मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

कबुतरांना दाणे देणारे अविचारी जन !


सद्यकाली समाजात कोणीही उठावं आणि नवीन पायंडा पाडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुज्ञ माणसं शक्यतो मुर्खांच्या तोंडी / नादी लागत नसल्यानं काही अनिष्ट प्रथा समाजात रुढ होत चालल्या आहेत. 

स्वतः प्रत्यक्ष जीवनात कितीही चुकीची वर्तवणुक करावी पण आपल्या जीवनात भूतदयेचा एक घटक असावा म्हणुन लोक बरेच स्वकेंद्रित उद्योग करतात. एखादी स्वच्छ जागा निवडुन दररोज सकाळी अथवा विशिष्ट वेळी तिथं धान्याचे दाणे आणुन टाकावेत हा हल्ली निर्बुद्ध लोकांनी चालवलेला उद्योग. शहरात वावरणारे मोजके पक्षी शिल्लक राहिले आहेत. चिमण्या दुर्मिळ होत चालल्या आहेत आणि कावळे कसाबसा तग धरुन आहेत पण एकेकाळी शांतिदूत म्हणुन ज्ञात असलेली पण सध्या एक गलेलठ्ठ, आळशी, सर्वत्र घाण पसरवणारा पक्षी म्हणुन माझ्या मनात प्रतिमा बनवुन असलेली कबुतरं मात्र सर्वत्र वेगानं पसरत आहेत. माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं असता ही कबुतरं श्वसनाच्या भयंकर समस्या निर्माण करतात, सर्वत्र विष्ठा पसरवुन ठेवतात जी आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे आणि त्यांच्या आवाज अत्यंत संतापजनक आहे. ह्या पक्ष्यांची प्रजननक्षमता जबरदस्त आहे आणि एखाद्या भागात ह्यांची संख्या पाच सहा महिन्याच्या कालावधीत 
असंख्य पटीनं वाढू शकते ह्याचा आपण सर्वांनी अनुभव केव्हातरी घेतला असेल. 

कबुतरांचे गुणधर्म कितीही संतापजनक असले तरी त्यांचा ह्यात पुर्णपणे दोष नाही कारण शेवटी ते बुद्धिमत्तेच्या अगदी मुलभूत पातळीवरील पक्षी आहे. माझा मोठ्ठा (माझ्या भावना ठळकपणे व्यक्त करण्यासाठी मोठ्ठा हा शब्द) आक्षेप आहे तो ह्या तथाकथित दयाळु लोकांना ! आपल्या जीवनातील भुतदयेचे चेकबॉक्स टिक करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविण्याचा तुम्हांला कोणताही हक्क नाही. तुम्ही जिथं दररोज दाणे टाकता तिथं  कबुतरं आपल्या विष्ठेनं सर्व परिसर अस्वच्छ करुन टाकतात, मुक्कामाला आजुबाजुच्या इमारतीत वास्तव्याला जातात. आधीच महानगरातील विविध समस्येने गांजलेल्या नागरिकांच्या जीवनात आरोग्याच्या अधिक समस्या निर्माण करतात. इंटरनेटवर शोध घेतला असता कबुतरांपायी निर्माण होणाऱ्या अनेक आरोग्यविषयी समस्यांची यादी आढळते. ज्यांना कोणाला इतकं भूतदयेचं वेड असेल त्यांनी स्वतःच्या घरात पिंजरा ठेवून कबुतरं पाळावीत ही नम्र विनंती !

(तळटीप - ह्या पोस्टचे येत्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी इंग्लिशमध्ये भाषांतर करण्याचा मानस आहे. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...