मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ३१ मे, २०१९

कास पठार, माउंट एव्हरेस्ट वगैरे वगैरे



निसर्ग हा एक मनस्वी सिद्धहस्त कलाकार आहे. निसर्ग ज्याप्रकारे आपल्या अदभुत कलाकारीनं मनुष्याच्या डोळ्यांचं, मनाचं पारणं फेडु शकतो त्याची सर कोणत्याही मानवनिर्मित कलाकृतीला येणं तसं कठीणच ! असं असलं तरी मनुष्यसुद्धा आपल्या परीनं नेटानं प्रयत्न करीतच असतो ! मनुष्यानं सुद्धा काही अप्रतिम कलाकृती ह्या भुतलावर निर्मिल्या आहेत!

निसर्ग आणि मनुष्यनिर्मित कलाकृतींचा याची देही डोळा आनंद घेणे ही इच्छा बऱ्याच जणांच्या मनात वर्षानुवर्षे रुजलेली असते. काही काळापुर्वी मर्यादित आर्थिक परिस्थिती, दुरवर आणि दुर्गम ठिकाणी जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाची सर्वसामान्य जनांपर्यंत असलेली मर्यादित उपलब्धता आणि आयुष्यात धाडस किती प्रमाणात करावं ह्याविषयी असलेली काहीशी मवाळ भूमिका ह्यामुळं सर्वसामान्य लोकं मर्यादित धाडशी कृत्यं करीत. 

अचानक आपण खालील तक्त्याकडं वळूयात! 
  
मुंबई उपनगरातील गणपती मंदिर 
सिद्धिविनायक मंदिर 
हिराडोंगरी (वसई )
माउंट एव्हरेस्ट
घरासमोरील बाग  
कास पठार 

मनुष्य कोणत्याही गोष्टीचा आनंद दोन पातळ्यांवर घेत असतो. 

पहिली असते मनातील भावनेची अनुभूती ! उपनगरातील गणपती मंदिर असो वा प्रभादेवीचं सिद्धीविनायक मंदिर, त्या सर्वशक्तिमानाच्या चरणाशी लीन होण्याची अनुभूती सारखीच असायला हवी ! 
दुसरी भावना असते ती त्या स्थळाच्या दर्शनाने अनुभवलेल्या इंद्रिय अनुभवांनी नतमस्तक होण्याची अनुभूती ! इथं आपण मानसिक अनुभूतीपेक्षा आपल्या इंद्रियांना जाणवलेल्या संवेदनावर आपल्या आनंदाची पातळी ठरवत असतो. 

भुतलावरील जी काही निसर्गनिर्मित अद्भुत स्थळं आहेत त्यांना प्रत्यक्षात भेट देणं हा म्हटलं तर प्रत्येक मनुष्याचा हक्क आहे. परंतु आपल्या प्रत्यक्ष भेटींनी  आणि तिथं आपण मागं सोडत असलेल्या पाऊलखुणांनी त्या स्थळाच्या सौंदर्यावर जर विपरीत परिणाम होत असेल तर मानवजातीचा एक  सुजाण प्रतिनिधी म्हणुन आपण खरोखर त्या स्थळांना भेट द्यायला हवी का ह्या गोष्टीचा विचार करायला हवा. 

गेल्या दहा वर्षात अचानक प्रसिद्धीला आल्यानं आपली नैसर्गिक विविधता धोक्याच्या पातळीवर जाण्याच्या संकटात सापडलेलं कास पठार, पर्यटकांच्या गर्दीत सापडलेलं एव्हरेस्ट शिखर ही सारी उदाहरणे कसली प्रतिक आहेत? एव्हरेस्ट शिखरावरील गर्दीमुळं वेळेत शिखरावरुन परतीच्या मार्गावर बेस कॅम्पपर्यंत पोहोचु न शकल्यानं मृत्युमुखी पडलेल्या अभागी गिर्यारोहकांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली ! 

मनाच्या हिंदोळ्यावर बसुन अफाट कल्पनाशक्तीनं सुद्धा आपण ह्या विश्वातील सौंदर्य अनुभवू शकतो, त्याच्याशी एकरुप होऊ शकतो ह्या भावनेचा पुर्णपणे झालेला लोप हे महत्वाचे कारण !

एक समाज म्हणुन लयाला गेलेली आपली मानसिक संवेदनशीलता परत मिळविणं कठीणच ! काही कठोर निर्बंधांचाच (जसे की मर्यादित पर्यटकांनाच कास पठाराला भेट देण्याची परवानगी !) वापर करणे आता आपल्या हाती आहे !

आपल्या पुढील पिढीला पृथ्वीवरील सौंदर्याचा आनंद अनुभवता यावा ह्यासाठी वसुंधरेचे जतन करणं ही प्रत्येक पिढीची जबाबदारी असते ! उपभोगवादाला शरण जाताना कुठंतरी ह्या जबाबदारीचं भान असु द्यात !

रविवार, २६ मे, २०१९

तो ही माणुस आहे !


पार्श्वभूमी  - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अथवा विश्वचषक स्पर्धेचा थेट प्रक्षेपणाचा एका आलिशान दिवाणखान्यात आनंद घेत बसलेली मित्रमंडळी / कुटुंब  !

मानसिकता -  गवसलेल्या आर्थिक सुबत्तेमुळं पैसा टाकुन आयुष्यात हवं ते मिळवता येतं!  

प्रसंग - सायंकाळची चार - साडेचारची वेळ ! टीव्हीवरील कार्यक्रम ऐन रंगात आला असताना मित्रमंडळीतील एक दोघांना अचानक भुकेची जाणीव होते ! झोमॅटो / स्विगी किंवा तत्सम ऍपवरुन काहीसं चमचमीत मागवलं जातं ! प्रशस्त दिवाणखाना, मोठाला टी. व्ही., बाहेरच्या धगधणाऱ्या उन्हाळ्याशी स्पर्धा करत कृत्रिम थंडावा निर्माण करणारं वातानुकूलित यंत्र, शीतपेयं ह्या साऱ्या पिक्चर परफेक्टमध्ये एकमेव कमी असलेल्या त्या पिझ्झा / मसालाडोसा आणि ह्या मंडळींना जोडणारा असतो तो डिलिव्हरी बॉय !

ऍपवरुन त्या डिलिव्हरी बॉयच्या प्रवासाचा मागोवा घेतला जातो. त्याला दिलेल्या मुदतीत तो पोहोचतो की नाही ह्यावर टीव्हीवर  लक्ष देता देता नजर ठेवली जाते ! 

तो बिचारा डिलिव्हरी बॉय ! दिवसातील त्याची ही पाचवी डिलिव्हरी ! तापत्या उन्हात, धो धो पडणाऱ्या पावसात, शहरातील खड्डामय रस्त्यांवरुन आपली दुचाकी सांभाळत तो इच्छित स्थळी ठरलेल्या वेळेआधी पोहोचण्याचा कसोशीनं प्रयत्न करतोय. वेळेत जर पोहोचता आलं नाही तर त्याच्या मोबदल्यातुन काही रक्कम वजा होणार आहे. त्यामुळं कदाचित त्याला सिग्नल मोडुन पुढे जाण्याची अथवा वाहतुकीच्या उलट्या दिशेनं आपलं वाहन हाकण्याची गरज वाटणार आहे. अशा वेळी ट्रॅफिक पोलिसानं पकडलं किंवा काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी पुर्णपणे त्याच्यावर असणार आहे. खरंतर ह्या पोस्टचा विषय मुंबई पोलिसांनी ह्या डिलिव्हरी बॉईजसाठी आयोजिलेल्या समुपदेश सत्रांवरून सुचला. 

वातानुकुलित दिवाणखान्यातील बेल ज्यावेळी वाजते आणि हा डिलिव्हरी बॉय आपल्यासाठी आपण मागवलेला खाद्यपदार्थ घेऊन येतो, त्यावेळी त्यानं दिवसातील कितवी डिलिव्हरी केली अथवा तो किती उन्हा-तान्हातुन / धो धो पावसातुन आला असावा हा विचार आपल्या मनात क्वचितच येतो. कदाचित आपल्यातील काही जणांच्या त्याच्याशी बोलण्यातुन काहीशी मग्रुरीसुद्धा जाणवत असणार. त्याला ऋतूनुसार चहा पाणी हवं आहे का हे विचारावं ह्याची थोडी जाणीव आपण ठेवायला नको का?

हल्ली शारीरिक क्षमतेवर अवलंबुन असणारी अशी काही करियर्स निर्माण झाली आहेत. डिलिव्हरी बॉईज, टूरवर जाणारे टूर मॅनेजर ह्या सर्वांना वयाच्या कितव्या वर्षापर्यंत ह्या नोकऱ्या जमणार आहेत हे देव जाणे ! उन्हा - तान्हात काम करताना त्यांना तब्येतीच्या काही तक्रारींना त्यावेळी तोंड द्यावं लागु शकते किंवा त्यांच्या तब्येतीवर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु साध्या आरोग्यविम्याची तरतुद करण्याचं भान त्यांना नसतं अथवा कदाचित ही चैन त्यांना परवडू शकत नसावी !

त्यांच्या ह्या समस्या सोडविणे कदाचित आपल्या हातात नसावं पण दारी आलेल्या ह्या डिलिव्हरी बॉयला  एक माणुस म्हणुन वागविणं नक्कीच आपल्या हातात आहे !

शनिवार, १८ मे, २०१९

शहरी समाजाचा हरवलेला आनंदी कप्पा !


भारतीय समाजाची सध्याची मनःस्थिती कशी आहे याविषयी आपण शांतपणे बसुन विचार केला असता फारसं आशादायी चित्र डोळ्यासमोर उभे राहात नाही.  समाजाला समस्यांनी ग्रासलं आहे असा आपला काहीसा समज होण्याची शक्यता आहे. इतिहासकाळापासुन पाहिलं असता समस्यारहित समाज खास करुन भारतीय समाज बहुदा केव्हाही नसेल.  समाजातील मध्यमवर्गीयांची आर्थिक परिस्थिती, हवामान, नोकऱ्यांची उपलब्धता, सामाजिक सुरक्षितता, शिक्षणाच्या संधी, वैयक्तिक नातेसंबंधांची एकंदरीत स्थिती, राजकीय नेतृत्वाची प्रगल्भता या घटकांची समाजाच्या मनःस्थितीवर परिणाम करण्याची मोठी क्षमता आहे. 

माझा वावर केवळ शहरी विभागात मर्यादित असल्यानं ह्या पोस्टची व्याप्ती केवळ शहरी समाजापुरता मर्यादित आहे. समाजाची मनःस्थिती ओळखण्याचे मापदंड कोणते? समाजातील घटकांना व्यक्त होण्यासाठी जी उपलब्ध माध्यमं आहेत त्यात सोशलमीडिया हे घरबसल्या उपलब्ध असणारे माध्यम असल्यानं व्यक्त होण्यासाठी आणि समाजमनाचे प्रतिबिंब जोखण्यासाठी त्याचा बऱ्याच वेळा वापर केला जातो. 

परंतु सोशल मीडियावर तुमच्या जीवनाचा कदाचित १०% भाग व्यक्त केला जातो. स्वतःच्या वाढदिवसाचे, लग्नाच्या वाढदिवसाचे अथवा सुट्ट्यानिमित्त केलेल्या विविध सहलींचे सोशल मीडियावरील फोटो हे सामाजिक आनंदाचे द्योतक असू शकत नाही. मग आपला रोख वर्तमानपत्रातील लेखांकडे, वैयक्तिक जीवनातील आपल्या संपर्कात येणाऱ्या मित्रमंडळींच्या व्यक्त केलेल्या भावनांकडे वळतो.  

समस्या कदाचित तुलनात्मक संज्ञा आहे. दोन भिन्न व्यक्ती एकाच परिस्थितीत आनंदी आणि दुःखी असु शकतात, एकाच व्यक्ती एकाच परिस्थितीत दोन भिन्न वेळी आनंदी आणि दुःखी असु शकते. 

आजच्या पोस्टचा मुख्य मुद्दा आपल्या समाजात काही प्रमाणात पसरल्या जाणाऱ्या नकारात्मकतेकडे आहे! सुरुवात माझ्यापासुन करुयात ! मला माझ्या कार्यालयीन कामाविषयी बोलण्यास तशी परवानगी नाही. पण एक गोष्ट मात्र मी सांगू इच्छितो! वरिष्ठ पातळीवर काही अत्यंत बुद्धिमान आणि नैतिकदृष्या योग्य निर्णय घेणाऱ्या माणसांचा सहवास मला कार्यालयात लाभला आहे. हल्लीच्या युगात सुद्धा अशी माणसे अस्तित्वात आहेत. वयानं विशी - तिशीत असणारी ऑफिसातील तरुण मंडळी सुद्धा उथळपणा दाखवत नाहीत. जबाबदारीनं वागतात! म्हणजे माझ्याबाबतीत कुठंतरी सकारात्मक घडत आहे, पण मी कोणाशी संवाद साधताना ह्या गोष्टीपासुन संवादाची सुरुवात करण्याची शक्यता किती आहे? बहुतांशी वेळा मी माझ्या कामाच्या दीर्घकालीन वेळा, तणाव ह्या विषयी बोलणं पसंद करीन. 

हे असं का घडत असावं? बहुदा आपण आपल्या जीवनाचे दोन भाग करतोय ! आयुष्याच्या वाढदिवस, सुट्ट्या वगैरे भागात उगाच सुखी आहोत असं दाखवायचं पण बाकी आयुष्यात मात्र आपण समस्यांचा सामना करतोय हे भासवायचं ! ह्यात दोन शक्यता आहेत! काहीजण मोजक्या लोकांसमोर आपण आयुष्याचा हा आनंदी कप्पा उघड करत असावेत (ह्यात उगाच आपलं सूख दुसऱ्याला का दाखवावं हा विचार ही असावा !) पण काही जणांना आपल्या आयुष्याच्या ह्या दुसऱ्या भागात आनंदाचा हा कप्पा अस्तित्वात आहे ह्याची जाणीवच नसावी ! 

आपल्या भोवताली वावरणाऱ्या लोकांविषयी दिवसेंदिवस ढासळणारा विश्वास ही आपली बहुदा खरी समस्या आहे ! 

बाकी सायंकाळी बागेला पाणी देताना मला गवसलेला माझ्या आयुष्याचा हा आनंदी कप्पा !









रविवार, १२ मे, २०१९

माझे विमानप्रवास - भाग १

   "तु कठीण आहेस" एक मित्र कधीतरी कार्यालयीन जीवनात मला म्हणाला होता. लौकिकार्थाने अनावश्यक त्या गोष्टीची सखोल आकडेवारी बाळगण्याचा माझा असलेला छंद पाहून त्यानं हे विधान केले होते.  आजच्या या पोस्टच्या निमित्ताने त्या मित्राची आठवण झाली. आपण किती वेळा विमानात बसलो आहोत ही काही नोंद ठेवण्यासारखी गोष्ट नाही.  परंतु मी त्याची नोंद ठेवली आहे. आज एका रिकामटेकड्या रविवारी संध्याकाळी या पोस्टद्वारे माझ्या विमानउड्डाणाच्या आठवणीतील पहिलं पुष्प मी आपल्यासमोर ठेवत आहे. 

माझ्या आयुष्यातील सर्व विमानउड्डाणांची यादी खालीलप्रमाणे 

1. मुंबई बहारीन 
2. बहारीन लंडन  
3. लंडन दुबई 
4. दुबई मुंबई 
5. मुंबई चेन्नई 
6. चेन्नई मुंबई  
7. मुंबई सिंगापुर 
8. सिंगापुर टोकियो 
9. टोकियो लॉस अँजेलिस  
10. लॉस अँजेलिस  फिनिक्स 
11. फिनिक्स ह्युस्टन  
12. ह्युस्टन  फोर्ट लोडरडेल 
13. फोर्ट लोडरडेल फिनिक्स 
14. फिनिक्स लॉस अँजेलिस 
15. लॉस अँजेलिस चायनीस तायपयी 
16  चायनीस तायपयी सिंगापुर 
17. सिंगापूर मुंबई  
18. मुंबई मिलान  
19. मिलान  मियामी 
20. मियामी  नेवार्क 
21. नेवार्क पॅरिस  
22. पॅरिस मुंबई  
23. मुंबई पॅरिस  
24. पॅरिस नेवार्क 
25. नेवार्क पॅरिस  
26. पॅरिस मुंबई  
27. मुंबई कोची 
28. कोची मुंबई 
29. मुंबई  चंदिगढ  
30. चंदिगढ मुंबई  
31.मुंबई  हैद्राबाद  
32. हैद्राबाद  मुंबई 
33. मुंबई दिल्ली 
34. दिल्ली मुंबई 
35. मुंबई चेन्नई 
36. चेन्नई मुंबई  
37. मुंबई  हैद्राबाद  
38. हैद्राबाद  मुंबई  
39. मुंबई  हैद्राबाद  
40. हैद्राबाद  मुंबई  
41. मुंबई कोझिकोडे  
42. कोझिकोडे मुंबई  
43. मुंबई सिंगापुर  
44. सिंगापुर हॉंगकॉंग  
45. हॉंगकॉंग सिंगापुर  
46. सिंगापुर मुंबई 
47. मुंबई  हैद्राबाद   
48. हैद्राबाद  मुंबई  
49. मुंबई फ्रॅंकफुर्ट  
50. फ्रॅंकफुर्ट  फिलाडेल्फिया 
51. फिलाडेल्फिया कोलंबस 
52. कोलंबस  फिलाडेल्फिया
53. फिलाडेल्फिया फ्रॅंकफुर्ट  
54. फ्रॅंकफुर्ट  मुंबई 
55. मुंबई  हैद्राबाद   
56. हैद्राबाद  मुंबई  
57. मुंबई  हैद्राबाद   
58. हैद्राबाद  मुंबई  
59. मुंबई  हैद्राबाद   
60. हैद्राबाद  मुंबई  
61. मुंबई लंडन  
62. लंडन फिलाडेल्फिया
63. फिलाडेल्फिया डॅलस 
64. डॅलस लंडन 
65. लंडन मुंबई  
आजच्या ह्या पोस्टमध्ये पहिल्या काही विमानप्रवासाशी निगडित आठवणी !

आयुष्यातील माझे पहिले विमान उड्डाण व्यावसायिक कामानिमित्त इंग्लंड येथे जाण्यासाठी झाले. एकंदरीत माझ्या पहिल्या परदेश प्रवासाविषयी माझ्या घरी संमिश्र प्रतिक्रिया होती. हा मुलगा आत्तापर्यंत फक्त वसई, मुंबई इतकाच फिरला आहे. महाराष्ट्राबाहेर फक्त गोव्याला गेला आहे. तो एकटा थेट इंग्लंडला कसा काय जाणार या मुद्यावर घरचे काही प्रमाणात चिंतित होते,  त्याचवेळी परदेश प्रवासाची संधी मिळाल्यामुळे त्यांना आनंदही होत होता. 

हीथ्रो विमानतळावर जाणारे आमचे गल्फ एअर विमान प्रथम बहारीनला जाऊन मग लंडनला पोहोचणार होते. बहारीन येथे साधारण सहा तासाचा थांबा होता. मुंबईहून बहारीनला आम्ही ज्यावेळी उतरलो त्यावेळी आमच्यातील शेषासाई नावाच्या मित्राच्या बॅगेच्या तपासणीमध्ये तेथील अरबांना काही आक्षेपार्ह असे आढळले असावे, त्यामुळे त्यांनी त्याला काही वेळ बाजूला घेतले होते त्यामुळे आम्ही सर्व चिंतित झालो होतो परंतु नंतर त्याला सोडण्यात आले. बहारीन येथे सहा तास काय करायचे हा मला आणि माझ्यासोबत असलेल्या माझ्या सहकारी मित्रांना तसा मोठा प्रश्नच होता.  या सहकाऱ्यांमध्ये एक मुलगीदेखील असल्याने तिनं मात्र हा वेळ बहारीन येथे हे विंडो शॉपिंग करण्यात चांगला व्यतित केला. या विमानतळावर अमेरिका वायुदलाची काही विमाने उड्डाण करताना आम्हाला दिसत होती. सहा तास जरी संपले तरी आमचे लंडनला जाणारे विमान उड्डाण करत नव्हते म्हणजे खरंतर आम्हांला विमानात प्रवेश केला जाऊ देत नव्हता. तेथे मोठ्या अधिकारपदावर असलेला एक अरब विमानाच्या प्रवेशद्वारापाशी मोठ्याने हातवारे करत कर्मचाऱ्यांना सूचना देत होता.  कधी एकदा या विमानतळावरून आमचे उड्डाण विमान करेल याची मी वाट पाहत होतो.  बाकी मधल्या वेळात आम्ही आमच्याजवळ असलेल्या पौंडांचा वापर करून मॅकडोनाल्डचे बर्गर खाल्ले होते. ज्यावेळी मध्यमवर्गीय भारतीय मुले पहिल्यांदा परदेशी जातात त्यावेळी परकीय चलन हाताळताना त्याचे भारतीय रुपयात परिवर्तन करून आपण किती रुपये खर्च करीत आहोत ह्याची काहीशी नको असणारी बोचरी जाणीव स्वतःला करुन देण्यात त्यांना कोण आनंद मिळत असतो. ज्यावेळी तिघे-चौघे मिळून सामायिकरीत्या खर्च करतात त्यावेळी त्याचे विभागणीकरण करताना नको तितकी अचुकता दाखवण्याचा प्रयत्न करतात. मला या गोष्टीचा पहिला अनुभव बहारीन इथं आला. पुढे इंग्लंडच्या वास्तव्यात काही दिवसातच मी या प्रकाराला विटून जाऊन मी आपले स्वतःचे खर्च खाते चालवले होते.  बहारीन ते लंडन हा प्रवास चांगला चालला होता. मला जरी खिडकीची सीट मिळाली नसली तरी माझ्या सीटवरून जे काही युरोपचे नयनरम्य दर्शन दिसत होते ते पाहून मी खुश होत होतो. इंग्लंडच्या हीथ्रो विमानतळावर येथे प्रथम उतरताच बऱ्यापैकी हिंदी बोलणारा कर्मचारीवर्गसुद्धा मला आढळला. हे पाहून मला आश्चर्य वाटले होते. परंतु इमिग्रेशन अधिकारी मात्र पूर्णपणे ब्रिटिश होते. सुरुवातीला आम्हांला आमच्या कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता वास्तव्याचा पत्ता म्हणून देण्यात आला होता. तेथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मला पुढील काही दिवसात खरोखरीचा वास्तव्याचा पत्ता योग्य ठिकाणी कळव अशी सूचना दिली होती. संध्याकाळचे आठ वाजले त्यावेळी आम्ही इथून विमानतळावर बाहेर पडलो होतो.  परंतु तेव्हाही तिथं बर्‍यापैकी उजेड होता. आम्ही मग तिथून ब्रायटन येथे जाणारी बस पकडली होती. 

उड्डाण ३ गॅटविक ते दुबई 

तीन महिन्याचे असलेले इंग्लंडचे वास्तव्य बराच काळ टिकले. शेवटी तिथल्या हिवाळ्यातला वैतागून मी स्वतःहून परत येण्याचा निर्णय घेतला होता.  परतीचे विमान गॅटविक इथून बहुदा इथियाद या एअरलाईनचे होते.  गॅटविक ते दुबई हा प्रवासात माझ्या सोबतीला बाजूला एक इंग्लिश उत्साही सद्गृहस्थ बसला होता. त्याच्याशी साधारण दिड-दोन तास फॉर्म्युला वन, इंग्लिश क्रिकेटची सद्यस्थिती ह्या विषयावर गप्पा मारल्याचे माझ्या स्मरणात आहे. दुबई येथे उतरताना रात्रीच्या विजेच्या प्रकाशांच्या रोषणाईत झगमगून निघालेला विमानतळ पाहून मी प्रचंड खूश झालो होतो. दुबई ते मुंबई हा विमानाचा प्रवास मात्र फारसा उत्साहवर्धक नव्हता. अचानक एसटीमध्ये बसल्यासारखे वाटू लागले होते. परंतु जसजसे मुंबई विमानतळ जवळ येऊ लागले तसं इतक्या कालावधीनंतर मायदेशी परतण्याचा आनंद काही आगळाच होता!!

इंग्लंडहुन मी ज्यावेळी परतलो त्यानंतरच्या दहा दिवसातच इंग्लंडहून अमेरिकन एक्सप्रेसचे काही उच्च अधिकारी चेन्नई येथील ऑफिसात येणार होते. माझा या उच्च अधिकाऱ्यांशी असलेला घनिष्ठ संबंध लक्षात घेता मला चेन्नईला त्यांच्यासोबत पाठवण्याचा घाट घालण्यात आला.  ह्या प्रवासात माझ्यासोबत ब्रायटन होऊन परत आलेला अजून एक सहकारी होता.  हा प्रवास काही खास लक्षात होण्यासारखा नव्हता. परंतु या सहकाऱ्याला विमान उतरण्याच्या वेळी होणाऱ्या हवेच्या दाबातील फरकामुळे डोकेदुखीचा प्रचंड त्रास होत असे. त्यामुळे त्यानं पहिल्यांदा माझा हात घट्ट पकडून ठेवला. तो आणि मी आमच्या कंपनीच्या गेस्टहाऊसवर राहत असू.  तिथे तो मला त्याने बनवलेल्या गजलांचा जबरदस्तीचा श्रोता बनवत असे!  ब्रायटनहुन परत आल्यावर आणि चेन्नईला जाण्याआधी माझी आणि प्राजक्ताची प्रथम भेट झाली होती! पण बोलण्यासारखे खूप होते आणि त्यामुळं चेन्नईला ऑफिस सुटल्यावर तिथल्या कॅफेमध्ये जाऊन मी तिला भलीमोठी ई -मेल्स लिहीत असे. 
सहावा विमानप्रवास म्हणजे चेन्नईहून मुंबईला परत येण्याचा विमानप्रवास! हा देखील सुरळीत झाला! आत्तापर्यंतच्या माझ्या सर्व प्रवासातील हा एकमेव प्रवास असा की ज्यात मी विमानातून उतरल्यावर विरार लोकल पकडून होळी बसने घरी गेलो आहे!
त्यानंतरच्या काळात विवाह आणि नोकरीमधील नवीन प्रोजेक्ट यामुळे पुढील विमान प्रवासाला काही वेळ लागला! पुढील प्रवास हा पुन्हा परदेश प्रवास होता.  ही अमेरिकावारी असणार होती. अमेरिकेला आम्हांला जायचे होते ते लॉस एंजलिसद्वारे फिनिक्स येथे! परंतु लॉस एंजेलिसला विमान काही थेट उड्डाण करणार नव्हते! प्रथम सिंगापूर मग टोकियो आणि त्यानंतर लॉस एंजलिस अशा तीन टप्प्यांमध्ये हा प्रवास होणार होता! सिंगापूरला आम्ही उतरलो त्यावेळी माझा मोठा भाऊ तिथे कंपनीच्या कामानिमित्त वास्तव्य करून होता. दोन उड्डाणांमधील मोजक्या वेळात त्याला मी विमानतळावरून फोन केला होता. सिंगापूर ते टोकियो हा विमान प्रवास सुद्धा जवळपास आठ तासाचा होता. या सर्व प्रवासात प्राजक्ता माझ्यासमवेत होती. त्यामुळे एकंदरीत वेळ कंटाळवाणा न होता लवकर जात होता!!! टोकियोच्या नारिटा विमानतळावर आम्हाला एका विमानातून उतरवून लगेचच दुसर्‍या विमानात बसविण्यात आले होते.  या दरम्यान येथील हसतमुख हवाईसुंदरीनी आम्हांला चॉकलेटससुद्धा दिली होती! टोकियो ते लॉस एंजलिस हा सुद्धा एक दीर्घ प्रवास होता! सिंगापूर एअरलाइन्सने हा प्रवास असल्यामुळे त्यांच्या हवाई सुंदरीनी सर्व प्रवाशांची योग्य बडदास्त ठेवली होती! लॉस एंजलिसला इमिग्रेशनचे सोपस्कार पार पडून आंतरराज्यीय विमान पकडण्यासाठी आम्हांला विमानतळाबाहेर पडावे लागले होते. त्यावेळी आलेला तेथील थंड हवेचा पहिला अनुभव लक्षात राहण्याजोगा होता!  फिनिक्सला जाणारे आमचे विमान खूपच उशीराने आले.  त्यामुळे आम्हांला लॉस एंजलिसला बराच काळ वाट पहावी लागली होती. आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करताना मोठाली विमाने आपण पाहतो, अनुभवत असतो. परंतु लॉस एंजेलिस ते फिनिक्स या प्रवासासाठी मिळालेले विमान बहुधा वीस ते तीस आसनांचे होते. त्यामुळे ज्यावेळी या विमानाने उड्डाण केले त्यावेळी प्राजक्ताने माझा हात घट्ट पकडला होता !पण ह्या विमानाने ज्यावेळी हवेत वळण घेतले त्यावेळी तर मीही चक्क घाबरलो होतो!  परंतु शेंगदाणे वाटत फिरणाऱ्या त्या हवाई सुंदऱ्या मात्र अगदी आनंदात होत्या. त्यांच्याकडे पाहून कदाचित आपण यातून तावून सुलाखून निघू शकू असा आम्हाला विश्वास वाटला होता! 

उड्डाण ११ फिनिक्स ते ह्यूस्टन / ह्युस्टन ते फोर्ट लॉडरडेल 

खरंतर फिनिक्स ला आल्यावर आम्ही कामानिमित्त तेथेच राहणार होतो.  परंतु काही कारणास्तव माझी फ्लोरिडा येथील फोर्ट लॉडरडेल इथे नियुक्ती करण्यात आली.  आम्हांला फ्लोरीडाला ह्युस्टन मार्गे जावे लागले.  अमेरिकेच्या आंतरराज्यीय प्रवासात तुमच्या अंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वजन केलेल्या बॅग तुम्हाला संकटात टाकू शकतात!  त्यात आम्ही केबिन लगेजमध्ये काही द्रव सौंदर्यप्रसाधने घेण्याची चूक केली होती! त्यामुळे आम्हाला अधिकच्या सुरक्षा तपासणीसाठी बाहेर काढण्यात आले. परंतु सुरुवातीच्या कालावधीत हा अनुभव आल्यामुळे हल्ली मला या गोष्टीचे भय वाटत नाही! आम्ही फ्लोरिडाला प्रवास चालू केला त्यावेळी जसजसं फ्लोरिडा जवळ येत गेलं तसा अवतीभवती काळ्याकुट्ट ढगांनी आकाशात गर्दी केली होती. त्यामुळे फिनिक्सच्या रुक्ष वातावरणात कित्येक महिने व्यतीत केल्यानंतर आमच्यासाठी हा एक सुखद अनुभव होता!

फ्लोरिडातील वास्तव्यानंतर आम्ही ज्यावेळी भारतात परतलो त्यावेळी आम्ही भारतात परत येण्यास ५३ तास घेतले. हा एक जागतिक विक्रम आहे! त्याविषयी आधीच मोठ्या दोन पोस्ट आहेत ! त्या जशाच्या तशा मी इथं नमुद करत आहे. 

फ्लोरिडा ते मुंबई ५३ तास - प्रवासवर्णन भाग १

ब्लॉगचे शीर्षक वाचून हे एखाद्या अतिजलद जहाजाने केलेल्या प्रवासाचे वर्णन असावे असा तुमचा समज झाल्यास त्यात काही चुकीचे नाही. परंतु तसली काही परिस्थिती नसून २००२ साली मी सपत्निक केलेल्या एका प्रदीर्घ विमानप्रवासाची ही हकीकत आहे. आणि हो,  हा नियोजित ५३ तासांचा प्रवास होता. ह्यात कोठेही विमान रद्द झाले नाही किंवा खोळंबले नाही किंवा आम्ही ते चुकविले नाही. बाकी म्हणावं तर विमानांचा वेगही २००२ साली अगदी कमी होता असेही नाही!
प्रस्तावना खूप झाली. झाले असे की माझी नेमणूक सर्वप्रथम फिनिक्स, अरिझोना इथे करण्यात आली होती. माझ्या तत्कालीन कंपनीच्या धोरणानुसार त्या कंपनीच्या भारतीय शाखेने आमचे मुंबई ते फिनिक्स असे दोन्ही मार्गांचे तिकीट घेतले. फिनिक्स हे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या जवळ असल्याने आम्ही मुंबईहून निघताना सिंगापूर - टोकियो - लॉस अंजेलीस - फिनिक्स असा प्रवास केला होता. त्या तिकीटावरील तारीख आणि वेळ ह्यांचा मेळ बसविताना नाकी नऊ आल्याने आम्ही शेवटी फिनिक्सला किती वाजता पोहोचणार ह्याचा फक्त विचार केला होता. हा प्रवास तसा व्यवस्थित झाला.
फिनिक्स मधील वास्तव्य तसे सुखदायक चालले होते. तेथील टीम अनुभवी आणि स्थिर अशी होती. त्यामुळे नवीन आज्ञावली विकसनाचे काम आणि प्रोडक्शन सपोर्ट (आग विझवण्याचे काम!) ह्यात काही चिंतेचे प्रसंग येत नसत. लग्नानंतर आमचे हे पहिलेच वर्ष होते आणि त्यामुळे अमेरिकेत अगदी शून्यातून घर वसवायची संधी मिळाल्याने आम्ही खुशीत होतो. परंतु म्हणतात ना कधी कधी सुखाला दृष्ट लागते. आमच्या बाबतीतही असेच झाले. तीन महिन्यानंतरच त्या प्रोजेक्टच्या संघरचनेत काहीसा बदल करण्याचे ठरविण्यात आले आणि भारतातील संघ मुंबईऐवजी चेन्नईला स्थलांतरित करण्याचे ठरविण्यात आले. ह्या सर्व बदलात माझी फिनिक्सची जागा धोक्यात आली. त्यामुळे माझ्यासाठी नवीन जागेचा शोध सुरु झाला आणि सुदैवाने माझी नेमणूक फ्लोरिडात करण्यात आली. कंपनीच्या धोरणानुसार फिनिक्स ते फ्लोरिडा हे तिकीट त्यांच्या अमेरिकन शाखेने बुक केले.
फ्लोरिडातील नेमणूक काही फारशी दीर्घ स्वरूपाची नव्हती. परंतु रखरखीत फिनिक्सपेक्षा काहीसे पावसाची कृपा असलेले हिरवेगार फ्लोरिडा बरे असा आम्ही समज करून घेतला. फ्लोरिडात नवीन कामाचे स्वरूप समजावून घेवून ते काम मुंबईहून करायचे होते. साधारणतः दोन महिन्यात ते काम आटोपण्याची चिन्हे दिसू लागली. फिनिक्स आणि फ्लोरिडातील वास्तव्यातील काही मनोरंजक कहाण्या नंतर कधीतरी! 
आता परतीचे तिकीट आरक्षित करण्याची वेळ आली. आम्ही अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर होतो आणि तेथून मुंबई युरोपमार्गे २० तासावर होती. त्यामुळे आम्हाला तसेच तिकीट मिळेल असा सोयीस्कर समज आम्ही करून घेतला होता.
प्रथम मी कंपनीच्या भारतीय शाखेला फोन केला. "आपले परतीचे तिकीट फिनिक्सहून आरक्षित आहे, त्या विमानकंपनीला फोन करून आपण तारीख निश्चित करा" असे मला सौजन्यपूर्ण भाषेत समजाविण्यात आले. "परंतु मी सध्या फ्लोरिडात आहे", मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. "तुम्ही तिथे कसे पोहोचलात?" काहीशा  आश्चर्यपूर्ण स्वरात समोरील ललना उद्गारली. "विमानाने!" असे उत्तर देण्याचा मोह मी अतिप्रयत्नपूर्व टाळला. तिला मी सर्व परिस्थिती थोडक्यात सांगितली. बहुधा तिला (अथवा तिच्या मेंदूला) हा सर्व प्रकार  झेपला नसावा. तिने मला सविस्तर ई -मेल लिहिण्यास सांगितले.
पुढील दोन दिवसात एकंदरीत प्रकार आमच्या ध्यानात आला होता. भारतीय शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या फक्त अमेरिकेतील अंतर्गत प्रवासाची जबाबदारी अमेरिकन शाखा करीत असे. भारत ते अमेरिका हा प्रवासटप्पा भारतीय शाखेच्या अखत्यारीत येत असे. आणि भारतीय शाखेने तर आमचे फिनिक्सहून तिकीट आरक्षित केले होते. हे तिकीट रद्द करून पूर्व किनारपट्टीवरून नव्याने तिकीट आरक्षित करण्यासाठी लाल फीत आणि रद्द करण्याचा खर्च मध्ये येत होते. तसे म्हटले तर हे दोन्ही अडथळे दूर करता येतात, पण त्यासाठी एकतर तुम्ही मोठ्या पदावर असायला हवे किंवा तितका समजूतदार व्यवस्थापक असावा लागतो. माझ्या बाबतीत हे दोन्ही प्रकार नव्हते त्यामुळे आमचा प्रवास मार्ग निश्चित झाला होता. त्यातही एक धमाल होती. फ्लोरिडा (फोर्ट लॉदरडेल) ते फिनिक्स ह्या प्रवासात सुद्धा आम्हाला टेक्सास असा थांबा सुचविण्यात आला होता. त्या अमेरिकन शाखेच्या तिकीट आरक्षित करणाऱ्या बाईस मी माझा एकंदरीत प्रवासमार्ग ऐकवला.   फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स - लॉस अंजेलीस - चायनीज तैपई - सिंगापोर - मुंबई, आणि ह्यात अजून एक थांबा न वाढविण्याची कळकळीची विनंती केली. बहुदा देवाने माझी प्रार्थना ऐकली असावी आणि मग तिने मला फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स असे थेट तिकीट देण्याचे कबूल केले. आता ह्यातील प्रवासाचा आणि थांब्यांचा कालावधी ऐका
 फोर्ट लॉदरडेल - फिनिक्स (प्रवास पाच तास, फिनिक्स थांबा सहा तास)
फिनिक्स - लॉस अंजेलीस (प्रवास दोन तास, लॉस अंजेलीस थांबा चार तास)
लॉस अंजेलीस - चायनीज  तैपई (प्रवास तेरा तास, चायनीज  तैपई थांबा चार तास)
 चायनीज  तैपई - सिंगापूर  (प्रवास पाच तास, सिंगापूर  थांबा नऊ तास)
सिंगापूर- मुंबई (प्रवास ४ - ५ तास) 
तसे पाहिले तर बाकीचे सर्व फिनिक्सवरून निघताना ४२ तासांचा प्रवास करीतच त्यात फक्त (!) अकरा तासांची भर पडली होती अशी माझी कंपनीतर्फे समजूत काढण्यात आली. आणि सिंगापूरला हॉटेल बुक करण्याचा सल्लाही देण्यात आला. "कंपनी हा हॉटेल खर्च देईल ना?" मी उगाचच विचारले! मग विषय बदलून मला ह्या नऊ तासात सिंगापूर दर्शन करण्याचा सल्ला देण्यात आला.
२२ ऑगस्ट २००२ रोजी अमेरिकन पूर्व किनारपट्टीच्या वेळेनुसार आम्ही सकाळी साडेसात वाजता आमचे हॉटेल सोडले. विमानतळावर सोडण्यासाठी एका भारतीय टक्सीवाल्याला आम्ही बोलावलं होत. तिकीट आरक्षित  करताना मी फ्लोरिडालाच आम्हाला मोठ्या सामानाच्या bags चेक  इन करता येईल ह्याची खात्री करून घेतली होती. परंतु प्रत्यक्ष विमानतळावरील चेकइन कक्षात मला दुसरीच माहिती मिळाली. तुम्हाला ह्या bags फिनिक्सला ताब्यात घेवून परत चेकइन कराव्या लागतील असे सांगण्यात आले. सहसा डोक्यात राख न घालून घेणारा अशी माझी स्वतःविषयी समजूत आहे. परंतु एकंदरीत ह्या प्रकाराने मी इतका संतापलो होतो की मी सभ्यपणा राखून जितका त्याच्याशी वाद घालता येईल तितका घातला. ह्यात माझ्या पत्नीने भरलेल्या वजनदार bagsचा विचार किती कारणीभूत होता हे माहित नाही! इतके होऊन सुद्धा त्या सभ्य गृहस्थाने मला असा मार्ग शोधून देणारा माझा ट्रेव्हल अजेंट बदलायचा सल्ला दिला. माझ्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या त्या सभ्य गृहस्थाला उत्तर देण्याचे मी कसोशीने टाळले.

अमेरिकेतील अंतर्गत प्रवासात खाण्यापिण्याची मारामार असते. त्यामुळे त्या विमानकंपनीने आम्हाला विमानात शिरण्याआधी काही अल्पोपहाराचे पदार्थ घेण्याचे सुचविले. परंतु आम्ही विमानात मिळणाऱ्या शेंगदाणे आणि कोकवर गुजराण करण्याचे ठरविले. बाकी विमानाने उड्डाण करण्याआधी मी प्राजक्ताला म्हणालो, "लग्नाच्या पहिल्या वर्षातच तुला पूर्ण अमेरिका पूर्व-पश्चिम अशी दाखवत आहे हो, नीट पाहून घे!" आणि तिच्या नजरेच्या तीक्ष्ण प्रतिसादाकडे पाहण्याची हिम्मत नसल्याने मी दुसरीकडे नजर वळविली. बाकी हा प्रवास ठीक चालला होता. वैमानिक अधून मधून खालून दिसणाऱ्या भूभागाविषयी बोलत होते. समोरील स्क्रीनवर हाणामारीचा एक चित्रपट चालला होता. फिनिक्सचा खरा पाच तासांचा प्रवास ह्या पट्ठ्याने लवकर संपवित आणला. फिनिक्सच्या आसपास अधूनमधून वणवे लागतात. असाच एक वणवा त्यावेळी लागला होता. वैमानिकाने त्याविषयी माहिती दिली. अशा वेळी साधारणतः अतिशोयक्ती अलंकार वापरले जातात त्यामुळे वैमानिकाच्या म्हणण्यानुसार हा गेल्या वीस वर्षातील सर्वात जास्त तीव्रतेचा वणवा होता. जोपर्यंत हा विमानापर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत हा गेल्या शंभर वर्षातील सर्वात जास्त तीव्रतेचा वणवा का नसेना असा स्वार्थी विचार आम्ही केला. फिनिक्सचे स्काय हार्बर दिसू लागले होते. माणसाचे मन कसं असतं पहा ना, फिनिक्स मध्ये आम्ही तर काही महिनेच घालविले होते परंतु तिथे पुन्हा उतरताना आपल्याच गावी उतरण्याची भावना आमच्या मनी दाटली होती. हे सर्व प्रवासवर्णन एका भागात संपवायचा विचार होता परंतु आता दुसरा भाग करावा लागेल असे दिसतंय! फिनिक्स ते मुंबई पुढच्या भागात! 

फ्लोरिडा ते मुंबई ५३ तास - प्रवासवर्णन भाग  २

अमेरिकेत गेलेल्या IT क्षेत्रातील तंत्रज्ञाच्या सुविद्य पत्नी बर्यापैकी चांगला कंपू बनवून असतात .  प्राजक्ताचा सुद्धा फिनिक्स मध्ये असा कंपू होता. फ्लोरिडात गेल्यावर सुद्धा ह्या कंपूतील बऱ्याचजणी तिच्या संपर्कात होत्या. परतीच्या मार्गावर प्राजक्ता फिनिक्सला उतरणार हे कळल्यावर त्यांना कोण आनंद झाला.  आपल्या पत्नींनी बनविलेल्या कंपूविषयी नवरेवर्गांच्या संमिश्र भावना असतात. ह्या कंपूमुळे सोमवार - शुक्रवार ह्या दिवसांत आपली पत्नी शांत असते त्यामुळे नवरे खुश असतात परंतु साप्ताहिक सुट्टीच्या वेळी ह्या कंपूमुळे नसते उद्योग त्यांच्या मागे लागतात, त्यामुळे नवरे बऱ्याच वेळा वैतागतात. परंतु हा वैताग बऱ्याच वेळा बोलून दाखवता  येत नाही. तसाच काहीसा प्रकार इथे झाला. प्राजक्ता आणि वर्गाने फिनिक्स विमानतळावर भेटण्याचा कार्यक्रम परस्पर ठरवला. ह्यात नवरे वर्गाला शुक्रवारी दुपारच्या वेळात कार्यालयातून सुट्टी घेवून विमानतळावर यायला जमेल असे गृहीतक होते. आणि ते गृहीतक दोन नवऱ्यांनी अचूक ठरविले.

फिनिक्स विमानतळावर आम्हाला आमच्या चेक इन सामानाचे दर्शन झाले. ते ताब्यात घेऊन उद्वाहकात टाकून एक मजला वर चढविले आणि पुन्हा चेक इन केले. आमचे विमान फिनिक्सला वेळेआधी पोहोचल्यामुळे लॉस अंजेलीसचे विमान सुटायला अजून ६ तास बाकी होते. त्यामुळे वेळेआधी सहा तास चेक इन करणाऱ्या माझ्याकडे त्या चेक इन कक्षातील इसमाने अजून एक नजर दिली. मला एकंदरीत ह्या प्रवासात अशा अनेक नजरांना सामोरे जावे लागेल ह्याचा एव्हाना मला अंदाज आलाच होता. त्यामुळे मी त्या नजरेकडे दुर्लक्ष गेले. एकंदरीत हे सामान माझ्याकडे दहा मिनिटे होते. हीच उठाठेव त्या दोन्ही स्वतःला सहभागी म्हणविणाऱ्या विमान कंपन्यांनी केली असती तर काय झाले असते असा विचार माझ्या मनात येऊन गेला. विमानतळावर भातजन्य काही आशियन भोजन पदार्थ उपलब्ध होते. त्यातील एकाची आम्ही निवड करून वेळ भागविली. एव्हाना आमच्या मित्रमंडळीचे आगमन झाले होते. आमच्यासाठी भेटवस्तू, काही चॉकोलेटस अशा वस्तू घेऊन ते आले होते. माझ्या दोन मित्रांनी सुद्धा अनपेक्षितरित्या विमानतळावर येऊन आम्हाला सुखद धक्का दिला. प्राजक्ताची एक मैत्रीण, रजिता तिच्यासाठी निवडुंगाचे  एक छोटे रोप घेऊन आली होती. फिनिक्समधील निवडुंगाची विविधता बघता ही एक योग्य भेट होती. पुढे हे रोप प्राजक्ताने वसईत बरेच दिवस टिकविले परंतु एका पावसात त्याला सुरक्षित वातावरणात घेऊन न जाता आल्याने ते बिचारे दगावले. आमच्याकडे भरपूर वेळ असला तरी मंडळी घाईत होती. त्यामुळे ४५ मिनिटांच्या आसपास त्यांना आमचा निरोप घ्यावा लागला. विमानतळावर खरेदीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध असले तरी आता अजून सामान कोंबायला वाव नसल्याने प्राजक्ताचा नाईलाज झाला आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
मराठीत किंबहुना प्रत्येक भाषेतील म्हणी अगदी समर्पक असतात. मनुष्यजातीच्या इतिहासात माणसे विविध प्रसंगात सापडली असतील तेव्हा त्यांना या म्हणी सुचल्या असतील. आपण ज्यावेळी तशाच प्रसंगात सापडतो तेव्हा आपल्याला ह्या म्हणी आठवतात. 'दुष्काळात तेरावा महिना' ही एक अशीच म्हण! सहा तासाचा थांबा काही कमी नव्हता म्हणून फ्लोरिडाहून विमान लवकर आले आणि आता लॉस अंजेलीसचे विमान काही वेळ उशिरा सुटणार असल्याची बातमी येऊन पोहोचली. अगदी काही निर्वाणा वगैरे परिस्थिती अजून आमची झाली नव्हती. त्यामुळे काही वेळ अजून घालविण्यात आम्ही यश मिळविले. शेवटी एकदाचे ते लॉस अंजेलीसला जाणारे विमान येऊन गेटवर लागले, आता आम्ही थोडे चिंतेत होतो. लॉस अंजेलीसवरून सुटणारे विमान चुकणार तर नाही ना ह्याची चिंता आम्हाला भेडसावू लागली होती. हा दोन तासाचा प्रवास तसा पटकन गेला. ह्यात लक्षात राहण्यासारखी एकच गोष्ट, आम्हाला दोघांना आजूबाजूच्या सीट्स मिळाल्या नव्हत्या. प्राजक्ताला एका अमेरिकन माणसाच्या बाजूची सीट मिळाली होती. आणि त्या दोघांचे हास्यविनोद चालू होते. आणि त्यामुळे माझी जिया जले … वगैरे परिस्थिती झाली होती. बाकी लग्नाला एकच वर्ष झाल्याने हे ठीक होते असे  मागे वळून पाहता मी म्हणू इच्छितो.
TOM BRADLEY विमानतळावर ही गर्दी उसळली होती. किंवा ती नेहमीच असावी आणि आम्ही दुसऱ्यांदाच तिथे आल्याने आम्हाला असे वाटले असावे. सर्व पावले आम्ही ज्या टर्मिनलकडे जाऊ पाहतो आहोत तिथेच चालली असावीत असा आम्हांला भास होत होता. त्या गर्दीचा मुकाबला करीत आम्ही अजून एका आगमन कक्षात जाऊन पोहोचलो. तिथे बोर्डिंग पास घेताना I९४ कागदपत्र तेथील अधिकाऱ्याला सोपविताना अमेरिकेची ही वारी संपुष्टात आल्याचे काही प्रमाणात आम्हाला दुःख झाले. सिंगापूर एयरलाईन्सचा एयर इंडियाबरोबर कोड शेयर होता असे मला पुसटसे आठवते. म्हणजे ह्या मार्गावर उड्डाण करण्याचे खरे हक्क कडे होते परंतु एयर इंडियाने काही पैशाच्या मोबदल्यात हे हक्क सिंगापूर एयरलाईन्सला विकले होते. एकंदरीत भारतात पोहोचल्याची चाहूल इथूनच मला लागली. त्या टर्मिनलच्या पुढे एखाद्या गावच्या एस टी डेपोप्रमाणे गर्दी उसळली  होती. एकदाचा आम्ही विमानात प्रवेश मिळविला.
TOM BRADLEY हे भव्य विमानतळ असावे ह्याची जाणीव मला उड्डाण होण्याच्या वेळी झाली. गेटवरून विमान निघाल्यापासून मुख्य धावपट्टीवर येईस्तोवर बहुदा पाच दहा मिनिटे गेली असावीत. विमान एकदा मुख्य धावपट्टीवर पोहोचले की अंतिम धाव सुरु करण्याआधी एक क्षणभर विसावते. त्यावेळी प्रत्येकवेळा माझ्या मनात ह्या क्षणी या महाकाय वाहनास उड्डाण करण्यापासून जर प्रवृत्त करायचे असेल तर काय करावे लागेल असा विचार माझ्या मनात येतो! असो विमानाने एकदाचे उड्डाण केले. पौर्णिमेची रात्र होती बहुदा. आकाशातील ढगांवरून हे विमान उडत होते आणि चंद्राची शीतल किरणे त्या ढगांवर पसरली होती. पुढील अनेक तास हेच दृश्य मला दिसणार होते.  विमानप्रवासातील काही गोष्टींचा मला सदैव अचंबा वाटत आला आहे. जसे की दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणात हवाई सुंदऱ्या काळ वेळ  पाहता आपल्याला एकदम ताटभर नव्हे प्लेटभर जेवण का आणून देतात? आणि प्रवाशातील काहीजण / अनेकजण पुढे बराच काळ आपल्याला काही खायला मिळणार नाही असे समजून त्यावर तुटून का पडतात? असो स्थळ काळाचे भान एव्हाना संपले होते आणि त्या रात्रीच्या पहिल्या जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला होता. जबरदस्तीने सर्वांना खिडक्या आणि सीटवरील  दिवे बंद करायला लावून झोपेसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करण्यात येत होता. इतका वेळ कसा व्यतीत करावयाचा ह्याची चिंता मला पडली होती. समोरील सीटवर असलेल्या स्क्रीनवर गेम खेळण्यात आणि उपलब्ध असलेले थोडेफार चित्रपट पाहण्यात मी सुरुवातीचा काही वेळ घालविला. प्राजक्ता एकंदरीत प्रवासी म्हणून असलेल्या आणि गृहीत धरलेल्या हक्कांविषयी अगदी जागरूक होती. त्यामुळे तिने जवळजवळ दर तासाला हवाईसुंदरीकडे कोमट पाण्याची विनंती करण्याचा सपाटा चालविला. त्या हवाईसुंदरींच्या संयमाचे कौतुक करावे तितके थोडे! त्यांनी तिच्या प्रत्येक विनंतीचा मान राखित प्रत्येक वेळी कोमट पाणी आणून दिले. मधल्या कालावधीत मी खेळत असलेल्या गेममध्ये नैपुण्य संपादित करीत माझे वैयक्तिक उच्चांक नोंदवले. विमानात दाखविले जाणारे टुकार हिंदी चित्रपट मला झेपण्याच्या पलीकडे होते. मध्येच कधीतरी माझा डोळा लागला. बहुदा तासभर असेल परंतु तितक्यात पुन्हा खाण्याची किंवा शीतपेयाची वेळ झाली होती. मदिराप्राशन करणारे सुखी जीव निद्राधीन झाले होते. असाच कधीतरी आकाशात सूर्य उगवला. दात घासण्याची तीव् इच्छा खळखळून चूळ मारण्यावर भागवून न्यावी लागली. आता मात्र जमिनीवर पाय टेकण्याची फार ओढ लागली होती. खूप वेळ नुसते खाऊन बसून राहिल्यावर दुसरे होणार तरी काय? शेवटी कसेबसे ते तेरा तास भरले आणि विमान चायनीज तैपईला उतरले. तिथे सराईत प्रवाशी ब्रश वगैरे घेवून न्हाणीघराच्या दिशेने कूच करते झाले. आम्ही फक्त ब्रश केले. ह्या विमानतळावर फारसे काही विशेष घडले नाही. म्हणायला तिथे चवीसाठी चहाचे नमुने ठेवण्यात आले होते. आम्ही त्यात फारसा रस दाखविला नाही.
सिंगापूरला उड्डाण करण्याचे गेट शोधून आम्ही तिथे स्थानापन्न झालो. चायनीज तैपई ते सिंगापूर हा प्रवास काही खास घटनेशिवाय झाला. बाहेर सूर्याची प्रखर किरणे विमानाला तापून काढत होती. तारीख कोणती असावी असा प्रश्न विचारून मेंदूला त्रास करून घेण्याची तसदी मी घेतली नाही.
सिंगापूरला आम्ही हॉटेल बुक केले होते. तिथे जाण्यासाठी एका टर्मिनलवरून मिनी ट्रेनने आम्ही दुसऱ्या टर्मिनलवर गेलो. तिथे हॉटेलमध्ये शिरून सचैल स्नान केले. अंघोळीनंतर अगदी गाढ झोप लागली. नशीब म्हणून अलार्म लावला होता. त्याच्या आवाजाने जाग आल्यावर एक क्षणभर आपण कोठे आहोत आणि किती वाजले असावेत ह्याचे भान राहिले नाही. बाहेर येवून आम्ही सिंगापूर दर्शनच्या रांगेत उभे राहिलो. तिथे आमचे पासपोर्ट ताब्यात घेवून ही विनामुल्य सफर घडविण्यात आली. त्यांना पासपोर्ट देताना आम्हाला काहीसे जीवावर आले होते. बाकी सफर उत्तम झाली. सन्तोसा बीचशिवाय विशेष उल्लेखनीय काही नव्हते. जर माझी स्मरणशक्ती माझी उत्तम सेवा करीत असेल तर त्या बीचवरील पांढरी वाळू विशेष लक्षात राहिली. (हे इंग्लिश वाक्याचे मराठीत जसेच्या तसे भाषांतर!) एकंदरीत थकलेल्या मनःस्थितीमुळे आम्ही ही सफर फारशी काही मजेत अनुभवली नाही. परत आल्यावर आम्हाला आमचे पासपोर्ट परत करण्यात आले. कोणी सिंगापूरमध्ये परस्पर गायब होऊ नये म्हणून ही काळजी. मग आम्ही विमानतळावर चिकन करी आणि भात असे जेवण घेतले. ह्या नऊ तासाच्या थांब्याची एक गंमत. एक मित्र एकटाच परत येताना ह्या गेटसमोर नऊ तासाचा थांबा म्हणून झोपून गेला. इतका गाढ कि विमान उड्डाणाची वेळ झाली तरी त्याची झोप काही उडाली नाही. एअरलाईन्सने केलेला त्याचा नावाचा घोष सुद्धा त्याला उठवू शकला नाही. शेवटी त्याचे सामान बाहेर काढून विमान उड्डाण करते झाले. त्याला मुंबई विमानतळावर घ्यायला आलेले नातेवाईक बराच काळ चिंताग्रस्त होते.
असो आम्ही सिंगापूर विमानतळावर एल्विसचा एक शो चालला होता तोही पाहिला. आणि शेवटी एकदाचे आम्ही  मुंबईला जाणाऱ्या विमानात बसलो. आता माझे स्थळकाळाचे भान काहीसे परत आले होते. रविवारची संध्याकाळ झाली होती. पुन्हा एकदा हवाईसुंदरी, जेवण, गेम्स अशा सर्व चक्राचा मुकाबला करीत आम्ही सोमवारी सकाळी साडेबारा वाजता मुंबईला आगमन करते झालो. आम्ही अशा मनःस्थितीत पोहोचलो होतो कि अजून आम्हाला कोणी परत अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसण्यास सांगितले असते तर ते ही आम्ही केले असते! असा एक धमाल प्रवास! एखादा धीम्या गतीचा चित्रपट ज्यात नायक नायिकेचे भावबंध ५३ तासात उलगडत जातात, असा सुद्धा बनू शकतो!


(क्रमशः )

शनिवार, ४ मे, २०१९

मुक्त निर्मितीचा महोत्सव




गंगाधर गाडगीळ ह्यांचं एका मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र वाचणं हे गेले दोन वर्षे माझ्या To Do List मध्ये आहे. आज काही वेळ मिळाल्यामुळे पुन्हा एकदा या पुस्तकाने आणि खास करुन मुक्त निर्मितीचा महोत्सव  या प्रकरणाने माझे लक्ष वेधून घेतले.  या प्रकरणामध्ये गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या या साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेविषयी एक विस्तृत असे विश्लेषण केलं आहे.  हा अत्यंत एक वाचनीय असा अनुभव आहे. मराठी भाषेतील एका नावाजलेल्या लेखकानं केलेलं साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेचे हे अत्यंत अभ्यासपुर्ण विश्लेषण आहे. ह्या पोस्टमध्ये गाडगीळांची काही वाक्ये जशीच्या तशी नमुद करण्यात आली आहेत. ह्यात वाडःमयचौर्य हा हेतु नसुन गाडगीळांच्या प्रतिभाशाली भाषाशैलीचा वाचकांना आनंद मिळावा हा हेतु आहे. 

१) या प्रकरणाच्या सुरुवातीला ते समीक्षालेखन आणि ललित साहित्य निर्मिती या दोन प्रकारांविषयी लिहतात. आपल्या समीक्षालेखनामागे नवनिर्मितीच्या मार्गातील अडचणी दूर करणे आणि तिच्यासाठी विशाल रिंगण निर्माण करणे हे मुख्य हेतू असावेत असे त्यांना वाटतं. 

२) ज्या लेखकाकडे स्वतंत्रनिर्मितीची क्षमता आहे त्यानं समीक्षेच्या क्षेत्रात अधिक काळ गुंतून राहून वाद निर्माण करत बसणे हे काहीसे अपकारक ठरण्याची शक्यता आहे. यामागं मर्यादित वेळेचा वापर हा एक घटक तर आहेच परंतु त्यासोबत समीक्षा आणि लेखन निर्मिती या दोन भिन्न प्रकारांत लेखक वेगवेगळ्या पातळ्यांवर सक्रिय असतो हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. 

समीक्षा ही बऱ्याचदा बौद्धिक पातळीवर असते तर साहित्यनिर्मितीमध्ये लेखकाला अकरणात्मक भूमिका घ्यायची असते असे ते म्हणतात. आता अकरणात्मक या शब्दाचा अर्थ शोधून काढणे हे ही पोस्ट लिहुन झाल्यानंतर माझ्यापुढील कार्य आहे.  आपण केलेल्या त्या काळातील साहित्यनिर्मितीचा वेध घेणाऱ्या समिक्षेमुळे आपल्या साहित्यनिर्मितीवर विपरीत परिणाम झाला नाही असे त्यांना वाटते. आपण कविता सोडून बाकी सर्व वाडःमय प्रकार हाताळले असे ते म्हणतात. 

३) त्याकाळी गाडगीळांनी बहुदा प्रस्थापित साहित्याला मोठ्या प्रमाणात आव्हान दिले असावे. या प्रकरणांमध्ये ते याविषयी विस्तृतपणे विवेचन करतात.  प्रस्थापित साहित्यातील सुबोधता,  सामाजिक परिणाम आणि सौंदर्य याविषयी एकंदरीत जे काही मापदंड निर्माण केले असावेत त्यामुळं मराठी साहित्याला कदाचित एक संकुचित रिंगण घातलं गेलं असावं असं त्यांना वाटलं. हे रिंगण विस्तारित करण्यासाठीच आपण प्रस्थापित साहित्याला आणि त्यातील वरील घटकांना आव्हान दिलं असे ते म्हणतात. 

४) समीक्षालेखन हे बौद्धिक पातळीवर असल्यानं सातत्याने केलेल्या समीक्षालेखनामुळे आपल्या भूमिकेत किंवा लिखाणात सुसंगती यावी असा प्रयत्न अजाणतेपणी होऊ लागतो. त्यामुळे कदाचित आपल्या साहित्यनिर्मितीतील अबोधता आणि अस्पष्टता ह्या घटकांवर प्रतिकूल परिणाम झाला असावा असं त्यांना वाटलं.  "जाणवणाऱ्या आशयाच्या पलीकडे जे अस्पष्ट मोठे हुंकार असतात त्यांच्याकडे मी दुर्लक्ष तर नाही केलं " असंही त्यांना वाटुन गेलं. 

५) या अशा सखोल विश्लेषणानंतर गाडगीळ हे त्यांनी मोठ्या प्रमाणात हाताळलेल्या लघुकथा या प्रकाराकडे वळतात.  इथं एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी विशद केला आहे, "मला काय सांगायचं आहे ते मी थोडक्यात सांगतो ! एखादं काम पार पडण्यासाठी आवश्यक काय आहे ते मला पटकन कळतं आणि मी आवश्यक तितकी मोजकी पावले टाकून ते काम पार पाडतो. इतर माणसं काम करू लागली की मला वाटतं इतका ही माणसं घोळ का घालत आहेत? कदाचित गाडगीळांची अर्थशास्त्रातील पार्श्वभूमी ह्या मुद्देसुदपणाला कारणीभुत असावी. 

आपल्यामधील या संक्षिप्तपणा साध्य करण्याच्या क्षमतेमुळं बऱ्याच खरंतर कादंबरीच्या स्वरुपात लिहिल्या जाऊ शकणाऱ्या कल्पनांना आपण लघुकथा म्हणून जन्म दिला असे ते म्हणतात. दुसऱ्या बाजूने विचार करता कदाचित माझ्यामध्ये दीर्घकाळ मन एकाग्र ठेवण्याची क्षमता अंगी नव्हती, मोठ्या रचना करण्याची आणि हाताळण्याची कुवत नव्हती म्हणून मी कादंबऱ्या कदाचित लिहिल्या नसाव्यात असं तर नाही ना हा विचार त्यांच्या मनात येतो!!  

६) कथा सुचण्यासाठी व्यावहारिक व्यवधानातून मुक्त होणे माझ्याबाबतीत तरी अत्यावश्यक असतं हे सांगताना आपला चिंतातुर जंतुचा स्वभावदेखील ते थोडक्यात नमूद करतात. या स्वभावामुळे निवांतपणा मिळण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते असं त्यांना वाटतं. यामुळे आपल्या बर्‍याचशा कथा या एखादं मोठं काम संपवून मोकळे झाल्यावर अथवा कॉलेजला सुट्टी पडल्यावर लिहिल्या गेल्या आहेत असे ते म्हणतात.  

ह्यासोबत चांगलं चालणं सुद्धा साहित्यनिर्मितीला  पूरक आहे हा मुद्दा ते अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट करतात.  चालताना भोवताली असणाऱ्या वातावरणातील प्रसन्नता हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे असे त्यांना वाटतं.  पावसानं, जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या धारांनी, वाहणाऱ्या पाण्याच्या ओहोळांनी आपल्या निर्मिती प्रक्रियेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे असे ते म्हणतात. 

७) आपल्या निर्मितीप्रक्रियेच्या वेळी आपल्याला निवांतपणा आणि त्याच्यासोबत एकटेपणा ही लागतो. आसपास काही अंतरावर माणसे असली तर चालतात पण ती आपापल्या उद्योगात व्यग्र असावीत. 

८)  ते आपल्या कथानिर्मितीच्या प्रक्रियेविषयी आणि त्यातील व्यक्तिरेखा आपल्याला कशा सुचल्या याविषयी विस्ताराने लिहितात. लहानपणापासून आपल्या जीवनात आलेली विविध माणसे ही थेट जरी जशीच्या तशी आपल्या कथेत येत नसली तरी त्या व्यक्तिरेखांचा मूळ गाभा घेऊन आपल्या कथेतील अनेक पात्रे आपण अजाणतेपणे रेखाटली आहेत हे त्यांना विश्लेषणानंतर समजलं. आपल्या मर्यादित स्मरणशक्तीचा देखील ते इथं उल्लेख करतात. त्यामुळे आपण प्रवासवर्णन या प्रकारात जास्त गुंतलो नाहीत असं त्यांना वाटतं. 

९) एखादी कथा लिहिताना एकदा मन त्या निर्मितीच्या अवस्थेत गुंतलं की निरनिराळ्या आणि कधीकधी अगदी वेगळ्या प्रकृतीच्या कथाकल्पना मनात उमटत राहतात.  आपलं मन हे या विविध प्रकृतीच्या कथांमध्ये स्वच्छंदपणे वावरत असतं. ह्यातील नक्की एखादा कोणता प्रकार, कोणती कल्पना आपण शेवटी उचलतो हा मात्र अगदी जाणतेपणे घेतलेला निर्णय असू शकत नाही ते म्हणतात. ज्यावेळी कथा सुचते तेव्हा ती एखाद्या ढगासारखी असते. ह्या ढगाचा पाठलाग करताना त्याच्या अनेक कथा देखील बनू शकतात.  आपल्या काही कथा या कशा जुळ्या बहिणी आहेत हा प्रकार देखील ते या ढगाच्या रूपकातून स्पष्ट करून सांगतात.  

बऱ्याच वेळा कथा लिहिताना आपली कथा बिनसले आहे हे मध्यावर आपल्याला जाणवलं आहे मग त्यावेळी आपला हातच पुढे चालत नाही मग ती पुढची पाने अथवा सगळी कथाच मी फाडुन टाकतो असे ते म्हणतात. 

१०) एखादी कथा लिहायला सुरुवात केली की आपल्याला नक्की काही म्हणायचं आहे हे आपल्या मनात नक्की ठरलेलं नसतं. त्यामुळे सुरुवातीचा बराचसा काळ हा अनिश्चिततेचा असतो. पण एक क्षण मात्र असा येतो की कथा आपल्याला जमली असं वाटू लागतं. त्यानंतर सुरळीतपणे लिहिली जाते कोणत्याही कथेमध्ये वेगवेगळी वर्तुळे असतात,  कथेतील व्यक्तिरेखा या वर्तुळांमध्ये फिरत असतात. 

१०) लेखकाची एक विशिष्ट प्रकारची लिखाणशैली काही कालावधीनंतर तयार होते,   त्यामुळे कथानकरचना, पात्र यामध्ये काहीसा तोचतोचपणा येऊ लागतो.  हा घटक लेखकांनी टाळावा असे ते म्हणतात. 

११) चांगलं साहित्य म्हणजे काय नक्की काय हे लेखकाला जरी माहीत असलं तरीदेखील प्रत्यक्ष लेखनाच्या वेळी त्या जाणिवेचा प्रत्यक्षात अंमल करणे हे इतकं सोपं नाही.  पुन्हा एकदा ढगाच्या उदाहरणाकडे वळुन ते म्हणतात की कथा ज्यावेळी सुचते त्यामध्ये त्या ढगामध्ये एकच नव्हे तर अनेक कथारुपी ढग असतात. त्यातील एका ढगांवर मन केंद्रित होण्याची क्रिया सावकाश आणि रेंगाळत होते. आपण एका विशिष्ट ढगावर लक्ष केंद्रित करावं असं ठरवावं आणि मनानं तसं करायला नकार द्यावा असेही अनेकदा घडतं आणि मग शेवटी जो ढग निवडला गेला त्यावर कथा लिहिली जाते.  

१२) विनोदी साहित्य या प्रकाराकडे आपण केंद्रित केले नाही असे ते  म्हणतात. मराठी भाषेत झालेल्या विनोदी लिखाणाविषयी आपण फारशे समाधानी नाही आहोत असे विधान ते करतात. त्या मानाने  इंग्लिश भाषेत अधिक चांगल्या दर्जाच्या विनोदनिर्मिती झाल्या आहेत ह्याचं सोदाहरण विवेचन त्यांनी केलं आहे.  

१३) विनोद कथांची निर्मिती प्रक्रिया काहीशी वेगळी आहे. गंभीर कथा जशा मनाच्या खोल अज्ञात व्यापारापासून जन्माला येतात त्याप्रमाणे विनोदी कथा जन्माला येत नाही. मनाच्या वरच्या थरांतून विनोदी कथा जन्म घेतात. काल परवा घडलेल्या कुठल्यातरी घटनांशी त्यांचा संबंध असतो. 

१४) विनोदी लेखकांकडुन त्यांनी समाजावर ताशेरे झाडले पाहिजेत, समाजातील अपप्रवृत्तीवर त्यांनी टीका केली पाहिजे अशी अपेक्षा साधारणतः केली जाते. 

१५) विनोद हा सहजपणे आपल्या गतीने आणि आपल्या पद्धतीने व्यक्त झाला पाहिजे. त्याचप्रमाणे विनोद करताना कुठे थांबायचं आणि अतिशयोक्ती कशी किती ताणायची, संभाषणातील घोटाळा कुठपर्यंत वाढत जाऊ द्यायचा हे कळावं लागतं. 

१६) मराठी भाषेची माझी नीट उमज आणि समज होती का?  मी मराठी जुनं साहित्य वाचलं नव्हतं,  संस्कृतचाही माझा व्यासंग नव्हता. संगीताचा मला कान नव्हता यामुळे माझी भाषिक क्षमता फार मर्यादित झाली होती का?  भाषिक क्षमतेवर अनुभव ओळखायची,  त्याचा वेगळेपणा,  खास त्याची चव टिपण्याची शक्ती काही प्रमाणात तरी अवलंबून असते.  त्याच बरोबर भाषिक क्षमता हा एक अडथळा देखील होऊ शकतो असं जरी वाटत असलं तरी  एकंदरीत आपल्या मर्यादित भाषिक क्षमतेबद्दल मला खंत वाटायची असे ते म्हणतात. ती खंत दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरी तुकारामाचे अभंग बखरी वगैरे जुनं  साहित्य मी थोडंफार वाचलं पण त्यात माझे मन रमेना!

१७) ते आपल्या स्वभावाविषयी सुद्धा म्हणतात. मी आयुष्यात अनेक धोके पत्करले. अनेक संघर्ष अंगावर ओढून घेतले तरी पण मला वाटायचं की मी भित्रा आहे. मला वाटायचं की मी साहित्यातही  तसंच करतो का? तीव्र आणि उत्कट अनुभवांपासून मी दूर पळतो का? ज्या अलिप्तपणे मी साहित्य लिहितो ते या पळपुटेपणाचेच वाङमयीन रुप आहे का?

गाडगीळांनी ह्या आणि बऱ्याच अनेक मुद्द्यांच्या आधारे स्वतःच्या साहित्याचे विस्तृत वर्णन केलं आहे. हे करताना ते  स्वतःच्या  व्यक्तिमत्वाचं देखील सखोल  विश्लेषण करतात. मराठी साहित्यिकांपैकी किती जणांनी असा प्रयत्न करुन पाहिला आहे हे मला ठाऊक नाही , पण  गाडगीळांचा हा प्रयत्न एक प्रामाणिक आणि मराठी भाषासौंदर्यानं  नटलेला  समृद्ध  अनुभव म्हणुन माझ्या ध्यानात राहील !

गुरुवार, २ मे, २०१९

महाराजा भोग



सुट्टीचा दिवस व्यतित करण्यासाठी समाजसंमत असे जे काही मार्ग आहेत त्यात कोणताही विशिष्ट हेतू मनात न बाळगता वातानुकूलित मॉलमध्ये तासंतास भटकंती करणे हा एक मार्ग आहे.  गेली काही वर्षे सुट्टी म्हटली की वसईला पलायन करणे हा एकमेव पर्याय आम्ही स्वीकारला होता. परंतु सध्या सोहम क्लासला जाण्याच्या वयोगटात असल्यामुळे वसईच्या फेऱ्यांची वारंवारता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत बऱ्याच दिवसांनंतर आम्ही मालाडच्या हायपरसिटी व इनॉर्बिट मॉलला भेट देण्याचे योजिले. 

हायपरसिटी मॉलमध्ये काही  विशिष्ट खरेदी करण्याचे प्रयोजन होते. इथे इतके विविध पर्याय उपलब्ध असताना माझ्यासारख्या मी इतक्या मिनिटात खरेदी करून मॉलबाहेर पडलो अशा वृथा अभिमान बाळगून असणाऱ्या माणसांसाठी घाईघाईने खरेदी करणे महागडे पडू शकते.  ही गोष्ट ध्यानात आल्यामुळे मी अत्यंत संयमाचे धोरण स्वीकारले होते. या संयमी धोरणाला फळ म्हणून की काय आम्हाला एक चांगली ऑफर मिळून इष्ट गोष्‍टींची मनाजोगती खरेदी झाली. मनाजोगती खरेदी हा शब्दप्रयोग पुरुषांसाठी वापरला जात असावा का ह्याविषयी उपलब्ध मराठी साहित्यात पुरेसे संदर्भ मला आढळले नसल्याने मी ह्या शब्दप्रयोगाचा वापर माझ्यासाठी नाही असे स्पष्टीकरण देऊ इच्छितो !

कार्यालयांमध्ये विविध प्रसंगांनिमित्त बाहेर जाऊन भोजन करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. सांघिक भावना निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांचा नक्कीच सकारात्मक परिणाम होत असला तरी तुमच्या एकंदरीत आकारमानावर मात्र त्याचा इष्ट परिणाम होत नाही! अशा भोजनप्रसंगाच्या माझ्या तोंडुन अनेक कहाण्या ऐकून कधीतरी आम्हाला सुद्धा या विशिष्ट उपहारगृहात जायचं आहे अशी मागणी करण्यात येते.  अशी मागणी केली गेली असता त्या उपहारगृहाविषयी विशिष्ट माहिती देऊन त्याऐवजी हे दुसरे उपहारगृह कसे चांगले आहे हे आपल्याला पटवून देता येणे जमायला हवे. 

मी याच तंत्राचा वापर करून काल इनॉर्बिटमॉल मधील महाराजा भोग या उपहारगृहात सोहम आणि प्राजक्ता ह्या दोघांना भोजनासाठी नेले.  हल्लीच्या सामाजिक संस्कृतीनुसार एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपण भोजनास गेलो असू तर तेथील अंबिएन्स मला आवडलं असे म्हणण्याची पद्धत आहे. अंबिएन्स या शब्दाच्या वापराशिवाय उपहारगृहातील तुमचा अनुभव आणि त्याचे वर्णन पुर्ण होत नाही.  त्याच धर्तीवर महाराजा भोग मधील अंबिएन्स हे अत्यंत प्रसन्न असुन मनाला सुखावणाऱ्या मंद संगीताच्या पार्श्वभूमीवर मनाला सुखावून देणारं असं आहे. 

आम्ही साधारणतः साडेसातच्या सुमारास या उपहारगृहात प्रवेश केल्यामुळे आम्हाला हवी ती आसने निवडण्याचे स्वातंत्र मिळाले. अनेक वाट्या, 3 चषक अर्थात प्याले अशा जय्यत तयारीसकट थाळी आमच्यासमोर मांडण्यात आली. चषक ह्या शब्दप्रयोगानंतर काही वाचकांच्या चित्तवृत्ती प्रफ्फुलीत झाल्या असतील तर क्षमस्व !  एका मनाला सुखावून देणाऱ्या सरबताचा आम्ही आस्वाद घेत आहोत तोवर एकामागोमाग एक अशा अनेक चविष्ट पदार्थांनी आमची थाळी भरून टाकली.  एकंदरीत हा प्रकार बघता ब्लॉग लिहिण्यासाठी हा एक योग्य अनुभव असू शकतो याविषयी आम्हां सर्वांचे एकमत झाले. इथं सोहम ब्लॉग वाचण्याची शक्यता नसल्यानं आम्हां सर्वांचे ह्या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात आला आहे. केवळ लिखाणावर वाचक ब्लॉगकडे आकर्षित होत नसल्याने त्याला पूरक असे फोटोदेखील काढावेत असा विचार योग्य वेळी आमच्या मनात आला.  परंतु ह्या विचारामुळं संपुर्ण थाळी रंगीबिरंगी चविष्ट पदार्थाने जोवर सजवली जात नाही तोवर कोणत्याही पदार्थाला स्पर्श करण्यास आम्हांला  मनाई करण्यात आली होती.  मनावर प्रचंड संयम दाखवत आम्ही या थाळीची सजावट पहात होतो. 





या उपहारगृहाचं  एक वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रत्येक वाढपी तुम्हाला प्रत्येक पदार्थाविषयी थोडीफार माहिती देऊन मग त्याचा आग्रह सुद्धा करीत असतो. संपुर्ण थाळीची सजावट झाल्यावर हवे तसे फोटो काढून घेतल्यानंतर आम्ही थाळीतील असंख्य पदार्थांचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली. पांढरा ढोकळा, चटण्या, बुंदी रायता, दाल बाटी चुरमा, आमरस पुरी, चपाती, रोटी, विविध प्रकारच्या गोड, तिखट डाळी, कढी,  तीन चार प्रकारच्या भाज्या, जिलेबी, मूंग हलवा, पापड, दाल खिचडी, पुलाव, छास अर्थात ताक अशा विविध पदार्थांचा आम्ही पुढील काही वेळ मनसोक्त आस्वाद घेत होतो.  परंतु मग मात्र माझी क्षमता संपत आली आहे हा संदेश पोटाद्वारे पाठवण्यात आल्यामुळे आम्ही आमचे जेवण आटोपते घेतले. शेवटी आम्हांला गोडसर असे पान देण्यात आले. बिल दोन हजाराच्या आत झाले. एकंदरीत दीक्षित, दिवेकर यांच्या सल्ल्याला पुर्णपणे धुडकावून देणारे असे भरपेट जेवण करून आम्ही महाराजा भोग या भोजनालयातुन प्रस्थान केले. 

त्यानंतर आम्ही अजून अर्धा-पाऊण तास त्या वातानुकूलित मॉलमधील विविध दुकानात भटकत होतो. तिथं घेतलेला हा एक फोटो!

इतक्या भरपेट जेवणांनंतरदेखील आपण फिट आहोत हे सिद्ध करण्यासाठी श्वास रोखून घेतलेला हा फोटो !

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...