मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

Just hanging in there!


कंपनीत गेल्या आठवड्यात असाच एक टाऊन हॉल सुरु होता. शेकडो माणसं त्या कॉलवर होती. अचानक एका व्यक्तीनं तिथं प्रश्न विचारला.  नांव परिचयातील होतं. २००५ - ०७ साली न्यू जर्सीत काम करताना तिथं ही व्यक्ती माझी व्यवस्थापक होती. त्याला मी पिंग करुन विचारलं, " ओळखलं का मला ? कसं काय चाललंय?" पंधरा वीस सेकंदांनी प्रतिसाद आला, " अरे वा आदित्य ! कसा आहेस ? I am just hanging in there."  सुरुवातीचा आनंद ओसरल्यानंतर आम्ही आपापल्या कामाकडे वळालो. 

 "Just hanging in there" डोक्यात बसून राहिलं. गेले कित्येक वर्षे ऐकत आलेला हा शब्दप्रयोग.  एकदा अमेरिकेतील बहुदा न्यू जर्सीतील ऑफिसातच रात्री ऑफिसात गेल्यानंतर तीन वाजता सुद्धा प्रश्न सुटायची चिन्हे दिसत नसताना तत्कालीन व्यवस्थापकाने बहुदा म्हटलं होतं, " Aditya, Just Hang in there!" सकाळी कधीतरी प्रश्न सुटला होता, त्यावेळी त्याचे मी आभार मानले होते  त्यानं दिलेल्या त्या धीराबद्दल ! 

हल्ली आपण सर्व सुद्धा बहुदा Just hanging in there चा अनुभव घेत असतो. वैयक्तिक आयुष्य, कार्यालयीन जबाबदाऱ्या ह्यात सर्व काही नियंत्रणाखाली आहे अशी परिस्थिती केव्हाच नसते. एका वेळी चिंता करण्याजोग्या असलेल्या पंधरा वीस प्रश्नांपैकी  कोणाकडं तात्काळ लक्ष द्यावं हे ठरवून त्या प्रश्नाचं प्राधान्यानं निराकरण करावं लागतं. 

आपलं आयुष्य कसं असावं ह्याविषयी आपण रेखाटलेल्या परिपूर्ण चित्रापासून (Picture Perfect) बरंचसं दूर असलेलं जीवन जगण्याची वेळ आपल्यापैकी बऱ्याच जणांवर येत असते. पण त्यामुळं आपण काही हतबल होऊन बसत नाहीत. आपल्या मतीनुसार, क्षमतेनुसार आपल्या भोवतालच्या परिस्थितीतुन आपण मार्ग काढत राहतो. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर ही जिद्दीनं टिकून राहण्याची वृत्तीच आपल्याला घडवत असते. भविष्यात मागं वळून ह्या कालावधीकडे पाहिलं तर ह्या कालावधीत आपण बरंच काही चांगलं केलं हे आपल्याला जाणवतं. 

 इथं एक लक्षात घ्यायला हवं की Just hanging in there आपल्या एकट्याच्या बाबतीतच घडत नाहीये. आपल्या भोवताली अनेकजण  सुद्धा त्या दोराच्या हातातून सुटू पाहणाऱ्या एका टोकाला अगदी घट्ट पकडून त्यांचा लढा लढत आहेत. त्यामुळं उघड्या डोळ्यांनी भोवतालचे असे सर्व जीवनसंघर्ष शोधत रहा आणि जमेल तितकी मदत करा. 

सतत ह्या स्थितीत राहणं हे योग्य नव्हे. ह्या संघर्षाचा नाही म्हटलं तरी तब्येतीवर, मनःस्वाथ्यावर परिणाम होत असतो. त्यामुळं योग्य वेळ येताच आपण ज्या गोष्टीसाठी संघर्ष करतोय ती खरोखरीच त्या संघर्षाच्या, त्यागाच्या  पात्र  आहे का हा प्रश्न देखील स्वतःला विचारुन पहावा. Just hanging in there ही फार कौतुकाची गोष्ट करु नये. जर संपूर्ण मनुष्यजमात ह्या उक्तीचा अनुभव घेत असेल तर एक समूह म्हणून आपल्या एकंदरीत विचारसरणीतच खोट असावी असंही आपण म्हणू शकतो. 

जाता जाता जागतिक पटलावर एक राष्ट्र सुद्धा ह्या उक्तीचा कसा प्रत्यय आणुन देत आहे हे आपण सर्व पाहत आहोतच. मित्रा - धीर सोडू नकोस!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...