दिवस पहिला
मनानं कितीही निर्धार केला असला तरी प्रत्यक्षात ती वेळ येऊन ठेपली त्यावेळी मात्र अत्यंत द्विधा मनस्थिती झाली होती. या पृथ्वीवर राहुन बाकीच्या सर्व मानवजातीपासुन दुर होण्याचा क्षण समीप आला होता. एकदा का या वसाहतीचे दरवाजे उघडले गेले आणि आम्ही सर्व दीड हजार मंडळी त्या प्रवेशदारातुन आत शिरलो की मग ते भलेमोठे लोखंडीद्वार बंद होणार होते. मग एकत्र राहणार होती ती केवळ दीड हजार मंडळी! यातील माझी पत्नी आणि दीड वर्षाचा आर्यन सोडला तर बाकी कोणीही परिचित नव्हते, किंबहुना या उपक्रमाची ती एक पूर्वअट होती. प्रतिक्षाकक्षातील वातावरण खुपच नियोजनबद्ध होतं. आम्हां सर्वांना एक विशिष्ट सांकेतिक क्रमांक देण्यात आला होता. आम्ही बंद कक्षात आमचा क्रमांक पुकारला जाण्याची वाट पाहत होतो. विविध वयोगटातील विविध राष्ट्रांची ही माणसे होती. या सर्वांसोबत आता पुढील आयुष्य व्यतीत करायचं होतं. आयुष्यच नव्हे तर आपल्या पुढील पिढ्यादेखील या सर्वांच्या आणि त्यांच्या पुढील पिढ्यांसोबत राहणार होते.
ह्या लोखंडी द्वाराच्या पलीकडं बफर प्रदेश होता आणि तो संपला की विस्तृत महाकाय प्रदेश सुरु होणार होता. इथं सुरुवातीच्या काळात आम्हाला जिवंत राहता यावं यासाठी दुर दुर अंतरावर तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय करण्यात आली होती. ही माहिती आम्हांला आधी देण्यात आली होती आणि त्याचे नकाशेसुद्धा आम्हाला इंटरनेटवर पाठविण्यात आले होते. परंतु नकाशांच्या छापील प्रती घेऊन जाण्यास आम्हाला मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मनात साठवलेल्या प्रतिमेवर विश्वास ठेवून आम्हाला यातील उत्तम जागा शोधायची होती!! उत्तम म्हणजे काय याची व्याख्या त्या जगात काय असेल याची काहीही पुर्वकल्पना आम्हांला नव्हती. आमच्यासोबत ह्या महाकाय प्रदेशात येणाऱ्या बाकीच्या दीड हजार लोकांपैकी काहींची तरी ओळख असावी म्हणून त्यांची नावे आम्हाला सांगावीत म्हणून आम्ही असंख्य विनवण्या केल्या होत्या. परंतु आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत.
असा बराच वेळ विचार करीत असताना अचानक ते महाकाय प्रवेशद्वार उघडलं गेलं. सर्वत्र जमलेल्या नातेवाईकांचा जवळजवळ आक्रोश म्हणता येईल असा आवाज सर्वत्र पसरला. परंतु मनाचा निर्धार केला असल्यामुळे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून प्रवेशद्वारातून शिरु लागलो. बफर झोन मधून चालताना मनात विविध भावनांचे कल्लोळ उमटले होते. आर्यनला काही छोटी मुले दिसल्यामुळे तो काहीसा मजेत होताआणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा पण प्रयत्न करत होता. परंतु आम्ही सध्या तरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करीत होतो. शेवटी एकदाचा बफर झोन संपला आणि पुन्हा एका महाकाय प्रवेशद्वाराने आमचे स्वागत केले. इथे मानवी सुरक्षा नसली तरी विद्युत् प्रवाहाचे प्रचंड जाळे सोडून कोणीही एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ शकणार नाही याची व्यवस्था करण्यात आली होती आणि शेवटचा माणूस आत मध्ये शिरल्यावर हा प्रचंड क्षमतेचा विद्युत प्रवाह सक्रिय होणार होता. सर्व दीड हजार माणसे आत शिरायला जवळपास एक तास लागला आणि शेवटचा माणूस आत शिरताच ते महाकाय प्रवेशद्वार बंद झालं.
सर्वत्र काहीशी शांतता पसरली होती. आता पुढे नक्की काय करायचं हे ठरत नव्हतं. कोणीतरी पुढाकार घेऊन पुढील पावले आखणे आवश्यक होते. ह्या अभूतपूर्व प्रकल्पात सहभागी होण्यासाठी निवड होणे हे फार मोठे जिकरीचे काम होते. जगभरातील सर्व देशातून इच्छुक नागरिकांचे अर्ज मागवण्यात आले होते आणि त्यानंतर प्रत्येक देशातील लोकसंख्येनुसार त्यांना निवड करण्यात आली होती. आम्ही या प्रक्रियेत गंमत म्हणून सुरुवातीला सहभागी झालो. परंतु जसजसे निवडप्रक्रियेचे टप्पे पार पडत गेले त्यानुसार मनाला खूप आनंद कसा होत गेला तसं दडपणसुद्धा वाढत गेलं. एका कमकुवत क्षणी आम्ही ह्या प्रकल्पातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेला पोहोचलो होतो परंतु आता असला कोणताही विचार करणं तुमच्या हातात नाही असा धमकीवजा इशारा आम्हांला मिळाला होता.
ही निवडप्रक्रिया अत्यंत गोपनीय अशी होती. जगभरातील कोणत्या नागरिकांची निवड झाली आहे हे ते नागरिक सोडून बाकी कोणालाही न सांगण्याचे बंधन त्यांच्यावर होते. निवड झाल्यापासून पुढील सहा महिन्यात आम्हाला बाकीच्या मनुष्यजातीपासूनचे आपले सर्व संबंध तोडून टाकण्यात सांगण्यात आले होते. आपल्या अस्तित्वाच्या खुणा टाकुन देण्यास सांगण्यात आलं होतं. आयुष्यभराच्या मेहनतीनं जोडलेल्या नात्यांचा, मैत्रीचा त्याग करुन जाणे हे काही सोपे काम नव्हते. परंतु जी काही मंडळी या प्रवेशप्रक्रियेत सहभागी झाली होती त्या सर्वांची जिद्द आणि अवलियागिरी वाखाणण्याजोगी होती.
बंद प्रवेशद्वाराकडे पाहण्यात काही वेळ असाच गेला. आता समोर दिसणाऱ्या भव्य प्रदेशाकडे वाटचाल करायची होती. इथं लक्षावधी चौरस किलोमीटरचा हा प्रदेश पसरला होता आणि विविध ठिकाणी घरांसाठी आवश्यक असलेली मूलभूत सामुग्री ठेवण्यात आली होती. ह्या वास्तव्यासाठी अनुकुल ठिकाणांचा अंदाज देणारे नकाशे आम्हाला काही दिवसांपूर्वी दाखवण्यात आले होते. परंतु त्याच्या काही छापील प्रती आत घेऊन जाण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. एकदा आत आल्यावर केव्हा आपल्या स्मरणशक्तीवर अवलंबून राहायचे होते.
इथं आम्हांला दोन निर्णय घ्यायचे होते पहिला म्हणजे कोणत्या माणसांसोबत आपला गट बनवायचा आणि दुसरा म्हणजे या अवाढव्य प्रदेशातील कोणते ठिकाण आपली वास्तव्यभूमी म्हणून स्वीकारायचा. इथं निर्णयासाठी कोणीतरी पुढाकार घेणे आवश्यक होते. परंतु ही तर पडली पंधराशे अनोळखी माणसं आणि ध्वनिक्षेपकाच्या अभावे सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात बोलणं सुद्धा कठीणच होतं. अशावेळी अचानक आफ्रिका खंडातील दोघं माणसे उभे राहुन त्यांच्या मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत काहीतरी मोठ्याने बोलत आहेत असे आम्हांला लांबूनच दिसले. मध्ये असलेल्या प्रचंड गर्दीमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण होते. त्या आफ्रिकन लोकांचे बोलणे बहुधा तिथे असलेल्या काही गोऱ्या लोकांना पटले नसावे. ते आणि आफ्रिकन लोक यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्भवला आहे अशी चिन्हे दिसू लागली.
समजा हा जर वाद टोकाला पोहोचला तर त्यात पोलिसाची भूमिका कोण बजावणार हा प्रश्न माझ्या मनात आला. समजा पुढील पातळी गाठली गेली आणि हाणामारीचा प्रसंग उद्भवला, कोणी जखमी झालं तर डॉक्टर कोठून आणायचे आणि जरी या समुहात डॉक्टर असले तरी त्यांच्यासाठी आवश्यक अशी उपकरणे, इस्पितळ नाही हे सर्वच प्रश्न उद्भवणार होते. म्हणायला गेलं तर सर्व शक्यतांचा थोडाफार विचार आम्ही केला होता. परंतु आधी विचार करणं आणि प्रत्यक्षात तो प्रसंग तुमच्यासमोर उभा ठाकणे यात जमीनअस्मानाचा फरक असतो हे मला कळून चुकले होते. नशिबाने तो प्रसंग फारसा ताणला न जाता थोडक्यात निभावला गेला.
अचानक लोक रांगेत उभे रहात असल्याचे आम्हाला दिसलं. दहा दहाच्या गटात लोक उभे राहत होते. आम्हीसुद्धा आम्हांला जमेल तसे एका रांगेत उभे राहिलो. आमच्या रांगेतील पहिल्या माणसाला मग पुढे येण्यास सांगण्यात आले. अशा पहिल्या क्रमांकावरील पंधरापंधराजणांना एकत्र बोलावुन त्यांचे पुन्हा विविध वेगळे गट करण्यात आले आणि त्यातील एकाला निवडण्यात आले. अशाप्रकारे दर दीडशे माणसांचे प्रतिनिधित्व करणारा एक माणूस निवडण्यात आला. या निवडीमागे कोणतीही तर्कसंगता नव्हती. जे कोणी पुढं उभे राहिले होते त्यांना निवडले गेले होते. अशाप्रकारे निवडले गेलेले हे दहाजण संपूर्ण दीड हजार लोकांचे प्रतिनिधित्व करत होते. हे दहाजण संपुर्ण समुदायाच्या समोरील मोकळ्या भागात चर्चा करत असल्याचं मला दिसत होतं. इथे ध्वनिक्षेपकाच्या सोयीअभावी त्यांच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा होत आहे हे समजण्यास वाव नव्हता. बराच वेळ चर्चा करुन आमचा मुख्य गटप्रमुख समोर उभ्या असलेल्या १५ उपगटप्रमुखांच्या समुदायाकडे आला. त्याने मुख्य चर्चेचा गोषवारा या पंधराजणांना दिला. आता हे उपप्रमुख आपल्या गटांच्या दिशेने येऊ लागले. आमचा उपप्रमुख आमच्याजवळ आला आणि आम्हाला एकंदरीत चर्चेचा आढावा आम्हांला देऊ लागला. त्यानं जमिनीवर एका काठीच्या आधारे संपूर्ण परिसराचा नकाशा काढला आणि नैऋत्य दिशेकडील एका कोपऱ्यात आपल्याला राहायला जायचे आहे असे सांगितले. मुख्य १० गटप्रमुखांची बैठक दर पोर्णिमेला होणार होती. दिनदर्शिका नसल्यामुळे केवळ पौर्णिमा हेच कालगणनेचे साधन बनणार आहे हे स्पष्ट झाले होते. ह्या बैठकीची आगाऊ सूचना म्हणून आदल्या दिवशी ढोल वाजवून सर्वांना पूर्वसूचना देण्यात येणार होती. एकंदरीत ह्या सूचना ऐकून काही काळ मन सुन्न झाले होते. प्रगतीचा ध्यास सोडून आपल्या अतिअतिपूर्वजांनी ज्याप्रकारे जीवन घालवलं होतं त्या प्रकारच्या जीवनाकडे आमची वाटचाल चालली होती. आमचं ठीक होतं कारण निर्णय आमचा होता. परंतु छोट्या आर्यनचा यात काय दोष? का म्हणुन मी माझा निर्णय त्याच्यावर लादला होता! माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं!!!
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा