मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

Just hanging in there!


कंपनीत गेल्या आठवड्यात असाच एक टाऊन हॉल सुरु होता. शेकडो माणसं त्या कॉलवर होती. अचानक एका व्यक्तीनं तिथं प्रश्न विचारला.  नांव परिचयातील होतं. २००५ - ०७ साली न्यू जर्सीत काम करताना तिथं ही व्यक्ती माझी व्यवस्थापक होती. त्याला मी पिंग करुन विचारलं, " ओळखलं का मला ? कसं काय चाललंय?" पंधरा वीस सेकंदांनी प्रतिसाद आला, " अरे वा आदित्य ! कसा आहेस ? I am just hanging in there."  सुरुवातीचा आनंद ओसरल्यानंतर आम्ही आपापल्या कामाकडे वळालो. 

 "Just hanging in there" डोक्यात बसून राहिलं. गेले कित्येक वर्षे ऐकत आलेला हा शब्दप्रयोग.  एकदा अमेरिकेतील बहुदा न्यू जर्सीतील ऑफिसातच रात्री ऑफिसात गेल्यानंतर तीन वाजता सुद्धा प्रश्न सुटायची चिन्हे दिसत नसताना तत्कालीन व्यवस्थापकाने बहुदा म्हटलं होतं, " Aditya, Just Hang in there!" सकाळी कधीतरी प्रश्न सुटला होता, त्यावेळी त्याचे मी आभार मानले होते  त्यानं दिलेल्या त्या धीराबद्दल ! 

हल्ली आपण सर्व सुद्धा बहुदा Just hanging in there चा अनुभव घेत असतो. वैयक्तिक आयुष्य, कार्यालयीन जबाबदाऱ्या ह्यात सर्व काही नियंत्रणाखाली आहे अशी परिस्थिती केव्हाच नसते. एका वेळी चिंता करण्याजोग्या असलेल्या पंधरा वीस प्रश्नांपैकी  कोणाकडं तात्काळ लक्ष द्यावं हे ठरवून त्या प्रश्नाचं प्राधान्यानं निराकरण करावं लागतं. 

आपलं आयुष्य कसं असावं ह्याविषयी आपण रेखाटलेल्या परिपूर्ण चित्रापासून (Picture Perfect) बरंचसं दूर असलेलं जीवन जगण्याची वेळ आपल्यापैकी बऱ्याच जणांवर येत असते. पण त्यामुळं आपण काही हतबल होऊन बसत नाहीत. आपल्या मतीनुसार, क्षमतेनुसार आपल्या भोवतालच्या परिस्थितीतुन आपण मार्ग काढत राहतो. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर ही जिद्दीनं टिकून राहण्याची वृत्तीच आपल्याला घडवत असते. भविष्यात मागं वळून ह्या कालावधीकडे पाहिलं तर ह्या कालावधीत आपण बरंच काही चांगलं केलं हे आपल्याला जाणवतं. 

 इथं एक लक्षात घ्यायला हवं की Just hanging in there आपल्या एकट्याच्या बाबतीतच घडत नाहीये. आपल्या भोवताली अनेकजण  सुद्धा त्या दोराच्या हातातून सुटू पाहणाऱ्या एका टोकाला अगदी घट्ट पकडून त्यांचा लढा लढत आहेत. त्यामुळं उघड्या डोळ्यांनी भोवतालचे असे सर्व जीवनसंघर्ष शोधत रहा आणि जमेल तितकी मदत करा. 

सतत ह्या स्थितीत राहणं हे योग्य नव्हे. ह्या संघर्षाचा नाही म्हटलं तरी तब्येतीवर, मनःस्वाथ्यावर परिणाम होत असतो. त्यामुळं योग्य वेळ येताच आपण ज्या गोष्टीसाठी संघर्ष करतोय ती खरोखरीच त्या संघर्षाच्या, त्यागाच्या  पात्र  आहे का हा प्रश्न देखील स्वतःला विचारुन पहावा. Just hanging in there ही फार कौतुकाची गोष्ट करु नये. जर संपूर्ण मनुष्यजमात ह्या उक्तीचा अनुभव घेत असेल तर एक समूह म्हणून आपल्या एकंदरीत विचारसरणीतच खोट असावी असंही आपण म्हणू शकतो. 

जाता जाता जागतिक पटलावर एक राष्ट्र सुद्धा ह्या उक्तीचा कसा प्रत्यय आणुन देत आहे हे आपण सर्व पाहत आहोतच. मित्रा - धीर सोडू नकोस!

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

कंपास



गेल्या आठवड्यात प्रिंट आऊट काढण्यासाठी सकाळ सकाळी स्टेशनरीच्या दुकानात गेलो होतो. सव्वा नऊच वाजले असल्यानं उघडल्यानं दुकानात कोणीही नव्हतं. प्रिंट आऊटची संख्या जरा जास्तच असल्यानं मी निवांत दुकानातील सर्व सामुग्रीकडं अगदी कुतूहलबुद्धीनं पाहत होतो. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी सर्व सामुग्री पाहून कसं बरं वाटतं. कोशातील जीवन जगत असल्यानं बहुदा ह्या सर्व गोष्टी वापरणारी मुलं आपल्या भोवताली आहेत ह्याचा खरंतर आपल्याला विसर पडलेला असावा असं वाटून गेलं. 

प्रिंटर पण निवांतपणे प्रती काढत होता. बहुदा वीस सेकंदामागे एक वगैरे वेगानं! मुलाच्या अभ्यासाच्या प्रती असल्यानं प्रिंटर त्या वाचूनच मग प्रती काढत असावा की काय असं सुद्धा मला वाटून गेलं.  घरी प्रिंटर का नाही वगैरे शंका वाचकांच्या मनात आल्यास घरचा प्रिंटर सुस्थितीत ठेवण्याचा नाद मी काही वर्षांपूर्वी सोडून दिला. ते प्रकरण पांढरा हत्ती पोसण्यासारखं वगैरे असतं. 

माझ्या आणि त्या दुकानदाराच्या निवांतपणाची हद्द होईल अशी स्थिती सुरु असल्यानं ह्या प्रती विषयानुसार फाईलमध्ये लावून देऊ का अशी पृच्छा त्यानं माझ्याकडं केली. त्या फाईल पाहून मला गहिवरुन आले. एखादं कागदपत्र सापडत नसल्यावर घरात असलेल्या असंख्य फाईल्सशी आमचा जवळचा संबंध सदैव येत असतो. असं असलं तरीही ह्या सर्व जुन्या फाईल्स आहेत. बरेच वर्षात नवीन फाईल घेण्याचा प्रसंग आला नव्हता. मी गदगदून त्याला विषयानुसार फाईल देण्याची विनंती केली. ह्या फाईल्स बऱ्याच जुन्या असल्यानं मला अजूनच गदगदून आलं. पहिल्या विषयाच्या प्रती छापून झाल्यावर दुकानदारानं त्यांना पंच करुन त्या व्यवस्थित फाईलमध्ये लावण्याचं काम सुरु केलं. त्यानं मला पंच विकण्याचा प्रयत्न करुन पाहिला नाही. एकंदरीत Customer Satisfaction अगदी महत्तम पातळीवर पोहोचलं होतं. 

हे सर्व भावनाविवश होण्याचे प्रसंग सुरु असताना अचानक दुकानात एक मुलगा आला. "अंकल, कॅम्लिन का कंपास हैं क्या? " त्यानं एका सराईतासारख्या स्वरात विचारलं. अंकल शब्द कानी येताच मी हमखास वळुन पाहतो आणि आपल्याला कोणी संबोधित नाही ना ह्याची खात्री करुन घेतो. इथं तशी शक्यता कमीच होती, नवीन गिऱ्हाईक आल्यानं दुकानदारानं त्याचा मोर्चा त्या मुलाकडं वळवला. दुकानात उपलब्ध असलेले विविध कंपास बॉक्स त्यानं त्या मुलासमोर ठेवले. मुलाला बहुदा कॅम्लिनचीच कंपास बॉक्स हवी होती. त्यानं ती उघडली आणि त्याची सखोल तपासणी केली. ह्या तपासणीत कर्कटकला  (हा शब्द लिहिताना मला पुन्हा गहिवरुन येत आहे) विशेष लक्ष मिळालं. एकंदरीत तपासणीनंतर समाधान झाल्यावर त्या मुलानं मुख्य मुद्द्याचा म्हणजे किंमतीचा विषय काढला. "एक सौ दस " दुकानदारानं त्वरित उत्तर दिलं. "क्या अंकल! वो कॉर्नरवाला सौ में बेचता हैं लेकिन आजकल बहुत नाटक कर रहा हैं इसलिये इधर आ गया। " बहुदा तो कॉर्नरवाला दुकानदार ह्या मुलाला वस्तुंची इतकी तपासणी करुन देत नसावा. पुढील दहा मिनिटं त्या मुलानं अगदी शांतपणे त्या दुकानदाराशी त्या दहा रुपयांसाठी घासाघीस केली. तितक्या वेळात नवीन विषयाच्या प्रती प्रिंटआऊट साठी देणं, त्या मुलाला कंपासचे दुसरे उपलब्ध पर्याय दाखविणं इत्यादी गोष्टी सुद्धा त्यानं केल्या. शेवटी त्या मुलाच्या जिद्दीचा विजय झाला. त्या दुकानदारानं तो कंपासबॉक्स शंभर रुपयांत त्या मुलास दिला. 

सवडीनं प्रिंटरने आपलं काम आटोपलं. केवळ प्रिंटआऊट घेण्यासाठी गेलो असता त्यासोबत फाईल्स सुद्धा घेऊन आलो. त्या मुलाचं आणि दुकानदाराचे मला खूप कौतुक वाटलं. त्या मुलासाठी बहुदा खरोखरच ते दहा रुपये महत्त्वाचे होते. ज्या शांतपणे त्यानं ते संभाषण हाताळलं हे नक्कीच कौतुकास्पद होतं. जीवन जगण्याची कला तो ह्या वयातच शिकला आहे. कष्ट करण्याची तयारी आणि संभाषणकला असेल तर उपलब्ध पैशात सन्मानानं जीवन जगण्याच्या संधी आजही किमान भारतात तरी उपलब्ध आहेत. तुम्ही जितका भोवतालच्या किराणा दुकानदारांशी, स्थानिक भाजीवाल्यांशी अधिक संवाद साधता तितकं तुम्हांला जीवनाविषयी अधिक आशादायी वाटायला लागतं. न राहवून मनात विचार आला तो आपल्या मुलासाठी हीच कंपास बॉक्स अधिकच्या भावानं ऍमेझॉनवरुन विकत घेणाऱ्या पालकांविषयी. कदाचित आपल्या मुलांना मिळू शकणारा जीवनातील एक पाठ त्या खरेदीमुळं ते गमावत असतील. आणि नाक्यावरील किराणा दुकानदाराला अस्तित्वात ठेवण्याची एक संधी सुद्धा !  

Long Live किराणा दुकानदार! 

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

एक संध्याकाळ



सायंकाळी घरातील खिडकीत बसून रस्त्यावरुन फिरायला जाणाऱ्या माणसांचं निरीक्षण करणं हा एक जीवनानुभव आहे. सायंकाळी माणसं काहीशी भावुक होत असावीत. आपल्या पूर्वजांच्या मनात सुर्यास्तानंतर येणाऱ्या अंधारामुळं एक भयाची भावना मनात निर्माण होत असावी. त्यानंतर हजारो वर्षे गेली असली तरी ती भावना रेंगाळलेल्या रुपात आपल्या मनात कुठंतरी असावी आणि त्यामुळं आपण भावुक होत असू असा माझा कयास. पण त्यासाठी टीव्ही, मोबाईलपासून आपण दूर असावं ही पूर्वअट ! बऱ्याच दिवसांनी अशी निरीक्षण संधी आज मला मिळाली. ह्यात जोडपी होती, मैदानावर खेळून हातात बॅट, बॉल घेऊन परतणारी मुलं होती, कष्टाचं काम आटपून घरी परतणारे मजूर होते.

एकत्र फिरायला जाणाऱ्या जोडप्याचं निरीक्षण करणं हा एक खास अनुभव असतो.  तिला खूप काही बोलायचं असतं. तो बऱ्याच वेळा मनाविरुद्ध तिच्या आवडीखातर घराबाहेर पडलेला असतो. त्यामुळं तिच्या बोलण्याकडं अगदी एकाग्रतेनं लक्ष देणं हे एकंदरीत अवघडच असतं. त्याच्या मनात कदाचित ऑफिसातील कामाचे, आर्थिक घडीचे किंवा IPL लिलावाचे विचार घोळत असतात. अधून मधून "असं होय?" "तिला काहीच काय कळत नाही का?" वगैरे प्रश्न विचारुन आपली तन्मयता सिद्ध करण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न सुरु असतो. त्यात काहीतरी चुकीचे प्रश्न विचारुन त्याचं तिच्या बोलण्याकडं लक्ष नाही हे तो सिद्ध करतो. पण केवळ त्याच्याकडं लटक्या रागानं पाहण्याव्यतिरिक्त किंवा त्याला चापटी मारण्याव्यतिरिक्त ती काहीच करत नाही. त्यानं आपल्या बोलण्याकडं लक्ष द्यावं अशी तिची अपेक्षाच नसते मुळी! तिला त्याचं आपल्यासोबत असणं महत्वाचं असतं. तिला बोलायचं असतं आणि ते ऐकून घेणारं कोणीतरी हक्काचं आपल्या सोबत आहे हेच तिच्यासाठी पुरेसं असतं. घर जसं जवळ येतं तेव्हा मात्र तिच्या बोलण्यात कदाचित सायंकाळच्या जेवणाचे विचार येऊ लागतात. मग तीही काहीशी गप्प होते. काळ जसा बदलेल तसं अर्थार्जन करणारी स्त्री आणि घर सांभाळणारा नवरा असंही चित्र दिसेल. अशी जोडपी फिरायला जातील तेव्हा कशी चर्चा होईल ह्याच्या विविध शक्यता मनात येतात. ही झाली तरुण जोडपी. वयस्क जोडप्यांची कथा काहीशी वेगळी असते. जे काही बोलण्यासारखं असतं ते आयुष्यभरात बोलून झालेलं असतं आणि त्यावर दिवसभर एकत्र असल्यानं सायंकाळी अजून काही खास बोलण्यासारखं नसावं. कदाचित आजोबा पुढं चालत असतील आणि आजी आपल्या बेतानं त्यांच्या मागे मागे चालत असतील. आयुष्यभर चालल्या तशा !

मैदानावर खेळून परतणारी मुलं म्हणजे मनुष्यजातीचा भविष्यकाळ! उत्साहाच्या चैतन्याचे झरे त्यांच्या चालण्याबोलण्यातून वातावरणात मिसळत असतात. मैदानावर आपण कसा पराक्रम गाजवला ह्याचा आढावा ते घेत असतात. कदाचित आपल्यातील एखाद्या मित्राची मजेत टर उडवत असतात आणि तो ही त्याचा आनंद घेत असतो. कष्टाचा दिवस आटोपून घरी जाणारे कष्टकरी पाहिले की आपसूक माझ्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण होते. प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आलो म्हणून ना दुःखाची भावना किंवा सुरक्षित भविष्याची खात्री आज देता येणार नाही म्हणून ना चिंतेची भावना. आपल्या स्वतःच्या कष्ट करण्याच्या क्षमतेवर अफाट विश्वास आणि त्या विश्वासावर आयुष्याचा लढा लढण्याची जिद्द. 

पाहता पाहता सूर्य मावळतो. मनुष्यजातीच्या जीवनसंघर्षांचं एक पान उलटलेलं असतं. ह्या पानावर लिहिले गेलेले असतात अनेक बरे वाईट अनुभव प्रत्येकाच्या नजरेतून ! आकाशात एव्हाना चंद्राने आपल्या शीतल किरणांची जादू पसरवलेली असते. शहरातील माणसं बहुदा ह्या जादूपासून अनभिज्ञ राहून केव्हातरी मध्यरात्रीनंतर झोपी जातील, गावातील माणसांना हा चंद्र बहुदा दर्शन देतीलच. पण सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे एक नवीन आशेनं दुसऱ्या दिवसाला सामोरे जाण्याची.  

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

मेरी आवाज ही पहचान हैं


लता मंगेशकर! आयुष्यभर सदैव सोबत असलेल्या लतादीदी.  लहानपणी विविधभारतीवरील मंगलप्रभात हा कार्यक्रम ऐकत सकाळची सुरुवात व्हायची. त्यावेळी बऱ्याच वेळा लतादिदींच्या स्वर्गीय आवाजानं घरातील वातावरण मंगलमय होत असे. त्यातील काही  मोजकी गाणी सांगायची झाली तर 

गणराज रंगी नाचतो 

गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया 

भेटी लागी जीवा लागली से आस

विठ्ठल तो आला आला मला 

भावनांचा तु भुकेला रे मुरारी 

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला - पंडित नगरकर आणि लता मंगेशकर  

ह्यातील घनश्याम सुंदरा श्रीधरा हे गाणं तर सकाळच्या पावित्र्याला अगदी पुरेपूर शब्दांत सामावून घेणारं.  लताजींच्या त्या स्वर्गीय आवाजानं लहानपणी मनावर खूप खोलवर संस्कार होत गेले.  अनेक शतकांपासून चालत आलेल्या संस्कृतीचा आपण भाग आहोत ही भावना ही सकाळची भक्तिगीतं ऐकत दृढ होत गेली. ह्या गीतांनी मनाला दिलेल्या स्थिरतेचे वरदान अजूनही वेळोवेळी उपयोगी येते. 

घरगुती गणपतीसोबत अतूट नातं असणारी अनेक पिढ्यांतील मराठी बालमंडळी ! गणराज रंगी नाचतो ,  गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ह्या गाण्याचे सूर कानावर पडले की लहानपण कसं अगदी नाचत बागडत आपल्याजवळ येतं. त्या न विसरण्याजोग्या सात दिवसांच्या गणेशोत्सवात लतादीदी सदैव आपल्यासोबत राहिल्या, अजूनही राहतात आणि सदैव राहतील. 

मराठी मनाचा एक संस्कृतीमय कप्पा म्हणजे ज्ञानेश्वरी ! लतादिदींच्या आवाजातील ज्ञानेश्वरीतील रचना ऐकणं म्हणजे एक स्वर्गीय अनुभव! 

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले 

अजि सोनियाचा दिनु 

अरे अरे ज्ञाना झालासी पावन 

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा 

अवचिता परिमळू 

पैल तो गे काऊ 

पसायदान 

संभ्रमात पडलेल्या मनाला शांतीच्या भावनेची अनुभूती देणारी ह्या ज्ञानेश्वरांच्या कालातीत रचना ! ह्या रचनांचा अर्थ समजणं हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडील, पण लतादीदींच्या आवाजानं ह्या रचनांना सामान्य माणसांच्या हृदयात कायमचं बसवलं. 

त्या काळातील मराठी कुटुंबाचा अविभाज्य घटक असलेला रेडिओ आमच्या घरातही होता. सकाळी भक्तिगीतांनी वातावरण मंगलमय करणाऱ्या लतादीदी नंतर हिंदी गाण्यांच्या माध्यमातून वेगळ्या रुपात भेटायच्या. रात्री छायागीत मध्ये त्यांची गाणी ऐकताना स्वरांच्या माध्यमातून भावना कशा थेट हृदयापर्यंत पोहचू शकतात ह्याची पुरेपूर जाणीव होते. 

लतादीदींनी देशभक्तीपर काही अविस्मरणीय गीतं गायली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी "ऐ मेरे वतन के लोगों" हे  गीत सदैव प्रेरणादायक राहील.  त्यांच्या आवाजातील "अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत" हे गाणं ऐकून ज्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत असा माणुस विरळाच ! "वंदे मातरम" हे ही एक संस्मरणीय देशभक्तीपर गीत ! भीमसेन जोशी रचित "मिले सूर मेरा तुम्हांरा" ह्या गाण्यात संपुर्ण देशाला एकत्र जोडण्याची ताकद आहे. ह्या गाण्यात लतादीदींनी सहगायकांसमवेत आपल्या स्वरांची जादू आपल्यासमोर साकार केली आहे. 

जयोऽस्तु ते

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!

श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!

स्वातंत्र्यवीर सावरकर रचित ही देशभक्तीपर रचना दीदींच्या आवाजात ऐकून स्वातंत्र्यसैनिकांच्या भावना ह्या काळात सुद्धा आपल्यापर्यंत अगदी यथार्थपणे पोहोचतात. 

लतादिदींनी जवळपास सात दशकं अनेक भाषांतून अविस्मरणीय गीतं गायली. त्याचा आढावा घेण्याची माझी कुवत नाही. त्यांनी एकल आणि पुरुष गायकांसोबत मिळून अनेक गाणी गायली. त्यातील माझी आवडती ही काही गीतं !

आयेगा आयेगा आयेगा आयेगा आनेवाला 

अजीब दास्तां हैं ये 

अल्लाह तेरो नाम 

फैली हुई हैं सपनों की बाहें 

आप की नजरों ने समझा प्यार के काबील मुझे 

लग जा गले के फिर ये रात 

तू जहाँ जहाँ चलेगा 

प्यार किया तो डरना क्या 

सीने में सुलगते हैं अरमान 

ये दिल और उनकी निगाहो के साये 

बीती ना बिताई रैना 

चलते  चलते युंही कोई मिल गया था 

इन्ही लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा 

अपलम चपलम चपलायी रे 

आजा रे परदेसी 

हम चूप हैं के दिल सून रहें हैं 

लिखनेवाले ने लिख डाले 

चाँद फिर निकला मगर तुम ना आये 

तेरा जाना दिल के अरमानोका 

मोरा गोरा रंग ले ले 

मैं तो भूल चली बाबुल का देश 

दिल की नजर से ये बात क्या हैं 

कहीं दीप जलें कहीं दिल 

धीरे धीरे चल 

सरसे सरके सरकी चुनरिया 

नैना बरसे रिमझिम 

तुने ओ रंगीले कैसे जादू किया 

दो नैनो में आंसू बसे हैं 

आप यूं फासलों से चलते रहें 

ये रातें नयी पुरानी 

ये कहाँ आ गये हम 

जिया जले जाँ  जले 

खुद् से बातें करती रहती हैं 

ये शहर बडा अजनबी हैं 

अखेरचा हा तुला हा दंडवत 

मोगरा फुलला 
मी रात टाकली मी कात टाकली 
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या 
विसरु नको श्रीरामा मला 
झुलतो बाई रास झुला 
सख्या रे घायाळ मी हरिणी 

ह्या गाण्यांची यादी न संपणारी आहे. ह्या गाण्यातीलच नव्हे तर त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्यातील प्रत्येक शब्द, सूर अगदी मनात साठवून ठेवावा असा! प्रणयाधीन नायिकेच्या प्रत्येक भावनेला अगदी पुरेपूर न्याय देण्याची जादू दिदींनी सर्वच गाण्यांत केली आहे.  

लतादिदींनी साधारणतः १९५० सालापासून आपल्या स्वरांची जादू संपूर्ण भारतदेशावरच नव्हे तर जगभर पसरवली.  संपूर्ण मनुष्यजातीच्या इतिहास भारतखंडातील अविस्मरणीय गायिका म्हणून लतादिदींचे नांव सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल. लतादीदी आज लौकिकार्थानं जरी आज आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या सुरांच्या माध्यमातून सदैव आपल्यात राहतील. आपण ह्या बाबतीत अगदी सुदैवी ठरलो. एका ईश्वरी अवताराचे प्रत्यक्ष साक्षीदार असण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. आपण हा संगीताचा हा अमुल्य ठेवा जर आपल्या पुढील पिढीला त्यांच्यात ह्या गीतांची आवड निर्माण करुन देऊ शकलो तर ही लतादिदींना खरी श्रद्धांजली ठरेल ! 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...