गेल्या आठवड्यात प्रिंट आऊट काढण्यासाठी सकाळ सकाळी स्टेशनरीच्या दुकानात गेलो होतो. सव्वा नऊच वाजले असल्यानं उघडल्यानं दुकानात कोणीही नव्हतं. प्रिंट आऊटची संख्या जरा जास्तच असल्यानं मी निवांत दुकानातील सर्व सामुग्रीकडं अगदी कुतूहलबुद्धीनं पाहत होतो. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी सर्व सामुग्री पाहून कसं बरं वाटतं. कोशातील जीवन जगत असल्यानं बहुदा ह्या सर्व गोष्टी वापरणारी मुलं आपल्या भोवताली आहेत ह्याचा खरंतर आपल्याला विसर पडलेला असावा असं वाटून गेलं.
प्रिंटर पण निवांतपणे प्रती काढत होता. बहुदा वीस सेकंदामागे एक वगैरे वेगानं! मुलाच्या अभ्यासाच्या प्रती असल्यानं प्रिंटर त्या वाचूनच मग प्रती काढत असावा की काय असं सुद्धा मला वाटून गेलं. घरी प्रिंटर का नाही वगैरे शंका वाचकांच्या मनात आल्यास घरचा प्रिंटर सुस्थितीत ठेवण्याचा नाद मी काही वर्षांपूर्वी सोडून दिला. ते प्रकरण पांढरा हत्ती पोसण्यासारखं वगैरे असतं.
माझ्या आणि त्या दुकानदाराच्या निवांतपणाची हद्द होईल अशी स्थिती सुरु असल्यानं ह्या प्रती विषयानुसार फाईलमध्ये लावून देऊ का अशी पृच्छा त्यानं माझ्याकडं केली. त्या फाईल पाहून मला गहिवरुन आले. एखादं कागदपत्र सापडत नसल्यावर घरात असलेल्या असंख्य फाईल्सशी आमचा जवळचा संबंध सदैव येत असतो. असं असलं तरीही ह्या सर्व जुन्या फाईल्स आहेत. बरेच वर्षात नवीन फाईल घेण्याचा प्रसंग आला नव्हता. मी गदगदून त्याला विषयानुसार फाईल देण्याची विनंती केली. ह्या फाईल्स बऱ्याच जुन्या असल्यानं मला अजूनच गदगदून आलं. पहिल्या विषयाच्या प्रती छापून झाल्यावर दुकानदारानं त्यांना पंच करुन त्या व्यवस्थित फाईलमध्ये लावण्याचं काम सुरु केलं. त्यानं मला पंच विकण्याचा प्रयत्न करुन पाहिला नाही. एकंदरीत Customer Satisfaction अगदी महत्तम पातळीवर पोहोचलं होतं.
हे सर्व भावनाविवश होण्याचे प्रसंग सुरु असताना अचानक दुकानात एक मुलगा आला. "अंकल, कॅम्लिन का कंपास हैं क्या? " त्यानं एका सराईतासारख्या स्वरात विचारलं. अंकल शब्द कानी येताच मी हमखास वळुन पाहतो आणि आपल्याला कोणी संबोधित नाही ना ह्याची खात्री करुन घेतो. इथं तशी शक्यता कमीच होती, नवीन गिऱ्हाईक आल्यानं दुकानदारानं त्याचा मोर्चा त्या मुलाकडं वळवला. दुकानात उपलब्ध असलेले विविध कंपास बॉक्स त्यानं त्या मुलासमोर ठेवले. मुलाला बहुदा कॅम्लिनचीच कंपास बॉक्स हवी होती. त्यानं ती उघडली आणि त्याची सखोल तपासणी केली. ह्या तपासणीत कर्कटकला (हा शब्द लिहिताना मला पुन्हा गहिवरुन येत आहे) विशेष लक्ष मिळालं. एकंदरीत तपासणीनंतर समाधान झाल्यावर त्या मुलानं मुख्य मुद्द्याचा म्हणजे किंमतीचा विषय काढला. "एक सौ दस " दुकानदारानं त्वरित उत्तर दिलं. "क्या अंकल! वो कॉर्नरवाला सौ में बेचता हैं लेकिन आजकल बहुत नाटक कर रहा हैं इसलिये इधर आ गया। " बहुदा तो कॉर्नरवाला दुकानदार ह्या मुलाला वस्तुंची इतकी तपासणी करुन देत नसावा. पुढील दहा मिनिटं त्या मुलानं अगदी शांतपणे त्या दुकानदाराशी त्या दहा रुपयांसाठी घासाघीस केली. तितक्या वेळात नवीन विषयाच्या प्रती प्रिंटआऊट साठी देणं, त्या मुलाला कंपासचे दुसरे उपलब्ध पर्याय दाखविणं इत्यादी गोष्टी सुद्धा त्यानं केल्या. शेवटी त्या मुलाच्या जिद्दीचा विजय झाला. त्या दुकानदारानं तो कंपासबॉक्स शंभर रुपयांत त्या मुलास दिला.
सवडीनं प्रिंटरने आपलं काम आटोपलं. केवळ प्रिंटआऊट घेण्यासाठी गेलो असता त्यासोबत फाईल्स सुद्धा घेऊन आलो. त्या मुलाचं आणि दुकानदाराचे मला खूप कौतुक वाटलं. त्या मुलासाठी बहुदा खरोखरच ते दहा रुपये महत्त्वाचे होते. ज्या शांतपणे त्यानं ते संभाषण हाताळलं हे नक्कीच कौतुकास्पद होतं. जीवन जगण्याची कला तो ह्या वयातच शिकला आहे. कष्ट करण्याची तयारी आणि संभाषणकला असेल तर उपलब्ध पैशात सन्मानानं जीवन जगण्याच्या संधी आजही किमान भारतात तरी उपलब्ध आहेत. तुम्ही जितका भोवतालच्या किराणा दुकानदारांशी, स्थानिक भाजीवाल्यांशी अधिक संवाद साधता तितकं तुम्हांला जीवनाविषयी अधिक आशादायी वाटायला लागतं. न राहवून मनात विचार आला तो आपल्या मुलासाठी हीच कंपास बॉक्स अधिकच्या भावानं ऍमेझॉनवरुन विकत घेणाऱ्या पालकांविषयी. कदाचित आपल्या मुलांना मिळू शकणारा जीवनातील एक पाठ त्या खरेदीमुळं ते गमावत असतील. आणि नाक्यावरील किराणा दुकानदाराला अस्तित्वात ठेवण्याची एक संधी सुद्धा !
Long Live किराणा दुकानदार!
मस्तच
उत्तर द्याहटवा