अधुनमधून हैदराबाद ऑफिसला माझं जाणं होतं. मी हैदराबाद ऑफिसला जाणार असं कळलं की सोहम काहीशा नाराजीने माझ्याकडे पाहतो. त्याच्या नाराजीची प्रामुख्याने दोन कारणे असतात. पहिलं कारण म्हणजे अनेक वेळा सांगुनसुद्धा आजतागायत मी सुप्रसिद्ध हैदराबाद बिर्याणी विमानातून मुंबईला आणली नाही. त्यासाठी बचावात्मक पवित्रा घेऊन मी रात्री विमान उशिरा येत असल्यानं दुसऱ्या दिवशी शिळी बिर्याणी खाणे योग्य नाही हे त्याला पटवून देण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. याविषयी तो मला माफ करतो. परंतु जे दुसरे कारण आहे त्याविषयी मात्र मी त्याची नाराजी मी दूर करु शकलो नाही. ते म्हणजे तिथे ज्या हॉटेलमध्ये माझे वास्तव्य असते त्या हॉटेलमध्ये असणाऱ्या ब्रेकफास्टची माझ्याकडून त्यानं ऐकलेली वर्णने!! त्याचा मी पुरेपूर न केलेला उपयोग! त्याहून अधिक म्हणजे एकदा तरी या ऑफिसच्या व्हिजिटला माझ्याऐवजी त्याला पाठवावे ही त्याची सातत्याने धुडकावून लावलेली मागणी!
आता मुख्य विषयाकडे वळतो! अशा हॉटेलमधील ब्रेकफास्टमधील वैविध्य तुम्हाला अचंबित करणारे असू शकतं! सुरुवातीला मलाही खूप आश्चर्य वाटलं होतं. या सर्व पदार्थांना आपण न्याय देऊ शकत नाही या भावनेमुळे काहीशी अपराधीपणाची भावना मनात निर्माण व्हायची. परंतु दोन-तीन भेटीनंतर मात्र मी या अपराधीपणाच्या भावनेला धुडकावून लावले. इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे इथे नाश्त्याच्या विविध प्रकारांचे वर्गीकरण आपल्याला ध्यानात घ्यायला हवं.
१) इथं वेगवेगळ्या अनेक प्रकारची फळे उपलब्ध असतात.
२) दक्षिण भारतीय न्याहारीच्या प्रकारातील तीन-चार प्रकार आकर्षकरित्या मांडुन ठेवलेले असतात.
३) लाईव्ह काऊंटरवर डोसा उत्तप्पा यांचे वैविध्यपूर्ण प्रकार तुम्हाला बनवून दिले जातात.
४) तुम्ही जर मांसाहारी पदार्थांच्या बाबतीत कोणताही विधिनिषेध बाळगत नसाल तर त्या प्रकारांचं एक दालन तुम्हाला खुणावत असतं.
५) उकडून ठेवलेल्या कच्च्या भाज्या, ब्रोकोली, बटाटे, उकडलेली कडधान्य अशा आरोग्यदायी पर्यायांचे एक दालन उपलब्ध असतं.
६) ब्रेड, केक. पेस्ट्री हे शर्करायुक्त पदार्थ तुम्हांला दालनातुन खुणावत असतात त्यानंतर दुधात टाकून घेण्यासारखे ओट्स मूसेली आणि कॉम्प्लेक्स असतात.
तुम्ही नाश्त्याच्या विभागात प्रवेश केलात की तुम्हांला तुमचा खोली क्रमांक विचारून तुम्हांला एक आसन दिलं जातं. तिथं एक सेवक येऊन कोणत्या प्रकारचा चहा, कॉफी हवी याची चौकशी करतो. माझ्यासारख्या माणसाला ज्याने आयुष्यात एकाच प्रकारच्या चहाचे प्राशन केले आहे त्याला अशा निरर्थक प्रश्नांमध्ये रस नसतो. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरच्या भावावरूनच त्याला मला नक्की काय हवं आहे ह्याची जाणीव होत असावी. त्यामुळं तो मुकाट्याने मला साधा चहा आणून देतो.
वरील परिच्छेदांमध्ये या हॉटेलांतील नाश्त्याचं वर्णन करण्यात आलं आहे. आता वळूयात ते मुख्य मुद्द्याकडे! अशा हॉटेलमध्ये राहण्याची वेळ आपण सुट्टीवर असतानासुद्धा येते. सुट्टीवर असताना अशा हॉटेलातील ब्रेकफास्ट हादडणे आणि कार्यालयीन भेटीवर असताना दहा मिनिटानंतर ऑफिसात जाऊन महत्त्वाच्या मिटींगला उपस्थित राहणे अपेक्षित असणं या दोन वेगळ्या प्रसंगातील फरक जाणून घेऊन त्यानुसार आपला नाश्ता निवडणे आपल्या तब्येतीच्या आणि कार्यालयातील कामगिरीच्या दृष्टीने योग्य होय! दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर वर्णन केलेल्या नाश्त्याच्या विविध प्रकारांची सरमिसळ करणे योग्य नाही. जसे की सुरुवातीला फळे घेऊन मग दार्जीलिंग टी मागवणे! त्यामुळे आपल्याला नक्की कोणते पदार्थ घ्यायचे आहेत याविषयी सुरुवातीपासून आपली संकल्पना स्पष्ट असलेली बरी! अजून एक मुद्दा की जर आपण बरेच पदार्थ खाण्याची मनिषा बाळगून असाल तर प्रत्येक पदार्थ मर्यादित प्रमाणात घेणे किंवा फक्त चाखुन पाहणे योग्य होय!
शेवटचा मुद्दा म्हणजे अमेरिकन किंवा पाश्चात्य देशातील लोक बऱ्याच वेळा नाश्ता मोठ्या प्रमाणात घेतात. त्यांचे अनुकरण करण्याचा आंधळा प्रयत्न करू नये. त्यांच्या आणि आपल्या राहणीमानातील काही फरक लक्षात घ्यावेत. पहिला फरक म्हणजे ते सकाळी लवकर उठण्याची शक्यता जास्त असते. आणि इथं ब्रेकफास्टला येण्याआधी त्यांनी बहुदा पाऊण-एक तास जिममध्ये जोरदार व्यायाम करून कॅलरीज जाळल्या असतात. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचा ब्रेकफास्ट एक तासभर सुद्धा चालू शकतो. प्रत्येक पदार्थाची लज्जत घेत ते नाश्त्याचा आनंद लुटतात! आपल्यासारखे पंधरा-वीस मिनिटात दहा-पंधरा पदार्थ ग्रहण करण्याचा प्रयत्न ते करत नाहीत! शेवटचा मुद्दा म्हणजे बऱ्याच वेळा एका मागोमाग येणाऱ्या मीटिंगमध्ये बऱ्याच वेळा ते दुपारच्या जेवणाला तिलांजली सुद्धा देतात.
बाकी अशा ह्या हॉटेलातील वास्तव्यानंतर त्या नाश्त्याच्या मधुर स्मृति बराच काळ मनात घोळत राहत असल्या तरी त्यामुळं घरच्या पोह्यावर काही टिपण्णी करण्याचं धारिष्टय आपण अतिधाडशी असाल तरच करावं !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा