विमानांना आपल्या प्रवासात Turbulence अर्थात वादळी हवामानास तोंड द्यावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरली जाणारी विमानं भलीमोठी असल्यानं आतल्या प्रवाशांना हा Turbulence बऱ्याच वेळा कमी प्रमाणात जाणवतो. पण तुम्ही youtube वर शोधलं असता Turbulence ने घाबरलेल्या प्रवाशांचे अनेक विडिओ पाहावयास मिळतील. अशावेळी विमानं अचानक कित्येक फूट / मीटर खाली जातात. मराठी प्रवाशांवर अशी परिस्थिती ओढवली असता अनेक पिढ्यांपासुन वापरात असलेलं "भीमरुपी महारुद्रा" स्तोत्राचं स्मरण करावं हा लेखकाचा सल्ला ! आंतरदेशीय प्रवासासाठी वापरलं जाणारं हे छोटूस विमान. ह्यात केवळ १८ रांगा आणि ५४ सीट्स होत्या आणि त्यात मला १८ वी रांग मिळाली. सुदैवानं मारुतीरायाची आठवण करायची वेळ आली नाही.
आंतरदेशीय विमानांत बऱ्याच वेळा टुकार खानपान सेवा आढळुन येते. ह्या टूकारपणाच्या बाबतीत भारतीय आंतरदेशीय सेवा परवडल्या असं म्हणण्याची वेळ अमेरिकन आंतरदेशीय सेवा पाहिल्यानंतर येते. तिथं बऱ्याच वेळा pretzel किंवा खारवलेले शेंगदाणे खाऊन वेळ मारुन नेण्याची पाळी येते. ह्यावरुन आठवली ती इंडिगोची मुंबई हैद्राबाद फ्लाईट! ह्यात जर तुम्ही ६ क्रमांकांची सीट घेतली असेल तर हवाईसुंदरी ज्याप्रकारे स्नॅक्स सर्व्ह करतात त्या क्रमवारीमध्ये तुम्हांला सर्वात शेवटी स्नॅक्स मिळतं. अवघा एका तासाची उड्डाण वेळ असणारं हे फ्लाईट ! त्यात तुम्हांला साधारणतः ३५ व्या मिनिटाला स्नॅक्स मिळु शकतं आणि मग लुटुपुटीचा पाच मिनिटाचा वेळ देऊन हवाई सुंदर / सुंदरी तुमच्याकडे आवरणांची मागणी करायला येतात. एखादा पुणेकर ह्या प्रसंगी त्यांना काय उत्तर देतो हे पाहण्यासाठी अशा नमुनेदार पुणेकराची मुंबई हैद्राबाद हवाई सहल प्रायोजित करायचा मी विचार करतोय.
३५००० फुटावर आपला मेंदु जमिनीवरील आपल्या मेंदूपेक्षा काहीसा वेगळा विचार करतो हे मला माहीत नव्हतं. पण मी ज्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्री श्रद्धा कपूर ह्यांचा हाफ गर्लफ्रेंड हा चित्रपट साधारणतः एक तासभर मन लावून पाहिला त्यावेळी मी दचकलो. आणि मग मन ताळ्यावर आणण्यासाठी मी The Circle सारखे २०१७ सालातील सोशल मीडियाच्या अतिरेकी व्यावसायिकरणाचे दुष्परिणाम दाखविणारा चित्रपट पाहिला.
आता थोडं गंभीर होऊयात! बऱ्याच वेळा आपण Lufthansa किंवा British Airways सारख्या एअरलाईन्सने प्रवास करताना आशियाई शाकाहारी जेवण किंवा भारतीय हिंदू मीलची आगाऊ नोंदणी करतो. परंतु बऱ्याच वेळा हे अगदीच टुकार निघण्याची शक्यता असते. मागील आठवड्यात अगदी सुगंधी, चांगल्या फुललेल्या बासमती भातासोबत केवळ कांदा घालुन उकडलेले छोले मला देण्यात आले. त्याआधी स्टार्टर म्हणुन सुद्धा हेच छोले, lettuce आणि कांद्यासोबत मला देण्यात आले होते. जवळपास तशीच पूर्ण प्लेट परत करताना त्या जर्मन हवाईसुंदरीने असे जेवण पुरविल्याबद्दल खेद व्यक्त केला. मग ह्यापासून धडा घेऊन पुढील टप्प्यात मी चक्क हवाईसुंदरीने सुचविलेली जर्मन डिश मागविली. आणि ती जबरदस्त चविष्ट निघाली. ज्या गावी जावं तिथल्या स्थानिक डिशेस चाखुन पाहाव्यात असं म्हणतात त्याची आठवण झाली.
तुम्ही जर अमेरिकेला जात असाल तर हल्ली थेट फ्लाईट उपलब्ध आहेत. त्यांचा अवधी १५ - १६ तास असतो. इतका वेळ विमानात सतत बसणं अवघड असु शकतं पण ह्याउलट तुम्ही युरोपात / पुर्व आशियात उतरुन जात असाल तर तुम्हांला परत सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या सुरक्षातपासणीचा, मैलभर लांब असणाऱ्या गेटचा शोध घेण्याची जबाबदारीचा सामना करावा लागतो.
ज्यावेळी तुम्ही विमानातुन उतरत असता त्यावेळी अगदी लोकल ट्रेनमधुन उतरल्यासारखी घाई करु नये. आपण प्रवेशद्वाराच्या दिशेनं जात असताना जी मंडळी त्यांच्या सीटवरुन बाहेर पडण्यासाठी थांबुन राहिलेली असतात त्यांना प्रथम बाहेर पडण्याची संधी द्यावी, जमलं तर "After You" वगैरे म्हणावं! दाराशी हवाई सुंदर / सुंदरी आपल्याला Thank You म्हणत असतात, अशा वेळी केवळ आपल्याला आवडलेल्या हवाई सुंदरीलाच "Thank You" न म्हणता सर्वांना Thank You म्हणावं.
युरोपात थांबा असला की विमानातुन उतरल्यावर आपल्याला दुसऱ्या उड्डाणासाठी असणाऱ्या गेटचा शोध घ्यावा लागतो. फ्रँकफर्ट विमानतळावर A,B,C,D टर्मिनल नंतर बहुदा थेट Z टर्मिनल आहे. जर तुमचं अमेरिकेहून फ्रँकफर्टला किंवा मुंबईहुन फ्रँकफर्टला येणारं विमान उशिरानं आलं तर तुमचं जोडणी विमान (connecting flight) चुकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यात आधी आलेलं विमान Z टर्मिनलवर असेल आणि जोडणी विमान समजा C टर्मिनलवर असेल तर तुम्हांला मोठी पायपीट आणि ट्रेनचा प्रवास करावा लागतो.
ह्या पायपिटीदरम्यान तुम्हांला विविध टर्मिनलची दिशा दर्शविणाऱ्या पाट्यांकडे लक्ष ठेवावं लागतं. ह्या प्रवासात मग तुम्हांला पुन्हा एकदा सुरक्षा तपासणीस सामोरं जावं लागतं. अमेरिकेला जाताना तिथल्या स्त्री अधिकारीने मला जणु काही ती अमेरिकेची इमिग्रेशन अधिकारी आहे ह्या थाटात प्रश्न विचारले. "तुम्ही अमेरिकेला का जात आहात?" ह्या तिच्या प्रश्नाला - "घरी करमत नाही", "मुंबईच्या ट्रॅफिकला वैतागलो", "अमेरिकेचा बर्फ पाहायचा आहे" "तात्यांना भेटायचं आहे!" आणि तत्सम उत्तरांपैकी एक उत्तर द्यायचा मला मोह झाला होता. थोडं गंभीर होत - ह्या सुरक्षा तपासणीत तुम्हांला आपलं लक्ष एकाग्र ठेवत, सामानाकडे लक्ष ठेवणं आवश्यक असतं. हे अधिकारी इथं येणारा प्रत्येकजण सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याचा माणुस असु शकतो ह्या मानसिकेत असल्यानं त्यांच्याशी आदरानं वागावं. सुरक्षा तपासणी झाली की मग पुन्हा ड्युटी फ्री शॉप, लाउंज वगैरे प्रकार असतात. तिथं उपलब्ध वेळ, आपली आवड, मदिरेची ओढ ह्या घटकांनुसार वेळ घालवावा. इथं फ्रँकफर्ट - पुणे विमानाची नोंद बोर्डवर पाहुन मी धन्य झालो. फ्रँकफर्ट - ड्युटी फ्री शॉपमध्ये चॉकोलेट घेतल्यावर विक्रेत्यानं माझं (आणि सर्वांचंच) पारपत्र तपासुन पाहिलं.
(क्रमशः )
भाग २
भाग १
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा