भारतीय समाजाची सध्याची मनःस्थिती कशी आहे याविषयी आपण शांतपणे बसुन विचार केला असता फारसं आशादायी चित्र डोळ्यासमोर उभे राहात नाही. समाजाला समस्यांनी ग्रासलं आहे असा आपला काहीसा समज होण्याची शक्यता आहे. इतिहासकाळापासुन पाहिलं असता समस्यारहित समाज खास करुन भारतीय समाज बहुदा केव्हाही नसेल. समाजातील मध्यमवर्गीयांची आर्थिक परिस्थिती, हवामान, नोकऱ्यांची उपलब्धता, सामाजिक सुरक्षितता, शिक्षणाच्या संधी, वैयक्तिक नातेसंबंधांची एकंदरीत स्थिती, राजकीय नेतृत्वाची प्रगल्भता या घटकांची समाजाच्या मनःस्थितीवर परिणाम करण्याची मोठी क्षमता आहे.
माझा वावर केवळ शहरी विभागात मर्यादित असल्यानं ह्या पोस्टची व्याप्ती केवळ शहरी समाजापुरता मर्यादित आहे. समाजाची मनःस्थिती ओळखण्याचे मापदंड कोणते? समाजातील घटकांना व्यक्त होण्यासाठी जी उपलब्ध माध्यमं आहेत त्यात सोशलमीडिया हे घरबसल्या उपलब्ध असणारे माध्यम असल्यानं व्यक्त होण्यासाठी आणि समाजमनाचे प्रतिबिंब जोखण्यासाठी त्याचा बऱ्याच वेळा वापर केला जातो.
परंतु सोशल मीडियावर तुमच्या जीवनाचा कदाचित १०% भाग व्यक्त केला जातो. स्वतःच्या वाढदिवसाचे, लग्नाच्या वाढदिवसाचे अथवा सुट्ट्यानिमित्त केलेल्या विविध सहलींचे सोशल मीडियावरील फोटो हे सामाजिक आनंदाचे द्योतक असू शकत नाही. मग आपला रोख वर्तमानपत्रातील लेखांकडे, वैयक्तिक जीवनातील आपल्या संपर्कात येणाऱ्या मित्रमंडळींच्या व्यक्त केलेल्या भावनांकडे वळतो.
समस्या कदाचित तुलनात्मक संज्ञा आहे. दोन भिन्न व्यक्ती एकाच परिस्थितीत आनंदी आणि दुःखी असु शकतात, एकाच व्यक्ती एकाच परिस्थितीत दोन भिन्न वेळी आनंदी आणि दुःखी असु शकते.
आजच्या पोस्टचा मुख्य मुद्दा आपल्या समाजात काही प्रमाणात पसरल्या जाणाऱ्या नकारात्मकतेकडे आहे! सुरुवात माझ्यापासुन करुयात ! मला माझ्या कार्यालयीन कामाविषयी बोलण्यास तशी परवानगी नाही. पण एक गोष्ट मात्र मी सांगू इच्छितो! वरिष्ठ पातळीवर काही अत्यंत बुद्धिमान आणि नैतिकदृष्या योग्य निर्णय घेणाऱ्या माणसांचा सहवास मला कार्यालयात लाभला आहे. हल्लीच्या युगात सुद्धा अशी माणसे अस्तित्वात आहेत. वयानं विशी - तिशीत असणारी ऑफिसातील तरुण मंडळी सुद्धा उथळपणा दाखवत नाहीत. जबाबदारीनं वागतात! म्हणजे माझ्याबाबतीत कुठंतरी सकारात्मक घडत आहे, पण मी कोणाशी संवाद साधताना ह्या गोष्टीपासुन संवादाची सुरुवात करण्याची शक्यता किती आहे? बहुतांशी वेळा मी माझ्या कामाच्या दीर्घकालीन वेळा, तणाव ह्या विषयी बोलणं पसंद करीन.
हे असं का घडत असावं? बहुदा आपण आपल्या जीवनाचे दोन भाग करतोय ! आयुष्याच्या वाढदिवस, सुट्ट्या वगैरे भागात उगाच सुखी आहोत असं दाखवायचं पण बाकी आयुष्यात मात्र आपण समस्यांचा सामना करतोय हे भासवायचं ! ह्यात दोन शक्यता आहेत! काहीजण मोजक्या लोकांसमोर आपण आयुष्याचा हा आनंदी कप्पा उघड करत असावेत (ह्यात उगाच आपलं सूख दुसऱ्याला का दाखवावं हा विचार ही असावा !) पण काही जणांना आपल्या आयुष्याच्या ह्या दुसऱ्या भागात आनंदाचा हा कप्पा अस्तित्वात आहे ह्याची जाणीवच नसावी !
आपल्या भोवताली वावरणाऱ्या लोकांविषयी दिवसेंदिवस ढासळणारा विश्वास ही आपली बहुदा खरी समस्या आहे !
बाकी सायंकाळी बागेला पाणी देताना मला गवसलेला माझ्या आयुष्याचा हा आनंदी कप्पा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा