मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग ४

Lounge चा आनंद घेत असताना किंवा एकंदरीतच एकट्याने प्रवास करीत असताना आपल्या सामानावर बारकाईने लक्ष द्यावे. कोणत्याही क्षणी आपले सामान नजरेआड होता कामा नये. Restroom चा वापर करताना देखील आपल्या बँग्जस आपल्या सोबत घेऊन जाणे इष्ट.

Travel Light ही उक्ती शक्य तितक्या प्रमाणात आचरणात आणावी. त्याचा एकट्याने प्रवास करताना विशेष फायदा होतो.
युरोपातुन किंवा पुर्व आशियाई देशातुन विमानाने अमेरिकच्या दिशेने उड्डाण केलं की त्या प्रवासात तुम्हांला कधीतरी अमेरिकेतील कस्टम अधिकार्यांना द्यावा लागणारा अर्ज देण्यात येतो. तो तुम्हांला काळजीपूर्वक भरावा लागतो. मी मागील भेटीत हा अर्ज भरला तेव्हा केवळ पहिल्या प्रश्नाचे (Are you on Business visit) उत्तर हो असे होते. बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं नकारार्थी होती. आपल्या चेकइन बँग्जसमध्ये नक्की काय आहे ह्याची आपल्याला माहिती असावी.
अमेरिकत उतरल्यावर बाह्यगमनाच्या सुचना पाळत गेल्यास आपली गाठ अमेरिकन immigration officer ह्या व्यक्तीशी पडते. आपली सर्व विनोदबुद्धी, वाह्यातपणा ह्या इसमाशी बोलताना बाजूला ठेवून द्यावा.

आपण ह्या अधिकार्याचे शंकासमाधान केले की मग आपल्या फिंगरप्रिंट घेण्यात येतात. डाव्या हाताची चार बोटं, डाव्या हाताचा अंगठा, उजव्या हाताची चार बोटं, उजव्या हाताचा अंगठा अशा क्रमाने ठसे घेण्यात येतात. तुम्हांला व्हिसा देण्यात येताना जे ठसे घेतले जातात त्यांच्याशी हे ठसे जुळवून पाहिले जात असावेत.

शेवटी एकदाचे हे महाशय तुमच्यावर प्रसन्न झाले की तुमच्या पासपोर्टवर शिक्का मारतात. अमेरिकेच्या ह्या भेटीत तुम्ही किती काळ वास्तव्य करू शक्यता ह्याची नोंद तुमच्या पासपोर्टवर केली जाते. ह्या मुदतीचे उल्लंघन करण्याचा विचारसुद्धा मनात आणु नये.
Immigration officer नं तुम्हांला पासपोर्ट शिक्कामोर्तब करून दिला की तुम्ही आपले चेकइन लगेज ताब्यात घेऊन कस्टमच्या दिशेनं जाता. इथला अधिकारी तुमच्याकडे काही आक्षेपार्ह सामान नाही ना याची तपासणी करतो. तुम्ही कोणत्याही प्रकारची बी बियाणे आणली नाही ना हा त्यांचा आवडता प्रश्न असतो. अरे मित्रा हल्ली वसईच्या वाडीत जायला वेळ नाही तर इथं बर्फाळ वातावरणात शेती करण्यात मला अजिबात रस नाही असं उत्तर देणं शक्य झाले तर टाळावं.

बाकी अमेरिकेत आंतरराज्य विमानप्रवास करताना भारतातुन आणलेल्या वजनदार बँग्जस तुम्हांला डोकेदुखी ठरु शकतात. आंतरराज्य विमानप्रवास हा तुमच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचाच सलग भाग असेल तर ठीक नाहीतर तुम्हांला प्रत्येक एअरलाईन्सनुसार डाँलर्स द्यावे लागतात. अमेरिकन एअरलाईन्सचा दर एक बँग २५ डाँलर्स, दोन बँग्जस ६० डाँलर्स आणि तीन बँग्जस २१० डाँलर्स असा चढ्या दराने आहे.
अमेरिकेतील वास्तव्याचा आनंद घेऊन झाला आणि सोशल मीडिया गाजवुन सोडलं की मग तुम्हांला परतीच्या प्रवासाचे वेध लागतात.

जर परतीच्या प्रवासात तुम्हांला आंतरराज्य विमानप्रवास करावा लागणार असेल तर त्या प्रवासाला तुमच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचा भाग बनविणे श्रेयस्कर! माझ्याकडून ही चुक दोन वेळा झाली आहे. आताच उदाहरण द्यायचं झालं तर कोलंबस ते फिलाडेल्फिया हे वेगळं तिकीट आणि फिलाडेल्फिया -   फ्रँकफर्ट -मुंबई हे वेगळं तिकीट असं आरक्षण मी केलं. ह्यात दोन प्रकारच्या गैरसोयी होतात. फिलाडेल्फियाला आपल्या बँग्जस ताब्यात घेऊन terminal F ते terminal A हा प्रवास स्वतः करावा लागला. आणि आतुन हा मार्ग न सापडल्याने मी हे मार्गक्रमण उणे किती तरी तापमानात केलं. आणि हो ट्रोली फुकटात मोजक्या देशात मिळतात, अमेरिकेत नाही.
दुसरा तोटा म्हणजे तुमच्या आंतरराज्य विमानास उशीर होऊन तुमचे आंतरराष्ट्रीय विमान चुकल्यास ती तुमची जबाबदारी असते आणि त्यामुळे तुम्हांला जबरदस्त आर्थिक भुर्दंड पडू शकतो. सुदैवाने माझ्यावर हा प्रसंग ओढवला नाही.

चार भागांची ही मालिका इथं आटोपती घेतोय. माझ्यापेक्षा बराच जास्त प्रवास केलेले अनेक लोक आहेत. पण त्यातले बरेच जण लिहायचा कंटाळा करतात, पण मी करत नाही. त्यामुळं इथली माहिती परिपूर्ण नसली तरी गोड मानुन घ्यावी.

समाप्त

भाग पहिला
http://patil2011.blogspot.in/2017/12/blog-post_19.html

भाग दुसरा
http://patil2011.blogspot.in/2017/12/blog-post.html

भाग तिसरा
http://patil2011.blogspot.in/2017/12/blog-post_20.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नाच ग घुमा !

  शहरी दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक असणाऱ्या, घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांवर आधारित हा एक सुरेख चित्रपट!  नम्रता संभेराव, मुक्ता बर्वे...