लोकसत्तेची कालची वर्धापन दिन विशेष चतुरंग पुरवणी अत्यंत वाचनीय अशी आहे. भारतीय साहित्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि बंडखोर म्हणता येईल अशा दहा लेखिकांच्या साहित्याचे अत्यंत समर्पक समीक्षण या पुरवणीत आपणास वाचावयास मिळतं. अत्यंत संग्रहणीय अशी ही पुरवणी आहे. आजच्या या पोस्टमध्ये या समीक्षणातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा संदर्भ देऊन त्यांचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न करत आहे.
ह्या दहा लेखिकांच्या व्यापक लिखाणाचा मागोवा ज्या परीक्षकांनी घेतला आहे त्या सर्वांना आदरपुर्वक सलाम! काही चांगलं, विचारघन वाचन करावयाचं असेल तर आवश्यक असणारे संदर्भ आपल्याला ह्या पुरवणीतुन मिळतील. ह्या समीक्षकांनी ह्या लेखिकांच्या लिखाणाचं वर्णन करण्यासाठी जे मोजके अर्थपुर्ण शब्द वापरले ते मी इथं मुक्तहस्ते वापरले आहेत.
ह्या दहा लेखिकांच्या व्यापक लिखाणाचा मागोवा ज्या परीक्षकांनी घेतला आहे त्या सर्वांना आदरपुर्वक सलाम! काही चांगलं, विचारघन वाचन करावयाचं असेल तर आवश्यक असणारे संदर्भ आपल्याला ह्या पुरवणीतुन मिळतील. ह्या समीक्षकांनी ह्या लेखिकांच्या लिखाणाचं वर्णन करण्यासाठी जे मोजके अर्थपुर्ण शब्द वापरले ते मी इथं मुक्तहस्ते वापरले आहेत.
ह्या पुरवणीची सुरुवात नावाजलेल्या लेखिका अमृता प्रीतम यांच्यापासून होते. प्रश्न विचारण्याचे धाडस असे एकदम साजेसं शीर्षक त्यांच्यावरील लेखास देण्यात आलं आहे. इतिहासापासून चालत आलेल्या स्त्रीच्या स्थितीबद्दल समाजाला प्रश्न विचारण्याचं धाडस आपण आपल्या साहित्यातून दाखवावं असा विचार अमृताजींनी आपल्या लहानपणापासुनच मनात बाळगला होता. अमृताजींच्या वडिलांनी त्यांनी केवळ सांप्रदायिक आणि धार्मिक रचनाच करायच्या अशी प्रारंभी अट घातली होती. काही काळापर्यंत अमृताजींनी या अटीनुसार लेखनसुद्धा केलं. परंतु सोळाव्या वर्षानंतर मात्र भोवतालच्या परंपरांचे जोखड त्यांनी आपल्या लेखनात आणि जीवनातसुद्धा धुडकावून दिलं. स्त्रीची गुलामी तिच्या आर्थिक पारतंत्र्यात आहे हा विचार काही काळानंतर त्यांच्या मनात रुजला. अमृताजींनी आपल्या साहित्यातून उलगडलेल्या स्त्रीच्या भावविश्वाचे अनेक पैलू ह्या लेखात आपणास वाचावयास मिळतात. शृंगाराची नशा ही अत्यावश्यक आहे ह्यांचा त्यांनी स्पष्ट उल्लेख आपल्या साहित्यातून केला. एकाच पुरुषाच्या प्रेमात पडलेल्या त्याच्या पत्नी आणि प्रेयसी यांच्यातील स्पर्धात्मक संबंधांचे वर्णन सुद्धा त्यांच्या कथेत आढळतं.
त्यानंतरचं सदर आहे ते मराठीतील अत्यंत प्रभावी लेखिका म्हणजे विभावरी शिरुरकर अर्थात मालती बेडेकर ह्यांच्यावर! या लेखामध्ये त्यांच्या विभावरी शिरुरकर या टोपणनावाचा उलगडा करण्यात आला आहे. त्याकाळी ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकर यांच्यासारखे ताकदीचे लेखक प्रितीकथा लिहीत असताना विभावरी शिरूरकर यांनी आपल्या कथांमधुन समाजातील अनेक थरातील स्त्रियांच्या जीवनातील होणारी कोंडी, समाजाने त्यांचा केलेला जाचआणि स्त्रियांनासुद्धा प्रणय भावना असू शकतात याविषयी समाजाला असणारी अनास्था ह्या सर्व बाबींचा आपल्या कथांतून अत्यंत समर्पकपणे उल्लेख केला आहे.
मातृत्वाचे गुणगान गाणारा आपला समाज मात्र आध्यात्मिक पुस्तकाद्वारे स्त्री पुरुषाला मोहात पाडते, ज्ञानप्राप्तीपासुन भ्रष्ट करते असा उल्लेख करतो. परंतु हीच स्त्री ज्यावेळी माता बनते त्यावेळी मात्र एकजात सर्व तिचा गौरव करतात या दुटप्पीपणाविषयी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. या मातेला सुमाता बनवण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. परंतु धर्म आणि देव या साधनांचा वापर करून पूर्वीच्या काळात स्त्रियांना शिक्षणापासुन वंचित ठेवण्यात आले. परंतु जेव्हापासून धर्म आणि देव यांच्याविषयीच्या भावनांचा ऱ्हास होऊ लागला त्यावेळी मात्र स्त्रियांनी आपल्या बंधनांविषयी प्रश्न विचारणं सुरू केलं. भावी स्मृतिकारांना समाज आणि व्यक्ती यांची कर्तव्य सांगताना त्याविषयी शास्त्रीय दृष्टिकोन मांडावा लागेल हा महत्त्वाचा मुद्दा ह्या लेखात उपस्थित करण्यात आला आहे.
आता इथं एक माझं स्वतःचं मत! स्मृतिकारांनी स्त्रियांना चार भिंतीच्या आत कोंडून ठेवलं आणि मुलांची बालपणं चांगली होतील याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या क्षणी स्त्रियांनी हे परंपरांचे जोखड भिरकावून दिलं त्यावेळी त्याचा समाजस्वास्थ्यावर कसा परिणाम झाला आहे हे आपण प्रत्यक्ष पाहत आहोतच. आताच्या समाजाची परिस्थिती पाहता कोणी कोणाचं ऐकेल असा विश्वास वाटत नाही. त्यामुळे इथं समाजाला सुवर्णमध्य कसा साधता येईल याविषयी विचार करण्यात सुद्धा अर्थ वाटत नाही. सदराच्या शेवटी भारतात केवळ पुरुषांनीच स्त्री स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले आहेत हा काहीसा आश्चर्यकारक मुद्दा मालती बेडेकर यांच्या विचारातून जाणवतो.
ओरिसातील प्रसिद्ध लेखिका प्रतिभा राय यांच्या सदरातून सती परंपरेला
त्यांनी केलेल्या विरोधाचे वर्णन आणि विधवेची गरज तिच्या मुलाबाळांना
आणि सासुसासर्यांना कशी आहे याविषयीची त्यांची टिप्पणी या सदरातून
उल्लेखण्यात आली आहे. जगन्नाथपुरीच्या प्रसिद्ध मंदिरात केवळ एखाद्या
माणसाच्या प्रवेशामुळे मंदिर अपवित्र झाले हे मानण्याच्या संकल्पनेला सुद्धा त्यांनी आव्हान दिलेलं वाचनात येतं.
ललितांबिका अंतर्जनम यांच्याविषयीच्या सदरातून केरळच्या नंबुद्री
घराण्यातील स्त्रियांची केविलवाणी स्थिती आपणास वाचावयास मिळते. या स्त्रिया अशा ज्यांना ज्यांनी सूर्याला पाहिले नाही आणि सूर्याने ज्यांना पाहिले नाही! क्वचितच बाहेर पडावं लागलं तर घट्ट शाल गुंडाळून, चेहरा छत्रीनं झाकून घेण्याची सक्ती त्यांच्यावर होती.
ललितांबिका यांनी या सर्व परंपरा धुडकावून दिल्या. या लेखातील लक्षात
राहण्यासारखं वाक्य म्हणजे सतत स्वयंपाकघरात राहणाऱ्या या बायकांची
पोटाची भूक जरी भागत असली तरी भावना संवेदना ह्या मात्र भुकेलेल्याच राहतात ना!
इस्मत चुगताई यांच्या सदरातून पितृप्रधान व्यवस्थेतील उपेक्षित स्त्रियांचे आणि त्यांच्या मनात कोंडून असलेल्या सुप्त इच्छांचे एक विश्व त्यांनी कसे खुले केले याविषयीचा उल्लेख येतो. त्या काळातील आपल्या नवऱ्याकडून उपेक्षित राहिलेल्या आणि नाइलाजानं समलैंगिक संबंधांकडे वळणाऱ्या स्त्रियांचं वर्णन त्यांच्या एका कथेतुन येतं. उर्दू भाषेचा डौल आणि वैभव, नेमके शब्द आणि वाक्प्रचार यांची फेक यामुळे इस्मत यांचे लेखन केवळ वाचनीयच नव्हे तर वाचकाला अभिमंत्रित करणारे असते हे लक्षात राहण्यासारखं वाक्य!
कमला दास यांच्याविषयीच्या सदरातून एकंदरीत त्यांच्या लिखाणातील
आणि प्रत्यक्ष जीवनातील बंडखोरीचं चित्रण वाचावयास मिळतं. या सदरात म्हटल्याप्रमाणे त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे स्त्रीच्या भावना, तिच्या आशा वाट्याला आलेला विरह,अपेक्षा, दुःख आणि अपमान यांचाच!
त्यांच्या साहित्याची ओळख देऊन सदर त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील
बंडखोरीकडे वळतं! वयाच्या ६३ व्या वर्षी स्वतःहून पंचवीस वर्षे लहान
असणाऱ्या परधर्मीय परदेशातील तरुणाशी लग्न करण्याचा बंडखोरपणा
त्यांनी दाखवला! त्यासाठी परका धर्म देखील स्वीकारला आणि मग त्या
तरुणांकडून अपेक्षाभंग झाल्यानंतर आपल्या वाट्याला आलेलं जीवन देखील त्यांनी मोठ्या धैर्याने स्वीकारले.
गीता साने काहीशा प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या मराठीतील
बंडखोर लेखिका त्यांच्या प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या कारणांचे विश्लेषणसुद्धा ह्या सदरात दिसून येते कथानक मांडणीतील विस्कळीतपणा, रचनासौष्ठवाचा अभाव, धावतं आणि अपुरं चित्रण,खडबडीत भाषाशैली ह्या लेखनत्रुटीचा उल्लेख तत्कालीन अभिप्रायात येतो हे नमुद करण्यात आलं आहे. स्त्रीशिक्षण, कुटुंबसंस्था वगैरे बाबींवर परखड आणि उपरोधपूर्ण भाष्य त्यांनी केलं.
महाश्वेतादेवी ह्यांनी आपल्या साहित्यातून आदिवासी अस्मितेचा प्रश्न सातत्यानं पुढं मांडला. त्यांनी प्रत्यक्ष जीवनात देशातील अनेक राज्यांतून आदिवासींसाठी कार्य केलं. त्यांच्या कथांमधुन मेहनती, संघर्षरत आणि निर्भय परंतु पुरुष सत्तेभोवती हतबल होणाऱ्या आदिवासी नायिकांचं चित्रण आपणांस आढळतं.
आसामी साहित्यिका इंदिरा गोस्वामी ह्यांनी आपल्या लिखाणातुन कर्मकांड आणि अंधश्रद्धा ह्यावर प्रहार केले. वर्षोनुवर्षे चालत आलेल्या मजुरांच्या आणि विधवांच्या शोषणाविषयी लिखाण करुन समाजबदल घडवुन आणण्याचा प्रयत्न केला.
गौरी देशपांडे ह्यांनी नायिकांचं एक वेगळं रुप आपल्या साहित्यातुन मांडलं. त्या निःश्वास वगैरे सोडण्यात दिवस फुकट घालवत नव्हत्या. त्या त्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायचा हे ठरवत होत्या आणि त्या निर्णयाची जबाबदारी सुद्धा घेत होत्या.
ह्या लेखिकांचा कालखंड वेगळा, पार्श्वभुमी वेगळी! महाराष्ट्र, पंजाब, बंगाल, केरळ, लाहोर अशा वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या ह्या लेखिका! हजारो वर्षांचा इतिहास लाभलेली एक गौरवशाली कुटुंबव्यवस्था ज्यावेळी निर्माण होते आणि नांदते त्यावेळी त्यामागं नक्कीच कोणाचा तरी मोठा त्याग असतो.भारतीय समाजाच्या बाबतीत वर्षोनुवर्षे स्त्रियांनी हा त्याग केला. हा त्याग करताना आपल्या भावनांचा कोंडमारा होऊ देण्याचं ह्यातील बहुतांशी जणींनी स्वीकारलं. काहीजणींची घुसमट भावनिक कोंडमाऱ्याच्या पलीकडं जाऊन त्यांना मिळणाऱ्या व्यावसायिक संधीतील असमानतेविषयी असणार! परंतु ह्यातील काही मोजक्या अशा होत्या की ज्यांनी आपल्या वागण्यातुन बंडखोरी केली आणि त्यातील मोजक्याजणींनी ह्या बंडखोरीसाठी लेखणीचा आधार घेतला. हेच विचार पुरुषांनी मांडले तर त्यांना आपण बंडखोर म्हणणार नाहीत. ह्यातच आपल्या समाजाची पुरुषधार्जिणी विचारसरणी दिसुन येते.
जाता जाता काही महत्वाचे मुद्दे !
ह्या पोस्टचा बहुतांशी वाचकवर्ग तथाकथित विकसित समाजात वावरणारा आहे. वरील लेखातील स्त्रियांना अनुभवाव्या लागणाऱ्या समस्यांचा मुकाबला त्यांना करावा लागत नसणार ही आपण करुन घेतलेली गोड समजुत! ह्या समजुतीच्या सत्यतेची पडताळणी करण्याची अनिच्छा आपण एक समाज म्हणुन दर्शविणार!
वरील लेखिकांनी आणि लिखाणातील त्यांच्या नायिकांनी दर्शवलेली बंडखोरी अगदी डोळ्यात भरण्यासारखी होती म्हणुन ती आपल्या नजरेस पडली तरी! पण आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या स्त्रियांचं सुक्ष्म निरीक्षण केलं असता त्या मर्यादित प्रमाणात का होईना पण एखाद्या मुद्द्यावर बंडखोरी करत असण्याची मोठी शक्यता आहे! आज गरज आहे ती ह्या मर्यादित प्रमाणात होणाऱ्या बंडखोरीची आणि त्यामागं असणाऱ्या मुळ संदेशाची दखल घेण्याची !
पुन्हा एकदा एका नितांतसुंदर चतुरंग पुरवणीबद्दल लोकसत्तेचे आभार मानुन ही पोस्ट आटोपती घेतो!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा