करतात. ही केवळ बुद्धिमानच असतात असं नव्हे तर आपल्या पद्धतीनं संस्कृतीची जपणुक करण्याचा प्रयत्न ह्यातील काहीजण करत असतात. भोवताली सकारात्मकता आहे फक्त तिचा शोध घेता यायला हवा. संस्कृतीची जपणुक केवळ आपल्याला अपेक्षित असलेल्या पद्धतीनंच केली जावी हा अट्टाहास चुकीचा! 

३. माझ्या मनाविरुद्ध काही घडलं की त्यातील काही वेळा माझी प्रतिक्रिया अगदी टोकाची असते असं मला सांगण्यात आलं. ही प्रतिक्रिया पाहण्याचं भाग्य केवळ जवळच्या लोकांना लाभतं. आता माझं हे मुळ स्वरूपातील स्वभाववैशिष्टय. ह्याला बदलण्याचा प्रयत्न मी कोणत्या टोकापर्यंत करावा ह्याचा सखोल विचार मी करत आहे. माझे मी पण मी हिरावुन घ्यावं का?  आपल्याला अप्रिय असणारी अशी घटना समोर घडणे ह्या क्षणापासुन आपली एक टोकाची प्रतिक्रिया बाहेर येणं ह्या क्षणापर्यंत आपल्या मेंदुत जे काही विचार येतात, त्यांचं विश्लेषण करून त्यावर आपण नियंत्रण मिळवु शकतो का असे ह्या अभ्यासाचं स्वरूप असु शकतं. 

४.  माझ्या लिखाणांत ऱ्हस्व-दीर्घाच्या असंख्य चुका असतात. ही बाब माझ्या ध्यानात गेले कित्येक वर्षे आणुन दिली जात आहे. मला शालेय जीवनात जे काही ऱ्हस्व-दीर्घाचे शिक्षण मिळालं ते ज्यात जतन करून ठेवलं होतं, त्या मेंदुच्या कप्प्यापर्यंत मी सध्या पोहोचु शकत नाही. भविष्यात मी व्यावसायिक जीवनापासुन निवृत्ती घेतल्यावर मेंदुला विश्रांती मिळाल्यानंतर पुन्हा ह्या कप्प्यापर्यँत मी कदाचित पोहोचु शकेन ह्याविषयी मी आशावादी आहे. 

५. "आदित्य तु स्वतःचे इतकं कठोर परीक्षण करू नकोस" असं मला सांगण्यात आलं. आपल्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची (नैतिक) जबाबदारी घेणं हे स्वभाववैशिष्टय काही प्रमाणात मी बहुदा दाखवलं असावं. ह्या स्वभाववैशिष्ट्याचा अभिमान वाटावा अशी छुपी भावना मी कदाचित बाळगुन असेन. पण ही अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट नाही, संघातील प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची योग्य शब्दांत जाणीव करून देता यायला हवी. 

६. मध्यंतरी इतका व्यस्त कालावधी आला होता की कसोशीनं पुर्ण केलेला क्लिष्ट गोष्टींचा आनंद वाटुन घेण्याचीही उसंत नसे. केवळ पुर्ण न केलेल्या गोष्टींचं दडपण, झालेल्या छोट्यामोठ्या चुकांची खंत ह्याचा भावना प्रबळ होत असत. आघाडीची भुमिका बजावायची असेल तर नैराश्याला प्रयत्नपुर्वक दूर सारता येण्याची कला अवगत करायला हवी. तुम्ही जितके वरच्या पदावर जाता तितके तुम्ही एकटे बनता असं जरी म्हटलं तरी तुम्हांला घरी, कार्यालयात तुमची आधार परिसंस्था (सपोर्ट सिस्टिम) बनवता यायला हवी. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर दरवर्षी ह्या मुद्द्यावर तुम्हांला भरघोस गुंतवणुक करायलाच हवी. 

७. भोवताली उथळपणा ओसंडुन वाहु लागला आहे. बरेचसे चित्रपट, रील्स, मालिका ह्यातुन सखोल असे काही हाती लागत नाही. पण त्यातुनही काही मोजके चित्रपट, नाटकं, पुस्तकं ह्यात खूप काही शिकायला मिळतं. अशा सखोलपणाचा आपल्याला प्रभावीपणे शोध घेता यायला हवा. 

८. लोकांचं लक्ष वेधून घेत जीवन जगण्याची खुमखुमी दरवर्षी झपाट्यानं कमी करता यायला हवी. news on air ह्या अँपवरील रागम ह्या चोवीस तास सुरु असणाऱ्या वाहिनीने मला खूप मदत केली आहे. मेंदुला शांत ठेवण्यासाठी ह्या अँपवर सुरु असणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचा मला बराच उपयोग झाला. दीर्घकाळ तबला, सतार व इतर साधनांवर रियाज करणाऱ्या ह्या वादकांची तपस्या वाखाणण्याजोगीच ! त्यांची कलेविषयी श्रद्धा, वर्षोनुवर्षे त्यांनी घेतलेली मेहनत ही आपण घेऊ शकू का ? ह्या प्रश्नाचं उत्तर सदैव नकारात्मकच आलं. 

९. आपण ज्यावेळी आपल्याला न आवडणाऱ्या परिस्थितीत सापडतो त्यावेळी आपल्यासमोर पुढील पर्याय असतात. 
अ.    मोठ्या धैर्यानं, तयारीनिशी परिस्थितीचा ताबा घेऊन उपस्थित सर्वांना आपल्या मर्जीनुसार वागण्यास भाग पाडावे.  
ब.    पर्याय अ मध्ये उल्लेखलेलं धैर्य किंवा आवश्यक तयारी जर आपणांजवळ नसेल तर मेहनत घेऊन ते अंगी बाणवून पर्याय अ स्वीकारावा. 
क.    पर्याय अ आणि ब स्वीकारायची आपली तयारी नसेल तर शांतपणे त्या परिस्थितीत कमीत कमी नुकसान होऊन देत तग धरावा. चांगली वा वाईट कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही त्यामुळं तग धरून राहणं हा सद्यःकाळात फार महत्वाचा गुणधर्म ठरत आहे. तग धरून राहताना संगीत मानापमान होत तर राहणारच ! त्याला पर्याय नाही !   

१०. आपल्या सर्वांप्रमाणं माझ्या जीवनात सुद्धा AI ने खळबळ माजवली आहे. त्याच्या संगतीनं पुढचा प्रवास करताना सखोल ज्ञानाची कास धरून आपलं स्थान अबाधित ठेवणं हा सर्वात मोठा धडा मला २०२५ ने दिला.  त्या अनुषंगानं ह्या पोस्टमध्ये घेतलेलं हे छायाचित्र ! आकर्षक छायाचित्र न देताही कितीजण खरोखर पोस्ट वाचण्यासाठी इथं येतात हे पाहण्याचा माझा हा प्रयत्न ! 

ह्या वर्षात अचानक हिरावुन घेतलेल्या प्रियजनांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करत ही पोस्ट आवरती घेतो ! 

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

२०२५ आठवणींच्या हिंदोळ्यावर

दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की वर्तमानकाळाशी आपल्या भुमिकेसाठी सदैव सज्ज राहत भविष्यकाळाला सामोरे जाण्यासाठी गुंतवणूक करायची हा यक्ष प्रश्न! 

२०२५ वर्ष पहायला गेलं तर माझ्यासाठी मानवी मनाच्या आतील कंगोरे उलगडवून दाखविणारे ठरलं. 'केल्यानं देशांतर मनुजा येत शहाणपण'  ह्या म्हणीची सार्थता मला प्रत्येक दौऱ्यात येते. माझ्या बाबतीत शहाणपण म्हणण्यापेक्षा प्रत्येक दौरा माझं अज्ञानीपण थोडं थोडं कमी करत असतो. एक क्षण असा येतो की आपण स्वतःला आपल्या अज्ञानीपणासहित आत्मविश्वासानं स्वीकारतो, त्यानंतर सर्व काही रम्य भासु लागतं. 

फेब्रुवारी अमेरिका दौऱ्यात फिलाडेल्फिया विमानतळावरून डल्लासला जाताना विमानाचे चाक पंक्चर झाल्याची उद्घोषणा झाल्यानंतर चार तास भोवताली असलेल्या प्रवाशांचे वागणं हे मानवी स्वभावाच्या अभ्यासासाठी एक उत्तम संधी होती. काहीजण शांतपणे आपल्या कामात व्यग्र राहिले, तर काही जण बैचैन झाले. चार तासानंतर परत विमानात बसल्यावर देखील ज्यावेळी अर्धा तास विमान निघण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा मात्र काही जण खरोखर बैचैन झाले. दोघा जणांनी तर विमानातुन उतरणे पसंत केले. मला ह्यावेळी नक्की काय वाटत होते हे मला नक्की सांगता येणार नाही. पण एकदा का तुम्ही एखादा व्यवसाय निवडला की त्या अनुषंगानं येणाऱ्या सर्व गोष्टी स्वीकाराव्या लागतात. जर तुमच्या व्यवसायामुळं तुम्हांला सतत प्रवास करावा लागणार असेल तर प्रत्येक वेळी विमानात बसताना तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकता कामा नये. 

मे महिन्यात मोजके दिवसच सुरु असलेल्या युद्धानं देखील आपल्या सर्वांना जीवनाच्या अशाश्वततेबद्दल पुन्हा एकदा जाणीव करून दिली. बढती मिळाली नाही, पगार कमी प्रमाणात वाढला, सेन्सेक्स गडगडला ह्या गोष्टींनी दुःखी होणारे आपण! ह्या सर्व गोष्टींना जीवनातील सर्वात मोठ्या सत्याच्या भिंगातून तपासून पाहावं, मग आपल्याला आपल्या विचारांचा फोलपणा जाणवुन येतो. 

पावसाळा वेळेआधी सुरु होऊन बराच काळ लांबला. निसर्ग आपल्याला स्पष्ट संदेश देत आहे. पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करत आपल्या अल्पकालीन स्वार्थासाठी जगण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्दैवानं आपल्या पुढील पिढीला त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतील.  महानगरातील आपली प्रशस्त घरं, गाड्या, शेअर बाजारातील गुंतवणुकी हे सारं सारं काही निसर्गाच्या प्रलयापुढं शून्य आहे. भारतातील समस्यांपासून दूर पळण्यासाठी परदेशी जाणं हा काही वर्षांपुर्वी योग्य असलेला पर्याय आपणच तिथं केलेल्या गर्दीमुळं आता फारसा योग्य ठरणारा राहिला नाही. 

ह्या वर्षातील माझ्या आयुष्यातील काही मोजकी छायाचित्रं !
 



भाईंदर खाडीवरून लोकल जातांना फोटो काढल्याशिवाय चैन न पडणारा मी ! 



घराभोवतालच्या अंगणात फिरताना आकाशातील ढगांची सुंदर नक्षी! 


आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान - पाटील कुटुंबीयांचा गावातील गणपती! बालपण पुन्हा नव्यानं आठवून देणारा हा गणपती !



अग्रोवन सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला अमिश वसाहतीवरील माझा लेख! 


घराभोवतीच्या गोकर्णाचं फुल !



सप्टेंबर मधील अमेरिका फेरीनंतर परतताना उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात दिसलेलं लाल रंगांचं रहस्यमय विवर ! मला पळवुन नेण्यासाठी परग्रहवासी अंतरिक्षयान घेऊन नक्की येणार ह्याविषयी माझी नक्की खात्री झाली होती. X Files मालिका बघण्याचा हा परिणाम !


सप्टेंबर मधील अमेरिका फेरीत सहकाऱ्याच्या घरी नवरात्रात मांडलेला गोलु ! खरी श्रद्धाळू माणसं कोणत्याच सबबी पुढे करत नाहीत हा माझ्यासाठीचा संदेश ! 


अमेरिकेतील हॉटेलभोवतालची बदके ! निसर्ग हा निसर्ग असतो, त्याला सीमेची बंधनं नसतात! 

                        अमेरिकेतील हॉटेलभोवतालच्या पाऊलवाटेवर भेटलेली ही रानफ़ळे  ! निसर्ग हा निसर्ग असतो, त्याला सीमेची बंधनं नसतात! 




अमेरिकेतील हॉटेलभोवतालची पानगळ  ! निसर्ग हा निसर्ग असतो, त्याला सीमेची बंधनं नसतात! 





वसईत आढळणारा रानटी वेल ! त्याची फळं आम्ही क्रिकेटचा चेंडू म्हणून वापरलेली. वसईत ज्यांचं बालपण गेलं त्यांना नक्की आठवेल. 


कार्यालयातील नेत्रदीपक भोजन ! ह्यातील नक्षी किती आणि खरं ग्रहण करण्यासारखे खाद्यपदार्थ किती ह्याविषयी प्रचंड साशंक असणारा मी ! 


चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे !
एअर इंडिया विमानातुन विश्रांती घेत असलेल्या इंडिगो विमानाचं घेतलेलं छायाचित्र !




कार्यालयातील आसनावरून दिसणारा सुर्यास्त ! दक्षिणायन आणि उत्तरायण बरोबर समजावून सांगणारं माझं आसन !


मराठी भाषेची भोवताली सुरु असलेली अधोगती दाखवणारा हा T1 टर्मिनलवरील बोर्ड ! सोलापूरवरून आलेल्या विमानाची स्थिती "आलेली"

 

सुदैवानं ह्या आठवड्यात थंडी जोरदार पडलेली ! तेल गोठल्यावर उन्हात ठेवून ते वितळविणे ही माझ्या वडिलांची सवय! त्या आठवणीला उजाळा देताना !


अमेरिकेतील संजेशला वसईतल्या खऱ्याखुऱ्या नाश्त्याची चव मिळावी ह्यासाठी मेहनत घेऊन राकेश, वैभव ह्यांनी चार पाच हॉटेलातून आणलेले हे चविष्ट पदार्थ ! 

धन्यवाद २०२५ ! 

शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

बिबट्या माझा शेजारी


'कानन निवास'  ह्या प्रसिद्ध सोसायटीचे सेक्रेटरी श्री. लेले दुपारी सोसायटीच्या कार्यालयातुन दुपारच्या भोजनासाठी आणि त्यानंतरच्या आपल्या हक्काच्या वामकुक्षीसाठी निघण्याच्या तयारीत होते. आजचा दिवस तसा शांत गेला होता.  तसंही जगभर काय अगदी आपल्या वॉर्डाच्या पलीकडील कोणत्याही बातमीनं त्रास करून घ्यायची लेले ह्यांना सवय नव्हती. त्यामुळं आपल्या शहरात बिबट्या फिरत असल्याच्या बातम्या येत असल्या तरीही तो आपल्या वॉर्डात फिरकणार नाही असा काहीसा त्यांना विश्वास होता. 

लेले आपल्या खुर्चीवरून उठणार तितक्यात 'गुर्रर्र गुर्रर्र' अशा खणखणीत आवाजानं त्यांना दचकवलं. बंद दरवाजा उघडून जसा राजबिंडा बिबट्या कार्यालयात प्रवेश करता झाला तसं लेले ह्यांना ब्रह्मांड आठवलं. आपण भ्रमणध्वनीवर फुकाचा वेळ न घालवता वेळीच घरी गेलो असतो तर हा दुर्धर प्रसंग आपल्यावर ओढवलाच नसता ह्या विचारानं ते प्रचंड अस्वस्थ झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिबट्याकडं सुद्धा स्मार्टफोन होता. बिबट्यानं तो चालू केला आणि कोणतंतरी अँप सुरु करून तो गुरकावला. "बसा लेले बसा! घाबरू नका !" स्मार्टफोननं बिबट्याचं म्हणणं लेलेंच्या भाषेत त्यांना सांगितलं. प्रसंगावधान राखून लेलेंनी सुद्धा "बिबट्याजी स्थानापन्न व्हा !" काही थंड वगैरे घेणार का?" अशा शब्दांत त्याचं स्वागत केलं.  

पुन्हा बिबट्या काहीसं स्मार्टफोनमध्ये पुटपुटला. "बिबट्याजी वगैरे काय? मी कोणी होतकरू नगरसेवक वगैरे वाटलो की काय तुम्हांला ?" स्मार्टफोनने बिबट्याच्या भावना लेलेंपर्यंत पोहोचवल्या. "आपण कसं काय येणं केलंत आम्हां गरीबाच्या घरी?" लेलेंचा मेंदू आता खुपच सक्रिय झाला होता. ते जे काही स्मार्टफोनमधील अँप आहे ते बिबट्याला आपल्या भावना चांगल्या प्रकारे पोहोचवत आहे ह्यावर त्यांचा प्रचंड विश्वास बसला होता. 

"मला तुमच्या सोसायटीत फ्लॅट भाड्यानं घ्यायचा आहे !" बिबट्या म्हणाला. "काय, काय म्हणालात? फ्लॅट भाड्यानं घ्यायचाय?" डोळे विस्फारून लेले म्हणाले. "त्यात काय वावगं आहे? आम्ही तुमच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करू?" "आम्ही म्हणजे .. ?" "मी आणि माझी पत्नी !" बिबट्या आत्मविश्वासानं म्हणाला. 

प्रकरण एकदम गंभीर होते. "सोसायटीची सभा बोलवावी लागेल, बहुमतानं जो काही निर्णय होईल तो मान्य करावा लागेल" लेलेंनी आपल्याकडचं प्रभावी शस्त्र बाहेर काढलं. लगेचच बिबट्याच्या चेहऱ्यावरील निर्माण झालेले क्रुद्ध भाव लेलेंनी हेरले. 'सर सलामत तो सभा पचास !" असं आपल्यासाठी म्हणीचे रूप बनवून त्यांनी झटपट सर्व रिकामी अर्ज बिबट्यासमोर मांडले. पुन्हा वैतागलेला बिबट्या पाहून त्यांनी स्वतःहूनच सर्व अर्ज जमतील तसे भरून टाकले. सोसायटीचं नांव पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यांत खुपत होतं. ह्या वेडपट स्मार्टफोनने काननचा अर्थ बिबट्याला सांगितला असावा म्हणुनच तो बाकीच्या चांगल्या चांगल्या सोसायट्या सोडून इथं कडमडला असावा ह्याविषयी त्यांची पक्की खात्री झाली.  दुपारी जेवणाला उशीर झाला म्हणून लेलेंना घरून सारखे फोन येत होते, ते त्यांनी अर्थातच घेतले नाहीत. तासाभरात सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले होते. लेले ह्यांनी सर्व काही धैर्य एकवटून आमच्या सोसायटीच्या सदस्यांच्या जीवाला काही धोका नाही ना असा प्रश्न विचारला. फ्लॅट मिळाल्यानं खुश झालेल्या बिबट्यानं मान डोलावत अजिबात नाही असं खुणेनं सांगितलं. "मी संध्याकाळी माझं सामान घेऊन शिफ्ट होतो" जाता जाता बिबट्या म्हणाला. बिबट्या गेला तसं लगेचच लेलेंनी आपल्यावर ओढवलेला अनावस्था प्रसंग व्हाट्सअँपच्या माध्यमातुन सर्व सोसायटीच्या सदस्यांना कळवला. लगेचच सर्वजण धावत कार्यालयात येतील अशी वेडी आशा लेले बाळगून होते. पण थोड्याच वेळात सर्वजण आपापल्या खिडक्यांतून लेलेंना धीर देण्यासाठी डोकावून पाहत असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं.  वॉचमननं बिबट्याला आत सोडलंच कसं? रजिस्टर मध्ये त्याची नोंद केली का? असे प्रश्न घेऊन लेले त्याच्याकडं गेले. बिचारा बेशुद्ध होऊन पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे हबकारे मारल्यानंतर त्याला जागं केलं तर तो जीव मुठीत घेऊन पळून गेला. एव्हाना सोसायटीवर लोकांच्या कल्पनाशक्तीला मोकळं रान मिळालं होतं. लेलेंनी बिबट्याला म्हटलं, "बिबट्या फ्लॅट लेले !" वगैरे वगैरे विनोद लोक टाकत होते. इतक्यात लेलेंना घरून फोन आला. "त्या बिबट्याबरोबर गप्पा मारून झाल्या असतील जेवायला लवकर घरी या ! मी पुन्हा पुन्हा जेवण गरम करणार नाही ! " आज्ञाधारक लेले खाली मान घालून घरी परतले. चप्पल काढून घरात प्रवेश करत नाही तोच "पटकन जेऊन घ्या, ते टीव्ही चॅनेलवाले कधी पोहोचतील ह्याचा भरंवसा नाही. आणि हो त्यांना मुलाखत द्यायची असेल तर ती सोसायटीच्या ऑफिसमध्येच द्या. इथं इतक्या सगळ्या लोकांना चहा करायला दूध घरात नाही आणि कालच ते सर्व घर स्वच्छ पुसून घेतलंय ! बाकी मुलाखत देताना तो दिवाळीत नवीन शर्ट घेतला आहे तो घाला !"  स्वच्छ लादी, संपलेलं दूध आणि आपला जीव ह्यात नक्की प्राधान्यक्रम कसा लावायचा हे लेलेंना समजेनासं झालं. 

संध्याकाळी बिबट्या आणि त्याची सहचारिणी सदनिकेत शिफ्ट झाले. बिबट्या शिफ्ट होतोय म्हणजे नक्की काय करतो ह्याविषयी लेलेंना खूपच कुतूहल होते. "त्यात काय मोठा विचार करायचा? दोन तीन मारलेल्या प्राण्यांना तोंडात घेऊन येतील दोघं?" आत्मविश्वासानं त्यांची बायको म्हणाली. चार वाजता वॉचमन विना भकास वाटत असलेल्या प्रवेशद्वारातुन ते दोघं प्रवेश करते झाले तेव्हा आपल्या बायकोचा अंदाज इतका अचुक कसा काय ठरला हे पाहून लेलेंच्या मनात अभिमान, कौतुक, असूया वगैरे संमिश्र भावना उमटल्या. "मी तुम्हांला सांगितलं होतं ना !" हे वाक्य तिच्या नजरेद्वारे स्पष्टपणे सांगितलं जात होतं. 

महिनाभरानंतर 
कानन सोसायटी आणि लेले इंटरनेट सेलेब्रिटी झाले होते. बिबट्या आणि लेले, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून व्यवस्थित बोलू शकत होते. आपण मॉर्निंग वॉकला एकत्र जाऊयात असं फ्लॅटमध्ये राहून कंटाळलेल्या बिबट्यानं कालच लेलेंना कळवलं होतं. पैसे कमवायची ही मोठी संधी आहे असं लेलेंचा मुलगा म्हणाला होता. बिबट्यासोबत एकत्र चालतानाचे रील्स बनवून इंटरनेट दणाणुन सोडुन टाकुयात असे तो म्हणाला. बाकी बिबट्याच्या चरितार्थाला सुद्धा मदत होईल असं काही करू असे तो म्हणाला. ह्या संवादाने प्रेरित होऊन  "आज खीर चांगली झाली आहे, ती बिबट्याच्या घरी घेऊन जाऊ का? " अशी लेलेंची सौ. त्यांना विचारत होती. 

लिमये, जोशी ह्यांचे कुत्रे घराबाहेर यायलाच तयार नव्हते. त्यामुळं त्यांच्या घरात भलत्याच समस्या उद्भवल्या होत्या. बिबटया स्मार्टफोनवरूनच चिकन, मटण मागवत असल्यानं त्याच्या फिटनेसच्या समस्या होऊ शकतील असे सौ. बिबट्या ह्यांना वाटत होते. बाकी चिकन, मटण घेऊन येणारे डिलिव्हरी माणसं पहिल्यांदा चुकून बिबट्याच्या फ्लॅटपर्यंत गेली होती, पण बिबट्यानं दार उघडताच त्यांची पळता भुई थोडी झाली होती. लेलेंनी वॉचमनची समजूत काढून त्याला परत कामावर बोलावलं होतं. आता तो बिबट्याच्या घरची सर्व डिलिव्हरी खालीच घेत असे. एकंदरीत लेलेंच्या रटाळ आयुष्यात अगदी धमाल सुरु झाली होती. 

बाकी फ्लॅटबाहेर चपला काढून ठेवल्या म्हणून बिबट्याला सोसायटीतर्फे पहिली नोटीस मिळाली. त्या चपलांचा हा तो फोटो !! 


२०२५ - शिकवण

'२०२५ - आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा जरी चांगला लेख असला तरी छायाचित्रांनीच जास्त व्यापलेला होता अशी दिलखुलास प्रतिक्रिया मिळाली. तिचा...