मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

आपला मानूस


काल 'आपला मानूस' चित्रपट पाहिला. कोणताही चित्रपट आपण Transactional आणि Strategic अशा दोन पातळींवर पाहु शकतो. ह्या चित्रपटातील संवादांची बौद्धिक पातळी वरच्या दर्जाची असल्यानं माझ्या नकळत हा चित्रपट मी Strategic पातळीवर पाहिला आणि आजचं हे परीक्षण सुद्धा काहीसं त्या धाटणीतलं ! Strategic पातळी म्हणजे नक्की काय असा प्रश्न तुम्हांला पडला असल्यास, चित्रपटातील छोट्या घटनांकडे, कथेकडे न पाहता त्यातील मूळ संदेश कोणता दिला जात आहे ते ध्यानात घेणं म्हणजे Strategic पातळी अशी माझी समजूत आहे. 

चित्रपट नक्कीच विचार करायला लावतो. कोणत्याही एका पिढीला परिपूर्ण म्हणुन चित्रीत करत नाही. शेवटी एक इन्स्पेक्टर नानाने दोघांना दिलेला संदेश वगळता दोन्ही पिढींची बाजू बऱ्यापैकी मांडतो. 
आपलं म्हणणं ऐकून घ्यावं हे जुन्या पिढीचं म्हणणं. पण ते कशा प्रकारे आणि केव्हा (टायमिंग) मांडावं ह्या बाबतीत सुधारणेस वाव आहे हे चित्रपट सुप्तपणे सांगतो. 

सद्यकालीन बऱ्याच मुलांची स्थिती चित्रपट चांगल्या प्रकारे सांगतो. लहानपणापासुन ज्यांनी आपला सांभाळ केला ते आईवडील एकीकडं आणि जिच्या आयुष्याची जबाबदारी सांभाळण्याची स्वीकारली आहे ती पत्नी दुसरीकडं अशा द्विधा परिस्थितीत मुलगा सापडलेला असतो. 

सुनेची बाजू काहीशी खलनायकी दिशेनं जाते. पण इथंही आपलं म्हणणंच संपुर्णपणे बरोबर  आहे हे सांगण्याचा सुन प्रयत्न करते असं जाणवत नाही. 

शेवटी हीच खरी स्थिती आहे. आपण परिपुर्ण नाहीत, आपणसुद्धा कुठंतरी चुकत आहोत हे सर्वांना जाणवत असतं. पण त्यातील किती भाग खुलेपणानं सर्वांसमोर कबुल करायचा हे मात्र कळत नाही आणि खरी घालमेल इथंच होते. घरातील मोलकरीण मध्येच एक सुरेख संवाद म्हणते. आमच्याकडची भांडणं कशी रोखठोक ! जे काही मनात आलं ते स्पष्ट बोलुन टाकायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र कशी सर्व मनं स्वच्छ असतात! इथं मात्र दोन वाक्यं बोलायची आणि नंतर आतल्याआत धुमसत बसायचं. चित्रपटात  बुद्धिजीवी वर्गाचा उल्लेख येतो. पुस्तकात वाचलेली फिलोसॉफ़ी आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनात किंवा जीवनातील संवादात वापरण्याबद्दल बुद्धिजीवी वर्गाच्या मनातील संभ्रम काहीसा सद्यस्थितीस कारणीभुत आहे हे म्हटलं जातं. 

चित्रपटातील काही वाक्यं सुंदरच! 
"प्रत्येक घरातील स्थितीवर एक रहस्यपुस्तक लिहु शकतो. तुमचं पुस्तक जगासमोर आलं इतकंच !"
"जर एखाद्याला गुन्हेगार ठरवायचं झालं तर फक्त त्याच दिशेनं हवे तितके पुरावे गोळा करता येऊ शकतात!"
सुमित राघवन आपल्या बाबांना एका क्षणी मनापासुन म्हणतो. "इथं कोणीही संपुर्णपणे परिपुर्ण नाही, पण निरपेक्ष प्रेमाची शेवटची आशा म्हणुन मी तुमच्याकडं पाहिलं आणि जेव्हा तुम्ही ह्या अपेक्षेला पुरे पडू शकला नाहीत, तेव्हा माझा भ्रमनिरास झाला आणि माझं खरं नैराश्य ते आहे !"
बाप, मुलगा आणि सुन ह्या त्रिकोणी कुटुंबाला दिलेली काटकोन त्रिकोणाची उपमा सुरुवातीला भावणारी पण नंतर तिचा काहीसा अतिरेक झालेला!

आता माझा सारांश - कोणतंही नातं टिकायला त्याचं दायित्व कोणीतरी घ्यायला हवं !  कोणत्याही नात्यात जबाबदारीची, दुसऱ्यांच्या चुका माफ करण्याची रेषा मध्यबिंदूवर आखता येते. पण ज्यावेळी ह्या मध्यबिंदूच्या मापनावरच नात्यातील सहभागी लोकांची शक्ती वाया जाते त्यावेळी नातं खऱ्या अर्थानं संपुष्ट पावतं. नवी पिढी आणि जुनी पिढी ह्यांच्या नात्याचं सुद्धा काहीसं असंच असतं. दोन्ही बाजूंची आयुष्यातील स्थिती पाहता नव्या पिढीनं ह्या नात्याचं दायित्व घ्यावं आणि आपली जबाबदारी मध्यबिंदूच्या पलीकडं न्यावी असा संदेश हा चित्रपट देतो आणि मला तो पटला !

बाकी आता शेवटचा काही भाग Transaction पातळीवर ! सुमित राघवनचा अभिनय सुरेखच आणि तो मस्त फिट वाटला. त्या प्रभावाखाली एक दोन दिवस व्यायाम करायला हरकत नाही. इरावती हर्षेनं सुद्धा चांगला अभिनय केला! ही गुणी अभिनेत्री इतके दिवस कुठं गायब झाली होती असं एखाद्या जाणकारासारखं मी म्हणायला हरकत नाही. नाना पाटेकर ह्यांच्या अभिनयाविषयी काही कंमेंट्स द्यायची माझी पात्रता नाही. पण त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणि अभिनयातील भारदस्तपणा चित्रपटाची पातळी टिकवुन ठेवतो. ह्या तिघा गुणी कलावंतांनी चित्रपटाचा डोलारा अगदी समर्थपणे पेलला आहे. 

जाता जाता गंमतीचा प्रसंग ! चित्रपटाच्या शेवटी नाना सुमित आणि इरावतीला आपण संशयाची सुई इथं तिथं का फिरवत राहिलो आणि त्यातुन आबांची बाजु कशी आपणास मांडायची होती हे समजावुन सांगतो. सुमित, इरावतीसोबत सारं चित्रपटगृह अगदी भावुक होतं. शेवटी सुमित उभा राहतो, नानाला मिठी मारतो. काहीशा विलंबाने कठोर नानाचे हात सुद्धा सुमितच्या पाठीवरुन फिरतात. मराठी भावुकतेची महत्तम पातळी गाठणारा हा क्षण! क्षणभर थांबुन सुमित दाराबाहेर पडतो. हे सर्व बाजुला उभं राहून पाहणारी इरावती जायला निघते. संपुर्ण मराठी थिएटरच्या मनातील भावना खट्याळ प्राजक्ता बोलुन दाखवते "पाया पडते !" अगदी पिनड्रॉप सायलेन्स असल्यानं सर्व थियेटर तिचे दोन शब्द ऐकते. पण आम्हां सर्वांची घोर निराशा करुन इरावती एका सेकंदात तशीच घराबाहेर पडते. प्राजक्ताच्या वाक्यानंतर दुसऱ्या सेकंदाला पुढील दोन रांगा सोडून बसलेली बाई म्हणते, "नाही पडली!"  संपुर्ण थियेटर हास्यकल्लोळात बुडून जातं!!

पुढं बाहेर पडता पडता एक बाई आपल्या परप्रांतीय मैत्रिणीला फोन करुन 
तुमच्या घरातील सर्वांनी हा चित्रपट कसा बघायलाच हवा हे पटवुन सांगत असते !! 

1 टिप्पणी:

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...