मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

श्रीदेवी


आयुष्य जसजसं अधिकाधिक बिझी होत जातं तसतसं बालपणाच्या, कॉलेजजीवनातील आठवणी दुरवर जात असल्यासारख्या वाटतात. पण काही प्रसंग असे घडतात की त्या आठवणी, ते क्षण पुन्हा अगदी जवळुन अनुभवल्यासारखे सामोरे येतात. आज सकाळ सकाळी श्रीदेवी गेल्याची अगदी धक्कादायक बातमी ऐकली आणि तिच्या अनेक चित्रपटांच्या आठवणी जाग्या झाल्या. 

एक गोष्ट मान्य करायला हवी, माझं चित्रपटक्षेत्राचं ज्ञान मर्यादित आणि शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात मी अगदी मोजके चित्रपट पाहिले होते आणि त्यामुळं श्रीदेवीसारख्या अत्यंत गुणी अभिनेत्रीच्या कारकिर्दीवर काही लिहायचं धारिष्टय खरतर मी करु नये. पण माझा बालमित्र आणि अगदी संवेदनशील माणुस RRR ने सकाळीच अगदी दुःखी होऊन म्हटलं काही तरी लिही. ह्याच्याबरोबर अगदी लहानाचा मोठा झालो आणि मागे राजेश खन्ना गेला तेव्हाही आम्ही दोघे दुःखी झालो होतो. बघायला गेलं तर ह्या कलाकारांना आपल्या गतआयुष्याला जोडणारे दुवे म्हणता येईल आणि त्यामुळं ते काळाच्या पडद्याआड गेले की आपल्याला खूप काही गमावल्यासारखं वाटतं. 

श्रीदेवीच्या अनेक दशके व्यापलेल्या चित्रपटकारकिर्दीचा विस्तृत आढावा घेण्याची ताकद माझ्यात नाही. त्यामुळं काही मोजक्या चित्रपटातील तिच्या रुपांचा इथं थोडाफार संदर्भ द्यायचा प्रयत्न करु इच्छितो.  

Julie - १९७५ सालच्या ह्या चित्रपटात श्रीदेवीनं बालकलाकाराची भुमिका केली होती. ह्या चित्रपटात मान्यवर कलाकार ओमप्रकाशसोबत 'My Heart is beating' ह्या गाण्यावर नाचणाऱ्या त्याच्या संपुर्ण कुटुंबातील छोटी श्रीदेवी चांगलीच लक्षात राहते. खरंतर हा चित्रपट पाहिला २००५ च्या आसपास आणि लक्षात राहिला तो त्यातील गाण्यांसाठी !
हिम्मतवाला / अकलमंद - जितेंद्र, जयाप्रदा आणि श्रीदेवी ह्यांनी बहुदा १९८३ - ८५ सालात आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला होता. काहीसे भडक रंगीबेरंगी कपडे, पुढच्या रांगेतील प्रेक्षकांसाठी लिहलेली गाणी ही ह्या चित्रपटांची वैशिष्टये होती. त्यात बिनधास्त भुमिका श्रीदेवीनं अगदी हुबेहूब वठवल्या होत्या. 
नगिना  - १९८६ साली आलेल्या ह्या चित्रपटाच्या वेळी आम्ही थोडेफार मोठे झालो होतो आणि केवळ एका गाण्यानं ("मैं तेरी दुश्मन , दुश्मन तु मेरा !") संपुर्ण राष्ट्राला वेड लावण्याची किमया श्रीदेवीनं इथं साध्य केली. 
MR. इंडिया - श्रीदेवीच्या बहुरंगी अभिनयक्षमतेची साक्ष देणारा हा चित्रपट. "हवा हवाई !" हे गाणं अजुनही लोकप्रिय आहे. ज्याच्या व्यक्तिमत्वावर चित्रपटाचं नाव ठेवलं गेलं तो अनिल कपुर, "मोगैम्बो खुश हुआ" हे भारतभर प्रसिद्ध झालेलं वाक्य बोलणारा अमरीश पुरी असताना खरा भाव खाऊन गेली ती श्रीदेवी ! 
असं म्हटलं जातं की श्रीदेवी येईपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टी ही नायकप्रधान होती. नायिका केवळ सहाय्यक भूमिकेत असतं. MR. इंडिया पासुन श्रीदेवीनं ह्या संकल्पनेस धक्का देण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात केली असावी. तेजाबनंतर प्रसिद्धीझोतात आलेल्या माधुरी आणि श्रीदेवी ह्या दोघींनी ९० च्या कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीवर आणि चाहत्यांच्या मनांवर राज्य केलं. काही काळ त्या दोघी एकमेकांच्या प्रतिस्पर्धी म्हणुन ओळखल्या गेल्या.   
सदमा  हा चित्रपट माझ्यामते कमल हसनचा म्हणुन ओळखला जाईल. एका special child च्या रुपातील श्रीदेवीची काळजी वाहणारा आणि तिच्यात गुंतून गेलेला नायक त्यानं आपल्या समर्थ अभिनयाद्वारे यथासांग साकारला. पण त्या भुमिकेतील अल्लडपणा श्रीदेवीनं ज्या प्रकारे साकारला त्याला तोड नाही. रुळाला कान लावून आगगाडीची वाट पाहण्याचा क्षण तर कमालीचा !

श्रीदेवीनं कर्मा, सल्तनत ह्यासारख्या बहूकलाकारांनी नटलेल्या चित्रपटात सुद्धा आपला ठसा उमटवला. अमिताभबरोबर खुदागवाह मध्ये काम केलं. ह्या तीन चित्रपटात तिनं मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेयर करण्याची तयारी दर्शवितांनाच आपलं अस्तित्व कसं प्रभावीपणे दाखवून द्यायचं ह्या आपल्या क्षमतेची जाणीव करुन दिली.  
सीता गीताचा रिमेक असलेल्या चालबाज चित्रपटांत तिने दुहेरी भुमिका बजावली. ह्यात दोन टोकाच्या व्यक्तिमत्वाच्या बहिणींच्या भुमिका तिनं अगदी समर्थपणे साकारल्या.  
चांदनी, लम्हे ह्या दोन्ही चित्रपटांद्वारे तिनं उत्कट प्रेमिका ही भुमिका अगदी परिपूर्णतेने साकारली. युरोपच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या ह्या प्रेमकथांनी त्या दशकातील पिढीला वेड लावलं. लम्हेमध्ये आपल्यापेक्षा वयानं बऱ्याच मोठ्या असणाऱ्या अनिल कपूरच्या प्रेमात पडणाऱ्या प्रेमिकेचं रुप तिनं अगदी परिपूर्णतेनं निभावलं.    

त्या काळातील कॉलेजकन्यांनी श्रीदेवीत आपलं रुप पाहिलं असावं. तिनं साकारलेल्या बंडखोर, खट्याळ युवतीच्या छटा त्यांना स्वतःमध्ये जाणवल्या असाव्यात पण बंधनामुळं स्वतःला कदाचित त्यांना प्रत्यक्ष जीवनात त्या साकारता आल्या नसल्यानं त्यांनी श्रीदेवीला अगदी डोक्यावर उचलुन धरलं. तिनं साकारलेल्या प्रेमिकेच्या रुपात त्या तरुणींनी स्वतःला पाहिलं असावं आणि आपल्या प्रेमिकेच्या रुपात तरुणांनी तिला ! 

श्रीदेवीचं एक खास वैशिष्टय म्हणजे ती पाश्चात्त्य आणि भारतीय पारंपरिक ह्या दोन्ही वेशभूषेत अगदी सराईतपणे वावरायची !  

पुढं अचानक तिला संसार थाटावा वाटला आणि मग बोनी कपूरशी लग्न करुन मोकळी झाली. लग्नानंतर तिनं पत्नीची आणि आईची भुमिका अगदी मनापासुन निभावली. चित्रपटसृष्टीपासून तिनं दीर्घकाळ संन्यास घेतला. आपल्या मुलींना मोठं केलं.  

मुली जशा मोठ्या झाल्या तसं तिच्यातील अभिनेत्रीनं तिला परत साद दिली असावी आणि मग तिनं पुनरागमन करुन इंग्लिश विंग्लिश, मॉम ह्या चित्रपटांतुन गृहिणी आणि एका समर्थ आईची भूमिका साकारली. 

बालकलाकार, अल्लड युवती, प्रेयसी ह्या रुपानंतर आता गृहिणी, माता ही सर्व रुपं समर्थपणे पेलणारी श्रीदेवी अजुन बराच काळ आपल्या चाहत्यांना अभिनयाची मेजवानी देत राहील अशा समजुतीत असताना अगदी अचानकपणे काल रात्री आमच्यातुन तु निघुन गेलीस. 

चाहत्यांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणारे कलाकारांना स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याकडे हवा तितका वेळ द्यायला मिळत नाही किंबहुना आपलं व्यावसायिक रुप राखण्यासाठी करावी लागणारी धडपड कदाचित त्यांना जीवघेणी ठरु शकते अशा आशयाचा संदेश व्हाट्सअँपवर आला. मेरा नाम जोकर मध्ये राज कपूर म्हणाला होता - 'Show Must Go On!"

श्रीदेवी - तु इतक्या लवकर जायला नको होतं !!

सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

गुलाबजाम !!


दृष्टिकोन १ - आयुष्यात अचानक आलेली आपत्कालीन परिस्थिती! त्यामुळं जीवनातील सर्व आनंद, सुख बाजुला सारुन केवळ दैनंदिन जीवन कसबसं जगणं हेच केवळ जीवनाचं ध्येय बनवुन जगणारी एक तिशीतील स्त्री! मनातील बाकी सर्व भावनांना मुरड घालुन, जनसंपर्क जमेल तितका टाळणारी ! अचानक तिच्या आयुष्यात जबरदस्तीनं शिरकाव करणारा विशीतला युवक! त्याची संवेदनशीलता तिला भावते. एकटीनं वाळवंटासारखं आयुष्य जगणं विरुद्ध आयुष्याच्या लढ्यात एका पुरुषाची साथ लाभणं ह्यातील फरक प्रथमच ती अनुभवते. आयुष्याच्या ज्या स्थितीवर ती असते तिथं केवळ कोणताही एक पुरुष तिला त्यातुन बाहेर काढु शकला नसता, केवळ ह्या पुरुषाची संवेदनशीलता तिला ह्यातुन बाहेर काढण्यास हातभार लावते. ह्या सुखद अनुभवाला सामोरं जात असताना नकळत आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या ह्या तरुणात गुंतत जाते आणि अशा वेळी अचानक तिच्यासमोर ह्या युवकाच्या खऱ्या स्वप्नाचा उलगडा होतो. आणि तिचा मोठा भ्रमनिरास होतो. पण ह्या युवकाने तिला एका गर्तेतून बाहेर काढलं असतं आणि त्यामुळं समाजाच्या प्रवाहात ती सामील होण्यास अधिक सक्षम बनली असते. 

सारांश १- नवयुवका, तुझं स्वप्न कितीही भव्यदिव्य असो, ते साध्य करत असताना ह्या सर्व प्रकारात एका स्त्रीच्या भावजीवनाशी आपण खेळत आहोत ह्याची जाणीव ठेवायला हवी!  

दृष्टिकोन २ - कॉर्पोरेट जगतातील एक स्वप्नवत नोकरी आणि ती सुद्धा लंडनसारख्या शहरात, एका सुंदर तरुणीशी लग्न जमलेलं - अशा परिस्थितीत केवळ आपलं मराठमोळ्या खाद्यपदार्थाचा प्रसार करण्याचं स्वप्न पुर्ण करण्याची आस घेतलेला एक देखणा तरुण सर्व  सुखांचा त्याग करुन मराठमोळ्या पदार्थाच्या पाककृती शिकण्यासाठी पुण्यात येऊन धडकतो. आपल्या रुमपार्टनरच्या डब्यातील रुचकर भाजीचा शोध घेत एका बाह्यदर्शनी विक्षिप्त अशा मध्यमवर्गीय स्त्रीकडं जाऊन पोहोचतो. तिनं आपल्याला शिष्य म्हणुन स्वीकारावं म्हणुन तिचं सर्व तऱ्हेवाईक वागणं सहन करतो. ह्या सर्व प्रवासात तिची दुःख जाणुन घेतो आणि तिला तिच्या कोषातून बाहेर येण्यास मदत करतो. योग्य वेळ येताच तिला तिच्या समवयस्क तरुणाशी गाठ घालुन देतो आणि एक विस्कटलेल्या आयुष्याची घडी घालून देण्यास हातभार लावतो. 

सारांश २- ह्या तरुणाच्या मनात त्या स्त्रीविषयी नक्की काय भावना आहेत हे तोच जाणे ! कदाचित ती जरी त्यात गुंतली गेली असली तरी तो तिच्यात गुंतला गेला आहेच असं १००% म्हणू शकत नाही. आणि जरी गुंतला गेला असला तरी आपली ध्येयं पाहता, वयातील अंतर पाहता आपण तिला योग्य न्याय देऊ शकु ह्याची त्याला कदाचित खात्री नसावी. त्याच्या वागण्याचं मुल्यमापन करताना त्याच्या मनातील द्वंद्वाचा विचार करायला हवा! 

एक उत्तम चित्रपट ! पुन्हा एकदा विचार करायला लावणारा ! मराठी चित्रपटांची वाटचाल खरोखर चांगल्या दिशेनं चालु आहे. वरकरणी संथ वाटत असला तरी संपुर्ण चित्रपट कथेच्या दृष्टीनं वेगानं पुढे सरकत असतो. मराठी खाद्यपदार्थांची मोहक दृश्ये मनाला भावतात, त्यात खरोखर मेहनत घेतली गेली आहे. डायल-अ-शेफची संकल्पना आवडली. सोनाली कुलकर्णीचा अभिनय लाजवाब ! त्या विशिष्ट परिस्थितीत सापडलेल्या स्त्रीच्या मनातील संवेदना संपुर्ण शुन्य नसतात त्या कशा स्वरुपात चेहऱ्यावर आणायच्या हे तिनं अप्रतिमपणे साकारलंय ! सिद्धार्थ चांदेकर एक देखणा अभिनेता आणि त्यानं आदित्याची भुमिका सुरेख साकारली आहे. चित्रपटाच्या आरंभी रुम पार्टनरच्या डब्यातील पदार्थाचा पहिला घास घेताना आपण ज्याच्या शोधात आलो आहोत ते आपल्याला सापडलं हे ज्याप्रकारे त्यानं चेहऱ्यावरील हावभावाद्वारे व्यक्त केलं ते अप्रतिमच ! ह्यापुढं गुलाबजाम खाल्ल्यावर कसं मस्त वाटलं हे चेहऱ्यावरील हावभावाद्वारे दाखवायचं आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे हा ट्रेंड येणार हे माझं भाकीत ! 

शनिवार - ते सोमवार सकाळ - दोन चित्रपट / तीन ब्लॉग पोस्ट्स - Time to go back to work Aditya Patil!! 

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

आपला मानूस


काल 'आपला मानूस' चित्रपट पाहिला. कोणताही चित्रपट आपण Transactional आणि Strategic अशा दोन पातळींवर पाहु शकतो. ह्या चित्रपटातील संवादांची बौद्धिक पातळी वरच्या दर्जाची असल्यानं माझ्या नकळत हा चित्रपट मी Strategic पातळीवर पाहिला आणि आजचं हे परीक्षण सुद्धा काहीसं त्या धाटणीतलं ! Strategic पातळी म्हणजे नक्की काय असा प्रश्न तुम्हांला पडला असल्यास, चित्रपटातील छोट्या घटनांकडे, कथेकडे न पाहता त्यातील मूळ संदेश कोणता दिला जात आहे ते ध्यानात घेणं म्हणजे Strategic पातळी अशी माझी समजूत आहे. 

चित्रपट नक्कीच विचार करायला लावतो. कोणत्याही एका पिढीला परिपूर्ण म्हणुन चित्रीत करत नाही. शेवटी एक इन्स्पेक्टर नानाने दोघांना दिलेला संदेश वगळता दोन्ही पिढींची बाजू बऱ्यापैकी मांडतो. 
आपलं म्हणणं ऐकून घ्यावं हे जुन्या पिढीचं म्हणणं. पण ते कशा प्रकारे आणि केव्हा (टायमिंग) मांडावं ह्या बाबतीत सुधारणेस वाव आहे हे चित्रपट सुप्तपणे सांगतो. 

सद्यकालीन बऱ्याच मुलांची स्थिती चित्रपट चांगल्या प्रकारे सांगतो. लहानपणापासुन ज्यांनी आपला सांभाळ केला ते आईवडील एकीकडं आणि जिच्या आयुष्याची जबाबदारी सांभाळण्याची स्वीकारली आहे ती पत्नी दुसरीकडं अशा द्विधा परिस्थितीत मुलगा सापडलेला असतो. 

सुनेची बाजू काहीशी खलनायकी दिशेनं जाते. पण इथंही आपलं म्हणणंच संपुर्णपणे बरोबर  आहे हे सांगण्याचा सुन प्रयत्न करते असं जाणवत नाही. 

शेवटी हीच खरी स्थिती आहे. आपण परिपुर्ण नाहीत, आपणसुद्धा कुठंतरी चुकत आहोत हे सर्वांना जाणवत असतं. पण त्यातील किती भाग खुलेपणानं सर्वांसमोर कबुल करायचा हे मात्र कळत नाही आणि खरी घालमेल इथंच होते. घरातील मोलकरीण मध्येच एक सुरेख संवाद म्हणते. आमच्याकडची भांडणं कशी रोखठोक ! जे काही मनात आलं ते स्पष्ट बोलुन टाकायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र कशी सर्व मनं स्वच्छ असतात! इथं मात्र दोन वाक्यं बोलायची आणि नंतर आतल्याआत धुमसत बसायचं. चित्रपटात  बुद्धिजीवी वर्गाचा उल्लेख येतो. पुस्तकात वाचलेली फिलोसॉफ़ी आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनात किंवा जीवनातील संवादात वापरण्याबद्दल बुद्धिजीवी वर्गाच्या मनातील संभ्रम काहीसा सद्यस्थितीस कारणीभुत आहे हे म्हटलं जातं. 

चित्रपटातील काही वाक्यं सुंदरच! 
"प्रत्येक घरातील स्थितीवर एक रहस्यपुस्तक लिहु शकतो. तुमचं पुस्तक जगासमोर आलं इतकंच !"
"जर एखाद्याला गुन्हेगार ठरवायचं झालं तर फक्त त्याच दिशेनं हवे तितके पुरावे गोळा करता येऊ शकतात!"
सुमित राघवन आपल्या बाबांना एका क्षणी मनापासुन म्हणतो. "इथं कोणीही संपुर्णपणे परिपुर्ण नाही, पण निरपेक्ष प्रेमाची शेवटची आशा म्हणुन मी तुमच्याकडं पाहिलं आणि जेव्हा तुम्ही ह्या अपेक्षेला पुरे पडू शकला नाहीत, तेव्हा माझा भ्रमनिरास झाला आणि माझं खरं नैराश्य ते आहे !"
बाप, मुलगा आणि सुन ह्या त्रिकोणी कुटुंबाला दिलेली काटकोन त्रिकोणाची उपमा सुरुवातीला भावणारी पण नंतर तिचा काहीसा अतिरेक झालेला!

आता माझा सारांश - कोणतंही नातं टिकायला त्याचं दायित्व कोणीतरी घ्यायला हवं !  कोणत्याही नात्यात जबाबदारीची, दुसऱ्यांच्या चुका माफ करण्याची रेषा मध्यबिंदूवर आखता येते. पण ज्यावेळी ह्या मध्यबिंदूच्या मापनावरच नात्यातील सहभागी लोकांची शक्ती वाया जाते त्यावेळी नातं खऱ्या अर्थानं संपुष्ट पावतं. नवी पिढी आणि जुनी पिढी ह्यांच्या नात्याचं सुद्धा काहीसं असंच असतं. दोन्ही बाजूंची आयुष्यातील स्थिती पाहता नव्या पिढीनं ह्या नात्याचं दायित्व घ्यावं आणि आपली जबाबदारी मध्यबिंदूच्या पलीकडं न्यावी असा संदेश हा चित्रपट देतो आणि मला तो पटला !

बाकी आता शेवटचा काही भाग Transaction पातळीवर ! सुमित राघवनचा अभिनय सुरेखच आणि तो मस्त फिट वाटला. त्या प्रभावाखाली एक दोन दिवस व्यायाम करायला हरकत नाही. इरावती हर्षेनं सुद्धा चांगला अभिनय केला! ही गुणी अभिनेत्री इतके दिवस कुठं गायब झाली होती असं एखाद्या जाणकारासारखं मी म्हणायला हरकत नाही. नाना पाटेकर ह्यांच्या अभिनयाविषयी काही कंमेंट्स द्यायची माझी पात्रता नाही. पण त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणि अभिनयातील भारदस्तपणा चित्रपटाची पातळी टिकवुन ठेवतो. ह्या तिघा गुणी कलावंतांनी चित्रपटाचा डोलारा अगदी समर्थपणे पेलला आहे. 

जाता जाता गंमतीचा प्रसंग ! चित्रपटाच्या शेवटी नाना सुमित आणि इरावतीला आपण संशयाची सुई इथं तिथं का फिरवत राहिलो आणि त्यातुन आबांची बाजु कशी आपणास मांडायची होती हे समजावुन सांगतो. सुमित, इरावतीसोबत सारं चित्रपटगृह अगदी भावुक होतं. शेवटी सुमित उभा राहतो, नानाला मिठी मारतो. काहीशा विलंबाने कठोर नानाचे हात सुद्धा सुमितच्या पाठीवरुन फिरतात. मराठी भावुकतेची महत्तम पातळी गाठणारा हा क्षण! क्षणभर थांबुन सुमित दाराबाहेर पडतो. हे सर्व बाजुला उभं राहून पाहणारी इरावती जायला निघते. संपुर्ण मराठी थिएटरच्या मनातील भावना खट्याळ प्राजक्ता बोलुन दाखवते "पाया पडते !" अगदी पिनड्रॉप सायलेन्स असल्यानं सर्व थियेटर तिचे दोन शब्द ऐकते. पण आम्हां सर्वांची घोर निराशा करुन इरावती एका सेकंदात तशीच घराबाहेर पडते. प्राजक्ताच्या वाक्यानंतर दुसऱ्या सेकंदाला पुढील दोन रांगा सोडून बसलेली बाई म्हणते, "नाही पडली!"  संपुर्ण थियेटर हास्यकल्लोळात बुडून जातं!!

पुढं बाहेर पडता पडता एक बाई आपल्या परप्रांतीय मैत्रिणीला फोन करुन 
तुमच्या घरातील सर्वांनी हा चित्रपट कसा बघायलाच हवा हे पटवुन सांगत असते !! 

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

चंद्रवसाहत - भाग १!



सन - २०८८
स्थळ - चंद्र (पृथ्वीचा)
बैठक विषय - चंद्रावरील वसाहतीचे नियम ठरविणे 

सभासदांपुढे चर्चेसाठी आलेले विषय 
१) पृथ्वीवरील देशांची संरचना चंद्रावर देखील शाबुत ठेवायची की देशविरहित संरचना पाळायची ?
२) चंद्रावरील एक दिवस सुमारे २८ पृथ्वीदिवसाइतका असल्यानं मनुष्याच्या शरीरात होणाऱ्या बदलांचे मापन कसे करायचे? साप्ताहिक सुट्टी घ्यायची कधी?
३) चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या १/६ पट असल्यानं, स्थुल व्यक्तीची व्याख्या बदलायची का?
४) पृथ्वीवरील गुन्हेगार चंद्रावर पळाला तर त्याचे गुन्हे कायम राहतील का?
५) माणसाची मंगळावर सुद्धा वसाहत होणार आहे. पृथ्वी आणि मंगळ हे सुर्याचे थेट उपग्रह तर चंद्र पृथ्वीचा उपग्रह - त्यामुळं चंद्रावरील माणसांना दुय्यम वागणुक तर मिळणार नाही ना?
६) पृथ्वीवरील खेळातील सर्व नियम, विक्रम चंद्रावर कोणत्या रुपात लागु होणार?
७) चंद्रवाल्यांचे WhatsApp, FB वेगळं असायला हवं. 
८) पृथ्वीवरील विविध चलने आणि चंद्रीय चलन ह्याचा विनिमय दर किती राहणार?

बैठक सुरु असताना अचानक जोशी धावत धावत (उडत उडत ) आत आले आणि त्यांनी एक कागद बैठकीच्या अध्यक्षांकडे दिला. अध्यक्ष अगदी प्रभावित झाले आणि त्यांनी त्या कागदावरील मुद्द्यांचे वाचन सुरु केले. 

१) तोच चंद्रमा नभात , मधु इथे अन चंद्र तिथे ह्यासारख्या असंख्य गाण्यात चंद्राचा उल्लेख आहे. सरसकट ही सर्व गाणी बदलुन त्यात पृथ्वीचा उल्लेख करणे कितपत योग्य राहील? आणि योग्य असलेल्या गाण्यांचे पुनर्लेखन करण्याची जबाबदारी कोणाची? पृथ्वीवरील कवींनी भविष्यवादी उदार दृष्टिकोन का स्वीकारला नाही?

२) प्रेयसीच्या चेहऱ्याला 'ये पृथ्वीसा चेहरा' बोलल्यास होणाऱ्या परिणामाची जबाबदारी कोणाची?

२) साळगावकर चंद्रवासीयांसाठी नवीन कालनिर्णय कधी प्रसिद्ध करणार ? संकष्टीचे काय?

३) ईद कशी साजरी होणार? 

४) चंद्र पृथ्वीवरील आकाशात जितका मोठा दिसतो त्यापेक्षा पृथ्वी चंद्रावरील आकाशात चौपट मोठी दिसते. हा दुजाभाव का?

५) पुण्याच्या लोकांना आपली संस्कृती कायम ठेवता यावी म्हणून चंद्रावर वेगळी जागा कधी मिळणार?

६) पृथ्वीवरील पुरुष आणि चंद्रावरील स्त्री (किंवा vice-versa) ह्यांनी लग्न केल्यास त्याला अंतरग्रहीय लग्न म्हणणार का? चंद्रावरील स्त्रीला पृथ्वीवर सून म्हणुन दुय्यम वागणुक मिळेल का?  

अध्यक्ष काहीसे संभ्रमात पडले होते. "ह्या सर्व प्रश्नांची उकल  आताच करणे शक्य होणार  नाही. मी  ही सभा  आता स्थगित करत आहे. पुढील बैठकीत ह्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली जाईल!!""

(तळटीप - चांगले मुद्दे सुचल्यास , वाचकांनी सुचवल्यास दुसरा भाग लिहिला जाईल , अन्यथा नाही  - आदित्य  (जोशी नव्हे !!)

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

एक धागा ...



आताशा तटस्थपणे पाहण्याची सवय झालेला संत व्हॅलेंटाईन दिवस आला आणि संपला. ह्याच दिवशी नेमकी ऑफिसातील मिटिंग रात्री साडेदहापर्यंत असणे ह्याला प्रारब्ध असं म्हणतात. म्हणजे लवकर येऊन काही कॅन्डल लाईट डिनर वगैरे केलं नसतं पण वरणभात एकत्र खाल्ला असता. 

ह्या संत व्हॅलेंटाईन दिनानिमित्त वैवाहिक जीवनातील जबाबदारी अक्षयतेचे नियम 

१) नियम १ - एका विशिष्ट कालावधीत (दिवस / आठवडा ) जगामध्ये  जबाबदारीनं वागणं आणि मौजमस्ती करणे ह्यांचा समन्वय असतो. ह्या काळात जगातील सर्व लोकांनी केलेल्या मौजमजेची बेरीज केली असता त्याला समतुल्य असं बाकीच्या लोकांचं जबाबदारीचं वागणं असावं लागतं. जिथं हा समतोल आढळत नाही तिथं गोंधळाच्या दृष्टीनं वाटचाल सुरु होते. 

२) नियम २ - एका माणसाच्या आयुष्यात जबाबदारीनं वागणं आणि मौजमस्ती करणे ह्यांचा समन्वय असतो. लग्नाआधी केलेली मौजमस्ती लग्नानंतर वादळाच्या वेगानं आपल्या अंगावर येतं आणि मग अगदी जबाबदारीनं वागावं लागतं.  ज्या माणसांच्या आयुष्याचा हिशेब लावताना जबाबदारी आणि मौजमस्ती ह्याचा समन्वय जमत नाही तिथं काहीतरी चुकू शकतं. 

सर्वसामान्य माणसांचं लग्नानंतरचं आयुष्य म्हणायला गेलं तर निरस (किंवा चाकोरीबद्ध हा अधिक योग्य शब्द म्हणता येईल)असण्याची शक्यता अधिक असते. समजा एखाद्या माणसात (ह्यात स्त्री आणि पुरुष दोन्ही आले) जीवनातील आनंद (जगभर हिंडणे, विविध कला, पाककृती ह्यांची माहिती घेणे  असा अर्थ अभिप्रेत)आयुष्यभर लुटण्याची इच्छा असेल तर लग्नानंतर त्या इच्छेचा आणि जबाबदारीचा कितीसा समन्वय साधू शकेल? तुमचा हा जीवन मुक्तपणे जगण्याचा धागा कांद्या - बटाट्याच्या रगड्याखाली अगदी दिसेनासा होतो, तो कधीच नाहीसा होत नाही पण तुमचा साथीदार त्याला किती जागृत ठेवतो किंवा त्या धाग्याच्या अस्तित्वाची जाणीव जागृत ठेवण्यास मदत करतो ह्यावर तुमच्या मनाचं चिरतारुण्य, तरुणपणातील तुमच्या प्रतिमेचं तुम्हां दोघांसाठी कायम राहणं अवलंबुन असतं. 

शेवटी जाता जाता, चिरतारुण्याला वयानुसार योग्य झालर चढवायला हरकत नाही! वरिअरच्या थिल्लरपणात आपण किती वाहवत जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न ! 

बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

कबुतरांना दाणे देणारे अविचारी जन !


सद्यकाली समाजात कोणीही उठावं आणि नवीन पायंडा पाडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुज्ञ माणसं शक्यतो मुर्खांच्या तोंडी / नादी लागत नसल्यानं काही अनिष्ट प्रथा समाजात रुढ होत चालल्या आहेत. 

स्वतः प्रत्यक्ष जीवनात कितीही चुकीची वर्तवणुक करावी पण आपल्या जीवनात भूतदयेचा एक घटक असावा म्हणुन लोक बरेच स्वकेंद्रित उद्योग करतात. एखादी स्वच्छ जागा निवडुन दररोज सकाळी अथवा विशिष्ट वेळी तिथं धान्याचे दाणे आणुन टाकावेत हा हल्ली निर्बुद्ध लोकांनी चालवलेला उद्योग. शहरात वावरणारे मोजके पक्षी शिल्लक राहिले आहेत. चिमण्या दुर्मिळ होत चालल्या आहेत आणि कावळे कसाबसा तग धरुन आहेत पण एकेकाळी शांतिदूत म्हणुन ज्ञात असलेली पण सध्या एक गलेलठ्ठ, आळशी, सर्वत्र घाण पसरवणारा पक्षी म्हणुन माझ्या मनात प्रतिमा बनवुन असलेली कबुतरं मात्र सर्वत्र वेगानं पसरत आहेत. माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं असता ही कबुतरं श्वसनाच्या भयंकर समस्या निर्माण करतात, सर्वत्र विष्ठा पसरवुन ठेवतात जी आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे आणि त्यांच्या आवाज अत्यंत संतापजनक आहे. ह्या पक्ष्यांची प्रजननक्षमता जबरदस्त आहे आणि एखाद्या भागात ह्यांची संख्या पाच सहा महिन्याच्या कालावधीत 
असंख्य पटीनं वाढू शकते ह्याचा आपण सर्वांनी अनुभव केव्हातरी घेतला असेल. 

कबुतरांचे गुणधर्म कितीही संतापजनक असले तरी त्यांचा ह्यात पुर्णपणे दोष नाही कारण शेवटी ते बुद्धिमत्तेच्या अगदी मुलभूत पातळीवरील पक्षी आहे. माझा मोठ्ठा (माझ्या भावना ठळकपणे व्यक्त करण्यासाठी मोठ्ठा हा शब्द) आक्षेप आहे तो ह्या तथाकथित दयाळु लोकांना ! आपल्या जीवनातील भुतदयेचे चेकबॉक्स टिक करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविण्याचा तुम्हांला कोणताही हक्क नाही. तुम्ही जिथं दररोज दाणे टाकता तिथं  कबुतरं आपल्या विष्ठेनं सर्व परिसर अस्वच्छ करुन टाकतात, मुक्कामाला आजुबाजुच्या इमारतीत वास्तव्याला जातात. आधीच महानगरातील विविध समस्येने गांजलेल्या नागरिकांच्या जीवनात आरोग्याच्या अधिक समस्या निर्माण करतात. इंटरनेटवर शोध घेतला असता कबुतरांपायी निर्माण होणाऱ्या अनेक आरोग्यविषयी समस्यांची यादी आढळते. ज्यांना कोणाला इतकं भूतदयेचं वेड असेल त्यांनी स्वतःच्या घरात पिंजरा ठेवून कबुतरं पाळावीत ही नम्र विनंती !

(तळटीप - ह्या पोस्टचे येत्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी इंग्लिशमध्ये भाषांतर करण्याचा मानस आहे. )

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

श्रीमंतवर्गाच्या भुमिकेतून !



ही पोस्ट लिहणं कठीण असणार आहे. खरंतर ह्यात माझ्या काही  मर्यादा स्पष्ट होणार आहेत. कोणालाही दुखवू नये ह्याचा विचार करताना एखादी गोष्ट किती निर्भीडपणे मांडु शकतो ह्याविषयीच्या माझ्या ज्या मर्यादा आहेत त्या इथं स्पष्ट होणार आहेत. आणि आतापर्यंत मी ज्या सामान्य मध्यमवर्गीय वर्गाच्या चष्म्यातुन बऱ्याचशा पोस्ट लिहिल्या त्याच्याशी विसंगत अशी ही पोस्ट असणार आहे. आणि माझ्या मनातील ह्या विषय मांडतानाचा सुसंगतीचा अभाव इथं स्पष्ट दिसणार आहे. 

ह्या आठवड्याच्या आरंभीस मुंबईतला एक डॉक्टर आपली बाईक घेऊन आपल्या साथीदारांसहित भ्रमंतीवर असताना बहुदा गुजरातमध्ये अपघातात मरण पावला. अपघाताचे कारण काय तर अचानक रस्ता क्रॉस करणारी लोक समोर आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची बाईक उलटली गेली आणि समोरुन भरधाव वेगानं येणाऱ्या अवजड वाहनाखाली तो सापडला. 

ज्यावेळी एखाद्या कारखाली येऊन माणुस मरण पावतो त्यावेळी दिल्या जाणाऱ्या बातमीला कुठंतरी श्रीमंत विरुद्ध सामान्य / गरीब वर्गलढा असं अप्रत्यक्षपणे रुप दिलं जातं. आणि श्रीमंताची चुक ह्यावर आपण हलकल्लोळ निर्माण करतो. पण ज्यावेळी सामान्य / गरीब माणसांच्या चुकीमुळे एखादा निरपराध माणुस बळी पडतो त्यावेळी मात्र फारशी चर्चा होत नाही. आता ही पोस्ट लिहिताना सामान्य आणि गरीब ह्या दोन संज्ञा एकाच अर्थानं वापरणं योग्य आहे का हा सुद्धा वादाचा मुद्दा किंबहुना हे चुकीचंच !

तटस्थपणे पाहिलं असता असं जाणवतं की आपली वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या ह्या सर्वांनी दिलेल्या बहुतांशी बातम्या ह्या सामान्य माणसाच्या नजरेतुन पाहिल्यासारख्या वाटतात. जो काही श्रीमंत वर्ग आहे त्याला काहीशी आपण बाकींच्यापासून वगळले जात आहोत अशी भावना निर्माण होत असणार. 
श्रीमंतवर्गाला आपण सर्व मध्यमवर्गीय लोक एखाद्या stereotype नजरेतुन पाहतो. काही लोक मेहनतीच्या जोरावर श्रीमंत बनतात, काहीजण वारसाहक्काने श्रीमंत झालेले असतात तर काहीजण गैरमार्गाचा वापर करुन श्रीमंत बनलेले असतात. पण सामान्यवर्ग श्रीमंतांकडे पाहताना बहुतांशी ते सारे शेवटच्या प्रकारातील असतील असाच समज करुन पाहत असतो. 

श्रीमंत लोक वरील उल्लेखलेल्या कोणत्याही मार्गाने श्रीमंत झालेले असोत बदलत्या काळानुसार श्रीमंती टिकविणे हे काही अगदी सोपं काम नसतं. त्यातसुद्धा मेहनत करावी लागते, हुशारीनं निर्णय घ्यावे लागतात, काहीसे रिस्की (धोकादायक) निर्णय घ्यावे लागतात. पण साऱ्या गोष्टी एकतर सामान्य माणसांना कळत नाहीत किंवा त्याच्याकडं सोयिस्कररित्या दुर्लक्ष केलं  जातं. 

समाजाचं फक्त श्रीमंत आणि सामान्य / गरीब ह्या दोन प्रकारात वर्गीकरण करणं चुकीचं आहे हे मी जाणुन आहे. सामान्य वर्गातुन श्रीमंतीकडे प्रवास करायला प्रत्येक काळ संधी देत असतो. आणि ह्या मार्गावर असणारे लोक नक्कीच वरील परिच्छेदात वर्णिलेले काही गुणधर्म दर्शवत असतात. 

माझा रोख आहे तो आपल्या सामान्यत्वाच्या प्रेमात पडलेल्या वर्गाकडे ! आपण सामान्य आहोत म्हणुन आम्हांला सहानुभूती मिळायला हवी अशी अदृश्य भावना ह्या वर्गात सतत वसत असते. आमच्या सर्व समस्यांसाठी सरकार जबाबदार आहे आणि त्यांनीच त्या सोडवायला हव्या अशी भावना घेऊन ह्यांच्या पिढ्यानपिढ्या वावरत असतात. काळाच्या पुढे पाहण्याच्या वृत्तीचा, चिकाटीचा अभाव असतो किंवा हे गुण आपल्यात आणि पुढील पिढीत विकसित करता येऊ शकतात ह्या जाणिवेचा पुर्ण अभाव ह्यांच्यात असतो. पिढ्यानपिढ्या सामान्यत्वाच्या प्रेमात पडलेला वर्ग हा देशाच्या / समाजाच्या प्रगतीसाठी ड्रॅग (अवजड ओझं ) बनु शकतो. संपुर्ण सामान्यत्वाने भरलेला समाज हा कोणतीही प्रगती करु शकत नाही. 

श्रीमंतांना सरसकट अयोग्य कंसात बसविणे चुकीचं आहे. श्रीमंत लोकांच्या खर्चिक वृत्तीमुळं अर्थव्यवस्थेला चालना मिळते, ते बऱ्याचवेळा रोजगार निर्मिती करतात. आपल्या राहणीमानामुळे बाकीच्या वर्गापुढं एक स्वप्न बघण्यासाठी चित्र उभं ठेवतात. आता इथं एक मुद्दा मांडला जाऊ शकतो की तू श्रीमंतांची बाजू मांडतोस पण श्रीमंत लोकांना सामान्यांची काही चिंता पडली आहे का? त्यांना सामान्य लोकांच्यात मिसळण्यास आवडतं का?  आता ही चर्चा मी एका दुसऱ्या पातळीवरुन बघू इच्छितो. ज्यावेळी सामान्यत्व आणि बेसिक एटीकेट्सचा अभाव ह्या दोन गोष्टी एकत्र येतात त्यावेळी मग श्रीमंतांनाच नव्हे तर कोणालाही संताप येऊ शकतो. आता श्रीमंती आणि बेसिक एटीकेट्स ह्या दोन गोष्टी सतत हात मिळवुनच चालतात असंही नाही पण श्रीमंती तुम्हांला बेसिक एटीकेट्सला खिडकीबाहेर फेकुन देण्याचं सामर्थ्य देते. 

सारांश - श्रीमंतांना सरसकट अयोग्य कंसात बसविणे चुकीचं आहे. त्यांच्यातील गुणांकडे सुद्धा उघड्या डोळ्यांनी पाहा. सामान्यत्व तुम्हांला दुनियेने तुमच्याकडे सहानुभूतीनं पाहावं ह्याचा परवाना देत नाही. सामान्यत्वामध्येच कायम राहिलं पाहिजे अशी विचारसरणी ठेवू नका. जाताजाता सुचलं - आर्थिक सामान्यत्व असलं तरी चालेल पण आर्थिक आणि वैचारिक सामान्यत्वाच्या एकत्र खाईतून जितक्या लवकर जमेल तितकं बाहेर या. आर्थिक किंवा वैचारिक श्रीमंतीचा पल्ला एका पिढीला गाठता येत नसला तरी प्रत्येक पिढीने त्या दिशेनं थोडी थोडी प्रगती केली पाहिजे. 

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...